Sunday, January 31, 2016

‎समाजवाद आणि भारत‬ (भाग २) - पूर्वपिठीका


--------------------
Capitalism (भांडवलशाही), Socialism (समाजवाद) आणि Communism (साम्यवाद) या तीनही संज्ञा आणि त्यामागील संकल्पना पाश्चात्य जगातून आपल्याकडे आल्या. Renaissance म्हणजे प्रबोधनाचा काळ हा जर एक बिंदू मानला तर, भांडवलशाही, प्रबोधनकाळाच्या आधीपासूनच जमीनदारी किंवा सरंजामशाही या व्यवस्थांच्या रूपाने अस्तित्वात होती. समाजवाद आणि साम्यवाद अस्तित्वात असलाच तरी तो छोट्या टोळक्यातील व्यक्तींच्या परस्पर संबंधांमधून दिसून येत होता. भांडवलशाहीला टक्कर देऊ शकणारे एक तत्वज्ञान म्हणून या दोन्ही संकल्पनांचा स्पष्ट उदय मात्र प्रबोधनाच्या चळवळीनंतरचा आहे.
प्रबोधनाच्या चळवळीमुळे पुढे आलेल्या Nation State च्या संकल्पनेमुळे भांडवलशाहीला "भांडवलदार आणि इतर" ह्या भेदाबरोबरच "स्वदेश आणि परदेश" असा अजून एक भेद करता येऊ लागला. आणि त्याच्या विस्ताराला अख्खे जग खुले झाले. या Nation Statesनी स्वदेशातील "भांडवलदार आणि इतर" यांच्यातील परस्पर संबंधांसाठी नव्या व्यवस्थांची मांडणी केली. जरी राजेशाही आणि सरंजामशाहीमुळे भांडवलशाही जोमाने विस्तारली होती तरी त्यांना तिलांजली देत; संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही अश्या नवीन व्यवस्थांची मांडणी आणि अंमलबजावणी सुरु झाली. जुन्या व्यवस्थांमधील हुशार सत्ताधारी नवीन व्यवस्थेत देखील मोक्याच्या जागा पटकावून बसले हा भाग सोडला तर पाश्चात्य जगात प्रबोधनाच्या चळवळीनंतर व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि विचारस्वातंत्र्याचे वारे वहायला सुरुवात झाली हे मात्र नाकारता येत नाही.
ऐन भरात आल्यामुळे बेबंद होऊन मोकाट सुटलेली भांडवलशाही, धर्माचे, धर्मगुरुंचे आणि राजांचे सार्वजनिक जीवनातील कमी झालेले महत्व आणि वाढलेले व्यक्ती व विचारस्वातंत्र्य यामुळे समाजवाद आणि साम्यवादाने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलशाहीला टक्कर देऊ शकेल असे तत्वज्ञान म्हणून आपली पाळेमुळे पाश्चात्य समाजात घट्ट रोवली. यात अजून एक महत्वाचा भाग असा की समाजवाद आणि साम्यवादाचे तत्वज्ञान इतर देशांनी पाश्चात्य देशांविरुद्ध तयार केले नसून, ज्या देशांनी भांडवलशाही आणि वसाहतवाद वापरून जगभर आपली बाजारपेठ वसवली तेथेच हे तत्वज्ञान उगम पावले आणि नंतर विस्तारत गेले. समाजवादाचे पुरस्कर्ते असलेले रॉबर्ट ओवेन आणि जॉन स्ट्यूअर्ट मिल हे दोघे इंग्लंडचे, पिअरे लेरोक्स फ्रांसचा, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि थोर्स्टीन व्हेब्लेन हे विचारवंत अमेरिकेचे होते. तर साम्यवादाचे उद्गाते कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स दोघेही जर्मन होते. पु ल देशपांड्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे "आत्यंतिक रती नंतर आलेली उपरती" असे काही तरी समाजवाद आणि साम्यवाद यांच्या पाश्चात्य देशातील उदयाबद्दल बोलता येईल.
प्रबोधनाची चळवळ आपण न अनुभवल्याने, राजांचे, सरंजामदारांचे, जमीनदारांचे आणि धर्माचे आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील महत्त्व कमी न झाल्याने आणि व्यक्ती स्वातंत्र्याची - विचारस्वातंत्र्याची साधी झुळूक देखील आपल्या पुरातन संस्कृतीच्या अभेद्य तटबंदीच्या आत शिरू न शकल्याने आपला बलुतेदारी समाज, 'राजे आणि मंदिरांभोवती फिरणारी अर्थव्यवस्था' यापलीकडे मोठी मजल मारू शकला नाही. त्यामुळे भांडवलशाही, समाजवाद आणि साम्यवाद या संज्ञा, त्यामागील संकल्पना आणि Nation State च्या स्तरावरील लोकशाहीची व्यवस्था आपल्यासाठी पूर्णपणे नवीन होत्या. याचा अर्थ आपण संकल्पना आणि व्यवस्थांच्या बाबतीत अगदीच दरिद्री होतो अशातला भाग नाही. आपण मांडलेल्या संकल्पनांच्या संज्ञा म्हणजे वसुधैव कुटुंबकम्, विश्वबंधुत्व, जीवो जीवस्य जीवनम्, जियो और जीने दो, पुनर्जन्म, कर्मविपाक, कृण्वन्तो विश्वम् आर्यम् वगैरे. चांगला कल्पनाविलास करता येत असेल तर त्यातल्या काही भांडवलशाहीच्या जवळ नेता येतात, तर काही समाजवादाच्या आणि काही साम्यवादाच्या. पण याचा अर्थ त्या पाश्चात्य संकल्पना या मातीतीलच आहेत असा कोणी करत असेल तर ते मात्र चुकीचे ठरेल.
आपल्या पूर्वजांनी वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी आखलेली व्यवस्था चार आश्रमांची होती तर त्यांनी तयार केलेली समाजव्यवस्था जातीच्या उतरंडीची होती आणि तिला अस्तर लावले होते वर्ण व्यवस्थेचे. त्यातल्या जाती व्यवस्थेचे मूळ स्वरूप जरी आर्थिक शोषण, माणसाची गुलामी, दुसऱ्याच्या श्रमाचा अपहार असा असला तरी वैयक्तिक आणि सामाजिक व्यवस्थांना भौतिकाऐवजी अधिभौतिकाचे, आणि लौकिकाऐवजी पारलौकीकाचे अधिष्ठान देण्यात आपले पूर्वज यशस्वी ठरले होते. त्याचे काही चांगले आणि बरेचसे वाईट परिणाम एक समाज म्हणून आपण इतिहासकाळापासून आजतागायत भोगतोय.
साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाने एकविसाव्या शतकात पोहोचलेला भारत समाजमनाच्या दृष्टीने अजून सरंजामी वृत्तीच्या मध्ययुगातच आहे. शाळा कॉलेजच्या बाहेर, क्रमिक पुस्तकांना सोडून, कथा कहाणी नाटक, चित्रपट आणि गाण्यातून आपण जी संस्कृती शिकतो आणि स्वतःच्या नकळत जिला अंगीकारतो ती संस्कृती भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद या संकल्पना आणि त्यांना रुजवायला लागणारी लोकशाही या व्यवस्थेपेक्षा फार वेगळी आहे हे आधी मान्य केले की भारतातील समाजवादी राजकारणाच्या पराभवाबाबत विचार करताना आपली पूर्वपिठीका अधिक योग्यरित्या तयार होते असे मला वाटते.

---------------------

No comments:

Post a Comment