Wednesday, August 23, 2017

ट्रोलधाड

आज एका भाजप विरोधी मित्राला ट्रोल बनताना पाहून फार वाईट वाटलं.

मी सौम्य भाषा वापरतो. माझ्या मित्रांच्या भिंतींवर जाऊन माझं विरोधी मत सौम्य भाषेत व्यक्त करतो. त्यांनी देखील सौम्य भाषा वापरावी असा आग्रह धरतो याचा त्याला फार राग येतो. विद्यमान सरकारचा मी तीव्र भाषेत निषेध केला पाहिजे. आणि तसा कुणी करत असेल तर मी तिथे सौम्य भाषेचा आग्रह धरला नाही पाहिजे असे त्याचे मत असावे.

इथे मी "असावे" असा शब्द वापरला कारण त्याचे मत सांगताना तो प्रचंड चिडतो. मला मूर्ख, गुरोगामी, हुकूमशाहीचा छुपा समर्थक, काळाची पावले ओळखण्यास असमर्थ असलेला सुशिक्षित अडाणी, लोकशाहीचा मारेकरी, इत्यादी शिव्या देता देता त्याचा मुद्दा हरवतो आणि त्याला मला जे सांगायचे असते ते माझ्या मनात स्पष्टपणे आकार घेत नाही.

मी राजकारणी नाही. कुठल्याही पक्षाचा सभासद नाही. मी फेसबुकवर कुठल्याही राजकीय ग्रुपचा सदस्य नाही. कुणी मला स्वतःहून ऍड केल्यास मी त्यातून बाहेर पडतो.

मला गांधी, नेहरू, आंबेडकर आणि सगळे स्वातंत्र्यसैनिक प्रातःस्मरणीय वाटतात. त्यांच्याबद्दल अतीव आदर असला तरीही ते देखील मानवी मर्यादांनी बांधलेले होते याची मला जाणीव आहे. ते सर्वज्ञ नव्हते हे मला मान्य आहे. त्यांनी त्यावेळी त्यांच्या आकलनाला अनुसरून जे निर्णय त्याकाळी घेतले आणि त्यातले जे निर्णय या देशासाठी आणि माझ्यासठी फायद्याचे ठरले त्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी आहे. आणि त्यातले जे निर्णय दुर्दैवाने देशासाठी किंवा माझ्यासाठी अहितकारक ठरले त्याबद्दल त्यांना दोष देण्याइतका माझा अधिकार आणि अनुभव नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पूर्वजांच्या चुकांबद्दल त्यांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्या चुकांतून योग्य तो बोध घेऊन आपण त्या चुका पुन्हा करू नयेत अशी माझी विचारसरणी आहे.

भाजप- काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप अश्या विविध पक्षांना समर्थन करणारे, सर्वोदयवादी-समाजवादी-कम्युनिस्ट किंवा उजव्या विचारसरणीचे, श्रीमंत-मध्यमवर्गीय-गरीब, याच देशात राहणारे - परदेशात राहणारे, स्त्री-पुरुष, आस्तिक-नास्तिक, आध्यात्मिक-विज्ञानवादी, समवयस्क-वृद्ध- तरुण अश्या विविध वयोगटातलेे माझे मित्र आहेत. या सगळ्यांच्या विविध धारणा बघून मी कधी आश्चर्यचकित होतो, कधी मंत्रमुग्ध होतो, कधी गोंधळतो. पण त्यांची मते अंगीकारण्यापूर्वी ती मला आतून पटली पाहिजेत असा आग्रह स्वतःशीच धरतो.

भलेही हे सरकार ३१% लोकांनी निवडून दिले असले तरी ते मला आपले सरकार वाटते कारण हाच लोकशाहीचा अर्थ आहे. मला या सरकारचे अनेक निर्णय आवडत नाहीत. पण म्हणून त्याबद्दल फेसबुकवर रोज गरळ ओकत राहून जातीय, वर्गीय, राजकीय आणि सामाजिक तेढ पसरवणे मला माझे कर्तव्य वाटत नाही. हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन किंवा खंडन करणे हे माझे नैमित्तिक कर्तव्य मला वाटत नाही. पण माझी खरी ताकद मतदानाच्या दिवशी वापरायला मी विसरणार नाही.

सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर समाजात व्यक्त होताना जपून व्यक्त व्हावे अश्या मताचा मी आहे. 'अभ्यासोनि प्रकटावे' यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझे मत चुकू शकते याची मला जाणीव आहे. पण कुणी उगीच माझ्या अंगावर धावून आल्यास, मला कुठली लेबले लावण्याचा प्रयत्न केल्यास मी त्यांना सौम्य शब्दात त्यांची मर्यादा दाखवून देतो.

मला माहिती आहे की प्रत्येकाला आतून तो स्वतः किंवा त्याचा आवडता राजकीय नेता Atlas Shrugged मधला जॉन गाल्ट किंवा हँक रिअरडन वाटत असतो. आणि सगळे विरोधक जेम्स टॅगार्ट, रॉबर्ट स्टेडलर वाटतात. पण खऱ्या आयुष्यात नायक आणि खलनायक वेगळे नसतात. त्यांचे नायकत्व किंवा खलनायकत्व काळाच्या कसोटीवर ठरते. आपण दिलेल्या पाठिंब्यावर नाही हे माझे स्पष्ट मत आहे.

कुठल्याही विचारवंताला, अभ्यासकाला कुणी पाठिंबा दिला, कुणी त्याचा गौरव केला यावरून मी त्याच्या विचारांचे मोठेपण जोखत नाही.

राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांसाठी मी नसून माझ्यासाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आहेत. मी त्यांचे समर्थन किंवा विरोध करायचा नसून माझ्या विकासाला जे उपयुक्त आहेत, कालसुसंगत आहेत त्यांची निवड करायची आहे. मत देऊन झाल्यावर माझ्या मनासारखे सरकार आले नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा, 'तुम्ही मूर्ख आहात' म्हणून इतरांवर उठसूट आगपाखड करण्यापेक्षा, आपल्या मताच्या मित्रांना सांभाळणे आणि विरोधकांना सौम्य पण ठाम शब्दात आपले म्हणणे ऐकवणे, हे एक नागरिक म्हणून मला माझे कर्तव्य वाटते.

याबद्दल मला कुणी भाबडा म्हटले तरी मला हरकत नाही. पण मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे कुणावरही सातत्याने टीका किंवा समर्थनाची माझ्यावर नसलेली जबाबदारी मी घेणार नाही. यामुळे कुण्या मित्राचा अपेक्षाभंग झाला तर त्याला माझा नाईलाज आहे. पण म्हणून मित्रांनी माझ्यावर ट्रोलिंग केल्यास त्याला तेच जबाबदार असतील.

माझे डोके माझ्या ताब्यात असल्याने मोदी किंवा मोदीभक्त माझ्यावर परिणाम करू शकत नाहीत. पण दुर्दैवाने त्यांच्या विरोधकांवर मात्र त्यांचा खोलवर परिणाम होत आहे. आणि हे अतिशय त्रासदायक आहे.

4 comments: