Sunday, January 31, 2016

‎समाजवाद आणि भारत‬ (भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का


--------------------

मागच्या भागात मी समाजवादाचे - साम्यवादाचे तत्वज्ञान हे जरी भांडवलशाहीला टक्कर देताना दिसले तरी ते ज्या देशांत शोषणकारी वसाहती वसवल्या गेल्या त्या जित देशात उगम पावलेले नाही. याउलट भांडवलशाहीचा उदो उदो करणाऱ्या वसाहतवादी, जेत्या देशांतच उगम पावले, ही खुली गुपिते माझे निरीक्षण म्हणून नोंदवून ठेवली.

प्रवाही भांडवलशाही

भांडवलशाही ही एक अशी व्यवस्था आहे जिचे स्वतःचे त्याच नावाचे तत्वज्ञान आहे. ही व्यवस्था माणसातल्या उपजत गुणांना वापरत असल्याने हिला रुजायला फार मोठी समाजरचना लागत नाही. किंबहुना स्वतःला हवी तशी समाजरचना तयार करून घेण्यास भांडवलशाही समर्थ असते. हिच्या तत्वज्ञानाला शिकायला उन्नत मनाची किंवा मेंदूची आवश्यकता लागत नाही. केवळ निरीक्षणातून देखील हे तत्वज्ञान शिकता येते. जगाच्या ज्या भागात ही व्यवस्था नव्हती त्या भागातील लोक या व्यवस्थेच्या राक्षसी महत्वाकांक्षेपुढे नामशेष तरी झाले किंवा ते देखील या तत्वज्ञानाचा अंगिकार  करून या व्यवस्थेचे पाइक झाले.

उपजत गुणांवर आधारित, व्यवस्थेचे शरीर असलेल्या भांडवलशाही तत्त्वज्ञानाच्या तुलनेत समाजवाद हे उच्च मूल्यांवर आधारित परंतू शरीरविरहीत असे केवळ तत्वज्ञान आहे.  आजच्या भाषेत बोलायचे झाले तर भांडवलशाही अॅपलच्या आय फोन आणि त्याच्यासाठी बनलेले आय ओएस सारखे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही आहे. तर समाजवाद हे गुगलच्या अँड्रॉइड सारखे केवळ सॉफ्टवेअर आहे. भांडवलशाही ही मनुष्याच्या उपजत गुणांवर आधारित व्यवस्था आणि तिला विषद करणारे तत्वज्ञान असल्याने, ती स्थिर नसून प्रवाही आहे. याउलट समाजवाद आणि त्याच्या अंतर्गत येणारा साम्यवाद हे मूल्यांवर आधारीत तत्वज्ञान असल्याने तुलनात्मक रित्या स्थिर भासते.

व्याख्या

१९७६ च्या  ४२व्या घटनादुरुस्तीने  भारताचे प्रजासाताक अधिकृतरित्या समाजवादी झालेले असले तरी त्याआधी देखील घटनेत असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे, भारतीय प्रजासत्ताक समाजवादीच होते असे आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्यानंतर पहिली ५० वर्षे भारताने मिश्र अर्थ व्यवस्थेचा अंगिकार केला होता, ज्यात भांडवलशाही आणि साम्यवादाच्या वळणाने जाणारा समाजवाद यांचे मिश्रण, अशी रचना तत्कालीन सरकारी पक्षाने राबवली होती. याशिवाय, अजूनही भारतात साम्यवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष आपला प्रभाव राखून असल्यामुळे भारतीय समाजवादाचा विचार करताना आपल्याला भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवाद या तिघांची व्याख्या समजून घेणे आवश्यक ठरते.

भांडवलशाही

मी भांडवलशाहीचे वर्णन प्रवाही व्यवस्थेचे प्रवाही तत्वज्ञान असे केल्याने तिची, "वैयक्तिक नफ्याचे, खाजगी मालमत्तेचे आणि सरकारी हस्तक्षेप नसलेल्या खुल्या बाजाराचे समर्थन करणारी व्यवस्था" अशी व्याख्या करताना ह्या व्याख्येतले गुणविशेष भांडवलशाहीत कसे आले असावेत त्याचे शब्दचित्र रंगवायचा प्रयत्न करतो आहे. मी जे मुद्दे त्यासाठी मांडत आहे ते संपूर्ण जगात, एकाच वेळी, काळाच्या रेषेवर एकामागोमाग एक घडले असा माझा दावा नाही याउलट, हे सर्व मुद्दे जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी एकमेकांच्या आगे मागे घडत होते आणि अजूनदेखील घडत आहेत, हे वाचकांनी ध्यानात  घ्यावे ही अपेक्षा आहे. मी भांडवलशाहीच्या आज सर्वमान्य झालेल्या वैशिष्ट्यांना एकत्र गुंफणारी जी व्याख्या वर दिली आहे त्यातील सर्व वैशिष्ट्ये एकाच वेळी घेऊन भांडवलशाही प्रकट झाली नाही. तर इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी भांडवलशाहीने वेगवेगळी वैशिष्ट्ये धारण केली आणि तिला तिचे आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे असे माझे मत आहे. त्यामुळे भांडवलशाहीला प्रवाही व्यवस्था म्हणताना मी, कालौघात वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये धारण करीत जाण्याचा तिचा हा गुण विचारात घेऊनंच मी हे शब्दचित्र रंगवतो आहे.

चंचुप्रवेश ते हलका शिक्का

माणूस जेंव्हा छोट्या टोळ्यांच्या रूपात एकत्र येतो भटका, शिकारी आणि निसर्गात आढळणारे अन्न गोळा करणारा असतो, किंवा अजून सुलभीकरण केले तर, जेंव्हा तो उत्पादक नसून केवळ ग्राहक असतो तेंव्हा  टोळीतील सर्वांचे परस्परसंबंध समाजवादाच्या किंवा साम्यवादाच्या धर्तीवर नैसर्गिकरीत्या तयार होतात आणि नैसर्गिकरित्या तयार झाल्याने ते मान्य करणाऱ्या टोळी सदस्यांची संख्या जास्त असते. मग या समाजवादी रचना असणाऱ्या टोळ्यांमध्ये भांडवलशाहीचा उगम होतो कसा काय?

या समाजवादी टोळ्यात सगळेच निसर्गाचे ग्राहक असतात. विवाह संस्थेचा उदय अजून झालेला नसतो. आपला किंवा परका हा भेद केवळ ती व्यक्ती टोळी सदस्य आहे की नाही यावरून ठरतो. दुसरे कुठलेही नाते नसते. नवरा - बायको, पालक - मुले अशी मूळ नातीच अस्तित्वात नसल्याने बाकीची नातीदेखील अस्तित्वात यायची बाकी असतात. टोळीतील स्त्रिया, पुरुष आणि मुले हे सर्व जण टोळीचे असतात. एकमेकांचे नाही. त्यामुळे टोळी हाच एक एकक असतो. इतर टोळ्यांशी संबंध क्वचितच येतो. आणि आला तरी तो संघर्षाचा असतो, वस्तूंच्या देवाणघेवाणीचा नसतो. अजून बाजाराला सुरवात झालेली नसते. जे हवे ते घ्यावे. निसर्गच उत्पादक असल्याने मालकी हक्क नावाची गोष्ट नसते. त्याशिवाय, आपल्याला जे हवे ते दुसऱ्याकडे असेल आणि तो ते आपल्याला देण्यास तयार नसेल तर शारीरिक बळाचा वापर करून ते हिसकावून घेण्याचा पर्याय टोळीबाहेर आणि टोळी अंतर्गतदेखील उपलब्ध असतो. बळी तो कान पिळीचा नियम सर्वमान्य असतो. भटके शिकारी निसर्गाच्या कृपेने जगत असतात. रानोमाळ भटकताना सुरवात होते पशुपालनाची. कुत्रे आणि घोडे हे पहिले उपयुक्त पाळीव प्राणी. अन्न गोळा करण्याच्या आणि शिकार करण्याच्या वेळी हे दोन प्राणी उपयोगी पडतात. त्यानंतर या पाळीव प्राण्यांच्या यादीत येतात गाई, बकऱ्या, कोंबड्या आणि त्या पाठोपाठ या सर्व पाळीव प्राण्यांचे नर. आता दूध, मांस आणि अंडी या सर्व अन्न पदार्थावर या टोळीची हुकुमत सुरु होते. शिकारीचे महत्व किंचित उणावते. पशुपालन महत्वाचे ठरू लागते. टोळीकडे पहिला संचय होऊ लागतो. या संचयाला आपण नाव देऊया, "पशुधन".

