Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १०)

_________

Marcel Lazăr Lehel नावाचा एक रोमानियन हॅकर आहे. तो Guccifer या टोपणनावाने हॅकिंगची कामे करायचा. सध्या तो अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगतोय.

Sidney Blumenthal नावाचे क्लिंटन कुटुंबाचे अत्यंत जवळचे सहकारी आणि सल्लागार आहेत. हिलरी क्लिंटन जेव्हा अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट होत्या तेव्हा २०१२ मध्ये लिबियाच्या बेनगाझी या शहरातील अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला. त्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्याबरोबर Sidney Blumenthal यांचे जे ईमेल संवाद झाले ते Marcel Lazăr Lehel ने हॅक केले. आणि जगासमोर आणले. त्यात एक महत्वाची गोष्ट दिसून आली की हिलरी क्लिंटन यांनी सरकारने दिलेला ईमेल सर्व्हर न वापरता खाजगी ईमेल सर्व्हर वापरला. सरकारी कामांसाठी वापरलेल्या या खाजगी ईमेल सर्व्हरची आणि त्यावरील संदेशांची नोंद सरकारदरबारी नव्हती आणि यातील कित्येक ईमेल्स गोपनीय स्वरूपाच्या होत्या. त्याबद्दल चौकशी झाली. शेवटी हिलरी क्लिंटन यांची निर्दोष मुक्तता झाली. पण २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत फेसबुकवरून अनेक पेजेसनी हिलरी क्लिंटन यांच्यावर चिखलफेक सुरु केली. आणि त्यात या खाजगी ईमेल सर्व्हरचा मुद्दा पुन्हा पुढे आला. बरोबर मतदानाच्या आधी ही केस पुन्हा उघडण्यात आली. नंतर हिलरी क्लिंटन यांचा पराभव होऊन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

निवडणूक प्रचारात हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात फेसबुकवर ईमेल सर्व्हरच्या निमित्ताने भरपूर चिखलफेक होत असताना, फेसबुकला अजून एक गोष्ट लक्षात आली. यापूर्वी रशियन हॅकर्स फेसबुकच्या सर्व्हर्सना हॅक करण्याचा जो प्रयत्न करत होते त्याऐवजी नवीन प्रकार सुरु झाला होता.

इंटरनेट रिसर्च एजन्सी नावाची एक रशियन कंपनी आहे. सेंट पीटर्सबर्गमधील तिचे कार्यालय २०१३ पासून चालू आहे. महिन्याला ७८० डॉलर्स या पगारावर तिथे हजारभर लोक कामाला आहेत. त्यांचे काम अगदी साधे आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर अकाउंट्स उघडून तिथे चर्चेत हस्तक्षेप करणे, अॉनलाईन वर्तमानपत्रातील बातम्यांवर प्रतिसाद देऊन बातम्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणे, विविध मिम्स बनवून ते समाज माध्यमांवर पसरवणे. त्या इमारतीला ट्रोल फॅक्टरी म्हटलं जातं.

तसेच फॅन्सी बेअर किंवा ऍडवान्सड पर्सिस्टन्ट थ्रेट (APT २८) नावाचा रशियन हॅकर्सचा एक ग्रुप आहे. एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीममधील कच्चा दुवा शोधून त्यावर सिक्युरिटी पॅच तयार व्हायच्या आधी त्याला वापरून जगभरातील शक्य तितक्या कॉम्प्युटर्समध्ये मालवेअर घुसवणे आणि त्यातून इंटरनेटवर उत्पात माजवणे हे त्यांचे काम आहे. ज्याप्रकारे ते हे काम करतात त्यावरून हे लक्षात येते की त्यामागे रशियन सरकारचा हात आहे.

तर या इंटरनेट रिसर्च एजन्सी आणि APT २८ ने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किमान १,००,००० डॉलर्स खर्च करून ३,५०० जाहिराती फेसबुकवर दिल्या. त्याशिवाय ८०,००० पोस्ट्स १२० फेक अकाउंटस / पेजेस वापरून शेअर केल्या. ज्या किमान २ कोटी अमेरिकन लोकांपर्यंत प्रत्यक्षरित्या पोहोचल्या (किमान १२.६ कोटी अमेरिकन लोकांनी त्या पहिल्या असा अंदाज आहे). या पोस्ट्स ट्रम्पना विजयी करा, हिलरीला हरवा असा स्पष्ट संदेश देणाऱ्या नाहीत. पण अमेरिकेतील रंगभेद, पोलीस अत्याचार, ख्रिश्चन मुस्लिम अविश्वास, मेक्सिकोबरोबरच्या सीमा सुरक्षेबाबतचे मतभेद या सर्वांवर जनमत टोकाचे विभाजित होत जावे, समाज विभागला जावा आणि समाजातील विसंवाद वाढावा अश्या प्रकारच्या होत्या. आणि त्या कश्या प्रकारे टार्गेट करायच्या याबाबत त्यांनी फेसबुक अल्गोरिदमचाच वापर करून घेतला होता.

समाजात पसरलेल्या या दुहीचा आणि हिलरी क्लिंटनवर ईमेल सर्व्हरबाबत केलेल्या टीकेच्या भडिमाराचा परिणाम म्हणून अनपेक्षितरित्या ट्रम्प निवडून आले असाही एक मतप्रवाह अमेरिकेत आहे. त्यामुळे डेटाचोरीच्या प्रकरणात रशियन हॅकर्सचाही एक पैलू जोडला गेलेला आहे.

आपल्या देशात सुरु होऊन लोकप्रिय झालेल्या समाजमाध्यमांचा वापर करून परदेशी शक्ती, अत्यंत कमी खर्चात आपल्या देशातील नागरिकांचा बुद्धिभेद करू शकतात, समाजात अशांतता आणि अविश्वास तयार करू शकतात, आपल्या निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण मिळवून लोकशाहीची थट्टा उडवू शकतात.

त्याचप्रमाणे एखादा अब्जाधीश, केवळ पैशाचे पाठबळ वापरून डेटा मायनिंग करून, टारगेटेड जाहिराती वापरून; अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या, आंतरराष्ट्रीय करारांबाबत तुच्छतेने बोलणाऱ्या, जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकणाऱ्या आणि राजकारणाबाबत अननुभवी व्यावसायिकालादेखील अगदी सहजपणे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आणू शकतो. या गोष्टी अमेरिकेतील राजकारण्यांसाठी चिंतेच्या आहेत.

स्वतः अमेरिका जरी असे अनेक प्रकार इतर देशात घडवून आणत असली तरी समाजमाध्यमांचा वापर करून आता तेच अमेरिकेतही केले जाऊ शकते ही जाणीव त्यांच्यासाठी धक्कादायक आहे.

म्हणून सध्या जरी डेटा चोरीच्या प्रकरणात यूजर्सना अंधारात ठेवून डेटा काढला असा कायदेशीर मुद्दा असला तरी उडणाऱ्या धुळीची खरी कारणे; रशिया आणि अमेरिकेचे राजकारण, जाहिरातींवर अवलंबून असलेली समाजमाध्यमे, सर्वसामान्यांच्या हातात आलेले स्मार्टफोन्स, त्यातून प्रत्येक व्यक्तीच्या दिनचर्येची, मतमतांची जमा होणारी इत्यंभूत माहिती, ही माहिती कशी वापरावी यावर नसलेले नियंत्रण आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपले घरही न सोडता इतर देशात तयार करता येणारा असंतोष; ही आहेत.

भारतासारख्या देशात जिथे अजून बहुसंख्य जनता समाजमाध्यमांपासून दूर आहे, तिथे या डेटाचोरीचा किंवा समाजमाध्यमांचा वापर करून समाजात पसरवण्यात येणाऱ्या दुहीचा त्रास अमेरिकेपेक्षा कमी आहे. पण आपल्याकडे फेक न्यूज, मिम्स, फेक फोटोज, फेक व्हिडीओज पाठवण्यासाठी व्हॉट्स ऍपचा वापर वाढतो आहे. निरक्षरांनाही फोटो किंवा व्हिडीओ चिथवू शकतो. त्यामुळे आपल्याकडे डेटाचोरीपेक्षा शेअर केले जाणाऱ्या फेक फोटोज आणि फेक व्हिडीओजचा त्रास मोठा आहे.

म्हणजे डेटाचोरीचा संबंध जाहिराती वापरून वस्तू खपविणे याच्याशी नसून डेटा वापरून समाजाचा बुद्धिभेद करणे याच्याशी आहे. त्यामुळे कदाचित आता फेसबुक किंवा सर्व समाजमाध्यमांवर यूजर्सकडून जमा झालेला डेटा कसा वापरायचा यावर कायदेशीर बंधने येतील. यूजर्सना आपला कुठला डेटा साठवला जातो आहे त्याबद्दल माहिती मिळू शकेल. तो कधी डिलीट करायचा याबद्दल सूचना देण्याचे स्वातंत्र्य मिळू शकेल. पण जोपर्यंत भडक बातम्या, भडक व्हिडीओज यांच्या खरेपणाबद्दल खात्री करून न घेता लोक त्या पुढे पसरवत राहतील, विविध पोस्टवर गलिच्छ भाषेत वाद करत राहतील तोपर्यंत बुद्धिभेद करणाऱ्या लोकांचे काम सोपेच राहील.

आपण समाज माध्यमे वापरणे बंद करू शकत नाही. समाजमाध्यमे यूजर्सकडून पैसे मागू शकत नाहीत. लोक अनोळखी लोकांशी मैत्री करणे बंद करू शकत नाहीत. म्हणजे बाटलीतून बाहेर आलेला राक्षस आता पुन्हा बाटलीत जाणे अशक्य आहे. आपण फारतर या राक्षसाची ताकद कमी करू शकतो. शेअर करताना सांभाळून शेअर करणे. आपल्या समाजात अनेक भेद आहेत, आणि ते कमी करत जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे मान्य करून सौम्य भाषेचा प्रयोग करणे, आपल्या विरोधी राजकीय विचारसरणीवर सभ्यतेच्या मर्यादा पाळत मुद्द्यांवर आधारित विरोध नोंदवणे, आपल्याला कळलेले सत्य इतरांनी मान्य करावे म्हणून हातघाईवर न येणे, हे या राक्षसाला हतप्रभ करण्याचे उपाय आहेत.

कायद्याचे नियंत्रण वाढले की जाहिरातदारांना समाजमाध्यमांकडून काय आणि किती डेटा मिळेल यावर निर्बंध येतील परिणामी जाहिरातींच्या उत्पन्नावर मर्यादा येतील हे ओळखून फेसबुकने फेसबुक फॉर वर्क ही फेसबुकची पैसे द्यावी लागणारी सेवा चालू केली आहे. गूगलने फोनसाठी अँड्रॉइड आणि कॉम्प्युटरसाठी क्रोम अश्या वेगळ्या प्रणाली वापरण्याऐवजी Google Fuchsia नावाची एकंच प्रणाली विकसित करायला सुरवात केली आहे. ऍमेझॉनच्या ऍलेक्साने घरात प्रवेश करून गुगल आणि फेसबुकच्या आधी लोकांच्या मनाचा आवडीनिवडीचा आणि गरजांचा कानोसा घ्यायला सुरवात केली आहे. गूगलने इंटरनेट ऑफ थिंग्जवर भर देऊन आपल्या घरातील विविध उपकरणांत शिरायला सुरवात केली आहे. म्हणजे आपला डेटा या सर्व कंपन्यांकडे जात राहणार आहेच. त्याला आपण थांबवू शकत नाही. या कंपन्यांनी तो कसा वापरावा यावर कायदेशीर नियंत्रण यावे इतकाच उपाय आपण करू शकतो.

राहता राहिली समाजमाध्यमे. तिथे संयम हाच आपला खरा मित्र आहे. कारण लोकशाहीचे फायदे घेण्यासाठी आपल्याला प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे.

या लेखमालेच्या सुरवातीला मी पाण्याचे उदाहरण घेतले होते. समाजमाध्यमे आता नवीन पाणवठा बनली आहेत. त्यामुळे इथले पाणी आपल्याकडे पाईपातून येवो अथवा बाटलीतून. आपण जर इथेच आपली धुणी धुणे, प्रातःर्विधी आटोपणे, भांडी घासणे, वगैरे उद्योग करून तेच पाणी पिण्यासाठी वापरणार असू तर समाजाचे आरोग्य कायम धोक्यात राहील. डेटाचोरीच्या निमित्ताने आपल्याला इतके जरी कळले तरी पुष्कळ आहे.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ९)

_________

मागल्या भागात आपण पाहिले की जिथून डेटा चोरीला सुरवात झाली असे मानले जाते ते ‘धिस इज युअर लाईफ’ नावाचे ऍप आधी अमेझॉनच्या मेकॅनिकल टर्क या फ्रीलान्स कामाच्या पोर्टलवर आणि नंतर फेसबुकवर अलेक्झांडर कोगनच्या ग्लोबल रिसर्च कंपनीने लॉन्च केले होते. अलेक्झांडर कोगन केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असणारा डेटा सायंटिस्ट आहे. त्याच्या ग्लोबल रिसर्च कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती केम्ब्रिज ऍनालिटिका नावाच्या दुसऱ्या कंपनीने.

केम्ब्रिज ऍनालिटिका २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये सुरु झालेली कंपनी होती. आता परवा म्हणजे १ मी २०१८ ला ही कंपनी बंद केली गेली आणि तिचे काम आता एमारडेटा नावाची दुसरी कंपनी करणार आहे. रॉबर्ट मर्सर या अमेरिकन हेज फंड मॅनेजरकडे आणि स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज या कंपनीकडे केम्ब्रिज ऍनालिटिकाची मालकी होती.

१९४६ मध्ये जन्मलेले रॉबर्ट मर्सर अमेरिकन कॉम्प्युटर सायंटिस्ट आहेत आणि अमेरिकेतील अनेक उजव्या (right wing) समजल्या जाणाऱ्या चळवळींचे खंदे समर्थक आहेत. सध्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत मर्सर यांचा लक्षणीय पाठिंबा होता.

तर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज (एससीएल) ही १९९० मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. या कंपनीची जन्मकथा धूसर आहे. १९८९ मध्ये निगेल ओक्स (Nigel Oakes) नावाच्या माणसाने लंडन युनिव्हर्सिटीमध्ये बिहेव्हियरल डायनॅमिक्स ग्रुप या नावाने एक चाचणी ग्रुप स्थापन केला अशी माहिती एससीएलच्या वेबसाईटवर होती. पण लंडन युनिव्हर्सिटीने त्यापासून हात झटकल्यावर लंडन युनिव्हर्सिटीचे नाव वेबसाइटवरून वगळण्यात आले. निगेल ओक्सच्या शिक्षणाच्या बाबतीतही असाच घोळ आहे. ‘निगेल ओक्स यांनी एटन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले’ असा उल्लेख एससीएलच्या वेबसाईटवर होता पण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने याबाबत कानावर हात ठेवल्याने, ‘निगेल ओक्स यांनी एटन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले नंतर मानसशास्त्राचे शिक्षण घेतले’ अशी दुरुस्ती एससीएलने केली.

तर एससीएलच्या वेबसाईटवर दिलेली माहिती खरी मानायची झाल्यास आपल्याला विश्वास ठेवावा लागेल की, १९८९ मध्ये निगेल ओक्सने बिहेव्हेरियल डायनॅमिक्स ग्रुप नावाचा एक चाचणी ग्रुप स्थापन केला. सामाजिक आपत्काळात उपयोगी पडेल असे संवादाचे आणि जनमानस बदलण्याचे तंत्र विकसित करणे हा या ग्रुपचा उद्देश होता. वर्षभरात देशोदेशीचे अनेक नामवंत प्राध्यापक आणि युनिव्हर्सिटीजनी या प्रकल्पात रस दाखवला. त्यानंतर १९९० मध्ये एका युरोपियन गुंतवणूक कन्सोर्टियमने दिलेल्या आर्थिक पाठबळातून बिहेव्हिरियल डायनॅमिक्स इन्स्टिट्यूटचा जन्म झाला. आणि याच इन्स्टिट्यूटचे १९९३मध्ये नवीन नामकरण झाले स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज उर्फ एससीएल.

जागतिक ब्रॅण्ड्स, देशोदेशींची सरकारे आणि सैन्य यांना आपापल्या कामात मदत करणे हे एससीएलचे काम होते आणि आहे. त्यांच्या वेबसाइटवर ते सांगतात की १९९४ पासून त्यांनी देशोदेशींच्या सरकारांना सामाजिक आपत्तीकाळात लोकांशी संपर्क कसा साधायचा त्याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेपाळ, इराक यासारख्या देशात निवडणुका व्यवस्थित पार पाडाव्यात म्हणून मदत केली आहे. विविध राजकारण्यांनी आपली इमेज समाजासमोर कशी मांडावी याचेही मार्गदर्शन ते करतात. एससीएलचे काम प्रामुख्याने तिसऱ्या जगात चालते.काही मिलिटरी उठावातही त्यांचा हात होता अशी कुजबुज आहे. एससीएलची कार्यपद्धती इंग्लंड आणि अमेरिकेच्या सरकारांनी मान्य केली आहे असा उल्लेख एससीएलच्या जुन्या वेबसाईटवर होता.

तर या एससीएल नावाच्या ब्रिटिश कंपनीने रॉबर्ट मर्सर नावाच्या उजव्या विचारसरणीच्या अमेरिकन अब्जाधीशाच्या पैशाने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये केम्ब्रिज ऍनालिटिका स्थापन केली. तिने केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या अलेक्झांडर कोगनच्या ग्लोबल रिसर्च कंपनीला अमेरिकन लोकांचा डेटा गोळा करायला पैसे पुरवले.

त्याचवेळी म्हणजे २०१३ मध्ये कॅनडात ‘ऍग्रीगेट आयक्यू’ नावाची अजून एक कंपनी स्थापन झाली. हिचे पण काम होते डेटा गोळा करणे, त्याचा अर्थ लावणे आणि त्याचा उपयोग करणे. या कंपनीत केम्ब्रिज ऍनालिटिका किंवा रॉबर्ट मर्सरचा पैसा लागलेला नव्हता. परंतु या कंपनीला सहा मोठी गिऱ्हाइकं मिळाली ती ब्रिटनमधून.

