Showing posts with label रसग्रहण. Show all posts
Showing posts with label रसग्रहण. Show all posts

Sunday, March 15, 2020

कंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यटिफुल

सकाळी चालायला जाण्यापूर्वी फेसबुक उघडलं. एका ज्येष्ठ मित्राने कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांचा व्हिडिओ शेअर केलेला पाहिला. त्यांच्याच पोस्ट्स बघून दोन वर्षांपूर्वी कंबोडिया व्हिएतनामला गेलो होतो. 

कंबोडियाच्या अंगकोर वट आणि अंगकोर थॉमच्या देवळानंतर 'टा प्र्हॉम' देवळात गेलो होतो. (या देवळाच्या दुरुस्तीचं काम भारत सरकार करत आहे आणि अॅंजेलीना जोलीच्या टूम्ब रेडर्स या चित्रपटाचं चित्रीकरण या देवळातही झालं होतं). 'टा प्र्हॉम'च्या भव्य भग्न वास्तूत फिरताना मोबाईलवर 'ओ फॉर्च्युना' लावून हिंडलो होतो. आजूबाजूला कुणी नाही ते पाहून इअरफोन बंद करून त्या भग्न वास्तूलाही 'ओ फॉर्च्युना' ऐकवलं होतं. कार्ल अॉफच्या संगीताची जादू, ओ फॉर्च्युनाचे न कळणारे लॅटिन शब्द आणि जुन्या देवळांच्या भिंतीतून उगवून आकाशापर्यंत पोचलेले वटवृक्ष या सगळ्याचा परिणाम होऊन मनात उसळलेला भावनांचा कल्लोळ डोळ्यातून घळाघळा वाहू दिला होता.आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून बावरलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप हसूही आलं होतं. 


आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हणून युट्यूबवर ओ फॉर्च्यूना शोधलं. समोर नेहमीचे व्हिडीओ आले आणि नेहमीपेक्षा एक वेगळा व्हिडीओ आला फ्लॅश मॉब या नावाने. 



माझ्या आयुष्यात फ्लॅश मॉब ही गोष्ट कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली नाही. अगदीच तोंडी लावायला म्हणून जेव्हा पिझ्झा हट भारतात नवीन होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा हिला घेऊन पिझ्झा हटला गेलेलो असताना आम्हाला वाढणारा वेटर टेबलाजवळ येऊन आपलं काम करत असताना एकाएकी बाकीच्या वेटर्सनी ताल धरून नाचायला सुरवात केली होती आणि तिथे आलेल्यापैकी कुणाच्या तरी वाढदिवसासाठी एक गाणं म्हणत टेबलामधल्या जागेत नाच करून दाखवला होता. 

माझ्या तालाशी जुळवून घेणं अशक्य आहे हे नृत्यदेवतेला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे तिने माझ्या आयुष्यातून फार लवकर काढता पाय घेतला होता. त्यामुळे इतर कुणी नाचू लागलं तरी मला अवघडल्यासारखं होतं. त्याशिवाय आपण, नाच आवडणाऱ्या आपल्या प्रेयसीला घेऊन त्या काळात न परवडणाऱ्या हॉटेलात गेलेलो असताना वेटर्सनी छान नाच करून दाखवल्याने माझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यानंतर मी कायम डॉमिनोजचा ग्राहक झालो आणि पिझ्झा हटला 'नाचता येईना ते गिऱ्हाईक होई वाकडे' ही मराठी म्हण शिकवली होती. 

त्यानंतर साधारण २०११ ला सीएसटी स्थानकावर संध्याकाळी पाचच्या सुमारास तरुणांच्या एका समूहाने रंग दे बसंतीच्या गाण्यावर समूहनृत्य केलेलं होतं. त्याचा व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांत बघताना, आपल्याला नाचता आलं असतं तरी आपण असं चारचौघात नाचू शकलो नसतो याची खात्री पटून त्या गाण्यावर सगळ्यात पहिल्यांदा नाचायला सुरवात करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटलं होतं. 



नंतर कळलं होतं की बघणाऱ्यांसाठी जरी तो उत्स्फूर्त अविष्कार असला तरी त्यात भाग घेणाऱ्यांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केलेली असते. त्यांचं सादरीकरण रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी प्रशिक्षित कॅमेरामन मोक्याच्या ठिकाणी पेरलेले असतात आणि ते केवळ सादरीकरणाला रेकॉर्ड करत नसून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील रेकॉर्ड करत असतात. अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितरित्या आपल्या बाजूला संगीत किंवा नृत्याचा अविष्कार सुरु झाला की माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते बघणं मोठं मनोरंजक असतं. आज ओ फॉर्च्यूनाच्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ बघताना त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना असाच हरखून गेलो. 

फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. यूट्यूबच्या अल्गोरिदमला माझी आवड कळली आणि त्याने ऑटो प्ले मोडवर फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाचे व्हिडीओ दाखवायला सुरवात केली. पश्चिमी देशात हे फ्लॅश मॉब साधारणपणे एअरपोर्ट किंवा मॉल किंवा रेल्वे स्टेशन किंवा शहरातील एखादा प्रसिद्ध चौक अश्या ठिकाणी आपलं सादरीकरण करतात. सुरवातीला तिथल्या गिऱ्हाईकांचे किंवा प्रवाश्यांचे आवाज, नेहमीच्या सूचनांचे आवाज असा सगळा मामला चालू असतो. आणि कुठेतरी कोपऱ्यातून कुणीतरी व्हायोलिन किंवा बासरी किंवा ट्रम्पेट किंवा छोटा ड्रम वाजवायला सुरवात करतं. लोक लक्ष देत नाहीत. मग अजून कुणीतरी दुसरं वाद्य घेऊन येतं. ठरलेल्या क्रमाने एका मागून एक इतर वाद्यवृंद गोळा होत जातो. आणि मूळ सुरावटीत आपलं वाद्य मिसळवू लागतो. आता लोक शांत होऊ लागतात. बहुतेक लोक एका ठिकाणी उभे राहून त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ लागतात. इतस्ततः धावणाऱ्या लहान मुलांचे आईबाप त्यांना पकडून उभे रहातात. संगीताची जादू आणि वातावरणातील भारलेपणा असा असतो की इतका वेळ गोंधळ घालणारी मुलंही शांतपणे उभी राहतात. वाद्यमेळ वाढत जातो. आता वाद्यवृंदाचा संगीत संयोजकही समोर येतो आणि त्या सुरावटीत तेथील सर्वजण गुंगून जातात. शेवट होतो आणि मग टाळ्यांचा जल्लोष, शिट्ट्या किंवा प्रोत्साहनपर हाकारे यांचा कल्ला होतो आणि रोमांचित प्रेक्षक पुन्हा आपापल्या कामाला लागतात. सगळ्या फ्लॅश मॉब व्हिडिओचा फॉरमॅट साधारणपणे असाच असतो. 

मोबाईल खिशात होता. त्यामुळे पुढे काय सुरु होणार ते माहिती नव्हतं. प्रत्येक वेळी युट्यूब जे ऐकवेल त्यासाठी तिथल्या प्रत्यक्षदर्शींइतकाच मी देखील अनभिज्ञ होतो. एकामागून एक वेगवेगळ्या सुरावटी वाजत होत्या. ओ फॉर्च्यूनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली सादरीकरणं झाली. मग बोलेरो झालं. मग ब्ल्यू डॅन्यूब झालं. मग बीथोव्हेनच्या नवव्या सिम्फनीतील ओड टू जॉय झालं. क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी झालं. 

चढ चढून धाप लागली होती. पण कानात वाजणाऱ्या सुरावटींमुळे अंगावर रोमांच उभे राहात होते. जरा थांबलो. घाम पुसता पुसता पुन्हा एकदा मगाशी लागून गेलेलं बोलेरो लावलं. मेक्सिकोतील कुठल्यातरी शहरातील चौकात एका वाद्यवृंदाने रावेलची ही रचना सादर केली होती. संध्याकाळच्या गर्दीतून एक मुलगी पुढे येते. ड्रम्स मांडते आणि बोलेरोचा मध्यवर्ती ताल चालू करते. 



बोलेरोमध्ये तो ताल संपूर्ण वेळ चालू राहतो. जवळपास पंधरा मिनिटांच्या त्या संगीतात मध्यवर्ती असणारा एकच ताल, संगीताच्या कार्यक्रमांसाठी बांधलेल्या विशेष सभागृहात असतानाही पुन्हा पुन्हा वाजवत राहायचं म्हणजे अजिबात खायचं काम नाही. आणि लोकांच्या गर्दीत एकट्याने येऊन आपले ड्रम्स मांडून तो ताल धरायचा म्हणजे तर अजून कठीण. आजूबाजूला अगदी जवळ उभे असलेले प्रेक्षक, त्यामुळे जरा ताल किंवा ठोका चुकला की नाचक्की ठरलेली. रंग दे बसंती गाण्यावर नाचायला सुरवात करणार्या पहिल्या मुलीप्रमाणेच या ड्रम वाजवणाऱ्या मुलीबद्दल मला फार कौतुक वाटू लागलं. वाटलं की अश्या कुठल्या फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाच्या वेळी आपणही तिथे असलं पाहिजे. त्या वाद्यवृंदातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक करताना मी थकणार नाही याची माझी मलाच खात्री पटली. 

आणि एकदम जाणवलं की फेसबुक म्हणजे एक प्रकारचा फ्लॅश मॉब आहे. फक्त या मॉबमधे जो तो एकटा असतो. आणि इथे बहुतेक जण फारसा सराव न करता येतात. आपापल्या भिंतीवर खरडणारा प्रत्येकजण एकटाच वेगवेगळी वाद्य वाजवत असतो. आणि आपापल्या कामात गुंतलेले लोक मधेच तिथे डोकावतात. आपण कलाकार आहोत की नाही हे माहिती नसलेल्या कलाकारांचं सादरीकरण बघत असतात. काहींचे ताल चुकतात. काहींचा एकट्याचा वाद्यवृंद फारसा रंग भरत नाही. काहींचा वाद्यवृंद मात्र कमालीचा रंगतो. लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांना खूष करून जातो. तुलना करून माझा मीच हसलो. बोलेरो संपलं. 

चेकॉव्हस्कीची रचना सुरु झाली. ही रचना मात्र कुठल्या एअरपोर्ट किंवा मॉलमध्ये नसून चक्क एका हॉस्पिटलमध्ये सादर केली होती. 



वेदनेने बेजार झालेल्या रुग्णांना आणि आप्तेष्टांच्या दुखण्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांना हे स्वर्गीय संगीत ऐकून किंचित काळ का होईना पण वेदनेचा आणि चिंतेचा विसर पडला असेल, असा विचार करून, त्या वाद्यवृंदाच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटलं. माझ्या आवडत्या शॉशँक रिडम्प्शन चित्रपटातील मोझार्ट ऑपेराचा सीन आठवला. जिथे जीवन म्हणजे त्याच त्याच कंटाळवाण्या गोष्टींची अंतहीन मालिका असते, जिथे आयुष्याला पुढे चालवणारी आशा नावाची अद्भुत साखळी नाहीशी झालेली असते, त्या रुक्ष आणि भकास तुरुंगात अँडी जेव्हा काही काळापुरता मोझार्टची सिम्फनी वाजवतो तेव्हा ती काय आहे ते कळलं नाही तरी तेथील कैद्यांच्या मनात आशेचं इवलंसं फूल फुलवते, ते आठवलं. 



आणि त्याचवेळी हे देखील जाणवलं की हॉस्पिटलमधील फ्लॅश मॉबच्या त्या संगीताने अनेकांना काहीकाळ चिंतामुक्त केलेलं असलं तरी कदाचित असह्य वेदनेने तळमळणाऱ्या काही जणांना त्याचा त्रास झालेला असू शकतो. आपल्याला सुखावणारे सूर इतरांना सुखावत असतीलंच हे गृहीतक मोठं धोकादायक आहे. ते इतरांच्या आवडीनिवडीबद्दल, त्रासाबद्दल, आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मनःशांतीबद्दल आपल्याला आंधळं बनवू शकतं. तल्लीनतेने गायलं जाणारं भारतीय शास्त्रीय संगीत कित्येकांना नीरस वाटू शकतं. बेभान होऊन ढोल वाजवणारे स्वतः जरी खूष होत असतील तरीही त्या तालाचा त्रास होणारे अनेकजण असू शकतात. कुणाची अजान तर कुणाची आरती एकाच वेळी कुणाची मन:शांती वाढवत असताना इतर कुणासाठी मात्र डोकेदुखी होऊ शकते. कॉलेज जीवनातील माझा आवडता मायकेल जॅक्सन माझ्या वडिलांना आवडत नव्हता. इतकंच काय पण मगाशी लागून गेलेलं क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी मला समजत नसल्याने फार आवडत नसलं तरी ते माझ्या मुलांना आवडतं हे मला काही कारण नसताना खटकतं. 

चेकॉव्हस्कीची रचना हॉस्पिटलात सादर करणाऱ्या फ्लॅश मॉबमुळे सकाळपासूनच्या माझ्या सकारात्मक विचारात अशा तऱ्हेने थोडा खंड पडला. आणि मी फोन पुन्हा खिशात ठेवून उताराला लागलो. ऑटो प्लेलिस्ट चालू होती. सहासात मिनिटं कुठलंतरी संगीत चालू होतं. सकाळच्या रोमांचकारी संगीताबरोबर केलेल्या रोलरकोस्टर राईडनंतर आलेल्या विचारांमुळे थोडा खिन्न झालो होतो. आणि एकाएकी लहान मुलांच्या आवाजात गाणं चालू झालं. धून ओळखीची होती. पण कुठली ते लक्षात येईना. शेवटी फोन खिशातून बाहेर काढला. संगीताच्या त्या रचनेचं नाव होतं 'ला विटा इ बेला' या इटालियन वाक्याचा अर्थ होतो 'लाईफ इज ब्युटीफुल'. 


रॉबर्टो बेनिग्निच्या लाईफ इज ब्युटीफुल या चित्रपटात ओफेनबाख या जर्मन - फ्रेंच संगीतकाराच्या रचनेचा वापर केलेला आहे. माझी अतिशय आवडती रचना लहान मुलांच्या तोंडून ऐकताना मला जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे. मगाशी आलेली खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. आणि मी टेकडीच्या त्या निर्जन उतारावर, कानात वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर झुलत झुलत, हात हवेवर हलवत हलवत झोकात उतरू लागलो. जर त्या वेळी मला कुणी पाहिलं असेल तर 'आजकाल लोक मॉर्निंग वॉकलाही ढोसून येतात', असं त्याच ठाम मत झालं असतं. आपला पदन्यास हा झोकांड्या या सदरात जातो आहे हे जाणवूनही त्या संगीताच्या तालावर झुलण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की माझ्या मनात आधीपासून असलेली, पिझ्झा हटमधील अनपेक्षित नाचण्यामुळे अजून घट्ट बसलेली नाचण्याविषयीची अढी त्या वाकड्या उतारावर मला नाचता येत नसूनही करत असलेल्या झुलण्यामुळे किंचित सैल झाली होती.

Wednesday, September 4, 2019

थोडक्यात सांगायचं झालं तर

जर्मन भाषेतील 'कुर्त्झगेझाग्ट' म्हणजे इंग्रजीतील 'In a nutshell' किंवा मराठीतील 'थोडक्यात सांगायचं झालं तर'.

तर या कुर्त्झगेझाग्ट नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना सुंदर अॅनिमेशनच्या सहाय्याने थोडक्यात समजावून सांगणे हा या चॅनेलचा उद्देश आहे. आणि हे काम करत गेली सहा वर्षे ते यशस्वीपणे टिकून आहेत.

असं काही चॅनेल आहे हे मला माहिती नव्हतं. सकाळी पोरांना घेऊन बाहेर गेलो होतो. त्यांच्याबरोबर रिसेशनवर गप्पा मारत होतो. काही व्हिडिओ बघत होतो. एक दीड तासाने मी जरा गप्प बसलो तर मोठा लेक म्हणाला, "बाबा तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. विषय वेगळा आहे. पण तुला आवडेल."

मी गाडी चालवत होतो. त्याने व्हिडिओ लावला आणि मग मला ९०लाख सबस्क्रायबर असलेल्या आणि २०१३ साली स्थापन झालेल्या या चॅनेलची ओळख झाली. मग उरलेला दिवस या चॅनेलच्या मागे कधी संपला ते कळलंच नाही.

जो व्हिडिओ लेकाने आग्रहाने दाखवला त्याचं नाव होतं The Egg.

अॅण्डी वियर नावाच्या लेखकाच्या कथेवर बेतलेला हा व्हिडीओ गेली दोन वर्षं बनत होता. दि १ सप्टेंबरला तो अपलोड केल्यापासून आज ४ सप्टेंबरला संध्याकाळी सातपर्यंत त्याला ६६लाख लोकांनी पाहिलंय.

काळ एकरेषीय असतो या गृहितकाला छेद देत आयुष्याचं प्रयोजन सांगणारा हा व्हिडीओ नितांतसुंदर आहे.

या निमित्ताने गेल्या वर्षी सुरू केलेली सिध्दार्थ मालिका पूर्ण करण्याची इच्छा तीव्र झाली. आणि मुलांना स्मार्टफोन घेऊन दिल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं.

