Tuesday, April 26, 2016

निर्गुणी भजने - प्रस्तावना

------------------

------------------
मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागांची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात. मनावर आलेली मरगळ घालवतात.


मला वाटत संगीताबद्दलची आवड तयार करून मला आपल्या कानसेन घराण्याचा शागीर्द करून घेण्याचे श्रेय माझ्या बाबांकडे जाते. माझे बाबा शास्त्रीय संगीत कमी ऐकत असले तरी भक्ती संगीत आणि नाट्य संगीताचे चाहते होते. पंडित जसराज, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा, किशोरीताई आमोणकर हे त्यांचे आवडते गायक. तुटपुंज्या पगारात त्यांनी एक छान रेकॉर्ड प्लेयर घेतला होता आणि त्यांच्या आवडत्या गायकांच्या रेकॉर्ड ते मोठ्या हौसेने विकत आणायचे. लहानपणी कुमारजींची निर्गुणी भजने मी आवडीने ऐकायचो असे माझी आई सांगते. मी तीन चार वर्षाचा असताना, माझ्या लहान भावाच्या जन्मानंतर एके दिवशी, आता हे छंद परवडायचे नाहीत असे वाटून त्यांनी तो रेकॉर्ड प्लेयर आणि त्या रेकॉर्ड्स घरातून काढून टाकल्या. मी चौथीत गेल्यावर, ताप काढून त्यांना फिलिप्सचा टू इन वन टेपरेकॉर्डर घ्यायला लावला. पण त्यांनी त्यातल्या रेडीओलाच जवळ केले. नाही म्हणायला, सुरेश वाडकरांची 'ओंकार स्वरूपा'ची आणि भीमसेन जोशींची 'सुन भाई साधो'ची, अश्या दोन कॅसेटस त्यांनी आणल्या होत्या. पण निर्गुणी भजने घरातून गेली ती गेलीच. बाबांनी जणू काही आपलं संगीत प्रेम आवरूनच घेतलं होतं.


मग मी मित्रांकडून कॅसेटस आणू लागलो. वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून किंवा बक्षीसाच्या पैशातून विकतही घेऊ लागलो. त्यात सगळं काही होतं. आधी किशोर कुमार आला, मग हेमंत कुमार, मग मन्ना डे, मग तलत मेहमूद, मग अजून एक ट्रॅक त्यात वाढला तो म्हणजे इगल्स, एल्विस प्रेसले, आणि मग बिली जोएल, मायकेल जॅक्सन. मग सी ए च्या अभ्यासाची आर्टीकलशिप सुरु झाली आणि माझा स्टायपेंड पण सुरु झाला. त्यातून कॅसेटस विकत घेणं सोपं झालं. त्यानंतर माझा ट्रॅक एकदम बदलून गेला आणि मी वाद्य संगीताकडे वळलो. उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं रविशंकर ऐकू लागलो. मग ओशोंच्या आश्रमातील ध्यानासाठीचे संगीत ऐकू लागलो. रोज (Rose) मेडीटेशन, गार्डन ऑफ बिलव्हेड, बॅशोज पॉण्ड, ओपन विंडो हे माझे सी ए चा अभ्यास करतानाचे आवडते अल्बम्स होते. तोपर्यंत बाबा, आपल्या कानसेन घराण्याच्या शागीर्दाची धडपडत चालणारी प्रगती लांबूनच बघत होते. मग पैसे कमवू लागलो आणि वाद्य संगीताच्या जोडीला बाबांचे लाडके पंडीत जसराज, कुमारजी, भीमसेनजी, वसंतराव आणि अभिषेकी बुवा कधी आले ते कळलेच नाही. मी अधाश्यासारखं ऐकत होतो. आता शागीर्दाच्या साथीला उस्ताद स्वतः (म्हणजे बाबा) पण येऊ लागले. आणि आम्हा कानसेनांची मैफल रंगू लागली. सगळे गायक आवडत होते पण मनात मोठ्ठ घर केलं कुमारजींनी. त्यांचे गीत वर्षा, मला उमजलेले बालगंधर्व, स्वरांजली ऐकता ऐकता हाती लागली 'निर्गुण के गुण' ची कॅसेट. त्यानंतर घरात निर्गुणी भजने पुन्हा आली ती कायमचीच.


सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. यु ट्यूब ची मजा घेत होतो पण बाबांना यु ट्यूबवर दाखवण्यासारखं काही मिळत नव्हतं. एक दिवस काम करताना कंटाळा आला म्हणून जरा सर्फ करत होतो तर माझ्याकडच्या कुमारजींच्या कॅसेटमधली माझी आवडती 'उड जायेगा हंस अकेला', 'हिरना' ही निर्गुणी भजनं मिळाली. ती ऐकता ऐकता, माझ्याकडच्या कॅसेटमध्ये नसलेली अजून अनेक निर्गुणी भजनं सापडली. नंतरच्या एका रविवारी बाबांना बसवून ऐकवलं. ते पण फार खूष झाले होते. त्यांच्याकडचा रेकोर्ड प्लेयर गेल्यावर त्यांचं हे आवडतं भजन त्यांनी पण वीस एक वर्षांनी ऐकलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी यु ट्यूबला मनोमन लाखो धन्यवाद दिले होते.