२००९ पासून ब्रिटनमध्ये युनायटेड किंगडम इंडिपेन्डन्ट पार्टी नावाचा लहानसा पक्ष लोकप्रिय होत होता. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे अशी या पक्षाची मागणी होती. सत्ताधारी असलेल्या आणि उजव्या विचारसरणीच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षातील अनेक सभासददेखील याच मताचे होते. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचे मत होते की युरोपियन युनियनच्या नियमांत बसून ब्रिटिश जनतेच्या मागण्या मान्य करता येतील. त्यासाठी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची गरज नाही. पण स्वपक्षातील सभासदांचा वाढता दबाव आणि युनायटेड किंगडम इंडिपेन्डन्ट पार्टीने तापवलेले वातावरण यामुळे कॅमेरॉननी या मुद्द्यावर सार्वमत घ्यायची घोषणा केली. आणि ‘व्होट लीव्ह’, ‘बी लीव्ह’ ‘व्हेटरन्स फॉर ब्रिटन’ यासारखे प्रचारगट सुरु झाले. त्यांना भरपूर डोनेशन्स मिळू लागले. आणि त्यांनी या डोनेशन्सचा वापर करून ‘ऍग्रीगेट आयक्यू’ ला कंत्राट दिले.

ऍग्रीगेट आयक्यूचे काम होते ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे यासाठी जनमत तयार करणे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटे मिळाल्याने ऍग्रीगेट आयक्यू कामाला लागली. आणि नक्की ऍग्रीगेट आयक्यूच्या प्रचारतंत्राचा किती हात आहे ते सांगता येत नसले तरी निसटत्या अंतराने ब्रिटिश जनतेने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यात केम्ब्रिज ऍनालिटिकाचा प्रत्यक्ष संबंध दिसत नसला तरी चॅनेल ४ या ब्रिटिश चॅनेलच्या शोधपत्रकारांसमोर बोलताना केम्ब्रिज ऍनालिटिकाचा सीईओ अलेक्झांडर निक्सने ब्रेक्झिटमध्ये केम्ब्रिज ऍनालिटिकाचा हात होता अशी कबुली दिली. आणि विविध उजव्या विचारसरणीच्या प्रचारगटांना मिळालेल्या डोनेशन्समध्ये उजव्या विचारसरणीचा अब्जाधीश रॉबर्ट मर्सरचा किती हात होता तेही गुलदस्त्यात आहे.



वय, उत्पन्न, लिंग, वंश सारख्या घटकांवर आधारित मतदारांचे वर्गीकरण करून, त्यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करून, त्यांच्यावर विशिष्ट मतांचा मारा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याच्या ऍग्रीगेट आयक्यूच्या कामासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणारा माणूस होता ‘क्रिस्तोफर वायली’. ब्रेकझिटचे काम झाल्यावर तो ऍग्रीगेट आयक्यू सोडून तो केम्ब्रिज ऍनालिटिकाला येऊन मिळाला. जो प्लॅटफॉर्म त्याने ब्रेक्झिटसाठी ऍग्रीगेट आयक्यूत बनवला होता; तोच प्लॅटफॉर्म आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीसाठी वापरला जाणार होता. आणि सगळे काम पूर्ण झाल्यावर हाच क्रिस्तोफर वायली केम्ब्रिज ऍनालिटिकाविरोधात व्हिसलब्लोअर म्हणून उभा राहाणार होता.



आता केम्ब्रिज ऍनालिटीकाकडे अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील पहिलं गिऱ्हाईक आलं. त्याचं नाव होतं रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार टेड क्रूझ. पण त्याच्यासमोर आव्हान होतं त्याच्याच पक्षातील दुसऱ्या एका उमेदवाराचं. त्याचं नाव होतं डोनाल्ड ट्रम्प. अध्यक्षपदासाठी कोण लढणार या रेसमध्ये टेड क्रूझ डोनाल्ड ट्रम्पकडून पराभूत झाला. मग डोनाल्ड ट्रम्पने केम्ब्रिज ऍनालिटिकाची मदत घ्यायचं ठरवलं. आता डोनाल्ड ट्रम्पची स्पर्धा सुरु झाली ती डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटनशी.

इंग्लंडमध्ये मजूर (labour) पक्ष म्हणजे उदारमतवादी आणि डावा मानला जातो तर कन्झर्व्हेटिव्ह पक्ष म्हणजे उदारमतवादी पण उजव्या विचारसरणीचा मानला जातो. ब्रेक्झिटच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये उजवी, राष्ट्रवादी आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विरुद्ध असलेली संकुचित विचारसरणी जिंकली होती. त्याचप्रमाणे अमेरिकेत बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटनचा डेमोक्रॅटिक पक्ष म्हणजे उदारमतवादी आणि डावा मानला जातो. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष उजव्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा मानला जातो.

आता या उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीला इंग्लंडनंतर अमेरिकेत जिंकायचं होतं. सोबत होती केम्ब्रिज ऍनालिटिका; अलेक्झांडर कोगनच्या धिस इज युअर लाईफने लोकांना अंधारात ठेवून गोळा केलेला ५० कोटी अमेरिकन लोकांचा डेटा आणि समोर होती डेमोक्रेटिक उमेदवार हिलरी क्लिंटन.

केम्ब्रिज ऍनालिटिकाने कुंपणावरचे मतदार शोधणे, त्यांना समजेल अश्या भाषेत स्लोगन तयार करणे, त्यांच्या फेसबुक फीडमध्ये हे संदेश पुन्हा पुन्हा येत राहतील अशी व्यवस्था करणे या सर्व गोष्टी केल्या. लोक प्रचाराला बळी पडत नाहीत पण आपल्या मित्रांच्या मतामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते, या गृहीतकाला वापरून विविध हॅशटॅग वापरणे, लोकांच्या चर्चा होतील असे विषय समाजमाध्यमांवर उठवणे; हे सर्व उद्योगही या निवडणुकीत झाले. शिवराळ भाषेत बोलणारे ट्रम्प हरतील अशी सर्व निवडणूक पंडितांची अटकळ असताना आश्चर्यकारकरित्या हिलरी हरल्या आणि राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीचे ट्रम्प अमेरिकन अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले.

याचा अर्थ फक्त उजव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन पक्षाने निवडणुकीत चलाखी केली का?

तर तसे म्हणता येणार नाही. कारण २०१२ च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हीच चलाखी डेमोक्रेटिक पक्षाच्या बराक ओबामांनी सर्वात प्रथम केली होती. तेव्हा बाराक ओबामा यांनी तर फेसबुकवर ओबामा फॉर २०१२ नावाचे ऍप लॉन्च केले होते. त्यात फेसबुक युझर्सनी आपली माहिती द्यायची होती आणि मग हे ऍप त्यांच्या मित्रांची माहितीही फेसबुककडून घेणार होते. म्हणजे जे काम अलेक्झांडर कोगनच्या धिस इज युअर लाइफने २०१३-१४ नंतर करायला सुरवात केली तेच काम २०१२च्या वेळी बराक ओबामा यांच्या ऍपनेही केले होते. आणि त्यांनाही फेसबुकच्या ग्राफ एपीआयने; यूझर्स, त्यांचे मित्र, त्यांचे लाईक्स याचा सगळा डेटा सरसकटपणे दिला होता. आणि तोच वापरून ओबामा दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले होते. आणि टेकसॅव्ही अध्यक्ष म्हणून त्यांचा गौरवही झाला होता.

जर असे असेल तर मग केम्ब्रिज ऍनालिटिकाबद्दल इतका गदारोळ का?

याचं उत्तर, 'मोठ्या कंपन्या करतात ते सगळं बरोबर' अशी मानसिकता असलेल्या भारतीय मनाला कळणे थोडे कठीण आहे. पण २०१२च्या ओबामा ऍपमध्ये आणि २०१३च्या धिस इज युअर लाईफ नावाच्या ऍपमध्ये एकंच मोठा फरक होता. तो म्हणजे ओबामा ऍपमध्ये माहिती देणाऱ्यांना हे माहिती होतं की त्यांचा डेटा राजकीय प्रचारासाठी वापरला जाणार आहे. म्हणजे ऍपला, फेसबुकला आणि युझर्सना सगळ्यांना ओबामा ऍपच्या हेतूंबद्दल पूर्ण कल्पना होती. याउलट धिस इज युअर लाइफने डेटा गोळा करताना केवळ अकॅडमिक संशोधनासाठी डेटा वापरला जाईल असे सांगून तो गोळा केला आणि नंतर तो केम्ब्रिज ऍनालिटिकाला विकला. म्हणजे या ऍपने फेसबुकची आणि यूझर्सची फसवणूक केली. आणि या फसवणुकीला फेसबुक रोखू शकले नाही. किंबहुना आपल्या प्लॅटफॉर्मवर कुठले ऍप्स येतात? डेटाच्या संदर्भात त्यांचे उद्देश, नियम आणि अटी काय आहेत? याबाबत फेसबुकने दुर्लक्ष केले, ऍप्स या डेटाचे काय करू शकतील याबाबत फेसबुककडे कुठलीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे अमेरिकेन लोकांच्या डेटाची चोरी करणे केम्ब्रिज ऍनालिटिकाला शक्य झाले. असा आरोप फेसबुकवर लागला आहे.

स्वतः केम्ब्रिज ऍनालिटिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी, 'हा डेटा उपलब्ध होता परंतू तो वापरण्याऐवजी रिपब्लिकन पार्टीकडे असलेला मतदारांचा डेटा वापरला कारण तो अधिक अचूक होता', असे जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदी उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीची व्यक्ती बसण्यात डेटाचोरीचा हात होता की नाही हे गुलदस्त्यात असले तरी फेसबुकला गंडवून त्याद्वारे फेसबुक यूजर्सना गंडवणे ऍप्सना सोपे आहे हे उघडकीस आले आहे. आम्ही जिच्यावर विश्वास ठेवला ती व्यवस्था अपूर्ण आहे, तिला वाकवणे सहजशक्य आहे आणि आमच्या डेटाबाबत ती पुरेशी गंभीर नाही हा धक्का मोठा असल्याने २०१३-१४ मध्ये झालेल्या या डेटाचोरीचा धुरळा आता उडतो आहे.

याशिवाय या गदारोळाला रशियन गुप्तचर संस्थांच्या कारवायांचाही एक मुद्दा आहे. त्याबाबत आणि आता पुढे काय होणार याबाबत पुढील भागात लिहीन आणि ही लेखमाला पूर्ण करीन.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ८)

_________

सर्वसाधारणपणे समाजशास्त्र म्हटल्यावर शाळेत इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र (इभूनाशा) असे विषय शिकवले जातात. त्यामुळे समाजशास्त्र म्हणजे सनावळ्या, घराणी, जमीनीची व हवामानाची वैशिष्ट्ये आणि नागरिकांची हक्क व कर्तव्ये, विविध घटनात्मक पदांसाठीची किमान वयोमर्यादा; इतक्याच गोष्टींचा अभ्यास अशी आपली समजूत असते. पण ती फारच अपूर्ण आणि फसवी आहे. समूहांसाठी कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर कसे घ्यावेत? कुठल्या गोष्टींचा विचार करावा? हे मुद्दे समाजशास्त्रात फार महत्वाचे असतात. त्यामुळे इभूनाशा सोडून समाजशास्त्रात समाजाचा अभ्यास दोन अंगाने केला जातो. एकाला डेमोग्राफिक दुसऱ्याला सायकोग्राफिक अभ्यास असं म्हणतात. यात व्यक्तींपेक्षा समूहाच्या लक्षणांचा अभ्यास केला जातो.

डेमोग्राफिक अभ्यासात समूहातील व्यक्तींचे वय, लिंग, भाषा, धर्म, शिक्षण, उत्पन्न, आयुष्यमान, जन्म-मृत्यूदर इत्यादी बाबींची नोंद केली जाते. आणि मग त्यावर स्टॅटिस्टिक्सच्या (सांख्यिकी) सहाय्याने संपूर्ण समाजाच्या गरजांबाबत निष्कर्ष काढले जातात. डेमोग्राफिक अभ्यास ही सर्व सरकारांची आत्यंतिक गरज असते. यासाठी दर दहा वर्षांनी सरकार जनगणना करते. त्यानुसार आपली वेगवेगळी धोरणे आखते.

याउलट सायकोग्राफिक अभ्यासात मूल्य, मत, दृष्टिकोन, आवड निवड इत्यादी बाबींची नोंद केली जाते. या अभ्यासाचा उपयोग जाहिराती आणि जनमानसावर प्रभाव पाडण्यासाठी केला जातो.

डेमोग्राफिक अभ्यासात नोंद केली गेलेली लक्षणे तुलनात्मक दृष्ट्या स्थिर असतात आणि बाह्य वातावरणात काही दीर्घकालीन बदल झाले तरंच त्यांच्यात फरक पडतो. पण सायकोग्राफिक अभ्यासात नोंद केली गेलेली लक्षणे मात्र कायम बदलती असू शकतात आणि बाह्य वातावरणातील अल्पकालीन बदलांचाही त्यांच्यावर मोठा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, २०१० च्या जनगणनेत भारतातील स्त्री पुरुषांचे गुणोत्तर, शिक्षित अशिक्षितांचे गुणोत्तर, अल्प मध्यम उच्च उत्पन्न गटांचे परस्परांशी असलेले गुणोत्तर आणि २०११ मधील याच मुद्द्यांची उत्तरे फारशी वेगळी नसतील. याउलट २०१० च्या जानेवारीतील भारतीयांची मते, आवडी निवडी, दृष्टिकोन नंतर आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे, नवीन माहितीमुळे, प्रचारामुळे लगेच फेब्रुवारी २०१० मध्ये बदलू शकतात.

थोडक्यात डेमोग्राफिक अभ्यास बऱ्यापैकी स्थिर बाबींची नोंद आणि अभ्यास असतो तर सायकोग्राफिक अभ्यास चंचल मनाची नोंद आणि अभ्यास असतो. परिणामी डेमोग्राफिक अभ्यास दहा वर्षातून एकदा आणि संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत केला जातो. तर सायकोग्राफिक अभ्यास वारंवार करावा लागतो आणि तो संपूर्ण लोकसंख्येच्या बाबतीत करण्याऐवजी लोकसंख्येतील एका नमुना गटाचा (सॅम्पलचा) केला जातो. मग त्यावरून संपूर्ण लोकसंख्येसाठी निष्कर्ष काढले जातात.

हे सगळं २००० सालापूर्वी तंतोतंत लागू होतं. पण एकविसाव्या शतकात फेसबुक आलं. त्यामागोमाग मोबाईल क्रांती झाली. फेसबुकने ग्राफ एपीआय सगळ्या यूजर्ससाठी खुला केला आणि अत्यंत कमी खर्चात सायकोग्राफिक अभ्यास करणे सहजशक्य झाले. आता लोक व्यक्त होत होते, पोस्ट्सना लाईक करत होते, कुठे लव्ह, कुठे हाहा, कुठे अँग्री होत होते. हॅशटॅग वापरून एकेक ट्रेंड चालू करत होते किंवा इतरांनी सुरु केलेल्या हॅशटॅगच्या ट्रेंडमध्ये सामील होत होते. वयोगट तेरापासून ते कायमची शुद्ध हरपेपर्यंतचे अगणित लोक फेसबुकवर आपापल्या मतांची पिंक टाकत होते. प्रायव्हसी सेटिंग्ज देऊन फेसबुकने त्यांना एक आभासी सुरक्षा कवच दिलेलं होतं. पण फेसबुकच्या सर्व्हरवर जमा होणारी ही समाजमनाची प्रतिबिंब कोण बघू शकतं याकडे ना यूजर्सचं लक्ष होतं ना फेसबुकचं.

कुणाला वाटेल की फेसबुकवर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादामुळे काय फारसा फरक पडेल? तर फक्त असा विचार करा की तुम्ही मुंबईच्या किंवा कुठल्याही महानगराच्या सगळ्यात मोठ्या डम्पिंग ग्राऊंडच्या मध्यभागी उभे आहात. किंवा मग मणिकर्णिका घाटावर उभे आहात. किंवा मग कायम निर्माल्य फेकले जाते अश्या तलावाच्या काठी उभे आहात. किंवा मग सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी नाशकात आहात. किंवा सबरीमालाच्या किंवा हज यात्रेला गेला आहात.

घरोघरी थोडा वाटणारा कचरा डम्पिंग ग्राउंडवर एकत्र आला की त्रासदायक ठरतो. गावोगावी स्मशानात होणारे अंत्यविधी जेव्हा गंगेच्या किनारी एकाच जागी होऊ लागले की ती जागाही भेसूर होते आणि नदीही प्रदूषित होते. घरोघरी जमा होणारे ओंजळीभर निर्माल्य जेव्हा देवस्थानच्या तलावात पडते तेव्हा त्या तलावाला कुजवून टाकते. आपापल्या गावात असेलेले साधू, बाबा, बैरागी आणि भाविक जेव्हा कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकाच वेळी एकाच ठिकाणी जमतात तेव्हा ते नेहमीपेक्षा जास्त घाण करत नसले तरी एकाजागी एकाच वेळी इतके लोक आल्याने तेथील सांडपाण्याच्या व्यवस्थेवर ताण पडतो. सबरीमाला किंवा हजला इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आल्यावर एक छोटीशी चूकही चेंगराचेंगरीला आणि दुर्घटनेला कारणीभूत होऊ शकते.

मोबाईलक्रांती, इतरत्र गुंतलेले स्पर्धक आणि डेटा सुरक्षेच्या बाबतीत तीस वर्षे जुन्या संकल्पना व तितकेच जुने कायदे असल्याने सामाजिक व कायदेशीर नियंत्रणाचा अभाव आणि व्यक्त होण्याचा मोफत प्लॅटफॉर्म यामुळे अल्पावधीत फेसबुक अभूतपूर्वरीत्या लोकप्रिय झालं. विचारांपेक्षाही आपल्या भावना व्यक्त करायला फेसबुक वापरलं जाऊ लागलं. आणि आपल्याला जरी फेसबुक ही समविचारी मित्र मिळवण्याची सोन्याची खाण वाटली तरी एकाच ठिकाणी जमा होणाऱ्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादांमुळे फेसबुक म्हणजे समाजाच्या भावनांचं डम्पिंग ग्राउंड बनत चाललं होतं. व्यक्तीला उपयुक्त वाटलं तरी समूहासाठी विषारी ठरू शकणारं. एका चुकीमुळे अनेकांची चेंगराचेंगरी करू शकणारं.

