Friday, December 27, 2019

टेकडीवरचा माझा झीरो स्टोन

ARAI च्या टेकडीवर भरपूर पायवाटा आहेत आणि एक मोठा हमरस्ताही आहे. जेव्हा टेकडीवर नवीन होतो तेव्हा हमरस्त्याने जात होतो. त्याच हमरस्त्याने परतत होतो. जसजसा टेकडीवर रुळू लागलो तसतश्या त्या पायवाटाही खुणावू लागल्या. मग एक दिवस एका नवीन पायवाटेने जायला निघालो. काहीसं निर्जन आणि म्हणून अस्पर्श असं टेकडीच वेगळं रूप पाहून आनंदलो. माझ्या दिशाज्ञानाबद्दल मला विश्वास होता. त्यामुळे पायवाटेने गेलो तरी शेवटी नेहमीच्या ठिकाणी जाईन अशा आत्मविश्वासाने इयरफोन लावून गाणी ऐकत चाललो होतो. वाटेवर एका ठिकाणी बरोबर मध्येच कुणीतरी दगडांची रास रचलेली होती. कुण्या गाढवाने वाटेच्या मधोमध दगड रचून ठेवले आहेत असं म्हणत पुढे गेलो.


नेहमीचं ठिकाण जवळ येतंय असं वाटेना. फोनवर रेंज मिळत नव्हती. आणि निर्जन भाग असल्याने कुणाला काही विचारण्याची सोयही नव्हती. रस्ता भरकटल्यासारखं वाटलं. पण शिक्षक असल्याने आपण चुकू शकतो यावर चटकन विश्वास बसत नाही. चालत राहिलो. घामाघूम झालो होतो. यातला किती घाम चालण्यामुळे आणि किती घाम रस्ता सापडत नसल्याच्या तणावामुळे होता कुणास ठाऊक?

आणि एका वळणानंतर एकाएकी गजानन महाराजांचं टपरीवजा मंदिर समोर आलं. देवभोळा नसल्याने संतभोळाही नाही. पण इतरांना पवित्र वाटणारी वास्तू अनपेक्षितपणे समोर आली की माझ्याकडून नेहमी ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान आणि लष्करी पद्धतीच्या अभिवादनाचं संमिश्र रूप असलेली हाताची हालचाल आपोआप होते, तशी झाली. मंदिराच्या समोरच्या छोट्याश्या अंगणात एक माझ्यासारखा चालकरी हाशहुश करत घाम पुसत बसला होता. आणि मी माझ्या नकळत एक सुटकेचा निश्वास टाकला. त्याला रस्ता विचारला नाही पण आपण निदान मानवी वावराच्या कक्षेत आहोत हे जाणवून सुखावलो. पुढे जात राहिलो तर तीव्र उतार लागला आणि टेकडी संपली. नेहमीची जागा आलीच नाही. मग धापा टाकीत मागे वळलो. पुन्हा चिलीम ओढणाऱ्या महाराजांचं मंदिर दिसलं आणि मनाशी खूणगाठ बांधली की महाराजांच्या मंदिराच्या उजवीकडे टेकडी संपते. तिथे जायचं नाही.

दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने गेलो. पुन्हा तीच दगडांची रास ओलांडली. आता पुढे गजाजन महाराजांचं देऊळ येईल हे माहिती होतं. देऊळ आलं पण आज उजवीकडे वळलो नाही. डावीकडे अगदी छोटी पायवाट होती. त्या वाटेने गेलो. आजूबाजूला झाडी झुडपं जास्त होती. चालायला छान वाटत होतं. मनात उगाच आपण 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'चे किंवा मग 'सर्व्हायवर' सारख्या कार्यक्रमाचे नायक आहोत अशी भावना येत होती. आपण गतानुगतिक नाही. आपण नवीन वाट शोधायला घाबरत नाही. असे विचार डोक्यात येऊन स्वतःबद्दल किंचित कौतुक आणि अभिमानही वाटू लागला. झाडी विरळ होऊ लागली. आणि मग पुन्हा मोठी पायवाट सुरु झाली. पुढे जात राहिलो. आणि मग एका उंच चढावाला पार केलं तर पुन्हा नेहमीचा हमरस्ता समोर आला. काहीही केलं नसताना विजयाचा आनंद मनात भरून आला. उशीर झाला होता. म्हणून परतताना पुन्हा हमरस्त्याने निघालो. मग कित्येक दिवस हाच शिरस्ता झाला. जाताना नवीन पायवाट. दगडांची रास. गजानन महाराजांचं मंदिर. डावीकडची छोटी पायवाट. मग मोठी पायवाट. मग चढण. मग हमरस्ता. मग नेहमीच्या ठिकाणी चालण्याचा शेवट आणि परतण्यासाठी नेहमीचा हमरस्ता.

एका रविवारी असाच परत निघालो होतो. चढणापाशी आलो. समोर हमरस्ता खुणावत होता. पण मनात विचार आला की आज क्लास नाही आहे. तर मग पुन्हा पायवाटेने उलट जाऊया. म्हणून पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करत, हमरस्ता सोडून चढ उतरू लागलो. मोठी वाट संपत आली. कानात कुठलीशी डॉक्युमेंटरी चालू होती. त्याच तंद्रीत चाललो होतो. आणि आजूबाजूला ओळखीच्या खाणाखुणा दिसेनात. तासभर चालून झालेलं होतं. त्यामुळे घशाला कोरड पडलेली होती. शरीरातील अतिरिक्त मेदवृद्धीमुळे भरपूर घाम आलेला होता. तशात डॉक्युमेंटरी संपली. आता लक्ष आजूबाजूला जास्त होतं. सगळी झाडं सारखी. सगळे दगड सारखे. एकक्षण थांबलो. पुन्हा मागे जावं असं वाटलं. पण तिथे दोन मुली माझ्या मागून येताना दिसल्या. (कदाचित माझ्या वयाच्या असाव्यात किंवा मग अजून काही. पण चष्मा घातलेला नसल्याने मला दुरून त्या मुलीच वाटल्या). त्यांचं माझ्याकडे लक्ष जावं इतका मी रुबाबदार नाही हे मला माहिती होतं. पण किमान 'हा धापा टाकणारा मध्यमवयीन पुरुष रस्ता चुकल्यामुळे गोंधळलेला आहे' असं त्यांचं माझ्याबद्दल मत होऊ नये म्हणून मी निसर्ग निरीक्षण करतो आहे असा आव आणला. आणि मग केसांवरून हात फिरवत पुन्हा उताराला लागलो. आता उजव्या हाताला अनोळखी चढण, डाव्या हाताला खोल घळ, मागे अनोळखी मुली आणि त्यांच्या मागे ओळखीचा रस्ता अश्या अवस्थेत मी पोटातल्या कावळ्याचं संगीत ऐकत अरुंद वाटेवरून चालू लागलो.

मुली बऱ्याच मागे पडल्या आहेत आणि त्यांना आपण दिसत नाही आहोत हे कळल्यावर मात्र मी त्या वाटेतून आणि प्रसंगातून मार्ग कसा काढायचा त्याचा विचार करू लागलो. मागे मुली असणार त्यामुळे तिथे जाण्याचे दोर मनाच्या आढ्यताखोर शेलारमामाने कापून टाकले होते. शेवटी मनाचा हिय्या केला आणि हर हर महादेव करत उजवीकडच्या अनोळखी चढणीकडे वळलो. काट्याकुट्यातून आणि घसरणाऱ्या दगडांवरून पायाबरोबर हातही वापरत, धापा टाकत चढण कशीबशी संपवली. अजूनही काही ओळखीचं दिसेना. त्यानंतर ज्याप्रमाणे मी धावलो ते जर कुणी बघितलं असतं तर, पर्णकुटीत सीता नाही हे पाहून सैरभैर झालेला आणि वृक्षवल्लरिंना तिच्या खाणाखुणा विचारणारा राम कसा दिसत असेल त्याची त्यांना लगेच कल्पना आली असती. फक्त शरचाप, जटा आणि वल्कलं तेवढी नव्हती.

दिशाहीन होऊन भटकण्यात अजून पाच मिनिटं गेली. ती पाच मिनिटं मला कित्येक युगांसारखी वाटून आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत समजलेला नसला तरी त्याची अनुभूती मात्र आली. जंगल संपून एक पायवाट दिसली. सगळ्या दिशा आणि सगळ्या वाटा आता सारख्याच दिसू लागल्या होत्या. स्वतःच्या दिशाज्ञानावरचा विश्वास आता संपल्यात जमा झाला होता. आपल्याला बहुतेक चकवा लागला आहे असं वाटू लागलं. मग माझ्या लहानपणी रविवारी दुपारी दूरदर्शनवर प्रादेशिक भाषेतील चित्रपट दाखवत त्यात पाहिलेला सत्यजित रेंचा 'गुपी गाईन बाघा बाईन' हा चित्रपट आणि त्यात जंगलात वाट हरवलेले गोपी आणि बाघा आठवले. त्यांच्यासमोरचा भुतांचा नाच आठवला. मग युट्युबवर तो चित्रपट आहे हे कळल्यावर मुलांना तो बघण्याची सक्ती केली होती ते आठवलं. आणि सध्याच्या ऍनिमेशनपटांच्या खुराकावर वाढलेल्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर, 'आपल्या बाबांना लहानपणी हे कसं काय आवडलं असावं?' असा प्रश्न उमटलेला पाहून आपण कसे अस्वस्थ झालो होतो ते आठवून हसू आलं. आणि इतक्या गोंधळलेल्या मनस्थितीतही आपल्या डोक्यात रामायणापासून ते आईन्स्टाईन आणि सत्यजित रेंपर्यंत कुठले कुठले विचार येत आहेत हे जाणवून स्वतःबद्दल थोडं कौतुकही वाटलं.


आता मी वाट फुटेल तिथे चालत होतो. मनातल्या शेलारमामाला, मागे दिसलेल्या मुलींना, 'अनोळखी मुलींनाही आपण हुशार दिसलं पाहिजे' या स्वतःच्या बावळट विचाराला शिव्या घालू लागलो होतो. आणि एकाएकी मला समोर ती दगडांची रास दिसली.


सीतेची पैंजणं पाहून रामलक्ष्मणाला जसा आनंद झाला असेल अगदी तसाच आनंद मला झाला. त्या दगडांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. शाहरुखसारखे हात पसरले. स्वतःलाच एक प्रदक्षिणा घातली. आता गजानन महाराजांचं देऊळ कुठे असेल त्याचा पत्ता लागला. टेकडीच्या शेवटच्या टोकाकडे नेणारी नेहमीची ओळखीची चढण कुठे आहे ते कळलं. घरी जायचा रस्ता समजला. सगळ्या टेकडीचा माझ्या मनात तयार असलेला आणि काही काळापूर्वी विस्कटलेला नकाशा पुन्हा पूर्ववत झाला.

रस्त्याच्या मध्यभागी रचलेली ती दगडांची रास जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली होती तेव्हा तिच्याबद्दल मनात आलेले नकारात्मक विचार आता दूर पळाले होते. त्यांची जागा आता विलक्षण आत्मीयतेने आणि प्रेमाने घेतलेली होती. याआधी असाच रस्ता चुकलेल्या कुण्या वाटसरूने पुन्हा रस्ता चुकू नये म्हणून आणि कदाचित इतरांनाही रस्ता कळावा म्हणून ती रास रचली असावी असं वाटून मी त्या अनामिक वाटसरूचे मनातल्या मनात आभार मानले. त्याबद्द्ल कृतज्ञता मनात दाटून आली होती. त्यामुळे त्याला काही देता आलं नाही तरी किमान त्याच्या धडपडीला काहीतरी द्यावं म्हणून मग बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलून त्या दगडांच्या राशीवर ठेवला आणि माझ्या घराच्या रस्त्याला लागलो.

रस्ते माहिती नसताना जंगलातून फिरत शहरे वसवणाऱ्या आदिमानवाबद्दल; समुद्रात असे दगड रचणे शक्य नसताना हजारो मैल दूर अश्या युरोपातून संपूर्ण जग पादाक्रांत करणाऱ्या माणसांबद्दल; वाळवंटात रोज वाऱ्याने टेकड्या आपल्या जागा बदलत असताना, काफिले घेऊन फिरणाऱ्या व्यापाऱ्यांबद्दल; सगळ्यांबद्दल आदर दाटून आला. काही दिवसांपूर्वी दोन्ही लेकरांना पुण्याचा झीरो स्टोन दाखवायला घेऊन गेलो होतो त्यावेळी भारताच्या टोपोग्राफीचा सर्व्हे करण्याचा महान प्रकल्प तडीस नेणाऱ्या ब्रिटिशांबद्दल आदर वाटला होता. त्यांच्या त्या कल्पनेशी माझ्या अनुभवाचा बारीकसा धागा जुळला आहे असं वाटून अंगी आलेला शीण थोडा कमी झाला.
आणि मग जाणवलं की हे खुणेचे दगड जुन्या पांथस्थांना रस्ता बरोबर असल्याची खात्री देतात, नवीन पांथस्थांना खाणाखुणा देतात आणि परतीच्या वाटसरूंनाही दिग्दर्शन करतात. हे दगड म्हणजे कुणाच्यातरी अनुभवांचे संचित आहेत. कुणाच्या तरी वाटेचा, ती हरवण्याचा, पुन्हा सापडण्याचा आणि इतर कुणी हरवू नये या इच्छेचा वस्तुरूप इतिहास आहेत. मग वाटलं मी जे लिहितो तेही असेच दगड आहेत. मी परतीच्या प्रवासाला निघालो तर मला घराकडे नीट जातो आहे हे सांगणारे. दुसरा कुणी या वाटेने जात असेल तर त्यालाही दिग्दर्शन करणारे. अर्थात त्याला त्यांचं महत्व पटलं तरंच ठीक. नाहीतर दगडांची रास पहिल्यांदा पाहून माझ्या मनात जसे नकारात्मक विचार आले होते तसेच त्याच्याही मनात आले तर त्यालाही किमान एकदा तरी जंगलात वाट चुकण्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि मग कदाचित तोही सैरभैर होईल. मग त्याला दगडांचे प्रयोजन कळेल. आणि मग कदाचित तोही माझ्यासारखाच कृतज्ञ होऊन एखादा दगड त्या राशीवर चढवेल.

Thursday, December 19, 2019

व्यर्थ न हो बलिदान (भाग ३)जेव्हा श्री सुब्रमण्यम यांनी एवरग्रीनिंग या संकल्पनेचा उल्लेख केला तेव्हा बँका असं का करतात याबद्दलची दोन स्पष्टीकरणं मला आठवली. बँकांनी असं करण्यामागे दोन प्रेरणा काम करत असतात असं मानलं जातं.

१) Containtment Scenario (कंटेन्टमेंट सिनारिओ) किंवा नुकसान रोखण्याची शक्यता. या कल्पनेप्रमाणे बँका अर्थव्यवस्थेकडे पाहतात. जर अर्थव्यवस्था जोमात असेल तर आपण सध्याचे मृत कर्ज पुन्हा जीवनदान देऊन सदाबहार केले तर आपल्याला ते अनुत्पादक घोषित करावे लागणार नाही परिणामी आपला ताळेबंद आणि नफातोटा पत्रक अनाकर्षक दिसणार नाही. अर्थव्यवस्था जोमात असल्याने आपण दिलेली इतर कर्ज आपल्याला व्यवस्थित उत्पन्न देतील. यातून अनुत्पादक कर्जांचा प्रश्न जरी सुटला नाही तरी त्यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानाचा फटका इतर चांगल्या कर्जाच्या उत्पन्नात दडून जाईल.

ज्याप्रमाणे शाळेत इन्स्पेक्शनला साहेब येणार असतील तर जुन्या काळचे शिक्षक जरा कमी हुशार मुलांना इतर हुशार मुलांच्या मधे दडवून ठेवत आणि या किंचित ढ मुलांना पाढे म्हणता आले नाहीत तरी ते सगळ्यांबरोबर निदान तोंड हलवत रहातील याची खात्री करून घेत त्यातलाच हा प्रकार. ढ मुलाचे पाढे पाठ न होण्याची समस्या सुटत नाही पण ते इन्स्पेक्शन साहेबांच्या लक्षात येत नाही इतकाच काय तो फरक.

२) Phoenix Scenario (फिनिक्स सिनारिओ) किंवा राखेतून भरारी घेण्याची आशा. या कल्पनेप्रमाणे बँकांना अनुत्पादक झालेल्या कर्जाच्या कर्जदाराबद्दल आपुलकी आणि त्याच्या व्यवसायातील अडचणींबद्दल सहानुभूती असते. त्याला जर पुन्हा मदत केली तर तो अडचणींतून बाहेर येऊ शकेल आणि त्याचे पुनरुज्जीवित केलेले कर्ज फेडू शकेल अशी बँकेला खात्री वाटते म्हणून बँका त्याचे कर्ज अनुत्पादित घोषित ना करता त्याला पुनरुज्जीवित करतात.

हा फिनिक्स सिनॅरिओ आठवला आणि मग लगोलग युवाल नोहा हरारींच्या होमो डेऊस या पुस्तकातील काही संदर्भ आठवले.

माणसाचा मेंदू कसा काम करतो? आपण निर्णय कसे घेतो? आपण अनुभवांतून खरंच शहाणे होतो का? याबद्दल बोलताना हरारी अनेक शास्त्रज्ञांच्या कामाचा दाखला देत सांगतात की आपल्या मेंदूचे दोन भाग असतात. एक अनुभव घेणारा आणि दुसरा त्या अनुभवांतून एक सुसंबद्ध गोष्ट रचणारा.

अनुभव घेणारा भाग हा कायम वर्तमानात जगत असतो. या क्षणाचा अनुभव घेत असताना त्याला त्याआधीच्या क्षणात घेतलेल्या अनुभवाची स्मृती नसते आणि दोन लगतच्या अनुभवांतील संबंध जोडून त्याचा सलग अनुभव घेण्यास तो असमर्थ असतो. म्हणजे आपल्या मेंदूत केवळ हाच एक भाग असता तर आपण कधीच अनुभवांतून शहाणे होऊ शकलो नसतो.

पण सुदैवाने आपल्या मेंदूत दुसरा भाग असतो त्याला अनुभव घेता येत नसले तरी तो त्या अनुभवांतून एक आपल्याला एक गोष्ट तयार करून सांगतो. त्या गोष्टीच्या आधारे आपण तशाच प्रकारच्या नवीन अनुभवात कसं वागायचं ते ठरवतो. हा गोष्ट तयार करणारा भाग आपल्याला प्रत्येक घटनेचा अर्थ सांगत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या अनुभवांची साखळी तयार करून त्यातून तो एक सुसंगत गोष्ट तयार करून आपल्याला एखादी गोष्ट का करावी किंवा का करू नये यासाठी कारण किंवा हेतू तयार करून देत असतो.

