------------------
------------------
मागच्या भागात "ओहं सोहं बाजा बाजे" मधील ओहं सोहं चा अर्थ लावताना मी आघाताशिवाय होणारा म्हणून अनाहत असलेला “ओम” चा अपभ्रंश म्हणजे “ओहं” तर शब्दविरहीत, न जपतादेखील जपला जाणारा ध्वनीमंत्र म्हणजे “सोहं” असे लिहिले होते. त्यावर माझ्या एका मित्राने अपभ्रंशाची कल्पना मानली पण, 'ते सोहं सोहं असेच आहे आणि पहिल्या सोहंचा अपभ्रंश हॊउन ओहं म्हटले गेले आहे', असे मत नोंदवले.
पूर्ण भजनाचा अर्थ एकत्र लावायचा प्रयत्न केला तर मला हे भजन जीवाची आणि शिवाची भेट कशी घडवावी त्याचे वर्णन वाटते. म्हणून मग जीवाचा सोहं, शिवाचा ओहं आणि या दोघांचा कायम झीनी झीनी वाजत राहणारा बाजा म्हणजे "ओहं सोहं". धृवपदाबद्दल लिहिताना मी याचेच वर्णन, "कायम होत रहाणारा शांत आवाज" असे केले होते. हा जरी कायम चालू असला तरी त्याचे ऐक्य फक्त ज्ञानी साधकाला कळते. आणि मग त्या साधकाचे वर्णन करताना कबीर म्हणतात,
सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी |
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी ||
असा अर्थ मला जास्त सुसंगत वाटतो. अर्थात पूर्ण भजन लक्षात घेऊन मग त्यातील पाठभेद असलेल्या शब्दांचा अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्न कदाचित सिद्ध साधकाच्या कथेच्या वळणाने चालला आहे हे मला मान्य आहे.
आता राहिला शेवटचा चरण, इथे कबीर म्हणतात,
कहत कबीर सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll
त्या अगम्य पुरुषाचे वर्णन करणारी ही वाणी आहे. जो सातत्याने नजर स्थिर करून कुंडलिनीचा प्रवास बघतो तो या विश्वाचे अजर (कधीही वृद्ध न होणारे) अमर (कधीही मृत न होणारे) असे स्वरूप पाहू शकतो. असे सांगून कबीर हे भजन संपवतात.
माझ्या मते, माझ्या अल्पमतीला आणि अनुभवशून्य अभ्यासाला साजेसा असा ह्या भजनाचा मी जो अर्थ लावला आहे. तो अनेकांना पटला नाही तरी एक लांबलेली पण तरीही सुसूत्र असलेली गोष्ट म्हणून तरी त्याची उपयुक्तता असावी.
या भजनातील कुंडलिनीच्या मूळ संकल्पनेविषयी माझ्या मनात फार थोडा विश्वास आहे. त्यामुळे तिच्या प्रवासाचे हे वर्णन आणि साधकाला मिळणारा अनिर्वचनीय आनंद याबद्दल मी साशंक आहे. किंबहुना, माझे शब्दप्रधान असणे आणि इंद्रियगम्य ज्ञानावर विश्वास ठेवणे माझ्या अज्ञानाचे खरे कारण असावे हे मला मान्य आहे. ह्या भजनात वर्णन केलेल्या गोष्टीबद्दल माझ्या मनात कितीही अविश्वास असला तरी, या भजनातील आणि याच्या अनुषंगाने वाचायला मिळालेल्या अनेक संकल्पना मला आश्चर्यचकित करून गेल्या.
सजीवांच्या सजीवपणाचे दृश्य लक्षण म्हणजे श्वासोछ्चवासाची क्रिया. ही थांबली की सजीव मृत मानला जातो. अगदी बेशुद्धावस्थेत देखील ही क्रिया चालू असते. गुदमरलेल्या, अर्धमेला झालेल्या व्यक्तीला प्रथम हवा असतो तो मोकळा श्वास. मग हा श्वास परमेश्वराचे रूप न वाटल्यास नवलच. म्हणून सजीव म्हणजे सप्राण आणि सजीवांचे लक्षण असलेल्या श्वासात जो महत्वाचा तो प्राणवायू. बरं या प्राणवायुचेही गुणधर्म विलक्षण. तो दिसत नाही पण वेदोपनिषद्काळी आणि कबीरांच्या वेळी मानवाला ज्ञात असणाऱ्या सर्व पोकळीत हा भरून राहिलेला असतो. झाकण बंद करून तो डब्यात कोंडला तरी तो डब्याबाहेर देखील असतो आणि डब्यात देखील असतो. तो सर्वसंचारी असतो. तो सर्व ध्वनींचे कारण असतो. ओम सारखा ध्वनी जो "अ + उ + म " या स्वरव्यंजनांचा बनलेला आहे त्याच्या मानवी देहातून निर्मिती साठी अ हा कंठ्य उ हा ओष्ठ्य आणि म हा अनुनासिक उच्चार पुरेसा असतो ज्यात आपले शरीर एखाद्या बासरीप्रमाणे असल्याचा अनुभव येऊ शकतो. मग जसा एखादा बासरीवादक मनाच्या लहरीखातर किंवा त्याच्या मनात गुंजणारे स्वरचित्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या बासरीत हवा फुंकून सूरांचे जसे एक विश्व उभे करतॊ तसेच कुठला तरी अगम्य बासरीवादक केवळ त्याच्या लहरीखातर प्राणवायूच्या रुपात चराचरात फिरून या विश्वाची निर्मिती करत असेल अशी कल्पना सुचणे मला अगदीच अशक्य वाटत नाही.
या लेखमालेच्या प्रतिसादात मला वाचकांकडून बरीच नवी माहिती मिळाली. भजनाचे पाठभेद मिळाले. शुचि या नव्या मैत्रिणीकडून श्री म वैद्य लिखित षट्चक्र दर्शन व भेदन ह्या पुस्तकाची लिंक मिळाली. राजेंद्र बाणाईत या ज्येष्ठ मित्राकडून स्वामी मुक्तानंद चित् शक्ति विलास हा ग्रंथ वाचावा अशी सूचना मिळाली. श्रीकांत पोळ या अत्यंत resourceful मित्राकडून Dancing Wu Li Masters या Gary Zukov लिखित पुस्तकाची प्रत मिळाली. पहिल्या भागाच्या शेवटी "ज्ञान वाटल्याने वाढतं आणि अज्ञान वाटल्याने कमी होतं" असं मी म्हणालो होतो आणि माझा तो तर्क खरा होता हे सिद्ध झाले. आता मिळालेले हे नवीन संदर्भ आधी वाचेन आणि मग इतर भजनांबद्दल अनियमितपणे लिहीन.
No comments:
Post a Comment