जागतिक महायुद्धांचं वर्णन करताना पाठयपुस्तकात एक वाक्य होतं की पहिल्या महायुद्धापूर्वी युरोपची अवस्था दारूगोळ्याने भरलेल्या कोठारासारखी होती. आणि ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फर्डिनांड याच्या खुनाने त्यावर ठिणगी पडली. त्याच धर्तीवर मी म्हणू शकतो की २०१३ पूर्वी फेसबुकची अवस्था दारुगोळ्याने भरलेल्या कोठारासारखी होती. आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या अलेक्झांडर कोगनने ‘धिस इज युअर लाईफ’ नावाचा एक सर्व्हे फेसबुकवर सुरु केल्याने त्यावर ठिणगी पडली.

अलेक्झांडर कोगन हा जुन्या सोव्हिएत रशियाच्या मोल्डाविया प्रांतात जन्मलेला पण अमेरिकेत आणि हॉंगकॉंगमध्ये मानसशास्त्राचे शिक्षण पूर्ण करून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत असलेला डेटा सायंटिस्ट आहे. लोकांच्या आवडीनिवडीवरून त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या निर्णयांबद्दल अचूक अनुमान काढता येते का? हा त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने आपल्याकडील डेटा वापरण्यास त्याला परवानगी नाकारली. म्हणून २०१३ मध्ये कोगनने ग्लोबल सायन्स रिसर्च नावाने एक कंपनी सुरु केली. या कंपनीत केम्ब्रिज ऍनालिटिकने पैसे गुंतवले. काम एकंच अमेरिकेतील लोकांचे शक्य तितके डेमोग्राफिक आणि सायकोग्राफिक डिटेल्स गोळा करणे. मग ग्लोबल रिसर्च कंपनीने एक ऍप लॉंच केले. त्याचं नाव ‘धिस इज युअर लाईफ’.

इंटरनेटवर काही कामे “मानवी बुद्धिमत्तेची कामे” म्हणून ओळखली जातात. जसे की एखादे चित्र पोर्नोग्राफिक आहे की नाही? किंवा सर्च रिझल्ट्स मधून इमेल ऍड्रेस शोधणे, वगैरे. अशी कामे जगभरातील फ्री लान्सर्स करत असतात (एका चित्राला / ईमेल ऍड्रेसला १ ते १५ सेंट्स या दराने) या फ्री लान्सर्ससाठी एक अॉनलाईन प्लॅटफॉर्म आहे मेकॅनिकल टर्क. हा प्लॅटफॉर्म ऍमेझॉन कंपनीच्या मालकीचा आहे. ज्यांना काम द्यायचे आहे ते फ्री लान्सर्सना या प्लॅटफॉर्मवर भेटतात. ग्लोबल सायन्स रिसर्चने आपले ‘धिस इज युअर लाईफ’ या मेकॅनिकल टर्कवर लॉन्च केले. त्यात एक छोटा सर्व्हे होता. तुमचं नाव, वय, शहर, अशी जुजबी माहिती त्यात भरायची. फक्त काही अटी होत्या.
  1. तुमचं फेसबुक अकाउंट असलं पाहिजे. 
  2. ‘धिस इज युअर लाईफ’ मध्ये माहिती भरताना तुम्ही तुमचं फेसबुक लॉगिन वापरलं पाहिजे. 
  3. ‘धिस इज युअर लाईफ’ तुमचा जो डेटा फेसबुककडून मागेल तो द्या, अशी मुक्त परवानगी तुम्ही फेसबुकला द्यायला पाहिजे. 
बदल्यात तुम्हाला १ ते ४ डॉलर्स मिळतील.

जेव्हा कुणी फ्री लान्सर हे काम घेत असे तेव्हा त्याचे, त्याच्या मित्रांचे फेसबुकवर जमा झालेले सर्व डिटेल्स ‘धिस इज युअर लाईफ’ ला मिळू लागले. अगदी त्यांनी कशा कशाला लाईक केले आहे पासून ते त्यांच्या मेसेजेसपर्यंत. साधारणपणे एका व्यक्तीला २०१४ मध्ये ३४० मित्र होते असं मानलं तरी एका फॉर्ममधून ‘धिस इज युअर लाईफ’ला ३४१ लोकांचा डेटा त्यांच्या नकळत मिळायला सुरवात झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे डेटा चोरीला सुरवात झाली. पण काही युजर्सनी याची तक्रार ऍमेझॉनकडे केली. प्लॅटफॉर्मच्या अटींचा भंग करणारे ऍप म्हणून ऍमेझॉनने ‘धिस इज युअर लाईफ’ला प्लॅटफॉर्मवरून हाकलले.

मग ग्लोबल सायन्स रिसर्चने आपले ऍप सरळ फेसबुकवर लॉन्च केले. आणि अनेक अमेरिकन लोकांनी आपली आपल्या मित्रांची माहिती स्वखुशीने या ऍपला दिली. सर्व्हेत भाग घेणाऱ्या प्रत्येकामुळे त्याच्या मित्रांचीही माहिती त्यांच्या नकळत अगदी सहजगत्या ग्लोबल सायन्स रिसर्चकडे परिणामी केम्ब्रिज ऍनालिटीकाकडे जमा होत होती.

यात फेसबुककडून झालेली मोठी गडबड म्हणजे सुरवातीला केवळ सर्वव्यापी परवानगी दिली की पुढे कुठलीही परवानगी मागण्याची गरज कुठल्याही ऍपला लागत नव्हती. आपण आपल्या कुठल्या डेटाला वापरण्याची परवानगी देतो आहोत याची यूझर्सना अजिबात कल्पना नव्हती, कारण आपला किती डेटा फेसबुककडे जमा झालेला आहे हेदेखील कुणाला माहित नव्हते. जेव्हा फेसबुकला ही गडबड कळली तेव्हा घाईघाईत ग्राफ एपीआय बदलण्यात आला. ग्लोबल सायन्स रिसर्चला तोपर्यंत जमवलेला डेटा डिलीट करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे डेटा डिलीट केला आहे या कबुलीवर विश्वास ठेवला गेला. पण तोपर्यंत ग्लोबल सायन्स रिसर्चकडे ५ कोटी लोकांचा, त्यांच्या लाईक्ससह इतर सगळा डेटा जमा झाला होता. आणि तो केम्ब्रिज ऍनालिटिकाकडे दिला गेला होता. हा डेटा आम्हीपण डिलीट केला आणि २०१६च्या अमेरिकन निवडणुकीत वापरला नाही असं केम्ब्रिज ऍनालिटिकादेखील म्हणते.

म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर ऍप काय करत आहेत इथे फेसबुकचे लक्ष नसल्यामुळे डेटाची चोरी झाली;
आपण कुठले ऍप वापरतो आहोत? ते ऍप आपल्याकडे कुठल्या आणि किती प्रकारच्या परवानगी मागते आहे? इथे यूजर्सचे लक्ष नसल्यामुळे डेटाची चोरी झाली; हे तर नक्की आहे.

पण या चोरीमागे उद्देश काय होता? आणि २०१४ मध्ये झालेल्या चोरीबद्दल इतका आरडा ओरडा आता २०१८ मध्ये का होतो आहे? या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात शोधण्याचा प्रयत्न करूया.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ७)

_________

ऍपलचं नियोजन परिपूर्ण होतं. स्वतःचा नफा, यूझर्ससाठी सुलभ आणि उपयुक्त व्यवस्था, ती चालावी म्हणून वर ऍप डेव्हलपर्स तर खाली नेटवर्क ऑपरेटर्सशी भागीदारी आणि स्पर्धकांच्या विरुद्ध पेटंट कायद्याचा धाक हे त्या नियोजनाचे मुख्य पैलू होते. आयफोनसाठी ऍपलने हार्डवेअर सॉफ्टवेअर या दोन्हीची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. ऍपल स्वतःला सोशल नेटवर्क किंवा पब्लिशिंग प्लॅटफॉर्म मानत नव्हती (आणि नाही) ऍपलच्या जन्मापासून ती एक तंत्रज्ञान कंपनी होती. त्यामुळे ऍपल जाहिराती वापरणार नव्हती. यूझर्सचा जो डेटा ऍपलकडे जमा होणार होता त्यावर ऍपलला आपले जाहिरातींचे साम्राज्य उभारायचे नव्हते. हे सगळे अगदी योग्य असले तरी याचा परिणाम म्हणून आयफोनची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नव्हती.

मग आयफोनची किंमत कमी वाटावी म्हणून ऍपलने मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सशी करार केले. म्हणजे आयफोन वापरायचा असेल तर विशिष्ट नेटवर्क ऑपरेटरच वापरावा लागेल. खुला आयफोन महाग असेल तर नेटवर्क ऑपरेटर्ससोबत घेतलेला आयफोन मात्र स्वस्त असेल. थोडक्यात नेटवर्क ऑपरेटर तुमच्या आयफोनला सब्सिडाईझ करतील. तुम्ही त्यांच्या नेटवर्कवरून डेटा वापरणार असल्याने त्यांना डेटा चार्जेस मिळतील. म्हणजे तुमच्याकडे ऍपलचा कॉम्प्युटर, ऍपलचा फोन, आणि ऍपलच्या भागीदाराचं मोबाईल नेटवर्क असेल तर तुम्हाला ऍपलने तयार केलेल्या बंदिस्त व्यवस्थेचा लाभ घेता येणार होता आणि हा ब्रँड वापरताय म्हणजे तुमच्या मित्रमंडळीत तुमची वट राहणार होती.

याउलट अँड्रॉइडने घाईघाईने रस्ता बदलला होता. आयफोननंतर बाजारात आलेली होती. स्वतः हार्डवेअर बनविण्यात अँड्रॉइडला रस नव्हता. उलट विविध हार्डवेअर उत्पादकांशी अँड्रॉइडने करार केले होते. म्हणजे ऍपलने मोबाईल उत्पादन स्वतः करायचे ठरवल्याने सरळ मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सशी करार केले. याउलट अँड्रॉइडवाल्या गूगलने मोबाईल उत्पादकांशी करार केले.

आता मोबाईल उत्पादकांसाठी समस्या तयार झाली. जर एलजी, सोनी, सॅमसंग, मोटोरोला सगळ्यांकडे सारखीच ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर मग लोक एलजीऐवजी सॅमसंग किंवा सॅमसंगऐवजी मोटोरोलाचे फोन का म्हणून घेतील? मग जणू याला उत्तर म्हणून प्रत्येक मोबाईल उत्पादक, अँड्रॉइड वापरून स्वतःची वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करत गेले. त्यामुळे गुगलने अँड्रॉइडची नवीन आवृत्ती बाजारात आणली तरी सर्व मोबाईल उत्पादकांना आपापल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लगोलग सुधारणा करणे अशक्य होते. परिणामी जेव्हा ऍपल ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन आवृत्ती बाजारात आणत होती तेव्हा जगभरातील सर्व आयफोन्सवर ती एकाचवेळी उपलब्ध होत होती. याउलट गूगलने अँड्रॉइडची नवीन आवृत्ती आणली तरी जगभरातील सर्व अँड्रॉइड फोन्सवर ती एकाचवेळी उपलब्ध होत नव्हती (अजूनही होत नाही).

पण लोक तक्रार करत नव्हते. कारण अँड्रॉइड मोफत असल्याने फोनची किंमत आयफोनच्या तुलनेत कमी होती. त्याशिवाय हवा तो नेटवर्क ऑपरेटर निवडण्याचे स्वातंत्र्य अँड्रॉइडमध्ये मिळत होते. किंमत कमी. हवा तो नेटवर्क ऑपरेटर. हवा तो मोबाईल उत्पादक निवडायचे स्वातंत्र्य. या सगळ्याच्या बदल्यात फक्त गोष्ट सक्तीची होती. ती म्हणजे प्रत्येक अँड्रॉइड फोनबरोबर तुम्हाला तुमचे गूगल अकाउंट जोडणे आवश्यक होते. परिणामी तुमच्या दिवसभराची सगळी माहिती गूगलकडे जात राहिली. तुम्हाला कुठल्या जाहिराती दाखवायच्या याबाबत गूगल अधिक अचूक होत राहिले. जवळपास प्रत्येक महिन्यात एक नवीन उत्पादक नवीन अँड्रॉइड फोन घेऊन बाजारात येत होता. किंमत कमी असल्याने नवनवीन ग्राहक बाजारात येत होते. परिणामी नेटवर्क ऑपेरेटर्सनाही नवनवीन ग्राहक मिळत होते. म्हणजे मोबाईल फोनच्या जगात ऍपल आणि अँड्रॉइड हे दोन प्लॅटफॉर्म सशक्तपणे उभे राहिले. या प्लॅटफॉर्मवर अनेक ऍप्स होती. त्यात सगळ्यात जास्त लोकप्रिय होऊ लागले ते फेसबुकचे ऍप.

ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून आपण आता चोरीकडे वळूया. कशाची चोरी झाली? तर डेटाची चोरी झाली. ती कशी झाली ते आपण बघूया. डेटा चोरी म्हटलं की साधारणपणे आपल्याला वाटतं, कुणीतरी अंगाला घट्ट बसणारा आणि संपूर्ण अंग झाकणारा काळा पोषाख घालून फेसबुकच्या सर्व्हररुमध्ये घालून गेले असेल. सर्व सुरक्षा यंत्रणांना चकवत आपला पेन ड्राईव्ह सर्व्हरला जोडला असेल आणि मग तिथला डेटा चोरून नेला असेल. जर असे काही कुणाच्या मनात आले तर ती व्यक्ती फार मोठ्या प्रमाणावर चित्रपट बघते आहे आणि त्यात जे काही दाखवतात त्यावर विश्वास ठेवते आहे असे समजायला हरकत नाही. डेटा चोरी अशी झाली नाही तर मग झाली कशी? ते समजून घ्यायला आपण प्रथम इंटरनेट सिक्युरिटीमागच्या संकल्पना थोडक्यात समजून घेऊ.

जेव्हापासून इंटरनेट वापरून माहितीची देवाणघेवाण सुरु झाली तेव्हापासून इंटरनेट सिक्युरिटीच्या पायाभरणीस सुरुवात झाली. नंतर १९९०च्या दशकात ईबे सुरु झाल्यावर, इंटरनेट बँकिंग सुरु झाल्यावर आणि जगभरातील सरकारी विभागांनी नागरिकांची कामे इंटरनेटवरून करायला सुरुवात केल्यावर इंटरनेट सिक्युरिटीच्या बाबतीत चार महत्वाच्या संकल्पना तयार झाल्या.

पहिली संकल्पना आहे कॉन्फिडेन्शियालीटी (Confidentiality) म्हणजे गुप्तता. ज्याच्यासाठी संदेश पाठवला आहे त्याला सोडून इतर कुणालाही तो संदेश वाचता येऊ नये.

दुसरी आहे इंटिग्रिटी (Integrity) म्हणजे म्हणजे अखंडत्व. संदेश जसा पाठवला आहे त्याच स्वरूपात कुठलाही बदल न करता समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा.

तिसरी आहे ऍव्हेलेबिलिटी (Availability) म्हणजे उपलब्धता. संदेश पाठवणारी, साठवणारी आणि शोधणारी व्यवस्था कायम उपलब्ध असली पाहिजे.

आणि चौथी आहे नॉन रेप्यूडिएशन (Non Repudiation) म्हणजे नाकारण्याची शक्यता नसणे. ज्याने संदेश पाठवला त्याला, 'तो त्यानेच पाठवला आहे' हे आणि ज्याला संदेश मिळाला त्याला, 'तो मिळाला आहे' हे नाकारता येणे अशक्य असले पाहिजे.

एखाद्या व्यवस्थेत जर या चार संकल्पना पूर्णपणे राबवल्या असतील तर ती इंटरनेटवरील माहितीच्या बाबतीतील परिपूर्ण आणि सुरक्षित व्यवस्था आहे हे मानले जात होते. इंटरनेट बँकिंगची सुविधा देणाऱ्या सर्व बँका, इंटरनेट वापरून इंश्युरन्स विकणाऱ्या, रेल्वे किंवा विमान प्रवास बुकिंग करून देणाऱ्या ईमेल सुविधा देणाऱ्या, वस्तू विकणाऱ्या ईबे किंवा अमॅझॉनसारख्या कंपन्या, आयकर किंवा तत्सम कराची विवरणपत्रके स्वीकारणारे सरकारी विभाग, या सर्व व्यवस्थांमध्ये या चारही संकल्पना काटेकोरपणे अमलात आणण्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. फेसबुकनेदेखील सोशल नेटवर्कची आपली व्यवस्था उभारताना या चारही संकल्पना बिनचूकपणे अमलात आणल्या होत्या आणि अजूनही त्यांच्यात कुठेही निष्काळजीपणा केलेला नाही. त्यामुळे फेसबुक आपल्या व्यवस्थेबद्दल आश्वस्त होती.

असे असेल तर मग डेटा चोरी झालीच कशी?
उत्तर अगदी सोपे आहे. ते लपले आहे वर उल्लेख केलेल्या संकल्पनांपैकी पहिल्या संकल्पनेमध्ये आणि फेसबुकवर तयार होणाऱ्या डेटामध्ये.

इंटरनेट सिक्युरिटीमध्ये पहिली संकल्पना आहे कॉन्फिडेन्शियालीटी (Confedentiality) म्हणजे गुप्तता. जेव्हा आपण आपला एखादा फोटो किंवा व्हिडीओ किंवा पोस्टस्वरूपातील कुठलाही डेटा आपल्या फोनमधून किंवा डेस्कटॉपवरून फेसबुकच्या सर्व्हरकडे पाठवतो तेव्हा जर आपल्या फोनमध्ये / डेस्कटॉपवर कुठलेही मालवेअर नसेल तर तो डेटा फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत गुप्तपणेच पोहोचतो. इंटरनेटवरून तो डेटा फेसबुकपर्यंत पोहोचताना मध्ये तो इतर कुणाला बघता येत नाही. पण गंमत नंतर सुरु होते. एकदा तुमची पोस्ट फेसबुकच्या सर्व्हरपर्यंत पोहोचली की तुम्हाला ती सगळ्यांना दाखवायची असते. म्हणजे ती पोस्ट फेसबुकवर प्रसिद्ध व्हावी, जगाला दिसावी, गुप्त न राहावी हीच तुमची इच्छा असते. किंबहुना, तुम्ही इतरांच्या कुठल्या पोस्टला लाईक केले आहे, काय प्रतिसाद दिला आहे तो देखील संपूर्ण जगासमोर खुला असतो. त्यात गुप्त असे काही नसते.

