Saturday, October 13, 2018

सारं काही परत येतं (भाग ५)

सिद्धार्थाने जरी श्रमणजीवनाचा त्याग केला असला तरी ज्याप्रमाणे ऐहिक जगाकडे श्रमण तुच्छतेने पाहतात त्याचप्रमाणे जगाचे सत्य स्वरूप जाणून घेण्यासाठी ऐंद्रिय अनुभवांचा रस्ता निवडलेला सिद्धार्थ, नेणिवेत भावनांचे प्राबल्य असलेल्या सामान्य लोकांच्या जीवनाकडे तुच्छतेने पाहात असतो. वैराग्यातून उमललेला तुच्छताभाव मनी बाळगून तो संसारात रममाण होत जातो. प्रचंड पैसा गाठीला जमवतो. वाडेहुडे, नोकरचाकर आणि अमाप रतिसुख मिळवतो. आणि सुखासीन होत जातो.

मातीच्या गोळ्याला आकार देणारे चाक कुंभाराने फिरवल्यावर आधी अतिवेगाने आणि मग हळूहळू कमी होत जाणाऱ्या वेगाने फिरू लागावे तसे त्याच्या हृदयी वसणारे वैराग्यचक्र हळूहळू मंदगतीने फिरू लागते. वठलेल्या झाडाच्या बुंध्यात ओल शिरावी आणि तिने हळूहळू संपूर्ण झाड कुजवून टाकावे त्याप्रमाणे संसार त्याच्यातील ज्ञानपिपासू सिद्धार्थावर ताबा मिळवतो. ज्या सामान्य लोकांचा तो तिरस्कार करत होता त्यांच्यातील सर्व अवगुण आता त्याच्यात घर करतात. आता सिद्धार्थ मांसाशन आणि मद्यपान करू लागतो. जुगार खेळू लागतो. व्यापाऱ्यांची देवी म्हणजे लक्ष्मी आपल्याला तुच्छ आहे हे दाखवण्यासाठी मोठमोठ्या रकमेचा एकेक डाव लावून डाव जिंकू की हरू ही हुरहूर अनुभवण्यात धन्यता मानू लागतो. ती आतुरता आणि अनिश्चितता त्याला आवडू लागते आणि तिचा अनुभव घेण्यासाठी तो पुन्हापुन्हा मोठमोठ्या रकमेचे डाव लावू लागतो. अनेकदा तो स्वतःकडची संपत्ती हरतो आणि अनेकदा तो ती जिंकून आणतो. जुगारातील अनिश्चिततेने मिळणाऱ्या आनंदासाठी मग तो आपल्या दैनंदिन व्यापारात क्रूर होऊ लागतो. भरमसाठ व्याज लावणे, व्याज आणि मुद्दल वसूल करण्यात हयगय न करणे हा त्याचा स्वभाव बनतो आणि दानधर्म, गोरगरिबांची मदत या त्याच्या सवयी नाहीश्या होतात.

आणि एके दिवशी कमलेच्या कुशीत असताना ती सिद्धार्थला गौतम बुद्धाबद्दल विचारते. आणि या विषयाबाबत तत्पूर्वी कधी फार न बोलल्याने सिद्धार्थ तिला गौतम बुद्धाची शांत चर्या, त्याची निर्मल दृष्टी, प्रसन्न स्मित, अक्षुब्ध आणि अचंचल वागणूक या सर्वांबद्दल विस्ताराने सांगतो. ते सर्व ऐकून ‘आपणही कधी गौतम बुद्धाची अनुयायी होऊ आणि हे क्रीडोद्यान त्याला अर्पण करू’ असा निश्चय ती सिद्धार्थला बोलून दाखवते आणि कामक्रीडेतील माधुर्याचा शेवटचा थेंबही निसटू नये अश्या आवेगाने त्याच्याशी रत होते. कामक्रीडेनंतर शांत झोपलेल्या कमलेचे मुख सिद्धार्थ जवळून पाहतो. त्याला त्यावर वृद्धत्वाच्या खुणा दिसून येतात. वासना आणि मरण एकमेकांच्या किती जवळ आहेत याचा त्याला प्रत्यय येतो. आजवर आपण जो मार्ग अंगिकारला तो साकल्याचा नाही हे कमलेला कळले आहे असे तिच्या चर्येवरुन सिद्धार्थला जाणवतं. आणि सिद्धार्थ तिथून निघतो.

मनात उद्भवलेल्या अस्वथतेला विसरण्यासाठी भरपूर मद्यपान करतो.मदिराक्षींना जवळ करतो पण त्याला त्या साऱ्याची शिसारी येते. तो झोपण्याचा प्रयत्न करतो. आणि पहाटेच्या वेळी त्याला जे स्वप्न पडतं त्यामुळे त्याला आपल्यातील काहीतरी मेल्याची जाणीव होते.

तो स्वतःच्या मालकीच्या आम्रवनात जातो. एका झाडाखाली बसतो. आणि आपल्याला यापूर्वी आनंद कधी अनुभवायला मिळाला होता याची उजळणी करू लागतो. बालपणी मंत्र पाठांतरात सवंगड्यांना हरवताना, यज्ञप्रसंगी वडीलधाऱ्यांना मदत करताना त्याने आनंद चाखला होता. आणि ब्राह्मणधर्म सोडून श्रमणमार्ग अनुसरतानाही त्याला ‘पुढे जा. हाच तुझा मार्ग आहे’, याची आनंददायी जाणीव झाली होती. गौतम बुद्धाचा उपदेश ऐकून त्याला आनंदाची जाणीव झाली होती आणि तसे असूनही संघदीक्षा न घेता तिथून निघून जातानाही त्याला त्या प्रस्थानातच स्वतःचा उत्कर्ष दिसला होता. पण आता त्याच्यापुढे कुठलंही ध्येय नव्हतं. त्याचा जीवनमार्ग ओसाड झाला होता.

सामान्य लोकांप्रमाणे सुखाच्या मागे धावूनही त्यांचे जीवितहेतू न अंगिकारल्यामुळे तो सामान्य जीवनात झोकून न देता त्यातील सुखदुःखांचा केवळ साक्षी बनून राहिला होता. ते जीवन त्याचे नव्हते. त्याला सामान्य लोक आणि जीवितहेतू परके होते आणि सामान्य लोकांना तो परका होता. कमला हीच त्याची एकमेव सहचरी होती. पण तिच्याबरोबर खेळत असलेल्या खेळात कितीही आनंद मिळाला तरी त्यात कायमचे मशगूल होऊन राहण्यासारखे काही आहे काय? हा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो. आणि सिद्धार्थचा निश्चय होतो. त्याला बालपणापासूनचे त्याचे सर्व आयुष्य आणि सर्व निर्णय आठवतात. हे सुखासीन नागर जीवन त्यागण्याचा निर्णय पक्का होतो. त्याला कडकडून भूक लागते. पण तो घराकडे न परतता नगरापासून दूर जाऊ लागतो.

सिद्धार्थ नगर सोडून पुढे पुढे जातो. त्याला स्वतःच्या अध:पातामुळे स्वतःची शिसारी येते. आपलं अस्तित्व व्यर्थ आहे. ते वन्य पशूंच्या किंवा दरोडेखोरांच्या हल्यात नष्ट झालं तर चांगलं होईल असे विचार त्याच्या मनात येऊ लागतात. तो नदीजवळ पोहोचतो. तिच्या शेवाळलेल्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतो. वृद्धत्वाकडे झुकलेला आणि सुखासीनतेमुळे आंतरिक तेज हरवून बसलेला चेहरा पाहून त्याला नदीत उडी मारून आत्महत्या करण्याची इच्छा होते. तो स्वतःच्या प्रतिबिंबावर थुंकतो. आणि तो जीव देणार इतक्यात त्याच्या मनात ओंकाराचा ध्वनी होतो. न उच्चारता उमटलेल्या त्या ओंकाराच्या लखलखाटामुळे सिद्धार्थला आपले गतायुष्य दिसते आणि त्याला गाढ झोप लागते. झोपेतून उठतो तो त्याला आपले गतायुष्य फार दूर आहे असे वाटू लागते. कदाचित जुना सिद्धार्थ मरून गेला असून त्याचं नवं रूप जन्माला आलं होतं असं त्याला वाटतं. या नव्या सिद्धार्थातील जुना अहं तोच असला तरी सिद्धार्थ आता बदलला होता. तो जागा झाला होता आणि जिज्ञासूदेखील.

