Sunday, October 30, 2016

मैत्रीण जेंव्हा फोटो मागते

घरी बसलो होतो. सर्दीने बेजार झालो होतो. माझं हे असं नेहमी होतं. लहानपणी, परीक्षा असली की ताप यायचा, पोट बिघडायचे. आताशा सुट्टी आली की असं सगळं होतं. अजून चार दिवस फटाक्यांच्या धुराला तोंड द्यायचं आहे या विचाराने मी गांगरलो होतो. हिने नाकाला, कपाळाला भरपूर व्हिक्स लावून दिलं होतं. (यात प्रेम किती आणि आजारी पडल्याचा राग किती ते मला जाणवत होतं). मग शॉपिंगला ती एकटीच माझं क्रेडिट कार्ड घेऊन गेली. तिने केलेल्या शॉपिंगच्या किमतीचे मेसेज तत्परतेने मला पाठवून क्रेडिट कार्ड वाले, "आगीतून फुफाट्यात", "आसमान से गिरे, खजूरमें अटके" वगैरे शब्दप्रयोगांची मला प्रत्यक्ष अनुभूती देत होते. व्हिक्समुळे डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. अश्यावेळी पुस्तक वाचन शक्य नव्हतं. झोपही येत नव्हती. शेवटी फोन उचलला. व्हॉट्स ऍपवर येणारे मेसेज आणि फेसबुकवर येणाऱ्या पोस्ट्स आलटून पालटून पाहत बसलो.
मुलामुलींच्या एकत्र गृपवर काही नेहमीचे पोस्टमन; पणती, माती, येती, वाती, नाती अशी यमके जुळवून अंगावर फेकत होते. घरातील कंदिलाचे फोटो टाकून त्यावर मुलींच्या "कित्ती छान" टाईप कमेंटवर गोबरे गाल फुगवून गुलाबी झाले आहेत असे दाखवणाऱ्या स्मायली टाकत होते. वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं महत्व सांगणारी माहिती फॉरवर्ड करत होते. तर हेच लोक फक्त मुलांच्या गृपवर, कंदिलासकट एखादी कमनीय देहाची मदनमंजिरी आव्हानात्मक मुद्रेत उभी असलेले किंवा "उठा उठा दिवाळी आली, शेजारीण रांगोळी काढायची वेळ झाली" किंवा "भाऊबीज मला आवडते कारण तेंव्हा जुनी मैत्रीण माहेरी येते" असे मेसेज सचित्ररूपात पाठवून; मानवी मन किती वेगवेगळ्या पातळींवर एकाच वेळी काम करू शकते त्याची प्रचिती देत होते.
इकडे फेसबुकवर स्वतःची भिंत चालवायला काहींनी ज्ञानदेवांना वेठीशी धरून त्यांना अविवेकाची काजळी काढायला लावले होते. काही जण नेहमीप्रमाणे फेसबुकवरून निवृत्ती जाहीर करत होते. त्यांचे मित्र, वनवासी निघालेल्या प्रभू रामचंद्रांना निरोप द्यायला शरयूतीरी उभ्या असलेल्या अयोध्यावासीयांच्या अविर्भावात त्यांना साश्रू नयनांनी निरोप देत होते. बायका फराळाचे फोटो टाकत होत्या. त्याखालच्या स्त्रियांच्या कमेंटमध्ये मला उगाच, "चकली काळपटली आहे, लाडू माणसांसाठी आहेत की उंदरांसाठी?, वगैरे" असे उद्गार ऐकू येत होते. तर पुरुषांच्या कमेंट वाचून, "अशीच आमची बायको असती, वदले सर्वपती" ही भावना जाणवत होती. दिवाळी अंकात लेखन छापून आलेले काही लेखक आपल्या अंकाची हिरीरीने जाहिरात करत होते आणि संपादकाच्या डिजिटल मीठाला जागत होते. असं सगळं कुणाचं काय काय कुठे कुठे छापून येताना पाहून, आपण एका ठिकाणी लेख देऊन तो त्यांनी छापला तर नाहीच पण त्याची काय विल्हेवाट लावली ते पण सांगितले नाही हे आठवून माझं नाक अजूनच चोंदून गेलं. अश्या सगळ्या नीरस वातावरणात माझ्या फोनने "टिंग" असा आवाज केला. आणि फोनच्या स्क्रीनवर एक फोटो एका गोलात तरंगू लागला.
