Tuesday, June 14, 2016

‪निर्गुणी भजने‬ (भाग २.७) सुनता है गुरु ग्यानी - समाप्त

------------------

------------------
मागच्या भागात "ओहं सोहं बाजा बाजे" मधील ओहं सोहं चा अर्थ लावताना मी आघाताशिवाय होणारा म्हणून अनाहत असलेला “ओम” चा अपभ्रंश म्हणजे “ओहं” तर शब्दविरहीत, न जपतादेखील जपला जाणारा ध्वनीमंत्र म्हणजे “सोहं” असे लिहिले होते. त्यावर माझ्या एका मित्राने अपभ्रंशाची कल्पना मानली पण,  'ते सोहं सोहं असेच आहे आणि पहिल्या सोहंचा अपभ्रंश हॊउन ओहं म्हटले गेले आहे', असे मत नोंदवले.


पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं".  धृवपदाबद्दल  लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात,


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी |
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी ||


असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो. अर्थात पूर्ण भजन लक्षात घेऊन मग त्यातील पाठभेद असलेल्या शब्दांचा अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न कदाचित सिद्ध साधकाच्या  कथेच्या वळणाने चालला आहे हे मला मान्य आहे.


आता राहिला शेवटचा चरण, इथे कबीर म्हणतात,


कहत कबीर सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll


त्या अगम्य पुरुषाचे वर्णन करणारी ही वाणी आहे. जो सातत्याने नजर स्थिर करून कुंडलिनीचा प्रवास बघतो तो या विश्वाचे अजर (कधीही वृद्ध न होणारे) अमर (कधीही मृत न होणारे) असे स्वरूप पाहू शकतो. असे सांगून कबीर हे भजन संपवतात.


माझ्या मते, माझ्या अल्पमतीला आणि अनुभवशून्य अभ्यासाला साजेसा असा ह्या भजनाचा मी जो अर्थ लावला आहे. तो अनेकांना पटला नाही तरी एक लांबलेली पण तरीही सुसूत्र असलेली गोष्ट म्हणून तरी त्याची उपयुक्तता असावी.


या भजनातील कुंडलिनीच्या मूळ संकल्पनेविषयी माझ्या मनात फार थोडा विश्वास आहे. त्यामुळे तिच्या प्रवासाचे हे वर्णन आणि साधकाला मिळणारा अनिर्वचनीय आनंद याबद्दल मी साशंक आहे. किंबहुना, माझे शब्दप्रधान असणे आणि इंद्रियगम्य ज्ञानावर विश्वास ठेवणे माझ्या अज्ञानाचे खरे कारण असावे हे मला मान्य आहे. ह्या भजनात वर्णन केलेल्या गोष्टीबद्दल माझ्या मनात कितीही अविश्वास असला तरी, या भजनातील आणि याच्या अनुषंगाने वाचायला मिळालेल्या अनेक संकल्पना  मला आश्चर्यचकित करून गेल्या.


