Monday, June 11, 2018

Avengers Infinity War


Source : Internet 
आपल्याकडे कॉमिक्स ही लहान मुलांनी वाचायची गोष्ट आहे. त्यामुळे कॉमिक्सवरुन चित्रपट बनले तरी ते लहान मुलांसाठीच असतात.

हिंदीतला क्रिशसारखा किंवा G1 सारखा सुपरहिरो प्रेम करतो, गाणी म्हणतो आणि खलनायकाशी लढताना संतपदाला पोचल्यासारखा वागतो. त्याचा आणि त्याच्या खलनायकाचा लढा तात्विक नसतो. खलनायक तंत्रज्ञानकुशल असला तरी कुठल्याही विचारधारेशी बांधलेला वगैरे नसून लहानपणी झालेल्या अन्यायामुळे विकृत झालेला असतो.

भारतीय सुपरहिरोंचे चित्रपट म्हणजे देव - असुर, सुष्ट दुष्ट प्रवृत्ती यांच्यातल्या झगड्याचं सत्प्रवृत्ती आणि खलप्रवृत्तीमधील किंवा प्रकृती आणि विकृतीमधील झगड्याचं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगवलेलं रुप असतं.

भारतीय सुपरहिरोला लोकप्रिय करण्यासाठी एखाद्या स्टार कलाकाराची गरज असते. लोकप्रिय सुपरहिरोचं काम करुन एखादा अनाम कलाकार प्रकाशझोतात आला असं अजून भारतात घडायचं बाकी आहे.

याउलट मार्व्हल किंवा डिसी कॉमिक्समधले सुपरहिरो आणि खलनायक तत्त्वासाठी झगडताना दिसतात. आपल्याला सत्य समजलं आहे हा त्यांचा दावा असतो. झगडा सत्प्रवृत्ती विरुध्द खलप्रवृत्ती असा नसून दोन प्रवृत्तीमधला असतो. कित्येकदा नायक आणि खलनायक यांच्यातील कोण बरोबर हेदेखील प्रेक्षकाला कळेनासे होते.

बॅटमॅनचा जोकर असो किंवा अॅव्हेंजर्सचा थॅनोस, त्यांच्या वागण्याला विकृतीऐवजी विचारांचं अधिष्ठान असतं.

विश्व आणि त्यातील साधनसामुग्री सांत आहे पण सतत मोठ्या संख्येने जन्म घेत रहाणार्‍या जीवांमुळे जीवन अनंत आहे. या सर्व जीवांना साधनसामुग्री पुरणार नाही. अमर्याद जीवन शेवटी सर्व जीवांसाठी साधनसामुग्रीचा तुटवडा तयार करेल. त्यावेळी सर्व जीवांचा हालहाल होऊन मृत्यू होईल. म्हणून विश्वातील निम्मे जीव भावनिक न होता संपवले पाहिजेत. त्यामुळे उरलेल्यांना साधनसामग्री पुरेल हा विचार करणारा थॅनोस. तर अमर्याद जीवनाला आपण संपवणे अयोग्य असे मानणारे अॅव्हेंजर्स, यापैकी कोण बरोबर? असा प्रश्न घेऊन प्रेक्षक सिनेमाबाहेर पडतो.

माझ्या डोक्यात अजून दोन प्रश्न आले. मराठी सुपरहिरो कधी येतील? आणि ते कुठल्या वाटेने जातील, बॉलीवूडच्या की हॉलीवूडच्या?

