Thursday, January 7, 2016

सुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ५)

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
--------------------------------------
मुन्नाभाई पिक्चर मुळे आपल्या शरीरात २०६ हाडे असतात हे कळले होते पण आपल्या शरीरातील स्नायूंची संख्या माहिती नव्हती. पण तिसऱ्या दिवसा नंतरच्या रात्री असतील नसतील त्या स्नायूंनी बंड केले. जाग झोप जाग झोप चालू होती. सकाळी हिने पण हळूच विचारले, "अहो, जाताय की झोपताय?" मोठा मुलगा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, "बाबा, उठ ! अरे जायचं ना तुला". त्याच्या मागे धाकटा पण झोपाळलेले डोळे चोळत उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागसपणाकडे बघून मी अंग सावरत, स्नायू आवरत उठलो. वॉचमन केबिनमधल्या रेडीओवर माउलींची रचना लागली होती.
जंववरी रे तंववरी, जंबूक करी गर्जना
तव त्या पंचानना, देखिले नाही रे बाप ।।
माउलींनी लवकर समाधीच नव्हे तर जन्मही लवकर घेतला असे वाटले. आज असते ज्ञानोबा तर नक्की एक चरण वाढवला असता, या रचनेमध्ये.
जंववरी रे तंववरी, जिम जाण्याच्या वल्गना
तव स्नायुदुखीचा ताप, देखिला नाही बाप ।।
शशी कपूरला सावरलं, वासराला वेसण घातली, जपानी माणसाला सरळ केलं आणि तयारी करून कसाबसा निघालो. जिम मधल्या सहाय्यकाला माझ्यासारख्या हौश्या गवश्यांची सवय असावी. मी काहीही न बोलता, माझ्या चेहऱ्यावरून जे काही समजायचे ते तो समजला. त्याने ट्रेड मिलकडे बोट दाखवलं. मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले. आणि ट्रेड मिलकडे मोर्चा वळवला.
मी आरशा समोरच्या ट्रेड मिलवर सराईतपणे चालू लागलो. आज काही गाणी गिणी नव्हती. हसण्या खिदळण्याचे आवाज नव्हते. सतत जिम करून पिळदार शरीरयष्टी कमवलेले सराईत लोक अजून आले नव्हते. ललना तर नव्हत्याच. माझ्या तीन दिवसांच्या उपद्व्यापाने, मी जिमचा बिझनेस कमी केला की काय? अशी पुसटशी शंका मनाला चाटून गेली. माझा स्वभावाच तसा आहे. एकदा कुणाला आपले मानले की एकदम काळजी घेणारा. इथे तर मी जिमला पैसे भरून आपले मानले होते. म्हणून मी महिलावर्गाबद्दल चौकशी करतोय असे वाटू नये याची काळजी घेत, सहाय्यकाला कमी गर्दीचे कारण विचारले. तो म्हणाला, "शनिवारी लोक कमी येतात. बायका तर अजूनच कमी". माझा जीव भांड्यात पडला.
ए सी ची थंड हवा अंगावर येत होती. खालच्या पळत्या भुईने वेग पकडला होता. अंग दुखतंच होते. आपण वर्षभराचे पैसे भरून मूर्खपणा केलाय असे वाटू लागले होते. मित्र, भाऊ, सहाय्यक प्रोफेसर बरोबर होते असे वाटू लागले. आपल्याच्याने काही हे जिम प्रकरण झेपणार नाही हे मनोमन पटले. एखाद आठवडा करून सोडून द्यावे आणि जिमकडून कसल्याही परताव्याची अपेक्षा न करता केवळ स्वेच्छेने जिमला वर्गणीइतकी रक्कम दान देणाऱ्या इतर अनेक दानशूर व्यक्तींच्या रांगेत सामील व्हावे अशी इच्छा प्रबळ होऊ लागली. शरीर नश्वर आहे. त्याचा मोह कशाला? असे मंगल, सात्विक आणि पवित्र विचार डोक्यात येऊ लागले.
तुकोबांना आपुला संवाद आपणाशी करण्यासाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर जावे लागत होते, तीच अवस्था जिमच्या ट्रेड मिलवर आल्याने मी मनातल्या मनात जिमचे नाव भंडारा ठेवले. भंडारा जिम. इथेच मोरे सरांना शरीराच्या नश्वर पणाचा साक्षात्कार झाला. इथेच त्यांच्यातील सनदी लेखापाल, कडक शिक्षक, मागे पडून दानशूर संत स्वभाव जागा झाला अशी भविष्यकालीन स्वप्ने मला उघड्या डोळ्यांनी पडू लागली.