फेसबुक मेसेंजर हे ऍप मी घेऊन ठेवलंय हे माझ्या मित्रांना माहिती असूनही ते दुर्लक्ष करतात. आणि मग ते दुर्लक्ष करतात म्हणून मग मी पण दुर्लक्ष करतो. मैत्रिणींची गोष्टच निराळी. माझ्यापेक्षा वयाने केवळ एखाद दोन महिने लहान असलेल्या मुलींना मी काका वाटतो, समवयस्क ललनांना मी कुठलेही काम ज्याला हक्काने सांगावे असा भाऊराया वाटतो आणि माझ्या वयापेक्षा मोठ्या स्त्रियांना मी श्यामची आईमधला श्याम वाटतो. त्यामुळे मैत्रिणींशी सगळे संवाद भिंतीवर साधून मी इनबॉक्सची झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली होती. त्याशिवाय, कुणाला मेसेज पाठवताना "जेवलात का?" असले प्रश्न पाठवायचे नाही इतके मला आता कळू लागले आहे, पण कुठले प्रश्न पाठवायचे ते मात्र कळत नाही. त्यामुळे झुक्याने दिलेला मेसेंजर, त्यातील स्टिकर्स, वेगवेगळे स्मायली, सगळे सगळे न वापरता, कोऱ्या करकरीत रूपात तसेच पडून होते. आणि आज मी घरात एकटा असताना फोनच्या स्क्रीनवर गोल तरंगू लागला. आणि त्यात गॉगल डोक्यावर ठेवलेली एक ललना सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहात होती. त्याक्षणी कुठला मॉडेल कोऑर्डिनेटर तिथे असता तर “मनमे लड्डू फूटा”च्या जाहिरातीसाठी त्याने मला आजीवन करारबद्ध करून घेतले असते.
पहिल्यांदा बाबा बनलेल्या अननुभवी बापाने लहान बाळाला हातात धरावे तश्या काळजीने फोनला अलगदपणे हातात धरले. हलक्या हाताने त्याला गादीवर ठेवले. एक दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला. चोंदलेल्या नाकाने तो हाणून पाडला. चष्मा काढून ठेवला, साबणाने तोंड धुतले, पावडर लावली. काजळ सापडेना म्हणून ते लावायचा विचार सोडला. शर्ट बदलला, केसावरून कंगवा फिरवला, चष्म्याच्या काचा पुसून तो पुन्हा नाकावर ठेवला आणि मग गादीवर ठेवलेल्या फोनसमोर पोटावर झोपत, दोन्ही हात कोपरात दुमडून हनुवटीखाली ठेवून फोनकडे मन भरून पाहत शेवटी थरथरत्या हाताने त्या गोलावर टिचकी मारली.
"मला तुमचा फोटो मिळेल काय ?" असा मेसेज वाचून माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मनात पार्श्वसंगीताला "आली माझ्या घरी ही दिवाळी" हे गाणं वाजू लागलं. "भगवान के घर देर है अंधेर नही है।" या वाक्यावर मला एकदम विश्वास ठेवावासा वाटू लागला. नास्तिक होऊन आपण काही चूक तर केली नाही ना? अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. चाळीशीत पुरुषाचे व्यक्तिमत्व खुलते हे ऐकून होतो आणि आता ते खरे असावे असे वाटू लागले. वर्षानुवर्षे बेडूक बनून राहिलेल्या राजकुमाराला मूळ रूपात परत आल्यावर काय वाटू शकेल त्याचा प्रत्यय आला.
हो हो हो... का नाही मिळणार? तुम्ही म्हणाल तर फोटोच काय मी पोस्टर पाठवतो, त्यापेक्षा मी स्वतःच येतो. अशी सगळी उत्तरे मनात आली होती. पण एकदम मनातील सावध सज्जन जागा झाला आणि मी फक्त "???" एव्हढाच रिप्लाय पाठवला.
नंतरचा अर्धा तास शांततेत गेला. स्क्रीनकडे एकटक पाहून डोळे शिणू लागले. नवीन शर्टाची इस्त्री उतरू लागली. राजकुमार पुन्हा बेडकात परिवर्तीत होऊ लागला. मी गादीवरून उठून इकडे तिकडे येरझाऱ्या मारू लागलो. आणि हा मेसेज चुकून आपल्याकडे आलाय याची खात्री पटत असताना, पुन्हा टिंग असा आवाज झाला. मी चाळिशीतल्या चित्त्याला लाजवेल अश्या चपळाईने गादीवर झेप घेतली. तरंगणाऱ्या गोलावर टिचकी मारली. उत्तर आले होते.
"तुमचा फोटो आणि थोडक्यात माहिती द्या, एका मासिकात द्यायची आहे. मागे तुम्ही मला एक मराठी भाषांतर करायला मदत केली होती. त्यात तुमचा ऋणनिर्देश करायचा आहे."
आणि माझ्या डोक्यात लखकन प्रकाश पडला. एक - दोन आठवड्यापूर्वी ह्या हुशार मुलीच्या भिंतीवर मी प्रतिसाद देताना या तरुणीने मला एका परिच्छेदाचे भाषांतर करून द्याल का ? असे विचारले होते. त्यावर त्याचवेळी मी मराठी भाषांतर करून दिलेही होते. पण नंतर तो सारा प्रसंग विसरून गेलो होतो. आणि आता तिचा हा निगर्वीपणा बघून मी विरघळून गेलो. लगेच दिलं तर प्रशस्त दिसणार नाही, म्हणून मी "आता प्रवासात आहे, रात्री घरी आल्यावर देतो", असा प्रतिसाद दिला आणि अंगठा दाखवला. लागलीच समोरून अंगठा आला.