तुमच्या बँक खात्यात किती पैसे आहेत, तुम्ही कधी किती पैसे भरले, काढले याची माहिती जगाला कळावी असे तुम्हाला वाटत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरून बँकेचे व्यवहार करता तेव्हा तुम्हाला व्यवहार करताना कॉन्फिडेन्शियालीटीची (Confedentiality) गुप्ततेची आवश्यकता असते व व्यवहार करून झाल्यावर प्रायव्हसीची (privacy) गोपनीयतेचीही अपेक्षा असते. याउलट इंटरनेट वापरून फेसबुकवर जाताना जगापुढे प्रसिद्धी हीच अपेक्षा असल्याने डेटा पाठवताना गुप्तता (confidentialitty) हवी की नको आणि डेटा पाठवून झाल्यावर (privacy) गोपनीयता हवी की नको याबाबत यूझर्स अतिशय गोंधळलेले असतात.

पण फेसबुकवर आपली पोस्ट प्रसिद्ध झाली आणि ती जगासाठी खुली राहिली तर अनोळखी व्यक्तींकडून त्रास होऊ शकतो किंवा काही ओळखीच्या व्यक्तींनाही काही पोस्ट दिसू नये असे यूझर्सना वाटू शकते; याचे भान ठेवत फेसबुकने प्रायव्हसी सेटिंग्ज नावाची व्यवस्था सुरु केली. नीट विचार केला तर लक्षात येईल की ही प्रायव्हसी सेटिंग्ज खरं तर पब्लिसिटी सेटिंग्ज आहेत, कारण आपल्या पोस्ट्स कुठल्या लोकांना दिसाव्यात याचे ते सेटिंग्ज आहेत. केवळ नाव प्रायव्हसी सेटिंग्ज दिल्यामुळे अनेकांना आपला डेटा फेसबुकवर प्रायव्हेट (गोपनीय) आहे असा भ्रम झाला. तुमच्या पोस्ट्स कुणाला दिसतील, तुम्ही ज्यांना ब्लॉक कराल त्यांना दिसतील की नाही यावर जरी तुमचे नियंत्रण असले तरी तुम्ही कुठल्या भाषेत पोस्ट करता, कुठून पोस्ट करता, कुठल्या विषयांवर पोस्ट करता, कुठल्या विषयांवर प्रतिसाद देता, कशावर कश्या प्रकारे रिऍक्शन देता हा डेटा फेसबुककडे जमा होत होता. आणि फेसबुकने त्याचे काय करावे यावर तुमचे नियंत्रण नव्हते आणि अजूनही नाही.

हा डेटा किती असतो हे समजण्यासाठी फेसबुक तुम्हाला मधून मधून जी समरी देते ती नीट बघा.मागील अमुक महिन्यात तुम्ही किती नवीन मित्र केलेत, किती पोस्ट्सना लाईक, लव्ह, हाहा केलेत, किंवा तुमच्या पोस्ट्सना किती जणांनी काय रिअक्शन दिली त्याचे छान दिसणारे व्हिडीओ पहा. आणि आता असा विचार करा की फेसबुककडे सगळ्या यूझर्सचा असा संपूर्ण डेटा आहे. आणि छान दिसणारे व्हिडीओ तुम्हाला दाखवण्याखेरीज या डेटाचे फेसबुकने काय करावे यावर आपले काही नियंत्रण नाही.

मग फेसबुकने ग्राफ एपीआय (Graph API) नावाची व्यवस्था उभी केली. आणि सर्व यूजर्सचा हा सगळा डेटा जाहिरातदारांसाठी खुला केला. केवळ जाहिरातदारांसाठी नाही तर ज्याला फेसबुक डेव्हलपर कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे त्या सर्वांसाठी खुला केला.

जास्तीत जास्त लोक मोबाईलवरून फेसबुक वापरू लागले होते. त्यांचे अकाउंट कुणी हॅक करू नये म्हणून फेसबुकने त्यांना अकाउंट फेसबुकशी जोडून घेण्याचा सल्ला दिला. मोबाईलवरून आपली मोफत सेवा वापरणाऱ्या लोकांनी कुठल्याही ब्राऊजरमधून आपल्या वेबसाईटवर न येता केवळ फेसबुकचे ऍप वापरावे जेणेकरून कुठल्याही ब्राऊजरद्वारे गूगलला फार माहिती मिळणार नाही आणि एकदा का फेसबुकवर आले की मग बाहेर न पडता सगळे यूझर्स इथेच एकमेकांच्या भिंतीवर खेळत बसतील म्हणून फेसबुकने आपले ऍप पुढे रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. जेव्हा ऍप ऍपलच्या आयफोनसाठी बनवायचे तेव्हा ऍपलच्या जाचक अटी पाळाव्या लागतात. पण अँड्रॉइडसाठी बनवायचे तर अटी शिथिल असतात (कारण वेगवेगळ्या मोबाईल उत्पादकांना सोयीचे व्हावे म्हणून अँड्रॉइडची व्यवस्था ऍपलच्या व्यवस्थेपेक्षा फार मोकळी ढाकळी आहे) याचा फेसबुकने फायदा घेतला.

ऍप कसे असावे? त्याला आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टिमकडून कुठली आणि किती माहिती मिळेल? याचे नियम ऍपल ठरवते. त्यामुळे जे ऍप आयफोनच्या यूझर्सना मिळते ते डाउनलोड करून वापरणे इतकी साधी गोष्ट यूझर्ससाठी बाकी राहिलेली असते.फक्त ऍपला कुठल्या कुठल्या परवानगी द्यायच्या ते आधी ठरवायचे. याउलट सिस्टीम मोकळी ढाकळी ठेवणे आवश्यक असल्याने अँड्रॉइडला सुरवातीला ते आवश्यक वाटले नाही. अर्थात पाचव्या आवृत्तीनंतर अँड्रॉइडनेही तेच धोरण राबवत युझर्सवर एक जबाबदारी टाकली. कुठलेही ऍप डाउनलोड केलेत आणि वापरायला सुरवात करणार असाल तर आता अँड्रॉइड तुम्हाला अनेक प्रश्न विचारेल. जसे की, या ऍपला तुमची फोटो गॅलरी बघायची आहे, परवानगी देऊ का? तुमचे काँटॅक्ट्स बघायचे आहेत, परवानगी देऊ का? तुमचे कॉल लॉग बघायचे आहेत, परवानगी देऊ का? तुमचे एसेमेस आणि त्याचे लॉग बघायचे आहेत, परवानगी देऊ का? तुमचा कॅमेरा वापरायचा आहे, परवानगी देऊ का? तुमची लोकेशन ट्रॅक करायची आहे, परवानगी देऊ का? मग तुम्ही हो किंवा नाही म्हणाल त्याप्रमाणे त्या ऍपला विविध परवानगी मिळू लागतात किंवा मिळणे बंद होते. आता जर तुम्ही फेसबुक ऍपला फोटो गॅलरी बघण्याची परवानगी नाकारलीत तर मग तुमच्या फोनमधून कुठलाही फोटो फेसबुक ऍप वापरून फेसबुकवर टाकणे अशक्य असेल. जर तसे करायचे असेल तर आधी नाकारलेली परवानगी फेसबुक ऍपला देऊन मग तुम्ही पुढे जाऊ शकाल.

फोटो गॅलरी, कॅमेरा प्रकरण ठीक आहे. पण फेसबुकने अँड्रॉइडसाठी जे ऍप बनवले त्यात फेसबुकने यूझर्सचे फोन नंबर, काँटॅक्ट्सचे नाव आणि नंबर, एसेमेसचा मेटा डेटा (किती वाजता, कुणाला, किती अक्षरे वगैरे) बघायची परवानगी मागितली. वर मी सांगितलेली अँड्रॉइडची प्रश्न विचारण्याची पद्धत साधारणपणे अँड्रॉइडच्या पाचव्या आवृत्तीपासून (अँड्रॉइड लॉलीपॉपपासून) सुरु झाली. त्याआधी सर्व ऍप्सना त्यांनी मागितलेल्या सर्व परवानग्या आपोआप मिळत होत्या. आणि लॉलीपॉप आवृत्तीनंतरही अनेक यूझर्स अँड्रॉइडने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ‘हो. परवानगी द्या.’ असंच देतात. त्यामुळे फेसबुककडे अनेक यूझर्सचा डेटा अतिप्रचंड प्रमाणात गोळा होऊ लागला. आणि फेसबुक ग्राफ एपीआय मुळे जाहिरातदार, गेम डेव्हलपर्स अश्या अनेकांना तो उपलब्ध होऊ लागला.

तुमच्या पोस्ट्स कुणाला दिसाव्यात हे तुमच्या हातात होतं पण तुम्ही तयार केलेला महाप्रचंड डेटा फेसबुकने कसा वापरावा यावर कुणाचंच नियंत्रण नव्हतं. Confidentiality, Authentication, Availability आणि Non Repudiation या तत्वांवर उभी असलेली व्यवस्था इंटरनेट बँकिंग साठी, ईमेलसाठी, सरकारी कार्यालयांसाठी योग्य होती. कारण तिथे व्यवहार जगाला दाखवणे हा मुद्दाच नव्हता. परंतु या संकल्पना तयार होऊन ३० -४० वर्षे लोटल्यानंतर जन्म घेतलेल्या फेसबुकसमोर नवीन प्रश्न होता. लोक इथे जे करणार होते ते जगाला दाखवण्यासाठीच करणार होते. आणि सेवा फुकट ठेवायची होती. त्यामुळे जाहिरातदार आवश्यक होते. आणि लोकांना फेसबुकबाहेर पडू द्यायचे नव्हते त्यामुळे गेम्स आणि इतर गमतीदार ऍप्स असणेही आवश्यक होते. परिणामी फेसबुकने प्रायव्हसी सेटिंग्जच्या नावाखाली आपल्या हातात पब्लिसिटी सेटिंग्ज ठेवली. आणि तयार होणारा महाप्रचंड डेटा सर्व ऍप्सना उपलब्ध करून दिला.

थोडक्यात सांगायचं म्हणजे फेसबुकवर आपण सगळ्यांनी मुख्य दाराला कुलूप लावले पण सर्व खिडक्या उघड्या ठेवल्या आणि मागचे दार उघडे ठेवले. डेटा चोरी कुणी केली नाही. तर आपण सगळ्यांनी आपापला डेटा फेसबुकला, त्याच्यावरच्या गेम्सना, विविध ऍप्सना स्वहस्ते उपलब्ध करून दिला. त्याद्वारे आपण कोण? आपले मित्र कोण? आपण काय वाचतो, कशावर कसा प्रतिसाद देतो? ही माहिती ज्याला हवी त्याला मिळू लागली.

आणि अशात एक दिवस केम्ब्रिज ऍनालिटिका फेसबुकवर आली.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ६)

_________

मागील भागाच्या शेवटी आपण बघितलं की गूगलने आपली शक्ती अँड्रॉइडच्या मागे तर फेसबुकने सोशल नेटवर्कच्या मागे लावली. हे निर्णय त्यांनी का घेतले असावेत हे बघितले की या कंपन्या कसा विचार करतात ते लक्षात येईल.

कॉम्प्युटरच्या क्षेत्रात 'प्लॅटफॉर्म' आणि 'प्रॉडक्ट' या दोन महत्वाच्या संकल्पना आहेत. आपण जरी भारताला आयटी सुपरपॉवर मानत असलो तरी आपल्याकडील कंपन्या प्रामुख्याने परदेशी कंपन्यांना सेवा देण्यात गुंतलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे या संकल्पना विशेष रुळलेल्या नाहीत. पण कॉम्प्युटरच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्टने या संकल्पना यशस्वीपणे राबवल्या. मायक्रोसॉफ्टने केवळ एमएस ऑफिस हे प्रॉडक्ट न राहाता तो प्लॅटफॉर्म कसा बनेल इथे पूर्ण लक्ष दिले. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइण्ट मधील मॅक्रो ही सुविधा किंवा व्हिज्युअल बेसिक वापरून ऑफिस ऍक्सेस या डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये स्वतः प्रोग्रॅम लिहिण्याची सुविधा या निर्णयांमुळे मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरवर स्वतःचे सॉफ्टवेअर उभे करणाऱ्या अनेक कंपन्या सुरु झाल्या. त्यामुळे ज्याप्रमाणे तुम्हाला इमारतीत घर घ्यायचे असेल तर इमारतीच्या बांधकामाच्या खर्चाबरोबर जमिनीचा खर्चही द्यावा लागतो त्याप्रमाणे अनेक सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टच्या मूळ सॉफ्टवेअरवर तयार झाल्याने, १९९०च्या दशकात मायक्रोसॉफ्टला वगळून पुढे जाणे कठीण झाले होते. कुठल्याही कंपनीच्या डेस्कटॉप सॉफ्टवेअरसाठी मायक्रोसॉफ्ट म्हणजे जणू इमारतीखालची जमीन बनली होती.

गूगलला इंटरनेटवर हेच करायचे होते. इंटरनेटवर काय आहे त्याची इंडेक्स बनवताना गूगलला जगातील सगळी माहिती आणि सगळे व्यवहार इंटरनेटवर आणायचे होते. त्यासाठी मायक्रोसॉफ्टपेक्षा अधिक मोठा प्लॅटफॉर्म बनवणे आवश्यक होते. सुरुवात सर्च इंजिनने झाली तरी शेवट तिथे होणार नव्हता. अधिकाधिक लोकांनी इंटरनेटवर येणे आवश्यक होते.

लोक इंटरनेटवर माहिती आणि मनोरंजनासाठी येत होते. कुठल्या वेबसाईटवर कुठली माहिती मिळेल त्यासाठी गुगलच्या होमपेजवर येत होते. सर्च करत होते. गूगल त्यांना सर्च रिझल्ट्स देत होतं. आणि बाजूला जाहिराती दाखवत होतं. मग गूगलने इंटरनेटचा प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं. ऍडसेन्स या प्रोग्रॅमखाली गूगलने आपल्याकडील जाहिराती इतरांच्या वेबसाईट्सवर दाखवणे सुरु केले. जाहिरातदार गूगलला पैसे देणार. गूगल वेगवेगळ्या वेबसाईट्सशी करार करणार. लोक गूगलच्या होमपेजवर सर्च करणार. गूगल सर्च रिझल्ट्सबरोबर जाहिराती दाखवणार. नंतर तुम्ही वेबवर जिथे जिथे जाल त्या वेबसाईटने जर गूगलशी करार केला असेल तर त्यांच्या वेबसाईटवरही तुम्हाला त्याच किंवा तशाच जाहिराती दिसत राहणार. आणि मग जाहिरातीच्या उत्पन्नातील एक भाग गुगल त्या वेबसाईटच्या मालकालाही देणार. आता गुगल मोठी व्हावी ही इच्छा इतर वेबसाईटच्या मालकांनाही होईल याची खात्री झाली.

मनोरंजन आणि माहितीच्या क्षेत्रासाठी गूगल स्वतःला प्लॅटफॉर्म विकसित करत असतानाच २००६ मध्ये गूगलने मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील वर्ड एक्सेल आणि पॉवरपॉईंट सारखे प्रोग्रॅम्स फुकट द्यायला सुरवात केली. जीमेल अकाउंट उघडलं की त्यासोबत हे सगळे प्रोग्रॅम्स गूगल डॉक्स या नावाने फुकटात उपलब्ध होणार होते. हे प्रोग्रॅम्स वापरण्यासाठी तुमच्याकडे फक्त कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक होतं. कॉम्प्युटरवर कुठलाही प्रोग्रॅम इन्स्टॉल न करता केवळ ब्राऊजर वापरून तुम्हाला ऑफिसची कामे करता यावीत. कॉम्प्युटर बदलला, व्हायरसचा किंवा हार्ड डिस्क क्रॅश झाली, यापैकी कुठलाच त्रास तुमचं काम थांबवू शकणार नव्हता. कारण तुमच्या फाईल्स तुमच्या कॉम्प्युटरवर न राहता गूगलच्या सर्व्हरवर राहणार होत्या.

मग २००८ मध्ये गूगलने क्रोम नावाचा वेब ब्राऊजर जगाला फुकट उपलब्ध करून दिला. आता लोक गूगलच्या ब्राऊजरने गूगलचं सर्च इंजिन वापरून वेबवर फिरणार होते. जीमेल वापरून एकमेकांना इमेल करणार होते. ब्लॉग वाचणार होते. यू ट्यूब व्हिडीओ बघणार होते. वेबसाईट वर्डप्रेसवर बनवलेली असो वा ड्रुपल वा अजून कशाने बनवलेली असो. वेबसाईट्सवर, जीमेलमध्ये, यू ट्यूबवर सगळीकडे जाहिराती असणार होत्या. गूगलने तुमच्यासाठी निवडलेल्या. त्यामुळे गूगलच्या जाहिरात उद्योगाला बहर आला होता. तुमच्या कॉम्प्युटरवर विंडोज असो वा लिनक्स वा ऍपलची ऑपरेटिंग सिस्टीम. तुम्ही वेबवर आलात की तुम्ही गूगलचे झालात. गूगल वेबचा प्लॅटफॉर्म बनला होता. आणि २००८ मध्ये फेसबुकने जाहिराती घ्यायला नुकतीच सुरुवात केली होती. त्यावेळी फेसबुकंच काय पण कुठलंही सोशल नेटवर्क गूगलला टक्कर देण्यासाठी असमर्थ होतं. किंबहुना जाहिरातींच्या प्रचंड साम्राज्याचा डोलारा सांभाळण्यासाठी गूगलला सोशल नेटवर्क या संकल्पनेची आवश्यकताही नव्हती.

गूगलच्या या उत्कृष्ट नियोजनाची दोन गृहीतकं होती. पहिलं गृहीतक मायक्रोसॉफ्टकडून आलेलं होतं. कॉम्प्युटर हे कन्टेन्ट तयार करण्याचं यंत्र (Content Creation Device) आहे तर मोबाईल हे कन्टेन्ट वापरण्याचं यंत्र (Content Consumption Device) आहे. मोबाईल वापरून लोक कन्टेन्ट तयार करू शकणार नाहीत. तर दुसरं गृहीतक मोबाईल नेटवर्कमधील त्रुटींमुळे जन्माला आलेलं होतं. मोबाईलमधून डेटा इतक्या कमी वेगाने मिळत होता आणि तो इतका खर्चिक होता की इंटरनेट वापरण्यासाठी लोक प्रामुख्याने कॉम्प्युटर वापरतील. तरीही गूगलने मोबाईलचं महत्व ओळखून अँड्रॉइड विकसित करण्यास सुरवात केली होती. पण अँड्रॉइडचा नियोजित मार्ग ब्लॅकबेरी आणि नोकिया यांच्या मार्गाने जाणार होता.

गूगलच्या परिपूर्ण नियोजनाला तडा गेला तो २००७ च्या जूनमध्ये. ऍपलने आयफोन लॉन्च केला. आयफोनने आयपॉड, फोन आणि इंटरनेट कनेक्शन डिव्हाईस या तिघांचा कन्व्हर्जन्स तर करून दाखवलाच होता. पण त्याच वेळी कन्टेन्ट तयार करण्यासाठी वेगळी आणि कन्टेट वापरण्यासाठी वेगळी अशी यंत्रांची विभागणी करणारी सीमारेषा पुसून टाकली. आयफोनवरील ऍप्सची कल्पना, त्यांचा सहजगत्या करता येणारा वापर आणि आयफोन व ऍपल कॉम्प्युटरवर या ऍप्सचा सहजगत्या करता येणारा वापर यामुळे इंटरनेटचा वापर करण्याबाबत लोकांच्या धारणा बदलून जाणार होत्या परिणामी गूगलची गृहितकही मोडून पडली. आता वेबच्या वापराचा गूगलपेक्षाही मोठा प्लॅटफॉर्म तयार होत होता. आणि तो ऍपलच्या मालकीचा होणार होता. याला आव्हान देणं गूगलसाठी जितकं महत्वाचं होतं तितकंच ते इतर मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्यासाठीदेखील महत्वाचं होतं.

आता गुगलने घाईघाईत अँड्रॉइडच्या विकासाचं आपलं नियोजन बदललं आणि अँड्रॉइडचा विकास टचस्क्रीनच्या मार्गाने वळवला गेला. ऍपलच्या आयओएसने जगभरात हातपाय पसरण्यापूर्वी अँड्रॉइड जगात पसरणं आवश्यक होतं. त्यासाठी गूगलने आपली नेहमीची हातखंडा युक्ती वापरली. ज्या मोबाईल उत्पादकांना पाहिजे त्यांना अँड्रॉइड मोफत मिळणार होती. अट फक्त एकंच तुमच्या मोबाईलवर गूगलच्या सर्व सर्व्हिसेस द्याव्या लागतील. गूगलचा डाव चांगला होता. आता जर लोक टचस्क्रीन वापरून इंटरनेट वापरणार असतील तर त्यांच्या मोबाईलवरून गूगल सर्व्हिसेस चालू असल्याने गूगलला त्यांच्याबाबत अधिक माहिती मिळणार होती. चोवीस तासात कोण किती वाजता झोपतो, उठतो, कुठे जातो, फिरतो, काय वाचतो, बघतो, ऐकतो, कुठे खातो, किती किमतीच्या हॉटेलात जातो, सगळी माहिती गूगलला मिळणार होती म्हणजे अजून अचूक जाहिराती दाखवणे शक्य होते. म्हणून गूगल खूष होती.

पण अँड्रॉइडच्या विकासाचा आराखडा आयफोनइतका सुव्यवस्थित नव्हता. ऍपलने फोन आणि कॉम्प्युटर यांच्यात सुसंवाद राहावा आणि सिस्टीम बंदिस्त रहावी याप्रमाणे व्यवस्था बनवली होती. ऍपलला जाहिरातींच्या पैशात रस नव्हता. ऍपलला फोन विकून पैसे कमवायचे होते. तर गूगल घाईघाईने इथे आली होती. जाहिराती सोडल्यास गूगलकडे पैसा कमविण्याचं दुसरं साधन नव्हतं. फोनसाठी अँड्रॉइड तर कॉम्प्युटरसाठी क्रोम अशी व्यवस्था गूगलच्या नियोजनात होती. फोन आणि कॉम्प्युटर ऍपल साठी सारखे होते. तर गूगलसाठी वेगवेगळे होते. वेगवेगळ्या मोबाईल उत्पादकांना उपलब्ध करून द्यायची असल्याने अँड्रॉइड बंदिस्त ठेवणे अशक्य होते. या सगळ्यातून ऍपलच्या आयओएसपेक्षा अँड्रॉइड फारच मोकळी ढाकळी बनत गेली. प्रोग्रॅमर्ससाठी ऍपलच्या ऍप स्टोअरवर ऍप्स विकसित करण्यासाठी अटी कडक होत्या आणि खर्चही जास्त होता. गूगलने आपल्या प्लेस्टोअरच्या अटी सौम्य ठेवल्या आणि त्यांचा खर्चही अतिशय माफक. आता मोफत असल्याने अँड्रॉइड वापरून आपले फोन विकणे मोबाईल उत्पादकांना शक्य होते. ऍपलला टक्कर देणे शक्य होते. एचटीसी, मोटोरोला, सॅमसंग, एमआय फोन, मायक्रोमॅक्स विविध कंपन्या बाजारात उतरल्या. अनेक प्रोग्रॅमर्स अँड्रॉइडसाठी ऍप्स विकसित करू लागले. अँड्रॉइड जगभरात पोहोचली. नंबर एकची फोन ऑपरेटिंग सिस्टीम बनली. गूगलच्या मूळ प्लॅटफॉर्मला धक्का बसू नये ही कामगिरी अँड्रॉइडने चोख बजावली.

पण याचा अनपेक्षित फायदा झाला तो फेसबुकला. गूगल अँड्रॉइडच्या मागे लागली असताना फेसबुक मात्र स्वतःच ऍप विकसित करून आपल्या सभासदांसाठी नवनवीन सेवा देण्यात गुंतलं होतं. आणि फोनमधून फोटो काढून लगेच फेसबुकवर टाकणं. बस स्टॉपवर किंवा ट्रेनची वाट बघत किंवा मित्रांची वाट बघत असताना सुचलेले विचार चटकन फेसबुकवर टाकणं सोपं होतं. कन्टेन्ट क्रिएशन साठी घरी जाऊन कॉम्प्युटर चालू करून मग ब्लॉगवर किंवा युट्युबवर टाकण्यापेक्षा फोनमधून जागच्या जागी पोस्ट तयार करून फेसबुकवर टाकून, मग मित्रांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद बघणं यात वेगळी मजा आहे हे लोकांना जाणवू लागलं. लोक फोन चालू करायचे आणि सरळ फेसबुक ऍप उघडायचे. तिथे मित्रांशी गप्पा मारताना जर कधी काही संदर्भाची गरज पडली तर मग गूगल सर्च करायचे. म्हणजे फेसबुक हे मोबाईल पिढीचं होमपेज बनू लागलं. आणि मग फेसबुकनेही जाहिराती दाखवायला सुरवात केली.

आता जाहिरातीतून उत्पन्न मिळवायचं तर मग लोकांनी फेसबुक सोडून बाहेर जायला नको. कारण बाहेरच्या कुठल्याही वेबसाईटवर गेले तर गूगलच्या जाहिरातींचं साम्राज्य आहे. मग गूगलचा डाव आता फेसबुकनेही खेळायला सुरवात केली. आता फेसबुकला प्लॅटफॉर्म बनायचं होतं. म्हणून फेसबुकने गेम डेव्हलपर्सना आपलं सोशल नेटवर्क खुलं करून दिलं. लोकांचा जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर जाऊ लागला. आणि डेटाचोरीसाठी रंगमंच तयार होऊ लागला.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ५)

_________

आयबीएम ही उद्योगांसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी होती. SAP, Oracle, BAAN या सॉफ्टवेअर बनवून उद्योगांना विकणाऱ्या कंपन्या होत्या. ऍपल ही पीसीसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी होती. मायक्रोसॉफ्ट ही पीसीसाठी सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी होती. याहू ही एक वेब पोर्टल कंपनी होती. गूगल एक सर्च इंजिन होते. तर फेसबुक एक सोशल नेटवर्क होते. गुगलने केलेले सोशल नेटवर्क म्हणजे ऑर्कुट आणि फेसबुक यांचा जगासाठी जन्म एक दोन महिन्यांच्या अंतराने झाला. पण त्यातलं फेसबुक टिकलं तर ऑर्कुट बंद पडलं. असं होण्यामागे फेसबुकचा जितका वाटा आहे तितकाच वाटा टेलिफोन उद्योगातील क्रांतीचाही आहे. त्यामुळे या भागात टेलिफोन क्रांतीचा थोडक्यात आढावा घेतो.

१८७६ला अलेक्झांडर ग्रॅहम बेलला अमेरिकेत टेलीफोनचं पेटंट मिळाल्यापासून १९७३ मध्ये मोटोरोलाने जगातील पहिला कुठेही घेऊन जाता येण्याजोगा (कार किंवा ट्रेनमध्ये न बसवलेला) मोबाईल फोन बाजारात आणेपर्यंत टेलिफोनच्या जगातील नवनवे शोध हे टेलिफोनच्या उपकरणाऐवजी टेलिफोनच्या नेटवर्कशी संबंधित होते. टेलीफोन एक्स्चेंजमधील स्विच कसे असावेत? ते माणसांनी नियंत्रित न करता स्वयंचलित कसे करावेत? संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे न्यावेत? तारेतून की बिनतारी? त्यासाठी कुठल्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरावे? रेडिओ लहरी किंवा उपग्रहांचा वापर करून टेलिफोन संदेश कसे पाठवता येतील? यासारखे प्रश्न सोडवण्यात टेलिफोन तंत्रज्ञांना रस होता. टेलिफोनच्या उपकरणात मात्र वरवरचे बदल होत होते.

१९५० मध्ये बाजारात पेजर आले. म्हणजे ध्वनीसाठी आणि लिखित संदेशांसाठी दोन वेगवेगळी उपकरणे विकसित झाली. यातील ध्वनीसाठी असलेला फोन अचल होता. फारतर धावत्या ट्रेनमध्ये किंवा कारमध्ये फोन उपलब्ध झाले होते. पण पेजर जसा ग्राहकांना स्वतःबरोबर कुठेही नेता येत होता त्याप्रमाणे फोन कुठेही नेणे ग्राहकांना शक्य नव्हते. या समस्येतून मोटोरोलाने मार्ग काढला. १९१७ ला एका फिनिश तंत्रज्ञाने मोबाईल फोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. पण प्रत्यक्ष मोबाईल बाजारात यायला १९७३ साल उजाडले. फोनच्या उपकरणाच्या बाबतीत संशोधनाची मंदगती चालू होती. आणि एकाभिमुखता (Convergence) किंवा एकाच उपकरणातून वेगवेगळ्या सेवा ही संकल्पना टेलिफोनच्या विश्वात मूळ पकडत नव्हती.

मोबाईल फोन १९७३ला बाजारात आले. त्यानंतरही त्यांचा वापर केवळ ध्वनिसंदेशांसाठी केला जात होता. मोबाईलमधून sms पाठवता यावेत या संकल्पनेवर काम करायला १९८० च्या दशकात सुरुवात झाली. प्रायोगिक तत्वावर जगातला पहिला sms १९९२ च्या अखेरीस पाठवला गेला आणि सर्व ग्राहकांसाठी sms सुविधा १९९३ला सर्वप्रथम स्वीडन मध्ये सुरु झाली. सुरवातीला केवळ नोकिया कंपनीचे हॅंडसेट्स sms पाठवण्यासाठी सक्षम होते. नंतर जवळपास वीस वर्षे टेलिफोनच्या क्षेत्रात अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे राज्य करण्यासाठी नोकियाच्या साम्राज्याच्या पाया या sms सर्व्हिसेस ने घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकांच्या हातात आलेल्या फोनवर आता स्क्रीन आली होती. त्यावर मेसेज येऊ शकत होते आणि त्यावर स्नेक सारखे साधे गेम खेळणेही शक्य होते.

म्हणजे १८७६ला लँडलाईन, आणि तिच्याशी संलग्न असणारे अचल टेलीफोन्स, नंतर १९१७च्या आसपास रेल्वे आणि कार्समध्ये बसवलेले फोन्स, नंतर १९५० ला पेजर, नंतर १९७३ ला मोबाईल फोन्स आणि मग १९९३ला एकाच फोनमधून ध्वनी आणि sms पाठविण्याची आणि साधे गेम्स खेळण्याची सोय , अशा मंदगतीने टेलिफोन उपकरणांच्या तंत्रज्ञानाची प्रगती चालू होती. १९८०तील १जीवरून १९९० मध्ये २जी, २.५जी अश्या प्रकारच्या नेटवर्कवर काम करून नोकिया जगभरात यशाचे ढोल वाजवत होती. त्याचवेळी ३जी नेटवर्कवर काम सुरु झाले होते.

थोडक्यात सांगायचं म्हणजे १जी सर्किट स्विचिंगवर काम करत होतं. २जी ध्वनिसंदेशांसाठी सर्किट स्विचिंगवर आणि डेटासाठी पॅकेट स्विचिंगवर काम करत होतं. आता ३जी मध्ये सर्किट स्विचिंग टाळून केवळ पॅकेट स्विचिंगवर सर्व कामे होणार होती. नोकियाने ३जी मध्येही लक्ष घातले. पण नोकिया सामान्य गिऱ्हाईकांना सेवा देण्याकडे लक्ष देत असताना, केवळ उद्योग क्षेत्राला हवी तशी सुरक्षितता देण्याच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली ती १९९६ मध्ये स्थापन झालेल्या रिसर्च इन मोशन या कंपनीने. तिने ईमेल, sms, आणि मर्यादित प्रमाणात ब्राउजिंग करू देणारा नवा फोन बाजारात आणला. त्या फोनचं नाव होतं ब्लॅकबेरी.

१९९३ ला IBM ने जगातील पहिला स्मार्टफोन बाजारात आणल्यानंतर आता फोनचा बाजार बदलू लागला होता. IBM पेक्षा ब्लॅकबेरी जास्त लोकप्रिय होऊ लागला होता. ब्लॅकबेरी इतका लोकप्रिय होता की सगळे उद्योग आपल्या कर्मचाऱ्यांना ब्लॅकबेरी फोन देऊ लागले. सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील ब्लॅकबेरी वापरणे सोयीचे वाटू लागले. अगदी आताच्या अमेरिकन निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाच्या घटनेत हिलरी क्लिंटन यांच्या ब्लॅकबेरी फोनच्या खाजगी सर्व्हरमधील इमेल्सची चोरीदेखील गाजली.

स्मार्टफोन आल्यामुळे फोन, डिजिटल डायरी, एसेमेस, ईमेल, मर्यादित ब्राउजिंग अश्या सगळ्या सेवा एका उपकरणातून मिळू लागल्या होत्या. त्यामुळे मोबाइललाही आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे आवश्यक होते. लँडलाईन फोनला वीज लागत नव्हती. पण मोबाईलला स्क्रीन आल्यापासून त्याला वीजेचा पुरवठा होणे आवश्यक होते. पण मोबाईल गिऱ्हाईकाच्या खिशात राहणार असल्याने त्याला बॅटरी असणे आवश्यक झाले. आता कमी वजन, खिशात मावण्याची आवश्यकता आणि ऊर्जेची बचत या सगळ्या गरजांना पूर्ण करू शकणारी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणे आवश्यक होते. आणि डेस्कटॉप किंवा लॅपटॉपप्रमाणे वापरून झाल्यावर कुणी मोबाईल बंद करणार नव्हतं. तो कायम चालू राहणार होता. त्यातील ईमेल क्लायंट ठराविक कालावधीनंतर स्वतःहून ईमेल सर्व्हरशी संपर्क साधून आलेल्या ईमेल्स फोनवर डाउनलोड करणार होता. त्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टीम रिअल टाईम असणार होती. कॉम्प्युटरला लागते ती OS (Operating System) फोनला लागते ती RTOS (Real Time Operating System) एरिक्सन, मोटोरोला आणि नोकिया एकत्र आले आणि सिम्बियन ऑपरेटिंग सिस्टीमचा विकास सुरु झाला. या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स त्या स्मार्टफोन्सवर काम करणार होत्या ज्यांचा अर्ध्याहून अधिक पृष्ठभाग स्थिर कीबोर्डने व्यापलेला होता.

फोनच्या दुनियेत अशी धामधूम चालू होती. आणि इथे कॉम्प्युटर व इंटरनेटच्या दुनियेत गुगलचा जन्म झाला होता. इंटरनेट बँकिंग सुरु झालं होतं. ईबे (e -bay) सुरु झालं होतं. काही देशातील सरकारनी लोकांचे आयकर रिटर्न्स इंटरनेटवरून स्वीकारता येतील का त्याची चाचपणी करायला सुरवात केली होती. १९९९ ते २००१ अश्या केवळ दोन वर्षात नॅपस्टरने गाणी मोफत वाटून इंटरनेटची ताकद काय असू शकते ते दाखवत मनोरंजन उद्योगाची झोप उडवली होती. मायक्रोसॉफ्टबरोबर ब्राऊजर युद्ध हरलेल्या नेटस्केपने आपला सगळा सोर्सकोड दान करून मोझिला या नव्या ब्राऊजरच्या विकासासाठी रस्ता मोकळा केला होता. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात ओपन सोर्स ही नवी संकल्पना उदयाला येऊ लागली होती. वेबसाईट चालवण्यासाठी ड्रूपल, वर्डप्रेस, जूमला अशी वेगवेगळी सॉफ्टवेअर ओपन सोर्सवर उपलब्ध होऊ लागली होती. २००१ ला विकिपीडिया सुरु होऊन माहितीचा अनमोल खजिना मोफत उपलब्ध झाला होता.

आणि त्याच २००१ मध्ये ऍपलने iPod लॉन्च करून नॅपस्टरमुळे जबर धक्का बसलेल्या संगीत क्षेत्राला नवीन उभारी देण्याचे काम सुरु केले. जे काम १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्ट MSN च्या सॉफ्टवेअरद्वारे करू शकली नव्हती तेच काम थोड्या वेगळ्या प्रकारे ऍपलने करण्यास सुरवात केली. मनोरंजन पाहिजे तर मनोरंजनासाठी पैसे मोजा. फुकटात मनोरंजन मिळणार नाही. मायक्रोसॉफ्टने यासाठी डेस्कटॉपवर सॉफ्टवेअर वापरण्याचा प्रयत्न केला होता. याउलट ऍपलने विशिष्ट हार्डवेअर वापरून आपली कल्पना यशस्वी करून दाखवली.