पण या गोष्ट तयार करणाऱ्या भागाचीही एक मर्यादा असते. त्याला सगळे अनुभव लक्षात ठेवून त्याआधारे गोष्ट तयार करता येत नाही. त्यामुळे तो केवळ अनुभवाची सुरवात आणि त्याचा शेवट या दोन बिंदूंची सरासरी काढून आपली गोष्ट पूर्ण करतो. या सरासरी काढण्यामुळे एक गडबड होते. ज्या घटनांची सुरवात आणि शेवट दोन्ही आल्हाददायक असतात किंवा सुरवात आणि शेवट दोन्ही कमी त्रासदायक असतात त्या घटना कितीही त्रासदायक असल्या तरी आपण त्यांना पुन्हा पुन्हा सामोरे जाऊ शकतो. याउलट ज्यांची सुरवात आणि शेवट त्रासदायक असतात त्यांचा बाकीचा अनुभव तितका त्रासदायक नसला तरी त्या घटना आपल्याला अप्रिय होतात. म्हणजे वास्तविक घटना आणि त्यांच्याबद्दल आपल्या मेंदूने तयार केलेली आणि आपल्याला सत्य वाटणारी काल्पनिक गोष्ट यांत बरीच मोठी तफावत असू शकते.

मानवी मेंदूच्या या गडबडीला निसर्गानेही वापरून घेतलेले आहे. त्यामुळे मरणप्राय अशा वेदना होऊनही नंतरच्या दोन तीन महिन्यात शरीरात तयार होणारे सुखकारक हार्मोन्स स्त्रियांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार करतात. प्रसूतीनंतर शरीरात तयार होणाऱ्या या हार्मोन्समुळे त्या वेदनादायी घटनेची सरासरी तीव्रता अतिशय कमी होते आणि बऱ्याच स्त्रियांना पुन्हा आई बनावसं वाटतं. लहान मुलांचे डॉक्टर आपल्याजवळ गोळ्या चॉकलेट्स ठेवतात आणि इंजेक्शन दिल्यावर रडणाऱ्या बाळांना चॉकलेट देऊन शांत करतात. पाच वर्षात आपल्या कारभाराला कावलेल्या जनतेने निवडणुकीत आपल्यालाच पुन्हा निवडून द्यावे म्हणून नेते मंडळी पाचव्या वर्षात करात सवलती, पगारात वाढ, किंवा नवनवीन योजनांची घोषणा करतात. आपण पब्लिक मेमरी छोटी असते असा निष्कर्ष काढून मोकळे होतो पण ते तसं नसून गोष्टी तयार करून आपल्याला पुढचे निर्णय घ्यायला मदत करणाऱ्या मेंदूच्या भागाला डॉक्टर आणि नेते मंडळींनी गुंगवून टाकलेल असतं. वाईट अनुभवांच्या शेवटी येणार सुखद अनुभव आपल्या मनात तयार होणाऱ्या गोष्टीतील अप्रियतेची सरासरी कमी करून टाकतो आणि आपण पुन्हा एकदा अप्रिय घटनेचं स्वरूप समजून न घेता तिला सामोरे जायला हसतमुखाने तयार होतो. आणि "ज्याचा शेवट गोड त्याचं सारंच गोड" किंवा "अंत भला तो सब भला" हे वाक्प्रचार आपोआप शास्त्रोक्त ठरतात.

या गोष्ट तयार करणाऱ्या मेंदूच्या भागाबद्दल बोलताना हरारी पुढे जॉर्ज बोर्गेस या अर्जेंटीनीयन लेखकाच्या एका छोट्या गोष्टीचा उल्लेख करतात. 

Jorge Borges
Image Credit : Internet 
ही गोष्ट मिगेल सर्वांटीसच्या जगप्रसिद्ध डॉन क्विक्झोट (डॉन किहोते) च्या गोष्टीवर बेतलेली आहे.

डॉनला त्याच्या मेंदूच्या गोष्टी सांगणाऱ्या भागाने पटवून दिलेलं असतं की तो एक मध्ययुगीन शूर सरदार आहे. आणि राजकन्येला वाचवण्यासाठी तो राक्षसांशी युद्ध करतो आहे. पण डॉनच्या मेंदूने त्याला दाखवलेली राजकन्या प्रत्यक्षात शेतावर काम करणारी एक साधारण मोलकरीण असते आणि डॉनच्या मेंदूंने जे राक्षस आहेत हे त्याला पटवून दिलेलं असतं त्या प्रत्यक्षात पवनचक्क्या असतात.

पवनचक्क्यांना राक्षस समजून लढणारा डॉन
Image  Credit: Internet
बोर्गेस यांनी या कथेला पुढे नेत असा मुद्दा मांडला आहे की समजा पवनचक्क्यांशी लढून स्वतःचं हसं उडवून घेणाऱ्या डॉनच्या हातून खरोखरंच कुणाचा खून झाला तर तो काय करेल? आपल्या हातून एका हाडामांसाच्या जिवंत व्यक्तीचा खून झाला आहे हे कळल्यावर डॉन कसा वागेल त्याबाबत बोर्गेसनी चार शक्यता वर्तवलेल्या आहेत त्यातल्या तीनच आपल्यासाठी महत्वाच्या आहेत म्हणून तितक्याच इथे लिहितो.

१) पहिल्या शक्यतेनुसार डॉनला कदाचित या घटनेचं गांभीर्य कळणार नाही. त्याच्या गोष्टी सांगणाऱ्या मेंदूने त्याच्यावर इतका मोठा पगडा बसवलेला असू शकतो की त्याला आपण काय केलं आहे हेच कळणार नाही. हे अनेकांच्या बाबतीत होतं. आपण यांना मठ्ठ किंवा मानसिक रुग्ण मानतो.

२) दुसऱ्या शक्यतेनुसार "युद्धस्य कथा रम्या" याला भुलून सैन्यात दाखल झालेला सैनिक ज्याप्रमाणे प्रत्यक्ष रणधुमाळीनंतर बधीर होऊन पुन्हा युद्धभूमीवर जायला टाळाटाळ करू शकतो त्याप्रमाणे आपल्या गोष्टी सांगणाऱ्या मेंदूने आपल्या हातून हे काय भयंकर कृत्य करवून घेतलं आहे, अशा विचाराने डॉन आपल्या कोषातून बाहेर पडून पूर्णपणे वेगळा माणूस बनू शकतो. ही शक्यता कितीही आकर्षक वाटली तरी फार थोड्या जणांसाठी ही प्रत्यक्षात येऊ शकते. वाल्याचा वाल्मिकी व्हायला नारदमुनी भेटावा लागतो आणि तरीही ज्या ज्या लोकांना नारदमुनी भेटले त्या सर्वांत वाल्मिकी ऋषी होण्याइतपत परिवर्तन घडून आले नाही. वाल्याचा वाल्मिकी ही आपल्या पुराणातील एकमेव गोष्ट आहे.

३) याउलट तिसरी आणि सर्वात जास्त गुंतागुंतीची शक्यता म्हणजे आपल्या कृत्याची त्याला जाणीव होईल. पण जे केलं आहे ते अयोग्य नसून तेच बरोबर आहे हे स्वतःला समजावण्याची त्याची धडपड सुरु होईल. आणि इथे त्याचा गोष्टी सांगणारा मेंदूचा भाग मदतीला येईल. तो त्याला एक नवीन गोष्ट तयार करून सांगेल ज्यामधे त्या जिवंत माणसाला मारणे कसे आवश्यक होते हे डॉन स्वतःला पटवू शकेल.

कदाचित ही तिसरी शक्यता आपल्याला प्रथमदर्शनी अशक्य वाटू शकते. पण तिन्हीपैकी तिसरी शक्यताच बहुसंख्य माणसांसाठी प्रत्यक्षात येते. आपण केलेल्या घृणास्पद कृत्याला न्याय्य ठरवण्याची आपली इच्छा इतकी तीव्र असते की आपण त्यासाठी एक नवीन गोष्ट तयार करतो. आणि मग आपले कृत्य योग्य हे स्वतःला पटवण्यासाठी आपण मग तेच कृत्य पुन्हा पुन्हा करू लागतो.

म्हणून अमेरिका आधी व्हिएतनाम युद्धात आणि मग अफगाणिस्तान युद्धात अडकते. साम्यवादाचा पाडाव करतो आहोत ही गोष्ट अमेरिकन समाजमानाने मान्य केली की मग हजारो सैनिक युद्धभूमीवर पाठवले जातात. आणि पहिल्या सैनिकाचा बळी गेला की सुरु होतो उद्घोष “व्यर्थ न हो बलिदान” चा. मग पहिल्या सैनिकाचे बलिदान व्यर्थ होऊ नये अनेक सैनिकांचे बलिदान द्यायला समाज तयार होतो. सैनिकही तयार होतात. युद्धातून अपंगावस्थेत परत आलेला सैनिक आणि त्याचे नातेवाईकही आपण जे केलं ते बरोबर होतं असंच स्वतःला सांगत रहातात. व्हिएतनामच्या भूमीवर आपले सैनिक पाठवून आपण मूर्खपणा केला या वास्तविक सत्यापेक्षा आपण साम्यवादाच्या राक्षसाशी लढताना अपंग झालो हे काल्पनिक सत्य त्या सगळ्यांना सुखावह वाटते. आणि लढाई जिंकली असेल तर विजयोन्माद देते; हरली असेल तर पुन्हा लढायला कारण देते.

जसा डॉन तसे बँकर्स. आपल्या काल्पनिक सत्यात जगाला फसवून अनुत्पादक कर्जांना पुनरुज्जीवित करणारे. उद्या कदाचित बाजार इतका उसळेल की बाकीच्या कर्जांतून मिळणाऱ्या उत्पन्नात ही अनुत्पादक कर्जे खपून जातील. किंवा मग कुणास ठाऊक? कदाचित आजचे अनुत्पदक कर्ज उद्या रसरशीत व्यवसाय म्हणून उभे राहील आणि सगळी रक्कम सव्याज परतफेड करेल!

