Saturday, April 22, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ९)



फार प्राचीन काळापासून जगभरातील इतर मानवसमूहांप्रमाणे भारतीय उपखंडावरील मानवसमूहांतदेखील भेदभावावर वसलेली, शोषणकारी, अन्यायकारी, दमनकारी समाजव्यवस्था होती. त्यामुळे जुन्याला कंटाळून भारतीय उपखंडातून आणि नवीन संधीच्या शोधात भारतीय उपखंडाकडे अनेकांचे निर्गमन कायम होत राहिले आहे. जे भारत सोडून गेले ते तिथे इथली संस्कृती घेऊन गेले. जिथे गेले तिथल्या भेदभावाशी जुळवून घेत स्वतःचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करत राहिले. जे इथे आले त्या सर्वांना आपापल्या मगदुराप्रमाणे स्थान मिळत गेले. जे आक्रमक होते त्यांना राज्यकारभारात, व्यापारी होते त्यांना व्यापारात आणि स्वतःची कुठलीही प्रबळ सामाजिक किंवा राजकीय आकांक्षा नसलेल्यांना इतर शोषितांच्या समूहात सामावून घेण्याच्या नोंदींनी भारतीय इतिहासाची अनेक पाने भरलेली आहेत. जणू काही या भूमीतून जगभर होणारे आणि जगभरातून इथे होणारे जनसमूहांचे निर्गमन म्हणजे मोसमी वाऱ्यांसारखी निरंतर चालणारी व्यवस्था होती. आणि जगभरातून निर्गमित होऊन भारतात स्थायिक होणाऱ्या लोकांनी बरोबर आणलेल्या संस्कृतींच्या वर्षावात भारतीय उपखंडातील वेगवेगळे भूभाग वेगवेगळ्या वेळी चिंब भिजत होते. कुठे संस्कृतीचा महापूर तर कुठे असंस्कृतपणाचा दुष्काळ पडत होता.

उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला समुद्र या नैसर्गिक सीमांमध्ये एक मोठे संस्कृतीसरोवर तयार झाले आणि येणाऱ्यांच्या विविध संस्कृती या सरोवरात आपापल्या परीने भर घालत एकमेकांशेजारी नांदत राहिल्या. एकाच विस्तीर्ण जलाशयात कुठे नितळ पाणी, कुठे शेवाळं, कुठे पाणवनस्पतींचे जंगल, कुठे खोल डोह, कुठे स्वतःभोवती गिरक्या घेणारा भोवरा असावा त्याप्रमाणे भारतीय उपखंडात विविध संस्कृती साचत राहिल्या. एकमेकांवर परिणाम करत आणि एकमेकांचे आघात झेलत राहिल्या.

या उपखंडावर जन्म घेणारी प्रत्येक पिढी जणू या संस्कृतीसरोवराच्या मध्यभागी जन्माला येत होती आणि या प्रत्येक पिढीला आपला भूतकाळ आपल्या मागे दिसण्याऐवजी आपल्यापुढे सरोवराच्या काठाकडे विस्तारीत होत जाताना दिसत होता. ज्या दिशेला तोंड फिरवू त्या दिशेला भूतकाळाचा विस्तारणारा एक अंश दिसेल अशी ही व्यवस्था. सर्वांनी एकाच दिशेने पाहावे अशी सक्तीदेखील नाही. त्यामुळे कुणी रामाला पूज्य मानावे तर कुणी कृष्णाला. कुणासाठी परशुराम पूजनीय व्हावा तर कुणासाठी बळीराजा. कुणी विष्णुभक्त व्हावे तर कुणी शिवभक्त. कुणी लक्ष्मीची पूजा करावी तर कुणी सरस्वतीची. कुणी सगुण साकाराच्या चरणी लीन व्हावे तर कुणी निर्गुण निराकाराच्या साधनेत स्वतःला हरवून बसावे. कुणी पूजेसाठी 'पत्रं पुष्पं फलं तोयं' म्हणावे तर कुणी पंचमकाराशिवाय पूजाविधी अशक्य समजावे. कुणी अहिंसा परमोधर्म म्हणून राज्य करावे तर कुणी स्वतःच्या बापाला मारूनच गादीवर यावे. इतकी विविधता असलेल्या या समाजात एक संकल्पना मात्र खूप खोलवर रुजली आणि तिने या समाजातील व्यक्तींच्या जीवनधारणेत आमूलाग्र बदल घडवून आणला.

मर्त्य शरीर - अमर आत्मा, पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पना सर्व धर्मात आहेत. प्राचीन इजिप्शियन लोकांच्या धर्मात तर मृत व्यक्तींना पुनर्जिवित करण्यात येईल अशीही संकल्पना आहे. पण भारतीय उपखंडात या सर्वांहून वेगळी संकल्पना जन्माला आली. ती म्हणजे ‘पुनर्जन्म’.

या संकल्पनांमुळे प्रत्येक व्यक्तीला, या जन्मीच्या दुःखांना सहन करण्याचे एक अत्यंत प्रभावी कारण मिळाले. या जन्मात इतरांकडून आज्ञापालन करवून घेण्यासाठी त्यांच्या पुढील जन्मीच्या सुखांची लालूच देणे शक्य झाले. मालक आणि गुलाम हे नाते क्रूर असेल तर पुनर्जन्म ही क्रूरतेची परमावधी आहे. समजायला सोपी अशी कर्मफल संकल्पना जर पुनर्जन्म संकल्पनेला जोडली तर त्यामुळे होऊ शकणारे शोषण आपल्या कल्पनेबाहेरचे आहे.

व्यक्तीला व्यक्तीची गुलामी करायला लावता येते. गुलामांचे जिणे जनावरासमान असते. गुलामाला कुटुंब नसते. त्याला देहेच्छा पूर्ण करायला जोडीदार मिळेल पण ते संबंधदेखील जनावरांसारखेच असतात. त्यामुळे गुलामाला स्त्रीवर अधिकार गाजवता येत नाही. स्वतःची हक्काची बायको, किंवा स्वतःचा हक्काचा नवरा हा विशेषाधिकार गुलामांना नसतो. त्यामुळे गुलामांची मुले गुलाम म्हणूनच जन्माला येतात. गुलामीची व्यवस्था खुली असते. एखादया व्यक्तीचा गुलामी व्यवस्थेत प्रवेश तीन प्रकारे होऊ शकतो. जन्मदास (गुलाम स्त्रीला झालेली मुले), जितदास (युद्धात जिंकून गुलाम बनवलेले) आणि क्रितदास (विकत घेतलेले गुलाम) असे ते तीन मार्ग आहेत.