सजीवांच्या सजीवपणाचे दृश्य लक्षण म्हणजे श्वासोछ्चवासाची क्रिया. ही थांबली की सजीव मृत मानला जातो. अगदी बेशुद्धावस्थेत देखील ही क्रिया चालू असते. गुदमरलेल्या, अर्धमेला झालेल्या व्यक्तीला प्रथम हवा असतो तो मोकळा श्वास.  मग हा श्वास  परमेश्वराचे रूप न वाटल्यास नवलच. म्हणून सजीव म्हणजे सप्राण आणि सजीवांचे लक्षण असलेल्या श्वासात जो महत्वाचा तो प्राणवायू. बरं या प्राणवायुचेही गुणधर्म विलक्षण. तो दिसत नाही पण वेदोपनिषद्काळी आणि कबीरांच्या वेळी मानवाला ज्ञात असणाऱ्या सर्व पोकळीत हा भरून राहिलेला असतो. झाकण बंद करून तो डब्यात कोंडला तरी तो डब्याबाहेर देखील असतो आणि डब्यात देखील असतो. तो सर्वसंचारी असतो. तो सर्व ध्वनींचे कारण असतो. ओम सारखा ध्वनी जो "अ + उ + म " या स्वरव्यंजनांचा बनलेला आहे त्याच्या मानवी देहातून निर्मिती साठी अ हा कंठ्य उ हा ओष्ठ्य आणि म हा अनुनासिक उच्चार पुरेसा असतो ज्यात आपले शरीर एखाद्या बासरीप्रमाणे असल्याचा अनुभव येऊ शकतो. मग जसा एखादा बासरीवादक मनाच्या लहरीखातर किंवा त्याच्या मनात गुंजणारे स्वरचित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या बासरीत हवा फुंकून सूरांचे जसे एक विश्व उभे करतॊ तसेच कुठला तरी अगम्य बासरीवादक केवळ त्याच्या लहरीखातर  प्राणवायूच्या रुपात चराचरात  फिरून या विश्वाची निर्मिती करत असेल अशी कल्पना सुचणे मला अगदीच अशक्य वाटत नाही.


या लेखमालेच्या प्रतिसादात मला वाचकांकडून बरीच नवी माहिती मिळाली. भजनाचे पाठभेद मिळाले.  शुचि या नव्या मैत्रिणीकडून श्री म वैद्य लिखित षट्चक्र दर्शन व भेदन ह्या पुस्तकाची लिंक मिळाली. राजेंद्र बाणाईत या ज्येष्ठ मित्राकडून स्वामी मुक्तानंद चित् शक्ति विलास हा ग्रंथ वाचावा अशी सूचना मिळाली. श्रीकांत पोळ या अत्यंत resourceful मित्राकडून Dancing Wu Li Masters या Gary Zukov लिखित पुस्तकाची प्रत मिळाली. पहिल्या भागाच्या शेवटी "ज्ञान वाटल्याने वाढतं  आणि अज्ञान वाटल्याने कमी होतं" असं मी म्हणालो होतो  आणि माझा तो तर्क खरा होता हे सिद्ध झाले. आता मिळालेले हे नवीन संदर्भ आधी वाचेन आणि मग इतर भजनांबद्दल अनियमितपणे लिहीन.

धन्यवाद
------------------

------------------

Monday, June 6, 2016

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.६) सुनता है गुरु ग्यानी - चौथा आणि पाचवा चरण

------------------

------------------
सुनता है गुरु ग्यानी या भजनाचा कुंडलिनीच्या प्रवासाशी मी लावलेला संबंध काही वाचकांना, "मारून मुटकून गणपती" बनवण्याचा माझा प्रयत्न वाटला. आणि काहींनी सौम्य शब्दात तशी प्रतिक्रिया देखील दिली. अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न म्हणजे ढगांच्या आकारातून प्राणी शोधण्याचा एक प्रकार वाटू शकतो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनात कुंडलिनी आणि या भजनाचा संबंध लागण्याचे सगळ्यात मोठे कारण असलेल्या चरणापर्यंत आपण आता पोहोचलो आहोत. त्यामुळे शेवटच्या तीन चरणांचा अर्थ वाचताना कदाचित माझा सगळा प्रयत्न वायफळाचे मळे फुलवण्याचा नव्हता हे वाचकांना पटेल असे मला वाटते. कदाचित कुंडलिनीचा आणि या भजनाचा संबंध वाचकांना माझ्यापेक्षा अधिक स्पष्ट प्रमाणात जाणवू शकेल.

या दोन चरणांचे बोल आहेत,

बिन धरती एक मंडल दीसे, बिन सरोवर जूँ पानी रे
गगन मंडलू में होए उजियाला, बोले गुरु-मुख बाणी हो जी ll 4 ll

ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे |
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी ll 5 ll

कहत कबीरा सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll

चौथ्या चरणात कबीरांनी धरतीशिवाय दिसणारे मंडल, सरोवराशिवाय जमा झालेले पाणी, गगन मंडळात पसरणारा प्रकाश यांचे वर्णन केले आहे.