Wonderful Wonderful

विशीत पदार्पण करायच्या आधी मी प्रेमविवाहातला अर्धा भाग पूर्ण करून प्रेमात पडलो होतो. विवाह करायचा होता पण त्याआधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बाकी होतं. त्यावेळी माझ्या तत्कालीन प्रेयसीवर (जिला चार वर्षे चाललेल्या कोर्टशिपनंतरही माझा कंटाळा न आल्याने किंवा चार वर्षात माझा इतका धाक बसला की नंतर माझ्याशी विवाह करण्यास नकार देऊ न शकल्याने जी पुढे माझी अर्धांगिनी बनली आणि माझ्या पूर्ण आयुष्यावर जिने ताबा मिळवला) इम्प्रेशन मारण्यासाठी भरपूर बडबड करत असे. एकदा बोलता बोलता तिला सहज म्हणालो होतो की ‘We are the history of future’. ते वाक्य माझं मलाच आवडलं. त्यामुळे मग अजून एक जाणीव झाली की पुढे छान भविष्य हवं असेल तर आज छान काम करायची जबाबदारी आपल्यावर आहे. मग तर अशी सवयंच झाली की पुढे काय हवं ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करायचा.
त्यात कित्येकदा असं व्हायचं (आणि अजूनही होतं) की मला दिसणारं भविष्य मी इतरांना सांगू शकायचो नाही. तिकडे कसा काय पोहोचणार तेही मला नीट कळलेलं नसायचं, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी उतावीळ झालेलो असायचो. त्यामुळे मग मी घरातल्यांवर आणि विशेषतः सप्तपदी करून आलेल्या माझ्या प्रेयसीवर झटकन चिडायचो. पण बहुतेक माझ्या बायकोचं गोत्र विश्वामित्र किंवा जमदग्नी असावं. कारण तिनेही प्रत्येक वेळी न चुकता ‘शस्त्राघाता शस्त्रची उत्तर’ हा न्याय वापरला. दोघांपैकी एकाला अंधुक दिसणाऱ्या आणि शब्दात पकडता न येणाऱ्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायचं कसं? या समस्येमुळे आम्ही एकमेकांना ज्या प्रेमादराने शहाण्यांत काढायचो की ‘प्रेमविवाहाचे फायदे तोटे’ या विषयावर आम्ही दोघे तीन तासाचा द्विपात्री कार्यक्रम करून; ‘आपण प्रेमविवाह करावा’, असं तरुणांना आणि ‘आपल्या लेकाने / लेकीने प्रेमविवाह करू नये’ असं त्यांच्या पालकांना एकाच वेळी पटवू शकतो.

आता माझ्या अर्धांगाने जितकं आयुष्य तिच्या माहेरी काढलं जवळपास तितकंच आयुष्य माझ्याबरोबर पूर्ण करून झालं आहे. मनाने आम्ही दोघं अजूनही विशीतंच असलो तरी अनुभवांनी आता चाळिशी गाठलेली आहे. दोन मुलांची काळजी घेताना आम्हा दोघांनाही भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील No First Use policy चं महत्व पटलेलं आहे. आता ‘जिंकू किंवा मरू’ चा आवेश सरलेला आहे आणि ‘हानी न होवो, होवो शुभंकर’ अशी नवी ओळ आम्ही गदिमांच्या समरगीतात घुसडून तहाचं निशाण कायम हाताशी ठेवतो आहोत. आता आम्हाला आमचं भविष्य अगदी स्पष्ट दिसत नसलं तरी ते जितकं दिसतं तितकं आपल्या जोडीदाराला कुठल्या शब्दांत मांडलेलं अधिक चांगल्या प्रकारे समजेल याचा बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे.

अजून काही आयुष्याचं सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली नाही पण मध्यंतरी बायको एक इंग्रजी टीव्ही सिरीयल बघत होती. बरेच दिवस (खरं तर बरीच वर्ष) चाललेली ती सिरीयल एकदाची संपली. सिरीयल बघताना नंतर बायको कंटाळूनही गेली होती. मधले कित्येक बेचव भाग सहन करून शेवटी जेव्हा ती सिरीयल संपली तेव्हा नेमका मी घरी होतो. ही सिरीयल बघत होती आणि मी फेसबुकवर टाईमपास करत होतो. एकाएकी थोड्या राकट पुरुषी आवाजातलं गाणं घरात वाजू लागलं. त्या आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. गाणं फार मस्त होतं. चटकन आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं.

मग माझ्या स्वभावाला अनुसरून ते गाणं, त्याचे बोल इंटरनेटवर शोधणं वगैरे उद्योग केले. आणि त्या गाण्यामागच्या कल्पनेने मला मोहून टाकलं.