ऍपल मनोरंजन क्षेत्राला आकार देत होती. स्वतःचे नवीन डेस्कटॉप आणि लॅपटॉप बाजारात आणत होती. नोकिया, मोटोरोला, ब्लॅकबेरी मोबाईल फोनमध्ये क्रांती घडवून फोन्सना अधिकाधिक स्मार्ट बनवण्याच्या मागे लागल्या होत्या. तेव्हा गूगलने इंटरनेटवर चालणाऱ्या विविध सेवा विकत घेण्याचा आणि गिऱ्हाईकांना त्या मोफत देण्याचा धडाका लावला होता. ऑर्कुट आणि फेसबुक अस्तित्वात आले. फेसबुकने सोशल नेटवर्कवर लक्ष दिलं. तर गूगलने मोबाईल फोनमध्ये लक्ष घालायला सुरवात केली. २००३ मध्ये सुरु झालेली अँड्रॉइड ही फोनसाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणारी कंपनी गूगलने 2005 मध्ये विकत घेतली. फेसबुकला सोशल नेटवर्क वाढवायचं होतं. तर गुगलला स्मार्टफोनच्या बाजारात सम्राट व्हायचं होतं. गुगलच्या अँड्रॉइडवर चालणारा फोनही ब्लॅकबेरी आणि नोकिया सारखा असणार होता. अर्धा भाग स्क्रीन उरलेला अर्धा भाग कीबोर्ड.

आणि २००७ मध्ये फोनच्या क्षेत्रात अजून एक मोठी क्रांती झाली. इतर सर्व कंपन्यांपेक्षा किमान पाच वर्षे पुढे असलेले तंत्रज्ञान वापरून तयार केलेले उपकरण हातात घेऊन स्टीव्ह जॉब्स मंचावर उभा राहिला. आणि त्याने एकंच वाक्य तीनदा म्हटलं. “आयपॉड, फोन आणि इंटरनेट डिव्हाईस” त्याच्या पुन्हा पुन्हा बोलण्याला हसून दाद देणाऱ्या प्रेक्षकांना आणि संपूर्ण जगाला नंतर लक्षात आलं की ऍपलने या तीन गोष्टी एका उपकरणात एकत्रित केल्या आहेत. टेलिफोनच्या क्षेत्रात convergence ची कमी शेवटी २००७ मध्ये पूर्ण झाली. एकाच उपकरणात सगळी कामे होणार होती. ते उपकरण म्हणजे एक भलीमोठी टचस्क्रीन असणार होते. त्याला स्थिर कीबोर्ड नव्हता. आणि त्यावर कामं करायला वेगवेगळी ऍप्स असणार होती. 



हे बघताच गूगलचं धाबं दणाणलं. स्मार्टफोनच्या बाजारात अँड्रॉइड आणून वर्चस्व प्रस्थापित करण्याची गूगलची इच्छा धुळीला मिळाली होती. गूगलने अँड्रॉइडवर नव्याने काम सुरु केलं. आता टचस्क्रीन हेच भविष्य होतं. नोकिया, मोटोरोला, ब्लॅकबेरी हे सत्य ओळखायला उशीर करणार होत्या म्हणून त्या मागे पडणार होत्या. गूगलने आपली सगळी शक्ती अँड्रॉइडच्या मागे लावली. आणि फेसबुकने सोशल नेटवर्कच्या मागे.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)

_________

गुगलने काय कमाल केली ते समजायच्या आधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. वेब सर्च सुरु व्हायच्या खूप आधी इंटरनेट सर्च सुरु झालेलं होतं. याचे धागेदोरे १९८२ च्या हू इज (Who is) पर्यंत जातात. पण वेब क्रॉलिंग, इंडेक्सिंग आणि सर्च या तीन चाकांवर चालणारं सर्च इंजिन १९९३ मध्ये अस्तित्वात आलं. त्याचं नाव होतं जम्पस्टेशन. त्याआधीची कित्येक सर्च इंजिन्स म्हणजे हाताने तयार केलेल्या वेब डिरेक्टरिज होत्या. ज्या वेगाने वेब वाढत होतं त्यापुढे हाताने तयार केलेल्या डिरेक्टरिज टिकणं अशक्य होतं. जम्पस्टेशन फार लोकप्रिय झालं नाही पण त्यानंतर लगेचच वेब क्रॉलर, लायकोस, मेगॅलेन, एक्साईट, इन्कटोमी, अल्टा विस्टा, याहू अशी अनेक सर्च इंजिन्स अस्तित्वात आली.

यातील बहुतेक सर्च इंजिन्स इतर कुठल्यातरी वेब पोर्टलशी किंवा वेब ब्राऊजरशी संलग्न होती. ब्राऊजर काय ते आपण मागेच बघितले आहे आणि तुमच्यापैकी अनेकजण हा लेख ब्राऊजरवर वाचत असतील. वेब पोर्टल ही इंटरनेटवरची सगळ्यात गोंधळलेली निर्मिती होती. एकाच वेळी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल, एकाच वेळी माहिती आणि मनोरंजन देण्याचा हा प्रकार होता.

वर्ल्ड वाईड वेब वापरण्यासाठी तुम्हाला टेलिफोन कंपनीला पैसे द्यावे लागायचे, वेब ब्राऊजर विकत घ्यावा लागायचा. आणि तुम्हाला एखाद्या उद्योगाबद्दलची माहिती त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मिळणार होती, ज्यासाठी त्या उद्योगाने वेब सर्वर आणि वेब डिझाईनचे पैसे मोजलेले होते. पण इंटरनेटचा वापर जर कुणी मनोरंजनासाठी किंवा बातम्या वाचण्यासाठी करायचं ठरवलं तर, मग या बातम्यांसाठी किंवा मनोरंजनासाठी बातम्या देणाऱ्या किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवणाऱ्या वेब साईट्सना पैसे द्यावेत की देऊ नयेत? यावर मायक्रोसॉफ्टचे उत्तर होते की त्यासाठीही पैसे द्यावेत. माहिती आणि मनोरंजासाठी ग्राहकांकडून पैसे घेणारी MSN नावाची सर्व्हिस मायक्रोसॉफ्टने १९९५ मध्ये सुरु केली होती. परंतु त्याचवेळेस आलेल्या याहू सारख्या वेब साईट्सवर बातम्या फुकट मिळू लागल्या. आणि मग अश्या बातम्या देणाऱ्या वेब पोर्टल्सचा महापूर आला. सगळ्या वेब पोर्टलवर सर्चइंजिन, ताज्या घडामोडींची माहिती असं सगळं पॅकेज एकत्रित मिळू लागलं. आणि तेही मोफत. या सगळ्या वेब पोर्टल्सनी वर्तमानपत्रांचं, टिव्हीचं आर्थिक गणित वापरलं. छपाईचा आणि वितरणाचा खर्च नसल्याने जाहिरातींच्या जोरावर माहिती मोफत देणे त्यांना शक्य वाटू लागले. अश्या रीतीने हार्डवेअरसाठी पैसे भरता, सॉफ्टवेअरसाठी पैसे भरता, कनेक्शनसाठी पैसे भरता, तर मग माहितीसाठीसुद्धा पैसे भरा हा msn चा मुद्दा जाहिरातींच्या वादळात पालापाचोळ्यासारखा उडून गेला. आणि वर्ल्ड वाईड वेबवर जाहिरातींचा प्रवेश झाला.

इंटरनेटवर erp सॉफ्टवेअर्स चालत होती पण तिथे जाहिरातींचा प्रवेश नव्हता. इंटरनेटवर ईमेल्सची सर्व्हिस वापरली जात होती पण तिथे जाहिरातींचा प्रवेश नव्हता. इंटरनेटवर वर्ल्ड वाईड वेब आलं. इथे मोठमोठ्या व्यवसायांनी आपापल्या वेब साईट्स बनवल्या त्यावर इतरांच्या जाहिराती घेण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु वेब पोर्टल्सनी वर्ल्ड वाईड वेबचा वापर करून माहिती आणि मनोरंजनाबरोबरच वेब सर्च सारख्या सेवा मोफत पुरवणे सुरु केले आणि इंटरनेटवर जाहिरातींना प्रवेश मिळाला.

पण या जाहिरातींवर खर्च म्हणजे अजूनही वर्तमानपत्र किंवा टीव्हीप्रमाणे अंधारात बाण मारण्याचा प्रकार होता. आपली जाहिरात कोण बघणार आहे यावर जाहिरातदाराचे काही नियंत्रण नव्हते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक खपाचे वर्तमानपत्र किंवा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम या धर्तीवर सगळ्यात जास्त वेब युजर्स ज्याच्याकडे आहेत त्याला जास्तीत जास्त जाहिराती मिळू लागल्या. यातूनच वेब पोर्टल्सची सारे काही मोफत देण्याची भूक वाढू लागली. यूजर्सना सारे काही मोफत, त्यामुळे सगळ्यात जास्त यूजर्स माझ्या पोर्टलकडे, त्यामुळे सगळ्यात जास्त जाहिरातदार माझ्याकडे असा साधा सरळ हिशोब सुरु झाला.

msn ने काळाची पावले ओळखली. आणि आपली विकतची सेवा बंद केली. msn देखील एक वेब पोर्टल बनलं. मोफत बातम्या आणि मनोरंजन देणारं वेब पोर्टल. मायक्रोसॉफ्टसारखी बलाढ्य कंपनी इंटरनेटवर दुसऱ्यांदा गोंधळली. प्रथम नेटस्केप नॅव्हिगेटवरला शह देण्यासाठी इंटरनेट एक्प्लोरर हा वेब ब्राऊजर तिने ग्राहकांना मोफत दिला होता. आता याहू सारख्या वेब पोर्टल्सना धूळ चारण्यासाठी msn च्या सुरवंटाचं फुलपाखरू झालं. मोफत सेवा देणारं.

मग वेब पोर्टल्सच्या युद्धात मायक्रोसॉफ्टने एक नवीन डाव टाकला. सबीर भाटिया या तरुण भारतीयाने वेब बेस्ड ईमेल ही सेवा मोफत सुरु केली होती. मायक्रोसॉफ्टने ही सेवा आधी कधीच न ऐकलेल्या अवाच्या सवा किमतीला विकत घेतली. आणि msn च्या यूजर्सना मोफत दिली. जेणेकरून msn चे यूजर्स / व्हिजिटर्स वाढतील परिणामी जाहिराती वाढतील आणि मायक्रोसॉफ्टचे उत्पन्न वाढेल. त्याच सुमारास याहूने रॉकेटमेल ही वेब बेस्ड ईमेल सेवा विकत घेतली आणि आपल्या यूजर्सना मोफत उपलब्ध करून दिली. या वेब पोर्टल्सनी आपापले व्हिजिटर्स आपल्याकडेच बांधून ठेवण्यासाठी वेब बेस्ड ईमेल्सचा वापर करून घेतला.याहूने मोफत चॅटरूम्स सुरु केल्या. जिओसिटीज ही वेब होस्टिंग सर्व्हिस (आजच्या ब्लॉग्जची आदिमाता म्हणता येईल) विकत घेतली आणि तीदेखील मोफत सुरु ठेवली. मग याहूने गो टू डॉट कॉम (GoTo.com) ही जाहिरातींच्या व्यवस्थापनाची कंपनी विकत घेतली. ज्यामुळे स्पॉन्सर्ड सर्च रिझल्ट्स ही कल्पना पुढे आली. जाहिरातदार अजून खूष झाले. कुणी ‘डायपर’ शोधलं की याहू सर्च इंजिन जे नेहेमीचे रिझल्ट्स एकाखाली एक दाखवेल त्याच्यावर आणि त्याच्या बाजूला जाहिरातदारांचे रिजल्ट्स दाखवेल. आणि लोक तर सगळ्यात वर दिसणाऱ्या रिझल्टवर क्लिक करतात. त्यामुळे तुमची जाहिरात जास्त प्रभावी ठरेल.

वर्ल्ड वाईड वेबच्या जन्माच्या किमान २० वर्षे अगोदर जन्माला आलेल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेस्कटॉप ऑफिस सॉफ्टवेअरसाठी पैसे आकारून श्रीमंत झालेल्या मायक्रॉफ्टला इंटरनेटवरची मोफत सेवेची गणितं सोडवताना दमछाक होत होती. पण वर्ल्ड वाईड वेबच्या जन्मानंतर जन्माला आलेल्या याहूसारख्या नवीन कंपन्या मात्र नवनवीन सेवा आणि सुविधा ग्राहकाला मोफत देण्यात पुढे धावत होत्या. त्यांच्यामागे पाठबळ होतं व्हेंचर कॅपिटलिस्टसचं. शक्य तिथे स्वतः नवीन सेवा बाजारात मोफत आणायची. जिथे आपल्यापेक्षा अधिक चांगली सेवा कुणी बाजारात आणली असेल तिथे ती सेवा घसघशीत रक्कम देऊन विकत घ्यायची आणि आपल्या यूजर्सना मोफत द्यायची. जुन्या यूजर्सना बांधून ठेवायचं आणि नवीन यूजर्सना खेचून आणायचं. हा मोफतचा डोलारा उभा होता कशाच्या जोरावर? एकंच उत्तर जाहिरातींच्या आणि जाहिरातदारांच्या जोरावर.

अव्वाच्या सव्वा रक्कम मिळाल्याने सबीर भाटिया सारखे इंजिनियर खूष होते. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवून नंतर आपली गुंतवणूक दसपट किंवा शतपट करून मिळाल्याने त्यांचे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट खूष होते. बातम्या, मनोरंजन, माहिती आणि सेवा मोफत मिळाल्याने वेब यूजर्स खूष होते. मोठा, स्थिर आणि वाढता प्रेक्षकवर्ग मिळाल्याने जाहिरातदार खूष होते. जाहिरातींचं उत्पन्न मिळाल्याने पोर्टल्स खूष होते. डॉट कॉम कंपन्यांचे शेअर्स म्हणजे सोन्याची खाण होती. अश्यावेळी गूगलचा जन्म झाला.

गूगलने काही नव्या गोष्टी केल्या. ते केवळ एक सर्च इंजिन होतं. गूगलने हार्डवेअर सॉफ्टवेअर विक्रीच्या बाजाराकडे दुर्लक्ष केले. आपण एक इंटरनेट कंपनी आहोत हे गूगलने निश्चित केले होते. पण याहूच्या मार्गाने जाण्याऐवजी गुगलने नवा रस्ता चोखाळला. गुगलने वेब पोर्टल सुरु केलं नाही. गूगलला इंटरनेटवर चालणारं वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनेल बनण्यात रस नव्हता. कुठल्याही प्रकारचं कन्टेन्ट तयार करण्यात गूगलने कधीच रस दाखवला नाही. जगातील माहितीच्या साठ्याची अनुक्रमणिका बनण्यात गुगलला रस होता.

त्यातलं पहिलं पाऊल म्हणजे गूगलने इंटरनेटचं यलो पेजेस बनायचं ठरवलं. गुगलने आपल्या सर्च इंजिनाच्या प्रोग्रॅममध्ये पेज रँकिंग ही नवी प्रणाली आणली. ज्यामुळे गुगलने शोधून दिलेली वेब पेजेस इतर सर्च इंजिनांपेक्षा यूजर्सच्या अपेक्षेच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी होती. मग गो टू डॉट कॉम (GoTo.com) या कंपनीच्या कल्पना वापरल्या. यात जाहिरातदारांना सर्च टर्म्सचा लिलाव करणे, स्पॉन्सर्ड सर्च रिजल्ट्स देणे या कल्पना होत्या. त्याशिवाय पे पर व्हयू आणि पे पर क्लिक या कल्पना त्यात जोडल्या. गो टू डॉट कॉमने गूगलला कोर्टात खेचलं. शेवटी गो टू ची मालक असलेल्या याहूला गूगलचे शेअर्स देऊन ते प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्यात आलं.

आणि मग याहूचा कित्ता गिरवत गूगलने एकामागून एक इंटरनेट कंपन्या विकत घेण्याचा सपाटा लावला. गूगल ग्रुप्स, पिकासा, गूगल अर्थ, गूगल ऍनालिटिक्स, यू ट्युब, गूगल मॅप्स या सर्व सेवा गूगलने इतरांकडून विकत घेतल्या आणि आपल्या ग्राहकांना मोफत दिल्या.

२२ जानेवारी २००४ ला गूगलने ऑर्कुट हे सोशल नेटवर्क लॉंच केलं. १ एप्रिल २००४ ला गुगलने तत्कालीन वेब मेल सर्व्हिसेसपेक्षा जास्त स्टोरेज असणारी वेबमेलसेवा सुरु केली. नाव ठेवलं जीमेल. आणि जाहिरातदारांना सांगितलं की आम्ही जीमेलच्या आतील शब्दांच्या अनुषंगाने योग्य जाहिरात जीमेलच्या आत दाखवू. अधिक अचूक जाहिरात. आणि त्याच वेळी यूजर्सना खात्री दिली की तुमची ईमेल्स कुठलीही व्यक्ती वाचणार नाही तर तर केवळ सिस्टीम वाचेल. ते सुद्धा त्यातील कन्टेन्टसाठी नाही तर कीवर्ड साठी. आता तुम्ही काय शोधत आहात त्याप्रमाणे तुम्हाला जाहिराती दिसणार नव्हत्या तर तुम्ही मित्रांशी काय गप्पा मारत आहात त्याप्रमाणे जाहिराती दिसणार होत्या. पण तुम्ही काय गप्पा मारल्या ते जाहिरातदारांना दिसणार नव्हते, गूगललाही ते दिसणार नव्हतं. पण गूगलच्या सिस्टिमला दिसणार होतं. गूगलचे बोधवाक्य होते ‘don’t be evil’. गूगलच्या यूजर्सचा त्यावर पूर्ण विश्वास होता.

