Sunday, March 15, 2020

कंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यटिफुल

सकाळी चालायला जाण्यापूर्वी फेसबुक उघडलं. एका ज्येष्ठ मित्राने कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांचा व्हिडिओ शेअर केलेला पाहिला. त्यांच्याच पोस्ट्स बघून दोन वर्षांपूर्वी कंबोडिया व्हिएतनामला गेलो होतो. 

कंबोडियाच्या अंगकोर वट आणि अंगकोर थॉमच्या देवळानंतर 'टा प्र्हॉम' देवळात गेलो होतो. (या देवळाच्या दुरुस्तीचं काम भारत सरकार करत आहे आणि अॅंजेलीना जोलीच्या टूम्ब रेडर्स या चित्रपटाचं चित्रीकरण या देवळातही झालं होतं). 'टा प्र्हॉम'च्या भव्य भग्न वास्तूत फिरताना मोबाईलवर 'ओ फॉर्च्युना' लावून हिंडलो होतो. आजूबाजूला कुणी नाही ते पाहून इअरफोन बंद करून त्या भग्न वास्तूलाही 'ओ फॉर्च्युना' ऐकवलं होतं. कार्ल अॉफच्या संगीताची जादू, ओ फॉर्च्युनाचे न कळणारे लॅटिन शब्द आणि जुन्या देवळांच्या भिंतीतून उगवून आकाशापर्यंत पोचलेले वटवृक्ष या सगळ्याचा परिणाम होऊन मनात उसळलेला भावनांचा कल्लोळ डोळ्यातून घळाघळा वाहू दिला होता.आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून बावरलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप हसूही आलं होतं. 


आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हणून युट्यूबवर ओ फॉर्च्यूना शोधलं. समोर नेहमीचे व्हिडीओ आले आणि नेहमीपेक्षा एक वेगळा व्हिडीओ आला फ्लॅश मॉब या नावाने. 



माझ्या आयुष्यात फ्लॅश मॉब ही गोष्ट कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली नाही. अगदीच तोंडी लावायला म्हणून जेव्हा पिझ्झा हट भारतात नवीन होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा हिला घेऊन पिझ्झा हटला गेलेलो असताना आम्हाला वाढणारा वेटर टेबलाजवळ येऊन आपलं काम करत असताना एकाएकी बाकीच्या वेटर्सनी ताल धरून नाचायला सुरवात केली होती आणि तिथे आलेल्यापैकी कुणाच्या तरी वाढदिवसासाठी एक गाणं म्हणत टेबलामधल्या जागेत नाच करून दाखवला होता. 

माझ्या तालाशी जुळवून घेणं अशक्य आहे हे नृत्यदेवतेला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे तिने माझ्या आयुष्यातून फार लवकर काढता पाय घेतला होता. त्यामुळे इतर कुणी नाचू लागलं तरी मला अवघडल्यासारखं होतं. त्याशिवाय आपण, नाच आवडणाऱ्या आपल्या प्रेयसीला घेऊन त्या काळात न परवडणाऱ्या हॉटेलात गेलेलो असताना वेटर्सनी छान नाच करून दाखवल्याने माझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यानंतर मी कायम डॉमिनोजचा ग्राहक झालो आणि पिझ्झा हटला 'नाचता येईना ते गिऱ्हाईक होई वाकडे' ही मराठी म्हण शिकवली होती. 

त्यानंतर साधारण २०११ ला सीएसटी स्थानकावर संध्याकाळी पाचच्या सुमारास तरुणांच्या एका समूहाने रंग दे बसंतीच्या गाण्यावर समूहनृत्य केलेलं होतं. त्याचा व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांत बघताना, आपल्याला नाचता आलं असतं तरी आपण असं चारचौघात नाचू शकलो नसतो याची खात्री पटून त्या गाण्यावर सगळ्यात पहिल्यांदा नाचायला सुरवात करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटलं होतं. 



नंतर कळलं होतं की बघणाऱ्यांसाठी जरी तो उत्स्फूर्त अविष्कार असला तरी त्यात भाग घेणाऱ्यांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केलेली असते. त्यांचं सादरीकरण रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी प्रशिक्षित कॅमेरामन मोक्याच्या ठिकाणी पेरलेले असतात आणि ते केवळ सादरीकरणाला रेकॉर्ड करत नसून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील रेकॉर्ड करत असतात. अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितरित्या आपल्या बाजूला संगीत किंवा नृत्याचा अविष्कार सुरु झाला की माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते बघणं मोठं मनोरंजक असतं. आज ओ फॉर्च्यूनाच्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ बघताना त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना असाच हरखून गेलो. 

फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. यूट्यूबच्या अल्गोरिदमला माझी आवड कळली आणि त्याने ऑटो प्ले मोडवर फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाचे व्हिडीओ दाखवायला सुरवात केली. पश्चिमी देशात हे फ्लॅश मॉब साधारणपणे एअरपोर्ट किंवा मॉल किंवा रेल्वे स्टेशन किंवा शहरातील एखादा प्रसिद्ध चौक अश्या ठिकाणी आपलं सादरीकरण करतात. सुरवातीला तिथल्या गिऱ्हाईकांचे किंवा प्रवाश्यांचे आवाज, नेहमीच्या सूचनांचे आवाज असा सगळा मामला चालू असतो. आणि कुठेतरी कोपऱ्यातून कुणीतरी व्हायोलिन किंवा बासरी किंवा ट्रम्पेट किंवा छोटा ड्रम वाजवायला सुरवात करतं. लोक लक्ष देत नाहीत. मग अजून कुणीतरी दुसरं वाद्य घेऊन येतं. ठरलेल्या क्रमाने एका मागून एक इतर वाद्यवृंद गोळा होत जातो. आणि मूळ सुरावटीत आपलं वाद्य मिसळवू लागतो. आता लोक शांत होऊ लागतात. बहुतेक लोक एका ठिकाणी उभे राहून त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ लागतात. इतस्ततः धावणाऱ्या लहान मुलांचे आईबाप त्यांना पकडून उभे रहातात. संगीताची जादू आणि वातावरणातील भारलेपणा असा असतो की इतका वेळ गोंधळ घालणारी मुलंही शांतपणे उभी राहतात. वाद्यमेळ वाढत जातो. आता वाद्यवृंदाचा संगीत संयोजकही समोर येतो आणि त्या सुरावटीत तेथील सर्वजण गुंगून जातात. शेवट होतो आणि मग टाळ्यांचा जल्लोष, शिट्ट्या किंवा प्रोत्साहनपर हाकारे यांचा कल्ला होतो आणि रोमांचित प्रेक्षक पुन्हा आपापल्या कामाला लागतात. सगळ्या फ्लॅश मॉब व्हिडिओचा फॉरमॅट साधारणपणे असाच असतो. 

मोबाईल खिशात होता. त्यामुळे पुढे काय सुरु होणार ते माहिती नव्हतं. प्रत्येक वेळी युट्यूब जे ऐकवेल त्यासाठी तिथल्या प्रत्यक्षदर्शींइतकाच मी देखील अनभिज्ञ होतो. एकामागून एक वेगवेगळ्या सुरावटी वाजत होत्या. ओ फॉर्च्यूनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली सादरीकरणं झाली. मग बोलेरो झालं. मग ब्ल्यू डॅन्यूब झालं. मग बीथोव्हेनच्या नवव्या सिम्फनीतील ओड टू जॉय झालं. क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी झालं. 

चढ चढून धाप लागली होती. पण कानात वाजणाऱ्या सुरावटींमुळे अंगावर रोमांच उभे राहात होते. जरा थांबलो. घाम पुसता पुसता पुन्हा एकदा मगाशी लागून गेलेलं बोलेरो लावलं. मेक्सिकोतील कुठल्यातरी शहरातील चौकात एका वाद्यवृंदाने रावेलची ही रचना सादर केली होती. संध्याकाळच्या गर्दीतून एक मुलगी पुढे येते. ड्रम्स मांडते आणि बोलेरोचा मध्यवर्ती ताल चालू करते. 



बोलेरोमध्ये तो ताल संपूर्ण वेळ चालू राहतो. जवळपास पंधरा मिनिटांच्या त्या संगीतात मध्यवर्ती असणारा एकच ताल, संगीताच्या कार्यक्रमांसाठी बांधलेल्या विशेष सभागृहात असतानाही पुन्हा पुन्हा वाजवत राहायचं म्हणजे अजिबात खायचं काम नाही. आणि लोकांच्या गर्दीत एकट्याने येऊन आपले ड्रम्स मांडून तो ताल धरायचा म्हणजे तर अजून कठीण. आजूबाजूला अगदी जवळ उभे असलेले प्रेक्षक, त्यामुळे जरा ताल किंवा ठोका चुकला की नाचक्की ठरलेली. रंग दे बसंती गाण्यावर नाचायला सुरवात करणार्या पहिल्या मुलीप्रमाणेच या ड्रम वाजवणाऱ्या मुलीबद्दल मला फार कौतुक वाटू लागलं. वाटलं की अश्या कुठल्या फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाच्या वेळी आपणही तिथे असलं पाहिजे. त्या वाद्यवृंदातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक करताना मी थकणार नाही याची माझी मलाच खात्री पटली. 