 

Tuesday, March 19, 2019

My Way and Women's Day

परवा क्लासमधून घरी आलो. क्लासमधल्या काही अतिआगाऊ पालकांमुळे आणि फेसबुकवरील एका अतिउत्साही मित्रामुळे जरा डोकं तडतडलं होतं. आपण काहीतरी शांतपणे सांगत असताना समोरच्याने प्रत्येक गोष्टीत अगोचरपणा केल्यावर जशी चिडचिड होते त्या अवस्थेत होतो. बायकोला म्हणालो मला जरा शांत बसू द्या, डोकं शांत झालं की मग बोलतो. माझं काहीतरी बिनसलं असेल तर त्यावेळी शांत रहाणंच चांगलं असतं हे तिला आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे पक्कं माहिती आहे. त्यामुळे ती तिच्या कामात बुडून गेली. मोठा लेक अभ्यास करत होता आणि धाकट्याने टीव्हीवर पिक्चर लावला आणि त्याच्याबरोबर मीपण टीव्ही बघत बसलो. सिंग (Sing) नावाचा इंग्रजी ऍनिमेशनपट होता.



चित्रपटात एकही मनुष्य नाही. सगळी पात्र म्हणजे वेगवेगळे प्राणी. आपलं थिएटर लिलावात जाऊ नये म्हणून धडपड करणाऱ्या बस्टर मून नावाच्या कोआलाची आणि त्याला प्रेमळ साथ देणाऱ्या वेंधळ्या वृद्ध स्त्री सरडा सहाय्यकाची गोष्ट.

या कोआलाचं एक थिएटर असतं. आपल्या धूम ३ मधल्या जॅकी श्रॉफसारखं. आणि ते हातातून जाऊ नये म्हणून हा अनेक प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून एक हजार डॉलर्सचं पारितोषिक असलेली एक संगीत स्पर्धा आयोजित करतो. पण त्याची वृद्ध स्त्री सहाय्यक गोंधळ करते आणि तिच्या हातून दोन शून्य जास्त टाईप होतात. एक लाख डॉलर्सचं बक्षीस छापलेली पत्रक गावभर पसरतात. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्या प्रत्येक स्पर्धकाच्या वेगवेगळ्या गमती जमती, प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण तणाव, मोठमोठे अनपेक्षित अपघात आणि शेवटी बस्टरचं थिएटर दिमाखात लोकप्रिय होणं अशी कथा आहे. दोन तासात जवळजवळ साठ गाणी आहेत. त्यामुळे मी काहीशा निरुत्साहाने चित्रपट पहात होतो. डोकं इतकं वैतागलं होतं की रिमोट घेऊन टीव्ही बंद करावा इतकं साधं सुचेना. पण चित्रपट अर्ध्यावर आला आणि माईक नावाचा उर्मट पांढरा उंदीर गायला उभा राहिला. आणि इतका वेळ चित्रपट बघण्याचं सार्थक झालं. दिवसभराचा सगळा ताण निघून गेला. कारण माईक गात होता ते माझं अतिशय लाडकं गाणं आहे. 

फ्रॅंक सिनात्राने अजरामर करून ठेवलेलं हे गाणं १९६९ पासून ते आजतागायत जगभरात गाजतंय. विविध भाषांत याची भाषांतरं झाली. किमान पंधरा जगप्रसिद्ध गायकांना हे गाणं स्वतः गायचा मोह आवरला नाही. कित्येकवेळा चालायला जाताना मी आंद्रे रियूने व्हायोलिनवर सादर केलेलं हे गाणं ऐकून भारावून गेलेलो आहे. असं म्हणतात की या गाण्याने फ्रॅंक सिनात्राच्या करियरमध्ये इतका मोठा रोल बजावला की नंतर त्याला फ्रॅंक सिनात्राचं अँथेम सॉंग म्हणू लागले. नंतर सिनात्राला या गाण्याचा प्रचंड कंटाळाही आला. या गाण्याची अजून एक गंमत म्हणजे अमेरिकेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तेव्हा पहिला बॉल डान्स करण्यासाठी त्यांनी हेच गाणं निवडलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय असं विचारल्यावर सिनात्राच्या मुलीनी गाण्याच्या पहिल्या ओळी उद्घृत केल्या होत्या; And now, the end is near!

फ्रॅंक सिनात्रा करियरमध्ये कंटाळला होता. आर्थिक डबघाईला आलेला होता. आपला तरुण मित्र पॉल अँकाला तो म्हणाला की आता ही शेवटची रेकॉर्ड आणि मग मी संगीत क्षेत्राला रामराम ठोकणार. नंतर पॉल पॅरिसजवळच्या एका खेड्यामध्ये आपल्या घरी गेला होता आणि एका संध्याकाळी रेडियोवर त्याने एक फ्रेंच गाणं ऐकलं. त्या गाण्याची धून त्याला अतिशय आवडली आणि त्याने गाण्याचे हक्क विकत घेण्यासाठी प्रयत्न केले. नगण्य किमतीला लोकप्रिय फ्रेंच गायकाचं ते पडेल गाणं पॉलला विकत मिळालं. आणि त्याने सिनात्राला फोन केला, ‘मी तुझ्यासाठी गाणं शोधलंय’.

रात्री एक वाजता पॉल गाणं लिहायला बसला आणि जर सिनात्रा हे गाणं लिहील तर त्यात कुठले शब्द वापरेल असा विचार करत त्याने सकाळी पाचपर्यंत गाणं पूर्ण केलं. मूळ फ्रेंच गाणं आयुष्यात तोचतोचपणा आल्याने प्रेम सुकून गेलेल्या शुष्क नात्यातील दिखाऊपणाबद्दल होतं पण पॉलने केवळ चाल तीच ठेवून गाण्याचा गाभाच बदलून टाकला. आता ते गाणं होतं एका कृतार्थ म्हाताऱ्याचं. ज्यांच्या आयुष्याची शेवटची संध्याकाळ आहे. मृत्यूची वाट बघताना त्याला गतायुष्य आठवतंय. त्या सिंहावलोकनात ताठ कण्याचा तो वृद्ध म्हातारा म्हणतो आहे की

And now, the end is near
And so I face the final curtain
My friend, I'll say it clear
I'll state my case, of which I'm certain

I've lived a life that's full
I've traveled each and every highway
And more, much more than this
I did it my way

Regrets, I've had a few
But then again, too few to mention
I did what I had to do
And saw it through without exemption

I planned each charted course
Each careful step along the byway
And more, much more than this
I did it my way

Yes, there were times, I'm sure you knew
When I bit off more than I could chew
But through it all, when there was doubt
I ate it up and spit it out
I faced it all and I stood tall
And did it my way

I've loved, I've laughed and cried
I've had my fill, my share of losing
And now, as tears subside
I find it all, all so amusing

To think I did all that
And may I say, not in a shy way
Oh no, no, not me
I did it my way

For what is man, what has he got?
If not himself, then he has naught
To say the things he truly feels
And not the words of one who kneels
The record shows I took the blows
And did it my way

And did it my way




आता माझा अंत जवळ आला आहे. पडदा पडायची वाट बघतो आहे. माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्याची गोष्ट तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो.

मी भरभरून आयुष्य जगलो. वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आणि मनापासून जगलो.

क्वचित कधी पश्चात्ताप झाला. पण असे प्रसंग नगण्य. पण मला हवं तेच केलं आणि सगळ्या परिणामांना न घाबरता सामोरा गेलो.

माझा रस्ता मीच आखला. आणि माझी दिशा मीच ठरवली. आणि मी मनमुराद जगलो.

कधी कधी मी मोठे घास घेतले. पण शक्य तितके पचवले आणि नाही तेव्हा टाकून दिले. पण माझ्या निर्णयांशी खंबीर उभा राहिलो.

प्रेम केलं, हसलो, रडलो, जिंकलो आणि हरलो सुद्धा. आता अश्रू सुकल्यानंतर मागे वळून बघतो तेव्हा सगळं फार विलोभनीय दिसतं आहे.

आता हे सगळं मीच केलंय असं सांगताना मी लाजणार नाही. कारण मी माझ्या मनमुराद जगलो आहे.

कारण हे माझं आयुष्य आहे. आणि ते नाकारण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? मी कधी झुकलो नाही आणि कधी शब्द गिळले नाहीत. मी झेललेल्या घावांच्या खुणा साक्ष आहेत की मी मनमुराद जगलो.

कसला दणदणीत म्हातारा आहे.मनमुराद जगणारा आहे पण बेबंद नाही. बेदरकार आहे पण बेजबाबदार नाही.

हे गाणं ऐकताना मला नेहमी हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सी मधला म्हातारा आठवतो. समुद्रावर एकटा जाणारा. मर्लिन मासा गळाला लागला म्हणून खूष होणारा. माशाला पकडून किनाऱ्यावर आणण्यासाठी उन्हातान्हात भर समुद्रात जाड दोरखंड पकडून बसणारा. हाताला रग लागली तरी दोरखंड न सोडणारा. माशाला किती त्रास होत असेल म्हणून विचार करणारा. त्याच्याशी गप्पा मारणारा. म्हातारपणी मी कसा असावा त्याचा विचार करताना मला कायम हाच म्हातारा आठवतो.

अर्थात भारतीय समाजाच्या चौकटीत अनेक मध्यमवर्गीयांना इतकं छान मनमुराद जगता येणार नाही याची मला कल्पना आहे. जर पुरुषांची ही कथा तर इथल्या स्त्रियांना असं जगता येईल याची शक्यता अगदीच नगण्य.अर्थात आता हे गाणं गायिकांनीही गायला सुरवात केली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना असं जगायला हवं ही इच्छा सगळ्यांच्या मनात तयार होईलंच. कारण कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात येण्याच्या आधी कल्पनेत अवतरते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे बेजाबदार न होता मनमुराद जगण्याची संधी आपल्याकडील सर्व स्त्री पुरुषांना मिळावी हीच आजच्या महिला दिनाची सदिच्छा.

आपल्या अगोचरपणामुळे मला वात आणणाऱ्या पालकांना आणि फेसबुक मित्रालाही धन्यवाद कारण त्यांनी मला वात आणला नसता तर मी परवाच्या मंगळवारी सिंग चित्रपट पाहिला नसता, मग कदाचित मला माझं लाडकं गाणं चटकन आठवलं नसतं आणि माझ्या लाडक्या गाण्याने माझ्या मनात रंगवलेल्या म्हाताऱ्याला विसरून मी उगाच घरच्यांवर डाफरत बसलो असतो.

Saturday, October 13, 2018

सारं काही परत येतं (भाग ५)

सिद्धार्थाने जरी श्रमणजीवनाचा त्याग केला असला तरी ज्याप्रमाणे ऐहिक जगाकडे श्रमण तुच्छतेने पाहतात त्याचप्रमाणे जगाचे सत्य स्वरूप जाणून घेण्यासाठी ऐंद्रिय अनुभवांचा रस्ता निवडलेला सिद्धार्थ, नेणिवेत भावनांचे प्राबल्य असलेल्या सामान्य लोकांच्या जीवनाकडे तुच्छतेने पाहात असतो. वैराग्यातून उमललेला तुच्छताभाव मनी बाळगून तो संसारात रममाण होत जातो. प्रचंड पैसा गाठीला जमवतो. वाडेहुडे, नोकरचाकर आणि अमाप रतिसुख मिळवतो. आणि सुखासीन होत जातो.

मातीच्या गोळ्याला आकार देणारे चाक कुंभाराने फिरवल्यावर आधी अतिवेगाने आणि मग हळूहळू कमी होत जाणाऱ्या वेगाने फिरू लागावे तसे त्याच्या हृदयी वसणारे वैराग्यचक्र हळूहळू मंदगतीने फिरू लागते. वठलेल्या झाडाच्या बुंध्यात ओल शिरावी आणि तिने हळूहळू संपूर्ण झाड कुजवून टाकावे त्याप्रमाणे संसार त्याच्यातील ज्ञानपिपासू सिद्धार्थावर ताबा मिळवतो. ज्या सामान्य लोकांचा तो तिरस्कार करत होता त्यांच्यातील सर्व अवगुण आता त्याच्यात घर करतात. आता सिद्धार्थ मांसाशन आणि मद्यपान करू लागतो. जुगार खेळू लागतो. व्यापाऱ्यांची देवी म्हणजे लक्ष्मी आपल्याला तुच्छ आहे हे दाखवण्यासाठी मोठमोठ्या रकमेचा एकेक डाव लावून डाव जिंकू की हरू ही हुरहूर अनुभवण्यात धन्यता मानू लागतो. ती आतुरता आणि अनिश्चितता त्याला आवडू लागते आणि तिचा अनुभव घेण्यासाठी तो पुन्हापुन्हा मोठमोठ्या रकमेचे डाव लावू लागतो. अनेकदा तो स्वतःकडची संपत्ती हरतो आणि अनेकदा तो ती जिंकून आणतो. जुगारातील अनिश्चिततेने मिळणाऱ्या आनंदासाठी मग तो आपल्या दैनंदिन व्यापारात क्रूर होऊ लागतो. भरमसाठ व्याज लावणे, व्याज आणि मुद्दल वसूल करण्यात हयगय न करणे हा त्याचा स्वभाव बनतो आणि दानधर्म, गोरगरिबांची मदत या त्याच्या सवयी नाहीश्या होतात.

आणि एके दिवशी कमलेच्या कुशीत असताना ती सिद्धार्थला गौतम बुद्धाबद्दल विचारते. आणि या विषयाबाबत तत्पूर्वी कधी फार न बोलल्याने सिद्धार्थ तिला गौतम बुद्धाची शांत चर्या, त्याची निर्मल दृष्टी, प्रसन्न स्मित, अक्षुब्ध आणि अचंचल वागणूक या सर्वांबद्दल विस्ताराने सांगतो. ते सर्व ऐकून ‘आपणही कधी गौतम बुद्धाची अनुयायी होऊ आणि हे क्रीडोद्यान त्याला अर्पण करू’ असा निश्चय ती सिद्धार्थला बोलून दाखवते आणि कामक्रीडेतील माधुर्याचा शेवटचा थेंबही निसटू नये अश्या आवेगाने त्याच्याशी रत होते. कामक्रीडेनंतर शांत झोपलेल्या कमलेचे मुख सिद्धार्थ जवळून पाहतो. त्याला त्यावर वृद्धत्वाच्या खुणा दिसून येतात. वासना आणि मरण एकमेकांच्या किती जवळ आहेत याचा त्याला प्रत्यय येतो. आजवर आपण जो मार्ग अंगिकारला तो साकल्याचा नाही हे कमलेला कळले आहे असे तिच्या चर्येवरुन सिद्धार्थला जाणवतं. आणि सिद्धार्थ तिथून निघतो.

मनात उद्भवलेल्या अस्वथतेला विसरण्यासाठी भरपूर मद्यपान करतो.मदिराक्षींना जवळ करतो पण त्याला त्या साऱ्याची शिसारी येते. तो झोपण्याचा प्रयत्न करतो. आणि पहाटेच्या वेळी त्याला जे स्वप्न पडतं त्यामुळे त्याला आपल्यातील काहीतरी मेल्याची जाणीव होते.

तो स्वतःच्या मालकीच्या आम्रवनात जातो. एका झाडाखाली बसतो. आणि आपल्याला यापूर्वी आनंद कधी अनुभवायला मिळाला होता याची उजळणी करू लागतो. बालपणी मंत्र पाठांतरात सवंगड्यांना हरवताना, यज्ञप्रसंगी वडीलधाऱ्यांना मदत करताना त्याने आनंद चाखला होता. आणि ब्राह्मणधर्म सोडून श्रमणमार्ग अनुसरतानाही त्याला ‘पुढे जा. हाच तुझा मार्ग आहे’, याची आनंददायी जाणीव झाली होती. गौतम बुद्धाचा उपदेश ऐकून त्याला आनंदाची जाणीव झाली होती आणि तसे असूनही संघदीक्षा न घेता तिथून निघून जातानाही त्याला त्या प्रस्थानातच स्वतःचा उत्कर्ष दिसला होता. पण आता त्याच्यापुढे कुठलंही ध्येय नव्हतं. त्याचा जीवनमार्ग ओसाड झाला होता.

सामान्य लोकांप्रमाणे सुखाच्या मागे धावूनही त्यांचे जीवितहेतू न अंगिकारल्यामुळे तो सामान्य जीवनात झोकून न देता त्यातील सुखदुःखांचा केवळ साक्षी बनून राहिला होता. ते जीवन त्याचे नव्हते. त्याला सामान्य लोक आणि जीवितहेतू परके होते आणि सामान्य लोकांना तो परका होता. कमला हीच त्याची एकमेव सहचरी होती. पण तिच्याबरोबर खेळत असलेल्या खेळात कितीही आनंद मिळाला तरी त्यात कायमचे मशगूल होऊन राहण्यासारखे काही आहे काय? हा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो. आणि सिद्धार्थचा निश्चय होतो. त्याला बालपणापासूनचे त्याचे सर्व आयुष्य आणि सर्व निर्णय आठवतात. हे सुखासीन नागर जीवन त्यागण्याचा निर्णय पक्का होतो. त्याला कडकडून भूक लागते. पण तो घराकडे न परतता नगरापासून दूर जाऊ लागतो.