गुलामीतही कर्मफल संकल्पना आहे. तुम्ही जे भोगता त्याचे कारण तुमचे कर्म आहे. पण ते कर्म या जन्मीचे आहे. म्हणून गुलाम बंड करू शकतात. गुलाम पळून जाऊ शकतात. गुलाम स्वतंत्र होऊ शकतात किंवा केले जाऊ शकतात. एकेकाळचा गुलाम नंतर आपल्या पदरी इतरांना गुलाम ठेवू शकतो किंवा एके ठिकाणचा गुलाम दुसरीकडे पळून जाऊन सम्राटदेखील बनू शकतो. गुलामी क्रूर असली तरी तिच्यात स्वातंत्र्याची अंधुकशी का होईना पण एक शक्यता असते. गुलामाला गुलामीची जाणीव असेल तर तो स्वातंत्र्याचा प्रयत्न करू शकतो. त्याने असा प्रयत्न करणे शिक्षेस पात्र ठरणारे असले तरी त्याच्या मनात स्वातंत्र्याकांक्षाच येणार नाही अशी हमी गुलामीच्या व्यवस्थेत मिळत नाही.

याउलट कर्मफलाला पुनर्जन्म कल्पना जोडल्यावर ती इतकी ताकदवान बनते की ती व्यक्तीला त्याच्या गुलामीची जाणीवच होऊ देत नाही. पुनर्जन्म आणि आणि कर्मफल एकत्र आले की व्यक्तीची, प्राप्त परिस्थितीविरुद्ध लढण्याची इच्छाच नाहीशी होते. काही अत्यंत बंडखोर व्यक्ती सोडल्यास बहुसंख्य सामान्य लोक प्रारब्धाचे भोग म्हणून येणारे आयुष्य जगायला तयार होतात. या व्यवस्थेत कोणीच स्वतःच्या मर्जीचा मालक नसतो. इथे सगळेच गुलाम असतात. एकमेकांचे गुलाम नाही तर आपापल्या पूर्वजन्मसंचितांचे गुलाम. इतरांसाठी श्रम करणारापण गतजन्मीच्या पापांचा गुलाम तर इतरांचे श्रम फुकट लाटणारापण गतजन्मीच्या पुण्याचा गुलाम. म्हणजे;

  1. आज एखादा श्रीमंत का? कारण त्याने मागील जन्मी पुण्य केले असावे. 
  2. आज एखादा गरीब का? कारण त्याने मागील जन्मी पाप केले असावे. 
  3. आज एखाद्याचे भाग्य का उजळले? कारण त्याने मागील जन्मी पुण्यकर्म केले असले पाहिजे. 
  4. आज एखादा अधिकारी देशोधडीला का लागला? त्याच्या मागील जन्मीच्या पापांचेच फळ असणार. 
  5. मला इतरांची सेवा करायला आवडत नाही तर मग मी ती का करू? कारण अशी सेवा करावी लागणे हेच तुझ्या मागल्या जन्मीच्या पापाचे फळ आहे. 
  6. मी ते फळ नाकारले तर काय होईल? पुढील जन्मी अजून नीच कर्म करावी लागतील. आणि यातून सुटका होणार नाही. 
  7. मी ते फळ स्वीकारून माझ्या मनाविरुद्ध इतरांची सेवा करत राहिलो तर काय होईल? पुढील जन्मी तुला अधिकारपद प्राप्त होईल आणि तू सर्व सुखांचा उपभोग घेऊ शकशील. इतर लोकांचे श्रम तुला फुकट खाता येतील. 
  8. आज एखादा धनिक व्यक्ती मातलेला आहे, इतरांचे शोषण करतो आहे. मी त्याला धडा का नको शिकवू? कारण त्याच्या पापाचा घडा भरतो आहे आणि पुढील जन्मी त्याला या सर्व पापांचा हिशोब फेडावा लागेल. 
  9. आज मी धनिक आहे. इतर लोक माझ्यासाठी राबताहेत. ते बंडदेखील करू इच्छित नाहीत. मग मी त्यांना मानाने का वागवू? कारण तू उतलास, मातलास की हे सुखोपभोग पुढील जन्मी तुझ्या नशिबी येणार नाहीत आणि तुला इतरांसाठी श्रम करत जगावे लागेल. अशी सगळी प्रारब्धयोगी मांडणी.

पण मनुष्य स्वार्थी आणि स्खलनशील असल्याने शेवटच्या प्रश्नाचं उत्तर फारसं मनावर न घेता, किंवा त्याचा स्वतःला सोयीचा अर्थ लावून अधिकारारूढ व्यक्तींनी इतरांचे शोषण करणे चालूच ठेवले. आणि या पापातून मुक्ती मिळण्यासाठी मग देवदेवस्की, दान धर्म, अश्या संकल्पनांना जोर आला. निर्मिती आणि संहार करणारा निर्गुण, निराकार, निर्लोभी आणि निर्मम असा परमेश्वर मग प्रसादाच्या बदल्यात पाप पुण्याची फेरफार करणारा लाचखोर अधिकारी बनला.

जगभरातील इतरांचे देवही असेच होते. पूर्ण समर्पण मागणारे. परीक्षा घेणारे. वर देणारे. लहान सहान कारणांवरून क्रोधायमान होणारे, चिडखोर. बळी मागणारे, भुकेले. पण इतर समाजात ही पुनर्जन्म संकल्पना नव्हती. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा थेट हिशोब देवाशी होता. आपल्याकडे मात्र प्रत्येक व्यक्तीचा थेट हिशोब स्वतःच्या गतजन्माशी होता. माणसेच काय पण देवही त्यांच्या कर्मफलापासून वाचू शकत नव्हते आणि सर्वशक्तिमान परमेश्वराच्या त्रिमूर्तीपैकी कुणाच्याही मानवी अवतारालासुद्धा या कर्मफलापासून सुटका नव्हती.

त्यामुळे इतर समाज म्हणजे देव, प्रेषित, पुरोहित आणि सामान्य जनता यांची लांबच लांब साखळी किंवा दहिहंडीसारखी उतरंड बनत गेले. याउलट पुनर्जन्म आणि कर्मफलाच्या संकल्पनेमुळे भारतीय समाज म्हणजे, स्वतःभोवती फिरत राहणाऱ्या अनेक भोवऱ्यांचा पुंजका बनून राहिला. भारतीय समाजातील या प्रत्येक भोवऱ्याला त्याच्या पाप पुण्याची आणि पुनर्जन्माची लांबच लांब दोरी गती देत राहिली होती आणि अजूनही देत आहे.