आता टोळी अन्न-वस्त्रासाठी निसर्गावर पूर्णतया अवलंबून नसून थोड्याफार प्रमाणात ती स्वावलंबी होऊ लागलेली असते. टोळी आता दूध, मांस आणि चामड्याची वस्त्रे यांची उत्पादक बनू लागलेली असते. आता रानोमाळ भटकण्याऐवजी आपल्या पशुधनाला आवश्यक असा चारा आणि पाणी जिथे मुबलक मिळेल अश्या पाणवठ्याजवळ स्थिर होणे टोळीसाठी सोयीस्कर ठरते. अश्या स्थिर टोळीत अंगमेहनतीची कामे पुरुषांकडे जाऊ लागतात आणि अष्टावधानाची कामे स्त्रियांकडे जातात. स्त्रियांना निरीक्षण आणि अनुमान काढायला वेळ मिळतो. माझ्या मते शेतीचा शोध माणसाला लागण्याचे कारण, प्रचंड निरीक्षणशक्ती असलेल्या स्त्रिया आहेत. शेतीचा शोध माणसांच्या टोळीला अजून स्वावलंबी बनवतो. शिकार आणि निसर्गात आढळणारे अन्न गोळा करण्याच्या बेभरवशाच्या कामापेक्षा शेती आणि पशुपालन अधिक खात्रीशीर उद्योग ठरतात. अश्या प्रकारे जेंव्हा माणूस त्याच्या जन्मसिद्ध ग्राहकाच्या भूमिकेबरोबरच उत्पादकाच्या भूमिकेत शिरू लागतो  तेंव्हा समाजवादी टोळ्यांमध्ये भांडवलशाहीचा चंचुप्रवेश होतो.

निसर्गाचे निरीक्षण करताना काही कल्पक टोळीसदस्यांना तंत्रज्ञानाचे शोध लागतात. उत्पादकता वाढू लागते. प्रचंड श्रमानंतर मिळणारे थोडके अन्न तेदेखील बेभरवशाचे, ही अवस्था जाऊन, तुलनेने कमी श्रमाचे आणि जास्त भरवशाचे अन्नाचे स्त्रोत टोळीच्या हातात येऊ लागतात. उत्पादन घरगुती प्रमाणात असल्याने आणि मालक स्वतःच मजूर असल्याने भांडवलशाहीने आपली मुळे इथे रुजवली आहेत हे चटकन लक्षात येत नाही.

काय बनवावे? किती बनवावे? कसे बनवावे? आणि कुणासाठी बनवावे? या अर्थशास्त्रातील मुलभूत प्रश्नांच्या आधी तयार होते ती मालकी हक्काची संकल्पना. कारण जो गुरे राखतो, जो जमीन कसतो तो वस्तू गोळा करणाऱ्यापेक्षा आता आपल्या कृतीत जास्त गुंतलेला असतो. आणि त्याच्या या गुंतवणुकीचे फळ त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात झालेल्या उत्पादनाच्या स्वरूपात मिळालेले असते. या जास्तीच्या उत्पादनावर त्याला त्याचा हक्क वाटणे स्वाभाविक असते. इतक्या छोट्या टोळ्यांच्या आदिम समाजात तंत्रज्ञानाच्या स्वामित्व हक्काचे प्रश्न येत नसले तरी जमिनीच्या आणि पशुधनाच्या मालकीचे हक्क नक्कीच तयार होतात.

भिन्नलिंगी व्यक्तीचे नैसर्गिक आकर्षण, त्यातून तयार होणारी प्रेम नावाची क्षणभंगुर भावना त्यापायी विनामोबदला केले जाणारे काम आणि मग केवळ प्रेमाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या अश्या विनाश्रमाच्या कामाच्या सातत्याची ओढ, टोळीमध्ये छोटे गट तयार करू लागते. त्या शिवाय अपत्यांच्या बद्दल असलेल्या नैसर्गिक प्रेमामुळे आणि गरोदरपणात घेतलेल्या काळजीमुळे स्त्री बद्दल तयार होणाऱ्या स्वामित्वाच्या भावनेमुळे, टोळीत स्त्री पुरुषांच्या जोड्यांच्या स्वरूपात उपटोळ्या तयार होतात. आपण त्यांना "कुटुंब" असे नाव देऊया.

जेंव्हा कुटुंब हा एकक तयार होतो आणि एका पिढीने राखलेले पशुधन, कुठल्याही मनुष्याने निर्माण न केलेली, निसर्गतः कुणाच्या नावे नसलेली जमीन, त्या पिढीच्याच वंशजांकडे हस्तांतरीत होते तेंव्हा समाजवादी असलेल्या टोळीवर भांडवलशाही आपला हलका शिक्का मारून ठेवते.
---------------------

No comments:

Post a Comment