आयुष्याची संध्याकाळ आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पाखरांना दिलेल्या बळाचं त्यांनी चीज केलं आहे. कृतकृत्य म्हातारा आणि म्हातारी एकटे एकमेकांच्या सोबतीने रहात आहेत. आणि अशात एके दिवशी म्हातारा आपल्या सुरकुतलेल्या म्हातारीला उद्देशून म्हणतो की,

‘बाई गं, कधी कधी समुद्रकिनाऱ्यावरून हातात हात घालून चालताना जेव्हा मी तुझं चुंबन घेतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मोकळ्या आकाशाखाली, एखाद्या टेकडीवर जेव्हा मी तुला मिठीत घेतो आणि त्यावेळी त्याक्षणी तिथे केवळ आपण दोघेच असतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मला जाणवतं की हे जग अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेलं आहे पण तू जर जवळ नसशील तर त्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. काही शांत संध्याकाळी जेव्हा आपण दोघे एकमेकांशेजारी बसलेलो असतो तेव्हा माझ्यावर तू करत असलेल्या प्रेमाची प्रभा तुझ्या चेहऱ्यावर दिसते आणि त्यावेळी मी किती मोठ्या भाग्याचा धनी आहे ते मला जाणवतं. आणि मग मी म्हणतो की बाई गं, तू आहेस म्हणून सगळं आनंददायी आहे. ‘

Sometimes we walk hand in hand by the sea
And we breathe in the cool salty air,
You turn to me with a kiss in your eyes
And my heart feels a thrill beyond compare
Then your lips cling to mine, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love.

Sometimes we stand on the top of a hill
And we gaze at the earth and the sky
I turn to you and you melt in my arms
There we are, darling, only you and I
What a moment to share, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love

The world is full of wondrous things it's true
But they wouldn't have much meaning without you

Some quiet evenings I sit by your side
And we're lost in a world of our own
I feel the glow of your unspoken love
I'm aware of the treasure that I own
And I say to myself, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love!


आपल्या समाजातील वृद्धांना संध्याछाया भिववू लागल्या की भक्तीरस, अध्यात्म यात गोडी निर्माण व्हावी अशी आपल्या समाजाची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा इतकी प्रखर असते की म्हातारा आणि म्हातारी एकमेकांवर अजूनही प्रेम करत असतील ही कल्पनाही आपण करू शकत नाही.

आपले कृतकृत्य वृद्ध बहुतेकदा एकारलेले असतात. किंवा मग ‘लाख चुका असतील केल्या’ असं म्हणत पश्चात्तापदग्ध असतात. किंवा मग ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी आर्जवे करत आपल्या दूर गेलेल्या पाखरांच्या आठवणीत दुःखी असतात. किंवा मग ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ असं म्हणत जोडीदाराऐवजी विश्वाबरोबर आपले अद्वैत अनुभवायचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी या इंग्रजी म्हाताऱ्याचे शब्द ऐकले तेव्हा आत कुठेतरी सुखावलो. माझा पिंड जरी भारतीय मातीतला असला, इथल्या तत्वज्ञानाने जरी मला वेळोवेळी साथ दिली असली तरी प्रेमविवाह केल्याने आणि आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर आहे हे जाणवल्याने; आयुष्याच्या संध्याकाळी माझी नाळ विश्वाच्या पसाऱ्याशी, किंवा उडून गेलेल्या चिमण्यांशी जोडण्याऐवजी किंवा केलेल्या चुकांबद्दल माफी मागत राहण्याऐवजी, घेतलेल्या योग्य निर्णयांना आनंददायी करण्याचं श्रेय आपल्या म्हातारीला देणारा म्हातारा मला जास्त जवळचा वाटतो.