गुलामाला स्वतःचं कुटुंब बनवण्याचा, मालमत्ता बाळगण्याचा अधिकार नाही पण स्वातंत्र्यासाठी धडपड करण्याचा अधिकार आहे. तो पकडला गेला तर मारला जाईल पण सुटला तर इतरांना गुलाम बनवू शकेल, मालमत्तेचा अधिकारी बनू शकेल. याउलट भारतीय समाजात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं कुटुंब बनवण्याचा अधिकार होता आणि कित्येकांना मालमत्तेचा अधिकारही होता पण स्वतःच्या पूर्वजन्मातून कुणाचीच सुटका नव्हती. या लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मुक्ती. आणि त्यासाठी निष्काम भावनेने कर्म करत राहणे, संसारत्याग, भक्ती, अनासक्ती असे प्रवृत्तीविरोधी आणि निवृत्तीप्रवण मार्ग सुचवले गेले.

त्यामुळे आपल्या भरतखंडात देवही गर्भगृहात रहातात आणि देवाचे भक्तही मुक्तीच्या प्रतीक्षेत गतजन्मीच्या पाप पुण्याने बनलेल्या आपापल्या कोशात राहतात. अंतिम न्याय, कयामत सारख्या संकल्पनांऐवजी पुनर्जन्म आणि मुक्ती या संकल्पना वापरल्याने येथील समाज मुक्ती हेच परमध्येय मानून भौतिक आयुष्याला मुक्तीच्या मार्गासाठीचा गर्भकोश मानू लागला. मुक्त असूनही गर्भगृहात राहणाऱ्या देवाचे मुक्तीच्या इच्छेने गर्भकोशात राहाणारे असंख्य भक्त अशी या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण रचना झाली होती आणि अजूनही आहे.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)



निर्गमन केल्यानंतर नव्या भूप्रदेशात जर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना हवे तसे वातावरण मिळाले तर व्यक्ती तिथेच स्थायिक होणे स्वाभाविक असते. मातृभू / पितृभू यांची ओढ असली तरी बसलेले बस्तान मोडून अश्या व्यक्तींनी केवळ मातृभूमीप्रती प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी परत यावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखे आहे. इजिप्त सोडून इझराईलला गेलेले ज्यू लोक, अरबस्थान आणि मध्य आशियाचा वाळवंटी प्रदेश सोडून भारतात आलेले मुस्लिम लोक, युरोप सोडून अमेरिकेला गेलेले ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीझ आणि स्पॅनिश लोक, फाळणीनंतर ब्रिटन आणि अमेरिकेत गेलेले पंजाबी आणि गुजराथी लोक, फाळणीनंतर भारतात आलेले सिंधी लोक, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आशियात स्थायिक झालेले तामिळ आणि मल्याळी लोक, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय विद्यापीठातून उच्चविद्याविभूषित होऊन परदेशात स्थायिक झालेलया डॉक्टर, इंजिनियर लोकांचा भारताने अनुभवलेला ब्रेनड्रेन किंवा मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईसारख्या मायावी महानगरात स्थायिक होणारी खेडेगावातील असंख्य लोकांची गर्दी ही सर्व यशस्वी निर्गमित लोकांची उदाहरणे आहेत. हे लोक नव्या जगात आपल्या काही जुन्या चालीरीती जिवंत ठेवतील, आपला गाव किती छान याबद्दल चार टिपे गाळतील, आपल्या गावाला वर्षातून एखाददोन भेटीदेखील देतील. पण नवे जग सोडून पुन्हा जुन्या गावी परतण्याचा विचार त्यांच्या मनातही येणार नाही. आपल्या यशात स्वकर्तुत्वापेक्षा नव्या जगाने दिलेल्या संधींचा वाटा अधिक आहे आणि आपण उपलब्ध संधींचा पुरेपूर वापर करून घेऊ शकत असलो तरी स्वतः संधी तयार करणे आपल्याला शक्य होणार नाही, याची जाणीव त्यांना सोडून आलेल्या जगाकडे परतण्यापासून रोखत असते.

याउलट निर्गमन करून जिथे गेलो तिथे जुन्या चालीरीती आणि जीवनपद्धती सोडून नव्याचा स्वीकार केला तरीही जर यश मिळाले नाही तर मातृभूमीला परतण्यापेक्षा अजून कुठल्या नवीन भूप्रदेशात निर्गमन करणेच अनेकांना श्रेयस्कर वाटू शकते. कारण मागे फिरणे म्हणजे आपल्याबरोबर न आलेल्या आप्तस्वकीयांना तोंड देणे पराभूतांसाठी नरकयातनेसमान असते. चालीरीती, परंपरा आणि प्रथा सोडून यशस्वी होऊन एखाददोन दिवसांसाठी परत आलेल्या व्यक्तीला कुणी जाब विचारत नाही पण जर ती व्यक्ती अयशस्वी ठरली असेल तर मात्र, आपल्या वाडवडिलांच्या परंपरा नाकारणे हेच त्याच्या पराभवाचे आणि स्वप्नभंगाचे सर्वात महत्वाचे कारण मानले जाते. पराभवाचे प्रतीक म्हणून आपल्या समाजात राहण्यापेक्षा अश्या अयशस्वी निर्गमित व्यक्ती, निर्गमित समाजात जिवंत प्रेते बनून दुय्यम जीवन स्वीकारतात किंवा मग निर्गमनासाठी अजून कुठलातरी नवा भूप्रदेश शोधतात. चित्रपट व्यवसायाच्या झगमगाटाला भुलून घर सोडून आलेले आणि त्या मायानगरीत बिनचेहऱ्याने राहून आपल्या स्वप्नांना रोज जळताना पाहणारे लोक; अभिनय, मॉडेलिंग किंवा फॅशन व्यवसायातील 'घी देखा मगर बडगा नाही देखा' अश्या स्थितीमुळे शेवटी शरीरविक्रयाकडे वळलेले लोक; नोकरी सोडून धंद्यात पडलेले पण धंदा म्हणजे काय ते कळले नसल्याने बुडीत खाती जाऊन थातुर मातुर कामे करून उपजीविका करणारे लोक; परदेशात किंवा परधर्मात दुय्यम स्थान घेऊन गप्प राहणारे लोक ही सर्व अयशस्वी निर्गमित व्यक्तींची उदाहरणे आहेत.