त्या दिवशी बाबांना ऐकवलेलं भजन होतं, 'सुनता है गुरु ग्यानी'. भजन फार सुंदर. वेगळेच शब्द. शेवटच्या चरणातील, 'कहे कबीरा सुन भाई साधो' मुळे हे कबीराचे आहे ते कळले होते. पण कुमारजींचा स्वर्गीय सूर ऐकताना शब्दांकडे लक्ष कमी जायचे. हे फक्त ऐकूनच आपण काहीतरी फार पवित्र, मंगल करतोय असे वाटायचे. आणि शब्द सुरांच्या त्या अनवट रचनेचा अर्थ न कळता सुद्धा तिचा वारंवार आनंद घ्यायचो. नंतर एकदा आंतरजालावर या रचनेचे शब्द मिळाले. आणि आपल्याला काही कळत नाही या माझ्या निष्कर्षावर शिक्का मोर्तब झाले. पण भजनाची गोडी काही कमी झाली नाही.

जोपर्यंत शब्द सुरात घोळून येत होते तोपर्यंत सुरांची मोहिनी इतकी होती की शब्दांकडे दुर्लक्ष होत होते. पण जेंव्हा शब्द अक्षरांच्या स्वरूपात आले, तेंव्हा मात्र त्यांचा अर्थ आपल्याला कळत नाही आहे हे डाचू लागले. कुठे काही मिळेल तर शोधणे चालू होते. त्याशिवाय स्वतःचे अर्धवट का असेना पण डोके चालवणे होतेच. पण अर्थ सुस्पष्ट लागत नव्हते. मग एक दिवस 'डॉ स म परळीकरांचे', 'सार्थ निर्गुणी भजने' हे पुस्तक हाती आलं. हे छोटेखानी पुस्तक खूप सुंदर आहे. त्यात कबीरांची २१ तर इतर संतांची ९ निर्गुणी भजने आहेत. लेखक स्वतः, एम ए च्या विद्यार्थ्यांना कबीर भजने सात आठ वर्षे शिकवत होते असे त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. त्यामुळेच की काय पण पुस्तकाची मांडणी मूळ भजन, मग शब्दार्थ आणि मग लेखकाला उमजलेला भावार्थ अशी थोडीशी क्रमिक पुस्तकांसारखी आहे. या पुस्तकाने माझी अर्थासाठीची भूक अंशतः का होईना पण भागवली खरी. किंवा ही निर्गुणी भजने समजण्यासाठीची पूर्वपीठीका आणि त्यांचा अर्थ कसा लावावा त्याचे दिग्दर्शन या पुस्तकाने अतिशय उत्तम रीतीने केले.

शब्दार्थ जरी एकसारखे असले तरी भावार्थ मात्र प्रत्येक माणसाला त्याच्या आकलनाप्रमाणे वेगवेगळे वाटू शकतात. आणि निर्गुणाचे वर्णन सगुण शब्दांनी केले असल्याने त्यात अनेक अर्थ लपले असतात किंवा त्यातून अनेक अर्थ निघू शकतात. शाळेतील दाणी बाई जर संगीताबरोबर कबीर आणि हठयोग शिकवत असत्या तर या दोन विषयांवरील माझे प्रभुत्व, संगीताच्या अभ्यासाइतकेच प्रगल्भ आहे याचे प्रमाणपत्र त्यांनी स्वहस्ते दिले असते आणि मलाही ते मान्य आहे. पण ज्ञान वाटल्याने वाढते या सुविचाराचा अनुभव घेताना मला अजून एक अनुभव आलेला आहे की अज्ञान वाटल्याने कमी होते, म्हणून मला आवडलेल्या निर्गुणी भजनांचे माझ्या अल्पमतीला लागलेले भावार्थ लिहून ठेवायचा संकल्प केला आहे. यात डॉ. परळीकरांचे पुस्तक, सिंगिंग एम्प्टीनेस हे लिंडा हेस यांचे पुस्तक, आंतरजालावरची माहिती हा पाया आणि त्यावर माझे मुक्त चिंतन करू शकीन असे आत्ता तरी वाटते आहे. या प्रयत्नात माझे अज्ञान उघडे पडले तर इथले मित्र मदत करतील आणि मला, आपल्या आकलनाचा फायदा करून देतील अशी खात्री आहे.
------------------

------------------

1 comment:

  1. आज वाचायला सुरुवात केली सर 😇 😇

    ReplyDelete