मग मी स्वतःची माहिती काय द्यायची त्या विचारात पडलो. नोकरी शोधण्याचे दिवस जाऊन आता १६ वर्षे होऊन गेली होती. त्यामुळे "Tell me something about yourself" सारखे प्रश्न कसे हाताळायचे ते विसरलो होतो. पण इथे मागे हटून चालणार नव्हते. "उंची अमूक अमूक. वजन तमूक तमूक. गहू वर्ण. मध्यम बांधा" अशी वाक्ये डोक्यात लागली. आणि हे जुन्या काळी दूरदर्शनवर चालणाऱ्या "आपण यांना पाहिलंत का?" या हरवलेल्या व्यक्तींची माहिती देण्याऱ्या कार्यक्रमासारखं आहे असं वाटू लागलं. मग मी ते वर्णन सोडलं.
"लग्नाला अमूक एक वर्षे झाली आहेत... दोन मुलांचा बाप आहे... स्वतःचे घर आहे .. हफ्ते फेडणे चालू आहे... बऱ्यापैकी कमावतो." वगैरे माहिती डोक्यात आली पण ती जर माझ्या सती सावित्रीने वाचली तर आपला सत्यवान, शादी डॉट कॉम वर बिजवराच्या विभागात जाहिरात देतोय असे वाटून तिने स्वतःच यमदूताचे रूप घेऊन सत्यवान सावित्रीची आधुनिक कथा रचली असती. म्हणून मी ही माहिती देण्याचे निग्रहाने टाळले.
मग शिक्षण, व्यवसाय, आवड याबद्दल लिहावेसे वाटले. तर लक्षात आले आपल्या आवडीनिवडी फारच कमी आहेत. खायला, झोपायला, वाचायला आणि चित्रपट बघायला आवडते. आपल्याला क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कुस्ती, ज्युडो कराटे, पोहणे असे मैदानी किंवा बुद्धिबळ, कॅरम यासारखे बैठे खेळ देखील नीट खेळता येत नाहीत. गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग यासारखे खेळ तर नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी वगैरे चॅनेलचे पगारी लोक त्यांचं चॅनेल चालावं म्हणून खेळून दाखवतात असं आपलं मत आहे. या सगळ्या गोष्टी आठवून खजील झाल्यासारखं झालं. एकाएकी मला स्वयंवराला आलेल्या आणि शिवधनुष्य न पेलल्यामुळे ते छातीवर पडलेल्या रावणाच्या मनस्थितीची कल्पना आली.
शेवटी फक्त मुद्दे द्यायचे ठरवले. तीन मुद्दे बरे वाटले. शिक्षण सी ए, व्यवसाय शिक्षक, वाचनाचा छंद आणि लेक्चर देणे ही आवड इतके सांगून बाकी तुला काय वाटेल ते तू लिही असं सांगूया असे ठरवले आणि शांत झालो.
मग फोटो शोधायच्या मागे लागलो. माझ्या मोबाईलमध्ये सगळे फोटो हिचे आणि मुलांचे, माझे फोटोच नाहीत हे तेंव्हा प्रथम कळले. जे होते त्यात मी सर्वात शेवटच्या रांगेतील डावीकडून अठरावा, अश्या स्वरूपाचे होते. मग घरात अल्बम शोधू लागलो. कुठे मी मुलांसोबत होतो, तर कुठे हिच्यासोबत, तर कुठे भावासोबत तर कुठे आई वडलांसोबत. आधार कार्ड, ड्रायविंग लायसेन्स, पॅन कार्ड, घराच्या ऍग्रीमेंटमधला शेवटच्या पानावरचा फोटो आणि पासपोर्ट याशिवाय माझा एकट्याचा फोटो नाही, ही जाणीव धक्कादायक होती. शेवटी एक फोटो सापडला. कृष्णधवल. पोटावर झोपलेला. अंगठा तोंडात घालून चोखणारा आणि फोटो स्टुडिओच्या नवीन वातावरणात बाचकलेला मी सहा महिन्याचा असताना काढलेला फोटो हाच माझा एकट्याचा एकुलता एक फोटो होता. आणि तो पाठवणे म्हणजे रुबाबदार गृहस्थाऐवजी ऐवजी बाळसे धरलेले बाळ अशी ओळख झाली असती. म्हणून शेवटी गृप फोटोतील त्यातल्या त्यात बऱ्या फोटोला कापून कुपून पाठवायचे माझ्या मनाने घेतले. मग पुन्हा एकदा फोटो शोधणे सुरु केले. एक फोटो बरा वाटला त्याला कापून ठेवला. आणि रात्रीची वाट पाहात बसलो.