म्हणजे यशस्वी असोत किंवा अयशस्वी, पण निर्गमित व्यक्तींचे स्वगृही पुनरागमन जवळपास अशक्यप्राय असते किंवा झालेच तर ते त्यांच्या आयुष्याच्या बहराचा काळ ओसरल्यानंतर होते. आपल्या कारकिर्दीच्या ऐन बहरात निर्गमित व्यक्तींचे स्वगृही पुनरागमन ही केवळ कवी कल्पना आहे. असे असूनही भारतीय इतिहासात ब्रिटिश राज्याच्या काळात अनेक व्यक्तींनी पुनरागमन केल्याचे दिसते. किंबहुना भारतीय स्वातंत्र्यलढ्याने जोर पकडण्याच्या आणि हा लढा यशस्वी होण्याच्या कालखंडात; राजकीय, आर्थिक, लष्करी आणि सामाजिक या सर्व आघाड्यांवर भारतीयांचे नेतृत्व करणारे जवळपास सर्व लोक हे पुनरागमित व्यक्ती होते. मग हे झाले कसे? इतके सारे लोक आपल्या आयुष्याच्या बहराच्या काळात निर्गमित प्रदेश सोडून भारतभूमीत परत आले कसे? देश आणि देशबांधवांबद्दल असलेले त्यांचे प्रेम त्यांना परत खेचून आणण्यास कारणीभूत ठरले असे मानण्यासाठी माझे भाबडे मन एका पायावर तयार असले तरी त्या मान्यतेमुळे अनेक नवीन प्रश्न तयार होतात. देशबांधवांबद्दल आणि देशाबद्दल इतके उत्कट प्रेम असलेले नेते ज्या देशात जन्मू शकतात तो देश इतकी वर्षे परकीयांच्या अमलाखाली कसा राहिला? इतक्या उत्तुंग नेत्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या, त्यांच्या आदेशासरशी तुरुंगवास पत्करणाऱ्या जनतेने, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्वार्थलोलुप नेत्यांना कसे काय निवडून दिले? स्वातंत्र्य चळवळीत एकत्र झालेला हा भारतीय समाज, स्वातंत्र्यानंतर महापुरुषांचीदेखील जातीधर्माच्या आधारावर विभागणी करून घेण्याइतपत कसा काय विभागला गेला? आणि स्वातंत्र्यपूर्व काळात दिसून येणारे हे प्रेरणादायी देशप्रेम लगेच पुढच्या पिढीत लोप पावून भारताला ब्रेनड्रेनला सामोरे का जावे लागले? स्वदेस चित्रपटाच्या नायकाप्रमाणे कितीजण भारतात परतले? आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाने अश्या किती पुनरागमित व्यक्तींचे नेतृत्व मान्य केले? या सगळ्या प्रश्नचिन्हांचा गुंता सोडवत बसल्यावर निघणारे निष्कर्ष अंतिम नसले तरी माझ्यासाठी धक्कादायक ठरतात.

हे निष्कर्ष मांडण्याआधी भारतीय समाजाची मला जाणवलेली वैशिष्ट्ये आणि पश्चिमी देशांच्या इतिहासाशी त्याची थोडक्यात तुलनात्मक मांडणी पुढच्या भागात करतो.

Sunday, April 2, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)


आगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते.

त्यातुलनेत निर्गमन संकल्पना समजायला थोडी सोपी आहे. कारण निर्गमन विचारांचे होत नाही तर व्यक्तीचे होते. त्यामुळे निर्गमनातील अनुभव हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या अनुभवांशी समरस होणे आपल्याला सहजशक्य असते. पण निर्गमन संकल्पनेबद्दल लिहिण्याआधी एक महत्वाची नोंद करून ठेवतो. ज्याप्रमाणे आगमन म्हणजे आक्रमण नव्हे त्याप्रमाणे निर्गमन म्हणजे निष्कासन नव्हे.

निष्कासन म्हणजे व्यक्तीच्या मनाविरुद्ध त्याला एका भू-प्रदेशातून किंवा समाजातून बाहेर जाण्यासाठी शासनाने केलेली सक्ती आहे. याउलट निर्गमनात एक प्रकारची अपरिहार्यता असली तरी ती शासनप्रणीत नसून भू-प्रदेश किंवा समाज सोडण्याचा निर्णय व्यक्तीने स्वतः घेतलेला असतो.

एकदा का निर्गमन म्हणजे निष्कासन नव्हे हे लक्षात घेतले की आपोआप अनेक प्राचीन महाकाव्यांतील किंवा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासातील नायकांच्या आयुष्यातील प्रसंग आपल्याला काळजीपूर्वक निवडावे लागतात.

रामायणातील, राम, सीता आणि लक्ष्मणाचा स्वीकारलेला वनवास निर्गमन ठरतो तर वालीच्या आज्ञेने सुग्रीवाला भोगावा लागलेला वनवास किंवा राज्याभिषेकांनंतर रामाने केलेला सीतेचा त्याग, हे दोन्हीही निष्कासन ठरतात. महाभारतातील कुंती आणि माद्रीसहित पंडुचे हिमालयातील वास्तव्य निर्गमन ठरते तर कुंती आणि पांडवांचा लाक्षागृहाच्या वेळेचा वनवास किंवा द्युतातील पराजय आणि द्रौपदी वस्त्रहरणानंतरचा पांडवांचा द्रौपदीसहित वनवास आणि अज्ञातवास निष्कासन ठरते. यहोवाच्या आज्ञेने इजिप्तमध्ये परत आलेल्या मोझेसबरोबर सर्व ज्यू लोकांचे इझरेलकडे प्रयाण निर्गमन ठरते तर त्यापूर्वी मोझेसच्या जन्माचे रहस्य कळल्याने राजा रामसेसने त्याला दिलेला देशाबाहेर जाण्याचा हुकूम निष्कासन ठरतो. कुराणातील प्रेषित मुहम्मदाच्या आयुष्यातील मदिनेकडील प्रयाण निर्गमन ठरते तर प्रेषिताच्या आज्ञेने बानू नादिरच्या ज्यू टोळीला मदिनेतून बाहेर जावे लागणे निष्कासन ठरते. सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग निर्गमन ठरतो तर बुद्धाने देवदत्ताला भिक्षू संघातून बाहेर काढणे निष्कासन ठरते. गृहस्थाश्रमी विठ्ठलपंतांनी पत्नीच्या परवानगीशिवाय घेतलेला संन्यास निर्गमन ठरते याउलट विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना समाजाने वाळीत टाकणे निष्कासन ठरते.