पण वास्तवातला बाजार कायम आपल्या कल्पनेतल्या बाजाराप्रमाणे चालायला बांधील नसतो. तेच आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे आपण एका आर्थिक अरिष्टाच्या खाईसमोर उभे आहोत. आणि हे आपल्याला अर्थव्यवस्थेचे सगळे आकडे सांगत आहेत. उच्चविद्याविभूषित अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. अनेक कंपन्यातील कामगार कपात सांगत आहे. कित्येक ठिकाणी रखडणारे किंवा न वाढणारे पगार सांगत आहेत.

असं सगळं असताना जेव्हा मी समाजमाध्यमांवर नजर टाकतो तेव्हा मी अचंबित होतो. अर्थव्यवस्थेबाबत सरकार कुठली धोरणात्मक पावले टाकत आहे याबद्दल काहीच चिंता न करता इथे अनेक लोक ज्या मुद्द्यांवर बोलत आहेत ते पाहून पुन्हा एकदा 'व्यर्थ न हो बलिदान'ने आपली भूल या देशातल्या सुजाण आणि सुशिक्षित लोकांवरही टाकायला सुरवात केली की काय? असं वाटू लागतं.

ज्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या खानपान पद्धती आहेत, वस्त्रप्रावरणांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, जिथले नववर्ष सुरु होण्याच्या तारखादेखील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या आहेत आणि ज्या देशात सामील होताना अनेक प्रदेशांनी आपापल्या परंपरा नष्ट होऊ न देण्याच्या बोलीवर सामीलनाम्यावर सही केली आहे; त्या देशावर आर्थिक मंदीचं संकट घोंघावत असताना सुशिक्षितांच्या तोंडचे विषय मात्र आर्थिक सोडून बाकी सर्व बाबींवर आहेत, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.

आपल्या समाजाला काय हवं आहे तेच आपल्याला माहिती नाही आहे याबद्दल माझी खात्री पटलेली आहे. कुठलीही तातडीची आवश्यकता नसताना केवळ जाहीरनाम्यात लिहिलं होतं म्हणून आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींबाबत कायदे संमत करून घेणं खरोखर आवश्यक होतं का? या कायद्यातील तरतुदींमुळे होऊ घातलेल्या प्रचंड गोंधळाला आणि खर्चाला ऐरणीवर घेत विरोध करण्याऐवजी इतर फुटकळ बाबींवर विरोध करणे खरोखर आवश्यक होतं का? ईशान्येच्या राज्यांना वेगळा न्याय लावत हा कायदा संमत करणं आणि त्याच वेळी ‘काश्मीरला वेगळा दर्जा का?’, असा प्रश्न विचारणं यात काही विसंगती आहे, असं कुणाला वाटत नाही का? आसामच्या लोकांनी कायद्याविरोधी निदर्शन करणं चूक आहे पण अंदमानच्या बेटांवरील ख्रिश्चन मिशनऱ्याला मारून टाकणाऱ्या आणि आपल्या भूमीवर परदेशी घुसखोरच काय पण स्वदेशी लोकांनाही पाय ठेवू न देणाऱ्या हिंसक आदिवासी जमाती योग्य आहेत, या दोन वाक्यात काही विसंगती आहे, असं कुणाला वाटत नाही का?

राष्ट्रातून देश उभा राहू शकतो पण विविध परंपरांनी नटलेल्या देशातून एक राष्ट्र उभे करणे म्हणजे अनेकांचा आवाज दडपणे हे साधं सत्य पटवून घ्यायला खरंच इतकं कठीण आहे का? की कुणाच्या तरी कल्पनेतील कुठल्यातरी प्राचीन राष्ट्राच्या अस्तित्वासाठी आपण जिवंत माणसांचे, त्यांच्या परंपरांचे, त्यांच्या स्वप्नांचे, त्यांच्या आर्थिक विकासाचे आणि जरूर पडेल तेव्हा त्यांच्या मुलाबाळांचे बळी द्यायला तयार झालो आहोत? आपण जरी आपल्या कल्पनेतील सत्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या स्वप्नाला पुनरुज्जीवित करत असलो तरी त्याप्रमाणे प्रकट व्हायची सक्ती वास्तविक सत्यावर नाही. आपण कदाचित आपल्या भूतकाळातील शत्रूंवर विजय मिळवत असू पण भविष्यातील शत्रू आपण शिकून घेतलेल्या सर्व तंत्रांपेक्षा वरचढ असेल. आणि आपण त्याला तोंड द्यायला तयार होण्याऐवजी, वास्तविक देशाला सोडून काल्पनिक राष्ट्रासाठी व्यर्थ न हो बलिदानचा घोष करत बसलो, तर आपल्यात आणि एवरग्रीनिंग करून संपूर्ण समाजाला फसवणाऱ्या बॅंकर्समध्ये काहीच फरक नसेल.

समाप्त

व्यर्थ न हो बलिदान (भाग २)


अरविंद सुब्रमण्यम
Image Credit : Internet
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीच्या कारणांबद्दल आपले निष्कर्ष मांडून झाल्यावर श्री. सुब्रमण्यम पुढे करायच्या उपाययोजनांकडे वळतात. त्यासाठी त्यांनी मांडलेले मुद्दे समजण्यासाठी अर्थशास्त्रातील एक महत्वाची संकल्पना समजणे आवश्यक आहे.

जीडीपी किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन पद्धती आहेत. त्यातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे Expenditure Method (एक्सपेंडिचर मेथड) किंवा खर्चाधारित पद्धत. या पद्धतीप्रमाणे सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास देशाचा जीडीपी म्हणजे C+G+I+(X-M). किंवा Consumption + Government Expenditure + Investment + (Export - Import). सोप्या शब्दात सांगायचं तर जीडीपी म्हणजे देशातील नागरिकांनी वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी केलेला खर्च (+) सरकारी खर्च (+) देशात झालेली गुंतवणूक (+) देशाची निर्यात (-) देशाने केलेली आयात.

म्हणजे जर देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर उपभोगावरचा खर्च किंवा सरकारी खर्च किंवा गुंतवणूक किंवा निर्यात यापैकी कुठलीही एक गोष्ट किंवा सर्व गोष्टी वाढवल्या पाहिजेत किंवा / आणि आयात कमी केली पाहिजे.

हा मुद्दा लक्षात घेऊन आपण श्री सुब्रमण्यम काय म्हणतात त्याकडे वळूया.

अनेक लोकांना वाटते की उपभोगावरचा खर्च वाढवणे हे जीडीपी वाढवण्याचे एक कारण आणि त्यामुळे जीडीपी वाढणे हा परिणाम आहे. परंतु श्री. सुब्रमण्यम सांगतात की आपण कारण परिणाम यांची साखळी उलटी बघत आहोत. सूत्ररूपाने संकल्पना मांडल्याने हा गोंधळ होत असावा. त्यांच्या मते उपभोगावरचा खर्च वाढल्याने जीडीपी वाढत नसून जीडीपी वाढल्याने उपभोगावरचा खर्च वाढत असतो.

जीडीपी वाढण्याची कारणे कोणती? या प्रश्नाला उत्तर देताना ते सांगतात "गुंतवणूक आणि निर्यात हीच खरी जीडीपी वाढवण्याची दोन इंजिन्स आहेत. यापूर्वी भारताने अनुभवलेली प्रगती हीदेखील याच दोन इंजिनांवर आधारलेली होती. आपण उत्पादन क्षेत्रात मुसंडी मारण्याऐवजी सेवा क्षेत्रात जोरदार मुसंडी मारल्याने कदाचित आपल्याला हे लक्षात येत नसेल पण १९९१ पासून आपण अनुभवलेली प्रगती ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील आपल्या निर्यातीमुळे आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ भारतात वाहता राहिला यामुळे झालेली होती. या प्रगतीचा परिणाम म्हणजे अनेक कुटुंबांचे उत्पन्न वाढले आणि अंतिमतः देशातील नागरिकांकडून उपभोगांवरचा खर्च वाढला. त्यामुळे आपण आता उपभोगांवरचा खर्च वाढवण्याकडे लक्ष देण्याऐवजी गुंतवणूक आणि निर्यात या गोष्टी कशा वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपली निर्यात तेव्हाच वाढते जेव्हा आपल्या मालासाठी किंवा सेवांसाठी अन्य देशात ग्राहक उपलब्ध असतात आणि त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजार इतका मंदावला आहे की निर्यातकेंद्री धोरण आखूनही आपल्याला त्यात मोठे यश मिळेल असं वाटत नाही. मग राहता राहिला मार्ग गुंतवणुकीचा. त्यातही परदेशी गुंतवणूक येण्याचे आपले मार्ग आता फार प्रशस्त राहिलेले नाहीत. असे का झाले असावे याबद्दल बोलण्याचे श्री सुब्रमण्यम यांनी टाळले असले तरी माझ्या मते आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवरील अस्थिर राजकीय आणि सामाजिक वातावरण यासाठी जबाबदार असावं.

आता जर उपभोगांवरचा खर्च हे जीडीपी वाढण्याचे कारणंच नसेल आणि गुंतवणूक व निर्यात हे दोन्ही राजमार्ग आता काट्याकुटयांतून जात असतील तर आपण यातून बाहेर पडणार कसे? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की आपण परिस्थितीचे सुयोग्य आकलन करून आपल्या अपेक्षांवर लगाम ठेवला पाहिजे. दोन अंकी वाढीचा दरंच काय पण ८% वाढीचा दर हे अशक्यप्राय स्वप्न आहे हे आपण स्वीकारले पाहिजे.

वेगळ्या भाषेत सांगायचं तर भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था तोंडापेक्षा मोठा घास घेतल्यासारखी झाली आहे. घास टाकणे शक्य नसल्याने गुदमरायला होणार आहेच. यावर एकमेव उपाय म्हणजे आता तोंडातल्या घासाचे हळूहळू तुकडे करून ते गिळणे आणि तोपर्यंत नवीन घास न घेणे, हाच आहे.