झोपेतून उठल्यावर सिद्धार्थला दिसतं की त्याच्याजवळ एक भिक्षू बसला आहे. तो गोविंद आहे हे सिद्धार्थ लगेच ओळखतो पण गोविंद त्याला ओळखत नाही. नदीकिनारी वन्यजीवांचे भय असताना एक मनुष्य झोपलेला आहे तेव्हा त्याचे रक्षण करण्याच्या भावनेने गोविंद तिथे बसलेला असतो. सिद्धार्थने आपली ओळख दिल्यावर गोविंदाला आनंद होतो. पण ते दोघे आपापल्या रस्त्याने निघून जातात. एक संघनियम पाळून जीवनाचा अर्थ शोधणारा प्रवासी तर दुसरा सर्व नियम तोडून जीवनाचा अर्थ शोधणारा प्रवासी.

सिद्धार्थाला पुन्हा भुकेची जाणीव होते. उपास, प्रतीक्षा आणि चिंतन हे त्याचे गुण देऊन त्याने संपत्ती, विलास आणि इंद्रियसुख इत्यादी नतद्रष्ट गोष्टींचा सौदा केला होता. भलताच मार्ग त्याने चोखाळला होता. त्यामुळे आपण एक सामान्य माणूस आहोत याची त्याला खात्री पटते.

पण आपण बालपणाप्रमाणे पुन्हा एकदा निःसंग होऊन नव्याने सुरवात करत आहोत. आपण पुन्हा परतीच्या वाटेने बालपणीच्या अवस्थेकडे, नव्याने सुरवात करण्याकडे चाललो आहोत याची विलक्षण जाणीव त्याला होते. समोरून वाहणारी नदीदेखील आनंदाने परतीचा प्रवास करीत सागराकडे जात आहे असे त्याला जाणवते. आपण ब्राह्मणधर्म, श्रमणधर्म, ऐन्द्रियसुख, व्यापारउदीम, अविवेक आणि कुबुद्धी या चक्रातून फिरत पुन्हा ओंकार ऐकून आपल्या शैशवाकडे चाललो आहोत याची त्याला अनुभूती होते.

'ऐहिक सुख आणि संपत्ती श्रेयस्कर नाहीत' हे तो लहानपणीच शिकलेला असला तरी त्याची प्रचिती मात्र त्याला त्याक्षणी होते. आता ती गोष्ट केवळ बुद्धिगम्य न राहता भावगम्य आणि इंद्रियगम्य झाली आहे, हेही त्याला जाणवतं. आणि ज्या अहंकारापासून मुक्ती मिळवायचा तो आजन्म प्रयत्न करत होता त्याचे स्वरूप त्याला दिसून येतं. ब्राह्मणधर्मात त्याने पाठांतराचा, कर्मकांडाचा आणि श्रमणधर्मात शरीरक्लेशाचा अतिरेक केला. मूळच्या हुशारीमुळे तो सर्वात अग्रेसर राहिला त्यामुळे त्याच्या आढ्यतेत आणि बुद्धीमत्तेत त्याच्या अहंकाराने घर केलं होतं. त्या हुशारीच्या जोरावरच त्याने ‘ कुणीही गुरु तुला मुक्ती देऊ शकणार नाही’ हा निर्णय घेतला होता. परिणामी त्याला जुगारी, मद्यपी, सुखलोलुप सावकार होणं भाग होतं. जीवनाचा वेडेपणा न भोगता त्याला जीवनाचं स्वरूप कळणं अशक्य होतं.

आपल्या जीवनाचा लंबक इतका एका बाजूला झुकण्याचं कारण आपण बुद्धी आणि तर्काच्या जोरावर त्याला दुसऱ्या बाजूला घेऊन गेलो होतो हे कळल्यावर सिद्धार्थाला स्वतःबद्दल स्वतःच्या परतीच्या प्रवासाबद्दल ममत्व वाटू लागते. आणि ज्या नदीच्या काठी त्याला हा परतीचा प्रवास असा का आहे ते कळतं त्या नदीला सोडून जायचं नाही असा निर्णय तो घेतो.

आता गोष्ट संपणार असं मला वाटू लागलं होतं. आणि आनंद बक्षींनी परदेस चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातील 'जीने का है शौक तो मरने को हो जा तैयार' हे वाक्य मला आठवत होतं. पण मी किती तोकडा विचार करतो ते मला लगेच जाणवलं. कारण, सिद्धार्थ नाहीसा झाला हे कळताच कामस्वामी त्याचा शोध घेऊ लागतो. पण सिद्धार्थ सापडत नाही. सिद्धार्थचे जाणे कमला मात्र लगेच स्वीकारते. तो मुळात अनिकेत श्रमण आहे हे तिने जाणलेले असते. आणि काही दिवसांनी तिला कळते की त्या दोघांच्या शेवटच्या भेटीत तिच्या पोटी सिद्धार्थचा गर्भ राहिला आहे. आता आनंद बक्षींच्या गाण्यातील 'नै होणा था, लेकिन हो गया यार... हो गया है मुझे प्यार' ही वाक्य सिध्दार्थला लागू होतात की काय? तो पुन्हा कमलेकडे जातो की काय? या प्रश्नांनी माझी उत्सुकता वाढवली.

सारं काही परत येतं (भाग ४)

गोविंदला सोडून आणि गौतम बुद्धाचा निरोप घेऊन सिद्धार्थ जैतवनातून निघतो. ज्ञानियांचा गुरु भेटूनही आपण त्याला सोडून का चाललो आहोत? या प्रश्नावर विचार करताना त्याला जाणवतं की ब्राह्मण आणि श्रमण जीवनाचा त्याग करणे, बालमित्र भिक्षूसंघात प्रवेश करत असताना गुरूपदेश नाकारून तिथून निघून जाणे या सर्वामागे एकंच कारण होते. अहम्, त्याचे स्वरूप, त्याची लक्षणे जाणण्याची त्याची इच्छा होती. आणि यज्ञयाग, व्रत वैकल्ये, किंवा इंद्रियदमन यातून त्याला अहम् शी लपंडाव खेळता आला असला तरी ‘मी सिद्धार्थ आहे’ या जाणिवेपासून त्याची कायमस्वरूपी सुटका झालेली नव्हती. म्हणजे अहम् ला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या सिद्धार्थला अजून सिद्धार्थची ओळख पटलेली नव्हती. त्याला जीव शिवाचे ऐक्य असते हा विचार माहीत होता पण त्यातील 'जीव असतो कसा?' याबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे तो ते ऐक्य अनुभवू शकत नव्हता.

आधी विचारांच्या व परंपरांच्या सहाय्याने त्याने जिवाशिवाचे अद्वैत अनुभवायचा प्रयत्न केला होता. ते न साधल्यामुळे त्याने जीवाच्या सर्व ऐंद्रिय इच्छांचे दमन करून जीव नष्टप्राय करून पाहिला होता. परंतु या सर्व झटापटी स्वस्वरूप न ओळखता केल्यामुळेच तो अनिकेत अवस्थेत होता.

इथपर्यंत पोहोचल्यावर मग या अस्थिरतेतून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसतो. स्वतःला अनुभवणे. जगाला अनुभवणे.

सत्य, विचारांच्या मागे किंवा भावनांच्या मागे कुठेतरी आत दडलेले नसून ते सर्वत्र आहे. 'जग माया आहे आणि इंद्रिये योगायोग आहेत असे मानणे' म्हणजे स्वतःची फसगत करून घेणे आहे. जर स्वतःचे सत्य स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर जगणे नाकारून चालणार नाही. सर्व विचार, इच्छा, भावना आणि भौतिक जग म्हणजे स्वस्वरूपाच्या पुस्तकातील विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हांचा तिरस्कार करत पुस्तक वाचणे आणि जीवनाला माया समजून जीवनविन्मुख होणे दोन्ही सारखेच निरुपयोगी आहे.

विचारांच्या या नव्या दिशेमुळे सिद्धार्थ आनंदित होतो आणि त्याचवेळी आपण असंग आहोत. आपल्याला आता कोणीही नातेवाईक, मित्र, श्रद्धा, वेष नाहीत हे जाणवून त्याला अथांग विश्वातील स्वतःच्या एकाकीपणाची जाणीव होते.

जग अनुभवण्यासाठी आता तो पुढे सरसावतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा रंग, गंध, तापमान तो आसुसून अनुभवू लागतो. शिकारी प्राण्यांच्या आणि त्यांच्या भक्ष्यांच्या परस्परविरोधी जीवनेच्छेचा आवेग त्याला जाणवतो. आणि मग थकलेला सिद्धार्थ नदीकिनारी एका नावाड्याच्या खोपटात झोपी जातो. त्याला स्वप्न पडते. स्वप्नात त्याचा बालमित्र गोविंद दिसतो. सिद्धार्थ त्याला एकटा सोडून गेल्यामुळे तो दु:खी आहे असे सिद्धार्थला दिसते. सिद्धार्थ त्याला स्वप्नातच मिठीत घेतो, प्रेमाने त्याचे चुंबन घेतो. आणि त्याला गोविंदाच्या जागी एक स्त्री आहे असे जाणवते. स्वप्नात सिद्धार्थला पहिला स्रीस्पर्श घडतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नगाराकडे जाण्यास निघालेला सिद्धार्थ नावाड्याच्या मदतीने नदी पार करतो. त्यावेळी त्याला नदी फार सुंदर भासते. आणि नावडीही त्याला दुजोरा देतो. 'नदी आपल्याशी बोलते. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असते', असे नावाडी सिद्धार्थला सांगतो.

सिद्धार्थ नगरात जातो. आणि त्याचे लौकिक जीवन सुरु होते. (आतापर्यंत लहान लहान प्रसंगात मोठमोठ्या घटना सांगून गोष्टीला वेग देणारा लेखक आता मात्र गोष्टीचा वेग कमी करतो.) सिद्धार्थचे लौकिक जीवन हेसेंनी मोठ्या बारकाईने रंगवले आहे. नावाड्याला द्यायला पैसे नसलेल्या सिद्धार्थची नगरात पहिली भेट होते नगरवधू असलेल्या कमलेबरोबर. तिच्याकडून प्रेमदीक्षा मिळवतो. तिच्याच ओळखीने नगरातील धनाढ्य व्यापारी असलेल्या कामस्वामींचा भागीदार बनतो. त्याच्या हातात पैसा खेळू लागतो. तरीही त्याच्यासाठी पैसा हे साध्य नसून साधन असते. गोरगरीबांना पैसे देण्यात तो हात कधीही आखडता घेत नाही. त्याच्या बेहिशोबी वागण्यामुळे कामस्वामी गोंधळतो पण सिद्धार्थ लोकांच्या प्रेमादरास पात्र होतो. जीवनाचा आनंद घेत असलेल्या सिद्धार्थला लोकांच्या व्यवहाराची मोठी मौज वाटत असते. त्याच्यासाठी व्यापार, व्यवहार म्हणजे जणू खेळ असतो. इतरांना बेहिशोबी आणि बेभान वाटावे अशा आवेगाने तो हा खेळ खेळत असतो.

सिद्धार्थच्या जीवनातील हा भाग वाचताना कुणीही गुंगून जाईल इतक्या तपशीलाने तो लेखकाने रंगवलेला आहे. पण यातील काही वाक्ये माझ्या मनात घर करून राहिली आहेत.

‘तुला काय येतं?’ या कमलेच्या प्रश्नावर सिद्धार्थ म्हणतो ‘मी वाट पाहू शकतो. मला चिंतन करता येतं आणि मला उपास करता येतो.’

आणि रतिसुखाचा आवेग ओसरल्यावर जेव्हा कमला सिद्धार्थला उद्देशून म्हणते ‘तुमचं कुणावरंच खरं प्रेम नाही’. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, ‘तू ही प्रेम करू शकत नाहीस. करू शकत असतीस तर तुला कलावंतीण होता आलं नसतं. सामान्य माणसं प्रेम करू शकतात हेच त्यांच्या जीवनाचं रहस्य आहे.’

ही वाक्ये वाचनाच्या ओघात जेव्हा येतात तेव्हा वाचकाला दणदणीत धक्के देऊन जागं करतात. मला त्या धक्क्यांमध्ये अजून गोष्ट दिसली की अहम् च्या शोधात जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ अजूनही अहम् चं स्वरूप ओळखू शकलेला नाही; हेच लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे.

सिद्धार्थचं व्यवहाराकडे खेळ म्हणून पाहणं. सामान्य लोकांच्या जीवनेच्छेचं त्याला कौतुक वाटणं, कमलेबरोबर प्रेमरंग खेळताना त्याकडेही खेळ म्हणून पाहणं आणि सामान्यांना प्रेम करता येतं हेच त्यांचं जीवनरहस्य आहे हे कबूल करणं; यातून लेखक आपल्याला एकंच मुद्दा सांगत असतो की अहम् चं स्वरुप जाणून घेण्यासाठी जीवनसन्मुख झालेला सिद्धार्थ कर्माला खेळ समजत असल्याने, 'मी सिध्दार्थ आहे' या भावनेपासून त्याची सुटका न झाल्याने त्याचा प्रवास अजून संपलेला नाही.