त्याशिवाय पाश्चात्य विद्या शिकायला परदेशी गेलेले सगळे भारतीय किंवा वेदविद्यांचे अध्ययन सोडून भारतातंच राहून पाश्च्यात्य विद्या शिकणारे भारतीय किंवा भारतातंच धर्म बदलून मुसलमान किंवा ख्रिश्चन आणि नजीकच्या भूतकाळात बुद्धाचा धम्म स्वीकारणारे भारतीय ही देखील निर्गमनाची उदाहरणे आहेत.

निर्गमनात जुन्या आठवणी कडू आणि गोड अश्या दोन्ही स्वरूपाच्या असतात तर निष्कासनात जुन्या आठवणी म्हणजे जळजळीत अपमानाच्या भळभळणाऱ्या जखमा असतात. त्यामुळे निर्गमनात नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची व्यक्तिगत धडपड असते. तशी धडपड निष्कासनातही असली तरी निष्कासनाचे पर्यवसान रक्तरंजित किंवा अन्य मार्गाने घेतलेला बदला किंवा पश्चात्तापदग्ध जीवन किंवा आत्महत्या असते. निर्गमन आणि निष्कासनात असा मूलभूत फरक असला तरी त्या निर्गमित किंवा निष्कासित व्यक्तीची नव्या संस्कृतीशी नाळ जुळवून घेण्याची धडपड बरेचदा सारखी असते आणि आपण सर्वजण या धडपडीशी एकरूप होऊ शकतो.

फार प्राचीन काळापासून "संपली येथील अन्नाची गुऱ्हाळे" असे म्हणत जगाच्या पाठीवर इथून तिथे लमाणांसारखे फिरत राहिलेले मानवांचे तांडे आणि लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे प्रमाण जर समसमान मानले तर अर्ध्या लोकसंख्येने लग्नाच्या निमित्ताने एका घरातून दुसऱ्या घरात केलेले निर्गमन यामुळे जगभरातील कथा, कादंबऱ्या, कविता आणि लोकगीते निर्गमनाच्या प्रसंगाला आणि त्यानंतरच्या आयुष्यातील धडपडीला उत्कटतेने व्यक्त करीत आलेले आहे.

आधुनिक जगात नोकरी किंवा धंदा या कारणांमुळे आपण सर्वजण जन्मगावापासून थोड्या कालावधीसाठी किंवा कायमचे दूर जातो किंवा त्याच भू-प्रदेशात राहून नोकरी किंवा धंदा बदलतो. मागील दरवाजे पूर्ण बंद करतो किंवा किंचित किलकिले ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवाहबंधन स्वीकारतो किंवा घटस्फोट घेऊन पुनर्विवाह करतो. तरुणच काय पण वयोवृद्ध विधुर आणि विधवांनीपण पुनर्विवाह केलेले पाहतो. आईवडिलांपासून वेगळे होऊन स्वतंत्र बिऱ्हाड करतो. त्यामुळे या साहित्यप्रवाहाला आपण प्रत्यक्ष जीवनात अनुभवतो. लेखक किंवा कवीने घातलेल्या रांगोळीत आपल्या अनुभवांचे रंग भरल्याने ती रांगोळी अजून गडद होते आणि तिच्यात आपली भावनिक गुंतवणूकदेखील होते. रामायण, महाभारत या महाकाव्यातील किंवा बायबल, कुराण धर्मग्रंथातील अनेक कथा आपल्याला प्रेरित करतात, मन हेलावून टाकतात, भावनिक आधार पुरवतात ते त्यामुळेच.

खेड्यातून शिक्षण पूर्ण करून शहरात आलेला, कुणाशीही ओळख नसलेला तरुण, आणि लग्न करून नवीन घरात आलेली मुलगी यांची धडपड वेगळ्या परिसरातील असली तरी त्या धडपडीचे स्वरूप सारखेच असते.

सगळे जुने आयुष्य नव्या जगात चालू करण्याची धडपड सुरु होते. जुनी वेशभूषा, जुनी भाषा, खाण्यापिण्याच्या जुन्या पद्धती नवीन समाजात तशाच प्रकारे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन लोक कसे आहेत त्याचा अनुभव नसल्याने त्यांच्याशी वागताना केवळ कल्पना वापरल्या जातात आणि थपडा खायला सुरवात होते. जिथे नशीब काढायला स्वखुशीने किंवा अपरिहार्यतेने आलो तिथे आपण एकटे आहोत. आपले कुणी नाही. आपण इथे येऊन चूक केली की काय? यापेक्षा जुनेच आयुष्य बरे होते. माझी जुनी मित्रमंडळीच छान होती. तेव्हा त्रासदायक वाटले तरी जुने आयुष्यच अधिक सुखावह होते. तेव्हा भांडलो तरी जुने नातेवाईकच अधिक प्रेमळ होते. असे वाटणे हा पहिला टप्पा असतो.

पहिल्या टप्प्यात खाल्लेल्या टक्के टोणप्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अधिक परिपक्व होऊन मग ती व्यक्ती नवीन जगात कुठे समविचारी मित्र मिळतात ते शोधू लागते. आपल्या स्वभावाचे कुठले हळुवार कोपरे दडवायचे?, कुठे खोटे काठिण्य आणायचे? आणि कुठे जुन्या चालीरीती सोडून द्यायच्या? याचा निर्णय घेणे आता सुरु होते. वेशभूषा बदलते. भाषा बदलते. नवीन जगातील लोकांच्या काही सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवल्या जातात. कित्येकदा नव्या जगातील लोक ज्यांच्याबद्दल आग्रही नाहीत त्या चालीरीतींबद्दलही आग्रही राहणे सुरु होऊ लागते. थोड्या असभ्य शब्दात सांगायचं झाल्यास, "नया नया मुल्ला जोरसे बांग देता है”, अशी काहीशी अवस्था या दुसऱ्या टप्प्यात असते. साधारणपणे, परत फिरावे की सोडून आलेल्या जगाच्या परतीचे दोर कापून टाकावेत त्याचा निर्णय आता पक्का होतो.

जुन्या स्वभावाला मुरड घालताना आता काही दबलेल्या भावना उफाळून वर येतात. सोडून आलेल्या समूहाचे दडपण नसल्याने आता या सुप्त किंवा दबलेल्या भावना पूर्ण करणे सुरु होते. त्यात अपराधबोध वाढतो. त्याला दूर करण्यासाठी मग नव्या संस्कृतीतील विचारांचे साहाय्य घ्यावे लागते. बेफिकिरीचा आव आणावा लागतो. हे सगळे करताना ती व्यक्ती अजून संबंध टिकवून असलेल्या जुन्या लोकांना तर दुखवतेच पण कित्येक नव्या लोकांनादेखील दुखावते. पण हा तिसरा टप्पा म्हणजे स्वतःला पैलू पाडण्याचा एक भाग असतो. आपण असेही वागू शकतो, आपल्या व्यक्तिमत्वाला ही देखील एक बाजू आहे, याची जाणीव होऊ लागते. आपण कुठल्या मर्यादा सहज तोडू शकतो आणि कुठल्या मर्यादा तोडणे आपल्याला शक्य नाही, हेदेखील कळून चुकते. इथे तिसरा टप्पा संपतो.

