Sunday, May 14, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १०)भारतीय उपखंडावर रुजलेल्या “पुनर्जन्म” या संकल्पनेला “कर्मफल” या संकल्पनेबरोबर जोडल्याने इथे सर्व सवर्ण आणि अवर्ण, उच्च आणि हीन जातीय भारतीय आपल्याच गतजन्मीचे गुलाम कसे झाले, हे मागच्या भागात आपण पाहिले. आता या भागात भारतीय समाजाच्या वाटचालीची जगातल्या इतर समाजांच्या वाटचालींशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो.

भौतिक जगात जन्मून अध्यात्मिक जगात मात्र मुक्तीच्या प्रतीक्षेत जणू गर्भातच राहणाऱ्या व्यक्तींचा हा समाज बाह्य जगाचा कुठलाही परिणाम होऊ न देता वर्षानुवर्षे टिकून राहिला असं म्हटलं तरी चालेल. जगभरातून इथे आलेले लोक इथे आपापली संस्कृती रुजवू शकले, टिकवू शकले. ते जिथून आले त्या मूळ भूमीत जरी त्यांची संस्कृती लयाला गेली तरीही या भूमीवर त्यांची संस्कृती टिकून राहण्यास पोषक वातावरण मिळाले. त्यांनी इथल्या विचारपद्धतीवर, राज्यपद्धतीवर, वास्तुकलेवर आपला प्रभाव पाडला पण या भूमीतील पुनर्जन्म आणि कर्मफलांची सांगड तोडण्यास ते असमर्थ ठरले. आक्रमक किंवा शरणार्थी किंवा सुधारक यापैकी कुठल्याही मार्गाने इथे आलेल्या विचारांना शेवटी इथले काही गुणधर्म घेऊन इथेच आपले मूळ स्वरूप बदलून जाताना बघावे लागले.

मोठी लोकसंख्या असलेल्या कुठल्याही एका संस्कृतीचा संपूर्ण निःपात कधी झालाच नाही. फारतर प्रत्येक संस्कृती भारतीय उपखंडाच्या विस्तीर्ण पटावर प्रमुख भूमिकेत आली आणि मग दुसऱ्या संस्कृतीच्या उदयानंतर तिला जागा करून देण्यासाठी त्याच रंगमंचावर कधी रक्तपात करून तर कधी रक्तपाताशिवाय थोडी बाजूला सरून टिकून राहिली.

मला तर कित्येकदा वाटतं मध्यपूर्व आशियातील जेरुसलेम शहराचे विस्तीर्ण रूप म्हणजे भारतीय उपखंड. ज्याप्रमाणे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तीनही प्रमुख धर्मांसाठी जेरुसलेम ही पवित्र भूमी आहे त्याचप्रमाणे भारतीय उपखंड म्हणजे अनेक धर्मांसाठी जन्मभूमी आणि बहुतेक सर्व धर्मांसाठी कर्मभूमी आहे. ज्याप्रमाणे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीय लोक एकाच देवाला भजत असूनही त्याची लक्षणे वेगवेगळी सांगतात, परस्परांचा द्वेष करूनही परस्परांना पूर्णपणे नष्ट न करता गेली किमान सोळाशे वर्षे एकमेकांच्या अनुयायांचे खून पाडत एकत्र राहतात त्याचप्रमाणे भारतीय उपखंडात केवळ तीन नाही तर शेकडो धर्म, पंथ एकमेकांना पूर्णपणे नष्ट न करता, एकाच देवाच्या विविध रूपांना भजत, परस्परांचा द्वेष करत, दोन रक्तपातामधील कालखंडात शांततेने नांदतात.