हळूहळू गूगलने वर्ल्ड वाईड वेबच्या दुसऱ्या आवृत्तीला आकार द्यायला सुरवात केली होती. कन्टेन्ट तयार करणारे मूठभर आणि कन्टेन्ट वापरणारे अगणित ही वर्ल्ड वाईड वेबची पहिली आवृत्ती होती. नवीन आवृत्तीत गुगलला हे समीकरण बदलायचं होतं. आता कन्टेन्ट वापरणारे पूर्वीप्रमाणेच अगणित रहाणार होते कन्टेन्ट तयार करणारेही अगणित होणार होते.

आता यूट्युब, ऑर्कुट आणि जीमेल यामुळे गूगलकडे टार्गेटेड जाहिराती दाखवण्यासाठी एकाहून अधिक प्लॅटफॉर्म तयार होते. आणि मुख्य म्हणजे यापैकी कुठल्याही एका प्लॅटफॉर्मवर यूजर्सना पकडून ठेवण्यासाठी गूगलला कन्टेन्ट तयार करण्याचा खर्च करावा लागत नव्हता. यूजर्स स्वतःच कन्टेन्ट तयार करत होते. पिकासावरचे फोटोज, यूट्युबवरचे व्हिडीओ, ऑर्कुटवरच्या गप्पा, जीमेलमधले मेल्स यातून यूजर्स स्वतःच गूगलच्या सिस्टिमला आपल्या आयुष्यात काय चाललंय त्याची माहिती देत होते. ती माहिती गूगलच्या सिस्टीममधून बाहेर जात नव्हती. फक्त तिचा वापर करून गूगलची सिस्टीम आपल्याला जाहिराती दाखवत होती आणि गूगलच्या तिजोरीत भर घालत होती.

ज्याप्रमाणे आयबीएम मेनफ्रेममध्ये गुंतलेली असताना ऍपल आणि मायक्रोसॉफ्टने डेस्कटॉप पीसीक्षेत्रात मुसंडी मारली. ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेस्कटॉप ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये गुंतलेली असताना याहूने इंटरनेटच्या क्षेत्रात मुसंडी मारली. ज्याप्रमाणे याहू वेब पोर्टल आणि मोफत वेब सर्व्हिसेसमध्ये गुंतलेली असताना गूगलने वर्ल्ड वाईड वेबच्या दुसऱ्या आवृत्तीला आकार द्यायला सुरवात केली. त्याप्रमाणे गूगल आपल्या कामात गुंतलेली असताना अजून एका कंपनीचा जन्म झाला होता तिचं तत्कालीन नाव होतं ‘द फेसबुक’ म्हणजेच आजचं ‘फेसबुक’.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)

_________

या लेखमालेचा उद्देश डेटा चोरी म्हणजे काय आणि त्याची मला जाणवलेली कारणे मांडणे असल्याने त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते महत्वाची आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि कायदेशीर संकल्पनाही महत्वाच्या आहेत. म्हणून या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते कशी बदलत गेली त्याचा धावता आढावा घेऊया.

१९११ मध्ये आयबीएम कंपनीची स्थापना झाली होती. पण कॉम्प्युटरच्या क्षेत्रात तिने प्रवेश केला तो १९५२ मध्ये. १९५२ पासून ते १९६४ पर्यंत आयबीएमने Special Purpose Computer बनवले. म्हणजे यातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभिन्न किंवा अविभाज्य होते. आयबीएमला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी वेगवेगळे पैसे मिळत नव्हते. १९६४ मध्ये आयबीएमने मोठा जुगार खेळला आणि पहिला General Purpose Computer बनवला. म्हणजे यावर सॉफ्टवेअर पहिल्यापासून लोडेड असणार नव्हतं. तर वेगवेगळी सॉफ्टवेअर एकाच कॉम्प्युटरवर लोड करता येणार होती. हा पर्सनल कॉम्प्युटर नसून मेनफ्रेम कॉम्प्युटर होता. इथून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांचा बाजार वेगळा होण्यास सुरवात झाली.

अजून इंटरनेट बाल्यावस्थेत होतं. पण क्रेडिट कार्डचा व्यवसाय भरभराटीला आलेला होता. डायनर्स कार्डपासून लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेवर व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्या भरभराटीला आलेल्या होत्या. मग बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारी घटना घडली. १९६७ मध्ये बार्कलेज बँकेने पहिलं ATM चालू केलं. १९५९ पासून चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न चालू होता आणि १९६९ साली एका माणसाच्या छोट्या पावलाने मानवजातीसाठी चंद्रापर्यंत मोठी झेप घेतली होती. इतकी सगळी धामधूम चालू होती पण TCP / IP चा जन्म व्हायचा होता. या सगळ्यांमुळे विविध प्रकारचे नेटवर्क प्रोटोकॉल अस्तित्वात येत गेले. त्यात सुसूत्रता यावी म्हणून प्रयत्न होत होते.

आणि १९७२ साली TCP / IP चा जन्म झाला. ज्यामुळे आपापले काम करताना कुणी कुठले नियम पाळावेत याचे नियम निश्चित झाले आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल विचार न करता, त्यात गुंतवणूक न करता, आपले काम अधिक वेगाने करू लागल्या. पण अजूनही ऑफिस किंवा उत्पादनाचे प्लांट्स हेच सॉफ्टवेअरचे कार्यक्षेत्र होते. घराघरात कॉम्प्युटर पोहोचले नव्हते. १९७२ ला SAP, १९७७ Oracle आणि १९७८ Baan या ERP (Enterprise Resource Planning) क्षेत्रातील दादा कंपन्यांचा जन्म झाला. यांनी इंटरनेटचा वापर करून घेतला.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस यायला सुरवात झाली. हार्डवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करून देण्याऱ्या सल्लागार कंपन्या स्थापन झाल्या. त्यांनीही रग्गड पैसे कमवले. विशेष म्हणजे त्यांनी ज्यांना या सेवा दिल्या त्यांच्याकडूनच पैसे घेतले. म्हणजे विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, बँका, वित्तसंस्था हे ग्राहक होते आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपन्या हे पुरवठादार होते. पुरवठादारांनी आपापल्या ग्राहकांच्या काम पद्धतीत कॉम्प्युटरचा वापर करायला उद्युक्त केले. त्यांची कार्यक्षमता वाढवली. त्यांचे खर्च कमी केले. त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढवायला, त्यांच्या ग्राहकांना खूष करायला त्यांना मदत केली. आणि या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यामुळे या काळात डेटा चोरीच्या प्रश्नाने आजच्यासारखे स्वरूप धारण केलेले नव्हते.

आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्वाच्या कंपन्यांनी जन्म घ्यायचा मुहूर्त जवळ येऊ लागला होता. १९७५ ला मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली आणि १९७६ला ऍपलची. मायक्रोसॉफ्टने हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरवर अधिक लक्ष द्यायला सुरवात केली. याउलट ऍपलने स्थापनावर्षातच आपला पुढला मार्ग आखून घेतला होता. कॉम्प्युटर म्हणजे केवळ कार्यालयात उपयोगी असणारे उपकरण राहणार नव्हते. आता मेनफ्रेमचा अश्वमेध रोखला जाणार होता. ऍपल बरोबर ह्युलेट-पॅकार्ड, टॅन्डी कॉर्पोरेशन वगैरे कंपन्यांनी आपापले मायक्रो कॉम्प्युटर (ज्याला आपण आजकाल पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो) बाजारात आणले.

या सगळ्यात वेगळी कंपनी होती ऍपल. ऍपलच्या मायक्रो कॉम्प्युटरला चालवण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः ऍपलचीच होती. हार्डवेअर वाल्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवाल्यांनी सॉफ्टवेअर हा नियम मोडीत काढून ऍपलने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीवर स्वतःचा ताबा ठेवला.

मायक्रो कॉम्प्युटरच्या बाजाराने बाळसे धरल्यावर 'हत्तीने टॅप डान्स करायचं ठरवलं'. कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील दादा कंपनी आयबीएमने घरगुती कॉम्प्युटरच्या बाजारात उतरायचा निर्णय घेतला. मेनफ्रेमच्या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळणाऱ्या आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीत मात्र एकदम खुलं धोरण अंगिकारलं. आयबीएमच्या या पीसीसाठीची ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टकडून बनवून घेतली गेली आणि इतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना या पीसीसाठी सॉफ्टवेअर तयार करायला उत्तेजन देण्यात आलं. यातून मायक्रोसॉफ्टचं अतिबलाढ्य साम्राज्य उभं राहिलं.

पर्सनल कॉम्युटर कुणीही बनवो त्यावर ऑपरेटिंग सिस्टीम आणि कामासाठी लागणारे वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस, ईमेल क्लायंट वगैरे सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स मायक्रोसॉफ्टचेच होते. हार्डवेअर कंपन्या आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील करारांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पीसी विकला गेला तरी मायक्रोसॉफ्टच्या खात्यात पैसे जमा होत होते. (इथे सॉफ्टवेअर पायरसीच्या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष केले आहे.)

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र विकून ऍपल पैसे कमवीत होतं. मायक्रोसॉफ्ट प्रामुख्याने केवळ सॉफ्टवेअर विकून तर ह्युलेट-पॅकार्ड, कॉम्पॅक सारख्या कंपन्या केवळ हार्डवेअर विकून. या काळातही विक्रेता आपल्या वस्तू किंवा सेवा ज्या ग्राहकाला विकत होता त्याच्याकडून त्याचे पैसे घेत होता. आणि या घरगुती पर्सनल कॉम्प्युटर्सना इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी काही विशेष कारण मिळाले नव्हते त्यामुळे त्याला डेटा चोरीचा मुद्दा जन्माला यायचा होता.

जगभरात काम करण्याच्या पद्धतीत पर्सनल कॉम्प्युटर्स मोठी उलथापालथ घडवून आणत असताना सर्न इथे हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉलचा जन्म झाला होता आणि टीम बार्नर्स लीने वर्ल्ड वाईड वेबची संकल्पना मांडली होती. वर्ल्ड वाईड वेब आकाराला येत असताना ते वापरण्यासाठी वेब क्लायंटची (ब्राऊजरची) आवश्यकता होती. पहिला ब्राऊजर टीम बार्नर्स लीनेच तयार केला होता आणि १९९१ मध्ये जगासाठी खुला केला होता. वेब सर्व्हर आणि वेब ब्राऊजर तयार झाले. वेबसाईट ही नवीन संकल्पना उदयाला आली. इंटरनेटवरील वेबसाईट म्हणजे कधीही बंद न होणारा बिलबोर्ड आहे हे अनेक व्यावसायिकांना जाणवले. आणि व्यवसायाची वेबसाईट असणे महत्वाचे ठरू लागले. हॉटमेल या नावाने सबीर भाटियाने ईमेलची सुविधा ईमेल क्लायंट न वापरता वेब ब्राऊजरमधून वापरायला उपलब्ध करून दिली. आणि आतापर्यंत केवळ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटवर जाण्याची नवीन कारणे आकाराला आली. हॉटमेल मायक्रोसॉफ्टने विकत घेतलं तर त्यासारखं रॉकेटमेल याहूने. आणि जगभरात लोकांना वेब ब्राउजरमधून ईमेल वापरणे शक्य झाले. तेही मोफत.

आता इंटरनेटवर वेबसाईट्स होत्या. एमएस ऑफिसबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर मोफत मिळू लागले होते. ऑफिसची कामे संपल्यावरदेखील लोक इंटरनेटवर जाऊ लागले. आपापल्या घरगुती पीसीवरून! वेब ब्राऊजर वापरत, वर्ल्ड वाईड वेबवर सर्फिंग करण्यासाठी!

सर्फिंग करून त्यांना इतर व्यवसायांबद्दलची माहिती मोफत मिळत होती. कारण वेबसाईट्स बनवण्याचा आणि कायम उपलब्ध ठेवण्याचा खर्च जो तो व्यावसायिक करत होता. लोकांना खर्च करायचा होता फक्त इंटरनेट कनेक्शनचा. ब्राऊजर मोफत. माहिती मोफत.

आता इंटरनेटचा वापर करून वस्तू विकण्याची कल्पना काही सुपीक डोक्यात खेळू लागली. त्यापैकी जेफ बेझॉसने १९९४ मध्ये ऍमेझॉनची स्थापना केली. सुरवातीला इंटरनेटचा वापर करून पुस्तके विकण्यासाठी तो ऍमेझॉनचा वापर करणार होता. या सगळ्या धामधुमीमुळे वर्ल्ड वाईड वेब अल्पावधीत लोकप्रिय झालं. आणि त्यावर तयार झालेल्या अगणित वेबसाईट्स मधून आपल्याला हवी ती वेबसाईट शोधण्यासाठी सर्वसामान्य लोकांना सर्च इंजिनची गरज भासू लागली. वेगवेगळी सर्च इंजिन्स इंटरनेटवर उपलब्ध होती. अशात १९९८ साल उजाडलं. डेटाचोरीच्या आपल्या आजच्या अडचणीचा एक धागा जिथून येतो ते बिझनेस मॉडेल यशस्वीरीत्या वापरणाऱ्या कंपनीचा कॅलिफोर्नियात जन्म झाला. तिचे नाव होते गूगल.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग २)

_________

दूर असलेल्या दोन माणसांना, जागांना जोडण्यासाठी आपण जे उभारतो त्याला मराठीत जाळं आणि इंग्रजीत नेटवर्क म्हणतात. आपली कामे करण्यासाठी माणसाने विविध नेटवर्क्स उभारली आणि त्यांचा वापर करण्यासाठी विविध साधने बनवली. पण ही साधने त्या त्या नेटवर्कपुरती मर्यादित होती. म्हणजे एका नेटवर्कवरचे साधन दुसऱ्या नेटवर्कवर उपयोगी नव्हते.

नेटवर्क आणि साधनांची उदाहरणं घ्यायची झाली तर; एकाचवेळी अनेक लोकांच्या जलदगती आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे ट्रॅकचं नेटवर्क आणि ते वापरण्यासाठी ट्रेन्स आणि स्टेशन्स ही साधनं, पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन्सचं नेटवर्क आणि ते वापरण्यासाठी पाण्याच्या टाक्या, पाणी वर चढवण्याचे पंप, वेगवेगळ्या प्रकारचे नळ, शॉवर्स आणि फ्लश ही साधनं, वीजपुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक वायर्सचं नेटवर्क आणि ते वापरण्यासाठी पंखे, लाईट्स, फ्रिज, एअर कूलर - कंडिशनर ही साधनं, ध्वनीसंदेश पोहोचवण्यासाठी टेलिफोन लाइन्सचं नेटवर्क आणि ते वापरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेलिफोन्स ही साधनं आहेत. यात नेटवर्क आधी की साधनं आधी हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंडं? सारखाच क्लिष्ट आहे. त्यामुळे त्याला बाजूला ठेवून आपण इंटरनेटकडे वळूया. आधी एक व्हिडीओ दाखवतो मग पुढले मुद्दे मांडतो.



म्हणजे एकोणीसशे चाळीसच्या दशकात कॉम्प्युटरचा शोध लागलेला होता. आणि एकाच किंवा एकापेक्षा जास्त इमारतीत असलेल्या विविध टर्मिनल्सना डेटा केबल्सने सीपीयूशी जोडून काम करण्याची पद्धत रुळली होती. म्हणजे अमेरिकन आणि वसाहतवादी देशांच्या लष्कराचे जगभरात पसरलेले वेगवेगळे तळ, काही बड्या कंपन्या आणि काही बड्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटरची मर्यादित नेटवर्क्स (लोकल एरिया नेटवर्क्स) तयार झाली होती. त्यात रस्त्यांचं, रेल्वे ट्रॅकचं, पाईपलाईन्सचं काम डेटा केबल्स करत होत्या. ट्रेन, नळ, पंखे आणि टेलिफोनचं काम कॉम्प्युटर टर्मिनल्स आणि सीपीयू करत होते. कॉम्प्युटरच्या त्या लोकल एरिया नेटवर्कच्या केबल्समधून माहिती धावत होती. शीतयुद्धामुळे अमेरिकेला आणि वसाहतवादी देशांची इच्छा होती की जगभर पसरलेली लष्करी तळांची ही लोकल एरिया नेटवर्क्स जोडून घ्यायची. अनेक नेटवर्क्सना जोडणारं एक नेटवर्क तयार करावं. इंटरसिटी बससेवा किंवा ट्रेनसेवेसारखं याचं नाव आपोआप पडलं इंटरनेटवर्क किंवा इंटरनेट.

फक्त आधीपासून तयार असलेली लोकल एरिया नेटवर्क जोडण्यासाठी नवीन वायर्सचं वेगळं नेटवर्क न उभारता आधीपासून उपलब्ध असलेलं टेलिफोनच्या वायर्सचं नेटवर्क वापरायचं ठरलं. फक्त दोन महत्वाच्या अपेक्षा अश्या होत्या की,
  1. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पाठवली जात असताना मध्येच जर टेलिफोनची वायर कुणी कापली तरी माहिती शेवटपर्यंत पोहोचावी. सोप्या शब्दात सांगायचं तर एक टेलिफोन लाईन डेड झाली तरी आपला कॉल कट न होता पूर्ण झाला पाहिजे. आणि 
  2. माहिती पाठवताना, 'इस रूट की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल करें।', चा त्रास इंटरनेटला कधी होऊ नये.
पहिल्या भागात उल्लेख केलेल्या पॅकेट स्विचिंग या कल्पनेचा उगम याच दोन अपेक्षांमधून झाला.

कुणाला पत्र पाठवायचं असलं किंवा पार्सल पाठवायचं असलं की आपण पाकिटात पत्र टाकतो किंवा खोक्यात वस्तू भरतो आणि मग त्या पाकिटावर किंवा खोक्यावर पाठवणाऱ्याचा आणि ज्याला पाठवतोय त्याचा पत्ता लिहितो. तसंच काहीसं इथे होणार आहे. फक्त एका पत्राचे किंवा वस्तूचे असंख्य छोटे छोटे तुकडे करून त्या प्रत्येक तुकड्याला वेगवेगळ्या पाकिटात भरून प्रत्येक छोट्या पाकिटावर पाठवणाऱ्याचा आणि ज्याला पाठवतोय त्याचा पत्ता लिहायचा. त्याशिवाय प्रत्येक पाकिटावर खुणेचे क्रमांक टाकायचे. मग सगळी छोटी छोटी पाकिटे वेगवेगळ्या रस्त्यावरून पाठवायची. मिळाल्यावर सगळी पाकिटे उघडून त्यावरील क्रमांक वापरून आतले छोटे तुकडे जोडून पत्र किंवा वस्तू पुन्हा तयार करायची. जर कुठल्याही क्रमांकाचं पाकीट मिळालं नसेल तर पुन्हा पाठवायला सांगायचं. अशी सगळी योजना आहे.

