Sunday, December 2, 2018

लग्नाला चला

माणसांना सगळ्यात जास्त काय आवडतं?

माझ्या मते माणसांना सगळ्यात जास्त लग्न आवडतं. लग्न करावं असं सगळ्या माणसांचं स्वप्न असतं. विशेषतः भारतीयांच्या जीवनात तर लग्न हा अविभाज्य घटक आहे. मुलांना लग्न करावंसं वाटतं. मुलींना लग्न करावंसं वाटतं. आपल्या मुलामुलींची लग्न झाली की आईबापांना कृतकृत्य वाटतं. मग ते इतरांच्या मुलामुलींची लग्न लावण्याच्या उद्योगाला लागतात. इंटरनेटचा वापर करुन एकीकडे जगभरात डेटिंग साईट्स बनल्या तर भारतात मात्र सरळ लग्न जुळवून देण्यासाठीच वेबसाईट्स तयार झाल्या.

ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांच्याकडे भारतीय समाज एकतर सहानुभूतीने बघतो नाहीतर त्यांना डोक्यावर घेऊन त्यांच्या कथित ब्रह्मचर्याचे गोडवे गात वैवाहिक आयुष्य कसे जगावे त्याचे धडे या अविवाहितांकडून घेतो. ज्याला एखाद्या क्षेत्राचा अजिबात अनुभव नाही त्याला त्या क्षेत्राचा तज्ञ मानण्याची भारतीय परंपरा मोठी नवलाची आहे. भारतीयांना अनुभवजन्य ज्ञानापेक्षा कल्पनाजन्य ज्ञानाबद्दल जास्त आदर आहे. आणि यशस्वी माणसापेक्षा अयशस्वी माणसाच्या शब्दांना भारतीय लोक झुकतं माप देतात. पुलंनी एका ठिकाणी म्हटलं आहे की ‘प्रपंच करावा नेटका म्हणणारे रामदास बोहल्यावरून पळून गेले होते आणि जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणणारे तुकाराम दिवाळं काढून मोकळे झाले आणि बायकोकडून बोलणी खात होते.’ (पुलंनी म्हटलंय सांगितल्यामुळे समर्थभक्त आणि तुकोबाभक्त माझ्यावर चवताळून येणार नाहीत आणि सध्या पुलं हयात नसल्याने कुणावर चवताळून जावं ते न कळल्याने निरुपाय होऊन पुढे वाचतील. मला जे म्हणायचं होतं ते आधीच म्हणून ठेवून पुलंनी माझ्यावर जे उपकार केले आहेत त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.) हे थोडं विषयांतर झालं. पण मूळ मुद्दा आहे तो भारतीयांच्या लग्नप्रेमाचा.

कुणाच्या लग्नात काय जेवण होतं? किती हुंडा दिला? किती पाकिटं आली? अहेर आणू नये असं पत्रिकेत सांगणाऱ्या माणसाला आपण गनिमीकाव्याने भेटवस्तू कशी दिली? याच्या चर्चा रंगतात. नात्यागोत्यातील लग्नांबरोबर शेजारपाजाऱ्यांची, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांची लग्न आपल्या जीवनात विविध भावनांचे कल्लोळ घडवून आणतात. चोवीस तास बातम्या देणाऱ्या असंख्य चॅनेलच्या आणि समाजमाध्यमांच्या आधुनिक काळात अजून एका लग्नाला आपण आपल्या जीवनात स्थान दिलेलं आहे. ते म्हणजे सेलिब्रिटीजचं लग्न. इंग्लंडच्या राजपुत्राचं लग्न असो की विराट अनुष्काचं की दिपिका रणवीरचं; भारतीयांना या सर्व लग्नांतही फार रस असतो.

