Monday, June 11, 2018

समाजाचे अनारोग्य

अनारोग्य शब्दात आरोग्यात झालेला बिघाड अभिप्रेत असतो. व्यक्तीच्या संदर्भात बोलताना हा बिघाड शारीरिक असू शकतो किंवा मानसिक. शरीराला दृश्य अस्तित्व आहे तर मन अदृश्य असल्याने आपण मनाला एक संकल्पना मानू शकतो. असे असले तरी निरोगी शरीर आणि निरोगी मन म्हणजे काय याची व्याख्या सुस्पष्ट असते आणि ती देशकालपरत्वे बदलत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अनारोग्याची व्याख्यादेखील सुस्पष्ट रहाते.

सर्व व्यक्तींची शरीरे विविध रसायनांना कमी अधिक प्रमाणात का होईना पण ठरविक पद्धतीने प्रतिसाद देतात. त्यामुळे शारीरिक अनारोग्यावर उपाय करणे शक्य असते. मन जरी अदृश्य असले तरी मनाच्या घावावर कधी मनाची फुंकर तर कधी औषधांचा मारा उपयोगी पडताना दिसतो. त्यामुळे व्यक्तीचे अनारोग्य शारीरिक असो वा मानसिक, वाईट सवयींमुळे असो वा बाह्य घटकांमुळे, त्याला दुरुस्त करता येणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे शक्य असते.

मात्र समाजाच्या बाबतीत जेव्हा आपण आरोग्य आणि अनारोग्य या संकल्पना वापरतो तेव्हा समाज हीच एक संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य - अनारोग्याची व्याख्या करणे कठीण होते. मग या संकल्पनारूपी समाजशरीराचे आणि समाजमनाचे आरोग्य बिघडले की नाही ते ठरवायचे कसे? आणि त्याला पूर्ववत किंवा अधिक सक्षम बनवायचे कसे? या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्याची शक्यता धूसर होत जाते. समाज जरी अशरिरी संकल्पना असली आणि समाजाच्या आरोग्य अनारोग्याच्या व्याख्येपासून उपायांपर्यंत अचूकतेचा अभाव असला, तरी व्यक्तीच्या जीवनावर समाजाचा प्रभाव पडत असल्याने समाजाच्या अनारोग्याबद्दल विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

विचारांच्या सोयीसाठी समाजातील आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या शरीरांची एक मोळी बांधून मी त्याला समाजाचे शरीर म्हणतो. तर या सर्वांच्या मनाची गोळाबेरीज म्हणजे समाजमन आहे अशी कल्पना करतो.

आता समाजाचे शरीर दृश्य झाल्यावर आपण त्याच्या आरोग्याची व्याख्या करू शकतो. माणसांना आपल्या सर्व गरजा एकट्याने पूर्ण करणे अशक्य असते त्यामुळे समाजाची निर्मिती होते. पण समाजाच्या सहाय्याने आपल्या गरजा पूर्ण करून घेताना समाजातील इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर येते. समाजशरीराच्या वर केलेल्या व्याख्येप्रमाणे समाजशरीराचे स्त्री व पुरुष हे दोन प्रमुख भाग होतात. आणि या दोन्ही भागांत विविध वयाच्या अनेक व्यक्ती येतात. त्याशिवाय समाजशरीराची अव्यंग व अपंग अश्या दोन भागात विभागणी करता येणे शक्य असते. या दोन्ही भागात मग स्त्री - पुरुष, बाल - तरुण - वृद्ध अशी विभागणी करता येते. वय, व्यंग आणि लिंग यात भेद असूनही गरजा सगळ्यांना असतात पण इतरांच्या गरजा पूर्ण करण्याची प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे लोकसंख्या वाढत गेल्यावर समाजात गरजांची मागणी वाढत गेली तरीही गरजांच्या पूर्तीचा पुरवठा पुरेसा होईल याची खात्री नसते. परिणामी समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडते.

म्हणजे स्त्री पुरुष लोकसंख्येचा समतोल बिघडणे; बहुसंख्य जनता अपंग निपजणे; समाजातील वृद्धांची लोकसंख्या तरुणांपेक्षा वाढणे; समाजातील लहान मुलांची संख्या कमावत्या व्यक्तींपेक्षा वाढणे; ही सर्व समाजाचे शारीरिक आरोग्य बिघडल्याची लक्षणे आहेत. कारण यातील प्रत्येक घटितामुळे गरजांची मागणी करणाऱ्यांची संख्या वाढते तर गरजांची पूर्ती करणाऱ्यांची संख्या कमी होत जाते. परिणामी सक्षम लोकसंख्येवरचा ताण वाढतो आणि समाजाचे शारीरिक आरोग्य धोक्यात येते. पुढे जाऊन मानसिक आरोग्यही धोक्यात येण्यास सुरुवात होते.

जननदर नियंत्रित करणे, वृद्धापकाळासाठी पैशाची बचत करण्याची सवय समाजाला लावणे, लोकसंख्येतील स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण सारखे राखणे, सर्व स्त्री पुरुषांना अर्थार्जनासाठी सक्षम बनविणे या उपायांनी शारीरिक अनारोग्याला दुरुस्त करणे शक्य आहे. हे सर्व उपाय दीर्घकालीन आहेत. त्यामुळे ज्या पिढीत अनारोग्याची समस्या जन्माला येईल त्याच पिढीत हे उपाय अमलात आणले तरीही त्यांचा फायदा साधारणपणे तिसऱ्या पिढीत दिसून येतो. आणि यातील काही उपायांचा अतिरेक नवीन समस्यांना जन्म देणारा असतो. उदाहरणार्थ, 'हम दो हमारा एक' च्या उपायाने चीनच्या एका पिढीची समस्या सोडवली असली तरी आता पुढील पिढीसाठी तरुणांपेक्षा दुप्पट वृद्ध ही समस्या तयार केली आहे. याचा अर्थ इतकाच की, समाजशरीरात अनारोग्य कशामुळे निर्माण होते? त्याचे निर्मूलन करून समाजशरीराला पूर्ववत करण्याचे उपाय कोणते? आणि कुठल्या उपायांच्या अतिरेकाने नवीन प्रकारचे अनारोग्य तयार होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली गेली आहेत. ती दीर्घकालीन असली तरी ती परिणामकारक आहेत.

मग प्रश्न उरतो तो समाजमनाच्या अनारोग्याचा.

सर्वसाधारणपणे भारतातील सर्वच पिढ्या "आमच्याकाळी असं नव्हतं" हे वाक्य आपल्या पुढल्या पिढीला ऐकवतात. आणि याचा खरा अर्थ असतो "आमच्याकाळी समाज आजच्याइतका बिघडलेला नव्हता". भारतातील सर्व पिढ्यांची येणाऱ्या काळाबद्दल जर अशीच नकारात्मक भावना असेल तर याचा एकंच अर्थ निघतो की 'भारतीय समाजाचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे', असा किमान भारतीयांचा तरी समज आहे.

असे का होत असावे? नव्या जुन्या पिढीत संघर्ष ही देशकालनिरपेक्ष गोष्ट आहे. असे असताना भारतीय समाज या संघर्षातील विजेत्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना वाट चुकलेले मानण्यात धन्यता का मानत असावा?संपूर्ण जगात सगळ्यात जास्त समाजसुधारक भारतात जन्माला आलेले असूनही प्रत्येक पिढीला गतकालीन समाज वर्तमानकालीन समाजापेक्षा अधिक योग्य का वाटत असावा? समाजसुधारक आहेत, आपण त्यांना वंदन करतो, त्यांच्यामुळे आपले जीवन सुखकर झाले हेही मान्य करतो परंतु "आमच्याकाळी असं नव्हतं" हे पालुपद मात्र आपण सोडत नाही. हे असे का? याचा विचार करताना आपल्याला भारतीय समाजमनाच्या गुंतागुंतीकडे लक्ष द्यावे लागेल.

प्रत्येक समाजात नवनवीन विचारांचे आगमन होत असते. ते जर समाजाच्या आतून असेल तर त्या विचाराला समाजाकडून प्रखर विरोध होतो. विरोधामुळे त्या विचारातील तीव्र टोकाचा भाग गाळून जातो आणि समाजाच्या मानसिक वयाला सहन होईल असा भाग टिकून रहातो. पुढील पिढीला वारसा म्हणून मिळतो. याचाच अर्थ जेव्हा समाजाच्या आतून एखादा विचार जन्माला येतो तेव्हा त्या विचाराची आणि समाजाच्या तत्कालीन धारणांची जी झटापट होते त्यामुळे तो विचार आणि समाजाच्या धारणा दोन्ही एकमेकांना घडवतात. म्हणजे विचार आणि समाज या दोघांची उत्क्रांती होते. वैचारिक उत्क्रांती जैविक उत्क्रांतीप्रमाणे हळूहळू चालणारी गोष्ट असल्याने नवीन विचारांचा टिकण्यासाठीचा संघर्ष दीर्घकालीन असतो आणि विचाराबरोबर उन्नत होत जाण्याचे भाग्य समाजाला लाभते. पाश्चात्य जगातील एकेश्वरवाद, भांडवलशाही, शिक्षणव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता, प्रौढ मतदानावर आधारित लोकशाही या सर्व कल्पनांनी, त्यांच्या उद्गात्यांनी आणि समर्थकांनी आजच्या काळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रखर संघर्ष केला. त्यात कित्येकदा प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचे वर्तन आणि ज्या कल्पनेला ते पाठिंबा देत होते यांत तफावत होती. परंतू सततच्या संघर्षामुळे आपल्या आचार विचारातील विसंगतीवर उपाय शोधणे त्या समाजांना शक्य झाले. हे उपाय म्हणजे त्यांनी स्वतःच्या अपूर्णतेवर मिळवलेला विजय होता. त्यामुळे त्यांना गतकाळापेक्षा वर्तमानकाळाचे प्रेम अधिक असणे स्वाभाविक आहे.

भारतीय समाजाच्या बाबतीत भारताबाहेरून सातत्याने दोन गोष्टींचे आगमन झाले. एक म्हणजे राजे आणि दुसरे म्हणजे नवीन विचार. आणि या दोघांच्या आगमनात एक साम्य होते. प्रत्येक नवीन जेत्याने पराभूतांचे, त्यांच्या संस्कृतीचे पूर्णपणे शिरकाण न करता त्यांना केवळ राज्यकारभारातून बाजूला सारून आपले राज्य वसवले. जसजसे नवनवीन जेते येत गेले तसतसे पूर्वीचे जेते पराभूत होऊन, ज्यांना पूर्वी धूळ चारली त्यांच्या बरोबरीने राहू लागले. त्यामुळे भारतात एकेकाळी जेते असलेले पण नंतर पराभूत झालेले अनेक समूह एकाशेजारी एक नांदू लागले. जी गोष्ट पराभूत समूहांची तीच गोष्ट विचारांची. नवनवीन जेते नवनवीन संकल्पना आणत होते. जेत्याने त्या आणल्यामुळे किमान तत्वतः मान्य करण्याशिवाय भारतीय समाजाला गत्यंतर नव्हते. परंतू व्यवहारात मात्र जुन्या चालीरीतीच चालू राहिल्या.

म्हणजे नवीन विचाराला रुजण्यासाठी भारतीय समाजमनाची आवश्यक ती मशागत झालेली नसताना केवळ राजकीय किंवा आर्थिक सामर्थ्याने अनेक विचारांचे भारतीय समाजात आगमन झाले तेही समाजाबाहेरून. विचार जेत्यांकडून आलेले होते. परिणामी त्या विचाराबरोबरचा संघर्ष हा स्वतःच्या धारणांबरोबरचा संघर्ष न ठरता केवळ आक्रमकांबरोबरच संघर्ष ठरला. आणि त्यात कुणाचाही निर्णायक विजय होण्याआधी नवीन आक्रमक नवीन विचार घेऊन भारतात येत राहिले. आणि प्रत्येक भारतीय पिढीत "आमच्याकाळी असं नव्हतं" ही भावना दृढ होत गेली.

आधुनिक जगात फार क्वचित राजकीय किंवा सैनिकी आक्रमण केले जाते. आता इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी नवनवीन आर्थिक आकृतीबंध हेच प्रभावी हत्यार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’, सारखा उच्च सामाजिक विचार विचार मांडू शकणाऱ्या भारतात दुर्दैवाने स्वतःचे आर्थिक विचार नाहीत. लोकांनी एकत्र का यावे? काय बनवावे? किती बनवावे? कसे वाटावे? याबाबत भारतीयांनी स्वतःचा कुठलाही नवीन विचार मांडलेला नाही. इतकेच काय पण पाश्चात्य देशांतील विचार राबवताना त्यांचे पुरेसे भारतीयीकरण करण्याचे कष्टही घेतलेले नाहीत. त्यामुळे भारतीयांच्या प्रत्येक पिढीत 'पैसा हाच खरा देव असूनही', 'पैसा झाला मोठा' याबद्दल आश्चर्य, दुःख आणि शोक व्यक्त केला जातो.

इंटरनेटमुळे, वाहतुकीच्या जलद साधनांमुळे आणि आर्थिक उदारीकरणामुळे जग आणि भारतीय यातील सीमारेषा पुसल्या जात आहेत. भारतीय समाजात पाश्चात्य समाजातील उन्मुक्तपणाचा संचार होत आहे. पण या उन्मुक्तपणाचे आगमनही भारतीय समाजमनाची पुरेशी मशागत झालेली नसताना भारतीय समाजाबाहेरून होते आहे. त्यामुळे भारतीयांची तरुण पिढी बिघडलेली आहे का? भारतीय तरुण समाजमन उन्मुक्तपणाच्या अनारोग्याने ग्रस्त झाले आहे का? हे प्रश्न कुणाला पडू शकतात. चटकन हे प्रश्न योग्य वाटले तरी मला ते अवास्तव वाटतात. आपण उन्मुक्तपणाच्या या विचारांचे भारतीयीकरण कश्या प्रकारे करू शकू? आपण भारतीय समाजमनाला नवीन विचारांशी संघर्ष करत त्या विचाराबरोबर स्वतःला उत्क्रांत व्हायला कश्या प्रकारे शिकवू शकू? हे प्रश्न माझ्या मताने अधिक महत्वाचे आहेत.

माणसाच्या सर्व शारीरिक आणि मानसिक गरजा योग्य कश्या आहेत ते सांगणाऱ्या आणि त्या गरजांना पूर्ण करण्यासाठी नवनवीन सामाजिक आणि आर्थिक आकृतिबंधांना आकार देणाऱ्या नवनवीन संकल्पनांच्या लाटा जगभरात निर्माण होत राहाणार आहेत. त्या जगभर फिरणार आहेत. मग त्या लाटांना आपण कश्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो? आणि अश्याच लाटा आपण तयार करू शकतो का? हे आपल्या समाजापुढले महत्वाचे प्रश्न आहेत. जर यांचे उत्तर नाही असेल तर आपण समाजमनाच्या मोठ्या अनारोग्याला आमंत्रण देत आहोत.

आपण निर्णय घेतो आहोत, आपण आपल्या मनाचे राजे आहोत ही भावना फार सुखावह असते. या भावनेने परिपूर्ण मन आरोग्यपूर्ण राहते. पण राजा होण्यासाठी तुमचा अधिकार इतरांनी मान्य करावा लागतो. म्हणजे आपल्याला राजा होण्याचा अधिकार कुणी दिला? या प्रश्नाचे उत्तर, राजा होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला द्यावी लागते. सध्याच्या काळात तो अधिकार फक्त जास्तीत जास्त लोकांसाठी उपयोगी पडणाऱ्या समाजालाच मिळतो. त्यामुळे भारतीय समाजमन अनारोग्याने ग्रस्त होऊ नये असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या समाजातील लहानग्यांना, तरुणाईला आणि वृद्धांना; स्त्रियांना आणि पुरुषांना; जगासाठी कायम उपयोगी कसे रहायचे ते शिकवणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.

पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक विवेक (एप्रिल २०१८)

No comments:

Post a Comment