अर्थात हे काही फार आकर्षक भविष्य नाही. त्यामुळे लोकानुनयी निर्णय करण्याकडे सरकारचा कल झुकू शकतो. ते टाळण्यासाठी श्री. सुब्रमण्यम सरकारला सल्ला देतात की,

१) वैयक्तिक उत्पन्न कर कमी करु नयेत(याचे लाभार्थी फार थोडे असतील आणि या निर्णयामुळे उपभोगावरचा खर्च फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. त्याऐवजी उत्पन्न कर तितकाच ठेवून गरिबांना डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर करुन समाजाच्या पायथ्याशी असलेल्या अनेकांची क्रयशक्ती सरकारने वाढवावी)

२) जीएसटीचे दर (विशेषतः न्यूनतम दर) वाढवू नयेत (याने होणाऱ्या भाववाढीमुळे बहुसंख्य लोकांची खर्च करण्याची तयारी आणि ताकद दोन्ही कमी होतील)

३) व्याजदर कमी करत रहाण्याचा फायदा होणार नाही, कारण बॅका आता जोखीम घ्यायला घाबरत असल्याने रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या व्याजदरकपातीचा फायदा गिऱ्हाईकांपर्यंत पोचणार नाही.

४) इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड (IBC) मधे अधिक लवचिकता आणावी. वीजनिर्मिती आणि रिअल इस्टेट सेक्टर हे पुढचे खड्डे आहेत. त्यांचा धक्का कमी बसावा अशा तर्‍हेने IBC मधे लवचिकता आणावी. सगळा भार न्यायालयांवर न टाकता सरकारने यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत.

५) आपली अर्थव्यवस्था अडचणीत आहे हे सरकारने नाकारु नये. रघुराम राजन यांनी बॅंकांवर उगारलेला पारदर्शकतेचा बडगा आता NBFC क्षेत्रापर्यंत पोचायला हवा. त्यांच्या अॅसेट्सच्या क्वालिटीचा लेखाजोखा घ्यायला हवा. बॅंका कुणाला कर्जे देतात, किती देतात, त्यांची वसुली कशी होते, न झाल्यास ते लपवले जाते की त्याची नोंद होते याबद्दलच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि तेच नियम NBFC क्षेत्रातही लागू केले पाहिजेत.

६) बाजारावरील नियंत्रकांच्या (अॉडिटर्स, आरबीय, सेबी, कंपनी कायदा सल्लागार इत्यादी) दर्जाकडे लक्ष द्यावे.

७) जोपर्यंत बॅंकांच्या व्यवहारात दृष्य सुधारणा दिसत नाहीत तोपर्यंत बॅंकाना भांडवली मदत करणं थांबवावं.

८) शेती, कामगार कायदे, जमीनधारणा कायदे यांत सुधारणा करावी.

९) अर्थव्यवस्थेच्या डेटाशी खेळणं सरकारने थांबवावं.

आपल्या अर्थव्यवस्थेपुढील अडचणी चक्राकार आवर्तने आणि रचनात्मक त्रुटी या दोन्ही स्वरुपाच्या असल्या तरी सरकारने व्याजदरकपात सारखे तात्पुरते निर्णय घेऊ नयेत असा सल्ला ते देतात. व्यवस्थेत विश्वासाचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. व्यवस्था जरी आयसीयूमधे असली तरी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्याचा फायदा नाही असं त्यांचं मत आहे.

श्री सुब्रमण्यम यांनी सांगितलेले उपाय सरकारने जसेच्या तसे अमलात आणले तर घरांच्या किमती वाढणार नाहीत, ठेवींवरचे बँकांचे व्याजदर कमी होतील आणि कर्जांवरचे व्याजदर वाढतील, प्राप्तीकर कमी होणार नाही.

त्यांच्या म्हणण्याचा रिअल इस्टेट क्षेत्रासंबंधी मला लागलेला अर्थ असा की रिअल इस्टेटमधे प्राईस करेक्शन झालं (किंमती गडगडल्या) तर बाजार कोसळेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अतिघातक ठरेल. त्यामुळे प्राईस करेक्शन ऐवजी टाईम करेक्शन (दीर्घकाळपर्यंत किंमती स्थिर रहाणे) करण्याकडे या क्षेत्राचा कल असेल.

याचा सर्वसामान्य माणसासाठी अर्थ असा होतो की
१) धंदा व्यवसाय करत असाल तर नवीन कर्जे काढताना अतिरिक्त जोखीम घेऊ नका.
२) नोकरी करत असाल तर थोड्या फरकासाठी स्थायी नोकरी सोडू नका.
३) नोकरी शोधत असाल तर चांगला पगार ही एकमेव कसोटी ठेवू नका.
४) बॅंकेत ठेवी ठेवताना बॅंकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या. घसघशीत व्याजाच्या आमिषाला बळी पडू नका.
५) सर्व रक्कम एकाच बॅंकेत ठेवणं टाळा.
६) भिशी किंवा तत्सम योजनेत उतरताना अनावश्यक जोखीम घेऊ नका.
७) नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याकडे लक्ष द्या.
८) वायफळ खर्च टाळा. आवडीपेक्षा उपयुक्ततेकडे आणि आवश्यकतेकडे लक्ष द्या.
९) शेअर बाजारात उतरत असाल तर स्वतः अभ्यास करून कंपनी निवडा. टिप्सवर अंधविश्वास ठेवू नका.
१०) मुलांना स्वावलंबनाची सवय लावा.

(वरील दहा मुद्दे माझे निष्कर्ष आहेत. श्री. सुब्रमण्यम यांनी मांडलेले नाहीत)

इथपर्यंत तुम्ही वाचत आला असाल तर इतक्या रुक्ष विषयातही रस घेऊन माझ्यासोबत आल्याबद्दल धन्यवाद. तरिही एक प्रश्न रहातोच की या लेखमालेचं नाव मी असं का ठेवलं? त्याचं उत्तर आहे युआल नोहा हरारीचं होमो डेऊस हे पुस्तक. त्या पुस्तकाने काय केलं ते पुढच्या भागात सांगतो.Tuesday, December 17, 2019

व्यर्थ न हो बलिदान (भाग १)


सकाळी टेकडीवर चालायला गेलो होतो. अरविंद सुब्रमण्यम यांनी बँगलोर (बंगळुरू) इंटरनॅशल सेंटरच्या व्यासपीठावर दिलेलं भाषण डाउनलोड करून ठेवलेलं होतं: ते ऐकत होतो. भाषणाचं नाव होतं ग्रेट इंडियन स्लो डाऊन (भारतातील महान मंदी). भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सुब्रमण्यम यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. आणि हार्वर्ड विद्यापीठात संशोधन व अध्यापनाच्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. सुब्रमण्यम आणि त्यांचे मित्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारत शाखेचे प्रमुख जॉश फेलमन यांनी केलेल्या संशोधनाचे सार या भाषणात मांडलेले आहे.

जेव्हा अमेरिकन सरकार भारतावर व्यापारी निर्बंध घालत होते तेव्हा अमेरिकन सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारे सुब्रमण्यम जेव्हा भारत सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करू लागले तेव्हा जनधन अकाउंट > आधार > मोबाईल क्रमांक यांची जोडणी करून सरकारी योजनांचे फायदे योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवावेत या योजनेचे ते शिल्पकार होते. विद्यमान सरकारबद्दल त्यांना ममत्व आहे आणि सरकारच्या उद्देशांबद्दल त्यांना खात्री आहे, असं मला त्यांच्या भाषणावरून आणि विशेषतः त्यानंतरच्या प्रश्नोत्तरावरून वाटलं.काही अन्य अर्थ तज्ञांप्रमाणे 'सरकारने सगळे निर्णय केंद्रीभूत करून ठेवल्याने अर्थव्यवस्थेला धोरण लकवा झालेला आहे, नोटबंदी आणि जीएसटी राबवण्यामधील अव्यवस्था' ही कारणे भारताच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला कारणीभूत आहेत असं त्यांना वाटत नाही. याऐवजी संशोधनांती त्यांना जाणवलेले मुद्दे त्यांनी याप्रमाणे मांडले आहेत.

१) कुणी मान्य करो अथवा न करो पण भारतीय अर्थव्यवस्था सध्या अतिशय मोठ्या संकटात आहे. आणि हे संकट त्यांच्या शब्दात unprecedented (न भूतो न भविष्यती) अशा प्रकारचे आहे.

२) केवळ जीडीपीच्या आकड्यांकडे न बघता विविध क्षेत्रातील उत्पादन, उत्पन्न आणि कर्ज यांच्या आकड्यांची तुलना करता त्यांचे असे मत आहे की ही परिस्थिती १९९१ पेक्षा आणि २००२ पेक्षाही वेगळी आहे. १९९१ मध्ये आपली अर्थव्यवस्था अडकलेली होती पण जग मात्र वेगाने पुढे जात होते. २००२ च्या वेळी जागतिक अर्थव्यवस्था अडकलेली होती पण आपली अर्थव्यवस्था ठणठणीत होती. सध्या मात्र आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही ठिकाणी अर्थव्यवस्था अडकलेल्या आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती अतिशय काळजी करण्यासारखी आहे. त्यांच्या शब्दात सांगायचे तर अर्थव्यवस्था अति दक्षता विभागात ठेवावी लागेल.

३) जर १९९१ मध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर केले होते आणि आणि २००२ च्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटातही आपण तग धरू शकलो इतकेच काय पण २००८ च्या अमेरिकन सब प्राईम क्रायसिसच्या वेळी जेव्हा जगभरातील विविध अर्थव्यवस्था डगमगू लागल्या तेव्हाही आपल्या अर्थव्यवस्थेचं तारू व्यवस्थित किनाऱ्याला लागलं तर मग आता एकाएकी असा कुठला खटका ओढला गेला आहे की ज्यामुळे सुव्यवस्थित अर्थव्यवस्थेत एकाएकी गतिरोध उत्पन्न झाला?