आता नव्या भू-प्रदेशाला किंवा समाजाला स्वीकारलेले असते. खाणे, पिणे, लेणे, बोलणे याच्या नवीन सवयी आत्मसात झालेल्या असतात किंवा सोडून आलेल्या जगातील सवयीचे कंगोरे घासून त्या नव्या भू-प्रदेशात किंवा समाजात कश्या वापरता येतील ते कळलेले असते. नव्या भू-प्रदेशातील किंवा समाजातील लोकांच्या कमकुवत बाजू, त्यांचे दौर्बल्य, त्यांचे पूर्वग्रह, त्यांचा अडाणीपणा, त्यांची गतानुगतिकता दिसू लागलेली असते. इतिहासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांचीदेखील चालू असलेली धडपड दिसू लागते. या सगळ्यावर कुरघोडी करण्यासाठी सोडून आलेल्या आपल्या समाजातील इतर नातेवाईकांना, मित्रमंडळींना इथे बोलावून घेणे सुरु होते. नवीन नोकरीच्या जागी जुन्या नोकरीतले सहाय्यक किंवा मित्र आणण्याचा प्रयत्न होतो. तसे कुणी येणे शक्य नसेल तर आपल्यासारखे जुन्या समाजाला सोडून आलेल्या समानशील लोकांचा शोध घेणे सुरु होते. सोडून आलेल्या समाजातील अजूनही हव्याहव्याशा वाटणाऱ्या काही चालीरितींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जातो. माहेरच्या काही पद्धती सासरी सुरु होतात. परदेशात महाराष्ट्र मंडळे, कन्नड समाज, बंगाली समाज वगैरे सुरु होऊन गणेशोत्सव, युगादी, दुर्गापूजा वगैरे साजरे केले जाऊ लागतात. आणि मग निर्गमित व्यक्ती नवीन समाजात जुन्या आणि नव्याचा संगम घडवू लागते.

अनेकांच्या निर्गमनाचा प्रवास इथे संपतो. पण काही जणांच्या बाबतीत तो संपत नाही. इथे मन रमवू न शकलेल्या व्यक्ती पुन्हा नवीन निर्गमनाच्या मागे लागतात किंवा पुन्हा मागे परत फिरतात. जर त्यांनी मागे परत फिरायचे ठरवले तर सुरु होते पुनरागमन. त्याच्याबद्दल पुढील भागात लिहीन.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)



आगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो.

आगमन म्हणजे आक्रमण नव्हे. आक्रमण ही एक लष्करी चाल आहे. याउलट आगमन म्हणजे प्रस्थापित मोठ्या लोकसमूहात आलेले नवीन विचार. हे नवीन विचार समूहांतर्गत घटकांकडून येऊ शकतात किंवा समूहबाह्य व्यक्तींकडूनदेखील येऊ शकतात. निर्गमन म्हणजे अश्या प्रस्थापित मोठ्या लोकसमूहातील काही व्यक्तींचे बहिर्गमन आणि त्या अनुषंगाने जेत्यांच्या समाजातील विचारांशी, त्यांची झालेली झटापट. तर पुनरागमन म्हणजे अश्या बहिर्गमीत व्यक्तींचे त्यांच्या स्वतःच्या प्रस्थापित समूहात पुन्हा झालेले आगमन आणि त्यामुळे व्यक्ती आणि समाज या दोघांची होणारी वैचारिक ससेहोलपट. माझे वाचन अपुरे आहे पण माझ्या माहितीप्रमाणे ही तिन्ही वादळे एकाच समुदायात घडूनही तो समाज टिकून असण्याचे भारत हे एकमेव उदाहरण आहे. बाकीचे कित्येक समाज यापैकी कुठल्यातरी एका वादळात समूळ नष्ट झालेले आहेत.

माणूस ही निसर्गाची निर्मिती आहे. गुंतागुंतीचे मानवी समाज ही मात्र मानवी विचारांची निर्मिती आहे. कुठलाही मानवी समुदाय धार्मिक, आर्थिक आणि राजकीय आधारस्तंभांवर उभा असतो. आणि या तिघांवरही सातत्याने नवीन विचारांचे किंवा नव्या बाटलीत जुनीच दारू अश्या प्रकारे जुन्या विचारांचे आगमन होताना दिसते. त्यात कधी आगमनकर्ता नवा विचार तर कधी जुनी समाजव्यवस्था विजेती झालेली दिसते.

धार्मिक विचारांचा मागोवा घेतला तर असे जाणवते की, जिज्ञासू असणारे सर्वजण चिकित्सक असतीलच खात्री देता नाही. त्यामुळे आस्तिक असणे ही जणू सर्व माणसांची नैसर्गिक स्थिती आहे. परिणामी वेगवेगळ्या स्वरूपात आलेल्या आस्तिक विचारांना मान्य करणे मानवी समाजांना शक्य झालेले आहे. पण आस्तिकतेच्या खुळचटपणाला ओळखून नास्तिक विचारांचे आगमन कुठल्याही काळात झाल्यास ते मात्र तितके प्रभावी झालेले नाही. म्हणजे नास्तिकांच्या समाजात आस्तिक विचारांचे आगमन किंवा एका प्रकारे आस्तिक असणाऱ्या समाजात दुसऱ्या देवाचे किंवा पूजा पद्धतीचे आगमन मोठ्या प्रमाणात यशस्वी होते. पण आस्तिकांच्या समाजात नास्तिक विचारांचे आगमन मात्र अल्पजीवी ठरते. चार्वाक दर्शनांसारख्या दर्शनांचा क्रूर मृत्यू, अत्त दीपो भव म्हणणाऱ्या बुद्धाच्या धर्मात मूर्तिपूजाप्रधान महायान पंथाचा उदय आणि एकेश्वरवादी अब्राहमीक धर्मांचा जगावरील गेल्या दोन हजार वर्षांचा प्रभाव, या सर्व गोष्टी मानवी मनाच्या आस्तिक्यप्रेमी असण्याचे द्योतक आहेत असे मला वाटते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आगमन करणारा विचार जर आस्तिक्याचा उद्घोष करणारा असेल तर तो जिंकतो, याउलट आगमन जर नास्तिक्याचे असेल तर प्रस्थापित समाज त्याला दडपण्यात यशस्वी होतो, असे इतिहास सांगतो.