बहुचर्चित असलेल्या दिपिका रणवीरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ वर्गातली मुलं गेल्या आठवडय़ात इंस्टावर बघत होती. आणि घरी बायको सव्यसाचीच्या लेहेंग्याबद्दल बोलत होती. (त्याला लेंगा म्हणालो म्हणून तिने माझ्याकडे मेलेल्या उंदराकडे पहावं तसा कटाक्ष टाकला होता) मला इंस्टाग्राम वापरताना अवघडलेपण येत असल्याने आणि लेंगा व लेहेंग्यातील फरक कळत नसल्याने दिपिका आणि रणवीरच्या लग्नात फार रस वाटत नव्हता. ज्या लग्नात आपण मुलीकडचेही नाही आणि मुलाकडचेही नाही अश्या लग्नात फार रस दाखवणे मला कालपर्यंत तरुण आणि मध्यमवर्गाची चैन वाटत होती.

पण काल रात्री पुण्याहून डोंबिवलीला परत येत होतो. डोंबिवलीच्या वेशीवर केवळ लायटिंगच्या सहाय्याने बनवलेलं गणपतीचं एक भलंमोठं चित्र आणि त्यामागे त्याला वीजपुरवठा करणारा किर्लोस्करचा फिरता जनरेटर दिसला. रस्त्यातील खड्डे चुकवत या चित्राचं कारण काय असावं हा विचार करत पुढे गेलो तर जागोजागी विविध देवी देवतांची अशी लायटिंगवाली चित्र दिसली. रस्त्याला लायटिंगचं छत केलेलं होतं. रस्त्याच्या कडेला सर्वत्र भगवे झेंडे लावलेले दिसले. ठिकठिकाणी तात्पुरते मंच उभे केलेले दिसले. रस्त्याच्या वाहतुकीला बांधण्यासाठी मधोमध बांबूचे डिव्हायडर उभे केलेले दिसले. मी आनंद चित्रपटाची गाणी ऐकत येत होतो. तर एकाएकी दक्षिण भारतीय पद्धतीची भक्तिगीतं त्यात मिसळू लागली म्हणून शेवटी गाडीतील ऑडिओ सिस्टीम बंद केली तर रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या लाऊड स्पीकरवरून वाजणारी गाणी माझ्या गाडीत घुमू लागली. शेवटी जिथे दोन वर्षांपूर्वी साहित्य संमेलन झालं होत त्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत पोहोचलो तर उलगडा झाला. डोंबिवलीत श्रीनिवास मंगल महोत्सव होऊ घातला होता. श्रीनिवास मंगल महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजीचं त्याच्या दोन पत्नींबरोबर लग्न. लग्न १ डिसेंबरला होणार होतं पण वातावरणात उत्साह भरून राहिला होता. भगव्या रंगावर स्वार होऊन राजकारण करणारे दोन्ही राजकीय पक्ष या कार्यक्रमात सहभागी होते असं सगळीकडे लागलेल्या होर्डिंग्सवरून कळत होतं. या विवाहाचं आमंत्रण सगळ्या समाजाला होतं.









तिरुपतीला गेलो असताना तेथील स्थलमहात्म्य सांगणारी कथा मला आठवली. बालाजीला लग्न करायचं असतं. आता देवाचं लग्न म्हटलं की मोठा समारंभ आलाच. मग खर्चही तितकाच मोठा. मग बालाजीने देवांच्या सावकाराकडे म्हणजे कुबेराकडे कर्ज मागितलं. बालाजी जरी देवाधिदेव असला तरी सावकाराचं काम चोख, म्हणून कर्ज फेडणार कसं? हा प्रश्न कुबेराने विचारलाच. तेव्हा बालाजी म्हणाला की मी तिरुमलाच्या डोंगरावर भक्तांसाठी उभा राहीन. त्यांच्या इच्छा पूर्ण करीन. त्या बदल्यात ते मला जी धनदौलत अर्पण करतील ती वापरून मी तुझं कर्ज फेडीन. तेव्हापासून बालाजी तिरुमलाच्या डोंगरावर भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा आहे. फक्त रात्रीचे दोन तास सोडल्यास तो दिवसभर भक्तांना दर्शन देत असतो. तो आपल्या इच्छा पूर्ण करतो आणि आपण त्याला धनदौलत अर्पण करून त्याचं कर्ज फेडायला त्याला मदत करत असतो. आणि आताशी कुठे पूर्ण कर्जाचा एक शतांश भाग फेडून झाला आहे. देव इतका भांडवलवादी तर त्याचे भक्तही तितकेच भांडवलवादी. बालाजीचे कित्येक भक्त बालाजीलाच भागीदार म्हणून दाखवतात. त्यामुळे धंद्यात होणाऱ्या फायद्याचा एक हिस्सा देवस्थानाला दिला जातो परिणामी बालाजीचे कर्ज फेडायला मदत होते. आणि कर्ज फिटावे म्हणून बालाजी धंद्यात नुकसान होऊ देत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