रात्री जेवण झाल्यावर घरची सगळी मंडळी झोपल्यावर, मेसेंजर उघडले. माहितीचा संदेश दिला. फोटो पाठवला. आणि तुम्ही इतक्या चांगल्या आहात की आजकालच्या आपमतलबी जगात देखील श्रेय देत आहात. अशी माणसे विरळा. वगैरे दोन चार वाक्ये लिहून फोन ठेवून झोपायला जाणार इतक्यात पुन्हा टिंग वाजले. पुन्हा गॉगल डोक्यावर ठेवलेली स्त्री गोलात तरंगत होती. मेसेज आला होता.
"मी कधी कुणाचं श्रेय लाटत नाही. ज्याचं त्याला दिलं की नंतर कटकट कमी होते. काम किती का फडतूस असेना मी श्रेय देऊन टाकते. दोन फायदे होतात. नंतर वटवट ऐकावी लागत नाही. आणि काम सुमार दर्जाचं असेल तर त्याचा आळ माझ्यावर येत नाही."
मी बरं म्हणालो. एक हसण्याची स्मायली टाकली आणि फोन बंद केला. तुम्ही फार स्पष्टवक्त्यादेखील आहात असे म्हणावेसे वाटले होते पण मी स्पष्टवक्ता नसल्याने काहीही न म्हणता झोपायला गेलो. माझी सावित्री अर्धवट जागी होती. कुणाचा मेसेज आला होता, वगैरे विचारू लागली. तर मी एका कुशीवर वळत म्हणालो झुक्याचा मेसेज आला होता. म्हणत होता, “मोरे सर, खेळत जा. अजून छंद वाढवा. घराबाहेर पडा. एकट्याचे फोटो काढत जा.” ती झोपेतंच हसली. आणि मग मी पण हसलो.