४) स्वतःच उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात सध्याची समस्या एकाच वेळी सायक्लिकल आणि स्ट्रक्चरल (अर्थव्यवस्थेतील चक्रांमुळे आणि रचनात्मक अडचणींमुळे) आहे. आणि त्यांना दोघांना एकत्र आणून अर्थव्यवस्थेला खीळ घालणारा खटका म्हणजे ILFSची पडझड.

५) ILFS म्हणजे Infrastructure Leasing & Financial Services उर्फ पायाभूत सुविधांना पतपुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या पडझडीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची घटना कशी काय होऊ शकते ते समजावताना श्री सुब्रमण्यम यांनी Twin Balance Sheet Problem (ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम) किंवा दोन ताळेबंदातील अडचणी आणि Evergreening of loans (एव्हरग्रीनिंग ऑफ लोन्स) किंवा सदाबहार लोन्स या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं.

६) ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे धनको आणि ऋणको दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा. व्यावसायिकाने केलेल्या स्वतःच्या व्यवसायाच्या भविष्य अंदाजाच्या आणि अर्थव्यवस्थेबद्दलच्या स्वतःच्या अंदाजाच्या आधारे बॅंका व्यवसायांना कर्जपुरवठा करतात. आता जर व्यावसायिकाच्या ताळेबंदातील तारण म्हणून दिलेल्या मिळकतींचे बाजारमूल्य घसरले (किंवा जास्त कर्ज मिळण्यासाठी जर ते खोटे वाढवून दाखवले असतील) आणि नंतर व्यावसायिकाला पुरेसा नफा झाला नाही तर तो कर्जाची परतफेड करत नाही. त्याच्या ताळेबंदात मूल्य वाढवून दाखवलेली पण प्रत्यक्षात कमी मूल्याची मालमत्ता दिसत रहाते आणि बॅंकेच्या ताळेबंदात त्याला दिलेले कर्ज बॅंकेची मालमत्ता म्हणून दिसत रहाते. कर्जाची आणि व्याजाची परतफेड होत नाही. पण बॅंका मात्र व्याज येणे आहे असं दाखवून नफा दाखवतात. प्रत्यक्षात ते कर्ज आता बुडीत खात्यात जमा झाल्यासारखे असते. पण फक्त ताळेबंद पाहणाऱ्याला मात्र सगळे व्यवस्थित दिसते.

असं होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅंकेने NPA नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स ताळेबंदात दाखवण्यासाठी आणि त्यावरील व्याज उत्पन्न म्हणून न दाखवण्यासाठी नियम केले आहेत. त्यातून वाचण्यासाठी बॅंका त्याच व्यावसायिकाला जुने कर्ज व्याजासहित फेडायला नवीन कर्ज देतात. आणि आपापले ताळेबंद नियमानुसार दिसतील याची काळजी घेतात. याला म्हणतात एव्हरग्रीनिंग लोन्स. कारण बाहेरून बघणाऱ्याला ताळेबंदातील कर्ज आता आतून सडलेली आहेत हे न कळता त्याला तो सदाबहार कर्जांचा ताळेबंद वाटतो.

७) २००४ ते २०११ च्या तेजीमधे बॅंकांनी स्टील, पायाभूत सुविधा, टेलिकॉम, वीजनिर्मिती या क्षेत्रांना भारंभार कर्जे दिली. परंतू ती कर्जे फेडण्यासाठी आवश्यक तितका नफा या उद्योगांनी न मिळवल्याने पहिला ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम सुरु झाला. बॅंकांनी एव्हरग्रीनिंग करु नये म्हणून रघुराम राजन यांनी नियमांचा बडगा उगारला. त्यामुळे बॅंकांनी आपापल्या ताळेबंदातील मृत कर्जे जाहीर करायला सुरुवात केली. ही होती ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची पहिली लाट.

यावर उपाय म्हणून सरकारने बॅंकांना भांडवल पुरवले आणि इन्सॉल्व्हंसी अॅण्ड बॅंकरप्सी कोड हा कायदा पास केला (दिवाळं काढण्याचा कायदा). त्याचा जास्तीत जास्त फायदा स्टील क्षेत्रातील उद्योगाला झाला. बाकीच्या क्षेत्रांना फायदा होण्यासाठी कायदा तितका लवचिक नव्हता.

तो तसा लवचिक करेपर्यंत सरकारने नोटबंदी केली.

नोटाबंदीमुळे बॅंकांच्या खात्यांमधे प्रचंड प्रमाणात पैसा आला. आता बॅंकांनी उद्योगांना कर्जपुरवठा करण्याऐवजी नॉन बॅंकिंग फायनान्शिअल कॉर्पोरेशन्सना (NBFC) कर्जे देण्यास सुरवात केली. म्हणजे बॅंकेसाठी हे कर्ज मालमत्ता झाले तर NBFC साठी देणी.

मग NBFC नी आपल्याकडे आलेल्या या पैशातून बांधकाम क्षेत्राला कर्जपुरवठा करायला सुरुवात केली. म्हणजे आता ही नवीन कर्जे NBFC साठी अॅसेट्स झाली आणि रिअल इस्टेट सेक्टरसाठी देणी बनली.

बांधकाम क्षेत्रात मागणीपेक्षा पुरवठा जास्त होता. पण त्यांनी जागांचे भाव उतरवण्यापेक्षा तसेच ठेवले आणि आपल्याकडील न विकल्या गेलेल्या जागांचा खर्च आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी ही नवीन कर्ज वापरली.

त्यात ILFS (जी स्वतः एक NBFC आहे) च्या ताळेबंदातील गडबडीमुळे तिच्या व्यवहारांवर नियंत्रकांची नजर पडली. तिथला घोटाळा बघून भल्या भल्यांचे डोळे पांढरे झाले. आणि मग सर्व बॅंकांनी आपण ज्यांना कर्जे दिली त्या NBFC चे ताळेबंद आणि त्यांनी ज्यांना कर्जे दिलीत त्यांची आर्थिक स्थिती बघायला सुरुवात केली. ती अर्थातच चांगली नव्हती. कारण अनेक जागा विक्रीविना तशाच पडून होत्या. आता बॅंकांचं धाबं दणाणलं. आणि त्यांनी उद्योगांना कर्जपुरवठा करणं थांबवलं. आरबीआयने रेपो रेट कमी करुनही त्यांचा फायदा ऋणकोंना द्यायला बॅंका टाळाटाळ करु लागल्या. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं धडधडणारं इंजिन रुळावरुन उतरु लागलं.

आता या अपघातात बॅंका आणि उद्योग यांच्या ताळेबंदातील न संपलेला जुना ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम तर होताच वरून NBFC आणि रिअल इस्टेट सेक्टर अशा दोघांच्या ताळेबंदातील घोटाळा जमा होऊन तो फोर बॅलन्स शीट प्रॉब्लेम झाला आणि आपण महान भारतीय मंदीच्या गर्तेत शिरलो.

ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमची समस्या वाढून आता तिची सुनामी झाली आहे. आणि यातून नुकसान न होता बाहेर येणं कठीण आहे असं श्री. सुब्रमण्यम यांचं मत आहे.

Sunday, December 15, 2019

वारसा

ही पोस्ट महाभारत युध्दाचे मूळ कारण सांगणारी वगैरे नाही. खरंतर महाभारत युध्दाला कुठलेतरी एकमेव कारण असेल अशी माझी समजूत नाही.

पण महाभारतकालीन समाजात पैतृक आणि मातुल घराण्याच्या संपत्तीच्या वारसाहक्काच्या व्यवस्थेचा पैलूही या युध्दाला असू शकतो अशी माझी धारणा आहे. त्या धारणेचा विस्तार म्हणजे ही पोस्ट आहे.

दोन गोष्टी आहेत

१) कुल कुणाचे? मातृकुलीन की पितृकुलीन. (मूल आईचे की बापाचे?)
२) आणि सत्ता कुणाकडे? (पुरुषाकडे की स्त्रीकडे?)

अनेकांच्या मताप्रमाणे महाभारतकालीन भारतात सत्ता पुरुषांच्या हातात गेली होती. स्त्री राज्य असलेले प्रदेश तुरळक होते. स्त्रीने माहेर सोडून सासरी जायची पद्धतही रुळली होती. पण विवाह ही सार्वत्रिक आणि सक्तीची बाब नव्हती. त्यामुळे विवाहबाह्य संबंध आणि विवाहपूर्व संबंध फार लक्षवेधी किंवा समाजविसंगत नव्हते. एकाच पुरुषाला अनेक स्त्रियांकडून मुले असणे किंवा एकाच स्त्रीला अनेक पुरुषांकडून मुले असणे याला समाजबाह्य वर्तन मानले जात नव्हते. पण त्यामुळे पहिला प्रश्न कळीचा झाला होता. की मुलाचे कुल कुठले? आईचे की बापाचे? कुणाच्या संपत्तीत मुलाला वाटा मिळणार, आईच्या की बापाच्या?

हिमालयीन समाजात मातृकुलीन व्यवस्था होती तर गांधार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पठारी प्रदेशात पितृकुलीन व्यवस्था स्थिरावत चाललेली होती.

शकुंतलेच्या पुत्राला (भरताला) राजा दुष्यंताने स्वीकारावे आणि आपले कुल द्यावे, आपल्या संपत्तीचा वारस म्हणून नेमावे अशी कण्वमुनींची आणि स्वतः शकुंतलेची इच्छा असते. इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाला हक्क मिळणे मान्य केले जाते. हस्तिनापूरमध्ये (उत्तर प्रदेशातल्या पठारी भागात) मुलावर पित्याचा हक्क आणि मुलाचा जन्मदात्या पित्याच्या संपत्तीवरचा हक्क प्रस्थापित होतो.