असे असले तरी व्हॅटिकनने, मक्का मदिनेने आणि जेरुसलेमने जे स्थान जगाच्या इतिहासात मिळवले आहे तसे केंद्रीय स्थान भारतात कुठल्याही एका शहराला मिळाले नाही. इथे ज्योतिर्लिंगे देखील बारा आहेत, त्याशिवाय गावोगावी स्मशानाजवळ शंकराची मंदिरे आहेत ती वेगळीच. साडेतीन शक्तिपीठे आहेत पण ठिकठिकाणी देवीची मंदिरे आहेत आणि नवरात्रीत देवी गावोगावी येते. हव्या त्या दगडाला शेंदूर फासला की त्यातून मारुती किंवा गणपती प्रकट होतो. गंगा पवित्र आहे, पापनाशिनी आहे. पण तितकीच पवित्र आणि पापनाशिनी गोदावरी देखील आहे. शिवाय मंत्र म्हणून विश्वास ठेवला की कमंडलू, तांब्यातील पाणी देखील गंगेचे पाणी बनू शकते. काशी पवित्र आहे तर दक्षिण काशी देखील उपलब्ध आहे. पर्वत महम्मदाकडे आला नाही तर महम्मद पर्वताकडे जातो हा नियम भारतीय भूमीत कधी लागू झालाच नाही. इथे पर्वत महम्मदाकडे आला नाही तर भारतीय महम्मद जवळपासच्या टेकडी किंवा उंचवट्यालाच पर्वत समजून स्वतःचे समाधान करून घेतात. आणि स्वतःच्या वर्तनाला महान भारतीय संस्कृतीशी जोडून घेतात.

काळाच्या विस्तीर्ण पटाला माझ्या सामान्य दृष्टीने बघणे आणि त्याहून सामान्य अश्या शब्दसामर्थ्याने पकडणे म्हणजे मोठे धाडस आहे. पण तारखांच्या तपशीलात न अडकता महान भारतीय संस्कृतीच्या वाटचालीतील महत्वाच्या टप्प्यांची त्याचवेळी जगात इतरत्र होत असलेल्या विविध उलथापालथींबरोबर तुलना करण्याचा छोटा प्रयत्न आता करतो. इंग्रज आमदनीत भारतातून निर्गमन करून बाहेर गेलेल्या सर्वांना हे दिसले असेल असा माझा दावा नाही पण त्यातील कित्येक संवेदनशील लोकांना केवळ भारतीय संस्कृती एकटीच महान किंवा सर्वश्रेष्ठ हा विचार किती तोकडा आहे हे जाणवले असेल याची मला खात्री आहे.

महाभारताच्या निश्चित काळाबद्दल अनेक मतभेद आहेत. महाभारत युद्धाच्या तारखेविषयी इसवीसनापूर्वी ३,००० वर्षे ते इसवीसनापूर्वी ८०० वर्षे इतकी वेगवेगळी मते आहेत. रामायण त्यापूर्वीचे असावे अशी मान्यता आहे. रामायण महाभारताचा निश्चित कालखंड सांगता नसला तरी इजिप्तमध्ये पहिले पिरॅमिड इसवीसनाच्या २८०० वर्षे आधी बांधून पूर्ण व्हायला सुरवात झाली होती. रामायणातील पुष्पक विमान, संजीवनी विद्या आणि महाभारतातील एका गर्भाचे शंभर तुकडे करून त्यातून शंभर जन्माला घालण्याची क्रिया किंवा युद्धातील अग्न्यास्त्र, पर्जन्यास्त्र, ब्रह्मास्त्र यांचे मौखिक सोडल्यास कुठलेही पुरावे आपल्या टिकून राहिलेल्या संस्कृतीकडे नाहीत. पण विलयाला गेलेल्या ईजिप्शियन संस्कृतीची साक्ष द्यायला तिथले पिरॅमिड मात्र अजून टिकून आहेत.रामायण महाभारताचा इतिहास अतिप्राचीन म्हणून बाजूला ठेवला तरी ख्रिस्तजन्माच्या आसपास आणि त्यानंतर भारतीय उपखंड आणि जगातील समाजजीवन कसे बदलत गेले ते बघितले तर अचंबित व्हायला होते.