यात कबीर आपल्या गुरूंच्या वचनाचा दाखला देत सांगतात की साधना सुरु केल्यावर साधकाला  धरित्रीच्या आधाराशिवाय वसलेले मंडल दिसेल. सर्व प्राण्यांच्या शरीराला पायाचा आधार, झाडांना खोडाचा आणि खोडाला मुळांचा आधार. तर या पायांना, मुळांना धरतीचा आधार. म्हणजे सजीव आणि निर्जीवांच्या पार्थिवाला पृथ्वीचा आधार. पण मग अंतराळात तरंगणाऱ्या धरतीला कशाचा आधार? किंबहुना सर्व विश्वाला कशाचा आधार?

स्वतःला स्वतःतून अनुभवण्याच्या परमेश्वराच्या इच्छेने हे विश्व तयार झाले हा सिद्धांत मानला तर सबंध विश्वाला ईश्वरी इच्छेचा आधार हाच त्याचा अर्थ होतो. सर्व पार्थिवांना जरी धरतीचा आधार लागत असला तरी मनुष्याच्या पार्थिव देहात वसणाऱ्या चैतन्याला मात्र असा धरतीचा आधार लागत नाही. स्वतःला अनुभवण्याच्या इच्छेने सगुण शरीरात मस्तकातून दाखल झालेले चैतन्य म्हणजे कुंडलिनी. ही कुंडलिनी मानवी शरीरात सूक्ष्मदेहात मूलाधार चक्राच्या जागी साडेतीन वर्तुळांचे मंडल करून विसावलेली असते.  तिचा आधार धरती नाही, चैतन्याची गुण अनुभवण्याची इच्छा हाच तिचा आधार.  

मग सरोवराचे रूपक वापरून ते सांगतात की साधकाला सरोवराशिवाय जमा झालेले पाणी दिसेल. सरोवरच का ? महासागर का नाही? नदी का नाही?  समुद्र स्थिर असतो. पण त्यात पाण्याचा उगम नसतो. त्यात पाणी वहात येते.  याउलट अनेक झऱ्यांचा एकत्रित समूह म्हणजे नदी. हिच्यात पाण्याचा उगम दिसला तरी नदी स्थिर नसून प्रवाही असते. आता राहिले सरोवर. सरोवरात पाण्याचे झरे असतात आणि त्याचे पाणी नदीपेक्षा स्थिर रहाते. याचा अर्थ उगम असूनही स्थिर रहाण्याची क्षमता असण्याच्या गोष्टीचे रूपक म्हणजे सरोवर. आता जेंव्हा मी पहिल्या चरणातील "नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी। " या वाक्याचा संबंध "बिन सरोवर जूँ पानी रे" शी लावतो तेंव्हा तेंव्हा त्याचा संबंध कुंडलिनी साधनेतील, शेंडीच्या ठिकाणी असलेल्या बिंदूस्थानातून होणारा विसर्ग, जो सहजप्रेरणेने नाभी जवळील मणिपूर चक्रात वाहत जाऊन शारीरिक वृद्धत्व आणतो, पण जर साधकाने दुसऱ्या चरणात सांगितलेला "उलटी फाँस फंसानी हो जी" चा उपदेश अमलात आणला तर हा विसर्ग टाळूजवळील ललना चक्रात साठवून ठेवता येतो आणि त्याचे अमृतात रुपांतर होते; या संकल्पनेशी लागतो. त्यामुळे बिंदूतून होणारा आणि ललना चक्रात साठवून ठेवलेला विसर्ग म्हणजे सरोवर. बिन पाण्याचे सरोवर.

साधनेच्या पुढच्या टप्प्यावर मग साधकाला गगन मंडळ म्हणजे मस्तकातील पोकळीत प्रकाश पसरताना दिसेल. हा प्रकाश चर्मचक्षुंनी बघण्याचा प्रकाश नसून अंतःचक्षुंनी अनुभवायचा प्रकाश असेल. आणि मग चौथा चरण संपवताना आपल्या या सगळ्या प्रतिपादनाला कबीर आपल्या गुरूंच्या वचनाचा आधार सांगतात.