Saturday, October 29, 2016

दिवाळीतल्या किल्ल्यांचा गाळीव इतिहास


जुन्या काळी असे नव्हते. तेंव्हा लोक, बांधायचे असले तर सरळ मोठे किल्ले बांधत. ज्यांना ते बांधता येत नसत, ते इतरांच्या किल्ल्यांवर घोरपड वगैरे लावून ते ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत. घोरपड म्हातारी झाली किंवा नवीन घोरपडीची पकड घट्ट बसत नसली की ते किल्ल्याच्या पायथ्याशी वेढा देऊन बसत. वेढा द्यायला सोपे जावे म्हणून किल्ले डोंगरात बांधले जात. त्यामुळे वेढा देता देता, गिर्यारोहण, नदी ओलांडणे, शिकार करणे, वासुदेव - कडकलक्ष्मी - फकीर वगैरे बनून बहुरुप्याचे सोंग आणणे, चिंचोक्याने चौकट खेळणे, मशाली लावून रात्री जंगलात हाकारे घालत फिरणे, असे मनोरंजनाचे खेळ वेढा घालणाऱ्या सैनिकांना खेळता येत असत आणि त्यांचा वेळ चांगला जात असे. यातील रात्रीच्या मशालींच्या खेळामुळे त्या काळी देखील 'रात्रीस खेळ चाले" हा फार लोकप्रिय प्रकार होता. आणि यात देखील शेवटी काय घडेल त्याचा पत्ता शेवटपर्यंत लागत नसे.
गडावरील लोक तटबंदीवर बसून खाली जंगलातील मशाली आणि त्यांच्या सावल्या बघून "पाचोळा सैरा वैरा, वारा पिसाट वाहे"1 असे म्हणू लागले की मशाली घेऊन खाली नाचणारे वेढेकरी आकाशाकडे बघून "रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा"2 असे म्हणून त्यांना प्रत्युत्तर देत. कधी कधी तर गाण्याच्या भेंड्यांचा हा खेळ देखील रात्रभर चालत राही. मंगळवारी जे लोक गाणी म्हणत त्यांचे आवाज गोड आणि भरदार होते. म्हणून मंगळवारच्या रात्री या भेंड्यांना बाया बापड्या पण ऐकायला येत. सुरात गाणाऱ्या या वेढेकऱ्यांना मग मंगळवेढेकर हे नाव पडले. यांच्या वंशातील एकाने गाणे सोडून पुढे लेखणी हातात धरली. आणि बालमनावर राज्य केले म्हणून त्याचे पाळण्यातले नाव विसरून जाऊन लोक पुढे त्याला राजा मंगळवेढेकर म्हणू लागले.
हे विषयांतर बाजूला ठेवूया. यासाठी (म्हणजे किल्ले बांधणे आणि त्याला वेढे घालण्यासाठी) लोक दिवाळी वगैरेचा मुहूर्त धरत नसत. आला कंटाळा की घाल वेढा. झाली घोरपड मोठी की घाल वेढा. वाटलं कडकलक्ष्मी व्हावंसं की घाल वेढा. असा सगळा प्रकार होता. त्यामुळे मुलांना किल्ले बांधणे यात काही फार नवलाई वाटत नव्हती.
शिवाय शिवाजी महाराज, मावळे प्रत्यक्ष जिवंत असल्याने त्यांच्या मूर्त्या (मूर्तीचे अनेकवचन मूर्त्या केल्याने शाळेत फटका खाल्ला होता.(त्यावेळी जिला भगिनी मानायला माझे बालमन तयार नव्हते अशी एकजण जरा जास्तच जोरात हसली होती. म्हणून मी तिला कधी माझ्या मनीचे गूज सांगितलेच नव्हते.) त्या फटक्याचा प्रतिहल्ला करणे तेंव्हा शक्य नव्हते. म्हणून आजही जेंव्हा कुठे मिळेल तिथे "मूर्त्या" शब्द लिहून त्या फटक्याचा निषेध करतो.) मुंबईच्या बाजारात आलेल्या नव्हत्या.
मटकी, मोहरी, गहू वगैरे धान्ये शेतात मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने त्यांना पुन्हा अंगणात लावल्यास आया (आईचे अनेकवचन. याची पण तशीच कथा आहे.) अंगण सारवतानाचा ओला हात घेऊन तश्याच धपाटा घालीत. त्यामुळे ती रोपे त्याकाळच्या मुलांच्या मनात रुजलीच नाहीत.
शिवाय त्याकाळी सर्व ठिकाणी टाकी किंवा तळी होती. पुष्करणी वगैरे गोष्टी अगदी श्रीमंत लोकांकडेच होत्या. सलाईन वगैरेचा शोध लागायचा बाकी असल्याने आणि कारंजे म्हणजे वाशीम जिल्ह्यातील गावाचे नाव असा शब्दार्थ विकिपीडिया आणि गूगल नकाश्यावर असल्याने त्याकाळच्या मुलांना पाण्याची किमया दाखवण्यात स्वारस्य नव्हते.
माझ्या अंदाजाने जेंव्हा महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्या त्यानंतर हा दिवाळीत किल्ले बांधणीचा प्रकार सुरु झाला असावा. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे मुली शाळेत जायला लागायच्या आधी हे सुरु झालं असावं.
म्हणजे बघा, दिवाळीत शाळेला सुट्ट्या देण्याची प्रथा सुरु झाली. मग मुलं घरी राहून दंगामस्ती करत. जुन्या मराठीत यास "कल्ला करणे" असे म्हणत. कल्ला करताना मुले घरभर धावत. स्वयंपाकघरात देखील येत. तिथे मुली कडबोळ्यांना दात काढून त्यांना चकल्या चकल्या असे चिडवणे, शंकरपाळे करंज्या कापणे, लाडूला बेदाणा लावणे असे काम करीत असत. मुलांचा कल्ला ऐकून त्या इइइ असे ओरडत.
मग यांचा कल्ला आणि त्यांचा इइइ एकत्र होऊन किल्ला तयार झाला. एका घरात सुरु झालं तर मग इतरांनी देखील अजून मोठा कल्ला आणि अजून मोठा इइइ करणे सुरु केले. अश्या प्रकारे महाराष्ट्रदेशी दिवाळीत किल्ला करणे सुरु झाले.