माझ्यासमोरच्या आरशात माझे प्रतिबिंब दिसत होते. आणि काहीतरी विलक्षण घडले. सकाळच्या वेळी मुलांचा तो हसरा चेहरा आठवला, माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यातले साम्य जाणवले. आणि एकाएकी माझ्या चेहऱ्याच्या जागी बाबांचा चेहरा दिसू लागला. तीच उंची, तसेच दाट आणि वळणदार केस.पण बाबा सडपातळ होते.
बाबा. आठवड्याला पाव किलो सुपारी संपवणारे पण मुलं मोठी होत आहेत मग त्यांच्या समोर चुकीचा आदर्श नको म्हणून एका झटक्यात ते सुपारीचं व्यसन कायमचं सोडणारे बाबा. आमच्या फिसाठी कायम ओव्हर टाईम करणारे बाबा. रोज चालत जाऊन चालत येणारे आणि रिक्षाचे पैसे वाचवणारे बाबा. सकाळी गाडीला गर्दी असते मग फर्स्ट क्लासचे तिकीट न काढता, गर्दी टाळण्यासाठी लवकर निघून कल्याण डाऊन करून सेकंड क्लासच्या पासवर जाणारे आणि पैसे वाचवणारे बाबा. घेतलेला वसा कधी न टाकणारे माझे बाबा. मी प्राथमिक इयत्तेत असताना रोज सकाळी मला शाळेत डबा द्यायला धावत येणारे माझे बाबा. वर्ष भर चार जोड कपडे वापरूनही टापटीप रहाणारे माझे बाबा. शाळेच्या whatsgroup एक बाल मैत्रीण बाबांच्या जाण्याची बातमी कळल्यावर म्हणाली पण होती, "तुझे बाबा कित्ती छान दिसायचे. तू पण त्यांच्या सारखाच दिसतोस बराचसा. फक्त सुटलायस थोडासा".
ज्ञानोबा आणि तुकोबांच्या सहवासातून बाहेर पडून मी एकाएकी वर्तुळात सापडलो. एक छोटेसे वर्तूळ. जिच्यात माझ्या मागे माझे बाबा होते आणि माझ्या पुढे माझी मुलं. बाबा प्रेमाने पुढे ढकलत होते, मुलं हौसेने पुढे खेचत होती. मी कोणी वेगळा नव्हतोच मुळी. मी होतो तो फक्त दुवा. माझ्या बाबांमधला आणि माझ्या मुलांमधला. बाबांकडून जे आलं त्यात भर टाकू शकलो नाही तरी निदान जसेच्या तसे मुलांकडे पोहोचवता आलं पाहिजे. घेतला वसा न टाकण्याचा त्यांचा मंत्र तर सगळ्यात महत्वाचा. आणि मग सगळा शीण पळाला. स्नायू मोकळे झाले. रक्तप्रवाह सुरळीत झाला. श्वास नियमित झाला. काय करायला हवे ते लख्ख दिसू लागले.
मी पण माझ्या मुलांच्या शाळेत रोज जातो. त्यांचे मित्र मैत्रिणी मला रोज पहातात. ते मोठे होतील तेंव्हा कदाचित whatsapp group नसतील, पण त्यांचेही कुठले ना कुठले ग्रुप असतीलच. त्यांची reunion होतील. त्यांना त्यांचे बाल मित्र आणि मैत्रिणी पुन्हा भेटतील. आणि त्यांना त्यांच्या बाबाची आठवण करून देतील. ती आठवण चांगली रहायला हवी. माझ्या बाबांच्या आठवणीने जशी मला कायम उभारी मिळते, त्यांच्या बद्दलच्या अभिमानाने ऊर भरून येते त्याच्या अगदी १० टक्के जरी मी माझ्या मुलांसाठी करू शकलो तरी पुरे. या विचाराने मनावर आलेली मरगळ दूर झाली. आणि पुढील वर्षभर नेमाने येण्यासाठी सबळ कारण मिळाले. माझा स्वभावंच तसा आहे. बाबा आणि मुलांची गोष्ट आली की मला माझे असे वेगळे काही मत राहातच नाही. फक्त जिम वाल्यांना माझा दानशूर अवतार पाहण्याची संधी हुकली.
आता जर तुम्हाला डोंबिवली मध्ये सकाळच्या वेळी मुलांना शाळेत सोडून, राजीखुशीने जिमकडे जाणारा, एखादा पोट सुटलेला, चाळीशीच्या आसपासचा इसम दिसला तर खुशाल समजा तुम्ही मला पाहिलंत. माझ्या भंडारा जिमकडे जाताना.
सुटलेल्या पोटाची कहाणी संपूर्ण … जिमचा प्रवास चालू आहे आणि तो चालू राहावा यासाठी तुमच्या सदिच्छांच्या अपेक्षेत.
--------------------

No comments:

Post a Comment