सिद्धार्थ नगर सोडून पुढे पुढे जातो. त्याला स्वतःच्या अध:पातामुळे स्वतःची शिसारी येते. आपलं अस्तित्व व्यर्थ आहे. ते वन्य पशूंच्या किंवा दरोडेखोरांच्या हल्यात नष्ट झालं तर चांगलं होईल असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. तो नदीजवळ पोहोचतो. तिच्या शेवाळलेल्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतो. वृद्धत्वाकडे झुकलेला आणि सुखासीनतेमुळे आंतरिक तेज हरवून बसलेला चेहरा पाहून त्याला नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची इच्छा होते. तो स्वतःच्या प्रतिबिंबावर थुंकतो. आणि तो जीव देणार इतक्यात त्याच्या मनात ओंकाराचा ध्वनी होतो. न उच्चारता उमटलेल्या त्या ओंकाराच्या लखलखाटामुळे सिद्धार्थला आपले गतायुष्य दिसते आणि त्याला गाढ झोप लागते. झोपेतून उठतो तो त्याला आपले गतायुष्य फार दूर आहे असे वाटू लागते. कदाचित जुना सिद्धार्थ मरून गेला असून त्याचं नवं रूप जन्माला आलं होतं असं त्याला वाटतं. या नव्या सिद्धार्थातील जुना अहं तोच असला तरी सिद्धार्थ आता बदलला होता. तो जागा झाला होता आणि जिज्ञासूदेखील.

झोपेतून उठल्यावर सिद्धार्थला दिसतं की त्याच्याजवळ एक भिक्षू बसला आहे. तो गोविंद आहे हे सिद्धार्थ लगेच ओळखतो पण गोविंद त्याला ओळखत नाही. नदीकिनारी वन्यजीवांचे भय असताना एक मनुष्य झोपलेला आहे तेव्हा त्याचे रक्षण करण्याच्या भावनेने गोविंद तिथे बसलेला असतो. सिद्धार्थने आपली ओळख दिल्यावर गोविंदाला आनंद होतो. पण ते दोघे आपापल्या रस्त्याने निघून जातात. एक संघनियम पाळून जीवनाचा अर्थ शोधणारा प्रवासी तर दुसरा सर्व नियम तोडून जीवनाचा अर्थ शोधणारा प्रवासी.

सिद्धार्थाला पुन्हा भुकेची जाणीव होते. उपास, प्रतीक्षा आणि चिंतन हे त्याचे गुण देऊन त्याने संपत्ती, विलास आणि इंद्रियसुख इत्यादी नतद्रष्ट गोष्टींचा सौदा केला होता. भलताच मार्ग त्याने चोखाळला होता. त्यामुळे आपण एक सामान्य माणूस आहोत याची त्याला खात्री पटते.

पण आपण बालपणाप्रमाणे पुन्हा एकदा निःसंग होऊन नव्याने सुरवात करत आहोत. आपण पुन्हा परतीच्या वाटेने बालपणीच्या अवस्थेकडे, नव्याने सुरवात करण्याकडे चाललो आहोत याची विलक्षण जाणीव त्याला होते. समोरून वाहणारी नदीदेखील आनंदाने परतीचा प्रवास करीत सागराकडे जात आहे असे त्याला जाणवते. आपण ब्राह्मणधर्म, श्रमणधर्म, ऐन्द्रियसुख, व्यापारउदीम, अविवेक आणि कुबुद्धी या चक्रातून फिरत पुन्हा ओंकार ऐकून आपल्या शैशवाकडे चाललो आहोत याची त्याला अनुभूती होते.

'ऐहिक सुख आणि संपत्ती श्रेयस्कर नाहीत' हे तो लहानपणीच शिकलेला असला तरी त्याची प्रचिती मात्र त्याला त्याक्षणी होते. आता ती गोष्ट केवळ बुद्धिगम्य न राहता भावगम्य आणि इंद्रियगम्य झाली आहे, हेही त्याला जाणवतं. आणि ज्या अहंकारापासून मुक्ती मिळवायचा तो आजन्म प्रयत्न करत होता त्याचे स्वरूप त्याला दिसून येतं. ब्राह्मणधर्मात त्याने पाठांतराचा, कर्मकांडाचा आणि श्रमणधर्मात शरीरक्लेशाचा अतिरेक केला. मूळच्या हुशारीमुळे तो सर्वात अग्रेसर राहिला त्यामुळे त्याच्या आढ्यतेत आणि बुद्धीमत्तेत त्याच्या अहंकाराने घर केलं होतं. त्या हुशारीच्या जोरावरच त्याने ‘ कुणीही गुरु तुला मुक्ती देऊ शकणार नाही’ हा निर्णय घेतला होता. परिणामी त्याला जुगारी, मद्यपी, सुखलोलुप सावकार होणं भाग होतं. जीवनाचा वेडेपणा न भोगता त्याला जीवनाचं स्वरूप कळणं अशक्य होतं.

आपल्या जीवनाचा लंबक इतका एका बाजूला झुकण्याचं कारण आपण बुद्धी आणि तर्काच्या जोरावर त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो होतो हे कळल्यावर सिद्धार्थाला स्वतःबद्दल स्वतःच्या परतीच्या प्रवासाबद्दल ममत्व वाटू लागते. आणि ज्या नदीच्या काठी त्याला हा परतीचा प्रवास असा का आहे ते कळतं त्या नदीला सोडून जायचं नाही असा निर्णय तो घेतो.

आता गोष्ट संपणार असं मला वाटू लागलं होतं. आणि आनंद बक्षींनी परदेस चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातील 'जीने का है शौक तो मरने को हो जा तैयार' हे वाक्य मला आठवत होतं. पण मी किती तोकडा विचार करतो ते मला लगेच जाणवलं. कारण, सिद्धार्थ नाहीसा झाला हे कळताच कामस्वामी त्याचा शोध घेऊ लागतो. पण सिद्धार्थ सापडत नाही. सिद्धार्थचे जाणे कमला मात्र लगेच स्वीकारते. तो मुळात अनिकेत श्रमण आहे हे तिने जाणलेले असते. आणि काही दिवसांनी तिला कळते की त्या दोघांच्या शेवटच्या भेटीत तिच्या पोटी सिद्धार्थचा गर्भ राहिला आहे. आता आनंद बक्षींच्या गाण्यातील 'नै होणा था, लेकिन हो गया यार... हो गया है मुझे प्यार' ही वाक्य सिध्दार्थला लागू होतात की काय? तो पुन्हा कमलेकडे जातो की काय? या प्रश्नांनी माझी उत्सुकता वाढवली.

सारं काही परत येतं (भाग ४)

गोविंदला सोडून आणि गौतम बुद्धाचा निरोप घेऊन सिद्धार्थ जैतवनातून निघतो. ज्ञानियांचा गुरु भेटूनही आपण त्याला सोडून का चाललो आहोत? या प्रश्नावर विचार करताना त्याला जाणवतं की ब्राह्मण आणि श्रमण जीवनाचा त्याग करणे, बालमित्र भिक्षूसंघात प्रवेश करत असताना गुरूपदेश नाकारून तिथून निघून जाणे या सर्वामागे एकंच कारण होते. अहम्, त्याचे स्वरूप, त्याची लक्षणे जाणण्याची त्याची इच्छा होती. आणि यज्ञयाग, व्रत वैकल्ये, किंवा इंद्रियदमन यातून त्याला अहम् शी लपंडाव खेळता आला असला तरी ‘मी सिद्धार्थ आहे’ या जाणिवेपासून त्याची कायमस्वरूपी सुटका झालेली नव्हती. म्हणजे अहम् ला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धार्थला अजून सिद्धार्थची ओळख पटलेली नव्हती. त्याला जीव शिवाचे ऐक्य असते हा विचार माहीत होता पण त्यातील 'जीव असतो कसा?' याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे तो ते ऐक्य अनुभवू शकत नव्हता.

आधी विचारांच्या व परंपरांच्या सहाय्याने त्याने जिवाशिवाचे अद्वैत अनुभवायचा प्रयत्न केला होता. ते न साधल्यामुळे त्याने जीवाच्या सर्व ऐंद्रिय इच्छांचे दमन करून जीव नष्टप्राय करून पाहिला होता. परंतु या सर्व झटापटी स्वस्वरूप न ओळखता केल्यामुळेच तो अनिकेत अवस्थेत होता.

इथपर्यंत पोहोचल्यावर मग या अस्थिरतेतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसतो. स्वतःला अनुभवणे. जगाला अनुभवणे.

सत्य, विचारांच्या मागे किंवा भावनांच्या मागे कुठेतरी आत दडलेले नसून ते सर्वत्र आहे. 'जग माया आहे आणि इंद्रिये योगायोग आहेत असे मानणे' म्हणजे स्वतःची फसगत करून घेणे आहे. जर स्वतःचे सत्य स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर जगणे नाकारून चालणार नाही. सर्व विचार, इच्छा, भावना आणि भौतिक जग म्हणजे स्वस्वरूपाच्या पुस्तकातील विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हांचा तिरस्कार करत पुस्तक वाचणे आणि जीवनाला माया समजून जीवनविन्मुख होणे दोन्ही सारखेच निरुपयोगी आहे.

विचारांच्या या नव्या दिशेमुळे सिद्धार्थ आनंदित होतो आणि त्याचवेळी आपण असंग आहोत. आपल्याला आता कोणीही नातेवाईक, मित्र, श्रद्धा, वेष नाहीत हे जाणवून त्याला अथांग विश्वातील स्वतःच्या एकाकीपणाची जाणीव होते.

जग अनुभवण्यासाठी आता तो पुढे सरसावतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा रंग, गंध, तापमान तो आसुसून अनुभवू लागतो. शिकारी प्राण्यांच्या आणि त्यांच्या भक्ष्यांच्या परस्परविरोधी जीवनेच्छेचा आवेग त्याला जाणवतो. आणि मग थकलेला सिद्धार्थ नदीकिनारी एका नावाड्याच्या खोपटात झोपी जातो. त्याला स्वप्न पडते. स्वप्नात त्याचा बालमित्र गोविंद दिसतो. सिद्धार्थ त्याला एकटा सोडून गेल्यामुळे तो दु:खी आहे असे सिद्धार्थला दिसते. सिद्धार्थ त्याला स्वप्नातच मिठीत घेतो, प्रेमाने त्याचे चुंबन घेतो. आणि त्याला गोविंदाच्या जागी एक स्त्री आहे असे जाणवते. स्वप्नात सिद्धार्थला पहिला स्रीस्पर्श घडतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नगाराकडे जाण्यास निघालेला सिद्धार्थ नावाड्याच्या मदतीने नदी पार करतो. त्यावेळी त्याला नदी फार सुंदर भासते. आणि नावडीही त्याला दुजोरा देतो. 'नदी आपल्याशी बोलते. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते', असे नावाडी सिद्धार्थला सांगतो.

सिद्धार्थ नगरात जातो. आणि त्याचे लौकिक जीवन सुरु होते. (आतापर्यंत लहान लहान प्रसंगात मोठमोठ्या घटना सांगून गोष्टीला वेग देणारा लेखक आता मात्र गोष्टीचा वेग कमी करतो.) सिद्धार्थचे लौकिक जीवन हेसेंनी मोठ्या बारकाईने रंगवले आहे. नावाड्याला द्यायला पैसे नसलेल्या सिद्धार्थची नगरात पहिली भेट होते नगरवधू असलेल्या कमलेबरोबर. तिच्याकडून प्रेमदीक्षा मिळवतो. तिच्याच ओळखीने नगरातील धनाढ्य व्यापारी असलेल्या कामस्वामींचा भागीदार बनतो. त्याच्या हातात पैसा खेळू लागतो. तरीही त्याच्यासाठी पैसा हे साध्य नसून साधन असते. गोरगरीबांना पैसे देण्यात तो हात कधीही आखडता घेत नाही. त्याच्या बेहिशोबी वागण्यामुळे कामस्वामी गोंधळतो पण सिद्धार्थ लोकांच्या प्रेमादरास पात्र होतो. जीवनाचा आनंद घेत असलेल्या सिद्धार्थला लोकांच्या व्यवहाराची मोठी मौज वाटत असते. त्याच्यासाठी व्यापार, व्यवहार म्हणजे जणू खेळ असतो. इतरांना बेहिशोबी आणि बेभान वाटावे अशा आवेगाने तो हा खेळ खेळत असतो.

सिद्धार्थच्या जीवनातील हा भाग वाचताना कुणीही गुंगून जाईल इतक्या तपशीलाने तो लेखकाने रंगवलेला आहे. पण यातील काही वाक्ये माझ्या मनात घर करून राहिली आहेत.

‘तुला काय येतं?’ या कमलेच्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणतो ‘मी वाट पाहू शकतो. मला चिंतन करता येतं आणि मला उपास करता येतो.’

आणि रतिसुखाचा आवेग ओसरल्यावर जेव्हा कमला सिद्धार्थला उद्देशून म्हणते ‘तुमचं कुणावरंच खरं प्रेम नाही’. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, ‘तू ही प्रेम करू शकत नाहीस. करू शकत असतीस तर तुला कलावंतीण होता आलं नसतं. सामान्य माणसं प्रेम करू शकतात हेच त्यांच्या जीवनाचं रहस्य आहे.’

ही वाक्ये वाचनाच्या ओघात जेव्हा येतात तेव्हा वाचकाला दणदणीत धक्के देऊन जागं करतात. मला त्या धक्क्यांमध्ये अजून गोष्ट दिसली की अहम् च्या शोधात जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ अजूनही अहम् चं स्वरूप ओळखू शकलेला नाही; हेच लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे.

सिद्धार्थचं व्यवहाराकडे खेळ म्हणून पाहणं. सामान्य लोकांच्या जीवनेच्छेचं त्याला कौतुक वाटणं, कमलेबरोबर प्रेमरंग खेळताना त्याकडेही खेळ म्हणून पाहणं आणि सामान्यांना प्रेम करता येतं हेच त्यांचं जीवनरहस्य आहे हे कबूल करणं; यातून लेखक आपल्याला एकंच मुद्दा सांगत असतो की अहम् चं स्वरुप जाणून घेण्यासाठी जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ कर्माला खेळ समजत असल्याने, 'मी सिध्दार्थ आहे' या भावनेपासून त्याची सुटका न झाल्याने त्याचा प्रवास अजून संपलेला नाही.

Sunday, September 9, 2018

सारं काही परत येतं (भाग ३)

श्रावस्ती नगरीजवळील जैतवनात गौतम बुद्धाचा निवास असतो. त्याचा संदेश ऐकण्यासाठी आलेल्या अनेक यात्रिकांची श्रावस्तीत गर्दी झालेली असते. गुरूमुखातून कुठलाही संदेश ऐकण्याची इच्छा न उरलेला, गुरूपदेशातून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते यावर विश्वास न उरलेला सिद्धार्थ आणि गौतम बुद्धाला पाहण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी अधीर झालेला गोविंद असे दोघे श्रावस्तीत पोहोचतात. पहिल्याच झोपडीत भिक्षा मागण्यासाठी थांबतात. तिथल्या वृद्ध स्त्रीच्या तोंडून मौन पाळणाऱ्या, एकभुक्त, पीतवस्त्रधारी, सस्मित चर्येच्या ज्ञानी गौतम बुद्धाचं वर्णन ऐकून आपला उद्धार जवळ आला आहे याची गोविंदला खात्री पटते. त्या झोपडीतून सिद्धार्थच गोविंदला जवळजवळ खेचूनच बाहेर काढतो. वनवासाची सवय झालेले पूर्वाश्रमीचे ते दोन श्रमण रात्री श्रावस्तीत आसरा शोधतात. त्यातील एक बुद्धाचा संदेश ऐकण्यासाठी आतुर असतो तर दुसरा बुद्धाला बघण्यासाठी उत्सुक असतो.

सकाळ होते. जैतवनात पीतवस्त्रधारी अनेक भिक्षू फिरत असतात. आणि त्या अनेक भिक्षूंतून गौतम बुद्ध कोण ते सिद्धार्थला प्रथम जाणवतं. उत्फुल्ल किंवा उदासीन नसलेली त्याची शांत चर्या, त्यावर विलसणारं मृदू स्मित, त्याची धीरोदात्त चाल बघून सिद्धार्थला बुद्धाची ओळख पटते. गोविंदला तो बुद्ध दाखवतो. आणि मग गोविंदलाही बुद्धाची ओळख पटते. ते दोघे दिवसभर बुद्धाच्या मागोमाग फिरतात. काहीही न शोधणारी त्याची शांत नजर, त्याची गती, अवनत दृष्टी, खाली लोंबणारा पण हेलकावे न घेणारा त्याचा एक हात; कसलीही धडपड, इच्छा, खोटेपणा किंवा कशाचाही शोध घेण्याची इच्छा नसलेली त्याची देहाकृती बघून या महात्म्याला सत्य उमगले आहे याची सिद्धार्थला खात्री पटते. इतर कुठल्याही पुरुषाबद्दल कधीही अनुभवायला न मिळालेली गौरवबुद्धी गौतम बुद्धाच्याबद्दल सिद्धार्थच्या मनात उमटते. गौतम बुद्धाचा संदेश त्यांनी कर्णोपकर्णी ऐकलेला असतो पण तरीही तो गौतम बुद्धाच्या मुखातून ऐकण्यासाठी गोविंद अजून आतूर होतो.

संध्याकाळ होते. गौतम बुद्धाचे प्रवचन सुरु होते. धीरगंभीर पण शांत आवाजात गौतम बोलू लागतो. नक्षत्रांचा मंद प्रकाश यावा तसा त्याचा स्वच्छ आणि संथ आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो. दुःख, त्याचा उगम, त्यापासून मुक्तीचा मार्ग याबद्दल बुद्ध बोलतो. आणि प्रवचन संपल्यावर बुद्धाच्या संघात प्रवेश घेण्यासाठी यात्रिकांची गर्दी होते. लाजरा बुजरा गोविंदही पुढे सरसावतो आणि भिक्षुसंघात प्रवेश द्या म्हणून गौतम बुद्धाला विनंती करतो. गोविंद भिक्षु होतो. पण सिद्धार्थ मात्र संघात प्रवेश करत नाही. गौतम बुद्धाच्या संदेशात खोट काढणे शक्य नाही अशी ग्वाही सिद्धार्थ, गोविंदला देतो. तो दुसऱ्या दिवशी जैतवन सोडून निघणार असतो. त्यामुळे गौतम बुद्धाचा संदेश ऐकून संघप्रवेश केलेला गोविंद दु:खी असतो. याउलट संघप्रवेश न केलेला सिद्धार्थ मात्र शांत असतो.