जोपर्यंत गाणे ऐकत होतो तोपर्यंत पाचव्या चरणाची सुरवात माझ्यासाठी "कोहं सोहं" अशीच होती. कारण मला "कोहं सोहं", "मी कोण आहे?, मी तोच आहे" ही प्रश्नोत्तरे ऐकून माहिती होती. पण मग जेंव्हा गाण्याचे बोल वाचायला मिळाले तेंव्हा मात्र पाचव्या चरणाचा अर्थ समजून घेताना मी अडखळलो. कारण परळीकरांच्या आणि श्रीमती हेस यांच्या पुस्तकात दोन्हीकडे स्पष्ट उल्लेख होता "ओऽहं सोऽहं". मला हे  "ओऽहं सोऽहं" काही माहिती नव्हते. मग पुन्हा शोधणे आले. या शोधात जी विविध माहिती मिळाली त्यातील सगळ्यात महत्वाची आणि कुंडलिनीशी सरळ संबंध सांगणारी माहिती होती "अजपा जप" या संकल्पनेची आणि “हंस मंत्राची”. किंबहुना याच चरणामुळे माझी खात्री झाली की हे भजन कुंडलिनी साधनेचे वर्णन आहे.

सगळ्यात सोपा, आपोआप घडणारा, न जपता जपला जाणारा जप म्हणजे अजपा जप. या जपात शब्द मंत्र नाही. हा ध्वनी मंत्राचा जप आहे. जो सर्व सजीव नकळत करत असतात. आपण श्वास घेतो तेंव्हा होणारा ध्वनी म्हणजे "सा किंवा सो" आणि जेंव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेंव्हा होणारा ध्वनी म्हणजे "ह किंवा हं". याचा अर्थ श्वासोच्छवासाच्या क्रियेतून सर्व सजीव जन्माला आल्यापासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत अव्याहत करत असलेला जप म्हणजे सोहं जप.  या सोहं चे उलट म्हणजे हंस किंवा हंसो. म्हणून हा हंस मंत्र. श्वासोच्छवासामुळे हा सतत चालू असतो म्हणून प्राण गायत्री असे देखील म्हणतात.

काही ठिकाणी कुंडलिनीचे वर्णन हंसाचे पंख असलेला सर्प असे केले आहे तेंव्हा हा हंस म्हणजे उलट फिरून सहस्रार चक्राकडे निघालेली कुंडलिनी शक्ती असा अर्थ निघतो. तर काही ठिकाणी, हंस म्हणजे प्राण आणि मन असे दोन पंख असलेला आत्मा असे वर्णन आहे. त्याला शिव किंवा पुरुष स्वरूप मानले आहे. तर कुंडलिनीला स्त्री किंवा शक्ती स्वरूप मानले आहे. मस्तकात असलेल्या सहस्रार चक्राकडे हा हंस कुंडलिनीला उचलून घेऊन जातो आणि तिथे असलेल्या परमात्म्याशी एकरूप होतो, असे वर्णन आहे. साधनेच्या सहाय्याने, जिथून सुरवात तिथेच शेवट असा उलटा फासा किंवा वर्तुळ पूर्ण करतो. हंसाला असे जागृत करण्यासाठी आणि कुंडलिनीचा उलटा प्रवास घडवण्यासाठी आवश्यक काय असते? याचे उत्तर शोधायला गेलो तर कबीर म्हणतात “बाजा बाजे” म्हणजे पुन्हा भेटला नाद.