We are the history of future हे मला जाणवलेलं सत्य आहे. म्हणून भविष्याला छान करण्यासाठी आज छान काम करणं माझी जबाबदारी आहे हे मला मान्य आहे. आयुष्याच्या संध्याकाळी कुठलं गाणं म्हणायचं आहे ते मला सापडलं आहे. त्यामुळे कदाचित माझं आजचं वागणं अजून सजग होईल या जाणीवेने मी खूष झालोय. Life is wonderful आणि ते wonderful का आहे त्याचं एक कारण मला कळलं आहे.

समाजाचे अनारोग्य

अनारोग्य शब्दात आरोग्यात झालेला बिघाड अभिप्रेत असतो. व्यक्तीच्या संदर्भात बोलताना हा बिघाड शारीरिक असू शकतो किंवा मानसिक. शरीराला दृश्य अस्तित्व आहे तर मन अदृश्य असल्याने आपण मनाला एक संकल्पना मानू शकतो. असे असले तरी निरोगी शरीर आणि निरोगी मन म्हणजे काय याची व्याख्या सुस्पष्ट असते आणि ती देशकालपरत्वे बदलत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अनारोग्याची व्याख्यादेखील सुस्पष्ट रहाते.

सर्व व्यक्तींची शरीरे विविध रसायनांना कमी अधिक प्रमाणात का होईना पण ठरविक पद्धतीने प्रतिसाद देतात. त्यामुळे शारीरिक अनारोग्यावर उपाय करणे शक्य असते. मन जरी अदृश्य असले तरी मनाच्या घावावर कधी मनाची फुंकर तर कधी औषधांचा मारा उपयोगी पडताना दिसतो. त्यामुळे व्यक्तीचे अनारोग्य शारीरिक असो वा मानसिक, वाईट सवयींमुळे असो वा बाह्य घटकांमुळे, त्याला दुरुस्त करता येणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे शक्य असते.

मात्र समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य - अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजशरीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बिघडले की नाही ते ठरवायचे कसे? आणि त्याला पूर्ववत किंवा अधिक सक्षम बनवायचे कसे? या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्याची शक्यता धूसर होत जाते. समाज जरी अशरिरी संकल्पना असली आणि समाजाच्या आरोग्य अनारोग्याच्या व्याख्येपासून उपायांपर्यंत अचूकतेचा अभाव असला, तरी व्यक्तीच्या जीवनावर समाजाचा प्रभाव पडत असल्याने समाजाच्या अनारोग्याबद्दल विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

विचारांच्या सोयीसाठी समाजातील आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या शरीरांची एक मोळी बांधून मी त्याला समाजाचे शरीर म्हणतो. तर या सर्वांच्या मनाची गोळाबेरीज म्हणजे समाजमन आहे अशी कल्पना करतो.

आता समाजाचे शरीर दृश्य झाल्यावर आपण त्याच्या आरोग्याची व्याख्या करू शकतो. माणसांना आपल्या सर्व गरजा एकट्याने पूर्ण करणे अशक्य असते त्यामुळे समाजाची निर्मिती होते. पण समाजाच्या सहाय्याने आपल्या गरजा पूर्ण करून घेताना समाजातील इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. समाजशरीराच्या वर केलेल्या व्याख्येप्रमाणे समाजशरीराचे स्त्री व पुरुष हे दोन प्रमुख भाग होतात. आणि या दोन्ही भागांत विविध वयाच्या अनेक व्यक्ती येतात. त्याशिवाय समाजशरीराची अव्यंग व अपंग अश्या दोन भागात विभागणी करता येणे शक्य असते. या दोन्ही भागात मग स्त्री - पुरुष, बाल - तरुण - वृद्ध अशी विभागणी करता येते. वय, व्यंग आणि लिंग यात भेद असूनही गरजा सगळ्यांना असतात पण इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे लोकसंख्या वाढत गेल्यावर समाजात गरजांची मागणी वाढत गेली तरीही गरजांच्या पूर्तीचा पुरवठा पुरेसा होईल याची खात्री नसते. परिणामी समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडते.