यज्ञ, व्रत वैकल्ये, उपास तापास यामुळे पापक्षालन होते हे नाकारून; कलंकहीन होण्यासाठी ब्राह्मणधर्म सोडून सिद्धार्थ श्रमण होतो. मग इंद्रियनियमन करून वासना, विकार आणि विचारांवर मिळालेला विजय तात्पुरता आहे पण त्यातून अहंभावापासून मुक्ती मिळत नाही. श्रमणमार्गातून झालेलं आत्मज्ञान अतूट शांती देत नाही, ते मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या गुंगीसारखे आहे; म्हणून तो मार्गही सोडणारा सिद्धार्थ, बुद्धाचे प्रवचन ऐकतो. त्या विचारात खोट नाही हे मित्राला सांगतो पण दीक्षा न घेता जेव्हा तो निघून जात असतो तेव्हा लेखकाने त्याची प्रत्यक्ष बुद्धाशी गाठभेट घालून दिली आहे. मी तत्वज्ञानाचा अभ्यासक नाही पण गौतम बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचताना भारतीय तत्वज्ञान शिकायचे बाकी आहे. तत्वज्ञान रुक्ष विषय वाटत असला तरी तो तसा नाही याची हेसेंनी आणि सरदेशमुखांनी मला जाणीव करून दिली. (अर्थात अंगभूत आळशीपणामुळे अजूनही मी त्याचा अभ्यास सुरु करू शकलेलो नाही, हा भाग अलाहिदा.)

सिद्धार्थ गौतमाला म्हणतो, ‘जग म्हणजे एक शाश्वत शृंखला आहे हे बुद्धाचे मत जर मान्य केले तर मग बुद्धाने सांगितलेले निर्वाणाचे तत्व त्या शृंखलेला तोडते. म्हणजे जग एक शाश्वत शृंखला आहे हे मान्य केले तर निर्वाण अमान्य करावे लागते आणि निर्वाण होणे शक्य आहे हे मानले तर शाश्वत शृंखलेचे तत्व भंगते’. सिद्धार्थाचा हा युक्तिवाद ऐकून गौतम बुद्धाची शांती ढळत नाही. त्याला गौतमाने जे उत्तर दिले आहे ते शब्दात मांडण्याची सिद्धी माझ्याकडे नाही. त्यासाठी हेसेंचेच शब्द वाचावेत.

गौतम बुद्धाचे उत्तर पटल्यावर सिद्धार्थ पुढे विचारतो की जी शांती गौतम बुद्धाने स्वानुभवातून मिळवली आहे, त्याच शांतीचा अनुभव केवळ त्याचा उपदेश ऐकून इतरांना होऊ शकेल काय? म्हणजेच अनुभवाअंती मिळणारे ज्ञान, स्वतः जगाचा अनुभव न घेता, केवळ गुरूपदेश ऐकून कुणालाही शाश्वत शांतीचा अनुभव देऊ शकणार नाही अशी आपली खात्री पटली आहे.

सिद्धार्थाच्या या मतप्रदर्शनावर आणि आपले ज्ञान स्वतः मिळवण्याच्या त्याच्या निर्णयाचे गौतम बुद्ध स्वागत करतो. पण जाताजाता तो सिद्धार्थाला अतिचातुर्यापासून सांभाळून राहण्यास सांगतो आणि त्या दोघांचा संवाद संपतो.

सिद्धार्थही तिथून निघतो आणि त्याला जाणवतं की गौतमाने त्याचा मित्र जरी त्याच्यापासून हिरावून घेतलेला असला तरी त्याने सिद्धार्थाला सिद्धार्थाचे दान दिले आहे.

अंतिम ज्ञान आणि शाश्वत शांती शोधणारा सिद्धार्थ, पूर्वज परंपरा किंवा इंद्रियदमन किंवा गुरूपदेश या तीनही मार्गांना सोडून आता पुढे निघतो. आता त्याचा मार्ग असतो तो स्वानुभवाचा. आणि त्या मार्गावर तो आता एकटा असतो. त्याच्याबरोबर त्याचा परममित्रही नसतो.

माझं एक फार आवडतं वाक्य आहे, ‘जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु अवतरतो’. बुद्धसंदेश ऐकण्यापूर्वीची गोविंदची आतुरता आणि बुद्धसंदेश ऐकण्यासाठी सिद्धार्थचा निरुत्साह वाचून मला वाटू लागलं होतं की बुद्धभेटीनंतर गोविंद आणि सिद्धार्थची साथ सुटणार. आणि तसेच झाल्यावर माझा इगो थोडा सुखावला होता. पण त्यानंतर बुद्ध आणि सिद्धार्थाचे संवाद वाचून, या पुस्तकाची किल्ली आपल्या हातात आली आहे हा माझा फाजील विश्वास आपोआप नाहीसा झाला आणि पुढे काय होणार? याबद्दलची माझी उत्सुकता वाढली.

Sunday, September 2, 2018

सारं काही परत येतं (भाग २)

कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या सिद्धार्थचे वडील एक वेदशास्त्रपारंगत ब्राह्मण. आपल्या मातापित्यांच्या लाडक्या सिद्धार्थाची यज्ञविधीतील निपुणता आणि अर्थ समजून वेदपठण करण्याच्या त्याच्या सवयीमुळे सिद्धार्थ सगळ्यांच्या कौतुकास पात्र झालेला असतो. आपला मुलगा ब्रह्मर्षी होणार याची वडिलांना खात्री असते. गोविंद हा सिद्धार्थचा जीवश्च कंठश्च मित्र. इतका जवळचा की जणू सिद्धार्थची सावली. अर्थ समजून न घेता केवळ उच्चारवात वेदमंत्रांचे पठण करून अहंकाराने भरलेल्या ब्राह्मणांच्या कळपात कुठल्याही परिस्थितीत सिद्धार्थ शिरणार नाही याची गोविंदला खात्री आणि त्यांच्यात सहभागी व्हायला गोविंदही नाराज असतो. सगळ्यांच्या कौतुकास पात्र असलेला आणि तरुणींच्या हृदयात कामव्यथा जागवणाऱ्या सिद्धार्थचं मन मात्र अशांत असतं.

अर्घ्यदानाने पापक्षालन कसं काय होणार? जर विविध रूपात प्रकटलेला तो परमात्मा एकंच असेल तर मग त्याच्या विविध रूपांची आराधना करून त्या परमतत्वाचे ज्ञान कसे होणार? मनात उमटणाऱ्या सर्व विकार, विचार आणि वासनांचे शमन केवळ आराधनेने कसे होणार? आणि यज्ञ, याग, उपास, व्रत, वैकल्ये यामुळे पापक्षालन होत असले हे मान्य केले तरी पाप पुन्हा पुन्हा उत्पन्न का होते? ज्यांनी आपला आत्मा म्हणजेच जग हे सत्य जाणून घेतले, ज्यांनी निद्रावस्थेत परमसत्याचा अनुभव घेतला आणि जागृतावस्थेत ज्यांच्या हातून पुन्हा कुठलेही पाप घडले नाही, असे ज्ञानी ऋषी कुठे भेटतील? त्यांच्या हृदयी वसत असलेल्या असीम शांततेचा उद्भव आपल्या ठायी करून घेण्यासाठी काय करावे लागेल? कलंकहीनाला पापक्षालन ते कसले; म्हणून कलंकहीन व्हायचा मार्ग कोणता? या प्रश्नांनी सिद्धार्थला अशांत केलेले असते. आणि एक दिवस त्याच्या नगरातून श्रमणांचा तांडा जातो. विरक्त जीवन जगणारे, तहान-भूक आणि अन्य शारीरजाणिवांचे चोचले न पुरवता सर्व देहोपभोगांना कस्पटासमान लेखून, वासनांना पायदळी तुडवून जगणारे श्रमण पाहून सिद्धार्थाला जणू त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं. ‘आत्मसंयमन’.

आणि तो गोविंदला आपला निग्रह सांगतो. श्रमण होण्याचा. वडिलांची परवानगी घेण्यासाठी तो त्यांच्याकडे जातो. अपेक्षेनुसार वडील परवानगी नाकारतात. त्याच्यावर चिडतात. त्याला निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण सिद्धार्थाचा निर्णय झालेला असतो. तो पुन्हा पुन्हा नम्रपणाने परवानगी मागत राहतो. ‘माझी परवानगी न मिळाल्यास तू काय करशील? विनापरवानगी जाशील का?’, वडिलांच्या या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देऊन सिद्धार्थ त्यांना निरुत्तर करतो. रात्रभर आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहत निश्चल उभा राहिलेल्या आपल्या मुलाला पाहून वडिलांना कळून चुकते की आपला मुलगा मनाने कधीच श्रमण झालेला आहे. आता तो आपल्याबरोबर थांबला तरीही ते केवळ शरीर असेल. त्यात पूर्वीचा सिद्धार्थ नसेल. म्हणून ते जड अंतःकरणाने श्रमणांबरोबर जाण्यास परवानगी देतात.

इथे मला जी ए कुलकर्णींचा ऑर्फियस आठवला. युरीडीसीला मृत्युदेवतेच्या राज्यातून परत पृथ्वीलोकात घेऊन चाललेल्या ऑर्फियसला जेव्हा जाणवतं की मृत्यूपूर्वीची युरीडीसी आणि आताची युरीडीसी वेगळी आहे, तेव्हा तो मागे वळून पाहतो, मृत्युदेवतेच्या अटीचा भंग करतो आणि त्याच्या लाडक्या युरीडीसीला परत पाठवतो, कारण त्याला जाणवलेलं असतं की आता त्याच्याबरोबर येतंय ते युरीडीसीचं शरीर. त्यातील मन पूर्णपणे बदललेलं आहे.

आपल्या कक्षाबाहेर परवानगीची वाट पाहात निश्चल उभ्या राहणाऱ्या सिद्धार्थला पाहून त्याच्या वडिलांनाही ऑर्फियससारखाच साक्षात्कार झालेला असावा. ते परवानगी देतात आणि म्हणतात, ‘वनात जा आणि श्रमण हो. तिथे सुखसर्वस्व सापडलं तर परत ये आणि माझा गुरु हो. तिथंही मृगजळच दिसलं तर परत ये आपण दोघे मिळून देवांना यज्ञाहुती देऊ’

सिद्धार्थ निघतो आणि त्याच्याबरोबर त्याची सावलीदेखील असते. गोविंद. त्यानेही घर सोडलेलं असतं. तोही सिद्धार्थाबरोबर श्रमण होण्यास निघतो. सिद्धार्थ सगळं काही सोडून निघतो पण त्याचा मित्र मात्र त्याच्याबरोबर असतो. जणू त्याचा भूतकाळ अजूनही त्याच्यासोबत असतो.

सिद्धार्थ श्रमण होतो. शारिरवासनांकडे तुच्छतेने बघू लागतो. शरीरोपभोगांच्या मागे लागलेल्या सामान्य जनतेकडे तुच्छतेने पाहू लागतो. वासनांमुळे पाप आणि मग पापक्षालनासाठी व्रत वैकल्ये या चक्रातून सुटण्याची त्याची धडपड चालू होते. आत्मसंयमनाच्या श्रमणांच्या सर्व विद्या तो शिकून घेतो. गोविंदही या मार्गावर सिद्धार्थच्या खांद्याला खांदा लावून चालत असतो. गोविंद आनंदी असतो पण सिद्धार्थमात्र अशांत.

सिद्धार्थाच्या मते अहंभाव विसरण्याचे श्रमणांचे सर्व मार्ग अहंभावापासून क्षणिक मुक्ती देतात. ज्याप्रमाणे एखादा मद्यपी मद्याच्या अमलाखाली स्वतःला विसरतो आणि मद्याचा अंमल ओसरला की पुन्हा नेहमीसारखा होतो त्याप्रमाणेच सिद्धार्थ समाधीअवस्थेत असताना अहंभाव विसरतो पण समाधीअवस्था ओसरली की पुन्हा त्याच अहंभावाने ओतप्रोत भरून जातो. त्याला जाणवते की त्याचे गुरूंनीदेखील अहंभावापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवलेली नाही. आणि त्याला आंतरिक शांतीसाठी श्रमणांचा आत्मसंयमनाचा मार्ग तोकडा वाटू लागतो.

त्यातच शाक्यवंशातील एक महानुभाव; ज्याने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवली आहे, ब्राह्मणपुत्र आणि राजपुत्र दोघेही ज्याच्या चरणी लीन होतात, अशा महाज्ञानी गौतम बुद्धाविषयी विविध वार्ता आता वनापर्यंत पोहोचू लागतात. हा बुद्ध म्हणवला जाणारा गौतम कधी काळी श्रमण होता आणि त्याने श्रमणमार्ग सोडल्यानंतर त्याला महाज्ञान प्राप्त झाले असे कळल्यामुळे सिद्धार्थच्या गुरूंच्या मनात गौतम बुद्धाबद्दल राग असतो. त्यांच्यासमोर गौतम बुद्धाबद्दल कुठलाही विषय काढलेला त्यांना पसंत नसतो.

भिक्षेसाठी नगरात गेलेल्या गोविंदला गौतम बुद्धाचा उपदेश एका घरात ऐकायला मिळतो. त्यामुळे प्रभावित होऊन परत आल्यावर तो गौतम बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी वन सोडून मगध देशाला जाण्याची आपली इच्छा सिध्दार्थाला सांगतो. सिद्धार्थासाठी जणू ही योग्य संधी असते. ब्राह्मणधर्म सोडून आपल्याबरोबर श्रमणधर्म स्वीकारलेल्या गोविंदाने श्रमणधर्मात आनंदी असताना गौतम बुद्धाचा मार्ग ऐकायला उत्सुकता दाखवावी या संधीचा तो फायदा घेतो आणि श्रमण मार्ग सोडण्याचे ठरवतो.

बुद्धाचा संदेश ऐकण्याची गोविंदला उत्सुकता असते. याउलट प्रत्यक्ष बुध्दमुखातून संदेश न ऐकताच केवळ त्याबद्दल ऐकल्याने बुद्धाने आपल्याला श्रमणधर्माच्या कक्षेतून बाहेर खेचले. म्हणजे बुद्धसंदेश न ऐकताही त्याचे फळ आपल्या पदरात पडले आहे हे जाणवलेला सिद्धार्थ उदास हसतो आणि श्रमणमार्ग सोडण्याचा आपला निर्णय गोविंदाला सांगतो.

श्रमणमार्ग सोडण्यासाठी तो दोघांच्या वतीने वृद्ध श्रमणगुरूंकडून परवानगी मागतो. गुरु आश्चर्यचकित होतात. रागावतात. त्यामुळे त्यांनी अजून आत्मशांती मिळवलेली नाही याबद्दलचे सिद्धार्थाचे मत अजूनच पक्के होते. त्यांच्याकडूनच शिकलेल्या विद्येचा वापर करून सिद्धार्थ गुरूंच्या जिभेवर, मनावर आणि वाणीवर ताबा मिळवतो आणि श्रमणमार्ग सोडण्याची परवानगी त्यांच्या मुखातून वदवून घेतो.

वडिलांकडून परवानगी मिळवताना आज्ञापालन हा वडिलांकडून शिकलेला गुण वापरून सिद्धार्थ ब्राह्मणधर्म सोडण्याची परवानगी मिळवतो. तर श्रमण गुरूंकडून परवानगी मिळवताना सिद्धार्थ त्यांच्याचकडून शिकलेल्या परकायाप्रवेशसदृश विद्येचा वापर करतो. सिद्धार्थ निघतो. आणि जोडीला त्याची सावलीदेखील निघते. अहंभावाच्या नाशाबाबत श्रमणमार्गाचे अपयश हे सिद्धार्थाचे प्रतिपादन पटल्यामुळे गोविंदही सिद्धार्थाबरोबर निघतो.

पाण्यावरून चालण्याची विद्या आत्मसात करण्याचे नाकारून सिद्धार्थ श्रावस्ती नागरीकडे निघतो. आणि त्याच्यासोबत असतो त्याचा बालमित्र गोविंद. बदललेल्या रूपात का असेना पण अजूनही सिद्धार्थाचा भूतकाळ त्याच्याबरोबर असतो.

Friday, August 31, 2018

सारं काही परत येतं (भाग १)

शिक्षणाच्या निमित्ताने वाघिणीचं दूध पिणं झालं पण मातृभाषा आणि संस्काराची भाषा मराठी असल्याने विचारांची भाषा मराठीच राहिली. त्यामुळे अनुवादात मूळ लेखनाचा आत्मा जसाच्या तसा उतरेल याची खात्री नसली तरी इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादाकडे माझं मन ओढ घेतं. कित्येकदा तर अनुवाद वाचून झाल्यावर मी मूळ पुस्तक घेतलेलं आहे. माझ्या नशीबाने मराठीत उत्तमोत्तम अनुवादक असल्याने माझ्यासारख्या धेडगुजरी (किंवा मग धेडइंग्रजी म्हणतो) माणसाची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात माझी एक तरी चक्कर अनुवाद सेक्शनकडे जातेच.

सात आठ वर्षांपूर्वी असाच डोंबिवलीच्या मॅजेस्टिकमध्ये रमलो असताना, खरेदी आटोपली आणि निघताना अनुवादाच्या सेक्शनमध्ये असलेल्या एका पुस्तकाच्या एकुलत्या एका प्रतीकडे लक्ष गेलं. काळ्या रंगाच्या मुखपृष्ठावर सेपिया टोनमध्ये लेखकाचा फोटो, त्यावर पिवळसर रंगात लेखकाचं नाव, खाली गडद आकाशी रंगात पुस्तकाचं नाव आणि पुन्हा पिवळसर रंगात अनुवादकाचं नाव अशी मांडणी असलेलं पुस्तक होतं. शब्दांच्या प्रभावाने गुंग होणारा मी, चित्रकलेत यथातथा असलो तरी मुखपृष्ठावरील चित्रभाषा मला पुस्तकाकडे खेचते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील कृश युरोपियन माणसाचा सेपिया रंगातील फोटो फारसा आकर्षक वाटला नसला तरी कुठल्यातरी अगम्य कारणामुळे मी ते पुस्तक माझ्या हातातील गठ्ठ्यावर ठेवलं आणि बिल बनवून घरी परतलो. आमच्या घरी माझ्या खरेदीची दोन प्रमुख गिऱ्हाइकं म्हणजे मी आणि माझे बाबा. मी इतर पुस्तकं सुरु केली आणि बाबांनी हे अनुवादित पुस्तक.

त्यांचं वाचून झाल्यावर मोजकं बोलण्याच्या आपल्या सवयीनुसार त्यांनी, ‘फार सुंदर पुस्तक आहे, नक्की वाच’ म्हणून मला सांगितलं. मी कामाच्या धबडग्यात अडकलेलो होतो आणि मुखपृष्ठाची चित्रभाषा माझ्यासारख्या प्रेक्षक वाचकासाठी अनाकर्षक होती म्हणून ते पुस्तक माझ्या हातात येत नव्हतं. तोपर्यंत बाबांनी तीनदा वाचून काढलं. प्रत्येक वेळी ते एकंच सांगत होते, ‘ फार सुंदर पुस्तक आहे, आनंद. नक्की वाच’.

नंतर बाबा गेले पण पुस्तकाची आणि माझी वेळ जुळत नव्हती. आणि एक दिवस (पुस्तक विकत घेतल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी) माझ्या आयुष्यात या पुस्तकाची वेळ आली.

पुस्तकाचं नाव ‘सिद्धार्थ. पूर्वेची यात्रा’. लेखकाचं नाव हरमन हेसे आणि अनुवादकाचं नाव त्र्यं वि सरदेशमुख.

प्रस्तावना, लेखकाचं मनोगत वगैरे वाचून मग पुस्तक वाचायचं हा माझा नेहमीचा शिरस्ता; पण या पुस्तकाच्या वेळी का कोण जाणे तो मोडला गेला. त्यामुळे पुस्तकाबद्दल मनात कुठलीही पूर्वपीठिका नव्हती. दिवसभराच्या लेक्चरनंतर रात्री पुस्तक हातात घेऊन सुरवातीची अठ्ठावीस तीस पानं वाचून झाली. बहुतेक रात्रीच्या गुंगीमुळे असावं पण गौतम बुद्धाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सारखे नसूनही मला मात्र ही कथा गौतम बुद्धाची वाटत होती. नायक क्षत्रिय नसून ब्राह्मण असणे, अविवाहित असणे, त्याला जीवनातील चार दुःखे न दिसता त्याने घर सोडण्याचा निर्णय घेणे हे सारे वाचून ही गोष्ट गौतम बुद्धाची नाही हे अगदी लहान मुलालाही कळणे सहज शक्य होते पण माझ्या आकलनक्षमतेवर गुंगीचा पडदा पडला होता. उपवास करून शरीर कष्टवणारा सिद्धार्थ मला गौतम बुद्धच वाटत होता. त्याच गुंगीत पुढे वाचत असताना मग सिद्धार्थ, गौतम बुद्धाला भेटतो असा प्रसंग आला. आणि माझी गुंगी खाडकन उडाली. पुन्हा पहिलं पान उघडलं आणि प्रस्तावनेपासून वाचायला सुरवात केली.

बाबा जे सांगत होते ते अख्ख्या जगानेही सांगितलेलं होतं. मुखपृष्ठावरील सेपिया रंगातील कृश युरोपियन माणूस म्हणजे लेखक हरमन हेसे यांनी अनुवादकाला पाठवलेले स्वतःचे छायाचित्र होते. हरमन हेसे यांना १९४६ साली साहित्याचे नोबेल मिळालेले होते. १९२२ साली प्रसिद्ध झालेली, ‘सिद्धार्थ’ ही त्यांची अतिशय गाजलेली कादंबरी आहे. माझ्या हातातील एका पुस्तकात त्यांच्या सिद्धार्थ या कादंबरीचा आणि पूर्वेची यात्रा या दीर्घकथेचा किंवा दीर्घकाव्याचा अनुवाद होता. म्हणजे मी ज्याला एक पुस्तक समजत होतो ती खरंतर दोन पुस्तके होती.

हरमन हेसे जर्मन, फ्रेंच आणि स्विस रक्ताचे होते. त्यांचे वडिलांचे वडील डॉक्टर तर आईचे वडील मिशनरी आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक होते. हेसेंचे वडील आणि आईदेखील मिशनरी होते. आणि त्यांनी आपल्या कवीमनाच्या लहान मुलासोबत काही काळ भारतात घालवलेला होता.

हिटलरच्या जर्मनीने हरमन हेसेंचा तीव्र तिरस्कार केला पण त्यांनी आपल्या लेखनाने मानव आणि समाज यांच्या परिवर्तनाबद्दल अतिशय मूलगामी विचार मांडले. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील अतीव नरसंहाराच्या काळात ‘अस्तित्वसत्याला न नाकारता भावसौंदर्य कसे जपायचे’ (अवतारणातील वाक्य अनुवादकाच्या मनोगतातील आहे) ते सांगणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकातील एक महत्वाचे नाव म्हणजे हरमन हेसे.

प्लेटो, स्पिनोझा, शोपेनहोअर आणि नित्शे यांच्या प्रभावाचे ऋणी असणाऱ्या हेसेंनी 'भारतीय आणि चिनी दर्शनांचा आपल्यावरील प्रभाव अधिक वरचढ होता', असे प्रांजळपणे मान्य केले आहे. मिशनरी लोकांच्या कार्यपद्धतीमुळे दुखावल्या गेलेल्या अनेक भारतीयांना एका मिशनरी जोडप्याच्या मुलाने भारतीय दर्शनांना वापरून लिहिलेली ही कादंबरी वाचून काय वाटेल त्याची कल्पना करून मला मौज वाटली. कदाचित न वाचलेल्या भारतीय दर्शनांबद्दलची कुणाची अस्मिता जागृत होईल आणि सगळं आमच्याकडे पूर्वीपासून आहेच याचा गजर होईल किंवा मग या कादंबरीमुळे मिशनरी लोकांच्या इतर कृत्यांवर पडदा टाकता येणार नाही असा निषेधाचा सूरही निघेल. पण काहीही असो या कवीमनाच्या लेखकाचे वर्णन करताना अनुवादकाने त्यांना ज्ञानेश्वरांच्या भाषेत ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत बसवलेले आहे, ते मला पूर्णपणे पटलेले आहे.

गौतम बुद्धाच्या काळात, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी, अस्तित्वाचे प्रयोजन शोधण्यासाठी एक युवक घराबाहेर पडतो. त्याच्या या शोधात तो ब्राह्मण, श्रमण, आणि बौद्ध या विचारांचा अनुनय करतो. साधक, संसारी, व्यापारी, आसक्त आणि विरक्त अश्या अवस्थांतून जातो. त्याच्या शोधप्रवासाची छोटेखानी काव्यात्म कादंबरी म्हणजे सिद्धार्थ. कादंबरीची ही मध्यवर्ती कल्पनाच मला अतिशय आवडली. आणि मी हेसेंच्या नजरेतून सरदेशमुखांच्या सहाय्याने सिद्धार्थाच्या प्रवसाची गोष्ट वाचायला सुरवात केली.


Monday, December 25, 2017

बोलेरो (भाग ४)

--------------
तुंबाडचे खोत मध्ये मंगल आणि अमंगलाचा सातत्याने चाललेल्या सोहळ्याला साक्षी असतो वाडा. मोरयाने बांधलेला; प्रचंड, भव्य वाडा. कादंबरीच्या सुरवातीला आपल्याला भेटतात ते त्याचे भग्नावशेष आणि शेवटी कळतात ती त्याच्या भग्नावस्थेची कारणे. म्हणजे अलिप्त असूनही वाडा शेवटी त्या कथेचा बळी ठरतो. खोतांच्या कथेत वारंवार येत असूनही आणि अलिप्त असूनही त्यात बळी न पडलेली अजून एक साक्षीदार असते जगबुडी नदी. दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला खोत तिची सहकुटुंब पूजा करतात, तिची ओटी भरतात. पण चारशे वर्षांच्या खोत घराण्याच्या इतिहासाला जगबुडी मात्र अलिप्तपणे पहाते. हजारो वर्षांपासून तशीच वहाते. कुठल्याही भावभावनांचे तरंग उमटवू न देता. एकाच तालात, आपल्याच तालात. आणि सगळ्या भावभावनांच्या तरंगात भिजून ओलेचिंब झालेले तुंबाडकर आणि लिंबाडकर तिच्या काठावर आपापले सूर आळवतात. आपल्या स्वभावामुळे निर्माण होणारे आवेग त्या सुरात मिसळतात. आणि जगबुडीच्या लाटांच्या कलकलाटात आपले भेसूर किंवा सुरेल सूर जोडतात.

आधी एक संथ सूर - जगबुडीचा.

तिच्या काठी मोरयाचा वाडा येतो. आणि जगबुडीच्या संथ एकसुरात खोतांच्या घराचे सूर मिसळू लागतात. पाशवी वासनांचे, मग्रुरीचे, रागाचे, द्वेषाचे, लोभाचे, सत्तोन्मादाचे, समजूतदारपणाचे, दबलेल्या दुःखांच्या उमाळ्याचे, हतबलतेचे, आनंदाचे, हताशेचे.

त्यात लिंबाडचे सूर मिसळतात. औदार्याचे, चिरडीला येण्याचे, देशप्रेमाचे, गोंधळल्याचे, ध्येयवादाचे, समजूतदारपणाचे, संशयाचे, दुःखाचे.

त्यात बाहेरील परिस्थितीचे निरनिराळे सूर मिसळत जातात. जातीभेदाचे, आडव्या पंगतीचे, नवीन शिक्षणाचे, मुंबईच्या पैश्याचे, धार्मिक तेढीचे, विधवा विवाहाचे, दारूचे आणि दारूबंदीचे, टिळकांच्या अग्रलेखांचे, गांधींच्या चळवळींचे, सावरकरांच्या गीतांचे आणि कुणी न पाळणाऱ्या त्यांच्या परंपराभेदी विचारांचे, अफवांचे; असे वेगवेगळे सूर मिळून कादंबरी वेग पकडते. आणि या कादंबरीला जर संगीत मानले तर तिचा क्रेसेंडो किंवा उत्कर्षबिंदू म्हणजे गांधीहत्येनंतर वाड्याचे नष्ट होणे.

गेल्या रविवारी कादंबरी वाचून झाली. डोक्यात हे कादंबरीचे संगीतमय रूप भिनलेले होते. ज्या मैत्रिणीने माझा वाढदिवस आहे अश्या चुकीच्या समजुतीने मला ही कादंबरी भेट दिली होती तिचे आभार मानण्यासाठी फोन केला. तिने उचलला नाही. मग तिला मेसेज टाकून घरच्यांबरोबर फिरायला बाहेर गेलो. गाडी सुरु केली तर त्यात माझी आवडती सीडी चालू झाली.

पहिले संगीत होते कार्ल ऑफ्फचे ‘ओ फॉर्च्यूना’. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन. आणि नंतर सुरु झाले फ्रेंच संगीतकार मॉरिस राव्हेलचे ‘बोलेरो’. हे माझे अतिशय आवडते संगीत आहे. मोठ्या लेकालाही आवडते. आवाज मोठा करून तीनचारदा ऐकले. शेवटी बायको आणि आईने वैतागलेल्या वाटल्या तेव्हा बंद केलं. एकाएकी डोक्यात भिनलेल्या कादंबरीच्या संगीतमय रूपाची राव्हेलच्या बोलेरोशी संगती जुळली. घरी आल्यावर राव्हेलच्या बोलेरोबद्दल जे जे मिळेल ते वाचून काढले.

मॉरिस राव्हेल (बोलेरोचा संगीतकार)
Image Source : Internet 
बोलेरो हा एक लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार आहे. क्युबा आणि स्पेनमध्ये लोकप्रिय असणारा हा नृत्यप्रकार म्हणजे जोडीने करायचे नृत्य. यात संगीत आणि नृत्याची लय संथ असते आणि नंतर ती हळूहळू वाढत जाते.

इडा रुबीनस्टेन नावाची एक रशियन नर्तकी राव्हेलची मैत्रीण होती. तिने राव्हेलला तिच्या बॅलेसाठी एका स्पॅनिश संगीतकाराच्या रचनेची सुधारित आवृत्ती करून देण्यास सांगितले. पण त्या रचना दुसऱ्या एका संगीतकाराच्या स्वामित्व हक्काखाली होत्या. त्याने त्या राव्हेलला देण्यासाठी आनंदाने होकार दिला पण राव्हेलने शेवटी स्वतःच एक रचना तयार करायचे ठरवले.

मग एक दिवस त्याने आपल्या मित्राला घरी बोलावले आणि त्याला पियानोवर एक तुकडा वाजवून दाखवला आणि म्हणाला, ‘मी याच तुकड्याला वारंवार वाजवत राहीन आणि प्रत्येक आवर्तनात त्यात एकेक वाद्य वाढवत जाईन. पाच मिनिटात सुचलेल्या त्या तुकड्याचा वाद्यमेळ बनविण्यासाठी राव्हेलला मग सहा महिन्यापेक्षा जात वेळ लागला. त्यातून जे बनलं त्याची सुरवात संथ लयीत आणि शेवट अतिशय वेगात होत असल्याने राव्हेलने त्या संगीताच्या तुकड्याचं नाव ठेवलं बोलेरो.

पंधरा मिनिटे आणि पन्नास सेकंदाच्या या संगीतात जवळपास सतरावेळा तोच तुकडा वाजतो. प्रत्येक वेळी एक नवीन वाद्य जुन्याबरोबर वाजू लागते आणि मग शेवटी अठराव्या आवर्तनात उत्कर्षबिंदूला तो सर्व वाद्यांना घेऊन थांबतो.


कॅरोल लोम्बार्डच्या १९३४च्या बोलेरो नावाच्या चित्रपटात या संगीताला वापरले आहे.


नंतर बो डेरेकच्या ‘१०’ नावाच्या चित्रपटातील एका संवादामुळे आणि बो डेरेकच्या लौकिकाला साजेश्या प्रणयदृष्यात पार्श्वसंगीत म्हणून वापरले गेल्यामुळे संगीताचा हा विलक्षण तुकडा अजून प्रकाशझोतात आला.


राशोमोन चित्रपटात अकिरा कुरोसावाने याच संगीताचे अनुकरण करणारी थीम पार्श्वसंगीत म्हणून वापरली आहे. त्याशिवाय अनेक चित्रपटांत आणि नृत्य नाटकांत या संगीताचा वापर केला गेला आहे.





जेव्हा या संगीताचा पहिला प्रयोग (परफॉर्मन्स) झाला तेव्हा, प्रेक्षक बेभान झाले होते आणि असे म्हणतात की एक स्त्री चित्कारली, ‘ हा वेडेपणा आहे. राव्हेल वेडा आहे’. जेव्हा राव्हेलला हे सांगितले गेले तेव्हा तो म्हणाला.’त्या स्त्रीला हे संगीत कळले आहे’. अजूनही कित्येक वेळा फ्लॅश मॉब करून हे संगीत युरोप अमेरिकेतील मॉल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी वाजवून कलाकार लोकांची वाहवा मिळवतात.



या संगीतावर टीकाही भरपूर झाली. सगळ्यात जहरी टीका म्हणजे हे संगीत नसून पाल्हाळ लावले आहे अश्या स्वरूपाची होती. ‘प्रत्येक संगीताचा एक अंतबिंदू असतो आणि बोलेरोच्या बाबतीत तो सुरवातीलाच आहे पण हे राव्हेलला कळलेले नाही’ अश्या तीव्र स्वरूपात त्यावर टीका झाली. ही टीका वाचली आणि तुंबाडचे खोत ही एक विसविशीत कादंबरी आहे. श्रीनांनी पाल्हाळ लावले आहे, अशी या कादंबरीवर होणारी टीका आठवली. आणि मला जाणवलेले कादंबरीतील संगीत व राव्हेलच्या बोलेरोची नक्की संगती काय ते माझे मला उमगले. राव्हेलची रचना अनेकांना पाल्हाळ वाटते, कादंबरी अनेकांना पाल्हाळ वाटते. राव्हेलला स्वतःला ही रचना त्याची सर्वोत्कृष्ट रचना वाटत नाही. या कादंबरीबद्दल श्रीनांचेही मत काहीसे असेच होते.