नाद कुठला? तर गगन मंडळात (मस्तकात) झिनी झिनी चालणाऱ्या ओंकाराचा आणि त्याबरोबर लक्ष देऊन केलेला अजपा जप यांचा नाद. म्हणजे साधकाने जाणीवपूर्वक "सोहं"  जप सुरु केला हंसाची कुंडलिनी सोबत ऊर्ध्वगामी गती सुरु होते.  जेंव्हा आपोआप चालणाऱ्या सोहं कडे साधक लक्ष देऊ लागतो, तेंव्हा श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित होते. त्यायोगे प्रथम नाकाच्या शेंड्याकडे मग दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित होते. ही जागा आज्ञा चक्राची असते. ही बरोबर शेंडीच्या समोरची म्हणजे बिंदूची जागा. कुंडलिनी बाह्य मार्गाने तात्पुरती जागृत करताना किंवा दीक्षा देताना गुरु या आज्ञा चक्रावरच बोटे टेकवतात. इथे इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडींचा संगम होतो. इडा नाडी गंगा मानली जाते, पिंगला यमुना आणि सुषुम्ना नाडी म्हणजे सरस्वती मानली जाते. म्हणजे एक प्रकारे आज्ञा चक्रावर त्रिवेणी संगम होतो. म्हणून भृकुटी मध्याला प्रयाग क्षेत्र असेही म्हणतात. सोहं वर लक्ष ठेवले, इडा आणि पिंगला नाड्यातून होणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित केले, त्याला नियंत्रित केले, तर सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी उर्ध्वगामी होते आणी प्रयाग क्षेत्री येउन पोहोचते. इथे झिनी झिनी चालणारा ओम चा अनाहत नाद आणि आपोआप होणारा सोहं चा नाद एकरूप होतात. ही साधकासाठी मोठ्या विजयाची गोष्ट असते. या विजयाच्या यात्रेचे वर्णन करताना कबीर पाचवा चरण रचतात. ते म्हणतात,

ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे |
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी ll 5 ll

कबीरांच्या शब्दात, “साधकाने विजयाचा ध्वज फडकवलेला आहे”. अजून या भजनाच्या शेवटच्या चरणाचा अर्थ लिहिणे बाकी आहे. आणि जन्माने व संस्काराने हिंदू असलेले, अध्यात्मात विश्वास आणि अनुभूती यावर भरअसतो हे मान्य असलेले पण त्याचवेळी शिक्षणाने आधुनिक शास्त्रांचा शंकेखोरपणा अंगी बाणवलेले माझे मन आत्तापर्यंत केलेल्या लिखाण प्रवासाचा शेवट, न झालेल्या अनुभूतीच्या आधारावर करावा की अजून न शमलेल्या शंकांच्या सहाय्याने करावा अश्या द्वंद्वात सापडले आहे. म्हणून मी इथेच थांबतो. पुढील भाग लिहायला सुरवात करेपर्यंत माझ्या मनातील द्वंद्व शमले असेल अशी माझी आशा आहे.
------------------

------------------

Saturday, June 4, 2016

सगुणातून निर्गुणाकडे, साकारातून निराकाराकडे, वरदायी कडून जबाबदारीकडे

One of my Facebook Friends, Mr. Irshad Bagwan, posted that despite his repeated efforts to avoid it, his brain used to project the image of his grandfather as Allah. Following are the screenshots of his post and my comments thereon

(Irshad's Original Post)

Part 1 of series of my comment on Irshaad's Post

Part 2 of series of my comment on Irshaad's Post
Then I fulfilled my promise with this long comment, given below....

बाकी सर्व प्राण्यांपेक्षा माणसात वेगळे काय असेल तर ते म्हणजे त्याची विशिष्ट प्रकारे जबाबदारी घेण्याची वृत्ती. तो स्वतः जबाबदारी घेतो आणि इतरांनी पण जबाबदारी घ्यावी अशी त्याची अपेक्षा असते. धर्म किंवा समाजव्यवस्था काय करतात, तर ही जबाबदारी घेण्याची वृत्ती वाढीस लावतात. कधी कधी तर लादतात देखील. यामुळे अनेक मानवी देहधारी जीवांची कुचंबणा देखील होते. पण कधी राजीखुशीने तर कधी समाजाच्या रेट्याने पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे  मानवी संस्कृती आज इथपर्यंत येउन पोहोचली आहे.

जबाबदारी घेण्याच्या आणि तिच्या सातत्याच्या अपेक्षेचा कळस म्हणजे मानवी जीवनात प्रचंड रस असलेला पितृरुपी ईश्वर. हा ईश्वर व्यक्तीने व्यक्तीशी, व्यक्तीने समूहाशी, समूहाने व्यक्तीशी आणि एका समूहाने दुसऱ्या समूहाशी कसे वागावे त्याचे नियम देतो. नियम पाळल्यास मृत्यूनंतरच्या परलोकातील सुखाचे आश्वासन देतो आणि  ते मोडल्यास प्रचंड मोठ्या शिक्षेची भीती देखील दाखवतो.

या ईश्वरकल्पनेचे साध्य फक्त एकच असते. व्यक्तीने परलोकातील सुखाच्या लालसेने किंवा शिक्षेच्या भीतीने इहलोकातील जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. त्यांच्यापासून दूर पळू नये. त्यामुळे अश्या प्रकारची ईश्वर कल्पना असणारे सर्व धर्म, मग ते मूर्तिपूजक असोत किंवा नसोत, ईश्वराला सगुण साकार किंवा निर्गुण निराकार, कसाही मानणारे असोत, शेवटी हे सर्व धर्म, या सर्व व्यवस्था, ईश्वराला मानवी आयुष्यात ढवळा ढवळ करण्यात प्रचंड रस असण्याचा गुण चिकटवतातच.

मूर्तिपूजकांचे काम थोडे सोपे असते. जे नीती नियम त्यांना स्वतःला पाळायचे असतात ते सगळे नियम ते देवाला लावू शकतात. यांचे देव शाप देतात, वर देतात, आपापसात स्पर्धा करतात. जे जे काही माणसांत होते ते ते सर्व काही करतात. आणि मग जे केले त्याच्या परिणामातून मुक्त देखील नसतात. मग कुणी सहस्त्राक्ष होतो, कुणावर काळे डाग पडतात, कुणी तुंदिलतनू होतो. मग यांच्या कृत्याचे परिणाम देणारी शक्ती अस्तित्वात आणावी लागते. या शक्तीला मग निर्गुण निराकार असावेच लागते. ती कशातच  ढवळा ढवळ करत नाही. ती निसर्ग चक्र चालू देते. कारण आणि परिणाम यांच्या साखळीला तिचा आधार असतो.

म्हणजे या व्यवस्थेत तीन पदर असतात. पहिला पदर असतो मानव. हा सगुण, साकार, निसर्ग नियमांनी बांधलेला आणि मर्त्य असतो. यालाच समाजाच्या नियमांनी बांधण्यासाठी बाकीचे दोन पदर आवश्यक असतात. दुसरा पदर असतो देव. शाप किंवा वर देणारे, स्तुतीमुळे आराधनेमुळे खुष होणारे आणि आराधना न केल्यास कोपणारे हे देव सगुण, साकार, निसर्ग नियमांनी बांधलेले, पण समाज बंधनातून मुक्त आणि अमर असतात. आणि या सगळ्यांचा कर्ता करविता म्हणजे तिसरा पदर म्हणजे परमेश्वर. हा निर्गुण, निराकार, अमर असतो. तो मानवी नीती नियमांच्या कक्षेबाहेर असतो. त्याला सुख-दु:ख, आनंद-वैताग, दया-द्वेष, प्रेम-वैर अश्या भावना नाहीत. आपल्या स्तुतीने श्रद्धाळूपणामुळे तो खूष होत नाही. आणि आपल्या निन्देने किंवा अश्रद्ध पणामुळे त्याला वाईट देखील वाटत नाही. तो निर्लिप्त असतो. आगीवर पाय पडला की भाजतो. मग तो लहान बाळाचा असो की वयोवृद्ध माणसाचा. समाजाच्या दृष्टीने पापी माणसाचा असो की पुण्यवान माणसाचा. सगळ्यांसाठी सारखाच परिणाम. तसे काहीसे परमेश्वराचे स्वरूप असते.