आणि एकदम जाणवलं की फेसबुक म्हणजे एक प्रकारचा फ्लॅश मॉब आहे. फक्त या मॉबमधे जो तो एकटा असतो. आणि इथे बहुतेक जण फारसा सराव न करता येतात. आपापल्या भिंतीवर खरडणारा प्रत्येकजण एकटाच वेगवेगळी वाद्य वाजवत असतो. आणि आपापल्या कामात गुंतलेले लोक मधेच तिथे डोकावतात. आपण कलाकार आहोत की नाही हे माहिती नसलेल्या कलाकारांचं सादरीकरण बघत असतात. काहींचे ताल चुकतात. काहींचा एकट्याचा वाद्यवृंद फारसा रंग भरत नाही. काहींचा वाद्यवृंद मात्र कमालीचा रंगतो. लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांना खूष करून जातो. तुलना करून माझा मीच हसलो. बोलेरो संपलं. 

चेकॉव्हस्कीची रचना सुरु झाली. ही रचना मात्र कुठल्या एअरपोर्ट किंवा मॉलमध्ये नसून चक्क एका हॉस्पिटलमध्ये सादर केली होती. 



वेदनेने बेजार झालेल्या रुग्णांना आणि आप्तेष्टांच्या दुखण्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांना हे स्वर्गीय संगीत ऐकून किंचित काळ का होईना पण वेदनेचा आणि चिंतेचा विसर पडला असेल, असा विचार करून, त्या वाद्यवृंदाच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटलं. माझ्या आवडत्या शॉशँक रिडम्प्शन चित्रपटातील मोझार्ट ऑपेराचा सीन आठवला. जिथे जीवन म्हणजे त्याच त्याच कंटाळवाण्या गोष्टींची अंतहीन मालिका असते, जिथे आयुष्याला पुढे चालवणारी आशा नावाची अद्भुत साखळी नाहीशी झालेली असते, त्या रुक्ष आणि भकास तुरुंगात अँडी जेव्हा काही काळापुरता मोझार्टची सिम्फनी वाजवतो तेव्हा ती काय आहे ते कळलं नाही तरी तेथील कैद्यांच्या मनात आशेचं इवलंसं फूल फुलवते, ते आठवलं. 



आणि त्याचवेळी हे देखील जाणवलं की हॉस्पिटलमधील फ्लॅश मॉबच्या त्या संगीताने अनेकांना काहीकाळ चिंतामुक्त केलेलं असलं तरी कदाचित असह्य वेदनेने तळमळणाऱ्या काही जणांना त्याचा त्रास झालेला असू शकतो. आपल्याला सुखावणारे सूर इतरांना सुखावत असतीलंच हे गृहीतक मोठं धोकादायक आहे. ते इतरांच्या आवडीनिवडीबद्दल, त्रासाबद्दल, आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मनःशांतीबद्दल आपल्याला आंधळं बनवू शकतं. तल्लीनतेने गायलं जाणारं भारतीय शास्त्रीय संगीत कित्येकांना नीरस वाटू शकतं. बेभान होऊन ढोल वाजवणारे स्वतः जरी खूष होत असतील तरीही त्या तालाचा त्रास होणारे अनेकजण असू शकतात. कुणाची अजान तर कुणाची आरती एकाच वेळी कुणाची मन:शांती वाढवत असताना इतर कुणासाठी मात्र डोकेदुखी होऊ शकते. कॉलेज जीवनातील माझा आवडता मायकेल जॅक्सन माझ्या वडिलांना आवडत नव्हता. इतकंच काय पण मगाशी लागून गेलेलं क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी मला समजत नसल्याने फार आवडत नसलं तरी ते माझ्या मुलांना आवडतं हे मला काही कारण नसताना खटकतं. 

चेकॉव्हस्कीची रचना हॉस्पिटलात सादर करणाऱ्या फ्लॅश मॉबमुळे सकाळपासूनच्या माझ्या सकारात्मक विचारात अशा तऱ्हेने थोडा खंड पडला. आणि मी फोन पुन्हा खिशात ठेवून उताराला लागलो. ऑटो प्लेलिस्ट चालू होती. सहासात मिनिटं कुठलंतरी संगीत चालू होतं. सकाळच्या रोमांचकारी संगीताबरोबर केलेल्या रोलरकोस्टर राईडनंतर आलेल्या विचारांमुळे थोडा खिन्न झालो होतो. आणि एकाएकी लहान मुलांच्या आवाजात गाणं चालू झालं. धून ओळखीची होती. पण कुठली ते लक्षात येईना. शेवटी फोन खिशातून बाहेर काढला. संगीताच्या त्या रचनेचं नाव होतं 'ला विटा इ बेला' या इटालियन वाक्याचा अर्थ होतो 'लाईफ इज ब्युटीफुल'. 