बोलेरो नृत्य म्हणजे दोन नर्तकांचा खेळ. कुरघोडी नाही, आक्रमण नाही, एकमेकांना संपवायची इच्छा नाही. उलट एकमेकांशी खेळून आनंद लुटणे हाच हेतू. किंवा कदाचित आनंद लुटण्यापेक्षा खेळणे हीच प्रवृत्ती असल्याने प्रवृत्तीशरण होऊन खेळत राहणे. कादंबरीत मंगल आणि अमंगल हे ते दोन नर्तक. राव्हेलच्या बोलेरोत एकामागून एक वाद्ये सुरु होत जातात आणि जुन्या वाद्याबरोबर तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात. कादंबरीत, मंगल आणि अमंगल सर्व पात्रांतून आपला अविरत खेळ पुन्हा पुन्हा खेळ खेळत रहातात. राव्हेलच्या बोलेरोत ड्रम, एकाच संथ लयीत सुरवातीपासून शेवटपर्यंत वाजत रहातो. कादंबरीत सुरवातीपासून शेवटपर्यंत जगबुडी एकाच संथ लयीत वहात रहाते. राव्हेलच्या बोलेरोत उत्कर्षबिंदूत सर्व वाद्ये एकत्र येऊन जो परिणाम घडवतात तोच परिणाम कादंबरीच्या शेवटी वाड्यावर येणाऱ्या संकटातून आपल्या अंगावर येतो.

कादंबरी मोठी, माझे आकलन तोकडे त्यामुळे त्यावर मी लिहिणार नाही असे आईला निक्षून सांगितले होते पण नंतर गाडीत ऐकलेल्या राव्हेलचे संगीत आणि मनात असलेले श्रीनांनी रंगवलेले शब्दचित्र इतके चपखल बसले की तुंबाडच्या खोतांवर लिहिणार नाही हा संकल्प तुटला. आता तर मला असेच वाटते आहे की कुणी तुंबाडचे खोतवर चित्रपट बनवला तर त्याला पार्श्वसंगीत म्हणून राव्हेलच्या बोलेरोशिवाय काहीही वापरू नये. आणि वाड्याच्या अखेरच्या क्षणी या संगीताचा शेवट येईल असे करावे.

मी ज्या प्रयोगांचा उल्लेख केला आहे त्या राव्हेलच्या बोलेरोच्या प्रयोगांचे आणि मग त्याला चित्रपटात वापरलेल्या तुकड्यांचे तुकड्यांचे किंवा त्यावरून बेतलेल्या पार्श्वसंगीताचे व्हिडीओ वर दिलेले आहेत.

लंडन सिम्फनी ऑर्केस्ट्राचा प्रयोग जरी पंधरा मिनिटे पन्नास सेकंद इतका मोठा असला आणि सुरवातीला थोडा संथ वाटला तरी शेवटपर्यंत ऐका ही विनंती. त्यात साधारण १५व्या मिनिटानंतर जे होते तिथे वाडा नष्ट होतो आहे अशी कल्पना मी केली आहे.

मग कदाचित तुम्हाला पटले नाही तरी किमान शक्यता जाणवेल की तुंबाडचे खोत म्हणजे मंगल व अमंगलाने एकमेकांशी मांडलेला खेळ आहे. कुरघोडी न करता एकमेकांना जोखण्याचा खेळ. दोन प्रवृत्तींचा प्रवृत्तीशरण अविरत अंतहीन खेळ. एकाच वाद्याने संथ लयीत चालू होऊन नंतर वेग आणि वाद्ये वाढवत जाणारा खेळ. ज्याचं नाव बोलेरो.


----

बोलेरो (भाग ३)

-----
तुंबाडचे खोत म्हणजे एक महाकादंबरी आहे. चार भाग असलेली आणि दोन खंडात विभागलेली ही कादंबरी काळाच्या एका विस्तीर्ण पटलावर घडते. एका घराण्याच्या चार पिढ्यांची कथा, कोकणच्या निसर्गाचे उत्कृष्ट शब्दचित्र रेखाटणारी कादंबरी, कोकणच्या माणसांची स्वभाववैशिष्ट्ये सफाईने रेखाटणारी कादंबरी अश्या अनेक प्रकारे तिचे वर्णन केले जाऊ शकते. मागील दोन भागात तिची रूपरेषा मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता तिच्यावरील आक्षेपांकडे वळतो.

‘तुंबाडचे खोत’ वर श्री ना पेंडसे स्वतःदेखील फारसे खूष नव्हते असे माझ्या काही मित्रांशी बोलताना मला कळले. ही कादंबरी महा कादंबरी आहे पण महान कादंबरी नाही, अश्या स्वरूपाचे मत त्यांचे स्नेही विं दा करंदीकरांनी व्यक्त केले होते. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेत स्वतः श्री ना म्हणतात, ‘त्या थोर कादंबरीकारांना ज्यांनी माझी जागा मला दाखवली’. काही टीकाकार तिच्यावर टीका करताना काहीजण तिला प्रादेशिक कादंबरी म्हणतात; तर काहीजण, ‘प्रयोजनहीन किंवा सूत्रहीन कादंबरी असा आरोप करतात. म्हणजे ही कादंबरी का वाचावी? ही नक्की कुणाची कथा? वाड्याची, घराण्याची, वाताहतीची की अजून कशाची? ते कळत नाही अशी टीका करतात. ऐसी अक्षरे या संस्थळावर एका वाचकाने असेही मत नोंदवले की या कादंबरीची पहिली पाचदहा आणि शेवटची पाच पाने फाडून ती वाचली तरी वाचकाला काही फरक पडत नाही. म्हणजे त्या पानांत असलेले कथानक आणि बाकीच्या कादंबरीतील कथानक यांचा सांधा जुळवायला शिरूभाऊ यशस्वी झालेले नाहीत.

माझ्या मते कादंबरीच्या शेवटी आलेले, ‘मंगल हवे असेल तर अमंगलाची किंमत मोजा’ हे वाक्य या कादंबरीचे सार किंवा सूत्र आहे. खोतांच्या घराण्यातील चार पिढ्यांच्या कथेच्या निमित्ताने मंगल आणि अमंगलाचा जिवंत वळवळणारा गोळा (हा कादंबरीतील शब्द आहे) शिरुभाऊंनी रेखाटला आहे. पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेली या कादंबरीच्या दोन्ही खंडांची मुखपृष्ठेही तेच सांगत आहेत असे मला वाटते. 



पहिल्या खंडाचे मुखपृष्ठ पाहताना असा भास होतो की वाचक समुद्रकिनाऱ्याजवळील एखाद्या टेकडीवर उभा आहे आहे, समोर नारळी पोफळीची झाडे आहेत, त्यापुढे हिरवीगार झुडपे आहेत आणि त्यापुढे किनाऱ्याकडे येणारी नीलधवल लाट आहे आणि त्यावर पसरलेले निळेशार आकाश आहे. त्या चित्रात सकाळ प्रसन्न करणारी वाऱ्याची एक सुखावह मंद झुळूक जाणवते. पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या शीर्षस्थानी निळ्या आकाशात आहे. पुस्तकाचे आणि आणि लेखकाचे नाव पांढऱ्या रंगात आणि डोळ्यांना प्रसन्न वाटेल अश्या गोलाई असलेल्या अक्षरात आहे.

याउलट दुसऱ्या खंडाचे मुखपृष्ठ रेखाटताना वाचक समुद्रात तरंगणाऱ्या आणि तुंबाडपासून दूर जाणाऱ्या होडीत किंवा बोटीत बसून दूर सुटत जाणाऱ्या तुंबाडकडे पाहतो आहे असे रेखाटले आहे. समोर समुद्राच्या लाटा आहेत, त्यापुढे तुंबाडचा किनारा आहे. किनाऱ्यावर विरळ झालेली नारळी पोफळीची झाडे आहेत, वेळ रात्रीची आहे. समोर तुंबाड नारिंगी ज्वाळांच्या प्रकाशात भेसूर दिसते आहे. सोसाट्याचा वारा सुटला आहे आणि त्यात उठलेल्या हिरव्या काळ्या धुराच्या लोटात समुद्रकिनारी उभी असलेली झाडे झाकोळून गेली आहेत. पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या शीर्षस्थानी नसून खाली लाटांमध्ये आलेले आहे. ते नारिंगी रंगात आहे. पुस्तकाचे आणि लेखकाचे नाव भुताळी वाटावे अश्या किंवा ज्वाळांतून उठणाऱ्या वाफेतून पाहिल्यावर पलीकडचे जग जसे हलताना दिसते तश्या अक्षरात आहे. जणू मंगल आणि अमंगलाचा गोळा धगधगतो आहे. आणि साक्षीला आहे जगबुडीचा अविरत प्रवाह.

मंगलातून अमंगल आणि अमंगलातून मंगल अशी सातत्याने चालणारी साखळी या कादंबरीत दिसून येते. जी व्यक्तिरेखा अमंगलाकडे तीव्रतेने झुकते तिच्या समोर उभी ठाकणारी व्यक्तिरेखा तीव्रतेने मंगलाकडे झुकणारी असते. तर ज्या व्यक्तिरेखा सौम्यपणे एकीकडे झुकतात त्यांच्यात मंगल अमंगल भावनांचा कल्लोळ चालू असतो. जणू अमंगलाला मंगलाचे कोंदण आणि मंगलाला आपले मांगल्य उजळून काढण्यासाठी अमंगलाची धग. तुंबाडात तीव्र व्यक्तिमत्वे तर लिंबाडातील लोक तुलनेने सौम्य.

भिकाजीपंतांची तीन मुले. मस्तवाल दादा आणि बंडूमुळे अमंगलाकडे झुकलेला गोळा जणू स्थिर करण्यासाठीच ज्याचा जन्म झाला तो नाना खोत. हा सौम्य प्रकृती खोत पुढे लिंबाडला जातो आणि त्याच्या वंशजांना सौम्य प्रवृत्तीचा वारसा मिळतो.

अहंकारी, उग्र आणि विलासी दादा खोतांचा विवाह होतो सात्विक आणि सोशिक गोदीशी. आणि त्यातून झालेला मुलगा म्हणजे सात्विक आणि निर्मोही गणेशशास्त्री. पण गणेशशास्त्रींचा विवाह होतो साधारण बुद्धिमत्तेच्या स्त्रीशी. त्यातून त्यांना झालेली मुलांत मंगल आणि अमंगलाची सरमिसळ होत जाते. थोरला जनापा म्हणजे शेतमजूर असल्याप्रमाणे राबणारा आणि केवळ शरीराच्या भुकांना जागणारा. दुसऱ्या क्रमांकावर कारस्थानी, पैशाचे आणि शरीरोपभोगांचे लोभी जुळे -चिमापा आणि बजापा. मग धगधगणारा गोळा मंगलाकडे सरकू लागतो आणि जन्माला येतो शरीराने आडदांड पण मनाने प्रेमळ बजापा आणि सगळ्यात शेवटी आजीची प्रतिकृती असलेली सोशिक आणि विद्वान ताई.

यातले जनापा, चिमापा, भिकापा सगळी थेरं करतात. लांड्या लबाड्या करतात, बायका ठेवतात, इतरांचं वाईट चिंततात, लोभाचा कळस गाठतात आणि स्वार्थासाठी नैतिक, अनैतिक असे सगळे मार्ग चोखाळतात. याउलट तीच रग किंबहुना त्याहून जास्त रग असलेला बजापा सगळ्या संधी उपलब्ध असूनही बायकांची लफडी करत नाही, कुणाला फसवत नाही, जुलाली प्रकरणात अडकूनही बायकोला अंतर देत नाही. किंबहुना तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करत नाही. सगळ्यात सात्विक ताई. तिचा नवराच गायब होतो आणि ती कायमची माहेरी येते आणि आपल्या थोरल्या तीन भावंडांच्या अमंगलाला सावरत बसते.

शारीरभुकांचा दास असलेला जनापा आणि चिमापाशी संबंध ठेवणारी त्याची बायको यांचा मुलगा म्हणजे देशासाठी प्राण अर्पण करणारा, कुशाग्रबुद्धी, तेजस्वी विश्राम. गणेशशास्त्र्यांच्या अखेरच्या क्षणातही रानात रत असणाऱ्या जनापाच्या विश्रामला मात्र इंद्रियविजय प्राप्त झालेला. चुलत्याचा किंवा पोलिसांचा मार किंवा उपास यापैकी काहीही त्याला नमवू शकत नाही.

कारस्थानी चिमापाचा मुलगा अनंता सत्प्रवृत्त. ताई आत्या आणि विश्रामचा भक्त. वडिलांचा तिरस्कार करू लागतो आणि शेवटी वडिलांच्या आक्रस्ताळेपणामुळे स्वतःच्या जातीबाह्य प्रेमाला मिळवू न शकल्याने दारूत बुडतो. चिमापाची धाकटी पोर ताई. रूपाने आणि बुद्धीने आपल्या आजोबांवर गेलेली. पण तिच्या प्रेमाचे धिंडवडे निघतात आणि आपल्या मनासारखे करण्यासाठी शेवटी तिला वडील आणि चुलत्यांसमोर उग्र रूप धारण करावे लागते. प्रेमळ बजापाचा मुलगा विठ्ठल. तो मनाने प्रेमळ पण तुंबाडच्या तिन्ही काकांबद्दल असलेल्या अढीमुळे हलक्या कानाचा बनलेला. आणि त्यांच्याबद्दल विचार करताना डोक्यावरचा ताबा निसटणारा.

लिंबाड गेलेल्या आणि शामळू खोत म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना खोताचा मुलगा कर्तबगार मधू खोत. त्याची तिन्ही मुले कर्तबगार निघतात. पण पहिले दोन लिंबाड सोडून घाटावर जातात. डॉक्टर इंजिनियर होतात. तिसरा नरसू खोतही कर्तबगार पण त्याच्या व्यक्तिमत्व शुभ्र पांढरे असण्याऐवजी त्यातही शरीराचे सर्व चोचले पुरवण्याची करडी छटा. सगळे रंगढंग करतो पण घरात आणत नाही. जनापा, चिमापा आणि भिकापासारखा भोगात लिडबिडत नाही पण बजापासारखा नायकिणीलाही बायको करून घेण्याइतका दिलदारही नाही. सगळ्या जगाला मदत करतो. पण धर्मांतर करणाऱ्या त्याच्या थोरल्या मुलाला मात्र जाणून घेऊ शकत नाही आणि धर्मांतरानंतर त्याला मदतही करत नाही. त्याचे संपूर्ण आयुष्य जाते ते चिमापा आणि भिकापाच्या कारस्थानांना तोंड देत, बजापाला आणि त्याच्या मुलाला सांभाळण्यात.

त्याची बायको आयुष्यभर नवऱ्याची सावली बनून राहते पण धाकट्या लेकाच्या लग्नानंतर मात्र नवऱ्याच्या वर्तनावर लांछन लावते आणि संपूर्ण घराला कसर लावते. त्याचा मोठा मुलगा हुशार पण शेवटी डॉक्टर होताना नापास होतो, वडिलांना न सांगता जास्तीचे पैसे मागत राहतो आणि शेवटी हिंदू धर्माला बोल लावत धर्मांतर करतो पण त्यामागील त्याग उदात्त नसून क्षुद्र आहे असे नरसूचे मत असते. धाकटा मधू, अबोल पण कामसू. लग्नानंतर बायकोच्या प्रेमात बुडालेला. पण शेवटी हलक्या कानाचा निघतो बापावर संशय घेतो आणि शेवटी वेडा होतो. वेडातून सुधारल्यावरही बायकोला घाबरून बाहेरचे मार्ग चोखाळतो. या मधुची बायको गुणी आणि सुंदर. पण तीही सासूच्या आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळते आणि मग तिच्या मूळ स्वभावाला विपरीत वागू लागते.

त्याच वेळी बाह्य जगात जाती जातीत भांडणे होत असतात. लोक कुणाबद्दल हळहळ व्यक्त करत असतात तर कुणाच्या दुःखाला परमेश्वराचा न्याय समजत असतात. हिंदू मुस्लिम दंगे होत असतात. दंग्यात घरे जाळणारे नंतर आपल्या मित्राचे घर जळाले म्हणून कानकोंडले होत असतात. टिळकभक्त गांधीभक्त होतात. गांधीभक्त गोंधळतात. शिवाजी, टिळक, गांधी, सावरकर ही आपल्या क्षुद्र आणि दुबळ्यांच्या समाजाला पडलेली स्वप्ने आहेत. त्यांचे विचार आपल्याला कितीही आवडले तरीही ते प्रत्यक्षात आणण्याइतका आपला समाज ओजस्वी नाही हे मान्य करून स्वतःला जमेल तितका स्वार्थमूलक परमार्थ करतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्याच नाकर्तेपणाच्या आणि स्वार्थाच्या अमंगलाला देशभक्तीच्या, नेतेभक्तीच्या मंगलाचे कोंदण द्यायचा प्रयत्न करतात.

त्यामुळे कादंबरीच्या सुरवातीच्या आणि अखेरच्या काही पानांचा मूळ कादंबरीशी असलेला क्षीण संदर्भ हा आक्षेप मला मान्य असला तरी, ‘कादंबरी सूत्रहीन आहे’ असे काही मला वाटत नाही.

------

बोलेरो (भाग २)

-----
श्री ना पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’ या महाकादंबरीने माझ्या मनावर गारूड केले.

उत्कृष्ट चित्रकार गरज नसल्यास संपूर्ण कॅनव्हास रंगवत बसत नाही. याउलट जिथे आवश्यक असेल तिथे कोऱ्या कॅनव्हासलाच चित्राचा भाग बनवतो. शिरुभाऊंनी या कादंबरीत हेच तंत्र अवलंबले असावे असे मला प्रस्तावना वाचून वाटले आणि मग संपूर्ण कादंबरी वाचताना शिरुभाऊंनी समाजात झालेले बदल कसे दाखवले आहेत, तिथेही माझे लक्ष जात राहिले.

कादंबरी सुरु होते पेशवाईच्या अस्ताच्या वेळी आणि संपते गांधीहत्येनंतर. या विस्तीर्ण कालखंडात भारतीय समाजात झालेले बदल लेखकाने मोठ्या सफाईने मांडले आहेत. कादंबरीतले पहिल्या पिढीतले खोत दादा आणि बंडू, अघोरी तंत्रमार्गाची उपासना करतात खरं तर मला हा भाग हास्यास्पद वाटायला हवा होता आणि या वर्णनाला मी लेखकाचं स्वातंत्र्य म्हणून मान्य करत पुढे गेलो असतो. पण माझ्या सुदैवाने मी नंदा खरेंचं, ‘बखर अंतकाळाची’ वाचलं होतं आणि त्या अनुषंगाने इतर वाचनही झालं होतं त्यामुळे पेशवाईच्या अखेरच्या काळात भारतीय समाजात तंत्रमार्गाची, शाक्तांची, अघोर पंथीयांची किती चलती होती ते मला माहिती होते. त्यामुळे दादा आणि बंडू खोतांच्या तंत्रउपासनेमागे तत्कालीन समजुतींचा लेखकाने वापर करून घेतल्याचे मला जाणवले. आणि पुढे जाऊन चिमापा, भिकापा व ताई आपल्या आजोबांच्या या अघोर साधनेला ‘ब्रिटिश सत्ता उलथवण्यासाठीचा प्रयत्न’ असा हेतू जोडून देऊन आपल्या घराण्याची प्रतिष्ठा राखतात. पुनर्लेखन करून सोयीचा इतिहास उभा करून आपल्या अस्मिता टोकदार करण्याची आणि समाजात आपले वजन वाढवण्याची भारतीय प्रवृत्ती अधोरेखित करतात. श्रीनांच्या लेखणीतून उतरलेले हे प्रसंग वाचताना, ‘वर्तमानात जगत भविष्य घडवत असताना भारतीय समाज त्याच वेळी घटित इतिहासालाही घडवत असतो’ हे माझं मत बरोबर असल्याची खात्री पटली.

दादा खोतांचा जन्म १७८० चा तर बंडू खोतांचा जन्म १७८२ चा. म्हणजे जेव्हा मुंबईची सात बेटं एकत्र करण्याचा प्रकल्प सुरु झाला त्याच वर्षाचा. म्हणजे खोतांच्या या काळात मुंबई अजून नावारूपाला आलेली नसते. त्यामुळे कादंबरीच्या या भागात मुंबईचा उल्लेख येत नाही. तो येतो अगदी नंतर म्हणजे खोतांच्या तिसऱ्या पिढीच्या वेळी, नरसू बजापाच्या वेळी. तोपर्यंत सगळं कथानक तुंबाड आणि लिंबाडच्या जवळपासच्या परिसरात फिरत रहातं. तालुक्याचा उल्लेखही कादंबरीत नंतर येतो. दादा खोत आणि बंडू खोत गावात अनिर्बंध सत्ता उपभोगत असतात.गावात कुणाला आणायचं, कुणाला कुठली जमीन द्यायची, कुणाच्या बायकोला आपल्या छपरी पलंगावर न्यायचं सगळा त्यांच्या मर्जीचा मामला. कुणी विचारणारं नाही. ‘हम करेसो कायदा’ हाच नियम. ना कोणी पोलीस पाटील ना कोणी न्यायाधीश. जेव्हा खोत बंधू अघोरी उपासनेतील अमानुष प्रकार करतात तेव्हा कादंबरीत कंपनी सरकारच्या कायद्याचा प्रवेश होतो आणि तुंबाडात टोपीकराबरोबर फौजदार येतो. त्याला त्या अमानुष प्रकाराचा छडा लावण्यात जितका रस आहे त्यापेक्षा आता खोतांच्या हम करेसो कायद्यासमोर कंपनीच्या कायद्याची ताकद दाखवायची आहे. आणि कंपनीचा कायदा सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचं आहे. त्यामुळे त्याचा आवेश लेखकाने वाजवीपेक्षा जास्त ठेवला आहे. नंतर कोर्टकचेरी न करता फौजदार पैसे खाऊन प्रकरण दाबतो, तेव्हा आजही टिकून असलेली सरकारी कमर्चाऱ्यांची वृत्ती अधोरेखित होते.

या काळात पोलीस नाहीत. मुंबई नाही. वर्तमानपत्र नाही. शिक्षण नाही. प्रेमविवाह नाहीत. पण विवाहपूर्व आणि विवाहबाह्य संबंध सर्रास आहेत. ब्राह्मणांत केशवपन सक्तीचे आहे. जन्माधारित अधिकार आणि त्याने आलेली मग्रुरी किंवा लाचारी यानेच समाजाचा गाडा चालतो आहे. ब्राह्मणेतर समाजात मराठ्यांचे स्थान महत्वाचे आहे पण ब्राह्मण स्वतःला उच्च समजतात आणि इतरही त्यांना तसे समजतात हे दिसून येते. काही ब्राह्मण केवळ पूजापाठ सांगतात आणि गरीब आहेत तर काही ब्राह्मण जमीनीचे मालक आहेत, सधन आहेत आणि आपली जमीन कुळांना कसायला देत आहेत. स्वतः व्यापार उदीमात लक्ष घालत आहेत. सोवळे ओवळे पाळत असले तरी स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या वैविध्याला जातीपातीचे बंधन नाही. सधन ब्राह्मण अनधिकृतरित्या अनाचार करत असले तरी गरीब ब्राह्मण कुलाचार, सोवळे ओवळे आणि नियमांच्या बाबतीत काटेकोर आहेत. गरीब ब्राह्मणावर हात टाकायला कुठल्याच जातीला फार भीती वाटत नाही. आणि आपल्याच जातभाईकडून अधिकृतरित्या जातीबाह्य वर्तन झाल्यास त्याला बहिष्कृत करण्याचे ब्राह्मणांचे वर्तन मराठ्यांसकट सर्व जातींना हास्यास्पद वाटते आहे. थोडक्यात सांगायचे तर व्यवहारात ‘बळी तो कान पिळी’ हा नियम असूनही ब्राह्मणातील गरीब श्रीमंत सारेजण किमान अधिकृतरीत्यातरी आपल्या पूर्वजांच्या धर्माचे नियम पाळण्यात धन्यता मानत होता.

शिक्षणासाठी गणेशशास्त्री पुण्यास जातात आणि नंतर सरळ काशीला. मुंबईला नाही. काशीहून धन्वंतरी होऊन येतात. पण नंतरच्या पिढ्यात मात्र डॉक्टर, वकील होणे प्रतिष्ठेचे मानले जाते आणि शिक्षणासाठी पुण्याऐवजी मुंबई महत्वाची ठरू लागते. सुरवातीला तुंबडबाहेर न जाणारी माणसे मग आगबोटीने मुंबईला फेऱ्या मारू लागतात. मुंबई जेव्हा कादंबरीत येते तेव्हाही ती कुणालाही विरघळवून टाकणारा मोठा जनसागर म्हणून येते. तिथे मोठमोठ्या इमारती आहेत, हॉस्पिटल आहेत, कॉलेजेस आहेत, लॉज आहेत, पेढ्या आहेत बग्ग्या आहेत, ट्राम आहे, चाकरमानी आहेत आणि नायकिणी आहेत. मुंबईचा प्रवेश झाल्यावर पुणे आणि काशी मागे पडते.

तुंबाडात शाळा सुरु होते ते प्रकरण वाचताना मला भैरप्पांची तंतू कादंबरी आठवली. शाळेत ब्राह्मण समाजातून येणारी जास्त मुलांची संख्या. मराठ्यांची त्यामुळे होणारी चडफड. त्यावरून होणारे राजकारण हा भाग तंतूपेक्षा वेगळा असला तरी काही माणसांचा आटापिटा. इतर सगळ्यांचा आडमुठेपणा. पैशाचं अपुरं पाठबळ. ध्येयवेडे शिक्षक. पालकांची आणि मुलांची शिक्षणाबाबतची उदासीनता, हे सगळे भाग सारखेच. आणि ब्राह्मण मराठे वाद वाचताना नेमाडेंचे चांगदेव चतुष्ट्य आठवतेच.

राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख येतो तोही कथानकाला पुढे घेऊन जातो. आपल्या हाताने सुल्तानकीची वस्त्रे खलिफाला पाठवून त्याचा आशीर्वाद मिळवून आपापल्या रयतेवर हुकूम गाजवण्याचा शिरस्ता ज्याप्रमाणे मुघल साम्राज्याच्या काळी रुळला होता तोच कित्ता मोरया गिरवतो आणि हर्णेच्या किल्ल्यावर आलेल्या शिवरायांकडून स्वतःचा सत्कार करून घेतो. नंतर चिमापा स्वतःच्या पैशाने समारंभ करून स्वतःचा सत्कार करवून घेतो ते वाचताना तर सध्याच्या कित्येक पुरस्कारांची आठवण व्हावी.

तुंबाडात फार थोड्या लोकांकडे केसरी येऊ लागतो. त्यातले बहुतेक लोक तो वाचत नाहीत. पण उमलत्या वयातील विश्राम ते ताईआत्याबरोबर वाचून भारावून जातो आणि देशकार्यासाठी घर सोडतो. काँग्रेसचा सदस्य वगैरे न होता त्याला क्रांतिकारक व्हायचे असते. लढ्याचे स्वरूप काय? कुणाशी, कुणासाठी आणि कसं लढायचं ते माहीत नसताना घरातील वातावरणापासून तुटलेला कोवळा पोरगा जेव्हा सरकारविरोधासाठी घर सोडतो तेव्हा तत्कालीन क्रांतीकारांची मानसिक अवस्था वाचकाला थोडी वेगळ्या अंगानेही दिसू लागते.

टिळक कोकणचे आणि त्यातही ब्राह्मण असल्याने त्यांचे नेतृत्व ब्राह्मण समाजात सहजी स्वीकारले जाते. पण ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारंच’, अशी गर्जना करणाऱ्या टिळकांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी कुणी घर सोडून बाहेर पडत नाही. ती किमया होते काँग्रेसमुळे आणि त्यातही गांधींमुळे. लोकांना गांधी कळत नाहीत. त्यांचे नेतृत्व अनेकांना गोंधळात पाडते. चळवळ सुरु करून मध्येच मागे घेणे, उपोषण, आमरण उपोषण, युद्धात सरकारला सहकार्य पण नंतर असहकाराची चळवळ, खादी, चरखा, सूत, परदेशी कापडाची होळी यातल्या कित्येक गोष्टीमागील राजकीय आणि आर्थिक तत्वे सामान्यांच्या गावीही नसतात. परदेशी कापडाची होळीत टाकलेले कपडे हे चळवळीतला सहभाग नसून काका पुतण्याचे भांडण म्हणून आलेले असतात. आणि नंतर कित्येक लोक मँचेस्टरचे कापड वापरणे चालू ठेवतात ते वाचताना स्वातंत्र्यलढ्यातील सामान्यांच्या सहभागाची वेगळी बाजू समोर येते.

काँग्रेसचा प्रचार करणारे बापू, नरसू आणि नरुशेट आपापल्या स्वभावाप्रमाणे चळवळीतील सोयीचा भाग उचलतात. बापू गावाचे गांधी होतात. ब्रह्मचर्य ते मैला साफ करणे ते विजातीय विवाह कर्मकांडांशिवाय लावून देणे वगैरे कामे करू लागतात. लोकांत अप्रिय होतात. पण गांधीवाद सोडत नाहीत. त्यामागे त्यांचे एक वैयक्तिक दु:खही असते, ज्याचा उल्लेख ते शेवटी नरसूकडे करतात आणि पुन्हा सार्वजनिक भूमिकेमागील वैयक्तिक कारणांकडे लेखक आपलं लक्ष वेधून घेतो. नरुशेट दारूबंदी होईपर्यंत काँग्रेसबरोबर राहतात पण नंतर मात्र त्यांना काँग्रेस नकोशी होते. नरसूला गांधी पटत नाही. त्याला गांधींचे नेतृत्व म्हणजे देशाचे दुर्दैव वाटते पण त्या माणसाच्या एका हाकेसरशी सारा देश हलतो याचे त्याला फार कौतुक असते. पुणे कराराच्या वेळी गांधींनी आंबेडकरांची केलेली अडवणूक त्याला पटत नाही पण स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? हेच त्याला कळत नाही. आणि नंतर एकाएकी अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम सुरु होणे, दलितांना हरिजन संबोधणे हे त्याला हास्यास्पद वाटते. त्याला गांधी आणि सावरकर दोघेही काळाच्या पुढे असलेले नेते वाटतात. सावरकरांची मते समाजाला पचणार नाहीत असे त्याला वाटते. गावात सुरु होणारे सावरकर मंडळाचे प्रतिज्ञापत्र छापायलाही तिथला ब्राह्मण मालक नकार देतो कारण त्यात हिंदू हीच माझी जात, विज्ञान हाच देव, गाय हा एक उपयुक्त पशू वगैरे मते नोंदवलेली असतात. आणि या मंडळाचे सभासददेखील ती प्रतिज्ञा न वाचताच केवळ तरुण नातेवाईकाचे मन राखावे म्हणून सभासदत्व घेतात आणि मंडळाच्या एकाही सभेला हजार राहात नाहीत.

गांधींचे साधे रहाणे लोकांत चेष्टेचा विषय असते टिळकभक्त लोकांना गांधींचा उदोउदो आवडत नाही. म्हणून ते सावरकरवादी होतात. पण सावरकर अंगीकारत नाहीत. सगळे राजकीय वाद केवळ वैयक्तिक हेवेदाव्यांसाठी वापरले जातात. हिंदू मुस्लिम दंग्यामागेही वैयक्तिक हेवेदावे हेच मोठे कारण असते. प्रत्येक सामाजिक चळवळीच्या उदात्त मुखवट्यामागचा वैयक्तिक हेवेदाव्यांचा ओबडधोबड चेहरा दाखवून लेखक त्याची चकाकी खरी किती आणि खोटी किती याचा निर्णय वाचकांवर सोडतो.

शेवटी फाळणीला गांधींना जबाबदार मानणाऱ्या काँग्रेसी नरसूला, टिळकभक्त असलेले देहाडराय जेव्हा सांगतात की फाळणीला गांधींचा विरोध होता आणि तिची बीजे टिळकांनी केलेल्या लखनौ करारात होती. हे कळल्यावर नरसूला जो धक्का बसतो त्यावरून स्वातंत्र्यलढ्यातील कित्येक घटनांबद्दल बहुसंख्य भारतीय समाज किती अज्ञानी होता त्याकडे लेखक आपले लक्ष वेधून घेतो.

जातीबाह्य विवाह, काळाबाजार, मुलींनी नोकरी करणे, प्रेमविवाह, केशवपन थांबणे, चित्रपट, त्यातील नायिकांप्रमाणे केसांच्या रचना, हिंदू अविभक्त कुटुंब, त्यातील सामायिक मालमत्तेबाबत होणारे वाद आणि त्यावर गडगंज होणारे वकील, देश सोडून बाहेर स्थायिक होणारे हुशार भारतीय, नीरा आणि माडीची जागा घेऊन संसार उध्वस्त करणारी दारू; हे सारे आपल्याला मधून मधून भेटत राहतात आणि तत्कालीन समाजाचे बदलते चित्र आपल्या मनात उभे राहू लागते. श्रीनांनी कथेतील व्यक्तींबरोबर तत्कालीन समाजालाही कथेचा नायक बनवल्याचे जाणवते. हे थोडे सध्याच्या हॉलिवूड पटांसारखे आहे. लाईफ इज ब्युटीफुल मध्ये नाझी छळछावणीच्या पार्श्वभूमीवर बापलेकाची कथा किंवा टायटॅनिक मध्ये त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एका जोडप्याची प्रेमकथा, ही उदाहरणे त्याच धाटणीची आहेत फक्त यात श्रीनांनी फार मोठ्या काळाची पार्श्वभूमी आणि अनेक पात्रांच्या जीवन कथा एकात एक गुंफल्या आहेत.
----

Sunday, December 17, 2017

बोलेरो ( भाग १)

---
श्री ना पेंडसे (तुंबाडचे खोत या कादंबरीचे लेखक)
Source : Internet 
मोरया दिसत नाही पण तो घराण्याचा मूळपुरुष मानला जातो. तुंबाडचा खोत. सुपारी आणि नारळाचा व्यापार करून सधन झालेला. शिवाजी महाराजांकडून सत्कार झालेला. कदाचित त्यामुळेच त्याला खोत घराण्याचा मूळपुरुष मानत असावेत आणि जगबुडी नदीच्या काठी तुंबाडचं गाव त्याच्यामुळेच नावारूपाला येतं. त्याने तुंबाडात गोड पाण्याची मोठी विहीर बांधली. जगबुडीची ओटी भरायचा रिवाज त्याने चालू केला. नवसासाठी टेंभूर्णीला प्रतिष्ठाही त्याच्या काळात मिळाली. नंतर जर मानवी हस्तक्षेप झाला नसता तर अजूनही टिकून राहिला असता असा चार शतकांचा साक्षीदार असलेला वाडा त्याने बांधला. तो कोण होता ते कुणाला माहिती नाही. काहीजण म्हणतात तो कदाचित दरोडेखोरही असावा. पण त्याचे अस्तित्व गावाला आणि वाड्यातल्या माणसांना सारखे जाणवत रहाते. गावात त्याची पावलं असलेले दगड असतात, जणू त्याने ठरवलेली गावाची सीमा सांगणारे. गावात येणारा - जाणारा त्या पावलांशी डोकं टेकून मगच पुढे जातो. तो वाड्यातील काही स्त्रियांच्या स्वप्नात येतो. कधी पाणी पितो कधी नाही. बोलत नाही पण शुभ किंवा अशुभ भविष्याची सूचना देतो अशी वाडेकरांची श्रद्धा असते. त्याने बांधलेला वाडा अजस्त्र, पहिल्या भेटीत अंगावर येणारा आणि कित्येक मंगल अमंगल घटनांना आपल्यात सामावून घेणारा. वाडेकऱ्यांना तुंबाडचं खोतपण देणारा.