पण सातत्याने बदलत राहणाऱ्या निसर्गामुळे, मूर्तिपूजकांनी बनवलेल्या ईश्वर कल्पनेच्या या व्यवस्थेत मग साचलेपणा येतो. समाजाचा आकार बदलल्यावर, पर्यावरणात  बदल घडून आल्यावर, निसर्गाचे चक्र निसर्ग नियमाने बदलल्यावर, समाजाचे नीती नियम बदलावे लागतात. जुने देव कामी येत नाहीत. निर्गुण निराकार तर निर्लिप्त असतो. यावर तोडगा म्हणून मग आणखी नवीन देवांची निर्मिती होते. या सगळ्यात सुसूत्रता नसते. मग ही हरवलेली सुसूत्रता पुन्हा आणण्यासाठी मूर्तीपूजक लोक अवतार संकल्पना मांडतात. निर्गुण निराकाराने धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी घेतलेला अवतार. हा अवतार सगुण असतो, साकार असतो. बऱ्याचदा तो मानव देहधारी असतो. तो माणसाची सर्व सुख दुःखे भोगतो. तो बहुधा अमर नसतो. त्याचे अवतार कार्य संपले की तो देह सोडतो.

अश्या प्रकारे मूर्तिपूजक सगुण आणि निर्गुण, साकार आणि निराकार यांची उपयुक्त मांडणी करून, मानवाला समाजाप्रती जबाबदार करतात आणि त्याच्याकडून बऱ्यापैकी चाकोरीबद्ध वर्तन घडवून आणून समाजाचा गाडा चालवितात.

जे धर्म मूर्तीपूजा निषिद्ध मानतात, आणि देव संकल्पनेचा दुसरा पदर नाकारतात, त्यांना मानवाचा संबंध थेट निर्गुण निराकार परमेश्वराशी लावायची कसरत करावी लागते.

जो निर्गुण निराकार ईश्वर मोझेसला, इजिप्शियन देवांच्या इच्छेने चालणारा राजप्रासाद सोडून बारा वर्षे मेंढपाळाचे जीवन जगून झाल्यावर, सिनाईच्या डोंगरावर जळत्या झुडपाच्या रुपात भेटला. जो निर्गुण निराकार ईश्वर येशूला समाजाच्या अवहेलनेला झेलल्यानंतर आणि जुन्या कराराचे पालन होत नाही आहे हे पूर्णपणे समजल्यावर, कर्मकांडांनी भरलेल्या जेरुसलेमच्या देवळात अंतर्यामी भेटला. जो निर्गुण निराकार ईश्वर  प्रेषितांना वयाची चाळीशी उलटल्यावर, जगाचे टक्के टोणपे खाल्ल्यावर देवदूतामार्फत भेटला. आणि ज्या निर्गुण निराकार ईश्वराने स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान या महात्म्यांना दिले;  ते सर्व ज्ञान, ईश्वराचे ते सर्व आकलन, सामान्य माणसाला, देवदूताच्या मदतीशिवाय, जगाचे टक्के टोणपे न खाता, शरीरात आणि मनात निसर्ग काय आणि कसा हैदोस घालू शकतो ते माहीत नसण्याच्या अजाणत्या वयात, तसेच्या तसेच कळेल याची मला खात्री नाही. त्यात मला हे देखील दिसते की हे तीनही महात्मे सगुण साकार ईश्वर कल्पना किंवा कर्मकांड जीवनात धुडगूस घालत असण्याच्या काळात जन्मले आणि मोठे झाले. त्यानंतर त्यांना निर्गुण निराकार ईश्वराचे ज्ञान झाले आणि तरीही त्यांचे हृदय प्रेमाने, दयेने आणि मानावाप्रती अपार करुणेने भरलेले राहिले. त्यांनी मूर्तीचा, मूर्तीपूजेचा अव्हेर केला असला तरी त्यानी मानवाचा अव्हेर कधीही केला नाही.

म्हणजे प्रेषितांचा प्रवास, प्रत्यक्ष देवाच्या किंवा देवदूताच्या मार्गदर्शनाखाली सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराकडे झाला आणि ते क्षमाशील राहिले. याउलट जेंव्हा सामान्य माणूस, सगुणाकडून निर्गुणाकडे, साकाराकडून निराकाराकडे या प्रेषितांच्या राजमार्गावर न चालता, कुठल्याही  दैवी शक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय,  थेट निर्गुण निराकाराची भक्ती करू लागतो, तेंव्हा तो गोंधळेल नाही तर काय?  दया, क्षमा शांती या भावना त्याच्यात उद्भवल्या तरीही त्या क्षणिक राहतात. आणि बरेचदा, मूर्ती का फोडायची ते कळण्याआधीच, मूर्ती फोडता फोडता, माणसाप्रतीचे प्रेम देखील सोडतो. आणि प्रेषितांनी सांगितलेला जिहाद, जो स्वतःच्या अज्ञानाशी असला पाहिजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जुन्या अपरिपक्व जाणीवा सोडताना जो केला पाहिजे, त्या ऐवजी तो इतर माणसांविरुद्ध केला जातो. आपल्या जाणीवा संपूर्ण करण्याकडे लक्ष देण्याऐवजी इतरांच्या जाणीवा आपल्या वाडवडिलांनी सांगितलेल्याप्रमाणे आहेत की नाहीत याकडे कट्टरपणे लक्ष देण्यात अनेक जण आपल्या आयुष्याची इतिकर्त्यव्यता मानतात.

जग कसे आहे ते समजणे महत्वाचे आहेच पण हे जग आपल्याला कश्या प्रकारे समजते ते समजणे देखील महत्वाचे आहे. जर महात्म्यांना निराकाराची जाणीव साकाराची भक्ती पूर्णपणे बघितल्यावर झाली तर आपण सामान्य लोक देखील त्या निराकाराची ओळख साकारातून नक्कीच घेऊ शकू. महात्म्यांच्या उलट दिशेने प्रवास करून आपण फारसे काही साध्य करू शकणार नाही. किंबहुना, वयाच्या चाळीशीनंतर अनेक मूर्तिपूजकांना त्यातला फोलपणा कळलेला असतो. अनेकदा ते सशक्त पर्याय उपलब्ध नाही किंवा केवळ तो दुसऱ्या समूहाच्या मान्यतेचा आहे म्हणून नाकारतात किंवा केवळ सवयीचा भाग म्हणून मूर्तिपूजेला, सगुण साकाराच्या पूजेला कवटाळून बसतात. त्यांचे वागणे असे आहे कारण सध्याचे उपलब्ध पर्याय गुंतागुंतीचे आहेत.

त्यापेक्षा आपण जर भक्तीची सुरवात होत असताना सगुणाचे अस्तित्व मान्य केले; जसजसा आणि ज्याचा ज्याचा सगुणावरचा विश्वास कमी होऊन त्याचे मन निर्गुण निराकाराचे, नीती पल्याड असलेल्या ईश्वराचे अस्तित्व मान्य करून देखील समाजाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचे पालन करण्यास तयार होईल; त्याला सगुण भक्ती ही निर्गुण भक्तीची पहिली पायरी आहे असे जाणवू दिले तर त्याचा आणि सर्वांचा गोंधळ कमी होईल. आणि कट्टरता देखील नाममात्र उरेल. म्हणून  Irshad Bagwan माझ्या दृष्टीने, नमाज पढताना आजोबांची मूर्ती डोळ्यापुढे येण्याचा  तुमचा अनुभव म्हणजे निर्गुण परमेश्वराच्या भक्तीच्या दिशेने आणि कट्टरतेकडे पाठ फिरवून उचललेले पहिले पाऊल वाटते. या प्रवासात तुम्हाला माझ्या शुभेच्छा.