गंगा हिमालयीन समाजातील मुलगी. ती लग्न करते हस्तिनापूरच्या शंतनूशी. गंगा शंतनूकडून मुलं माहेरी पाठविण्यास संमती मिळवते. म्हणजे ती स्वतः जरी पुरुषसत्ता मानत असली, स्वतः जरी सासरी आलेली असली तरी मुलांना माहेरी पाठवते. जेव्हा भीष्माच्या वेळी शंतनू अडवतो तेव्हा ती भीष्माला त्याच्याकडे सोडून स्वतः माहेरी निघून जाते. म्हणजे शंतनू आणि गंगेच्या सुरवातीच्या सात पुत्रांना मातृकुल मिळते तर आठवा पुत्र भीष्माला मात्र पितृकुल मिळते पण त्याचे आजोळ तुटते. आणि पित्याच्या संपत्तीचा तो उत्तराधिकारी होतो.

पराशर तर सत्यवतीकडे कामभिक्षा मागतात आणि नंतर व्यासांना आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणजे सत्यवती सासरी जात नाही पण तिचा मुलगा मात्र बापाकडे जातो. म्हणजे व्यासाला पितृकुल मिळते पण त्याचेही आजोळ तुटते. पराशर फिरते तर सत्यवती हस्तिनापूर म्हणजे उत्तर प्रदेशातील. तिला पितृकुल व्यवस्था चालते आणि तीच व्यवस्था पुढे चालावी म्हणून ती नंतर जागरूक असते.

शंतनू आणि सत्यवतीचा मुलगा विचित्रवीर्य, बापाकडे राहतो. त्याचे आजोळही तुटत नाही आणि त्याला पैतृक संपत्तीचा वारस नेमावे म्हणून विवाहपूर्व अट त्याच्या आईने आणि आजोबानेच घातलेली असते. म्हणजे इथे पित्याच्या संपत्तीत (मातेच्या नव्हे) मुलाचा हक्क असणे अजून घट्ट होत जाते.

कुंती आणि माद्रीच्या वेळी गुंता अजून वाढतो. कारण त्यांच्या मुलांचा जन्मदाता पिता वेगळा आणि सामाजिक पिता वेगळा. जन्मदाता पिता हिमालयीन समाजातला तर सामाजिक पिता उत्तर प्रदेशातल्या हस्तिनापूरचा. जन्मदाते तर मुलांना सांगणार की माझ्या संपत्तीत तुमचा वाट नाही तुम्ही आईची संपत्ती बघा. आणि सामाजिक पिता म्हणावे तर उत्तर प्रदेशातील नियोगाचे प्रचलित नियम पाळलेले नाहीत.

त्यामुळे पैतृक संपत्ती मिळायची तर कुठल्या पित्याची? मूल आईचे म्हणावे तर त्यांना पहिल्या तीन पांडवांना कुंतिभोज (कुंतीला दत्तक घेणारा पिता) किंवा शूरसेन (कुंतीचा जन्मदाता) राजाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल आणि शेवटच्या दोन पांडवांना मद्रदेशाच्या संपत्तीचे वारस बनावे लागेल.

कुंती आणि माद्री पुत्र प्राप्त करून घेतात आणि त्या दोघींचे पुत्र त्यांच्याकडेच राहतात. आपापल्या बापाकडे जात नाहीत. म्हणजे पांडवांना मातृकुल मिळते आणि त्यांचे बापकडचे आजोळ तुटते. त्यांना जन्मदाता पित्याची संपत्ती मिळत नाही. कारण की कुंती आणि माद्रीने निवडलेले साथीदार त्या गंगेच्या समाजव्यवस्थेला मनात असतात. आणि कुंतीचा प्रयत्न असतो की त्यांना सामाजिक पित्याची संपत्ती मिळावी.

जर पांडवांना गंगेचा न्याय लावला असता माद्रीचा भाऊ शल्य राजाला नकुल सहदेवांना आपल्या संपत्तीमध्ये वाटा द्यावा लागला असता आणि कृष्णाला (कारण कृष्ण मथुरेचा आणि शूरसेन मथुरेचा राजा होता) पांडवांना वाटा द्यावा लागला असता. त्यामुळे शल्य आणि आणि कृष्ण दोघांचीही इच्छा होती की कुंती आणि पांडवांनी गंगेचा न्याय वापरू नये. तर सत्यवतीच्या न्याय वापरावा. म्हणून शल्य लढतो कौरवांकडून आणि कृष्ण लढतो पांडवांकडून.

बरं धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचा जन्मदाताही अव्यंग नसल्याने समाजमान्य सम्राट नाही. आणि त्याची सूतसंतती भरपूर त्यामुळे पैतृक संपत्तीचा भरताचा किंवा विचित्रवीर्याचा न्याय लावला तर दुर्योधन आणि दुःशासनाला भरपूर वाटेकरी. (व्यासांच्या चरूची गोष्ट खरी मानून व्यासांकडे पितृत्व द्यावे तर व्यासांच्या पैतृक संपत्तीचा वाटा मिळेल पण हस्तिनापुरचा नाही.) आणि कौरव आईचे म्हणावेत तर त्यांना शकुनी मामाच्या संपत्तीत वाटा मागावा लागला असता.

या सगळ्यात विचित्रपणे अडकलेली दोन माणसे म्हणजे भीष्म आणि व्यास. म्हटलं तर भावंडे. कारण आई वडील वेगवेगळे असले तरी एकाच्या आईचा दुसऱ्याच्या वडिलांशी विवाह झालेला. आणि दोघांनाही पित्याच्या संपत्तीचा अधिकार मिळालेला. पण कुंती, माद्री आणि गांधारी या स्त्रियांनी दोन वेगवेगळ्या समाजांना (हिमालयीन आणि पठारी) एकत्र आणून जो गुंता तयार करतात त्याला सोडवणे कुणालाही शक्य नसते. आणि सर्वजण संपत्तीचे मालक असल्याने युद्ध अटळ होते.

Saturday, December 14, 2019

वेताळ पंचविशी

या बातमीवरून खालील पोस्ट सुचली होती.
------------------------------------------------------------

Image Credit : Internet 

अंधारी रात्र होती आणि वातावरण भेसूर होते. मधूनमधून पाऊस पडत होता. सोसाट्याच्या वार्‍याने अरण्यांतली झाडें हलत होती. विजांचा गडगडाट आणि कोल्हेकुई यांत मधेच भुतांचा हंसण्याचा आवाज येत होता. पण राजा विक्रम डगमगला नाही. निर्धाराने तो प्रेत घेऊन पळालेल्या वेताळाचा पाठलाग करीत होता. वेताळ प्रेत घेऊन झाडावर पुन्हां लपला होता. राजा त्या जुन्या झाडावर परत चढला आणि त्याने ते प्रेत खाली आणले. आपल्या खांद्यावर ते प्रेत घेऊन तो स्मशानाच्या दिशेने चालायला लागला.

तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन, मला तुझा हेतू काय आहे ते कांही उमजत नाही. हे इतके कष्ट तूं कशासाठी करतो आहेस? मध्यरात्र झाली आहे, गडद अंधार आहे, कांहीही दिसत नाही आणि तुला भिती वाटत नाही कां? वन्य श्वापदांच्या, विषारी जनावरांच्या आणि भुताखेतांच्या या अरण्यांत तू तुझे प्राण धोक्यांत कां घालतो आहेस? तुझ्या मनांत काय आहे ते तरी मला सांग.

अनेकवेळा असं दिसतं की आपण जे करतो ते योग्य की अयोग्य हे ठरवणं अतिशय कठीण असतं. धर्मबुध्दी नावाच्या राजाच्या राज्यात एक घटना घडली. तिची कथा मी तुला सांगतो. त्या कथेवरुन धर्मबुध्दी असं का वागला ते तू मला सांग.

आटपाट नगर होतं. त्याचा राजा होता धर्मबुध्दी. या धर्मबुध्दीला दोन मुलं होती. एकाचं नाव शुध्दबुध्दी आणि दुसऱ्याचं नाव शीघ्रबुध्दी. दोघेही तेजस्वी आणि बलशाली होते. त्यांच्या बलशाली देहांकडे बघून दबून जाणारा माणूस त्यांच्या विनयशील वागणुकीमुळे चटकन आश्वस्त होत असे. सर्व प्रजाजन आपल्या या राजकुमारांवर अतिशय प्रसन्न होते. इतकं असूनही राजा आता चिंतेत पडू लागला होता. आपल्यानंतर या दोघांपैकी कुणाला राजा करावं या चिंतेने त्याच्या मनात घर केलं होतं.

एकदा त्याच्या कानावर एक अतिशय वाईट बातमी आली. प्रातःसमयी आलेल्या या बातमीने राजा हादरला. कुणीतरी राज्यातील एका स्त्रीवर अतिप्रसंग करुन तिला जाळून टाकलं होतं. या अमानुष अत्याचाराच्या बातमीमुळे संपूर्ण प्रजा चवताळून उठली. अत्याचाऱ्यांना शासन व्हायलाच हवं असा सूर सगळीकडून उठू लागला.

धर्मबुध्दीने दंडपाणी नावाच्या आपल्या अंतर्गत सुरक्षाप्रमुखाला बोलावलं आणि आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांना न्यायासनासमोर आणण्याचं फर्मान सोडलं.

दुसऱ्या दिवशी बातमी आली की दंडपाणीने चारही अत्याचारी नराधमांना पकडलं आहे.'या नराधमांना हालहाल करून मारावं, त्यांचे असे हाल करावेत की पुन्हा कुणाला असा अत्याचार करण्याची इच्छा होऊ नये', अशी मागणी जनतेतून होऊ लागली.