अश्या या मोरयाचा एक वंशज भिकाजी; पहिल्यांदा तुंबडबाहेर पडतो. त्याला स्वतःचं संस्थान स्थापन करायचं आहे तुंबाडात. पण तो पेशव्यांबरोबर पानिपतावर जातो आणि लंगडा होऊन परततो. त्याचं संस्थान स्थापनेचं स्वप्न विरून जातं. त्याची तीन मुलं; बंडू, दादा आणि नाना. त्यातील बंडू आणि दादा खोतपणाची रग मिरवणारे तर नाना मात्र खोत वाटत नाही इतका मवाळ.गावात त्याला सगळे शामळू खोत म्हणतात. भिकाजीपंतांचं संस्थान स्थापनेचं स्वप्न बंडू आणि दादा खोताच्या डोक्यात शिरतं. पेशवाई सरत चालली आहे. भारतात कंपनी सरकारचं राज्य आलं आहे. बंडू आणि दादा खोत गावात आणि बिछान्यात आपले रंग उधळत आहेत. चाळीशीच्या तिजवर दादा खोताचा विवाह होतो गरीब किर्तनकार बापाच्या कोवळ्या पोरीशी, गोदीशी. वाड्याच्या आणि दादाच्या प्रथम दर्शनाला पोरगी गांगरते पण स्वतःला आणि नंतर घराला सावरते. इथे संस्थान स्थापन करण्याचं खोत बंधूंचं स्वप्न उचल खातं. कंपनी सरकारचं राज्य उलथायला ते अघोरी मार्गाची उपासना करतात. मोरयाच्या टेंभुर्णीला सोडून, खाडीतील बेटावर असलेल्या गिऱ्हाडीला नवस करतात. मद्य, मास, मैथुनाचा नैवेद्य करतात आणि शेवटी आपली उपासना पूर्ण करण्यासाठी अतिशय क्रूर आणि अमानवी प्रकार करतात. ते पाहून शामळू नाना खोत विभक्त होतो. वाड्याची वाटणी होत नाही आणि इतर सामायिकीची जी वाटणी होते त्यात त्याच्या हाताला फार काही लागत नाही. पण तो मोरयाच्या मूळ वाड्यापासून दूर लिंबाडला स्वतःचा वाडा बांधतो. मूळ वाड्यासारखाच पण लहान. कारण मोरयाच्या मानाला धक्का लागायला नको. पण त्या अघोरी प्रकारामुळे कंपनी सरकारचा फौजदार तुंबाडला चौकशीला येतो. बंडू खोत परागंदा होतो. दादा खोताची चामडी लोळवली जाते. गावातून वरात निघते. नंतर प्रकरणातून घराण्याच्या नावाला सावरण्यासाठी फौजदाराची धन करावी लागते आणि त्यात दादा खोत निर्धन होतात. तरीही घराण्याचा नावलौकिक जातो तो जातोच. वाड्याचे नष्टचर्य चालू होते.

दादा खोतांचा मुलगा गणेश, आईसारखा तेजस्वी आणि हुशार. दादा खोताने दुखावलेल्या गावकऱ्याकडून त्याचा अपमान होतो. त्याला शिक्षणासाठी गावापासून दूर पाठविण्याचा निर्णय गोदाताई घेतात. आणि नंतर त्याच मुलाला विद्याभ्यासासाठी काशीला पाठवतात. त्यावेळी लाखेश्री करेल असं पुण्यातील एका मुलीचं स्थळ नाकारतात. नाना खोत चिडतो. पण गोदाताई ऐकत नाहीत. तुंबाडच्या वाड्याला मरणकळा येते. वैभव लयाला गेलेले असते. आणि मग विद्याभ्यास संपवून गणेश परततो तो गणेशशास्त्री होऊन. तेजस्वी आणि विद्वान वैद्य होऊन परतलेल्या गणेशशास्त्रींना बघून तुंबाड थरारतं. नाना खोत गोदावहिनीचे पाय पकडून माफी मागतो. गोदाताई आपल्या आनंदाचं प्रदर्शन मांडत नाहीत. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.

गणेशशास्त्रींनी गुरूजवळ शपथ घेतलेली असते की विद्या वापरून अर्थार्जन करणार नाही. पण त्यांच्या हाताला प्रचंड गुण असतो. धन्वंतरीच जणू. पंचक्रोशीतून त्यांच्याकडे रोगी येतात आणि निरिच्छ भावनेने गणेशशास्त्री त्यांचे रोगनिदान करतात. लोक मोबदला देऊ करतात तर तो नाकारतात. खोत घराण्याचा लौकिक वाढू लागतो. गणेशशास्त्रींच लग्न ठरतं. उपकृत गाव लग्नाचा सोहळा दिमाखात साजरा करतं. लग्नानंतर रोगी शास्त्र्यांच्या पत्नीकडे रोगनिदानाच्या कृतज्ञतेने भेटी देऊ लागतं आणि ती त्या भेटी शास्त्रीबुवांच्या नकळत स्वीकारू लागते. आता तो शिरस्ता होतो. वाड्याची भरभराट होऊ लागते.

शास्त्र्यांना चार मुलं आणि एक मुलगी. पहिला जनापा. तो खैराचं झाड निघतो. नोकरांच्या संगतीत लागतो. शास्त्र्यांची विद्या घेणं त्याच्या कुवतीबाहेरचं असतं. गड्यांच्या सवयी उचलतो आणि आयुष्यभर शेतात राबतो. नंतर जुळे चिमापा आणि भिकापा. वडिलांच्या विद्येला तेही ग्रहण करू शकत नाहीत. तालुक्याला दुसऱ्याच्या दुकानात काम करतात. त्याच्याकडून व्यापार शिकतात शेवटी तालुक्याला वखार काढतात. चौथा बजापा. आडदांड आणि लहरी. बापाचा एकही गुण न उचललेला, शिकार आणि मित्र हेच शौक असलेला. बाकी सगळे खोत बाईबाजी करणारे पण बजापा मात्र त्या बाबतीत अगदीच निरस. आणि पाचवी ताई. हिने रूप आपल्या आजीचं घेतलेलं असतं. आणि हुशारी बापाची. तिचं लग्न मोठ्या थाटात होतं.

आपली बायको रोग्यांकडून पैसे घेते हे कळताच गणेशशास्त्री हाय खातात. गुरूने दिलेल्या व्रताचा भंग झाल्याने ते बिथरतात. अचानक उद्भवलेल्या असाध्य आजाराने गणेशशास्त्र्यांचं देहावसान होतं. काही वर्षातच ताईचा नवरा परागंदा होतो आणि ती वाड्यावर परतते. शास्त्र्यांच्या बायकोने माहेरी व्याजाने लावण्यासाठी दिलेले पैसे परत देण्यास तिच्या माहेरचे नकार देतात. पैसे घेतले हे वाक्य येताच कानावर हात ठेवतात. शास्त्री देवाघरी. मोठा मुलगा अजून नाकर्ता. नंतरचे तीन अजून नशीब चाचपडणारे. मुलगी परत आलेली. माहेरी दिलेलं धन गायब झालेलं. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.

इथे शामळू नाना खोताच्या मुलाने, मधू खोताने लिंबाडला सावरलं असतं. तुंबाडात जातपात आणि कडक सोवळं, मात्र लिंबाडात जातभेदाची धार बोथटलेली. तुंबाडात इतर जातींची पानं आडवी मांडलेली, लिंबाडात मात्र ती ब्राह्मणांबरोबर सरळ रेषेत. मधू खोताला मुलगा होतो. त्याचं नाव नृसिंह किंवा नरसू खोत. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, हुशार डोक्याचा, व्यापारी आणि वृत्तीने रसिक. त्याची आणि बजापाची दोस्ती घट्ट होत जाते. ती दोस्ती जुळ्या चिमापा आणि भिकापाला सलू लागते. पण बजापा नरसूचा आधार सोडत नाही. नरसूच्या बायकोच्या नात्यातल्या मुलीशी बजापाचं लग्न होतं. जुळे नरसूला पाण्यात पाहू लागतात. त्यांना वाटतं बजापाला हाताशी घेऊन नरसू त्यांना बुडवणार. ते नरसूच्या खोड्या काढू लागतात. नरसू बजापाला मुंबईला घेऊन जातो. तिथे त्याची भेट जुलालीशी होते. म्हटलं तर नायकीण पण कुणाला जवळ येऊ न देणारी. कुणाला बोलूही न देणारी जुलाली बजापावर भाळते. आणि बायकांच्या नादाला न लागणारा बजापा तिच्याजवळ जातो. पंधरा दिवस मुंबईला तिच्याजवळ नंतर पुन्हा तुंबाडला असा त्याचा दिनक्रम सुरु होतो. तिच्या पैशातून तुंबाडला उर्जितावस्था येते. वाड्याचे दिवस फिरू लागलेले असतात.

जनपाला मुलगा होतो. त्याचे नाव विश्राम. आजोबांसारखा देखणा आणि कुशाग्रबुद्धी. पण जनापा त्याला बापाचं प्रेम देऊ शकत नाही. जनापाच्या बायकोचं चिमापाबरोबर प्रकरण चालू असतं. शेवटी तिला वेड लागतं आणि ती विवस्त्रावस्थेत खाडीत उडी टाकून जीव देते. जनापा घरात अजून अबोल होतो. विश्राम ताईशी बोलत राहतो. तिच्याबरोबर केसरी वाचतो. क्रांतिकारकांच्या गोष्टी ऐकून भारावून जातो. वडिलांबद्दल त्याच्या मनात अढी असते. एक दिवस चिमापाकडून गुरासारखा मार खातो. आणि मग त्याचे अन्नपाणी तोडले जाते. मार खाताना तो तोंडातून अक्षरही काढत नाही. स्वतःहून अन्नपाणी मागतही नाही. शेवटी चुलता चिमापा माघार घेतो. विश्राम जेवतो पण लवकरच घर देशकार्यासाठी घर सोडतो. क्रांतिकारक होतो. त्याच्या मागावर असलेले पोलीस वाड्यावर येऊन जुळ्यांना बडवतात.

बजापा तालुक्याला नवीन वाडा बांधणार असतो. मोरयाच्या वाड्यासारखा पण त्याहून छोटा. पण त्याआधी त्याची बायको होरेत (दलदलीत) उडी टाकून जीव देते. त्याचे कारण जरी वेगळे असले तरी बजापाला आणि गावाला वाटते की जुलाली प्रकरणामुळे तिने जीव दिला. त्या वाड्यावरून बजापाचं मन उडतं. अर्धवट बांधलेला वाडा तसाच सोडून तो मुंबईला जातो. त्याचा मुलगा विठ्ठल त्याच्याशी कुठलीच आपुलकी दाखवत नाही आणि मग बजापा मुंबईला तर विठ्ठल ताईजवळ तुंबाडला राहतो. पण त्याला आदर वाटतो तो लिंबाडच्या नरसूबद्दल.

मग तुंबाडला शाळा काढली जाते. त्यात मराठा ब्राह्मण वाद येतो. देणगीदार फसवतात. नरसू सगळं निभावून नेतो. चिमापाला शाळेचा चेअरमन करतो. शाळेसाठी जिवाचं रान करतो. देहाडरायांसारखा टिळकभक्त शाळेचा हेडमास्तर होतो. पण बापू वकिलांच्या संगतीने नरसू काँग्रेसमध्ये शिरतो. त्याला गांधी कळत नाहीत पण गांधींचं ऐकावंसं वाटतं. तो सत्याग्रहात भाग घेतो. तुरुंगात जाऊन येतो. पुणे करारामुळे त्याला गांधी अनाकलनीय होतो. पण काँग्रेसच देशाचं भलं करेल असं वाटत असल्यामुळे तो काँग्रेसमध्येच रहातो. तुरुंगवासामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते. चिमापा जळफळतो. तो बांडेरामाच्या देवळाचा पंच झालेला असतो. नरसूला विरोध म्हणून तो टिळकपंथी होतो. शतचंडीचा यज्ञ करतो. त्यात बांडेरामाच्या आवाराजवळील एका दर्ग्याचे प्रकरण घडते. आणि ज्या मुलीवर आपलं मन बसलेलं होतं तिला चिमापाने ठेवून घेतली म्हणून बिथरलेला खान वकील दर्ग्याच्या प्रकरणात तेल ओततो. गावात हिंदू मुसलमान दंगल घडते.

नरसूची पहिली दोन मुले अनाकलनीय आजाराने लहानपणीच मरतात. जुळे सोडून तुंबाड आणि लिंबाड नरसूसाठी हळहळतं. तिसऱ्या मुलाच्या वेळी बजापा आणि जुलालीच्या हट्टाने नरसू मुंबईला डॉक्टरांकडे जातो आणि हा तिसरा मुलगा वाचतो. पुढे हाच मुलगा मुंबईला डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला जातो. नापास होत राहतो आणि परीक्षा देत राहतो. आणि एक दिवस नरसूच्या दृष्टीने क्षुल्लक असलेल्या कारणासाठी तो धर्मांतर करतो. नरसूला धक्का बसतो. पण तो धक्का नरसू पचवतो. मुलाला विसरतो. धाकट्या मुलावर लक्ष देतो.

बापू वकील, वकिली सोडतात. गावात खादी आणतात. नरसू त्यात भाग घेतो. मग बापू वकील मैला साफ करू लागतात. नरसू त्यात भाग घेत नाही. आंतरजातीय विवाह करून देऊ लागतात. नरसूला ते कळत नाही. पण तो त्याला विरोधही करत नाही. महायुद्ध चालू होतं. नरसूला हिटलर आवडू लागतो. तो देहाडरायांशी त्याबद्दल बोलतो. टिळकभक्त असलेले देहाडरायांनी माईन काम्फ वाचलेलं असतं. हिटलरबद्दल ते नरसूला जे सांगतात ते ऐकून नरसू अजून गोंधळतो. न पटणारा गांधीच आपल्या कामाचा आहे असं त्याला वाटू लागतं. त्या एकट्या माणसाच्या जोरावर अख्खा भारत ढवळला जात आहे हे त्याला दिसतं. इतरांप्रमाणे गांधींची धरसोड वृत्ती त्याला पटत नाही. सर्वांप्रमाणे अहिंसा त्याला मूर्खपणा वाटतो. आंदोलन सुरु केल्यावर मध्येच मागे घेणाऱ्या गांधींबद्दल, 'बेभरवशाचे नेतृत्व' हेच त्याचे मत असते. पण भारतातील सर्व जातीधर्माच्या सर्व नेत्यांना मान्य नसूनही बहुसंख्य जनतेला पटणारा गांधींशिवायदुसरा कुठला नेता नाही हे त्याला पटलेले असते. नरसू काँग्रेस सोडत नाही. मनात नसताना दारूबंदी कार्यक्रमात भाग घेतो.

हिंदू मुस्लिम दंग्यात मर्दुमकी गाजवलेल्या भंडारी जातीच्या संताजीवर चिमापाच्या मुलीचं मन बसतं. तो सावरकरवादी असतो. गांधींना मानणाऱ्या नरसूला विरोध म्हणून चिमापा सावरकरवादी होतो. पण मुलगी भंडाऱ्याबरोबर जाईल हे कळताच बिथरतो. त्यात पुन्हा संताजी नरसूचा मानसपुत्र असतो. मुलीचं लग्न दुसरीकडे करून दिलं जातं. पण सर्व काही सुरळीत होत असताना तिथे गडबड होते. मुलगी परत येते. सासरकडून पुन्हा बोलावणं आल्यावर सासऱ्याला आणि नवऱ्याला जे प्रश्न विचारते ते जणू द्रौपदीने वस्त्रहरणप्रसंगी कुरुसभेला विचारलेल्या प्रश्नांच्या तोडीचे असतात. आणि मग पाच पतींबरोबर संसार करणाऱ्या द्रौपदीप्रमाणे पहिला नवरा हयात असताना घटस्फोट न घेताच संताजींबरोबर संसार करू लागते.

स्वातंत्र्य मिळते. पन्नास कोटीचा चेक पाकिस्तानकडे जातो. नौखालीत दंगली होतात. बातम्या येत असतात. लोकांना गांधी नकोसा होतो. त्यांचा उल्लेख आता 'म्हातारा' असा होऊ लागलेला असतो. गांधींनी उपोषण करावे आणि त्यात ते मरावेत अशी अनेकांची इच्छा असते. संतू, नरसू आणि खान वकिलावर चिडलेला चिमापा गांधींवर गोळ्या झाडायची भाषा करत असतो. नेमकी गांधींवर गोळी झाडली जाते तेव्हा तो मुंबईला असतो आणि नंतरच्या दंगलीत अडकतो. गावी बातमी पसरते की चिमापा सावरकरवादी आणि गोळ्या झाडायची गोष्ट करणारा म्हणजे तो मारेकऱ्याला सामील आहे. मारेकरी ब्राह्मण आहे हे कळल्यावर उसळलेल्या ब्राह्मण द्वेषात तुंबाड आणि लिंबाडची वाताहात होते. श्री ना पेंडसेंच्या तुंबाडचे खोत या महाकादंबरीची ही थोडक्यात रूपरेषा.
____