म्हणजे स्त्री पुरुष लोकसंख्येचा समतोल बिघडणे; बहुसंख्य जनता अपंग निपजणे; समाजातील वृद्धांची लोकसंख्या तरुणांपेक्षा वाढणे; समाजातील लहान मुलांची संख्या कमावत्या व्यक्तींपेक्षा वाढणे; ही सर्व समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. कारण यातील प्रत्येक घटितामुळे गरजांची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढते तर गरजांची पूर्ती करणाऱ्यांची संख्या कमी होत जाते. परिणामी सक्षम लोकसंख्येवरचा ताण वाढतो आणि समाजाचे शारीरिक आरोग्य धोक्यात येते. पुढे जाऊन मानसिक आरोग्यही धोक्यात येण्यास सुरुवात होते.

जननदर नियंत्रित करणे, वृद्धापकाळासाठी पैशाची बचत करण्याची सवय समाजाला लावणे, लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण सारखे राखणे, सर्व स्त्री पुरुषांना अर्थार्जनासाठी सक्षम बनविणे या उपायांनी शारीरिक अनारोग्याला दुरुस्त करणे शक्य आहे. हे सर्व उपाय दीर्घकालीन आहेत. त्यामुळे ज्या पिढीत अनारोग्याची समस्या जन्माला येईल त्याच पिढीत हे उपाय अमलात आणले तरीही त्यांचा फायदा साधारणपणे तिसऱ्या पिढीत दिसून येतो. आणि यातील काही उपायांचा अतिरेक नवीन समस्यांना जन्म देणारा असतो. उदाहरणार्थ, 'हम दो हमारा एक' च्या उपायाने चीनच्या एका पिढीची समस्या सोडवली असली तरी आता पुढील पिढीसाठी तरुणांपेक्षा दुप्पट वृद्ध ही समस्या तयार केली आहे. याचा अर्थ इतकाच की, समाजशरीरात अनारोग्य कशामुळे निर्माण होते? त्याचे निर्मूलन करून समाजशरीराला पूर्ववत करण्याचे उपाय कोणते? आणि कुठल्या उपायांच्या अतिरेकाने नवीन प्रकारचे अनारोग्य तयार होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली गेली आहेत. ती दीर्घकालीन असली तरी ती परिणामकारक आहेत.

मग प्रश्न उरतो तो समाजमनाच्या अनारोग्याचा.

सर्वसाधारणपणे भारतातील सर्वच पिढ्या "आमच्याकाळी असं नव्हतं" हे वाक्य आपल्या पुढल्या पिढीला ऐकवतात. आणि याचा खरा अर्थ असतो "आमच्याकाळी समाज आजच्याइतका बिघडलेला नव्हता". भारतातील सर्व पिढ्यांची येणाऱ्या काळाबद्दल जर अशीच नकारात्मक भावना असेल तर याचा एकंच अर्थ निघतो की 'भारतीय समाजाचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे', असा किमान भारतीयांचा तरी समज आहे.

असे का होत असावे? नव्या जुन्या पिढीत संघर्ष ही देशकालनिरपेक्ष गोष्ट आहे. असे असताना भारतीय समाज या संघर्षातील विजेत्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना वाट चुकलेले मानण्यात धन्यता का मानत असावा?संपूर्ण जगात सगळ्यात जास्त समाजसुधारक भारतात जन्माला आलेले असूनही प्रत्येक पिढीला गतकालीन समाज वर्तमानकालीन समाजापेक्षा अधिक योग्य का वाटत असावा? समाजसुधारक आहेत, आपण त्यांना वंदन करतो, त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर झाले हेही मान्य करतो परंतु "आमच्याकाळी असं नव्हतं" हे पालुपद मात्र आपण सोडत नाही. हे असे का? याचा विचार करताना आपल्याला भारतीय समाजमनाच्या गुंतागुंतीकडे लक्ष द्यावे लागेल.