रॉबर्टो बेनिग्निच्या लाईफ इज ब्युटीफुल या चित्रपटात ओफेनबाख या जर्मन - फ्रेंच संगीतकाराच्या रचनेचा वापर केलेला आहे. माझी अतिशय आवडती रचना लहान मुलांच्या तोंडून ऐकताना मला जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे. मगाशी आलेली खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. आणि मी टेकडीच्या त्या निर्जन उतारावर, कानात वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर झुलत झुलत, हात हवेवर हलवत हलवत झोकात उतरू लागलो. जर त्या वेळी मला कुणी पाहिलं असेल तर 'आजकाल लोक मॉर्निंग वॉकलाही ढोसून येतात', असं त्याच ठाम मत झालं असतं. आपला पदन्यास हा झोकांड्या या सदरात जातो आहे हे जाणवूनही त्या संगीताच्या तालावर झुलण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की माझ्या मनात आधीपासून असलेली, पिझ्झा हटमधील अनपेक्षित नाचण्यामुळे अजून घट्ट बसलेली नाचण्याविषयीची अढी त्या वाकड्या उतारावर मला नाचता येत नसूनही करत असलेल्या झुलण्यामुळे किंचित सैल झाली होती.

Monday, March 9, 2020

नंदीबैल, माझ्या आयुष्यातील मुली आणि महिला दिन

माझ्या लहानपणी नंदीबैल घेऊन दारोदार फिरणाऱ्या आणि लोकांचं भविष्य सांगणाऱ्या एका ज्योतिष्याने 'तुमच्या लेकराला मुलींकडून फायदा होईल ताई' असं माझ्या आईला सांगितलेलं मला आठवतं. हे वाक्य आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर (म्हणजे मी अजून वानप्रस्थाश्रम घेण्याइतका म्हातारा झालेलो नाही. तरीही वयाच्या पाचव्या वर्षानंतरच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे दहा दहा वर्षांचे चार टप्पे केले तर) त्या त्या वयातील कुमारसुलभ किंवा तारुण्यसुलभ किंवा गृहस्थसुलभ भावनांमुळे मला आशावादी राहण्यात मदत करत आलेलं आहे. असं असलं तरी त्या वाक्याची मला प्रचिती आलेली नाही असं माझं मत होतं. पण आज महिला दिनावरच्या इतरांच्या पोस्ट्स पाहून मला मुलींमुळे झालेल्या फायद्याबद्दल विचार करावासा वाटला. तेव्हा जाणवलं की,

माझ्या आयुष्यात भरपूर मुली येतील याची काळजी माझ्या जन्माअगोदरच माझ्या आजी आजोबांनी घेतली आणि मला पाच मावश्या असतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती. आजी आजोबांच्या थोरल्या मुलीचा मी पहिला मुलगा असल्याने मी 'पुतना मावशी' असं म्हटलं तरी कौतुकाने धपाटे घालत आपल्या पहिल्या भाच्याचं कौतुक करण्यात सगळ्या मावश्या दंग असायच्या. अशी माझ्या आयुष्याची सुरुवात भरपूर कौतुक करणाऱ्या मुलींमधेच झाली. आजोबांच्या सहाही मुलींचा मी लाडका आहे आणि आपलं हे लेकरू किंवा भाचरू चांगलं आहे या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आत्यंतिक निराशेच्या कित्येक क्षणांत मला आधार दिलेला आहे.

नंतर शाळेत गेलो. मुलामुलींची एकत्र शाळा असली तरी एकाच बाकावर आपापल्या आवडत्या मित्र मैत्रिणींशेजारी बसण्याची मुभा नव्हती. त्यामुळे वर्गात एका अदृष्य रेषेच्या डावीकडे मुलं आणि उजवीकडे मुली अशी दहा वर्षे काढली. मी डाव्या विचारांकडे ओढ घेणारा मुलगा असावा हे माझ्या शिक्षकांना कसं काय कळलं कुणास ठाऊक? पण कदाचित डाव्या विचारांना डोंबिवलीत मूळ धरता येऊ नये म्हणून किंवा मग मी अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री पटल्यामुळे मला कायम या अदृष्य रेषेवर बसायला मिळालं. त्यामुळे डावीकडचं हृदय मुलांच्या बाजूला असूनही माझ्या उजव्या मेंदूवर मुलींच्या कोलाहलाचे कोमल घाव दहाही वर्षं पडत राहिले.

वर्गात मुलींच्या बाजूला पेन किंवा पेन्सिल पडली तर आता ती कायमची गेली असं समजावं हे सांगणाऱ्या शाळेत दहा वर्षे गेल्याने कुमारसुलभ भावनांना तोंड फोडणं मला जमलं नाही. पण कधीतरी चुकून किंवा जाणूनबुजून उजव्या बाजूला पडणारी माझी पेन्स, पेन्सिली आणि खोडरबरं मी न मागताही मला कायम परत मिळत होती. त्यामुळे जगात चांगुलपणा आहे यावरचा माझा विश्वास टिकून राहिला.

शाळेची दहा वर्षे शब्देविण संवादात गेल्याने कॉलेजात गेल्यावर, परमेश्वराने सृष्टीचं चालन करण्यासाठी तयार केलेल्या आणि आपल्या मनोरम विभ्रमांनी माझ्या ज्ञानयज्ञात अडथळे आणणाऱ्या अप्सरांशी कसं बोलावं ते मला कळत नसे.

बाईक असलेल्या मुलाच्या आजूबाजूला कोंडाळे करुन उभे असलेल्या या अप्सरांपैकी कुणालाही सायकल चालवणाऱ्या मी जर 'चल डबलसीट गं लांब लांब लांब' म्हणालो असतो तर त्या सर्वांनी जो जीता वही सिकंदरमधील पूजा बेदीला न्यूनगंड येईल अश्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं असतं आणि मला माझ्या पायजमाछाप असण्याची जाणीव करून दिली असती. त्यानंतर मला लक्ष्यामामा म्हणून हाका मारायला सुरुवात केली असती. याची कल्पना असल्याने मी तसं काही न करता माझा मुक्काम कॉलेजच्या गेटऐवजी रीडिंग रुममधेच ठेवला. 'लवकर सीए होऊ. पैसे कमवू आणि मग बाईक घेऊन ऐटीत कॉलेजच्या गेटवर येऊ', अश्या विचारामुळे मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं गेलं. त्यामुळे माझ्या लवकर सीए होण्यातही एका तऱ्हेने मुलींचाच अदृश्य हात होता.

स्वतः फार देखणा नसताना केवळ गप्पा मारण्याच्या आणि स्वप्न रंगवून सांगण्याच्या बळावर जेव्हा मी एका अठरा वर्षाच्या मुलीला 'तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मै' हे पटवू शकलो तेव्हा आपण असं करू शकतो यावर माझा विश्वास पक्का करण्यात माझ्या त्या प्रेयसीचा मोठा हात होता. जेव्हा तिचा हात मागायला तिच्या घरी एकटा गेलो होतो तेव्हा आपला नवरा कदाचित नाही म्हणेल हे जाणवून त्याला माजघरात बोलवून तसं न करण्याची सूचना देणाऱ्या सासूबाईंमुळे, 'केवळ माझ्या आजोबांच्या मुलीच नव्हे तर जगातील इतर ज्येष्ठ स्त्रियाही मायाळू असतात' यावरचा माझा विश्वास वाढला होता.

आणि त्यानंतर आजतागायत 'मी आणि माझ्या आईने तू मला सुखात ठेवशील या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता त्यामुळे आता तुझा शब्द पूर्ण कर', असं केवळ नजरेने सांगून मला आळशीपणापासून दूर ठेवण्यातही माझ्या तत्कालीन प्रेयसीचा आणि सध्याच्या अर्धांगिनीचा हात आहे.

कॉमर्सचे क्लासेस सुरू केले आणि सायन्सपेक्षा कॉमर्सकडे मुलींचा जास्त ओढा असल्याने वर्गात मुलीच जास्त असतात. परिणामी माझ्या बँकेत येणारी लक्ष्मी ही मुलींच्या पावलानेच आली.

पुण्यात क्लासची शाखा काढायचं ठरवलं तेव्हाही शाळेच्या वर्गातील आता पुण्यात स्थायिक झालेल्या मैत्रीणींनी आणि फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनीही खूप मदत केली.

आता जाणवतं आहे की त्या नंदीबैलवाल्याची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. खरोखरंच मला मुलींकडून भरपूर फायदा झाला आहे. त्यामुळे माझा फायदा करून देणाऱ्या आणि जसा मी आहे तसा होण्यास मला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा.