Wednesday, January 25, 2017

गॉर्डन के आणि Allo Allo

काल संध्याकाळी सहज रावांचा मेसेज आला. “गॉर्डन के यांचं देहावसान झालं.” मला संदर्भ लागेना. मग पुढचा मेसेज आला, “Allo Allo मधले कलाकार”. मग लक्षात आलं की सहज रावांच्या मनात, “बऱ्यापैकी माहिती बाळगून असणारा माणूस” अशी प्रतिमा बनवण्यात मी यशस्वी झालो आहे. पण एका प्रतिमेच्या साच्यात मी अडकण्याचा धोका ओळखून, स्वर्गवासी गॉर्डन साहेबांनी जाता जाता माझ्या माहितीच्या छोट्या परिघाची मला जाणीव करून दिली. त्यात रात्री सोसायटीच्या मीटिंगमुळे उशीर झाला आणि माहितीचा परीघ आपल्या मर्यादेतच राहिला. पण सकाळी थोडा वेळ मिळाल्यावर ‘आलो आलो’ शोधलं. यु ट्यूबवर व्हिडीओ मिळाला. तो पाहताना सारखा हसत राहिलो आणि मनातल्या मनात सहज रावांचे आभार मानले. बोलणाऱ्याला / लिहिणाऱ्याला त्याच्या विषयाची माहिती असायलाच हवी, हा नियम मी कसोशीने पाळतो. पण आज ‘Allo Allo’चा व्हिडिओ बघितल्यावर या नियमातून स्वतःला सूट द्यायचं ठरवलं. त्यामुळे केवळ एकंच व्हिडिओ बघून हा लेख लिहिला आहे.
७५ वर्षाचे गॉर्डन के, ब्रिटनच्या हडर्सफील्डमध्ये १९४१ मध्ये जन्मले. इंग्लडमध्ये (आणि युरोपातील काही इतर देशातसुद्धा) हॉस्पिटल रेडिओ म्हणून एक व्यवस्था आहे. यात हॉस्पिटलमधल्या पेशंटसाठी विशेष रेडिओ स्टेशन्स स्वयंसेवकांच्या सहाय्याने चालवली जातात. यावर संगीताचे विविध कार्यक्रम चालतात. एकट्या इंग्लंडमध्ये २३० च्या आसपास अशी हॉस्पिटल रेडिओ स्टेशन्स आहेत. गॉर्डन साहेब हडर्सफील्डमधल्या एका हॉस्पिटल रेडिओ स्टेशनमध्ये स्वयंसेवक होते. त्यांनी टेक्सटाईल मिल्स, वाईन फॅक्टरी आणि ट्रॅक्टर फॅक्टरीमध्ये कामे केली. यातच सर अॅलन ऐकबॉर्न यांनी दिग्दर्शित केलेल्या रेडिओवरील नाटकात काम करण्याची त्यांना संधी मिळाली. आणि मग त्यांच्याच सल्ल्याने गॉर्डन, बोल्टन ऑक्टागॉन थियेटर मध्ये ऑडिशनला गेले. तिथून त्यांची रंगमंच कारकीर्द सुरु झाली. मग १९६८ मध्ये बीबीसी मध्ये ते कलाकार म्हणून काम करू लागले. सुरवातीला फुटकळ रोल्स करत असताना तेथील अतिशय यशस्वी लेखक आणि निर्माते डेव्हिड क्रॉफ्ट यांच्या Are You Being Served? या विनोदी मालिकेत त्यांनी काही स्मरणीय भूमिका केल्या. आणि डेव्हिड क्रॉफ्टवर त्यांची चांगलीच छाप पडली.
Are You Being Served? मालिका संपत आली होती. डेव्हिड क्रॉफ्ट नवीन विषयाच्या शोधात होते. त्यांच्या मित्राने युद्धकाळ दाखवणाऱ्या मालिकांचे विशेषतः Secret Army या मालिकेचे विडंबन करूया असे सुचवले.
Secret Army ही मालिका १९७७७ -१९७९ मध्ये बीबीसीवर दाखवली जात होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणाऱ्या या मालिकेत जर्मनीचा प्रतिकार करणारे एक बेल्जीयन युनिट, हॉटेल मालक असलेला तिचा एक सदस्य, त्याची आजारी बायको, रखेल, वेट्रेस, त्याच्या हॉटेलात येणारे जर्मन अधिकारी, आणि त्यांच्या संभाषणातून ब्रिटिश सैन्याला मिळणारे संदेश; असा असा सगळा जामानिमा होता.
क्रॉफ्टना ही कल्पना आवडली. आणि त्यातून जन्म झाला “Allo Allo’’ चा. आणि सुरू झाला गॉर्डन केंच्या आयुष्यातील सुवर्णाध्याय. क्रॉफ्टनी मालिकेची संहिता लिहिली आणि गॉर्डनकडे पाठवताना सांगितले की गॉर्डनने यातील रेने आर्टोईसची भूमिका करावी. गॉर्डनने भूमिका स्वीकारली आणि पुढे १९८२ ते १९९२ अशी दहा वर्षे ते रेनेची भूमिका करत होते. मालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ भागात आणि मालिकेच्या १२०० पेक्षा अधिक रंगमंचीय सादरीकरणात ते रेने बनून प्रेक्षकांना हसवत राहिले. रेने त्यांच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झाला होता की १९८९ मध्ये त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नावही Rene & Me: A Sort of Autobiography ठेवले होते. हॉटेलमधले शेफ घालतात तसा ऍप्रन घातलेला रेने ही त्यांची कायमची प्रतिमा बनली. मालिका संपल्यावर एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘खरं सांगायचं म्हणजे, मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेसाठी बनलोच नव्हतो.’
काय होतं Allo Allo मध्ये? रेने आर्टोईस हा जर्मनीने जिंकून घेतलेल्या फ्रान्समधल्या Nouvion गावातला एक मध्यमवयीन हॉटेल मालक. त्याच्या बरोबर असते एक साधारण दिसणारी, बेसूर गाणारी, वेंधळी बायको आणि अंथरुणाला खिळलेली कटकटी बहिरी सासू. ती इतकी कटकटी असते की रेने म्हणतो, ‘देव तिला लवकर उचलत नाही कारण त्याला पण स्वतःची शांती गमवायची नाही’. त्याच्या हॉटेलात दोन सुंदर वेट्रेसेस काम करत असतात. त्या दोघींबरोबर रेनेच्या भानगडी चालू असतात. आणि जेव्हा कधी रेनेची बायको त्याला रंगेहाथ पकडते तेव्हा तो तिला काहीतरी कारण सांगून तिचा संशय दूर करण्यात कायम यशस्वी होतो. त्याच्या हॉटेलात अनेक जर्मन अधिकारी येतात. त्यांच्याशी गोड बोलून कधी स्वतःचे शब्द तर कधी वेट्रेसेसचे सौंदर्य वापरून त्यांची मर्जी राखत असतो. त्याच्या बदल्यात रेशनचे नियम धुडकावून जास्तीचे रेशन मिळवत रहातो.
मग त्याच्याकडे येते एक ब्रिटिश अधिकारी. ती सांगते, की जर्मन अधिकाऱ्यांचा त्याच्यावर चांगला विश्वास आहे यामुळे त्याच्या हॉटेलात कोणी धाड मारणार नाही. म्हणून त्याच्या हॉटेलात दोन ब्रिटिश सैन्याधिकाऱ्यांना लपवायचे आहे. रेने घाबरतो. पण तयार होतो. ब्रिटिश मुख्यालयाशी संपर्क साधण्यासाठी सासूच्या खोलीत रेडिओ ट्रान्समिशन यंत्र बसवतो. रेनेचे उच्चार फ्रेंच हेल असलेले असल्याने, तो हॅलो हॅलो बोलण्याच्या ऐवजी ‘आलो आलो’ बोलतो. म्हणून मालिकेचे नाव ‘आलो आलो’.
तोपर्यंत जर्मनीहून गेस्टापो अधिकारी येतो. हिटलरने त्याला The Falling Madonna चे प्रसिद्ध चित्र शोधून आणायची जबाबदारी दिलेली असते. ते चित्र रेनेकडे नेहमी येणाऱ्या जर्मन अधिकाऱ्याने स्वतःसाठी ठेवलेले असते. त्याला गेस्टापोची भीती वाटते. म्हणून तो ते चित्र लपवायला रेनेच्या हॉटेलात येतो. आता रेने कैचीत सापडतो. एकाचवेळी तो बायको आणि वेट्रेस, सासू आणि बायको, लपवलेले ब्रिटिश अधिकारी आणि लपवलेल्या मौल्यवान कलाकृती, अश्या गोंधळात सापडतो. त्याबरोबर हा गोंधळ वाढवायला मधून मधून गेस्टापो आणि ब्रिटिश गुप्तहेर तिथे येत रहातात.
या मालिकेतली अजून एक धमाल म्हणजे, यात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि इटली या चार देशातले लोक येतात. पण चार भाषा वापरल्या तर मग मालिका समजायला कठीण जाईल म्हणून सगळे संवाद इंग्रजीतून बोलले जातात. फक्त वेगवेगळ्या देशाचे लोक आपापली विशिष्ट हेल काढून बोलतात. त्यामुळेच रेने ‘आलो आलो’ बोलतो. गंमत अशी की फ्रेंच पात्रांनी फ्रेंच हेल असलेल्या इंग्रजीतून बोललेले संवाद आपल्याला कळतात आणि मालिकेतल्या फ्रेंच पात्रांना कळतात पण त्यावेळी समोर असलेल्या इतर देशातील पात्रांना काळात नाहीत. तीच गत जर्मन हेल असलेल्या इंग्रजीची. ते प्रेक्षकांना कळते आणि जर्मन पात्रांना कळते पण इतर पात्रांना काळात नाही. त्यामुळे अजून धमाल येत रहाते.
यु ट्यूबवर मला याचे बरेचसे भाग मिळाले आहेत. त्यामुळे किमान ८५ रात्री तरी रेनेच्या संगतीत हसत हसत जातील.
हे असे दुसऱ्यांदा झाले आहे. याआधी जॉर्ज कार्लिनशी ओळख झाली ती २००८ मध्ये त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर. आणि आता गॉर्डन केशी ओळख झाली सहज रावांमुळे, गॉर्डन साहेबांच्या स्वर्गवासाच्या दिवशीच.
आता बहुतेक गॉर्डन साहेब, परम कृपाळू दयाघन परमेश्वराला प्रेक्षकाच्या भूमिकेत बसवून रेनेच्या गमती करत हसवत असतील. आणि कदाचित हसून तृप्त झालेल्या ईश्वराच्या आनंदामुळे जगात सर्वत्र आनंदी आनंद नांदू लागेल.


No comments:

Post a Comment