1


2




ऐ दिल है मुश्किल आणि पाकिस्तानी कलाकार

मला वाटतं हा राग पाकिस्तानी कलाकारांपेक्षा करण जोहर वर जास्त आहे. हाच चित्रपट जर एखाद्या सुमार गर्दी खेचू शकणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकाने काढला असता, तर कुणाला इतका त्रास झाला नसता. करण जोहर आपल्या कुठल्याच समीकरणात बसत नाही. तो तद्दन भंपक सिनेमे काढतो तरीही ते चालतात. त्याच्याकडे बाजाराला खेळवण्याची क्षमता आहे. हे त्याच्या इंडस्ट्री मधील अनेकांना देखील खुपत असणारंच. प्रत्येक इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या राजकीय निष्ठा असणारे लोक असतात. जोहरची निष्ठा पैशाशी जास्त आहे. त्याला बिझनेस समजतो. पाकिस्तानी कलाकारांना घेऊन तो मार्केट शेअर वाढवू पाहतो. काही जणांना हे मॉडेल पटत नसावे. काहीजणांना त्यांच्या आता रिलीज होऊ घातलेल्या चित्रपटाला होऊ शकणारी जोहरच्या चित्रपटाची स्पर्धा मोडून काढायची असावी. काहींना जवळ आलेल्या निवडणूका जिंकायच्या असाव्यात. या सर्वांना उरी अटॅक आणि नंतरच्या सर्जिकल स्ट्राईक्सने उत्कलन बिंदूपर्यंत आणलंय.

माझ्या मते बहिष्कार ही वैयक्तिक बाब आहे. माझ्या वडिलांनी संजय दत्तचे कुठलेही सिनेमे बघितले नाहीत. (मी मुन्नाभाई बघितला) त्याचे सिनेमे टीव्हीवर आले आणि आम्ही पाहत बसलो की तोंड फिरवून बसत किंवा बाहेर फिरायला जात. आज जोहरला विरोध करणाऱ्या किती जणांनी दत्तचे सिनेमे न बघता मोडून काढले. त्याचा तर मुंबई बॉम्बस्फोटाला प्रत्यक्ष हातभार होता. मला असे म्हणायचे नाही आहे की दत्तला बहिष्कार नाही केलात म्हणजे तुम्ही इतरांना बहिष्कार करण्याचा हक्क गमावलात. माझे म्हणणे हे आहे, बहिष्कार करावा न करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावरून कुणाला देशप्रेमी किंवा देशद्रोही ठरवू नये.



वरील व्हिडिओत जोहरने मांडलेला  २००-३०० तंत्रज्ञांचा मुद्दा निखालस खोटा आहे. पण अनेक चित्रपटगृहात काम करणाऱ्या लोकांचा मुद्दा (ज्याबद्दल जोहर काही बोलला नाही) मात्र मला महत्वाचा वाटतो.

