Monday, March 9, 2020

नंदीबैल, माझ्या आयुष्यातील मुली आणि महिला दिन

माझ्या लहानपणी नंदीबैल घेऊन दारोदार फिरणाऱ्या आणि लोकांचं भविष्य सांगणाऱ्या एका ज्योतिष्याने 'तुमच्या लेकराला मुलींकडून फायदा होईल ताई' असं माझ्या आईला सांगितलेलं मला आठवतं. हे वाक्य आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर (म्हणजे मी अजून वानप्रस्थाश्रम घेण्याइतका म्हातारा झालेलो नाही. तरीही वयाच्या पाचव्या वर्षानंतरच्या आतापर्यंतच्या आयुष्याचे दहा दहा वर्षांचे चार टप्पे केले तर) त्या त्या वयातील कुमारसुलभ किंवा तारुण्यसुलभ किंवा गृहस्थसुलभ भावनांमुळे मला आशावादी राहण्यात मदत करत आलेलं आहे. असं असलं तरी त्या वाक्याची मला प्रचिती आलेली नाही असं माझं मत होतं. पण आज महिला दिनावरच्या इतरांच्या पोस्ट्स पाहून मला मुलींमुळे झालेल्या फायद्याबद्दल विचार करावासा वाटला. तेव्हा जाणवलं की,

माझ्या आयुष्यात भरपूर मुली येतील याची काळजी माझ्या जन्माअगोदरच माझ्या आजी आजोबांनी घेतली आणि मला पाच मावश्या असतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती. आजी आजोबांच्या थोरल्या मुलीचा मी पहिला मुलगा असल्याने मी 'पुतना मावशी' असं म्हटलं तरी कौतुकाने धपाटे घालत आपल्या पहिल्या भाच्याचं कौतुक करण्यात सगळ्या मावश्या दंग असायच्या. अशी माझ्या आयुष्याची सुरुवात भरपूर कौतुक करणाऱ्या मुलींमधेच झाली. आजोबांच्या सहाही मुलींचा मी लाडका आहे आणि आपलं हे लेकरू किंवा भाचरू चांगलं आहे या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे आत्यंतिक निराशेच्या कित्येक क्षणांत मला आधार दिलेला आहे.

नंतर शाळेत गेलो. मुलामुलींची एकत्र शाळा असली तरी एकाच बाकावर आपापल्या आवडत्या मित्र मैत्रिणींशेजारी बसण्याची मुभा नव्हती. त्यामुळे वर्गात एका अदृष्य रेषेच्या डावीकडे मुलं आणि उजवीकडे मुली अशी दहा वर्षे काढली. मी डाव्या विचारांकडे ओढ घेणारा मुलगा असावा हे माझ्या शिक्षकांना कसं काय कळलं कुणास ठाऊक? पण कदाचित डाव्या विचारांना डोंबिवलीत मूळ धरता येऊ नये म्हणून किंवा मग मी अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री पटल्यामुळे मला कायम या अदृष्य रेषेवर बसायला मिळालं. त्यामुळे डावीकडचं हृदय मुलांच्या बाजूला असूनही माझ्या उजव्या मेंदूवर मुलींच्या कोलाहलाचे कोमल घाव दहाही वर्षं पडत राहिले.

वर्गात मुलींच्या बाजूला पेन किंवा पेन्सिल पडली तर आता ती कायमची गेली असं समजावं हे सांगणाऱ्या शाळेत दहा वर्षे गेल्याने कुमारसुलभ भावनांना तोंड फोडणं मला जमलं नाही. पण कधीतरी चुकून किंवा जाणूनबुजून उजव्या बाजूला पडणारी माझी पेन्स, पेन्सिली आणि खोडरबरं मी न मागताही मला कायम परत मिळत होती. त्यामुळे जगात चांगुलपणा आहे यावरचा माझा विश्वास टिकून राहिला.

शाळेची दहा वर्षे शब्देविण संवादात गेल्याने कॉलेजात गेल्यावर, परमेश्वराने सृष्टीचं चालन करण्यासाठी तयार केलेल्या आणि आपल्या मनोरम विभ्रमांनी माझ्या ज्ञानयज्ञात अडथळे आणणाऱ्या अप्सरांशी कसं बोलावं ते मला कळत नसे.

बाईक असलेल्या मुलाच्या आजूबाजूला कोंडाळे करुन उभे असलेल्या या अप्सरांपैकी कुणालाही सायकल चालवणाऱ्या मी जर 'चल डबलसीट गं लांब लांब लांब' म्हणालो असतो तर त्या सर्वांनी जो जीता वही सिकंदरमधील पूजा बेदीला न्यूनगंड येईल अश्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं असतं आणि मला माझ्या पायजमाछाप असण्याची जाणीव करून दिली असती. त्यानंतर मला लक्ष्यामामा म्हणून हाका मारायला सुरुवात केली असती. याची कल्पना असल्याने मी तसं काही न करता माझा मुक्काम कॉलेजच्या गेटऐवजी रीडिंग रुममधेच ठेवला. 'लवकर सीए होऊ. पैसे कमवू आणि मग बाईक घेऊन ऐटीत कॉलेजच्या गेटवर येऊ', अश्या विचारामुळे मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं गेलं. त्यामुळे माझ्या लवकर सीए होण्यातही एका तऱ्हेने मुलींचाच अदृश्य हात होता.

स्वतः फार देखणा नसताना केवळ गप्पा मारण्याच्या आणि स्वप्न रंगवून सांगण्याच्या बळावर जेव्हा मी एका अठरा वर्षाच्या मुलीला 'तुम जो पकड लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूं मै' हे पटवू शकलो तेव्हा आपण असं करू शकतो यावर माझा विश्वास पक्का करण्यात माझ्या त्या प्रेयसीचा मोठा हात होता. जेव्हा तिचा हात मागायला तिच्या घरी एकटा गेलो होतो तेव्हा आपला नवरा कदाचित नाही म्हणेल हे जाणवून त्याला माजघरात बोलवून तसं न करण्याची सूचना देणाऱ्या सासूबाईंमुळे, 'केवळ माझ्या आजोबांच्या मुलीच नव्हे तर जगातील इतर ज्येष्ठ स्त्रियाही मायाळू असतात' यावरचा माझा विश्वास वाढला होता.

आणि त्यानंतर आजतागायत 'मी आणि माझ्या आईने तू मला सुखात ठेवशील या तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता त्यामुळे आता तुझा शब्द पूर्ण कर', असं केवळ नजरेने सांगून मला आळशीपणापासून दूर ठेवण्यातही माझ्या तत्कालीन प्रेयसीचा आणि सध्याच्या अर्धांगिनीचा हात आहे.

कॉमर्सचे क्लासेस सुरू केले आणि सायन्सपेक्षा कॉमर्सकडे मुलींचा जास्त ओढा असल्याने वर्गात मुलीच जास्त असतात. परिणामी माझ्या बँकेत येणारी लक्ष्मी ही मुलींच्या पावलानेच आली.

पुण्यात क्लासची शाखा काढायचं ठरवलं तेव्हाही शाळेच्या वर्गातील आता पुण्यात स्थायिक झालेल्या मैत्रीणींनी आणि फेसबुकवर ओळख झालेल्या मैत्रिणींनी आणि त्यांच्या नवऱ्यांनीही खूप मदत केली.

आता जाणवतं आहे की त्या नंदीबैलवाल्याची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. खरोखरंच मला मुलींकडून भरपूर फायदा झाला आहे. त्यामुळे माझा फायदा करून देणाऱ्या आणि जसा मी आहे तसा होण्यास मला मदत करणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मुलींना महिला दिनाच्या शुभेच्छा.

No comments:

Post a Comment