प्रत्येक समाजात नवनवीन विचारांचे आगमन होत असते. ते जर समाजाच्या आतून असेल तर त्या विचाराला समाजाकडून प्रखर विरोध होतो. विरोधामुळे त्या विचारातील तीव्र टोकाचा भाग गाळून जातो आणि समाजाच्या मानसिक वयाला सहन होईल असा भाग टिकून रहातो. पुढील पिढीला वारसा म्हणून मिळतो. याचाच अर्थ जेव्हा समाजाच्या आतून एखादा विचार जन्माला येतो तेव्हा त्या विचाराची आणि समाजाच्या तत्कालीन धारणांची जी झटापट होते त्यामुळे तो विचार आणि समाजाच्या धारणा दोन्ही एकमेकांना घडवतात. म्हणजे विचार आणि समाज या दोघांची उत्क्रांती होते. वैचारिक उत्क्रांती जैविक उत्क्रांतीप्रमाणे हळूहळू चालणारी गोष्ट असल्याने नवीन विचारांचा टिकण्यासाठीचा संघर्ष दीर्घकालीन असतो आणि विचाराबरोबर उन्नत होत जाण्याचे भाग्य समाजाला लाभते. पाश्चात्य जगातील एकेश्वरवाद, भांडवलशाही, शिक्षणव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, प्रौढ मतदानावर आधारित लोकशाही या सर्व कल्पनांनी, त्यांच्या उद्गात्यांनी आणि समर्थकांनी आजच्या काळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रखर संघर्ष केला. त्यात कित्येकदा प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचे वर्तन आणि ज्या कल्पनेला ते पाठिंबा देत होते यांत तफावत होती. परंतू सततच्या संघर्षामुळे आपल्या आचार विचारातील विसंगतीवर उपाय शोधणे त्या समाजांना शक्य झाले. हे उपाय म्हणजे त्यांनी स्वतःच्या अपूर्णतेवर मिळवलेला विजय होता. त्यामुळे त्यांना गतकाळापेक्षा वर्तमानकाळाचे प्रेम अधिक असणे स्वाभाविक आहे.

भारतीय समाजाच्या बाबतीत भारताबाहेरून सातत्याने दोन गोष्टींचे आगमन झाले. एक म्हणजे राजे आणि दुसरे म्हणजे नवीन विचार. आणि या दोघांच्या आगमनात एक साम्य होते. प्रत्येक नवीन जेत्याने पराभूतांचे, त्यांच्या संस्कृतीचे पूर्णपणे शिरकाण न करता त्यांना केवळ राज्यकारभारातून बाजूला सारून आपले राज्य वसवले. जसजसे नवनवीन जेते येत गेले तसतसे पूर्वीचे जेते पराभूत होऊन, ज्यांना पूर्वी धूळ चारली त्यांच्या बरोबरीने राहू लागले. त्यामुळे भारतात एकेकाळी जेते असलेले पण नंतर पराभूत झालेले अनेक समूह एकाशेजारी एक नांदू लागले. जी गोष्ट पराभूत समूहांची तीच गोष्ट विचारांची. नवनवीन जेते नवनवीन संकल्पना आणत होते. जेत्याने त्या आणल्यामुळे किमान तत्वतः मान्य करण्याशिवाय भारतीय समाजाला गत्यंतर नव्हते. परंतू व्यवहारात मात्र जुन्या चालीरीतीच चालू राहिल्या.

म्हणजे नवीन विचाराला रुजण्यासाठी भारतीय समाजमनाची आवश्यक ती मशागत झालेली नसताना केवळ राजकीय किंवा आर्थिक सामर्थ्याने अनेक विचारांचे भारतीय समाजात आगमन झाले तेही समाजाबाहेरून. विचार जेत्यांकडून आलेले होते. परिणामी त्या विचाराबरोबरचा संघर्ष हा स्वतःच्या धारणांबरोबरचा संघर्ष न ठरता केवळ आक्रमकांबरोबरच संघर्ष ठरला. आणि त्यात कुणाचाही निर्णायक विजय होण्याआधी नवीन आक्रमक नवीन विचार घेऊन भारतात येत राहिले. आणि प्रत्येक भारतीय पिढीत "आमच्याकाळी असं नव्हतं" ही भावना दृढ होत गेली.