तिसऱ्या दिवशी या चौघांना न्यायासनासमोर घेऊन येण्यासाठी दंडपाणी निघाला. पण रस्त्यात ते चौघे आरोपी त्याला हिसडा देऊन पळून जाऊ लागले. दंडपाणी चिडला. त्याने आपली तलवार काढली आणि तो आरोपींचा पाठलाग करु लागला. नग्न खड्ग घेऊन धावणारा उग्र दंडपाणी बघून आरोपी घाबरले आणि अजून वेगाने पळू लागले. त्यामुळे दंडपाणीचा राग अजून वाढला. आणि आरोपींना पकडण्याऐवजी त्याने त्यांच्यावर सपासप तलवारी चालवल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते मृतदेह मग आपल्या वृषभशकटात टाकून त्याने न्यायासनासमोर आणले.

शकटातील ते मृतदेह, ते आणणारा रक्तलांछित दंडपाणी आणि त्याच्या हातातील ते रक्त प्यायलेलं खड्ग पाहून दरबार भयचकित झाला. नगरजनांनी खचाखच भरलेलं ते सभागृह दंडपाणी काय बोलणार तिकडे कान लावून बसलं होतं. इतक्या मोठ्या जनसमुदायात त्या वेळी अगदी मोरपीस पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता होती.

धर्मबुध्दी, त्याच्या डाव्या बाजूला राणी न्यायसेना आणि उजव्या बाजूला दोन्ही राजकुमार शुध्दबुध्दी आणि शीघ्रबुध्दी बसले होते. मग धर्मबुध्दीने दंडपाणीला साऱ्या दृष्याचा खुलासा करायला सांगितलं.

जेव्हा दंडपाणीने आरोपींनी हिसडा देऊन पळण्यात यश मिळवलं हे सांगितलं तेव्हा सभागृहातील सर्वांच्या डोळ्यात अंगार फुलला. नाकपुड्या क्रोधाने फुलू लागल्या. हाताच्या मुठी वळल्या गेल्या. आणि मग जेव्हा दंडपाणीने पाठलाग व तलवारबाजीची घटना सांगितली तेव्हा सभागृहात एकंच आनंदाचा चीत्कार उठला. सर्व सभाजनांनी दंडपाणीचा जयजयकार केला.

धर्मबुध्दीने मग आपल्या दोन्ही राजकुमारांना पुढे बोलावलं आणि सांगितलं की दंडपाणीने जे केलं आहे त्याबद्दल तुम्हाला योग्य वाटेल तसा त्याचा सत्कार करा. ज्याची पध्दत मला योग्य वाटेल तो माझ्यानंतर या राज्याचा राजा बनेल.

शीघ्रबुध्दी लगेच पुढे आला. त्याने दंडपाणीला आपल्या गळ्यातील मोत्याची माळ काढून दिली आणि कृतकृत्य झालेल्या दंडपाणीला आपली तलवार भेट दिली. पुन्हा एकदा सभागृहात दंडपाणीचा आणि शीघ्रबुध्दीचा जयघोष झाला. तो आवाज इतका मोठा होता की जणू स्वर्गातील देवतांनाही शीघ्रबुध्दी राजा झाला असं वाटलं.

मग शुध्दबुध्दी पुढे झाला. आता तो दंडपाणीचा सत्कार कसा काय करणार याबद्दल सगळ्यांच्या मनात कुतूहल होतं. त्याने दंडपाणीला जवळ बोलावलं. त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. त्याला सभागृहाकडे तोंड करायला सांगितलं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि मग तो उच्चारवात म्हणाला 'दंडपाणीचं शौर्य अतुलनीय आहे आणि त्याची न्यायबुध्दी सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे विचार करते.' सभागृह कानात प्राण आणून शुध्दबुध्दीचं भाषण ऐकत होतं. मग शुध्दबुध्दी पुढे म्हणाला 'असं असूनही यापुढे दंडपाणी आपल्या राज्याचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख रहाणार नाही'. दंडपाणी आणि सभागृह या वाक्यामुळे अवाक् झालं असतानाच राजा धर्मबुध्दी उभा राहिला आणि त्याने शुध्दबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं."

ही कथा सांगितल्यानंतर वेताळ म्हणाला, ‘‘राजन्, असं वाटतं की राजा धर्मबुध्दी चुकला. त्याने लोकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय घेणाऱ्या राजकुमाराला आपला वारस म्हणून घोषित केलं. मला तर वाटतं त्याने लोकभावनेत समरस झालेल्या शीघ्रबुध्दीला आपला वारस म्हणून घोषित केलं असतं तर प्रजा खूष झाली असती. ते न केल्याने धर्मबुध्दी चुकला. तुला काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही जर तू मौन पत्करलंस, तर तुझ्या मस्तकांचे असंख्य तुकडे होतील. आणि तुझ्या पायाशी लोळू लागतील.

राजा विक्रम म्हणाला, ' वेताळा, धर्मबुध्दीने केलं तेच योग्य आहे. राज्य चालवणं म्हणजे केवळ लोकांना आज जे आवडतं आहे ते करणं नसून राज्यशकट मजबूत करणं आहे.

अधिकारी हे व्यवस्थेला बांधलेले असतात. त्यांना त्यांचे अधिकार व्यवस्थेकडून मिळालेले असतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांची कक्षा कुठल्याही कारणांमुळे स्वतःच्या मर्जीने वाढवून घेतली आणि त्याला लोकभावनेमुळे राजाने मान्यता दिली तर ते व्यवस्थेला अंतिमतः मारक ठरते.

जर राज्य म्हणजे एक शरीर मानले तर प्रत्येक अधिकारी हा त्या शरीराचा एकेक अवयव असतो. आणि प्रत्येक अवयवाने आपापले काम सोडून दुसरे काम करणे शरीरासाठी धोकादायक असते. जर माणूस चालताना पडला आणि त्याला जखम झाली, त्यातून रक्त भळाभळा वाहू लागले, त्याच्या रक्तात खपली धरणारे घटक नसल्याने त्या माणसाचा शक्तीक्षय होऊ लागला तरी हृदयाने आपले रक्ताभिसरणाचे काम थांबवून चालत नाही. जर रक्त वाहू नये म्हणून हृदयाचे ठोके थांबले तर त्या माणसाचा तत्क्षणी मृत्यू होईल. त्याऐवजी बाकी सर्व अवयवांनी आपापले काम व्यवस्थित केले तर त्या माणसाचा जीव वाचू शकतो.

तसंच राज्याचं आहे. दंडपाणीचं काम न्याय करण्याचं नसून न्यायासनासमोर आरोपींना आणण्याचं आहे. त्याने आरोपींना मारुन टाकणं म्हणजे राज्यव्यवस्थेला दिलेला झटका आहे. याने लोकांना आज छान वाटलं आणि दंडपाणी शुद्ध चारित्र्याचा असला तरी भविष्यात या निर्णयाचा वापर करणारा अधिकारी किती शुद्ध चारित्र्याचा असेल याची खात्री नाही. किंबहुना इतका जयजयकार ऐकल्यावर दंडपाणीला आपल्या निर्णयक्षमतेवर गर्व होणारंच नाही आणि त्याच्या हातून चुका होणारंच नाहीत याचीही खात्री नाही.

व्यवस्था बनवताना आज समोर असलेल्या माणसांच्या चारित्र्याकडे बघून चालत नाही. तर हे अधिकार मिळालेला कुठलाही अधिकारी कशाप्रकारे वागेल त्याकडे लक्ष द्यावे लागते.

आज अमुकतमुकचा जयजयकार करणारे लोक आपल्या या वर्तणुकीचा भविष्यात काय परिणाम होईल ते न कळल्याने तसे वागत आहेत. उद्या अशाच अधिकाऱ्यांचा त्यांना त्रास झाला तर ते रडारड करतील. ते राज्यरुपी शरिरातील जिभेसारखे आहेत. पटकन ओव्या आणि त्याच तालात शिव्या देणारी जीभ. शरीराला त्रास होईल हे कळत असताना जास्तीत जास्त तिखट, मसालेदार किंवा चमचमीत खायला पुढे येणारी जीभ. तिच्या आहारी जाऊन निर्णय घेतले तर शरीर कायम दुःखात राहील.

म्हणून माझ्या मते धर्मबुध्दीने योग्य तेच केलं. "

राजाचं उत्तर ऐकून वेताळ प्रसन्न होत हसला आणि म्हणाला, तुझ्या सूक्ष्म विचारशक्तीबद्दल मी जे ऐकून होतो ते खरंच आहे तर. पण राजा तू असा उदास का दिसतोस? '

राजा विक्रम म्हणाला,' वेताळा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक शक्यता जाणवली. आजच्या आपल्या राजेशाही व्यवस्थेत ठीक आहे पण उद्या जर अशी कुठली समाजव्यवस्था अस्तित्वात आली की ज्यात समाजाचं नेतृत्व कुणी करावं याचा निर्णय लोकांच्या मताने घ्यावयाचा असेल तर त्या व्यवस्थेतील शुध्दबुध्दींचं जीवन किती खडतर असेल याचा विचार करून मी खिन्न होतो आहे. त्या काळात सदानकदा लोकानुनय करणारा राज्यकर्ता आणि अधिकारांचा अधिक्षेप करणारा अधिकारी व्यवस्थेला मारक असतो हे लोकांना कोण समजावेल? या विचारामुळे मी थोडा हतोत्साहित झालोय. '

यावर वेताळ म्हणाला,' खरंय तुझं. पण तू बोललास आणि तुझं मौन सोडलंस. त्यामुळे मी चाललो.' आणि मग वेताळही खिन्नमनाने झाडावर लटकून राहिला. विक्रमाने तलवार उपसली आणि तो पुन्हा वेताळाला आणायला निघाला.