रात्री घरी पोचलो. मुलांना तिरुपतीच्या लग्नाची आणि कर्जाची गोष्ट सांगितली. म्हटलं दिपिका रणवीरचं लग्न त्याची तीन तीन रिसेप्शन सगळी त्यांच्या स्पॉन्सरच्या पैशाने साजरी होत आहेत. लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळे डिझायनर्स, ज्वेलर्स आपापली जाहिरात करून घेत आहेत. दिपिका रणवीरला लग्न साजरं करायला मिळतं आहे, जाहिरातदारांना जाहिरात करायला मिळते आहे आणि आपल्याला लग्न बघायला मिळतं आहे. अर्थव्यवस्थेचं चाक फिरतं आहे. थोर्स्टीन व्हेब्लेनने सांगितलेली कॉन्स्पिक्युअस कंजम्पशनची थियरी लागू होताना दिसते आहे. (Theory of Conspicuous Consumption म्हणजे उल्लेखनीय खरेदीचा सिद्धांत : सगळ्यांच्या नजरेत येईल अश्या उल्लेखनीय आणि उधळपट्टीच्या राहणीमानामुळे धनिक लोक समाजात रोजगार निर्माण करतात. धनिकांच्या छानछोकी आणि उधळपट्टीमुळे समाजाचे नुकसान होत नसून एका प्रकारे समाजातील निम्न आर्थिक गटांतील लोकांना काम मिळतं असा या सिद्धांताचा गाभा आहे)

बालाजीने (किंवा मग तिथल्या पुजाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी) या थियरीला ओलांडून पुढचा टप्पा गाठला. जे लग्न कधी झालं की नाही याची खात्री नाही त्याचा आधार करून प्रचंड वेगाने फिरणारं आर्थिक व्यवहाराचं एक केंद्र तिरुमला तिरुपतीच्या डोंगरात उभं केलं. त्याला गती देण्यासाठी वापरली भारतीयांच्या श्रद्धेची ऊर्जा. आणि आताचे राज्यकर्ते त्याच चाकाला पुढे ढकलताहेत. आता त्याच देवाच्या लग्नाचे खेळ गावोगावी भरवून लोकांच्या आयुष्यात भावनांचे कल्लोळ घडवून आणत आहेत. धर्ममार्तंडांना आपलं धर्मकार्य पूर्ण केल्याचा आनंद आहे. राजकारण्यांना आपला मतदार बांधला गेल्याचा आनंद आहे, सामान्यांना एक दिवस पुण्य केल्याचा आणि सेलिब्रिटी लग्नाचा भाग होता आलं याचा आनंद आहे. मंडपावले, लायटिंगवाले, खुर्च्यावाले, फुलवाले, लाऊड स्पीकरवाले, आरोग्य सुरक्षावाले, नृत्य गायन करणारे, किराणा माल विकणारे, कापडचोपड विकणारे या सगळ्यांना आपापला व्यवसाय वाढल्याचा आनंद आहे. देवाच्या लग्नाला केंद्रात ठेवून, धर्म आणि परंपरांच्या आरी वापरून बनवलेलं चाक वापरून अर्थव्यवस्था गरगर फिरते आहे.

मुलांना किती कळलं ते ठाऊक नाही पण नेहमी उशीरापर्यंत जागणारी माझी दोन्ही मुलं काल फार लवकर झोपी गेली. आणि मला जाणवलं की दिपिका रणवीरचं लग्न जरी तरुण मध्यमवर्गाच्या चैनीचा भाग असला तरी डोंबिवलीत होऊ घातलेलं बालाजीचं लग्न गरीब श्रीमंत सगळ्यांसाठी आहे. किंबहुना या सगळ्यांना एक सेलिब्रिटी लग्न अनुभवायला मिळणार आहे.