आणि हो पाकिस्तानी कलाकारांना इथे काम - पैसा - प्रसिद्धी मिळणे यातून पाकिस्तानची चित्रपट सृष्टी आपोआप मरते आणि भारतीय सांस्कृतिक वर्चस्व बाजाराच्या माध्यमातून प्रस्थापित होतं याकडे कुणाचं लक्ष कसं जात नाही त्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. अर्थात भारताकडे करवा चौथ आणि तत्सम चालीरीती सोडल्यास उद्योजकांची विशेष संस्कृती नाही हे मला माहिती आहे. जर आपण आपल्या उत्पादनांना जागतिक दर्जाचे बनवू शकलो आणि त्यांचा वापर आपल्या देशातल्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी करू शकलो, तर ते आपल्या चित्रपटातून दिसू लागेल आणि मग चित्रपटातून ऊर्जा घेणाऱ्या शेजारी राष्ट्रांतून आपल्या उत्पादनांची मागणी वाढेल, ह्या शक्यतेकडे काणाडोळा करू नये.

तूर्तास आपण डॉल्से अँड गब्बाना, गुची, पेप्सी, कोक, मर्सिडीझ आणि ऑडीची जाहिरात करण्यापलीकडे फार काही करू शकत नाही हे मला माहित आहे. पण सच्चा देशभक्त असल्याने, तसे का होईना, पाकिस्तानी चित्रपट उद्योग बंद पडतोय या कल्पनेने मी खुष होतो. अर्थात आपण त्यांना कोपऱ्यात कोंडले तर त्यांच्या मरू घातलेल्या चित्रपट उद्योगाला आपण खतपाणी घालतोय हे कुणाला कळेल का यात मला शंकाच आहे.

बॉब डिलन, नोबेल पुरस्कार, मॉन्टी पायथॉन आणि इंडिविज्युअल्स

एरीक आयडल हा माँटी पायथॉन मधला वादग्रस्त मेंबर होता. माँटी पायथॉनच्या प्रचंड गाजलेल्या "लाईफ ऑफ ब्रायन, Life of Brian" या चित्रपटाचे त्याने नंतर "नॉट द मसाया, ही इज अ व्हेरी नॉटी बॉय. Not the Messiah (He's a Very Naughty Boy)" ह्या नावाने संगितिकेत रूपांतर केले ते पण अनेकांना रुचले नव्हते. एरीक आयडल, माँटी पायथॉन, लाईफ ऑफ ब्रायन बद्दल नंतर कधीतरी लिहीन. पण आज दुसरी एक गंमत सापडली.
परवा बॉब डिलन साहेबांना साहित्याचे नोबेल मिळाले. संगीतक्षेत्रात किती का महान असेना पण त्यांना साहित्याचे नोबेल मिळाले हे अनेकांना रुचले नाही.
आणि मला एरीक आयडलने Not the Messiah (He's a Very Naughty Boy) मध्ये डिलन साहेबांची केलेली नक्कल आठवली. कुणाला हे नोबेल रुचो किंवा न रुचो. कुणाला एरीक आयडल ने चित्रपटाचे संगितिकेत केलेलं रूपांतर रुचो न रुचो. हे गाणं मात्र फक्कड आहे. या नोबेल बाबतीत. आणि इतर सगळ्या परिस्थितीत, जिथे आपण इतरांच्या मताने , मेंढरासारखे जातो, जिथे आपण स्वतःचा विचार करायला विसरतो,तिथे हे गाणं बरोबर बसतं. गाण्याचं नाव आहे
"Individuals."
आणि हो गाण्याचा शेवट चुकवू नका. माँटी पायथॉनच्या परंपरेला आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीतून जन्मलेल्या तिरक्या विनोदबुद्धीला अनुसरून माणसांच्या मेंढरासारख्या प्रवुत्तीवर अतिशय मार्मिक टीका करणारा शेवट केला आहे.
Here, Brian, let me help you out with this.
They're just not getting this, okay?
Better.
Hey, listen, people, listen to me
This is what he's trying to say
Each of you must
Make up your own minds
Have your different point of view
Some people have
And some will have
But time has got you by the balls
But you must to your own selves
Be true
For you're all individuals
You don't know how bad
Your fate can get
Then one day you find
You're played by Cate Blanchett
So l'll take your hand
Make up your mind
Choose a healthy point of view
Don't follow leaders
Or parking meters
They tell you all what you must do
Well, some people preach you
Others will teach you
They don't know what l can do
You must to your own selves
Be true
'Cause you're all individuals
इतकं सगळं ऐकून देखील शेवटी कोरस म्हणतो
Yes, we'll do whatever you say
Because we're....
ऐका हे गाणं