यासाठी एक मशीन कायमचे सर्वर आणि इतर मशिन्स क्लायंट (Client Server Architecture) ही एक रचना तर प्रत्येक मशीन क्लायंट असताना त्याचवेळी इतरांसाठी सर्वर (Peer to Peer Architecture) अशी दुसरी एक रचना अस्तित्वात आली. यातील Peer to Peer अजूनही वापरात असली तरी व्यापक प्रमाणावर वापरण्यासाठी Client-Server सोयीचे असल्याने ती रचना इंटरनेटवर लोकप्रिय झाली.

पण या दोन्ही रचनांसाठी काम करण्याची सुसूत्र अश्या नियमावलीची (Protocol) गरज होती. १९५० ते १९७०च्या दशकात कुठलीही मार्गदर्शक तत्वे नसताना वेगवेगळ्या नियमावली अस्तित्वात आल्या. त्यात सगळ्यात जास्त वापरली गेलेली नियमावली होती नेटवर्क कंट्रोल प्रोटोकॉल. पण जसजसे इंटरनेटवर अनेक लोकल एरिया नेटवर्क जोडले जाऊ लागले आणि टेलिफोन लाईन्स बरोबर सॅटेलाईटचा वापर करण्याचा विचार होऊ लागला तसतश्या नेटवर्क कंट्रोल प्रोटोकॉलमधील त्रुटी जाणवू लागल्या. मग १९७०च्या दशकात रॉबर्ट कान्ह आणि व्हिन्टन सर्फ यांनी एक नवीन प्रोटोकॉल तयार केला ज्याचं नाव होतं ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल इंटरनेट प्रोटोकॉल (TCP / IP).

या प्रोटोकॉलने इंटरनेटवर काम करणं सोपं झालं. आता नेटवर्कमध्ये दिसायला जरी वायर्स आणि कॉम्प्युटर्स दिसत असले तरी त्यात लेयर्स आहेत अशी रचना करून त्याबद्दल नियमावली करण्यात आली. या लेयर्सची कल्पना समजून घेण्यासाठी आपण मुंबई ते गोवा वोल्वो बसच्या प्रवासाचं उदाहरण घेऊया.

तुम्ही बस कुठल्या रस्त्यावर पळवताय याच्याशी वोल्वो कंपनीला काही घेणं देणं नसतं. तुम्ही ती मुंबई ते गोवा चालवा किंवा मग मुंबई मंगलोर चालवा. वोल्वो कंपनी आपल्या स्टँडर्ड्स प्रमाणे बस तयार करून देणार. तुम्ही बस कंपनी असाल तर तुम्ही फक्त ड्रायव्हर, क्लिनर, पेट्रोल पंप, रस्त्यातील हॉटेल्स आणि तिकीट बुकिंग करून देणारे ट्रॅव्हल एजंट यांच्याबद्दल विचार करायचा. बसच्या गुणवत्तेची जबाबदारी वोल्वोची. तुम्ही ट्रॅव्हल एजंट किंवा रेड बससारखी वेबसाईट असाल तर तुम्ही फक्त तिकीट काढून द्यायचं. बसच्या गुणवत्तेची आणि ड्रायव्हर क्लिनर यांच्या कार्यक्षमतेची जबाबदारी बस कंपनीची. तुम्ही जर चिक्की किंवा चॉकलेट विकणारे असाल तर बाकीच्या सगळ्या काळज्या विसरा आणि तुम्ही फक्त ठरलेल्या ठिकाणी बसमध्ये चढून ठरलेल्या ठिकाणी उतरा. तुमचा हिशोब नीट ठेवा. आणि तुम्ही जर केसरी टूर्स किंवा अजून कुठली ट्रॅव्हल कंपनी असाल तर बाकीच्या ट्रीपच्या आयोजनाकडे लक्ष द्या अमूक एका बस कंपनीचं तिकीट काढलं की तुमची चिंता संपली.

TCP/IP मुळे टेलिफोन वायर्स किंवा फायबर ऑप्टिक किंवा इतर प्रकारच्या वायर्स, कनेक्टर्स, कॉम्प्युटर्स किंवा रूटर्स तयार करणाऱ्या कंपन्यांनी केवळ कोणत्या गोष्टींची चिंता करावी? आणि कोणत्या गोष्टी स्वतःवर ओढवून घेऊ नयेत? सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांनी कोणत्या गोष्टी गृहीत धराव्यात आणि कोणत्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी यात सुसूत्रता आली. आणि सर्वांची कामे सोपी होत गेली.

आता सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांची कामे सोपी होण्यासाठी मग केवळ सॉफ्टवेअरशी संबंधित प्रोटोकॉल तयार केले गेले. ईमेल साठी पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल (POP) मोठ्या फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) यासारखे अनेक प्रोटोकॉल तयार झाले. फक्त या प्रोटोकॉल्सना वापरून तयार केल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्समध्ये एक अट होती की तुम्हाला त्या सॉफ्टवेअरचा क्लायंट पार्ट वापरणे आवश्यक होते. म्हणजे तुम्हाला ईमेल वापरायचे असेल तर तुमच्या कॉम्प्युटरवर आऊटलूक किंवा थंडरबर्डसारखे ईमेल क्लायंट सॉफ्टवेअर असायला हवे आणि तुमच्या कंपनीच्या सर्वर कॉम्प्युटरवर ईमेल सर्वरचे सॉफ्टवेअर असायला हवे. तुम्हाला मोठ्या फाईल्स डाउनलोड करायच्या आहेत तर मग तुमच्या कॉम्प्युटरवर फाईलझिला किंवा क्युटएफटीपी सारखे क्लायंट सॉफ्टवेअर असायला हवे आणि तुम्हाला हव्या त्या फाईल्स ज्या कॉम्प्युटरवर आहेत त्यावर एफटीपी सर्व्हर असायला हवा.

आणि मग १९८०च्या दशकात सध्या जिथे हिग्स बोसॉन कणांवर संशोधन चालू आहे त्या सर्न (CERN) या ठिकाणी टिम बार्नेर्स ली या ब्रिटिश इंजिनियरने हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉल (http) या प्रोटोकॉलची मांडणी केली. आणि त्यावर आधारित वर्ल्ड वाईड वेब (www) कसे काम करेल त्याची पायाभरणी केली. या नव्या व्यवस्थेतही क्लायंट सर्वर हीच रचना होती. या नव्या व्यवस्थेत सर्व्हरला म्हणणार 'वेब सर्वर' आणि क्लायंटला म्हणणार 'वेब क्लायंट' उर्फ 'वेब ब्राऊजर' . पहिला वेब ब्राऊजर होता नेटस्केप नॅव्हिगेटवर. नंतर मग इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी, ऑपेरा, गूगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स असे अनेक वेब ब्राऊजर बाजारात आले.

यातल्या नेटस्केप नेव्हिगेटर या पहिल्या वेब ब्राऊजरची किंमत होती ४९ डॉलर्स. पण नेटस्केपच्या ब्राऊजरला टक्कर देण्यासाठी पुढे सरसावली सॉफ्टवेअर क्षेत्रातील दादा कंपनी. तिचं नाव होतं मायक्रोसॉफ्ट. आपला इंटरनेट एक्सप्लोरर हा वेब ब्राऊजर मायक्रोसॉफ्टने एमएस ऑफिसबरोबर फुकट द्यायला सुरवात केली. आणि, 'इंटरनेट म्हणजे मोफत' हा समज पक्का होण्यास सुरवात झाली.

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)

_________

जगण्यासाठी गोडं पाणी आवश्यक आहे. गोडं पाणी झऱ्यात होतं. नदीत होतं. तळ्यात होतं. आपण पाण्याकडे जात होतो. आपण कधी पाण्याकाठी घरं वसवली. तर कधी घराजवळ विहिरी खोदल्या. पाण्याशी निगडित काही व्यवहार जसे की धुणी भांडी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीकाठी करू लागलो. तर काही व्यवहार, जसे की अंघोळ, स्वयंपाक वगैरे घरात करू लागलो. घरात करण्याच्या व्यवहारांसाठी आपण हंडे कळश्या घेऊन नदीकाठी किंवा सार्वजनिक विहिरीवर जाऊ लागलो.

म्हणजे आपल्या घरी पाणी येऊ लागलं ते आपल्या डोक्यावर किंवा कमरेवर धरलेल्या कळश्यांमधून किंवा बादल्यांमधून तेही माणसांसाठी बनवलेल्या रस्त्यांवरून माणसांच्या डोक्या-खांद्यांवरून.

मग गावांची शहरे झाली. पाण्याचे नैसर्गिक स्रोत भलतीकडे आणि माणसांची वस्ती भलतीकडे झाली. आता हंडे- कळश्या, बादल्या वापरणं अशक्य होतं. मग आपण नवीन युक्ती केली. आपण माणसांचे रस्ते आणि पाण्याचे रस्ते बदलून टाकले. माणसाच्या रस्त्याला रस्ते हेच नाव ठेवलं पण पाण्याच्या रस्त्याला आपण नाव ठेवलं पाईपलाईन. आता पाणी पाण्याच्या रस्त्याने शहरभर फिरवणं शक्य झालं. मोठी पाईपलाईन >> मध्यम पाईपलाईन >> छोट्या पाईपलाईन्स असं प्रचंड मोठं जाळं आपण शहरभर विणलं. आता पाणी कुणाच्या डोक्यावरून किंवा खांद्यावरून फिरत नव्हतं. याउलट, रस्त्यावरून उताराकडे धावण्याच्या स्वतःच्या गुणधर्माला वापरून ते प्रत्येकाच्या घरात पोहोचू लागलं.

मग लोक फिरू लागले. आणि फिरताना घरातील नळ, पाईपलाईन बरोबर घेऊन फिरणं अशक्य होतं. काही गावे इतकी दुर्गम होती की तिथपर्यंत पाईपलाईन्स पोहोचवण्याचा आणि त्या सांभाळण्याचा खर्च जास्त होता. मग आपण बाटलीबंद पाणी ही व्यवस्था वापरायला सुरवात केली. आता पाईपलाईन फुटली तरी वेगवेगळ्या ट्रकमध्ये भरलेल्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

असंच काहीसं माहितीबाबत आहे.

सुरवातीला माहितीचा संदेश दूरवर पाठवण्यासाठी जोरात ओरडणे हा मार्ग होता. पण मग ती माहिती सगळ्यांना मिळायची तिच्यात गुप्तता राहात नव्हती. म्हणून मग संकेत वापरून माहिती पाठवणे सुरु झाले. त्यात मग तोफांचे आवाज, मशालींचा उजेड, विविधरंगी निशाणे आली. पण लांबलचक संदेश पाठवणे अशक्य होते. मग संदेशवाहक आले. हनुमंत किंवा अंगद किंवा कृष्ण किंवा विदुर अश्या हुशार लोकांनीही संदेशवाहकांचे काम केले. पण यात संदेशवाहक मूळ संदेशात स्वतःची भर घालून संदेश बिघडवण्याची भीती होती.

मग लिपीचा शोध लागला. मग घोडेस्वार, सांडणीस्वार वगैरे संदेशवाहकांच्याबरोबर लिखित स्वरूपात संदेशवहन सुरु झाले. कधी कधी कबुतरे, ससाणे देखील वापरले गेले. पण पक्ष्यांचा वापर करून पाठवलेले संदेश लहान असायचे आणि ते पोहोचतीलंच याची खात्री नव्हती. म्हणून माणूस संदेशवाहक ही पद्धत जास्त खात्रीशीर होती. म्हणजे इथेदेखील पाण्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी माणसांचे रस्ते वापरले जाऊ लागले. आपापली पत्रे समुद्रमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग किंवा भूमार्गावरून इकडून तिकडे जाऊ लागली.

मग तारायंत्राचा शोध लागला. म्हणजे सगळ्यात प्रथम संदेशवहनासाठी आपण वेगळे रस्ते वापरले ते तारायंत्राच्या शोधानंतर. पण इथेदेखील संदेशाची लांबी छोटी असणं आवश्यक होतं. आणि मग लागला टेलिफोनचा शोध. यात संदेश देणारा आणि घेणारा या दोघात मध्यस्थ कुणीच नव्हता. आणि संदेश माणसाच्या रस्त्याने न जाता टेलिफोनच्या वायरीतून जाऊ लागला. ही मोठी क्रांती होती. जगभर टेलेफोन लाईन्सचं जाळं विणलं गेलं. पाण्यासाठी पाईपलाईन्स आणि संदेशासाठी टेलिफोन लाईन्स.

फक्त पाईपलाईन्स जाळं तयार करणं सोपं होतं. कारण पाण्याचा स्रोत आणि आपलं घर स्थिर होतं. त्यामुळे पाईपलाईन्सचं जाळं देखील स्थिर होतं. पण टेलिफोनच्या बाबतीत गडबड होती. इथे आपलं घर स्थिर असलं तरी आपल्याला येणारा फोन कुणाकडूनही येऊ शकला असता. म्हणजे स्रोतापासून ते घरापर्यन्त टेलिफोन लाईन्सचं स्थिर जाळं तयार करायचं असेल तर आपल्याला ज्या ज्या लोकांकडून फोन येऊ शकतील त्या सर्व लोकांकडून प्रत्येकी एक अश्या अनेक वायर्सचं जाळं आपल्याला विणावं लागलं असतं. आणि टेलिफोन उपकरणाच्या मागे या सगळ्या वायर्स लावण्यासाठी असंख्य सॉकेट्स तयार ठेवावी लागली असती. हे अशक्य होतं. म्हणून आपण दुसरी शक्कल लढवली. यात आपण मध्ये स्विच ठेवले. आणि स्विच बदलायला ऑपरेटर ठेवले. तो ऑपरेटर जिथे बसतो तिथे टेलिफोनचे स्विच एक्सचेंज होतात म्हणून ते टेलिफोन एक्सचेंज. आता टेलिफोन एक्सचेंजपासून घराजवळच्या बॉक्सपर्यंत अनेक वायर्सची बनलेली एक मोठी वायर. आणि घराजवळच्या बॉक्समधून घरापर्यंत एकच छोटी वायर. आणि एका एक्सचेंजच्या क्षेत्रातून दुसऱ्या एक्सचेंजच्या क्षेत्रात फोन करायचा असेल तर तो ट्रॅक कॉल जोडून द्यायला मध्ये ऑपरेटर अशी रचना तयार झाली.

आता संदेश देणारा आणि घेणारा दूरवर असले तरी एकमेकांना संदेश पाठवू शकत होते. मध्यस्थ नव्हते. माणसांच्या रस्त्यांऐवजी संदेशाचे स्वतःचे रस्ते होते. भेसळीची शक्यता अतिशय नगण्य होती. संदेश जवळपास गुप्त होते. आणि संदेश त्वरित पोहोचत होते. संदेशाची लांबी गरजेनुसार कमी जास्त करता येत होती. तंत्राची संदेशाचा आकार ठरवत नव्हती. पण संदेश केवळ ध्वनीच्या स्वरूपात होते. आणि कुणी छान नकलाकार असेल तर दुसऱ्याला फसविणे शक्य होते.

तारायंत्र आणि दूरध्वनीच्या सहाय्याने युरोपियांननी जगभर सत्ता प्रस्थापित केली. मग दोन महायुद्ध झाली. त्यात तारायंत्र आणि दूरध्वनीच्या मर्यादांचा वापर करून शत्रुपक्षाला जेरीला आणण्याचे प्रकार करून झाले. महायुद्ध संपली आणि शीतयुद्ध सुरु झाले. जुन्या वसाहतकारांना आता नवीन भीती सतावू लागली होती. जर कुणी महासागराच्या तळाशी टाकून ठेवलेल्या मोठमोठ्या टेलिफोन लाईन्स कापून टाकल्या तर दूरवर संदेश पोहोचवायचे कसे? जसं पाईप फोडला तर पुढे पाणी जाणार नाही तसंच बॅकबोन वायर तोडली तर पुढे संदेश जाणार नाही.

मग इथे आपण नवीन तंत्रज्ञान काढलं. त्याचं नाव पॅकेट स्विचिंग. माहितीच्या स्रोताजवळ माहितीची छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते सगळे तुकडे विविध वायर्समधून दुसऱ्या टोकापर्यंत पाठवायचे. तिथे मग या तुकडयांना पुन्हा जोडून मूळ संदेश पुन्हा तयार करायचा. आणि ही सगळी तोड-जोड यंत्रांकरवी करायची. इतकंच काय पण कुठलं पॅकेट कुठल्या वायरमधून जाईल तेदेखील यंत्रच ठरवणार. म्हणजे आता पाणी पाईपलाईनमधून न जाता बिसलेरीसारखं बाटल्यांमधून पाठवतो तसं एकाच वायरमधून संदेश न जाता त्याचे विविध तुकडे विविध वायरमधून जातात. मग यात तुकडे पुढे मागे पोहोचले, मधेच हरवले तर त्याची सगळी जबाबदारी यंत्र घेणार.

या कल्पनेतून जे जन्माला आलं त्याला आपण म्हणतो इंटरनेट. या व्यवस्थेची कल्पना येण्यासाठी एक व्हिडीओ देतो. 



इंटरनेट म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांची एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे. यात मेसेज तोडायचा कसा? पाठवायचा कसा? पोहोचला आहे की नाही याची खात्री कशी करायची? नाही पोहोचला तर पुन्हा पाठवायचा कसा? आणि पुन्हा जोडायचा कसा? याची प्रचंड प्रणाली आहे. आणि ही प्रणाली जुन्या टेलिफोन लाईन्सवर काम करणार होती. नंतर त्यात फायबर ऑप्टिक केबल्स, सॅटेलाईट्स असे अनेक मार्ग जोडले गेले. पण आपल्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरनेट हे पाईपलाईन्समधून पाणी पाठवण्यापेक्षा ट्रकमधून पाण्याच्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने पाठवणे आहे. आणि यात केवळ ध्वनी पाठवणे अशी सक्ती नसून आपण चित्र, लेखन, चलतचित्र असे विविध प्रकारचे संदेश पाठवू शकतो.