सकाळी बायकोबरोबर बाहेर पडलो. सगळी होर्डिंग्स बघून बायको वैतागून म्हणाली डोंबिवलीचे रस्ते नीट करायला या राजकारण्यांकडे वेळ आणि पैसे नाहीत पण देवमूर्तीच्या लग्नासाठी पैसे आहेत आणि त्यांना भरभरून डोनेशन द्यायला लोक तयारही आहेत. आपल्या देशातील लोकांचं काही खरं नाही. देवाच्या नावाखाली कुठेही कितीही पैसा सोडतील पण एकदा पुण्य करून आले की नंतर पुन्हा समाजाचे नियम मोडायला तयार होतील. एकीकडे देव एकंच आहे असं सांगणारे; देवाच्या ब्रह्मचारी रूपाच्या देवळात बायकांनी जावं की नाही यावर परंपरेच्या पडद्यामागे लपतात आणि दुसरीकडे त्याच एकमेव देवाच्या संसारी रूपाचं मैदानात लग्न लावून त्यासाठी अख्ख्या गावाला आमंत्रण देतात. यातला विरोधाभास कुणाला कळत नाही हीच आपल्या शोकांतिका आहे.

तिचं म्हणणं मला पटलं होतं. पण कुठलाही समाज उत्सवप्रिय असतो. त्यामुळे लोकांनी लग्नात उत्साह दाखवला यात मला भारतीय समाजाची घोडचूक दिसत नव्हती. पण देवाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी, पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी एका पायावर तयार असलेला समाज नंतर आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मात्र मागे हटतो ही मात्र आपली घोडचूक आहे. कदाचित या साऱ्यांच मूळ आपल्या सुखाच्या कल्पनांमध्ये असावं.

आयुष्य सोपं होणं म्हणजे सुख असं न मानता पुण्य पदरी पडणं म्हणजे सुख अशी आपल्या समाजाची धारणा असावी. हा विचार मनात आला आणि विठ्ठल उमप यांनी गायलेल्या लोकगीताच्या ओळी आठवल्या. लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला या लोकगीतात ते म्हणतात

लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला
नाक नाही नथीला अन भोक पाडा भितिला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला

बसायला तुम्हाला मेणाची गाडी
गाडीला वढायला मुंगळ्याची जोडी
तुम्ही गाडीखाली बसा
पोरं बापं खांबाला कुत्री घ्या काखंला
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला

इकडं काही जेवायचं नाही तिकडं काही खायचं नाही
हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायाचं
जेवल्याशिवाय न्हाई जायचं चाळणीनं पाणी प्यायचं
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला 



हे गाणं बहिर्जी नाईकाने शत्रूची खबरबात देण्यासाठी सांकेतिक भाषेत रचलं होतं असं म्हणतात. यातील बहिर्जीला अभिप्रेत असलेली सांकेतिकता वगळली तरी एक डिसेंबरला संध्याकाळी डोंबिवलीतील अनेक लोक याच प्रकारे या लग्नात उपस्थित राहतील. व्यापाऱ्यांचा व्यापार होईल. राजकारण्यांचं राजकारण, धर्ममार्तंडांची मान उंचावेल पण सामान्य जनता मात्र चाळणीनं पाणी पिऊन पुण्य पदरी पडल्याचं काल्पनिक सुख पदरात पाडून घरी परतेल.

इथली जनता जगातील इतर कुठल्याही जनतेपेक्षा जास्त अडाणी नाही, जास्त अंधश्रद्ध नाही. गरज आहे ती तिच्या श्रद्धेचा वापर करून तिच्या सुखाच्या कल्पना बदलण्याची. आपल्या पूर्वजांनी सुखाचं पुण्याशी लावलेलं लग्न जर आपण मोडू शकलो तर भौतिक सुखांची कुचेष्टा न करता आपण आपली आवड पूर्ण करू शकू.
लग्न लावण्याची आवड, इतरांचं लग्न लागलेलं बघण्याची आवड.

2 comments:

  1. छान लेखन! आवडले

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लेखन अप्रतिम सर

    ReplyDelete