ज्यू जरी एकेश्वरवादी असले तरी समतावादी नाहीत. याउलट ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांचे धर्म केवळ एकेश्वरवादी नसून समतावादी आहेत. हे एकेश्वरवादी आणि समतावादी धर्म थोड्याच काळात अस्थिर होऊ लागतात. ‘सगळेच समान तर मग कोणाची इच्छा बलवान आणि इतरांसाठी शिरोधार्य?’ हा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा आहे आणि गेल्या दोन हजार वर्षात त्याला उत्तर सापडलेले नाही. त्यामुळे त्या प्रश्नाला बगल देत या दोन्ही धर्मांनी धर्मांतरातून विस्तारवाद हे तत्व स्वीकारले आहे. त्यातूनच या दोन्ही धर्मविचारांचे जगाच्या कानाकोपऱ्यात आगमन झाले. आणि त्यांच्यापुढे (भारतीय समाज सोडता) अनेकेश्वरवादी धर्मांनी सपशेल शरणागती पत्करली.

आर्थिक विचारांचा मागोवा घेतला तर त्यातही आस्तिक नास्तिक प्रमाणे उत्पादन आणि खाजगीमालमत्ताकेंद्री व्यवस्था विरुद्ध वितरण आणि सामाजिकमलमत्ताकेंद्री व्यवस्था असे दोन विचार प्रवाह दिसून येतात.

मूत्रविसर्जन करून एखादे क्षेत्र आपल्या अधिपत्याखाली आहे हे दर्शविणाऱ्या वाघ - सिंहाप्रमाणे खाजगी मालमत्ता बाळगणे ही माणसांची सहजप्रवृत्ती आहे असे आपल्याला वाटत असले तरी खाजगी मालमत्तेचा आकार आणि तिच्यात काय काय अंतर्भूत असायला हवे याबाबत व्यक्तींची मते वेगवेगळी असतात. इतकेच काय, वयोमानापरत्वे या बाबतीतील एकाच व्यक्तीची मतेदेखील बदलताना आढळतात. त्यामुळे जो आर्थिक विचार एकाच वेळी माणसांतील या दोन्ही प्रवृत्तीना व्यवस्थितरित्या सामावून घेऊ शकतो तोच विजयी होऊ शकतो. सध्याचे आर्थिक विचार, मानवी स्वभावातील या असमानता आणि अनित्यतेला सामावून घेऊ शकणारे नसल्याने ते एकमेकांच्या प्रदेशात आगमन करीत आहेत आणि एकमेकांसोबत स्वतःला परिपूर्ण करून घेत आहेत असे माझे मत आहे.

ढोबळमानाने असे म्हणता येईल की अभावग्रस्त समाजात प्रथम वितरण आणि सामाजिक मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन यशस्वी होते. समूहशक्तीतून उत्पादनवाढ झाल्यास तिथे उत्पादन आणि खाजगी मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन होते आणि ते यशस्वीदेखील होते. खाजगी मालमत्तेच्या अधिकाराचा अतिरेक झाला आणि राजकीय विचारांचे आकृतीबंध, मूठभर लोकांच्या हातात एकवटलेला खाजगी मालमत्तेचा हा डोलारा सांभाळण्यास कमी पडू लागले की लोकांना हे मूठभर धनिक नकोसे होतात. मग खरे तर सामाजिक मालमत्तेच्या विचारांचे आगमन व्हायला हवे पण तसे न होता केवळ खाजगी मालमत्तेला विरोधाचा मुखवटा घातलेल्या क्रांतीविचारांचे आगमन होते. ते सध्याच्या प्रस्थापितांना हलवून इतरांनी प्रस्थापित होण्याचा मार्ग सुकर करते.

याउलट मुबलकता असलेल्या समूहात, वितरण आणि सामाजिक मालमत्ताकेंद्री विचारांचे आगमन तितकेसे यशस्वी होत नाही. कारण अभावाच्या पातळीपासून थोडे दूर मुबलकतेच्या दिशेने गेल्यावर खाजगी मालमत्तेचे आकर्षण अधिक जोरदार असते.
ज्या समाजात पशुशक्ती, यंत्रशक्ती आणि औद्योगिकीकरण होते त्यांचे उत्पादन उपभोगाच्या तुलनेत वाढून विक्रीसाठी स्थलांतर आवश्यक होते. अश्या समाजात व्यक्तींनी एकत्र येण्याचे नवनवे मार्ग शोधले जातात आणि मग या व्यक्तीसमूहांच्या लालसेचे इतर अप्रगत समाजात जेव्हा आगमन होते तेव्हा हे इतर समाज अक्षरशः मोडकळीस येतात. अमेरिकेतील रेड इंडियन्स, पेरूतील इंका, आफ्रिकेतील नीग्रो, न्यूझीलंडमधील माओरी किंवा ऑस्ट्रेलियातील अबॉरिजिनल लोकांच्या समाजात व्यापारी संस्कृतीच्या आगमनाने झालेली पडझड त्याचेच उदाहरण आहे.

राजकीय विचारांचा मागोवा घेतला तर असे दिसते की माणूस एकटा असताना व्यक्तिकेंद्री असतो. जेव्हा तो समूहात जातो तेव्हाही तो व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असतो मात्र समूहातील इतरांचे कुणीतरी नियंत्रण करावे असे त्याला तीव्रतेने वाटते. स्वतःच्या स्वातंत्र्याला जपण्यासाठी इतरांचे व्यक्तीस्वातंत्र्य थोड्याफार प्रमाणात किंवा संपूर्णपणे हिरावून घेणे त्याला अयोग्य वाटत नाही. त्यामुळे त्याला एकाच वेळी त्याच्या मताचा आदर करणारी लोकशाही आणि इतरांच्या मताला उडवून लावणारी राजेशाही या दोघींचे आकर्षण असते.
आर्थिक विचारांप्रमाणे राजकीय विचार देखील प्रथम समाजकेंद्रीत आणि नंतर व्यक्तिकेंद्रित होत जाताना दिसतात. आणि समाजकेंद्रीत व्यवस्था जेव्हा आर्थिक गर्तेत व्यक्तिकेंद्रित व्यवस्था विचारांचे तिथे आगमन सुकर होते. याउलट व्यक्तिकेंद्रित व्यवस्थांमध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा लोप होतो तेव्हा समाजकेंद्रीत व्यवस्था विचारांचे तिथे आगमन होण्याचा मार्ग प्रशस्त होतो.

राजकीय विचार म्हणजे ‘इतरांच्या नकळत आपले विचार त्यांच्यावर लादण्याची व्यवस्था’ असल्याने त्यात अधिकारांचे वाटप समान रीतीने होत नाही. उलट अधिकारवाटपाच्या वेळी लिंगभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, आर्थिक स्तरभेद अश्या वेगेवगेळ्या भेदविचारांचे त्या व्यवस्थेत आगमन होत असते. तसेच अधिकारांचे हस्तांतरण होत असताना घराणेशाही, भाऊबंदकी, रक्तपात, उठाव या विचारांचे आगमन होताना दिसते. सध्याच्या लोकशाहीने रक्तपात आणि सशस्त्र उठाव हे मार्ग जवळपास नष्ट केले असले तरी अधिकारांचे हस्तांतरण होत असताना; घराणेशाही, भाऊबंदकी आणि वैचारिक अनागोंदीचे आगमन रोखणे लोकशाहीला शक्य झालेले नाही. त्यामुळे लोकशाहीलासुद्धा अधिकारांच्या हस्तांतरणाच्या प्रत्येक प्रसंगी सामूहिक भ्रम, उन्माद, मनगटशाही आणि आर्थिक मुजोरी या सर्वांच्या आगमनाला सामोरे लागते.

लोकशाही परिपूर्ण राजकीय व्यवस्था नाही. लोकशाहीच्या बुरख्याआडून कधी धनदांडगे, कधी धर्मवादी, कधी जातीवादी, कधी प्रांतवादी, कधी वंशवादी तर कधी द्वेषवादी विचार सत्तेवर येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे लोकशाही विचाराचे सध्याचे स्वरूप परिपूर्ण नसल्याने अधिकार वाटप आणि हस्तांतरणाच्या वेळी तिच्यात इतर राजकीय व्यवस्थांतील विचारांचे आगमन होत राहाते.

कित्येकदा बहुसंख्यांच्या अपुऱ्या विचारक्षमतेचा फटका बसून कार्यक्षम व्यक्तीना आणि समाजोपयोगी विचारांना जास्त काळ अडगळीत पडून राहावे लागू शकते. असे असले तरी प्रत्येक विचाराला पुढे येण्याची, बहुमताच्या रूपाने क्रिटिकल मास उत्पन्न करण्याची, त्यायोगे स्वतःला राबवण्याची जी क्षमता लोकशाही देते तशी किंवा त्यापेक्षा सरस क्षमता देण्याची शक्ती इतर कुठल्याही व्यवस्थेत नसल्याने लोकशाही विचाराचे जवळपास साऱ्या जगात आगमन झालेले आहे आणि जिथे ते झालेले नाही तेथील जनता ते लवकरच घडवून आणेल याची मला खात्री आहे. बहुसंख्येच्या बाजूने निसर्ग देखील झुकतो त्या अर्थाने इतर कुठल्याही व्यवस्थेपेक्षा लोकशाही अधिक नैसर्गिक आहे.
आगमन संकल्पनेत नव्या विचाराविरूध्द समग्र समाजाची लढाई चालू असते. त्यामुळे त्यात विविध व्यक्तींचे विविध अनुभव असतात. काही व्यक्ती नव्याचे स्वागत स्वार्थभावाने काही उदात्तभावाने तर काही जण अबोधपणे करत असतात. काहीजण त्याच स्वार्थ किंवा उदात्त किंवा अबोधभावाने नव्याचा विरोध करत असतात आणि बहुतांश समाज उदासीनतेने तटस्थ असतो. आगमन अयशस्वी झाले तर जेता समाज त्याला राक्षसांचे आक्रमण म्हणून रंगवतो आणि ते यशस्वी झाले तर जेता विचार जित समाजातील संघर्षाला इतिहासात स्थान मिळू देत नाहीत. त्यामुळे आगमनाच्या प्रसंगांशी व्यक्तीच्या आणि तथ्यांच्या पातळीवर एकरूप होणे कठीण असते. त्यामुळे हा भाग लिहिताना मलादेखील अंधारात चाचपडल्यासारखे होत होते.

यज्ञप्रधान आणि बळीप्रथा मानणाऱ्या संस्कृतीत अहिंसेचे तत्वज्ञान मांडणाऱ्या जैन विचारांचे आगमन, पुनर्जन्म आणि पुण्याच्या चक्रात फिरणाऱ्या हिंदू समाजाला मृत्यूनंतरच्या प्रवासाकडे दुर्लक्ष करायला लावून तृष्णेभोवती जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या बौद्ध विचारांचे आगमन, सिध्दार्थाच्या, विठ्ठलपंतांच्या, तुकारामांच्या आयुष्यात झालेलं वैराग्याचं आगमन. मूर्तीपूजक भारतीयांच्या आयुष्यात मूर्तीभंजक इस्लामचे आगमन, खुल्क खुदाका मुल्क बादशहाका म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या मराठी वतनदारांत शहाजीराजे जिजाऊसाहेब आणि शिवबांच्या रूपाने स्वराज्याचे आगमन, रोटीबेटी व्यवहारातही स्पृश्यास्पृश्यता पाळणाऱ्या भारतीयांच्यात येशूचा प्रेमाचा संदेश घेऊन येणाऱ्या आणि विहिरीत पाव टाकून धर्म बाटवणाऱ्या युरोपियनांचे आगमन, अमानुष सतीप्रथा पाळणाऱ्या भारतात राम मोहन रॉय यांच्या नवविचारांचे आगमन, सोवळ्यातल्या विधवांच्या दयनीय आयुष्यात विधवा विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या महर्षी कर्व्यांचे आगमन, शिक्षणाचा हक्क केवळ जातींपुरता मर्यादित असलेल्या समाजात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांचे आगमन या साऱ्या घटनांतून आपण आगमनाचे स्वरूप समजून घेऊ शकतो.

मराठीतील, ह. ना. आपटेंची 'पण लक्ष्यात कोण घेतो', पडघवली ही गोनीदांची, खानोलकरांच्या आणि पेंडश्यांच्या कादंबऱ्या, त्याशिवाय विनोदी अंगाने लिहिलेले पुलंचे बटाट्याची चाळ किंवा जयवंत दळवींचे सारे प्रवासी घडीचे ही पुस्तके; कन्नडमधील भैरप्पांची वंशवृक्ष, अनंतमूर्तीची संस्कार आणि कारंथांची डोंगराएव्हढा या कादंबऱ्या; मी वाचलेल्या साहित्यात मला आगमनाचे प्रवाह टिपणाऱ्या वाटतात.