आधुनिक जगात फार क्वचित राजकीय किंवा सैनिकी आक्रमण केले जाते. आता इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी नवनवीन आर्थिक आकृतीबंध हेच प्रभावी हत्यार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’, सारखा उच्च सामाजिक विचार विचार मांडू शकणाऱ्या भारतात दुर्दैवाने स्वतःचे आर्थिक विचार नाहीत. लोकांनी एकत्र का यावे? काय बनवावे? किती बनवावे? कसे वाटावे? याबाबत भारतीयांनी स्वतःचा कुठलाही नवीन विचार मांडलेला नाही. इतकेच काय पण पाश्चात्य देशांतील विचार राबवताना त्यांचे पुरेसे भारतीयीकरण करण्याचे कष्टही घेतलेले नाहीत. त्यामुळे भारतीयांच्या प्रत्येक पिढीत 'पैसा हाच खरा देव असूनही', 'पैसा झाला मोठा' याबद्दल आश्चर्य, दुःख आणि शोक व्यक्त केला जातो.

इंटरनेटमुळे, वाहतुकीच्या जलद साधनांमुळे आणि आर्थिक उदारीकरणामुळे जग आणि भारतीय यातील सीमारेषा पुसल्या जात आहेत. भारतीय समाजात पाश्चात्य समाजातील उन्मुक्तपणाचा संचार होत आहे. पण या उन्मुक्तपणाचे आगमनही भारतीय समाजमनाची पुरेशी मशागत झालेली नसताना भारतीय समाजाबाहेरून होते आहे. त्यामुळे भारतीयांची तरुण पिढी बिघडलेली आहे का? भारतीय तरुण समाजमन उन्मुक्तपणाच्या अनारोग्याने ग्रस्त झाले आहे का? हे प्रश्न कुणाला पडू शकतात. चटकन हे प्रश्न योग्य वाटले तरी मला ते अवास्तव वाटतात. आपण उन्मुक्तपणाच्या या विचारांचे भारतीयीकरण कश्या प्रकारे करू शकू? आपण भारतीय समाजमनाला नवीन विचारांशी संघर्ष करत त्या विचाराबरोबर स्वतःला उत्क्रांत व्हायला कश्या प्रकारे शिकवू शकू? हे प्रश्न माझ्या मताने अधिक महत्वाचे आहेत.

माणसाच्या सर्व शारीरिक आणि मानसिक गरजा योग्य कश्या आहेत ते सांगणाऱ्या आणि त्या गरजांना पूर्ण करण्यासाठी नवनवीन सामाजिक आणि आर्थिक आकृतिबंधांना आकार देणाऱ्या नवनवीन संकल्पनांच्या लाटा जगभरात निर्माण होत राहाणार आहेत. त्या जगभर फिरणार आहेत. मग त्या लाटांना आपण कश्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो? आणि अश्याच लाटा आपण तयार करू शकतो का? हे आपल्या समाजापुढले महत्वाचे प्रश्न आहेत. जर यांचे उत्तर नाही असेल तर आपण समाजमनाच्या मोठ्या अनारोग्याला आमंत्रण देत आहोत.

आपण निर्णय घेतो आहोत, आपण आपल्या मनाचे राजे आहोत ही भावना फार सुखावह असते. या भावनेने परिपूर्ण मन आरोग्यपूर्ण राहते. पण राजा होण्यासाठी तुमचा अधिकार इतरांनी मान्य करावा लागतो. म्हणजे आपल्याला राजा होण्याचा अधिकार कुणी दिला? या प्रश्नाचे उत्तर, राजा होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला द्यावी लागते. सध्याच्या काळात तो अधिकार फक्त जास्तीत जास्त लोकांसाठी उपयोगी पडणाऱ्या समाजालाच मिळतो. त्यामुळे भारतीय समाजमन अनारोग्याने ग्रस्त होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या समाजातील लहानग्यांना, तरुणाईला आणि वृद्धांना; स्त्रियांना आणि पुरुषांना; जगासाठी कायम उपयोगी कसे रहायचे ते शिकवणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक विवेक (एप्रिल २०१८)