भारतात महावीर आणि बुद्धाचे विचार जेव्हा प्रचंड मोठे सामाजिक अभिसरण करत होते तेव्हा युरोप अंधारात चाचपडत होता. अमेरिकेचा जन्म व्हायचा बाकी होता. बुद्ध विचारांचा पाडाव करीत चंद्रगुप्त मौर्य भारतावर आपले साम्राज्य प्रस्थापित करत होता तेव्हा युरोप रोमन साम्राज्याचा भाग होता. पुढे चंद्रगुप्ताचा नातू अशोकाने बुद्धाच्या धम्माविचारांना राजाश्रय दिला आणि बुद्धविचारांची पताका दक्षिण आशियात फडकावली. त्यानंतर सुमारे दोनशे वर्षात रोमन साम्राज्याने ख्रिस्ताचा धर्म आपलासा केला आणि रोमन कॅथॉलिक चर्चची स्थापना केली. भारतात सम्राट अशोकाचे साम्राज्य शतखंड होत गेले आणि विविध ठिकाणी छोटी छोटी राज्ये पुन्हा आपापल्या पूर्वजांच्या सोयीच्या प्रथा मानू लागली. प्रत्येकाचा राजा वेगळा, राजाचा राजगुरू वेगळा, आणि राजाचा कुलदेवदेखील वेगळा. युरोपात देखील त्या वेळी छोटी छोटी राज्ये मूळ धरू लागली होती. रोमन साम्राज्य कोसळले होते पण रोमन कॅथॉलिक चर्च मात्र सर्व राजांवर राज्य करत होते. राजसत्तेने अंगिकारलेला धर्म आता राजसत्तेपेक्षा मोठा होऊन स्वतःची सत्ता गाजवू लागला होता.

जेव्हा पश्चिम आशियात प्रेषित मुहम्मदाला अल्लाहने दृष्टांत द्यायला सुरवात केली, सर्वशक्तिमान देव आणि त्या देवाने निर्माण केलेल्या सृष्टीतील त्याचे मूढ निर्बल भक्त अशी सरळ सरळ द्वैतवादाची मांडणी करून दिली त्याच्या एक शतक अलीकडे भारतात आदी शंकराचार्यांनी ब्रह्म सत्य जगन्मिथ्या चा सिद्धांत मांडत आपल्या अद्वैतवादाने भारतीय भूखंडावरील पुनर्जन्म आणि मुक्तीच्या स्वकेंद्री वर्तुळात फिरणाऱ्या व्यक्तींना स्वमग्न होण्यासाठी अजून एक सबळ कारण दिले होते. इथे भारतीय समाज आपापल्या प्रदेशात आपापल्या प्रथा परंपरा सांभाळत होता. प्रबळ केंद्रीय राजसत्ता नव्हती आणि प्रबळ केंद्रीय धर्मसत्ता देखील नव्हती. अजिंठा वेरूळची लेणी पूर्ण होत आली होती. बुद्ध, ब्राह्मणी आणि जैन स्थापत्याचा आविष्कार एका शेजारी एक तयार होत होता.

यानंतर मात्र युरोप भारतीय उपखंडापेक्षा फार वेगाने पुढे निघून गेला. इथे ज्ञानोबा माउलींच्या मौजीबंधनाचा प्रश्न सोडवण्यात इथली मंडळी अयशस्वी ठरत असताना ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विश्वविद्यालयांची स्थापना झालेली होती. भारतात छोटे छोटे राज्यकर्ते एकमेकांवर चढाया करण्यात, त्यानंतर इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात, आपल्या विजयाच्या कहाण्या रचण्यात, आणि राजा म्हणजे विष्णूचा प्रतिनिधी असतो हे जनतेवर बिंबवण्यात गर्क होती तर ब्रिटनमध्ये मॅग्ना कार्टावर सही करून राजाने आपले अधिकार कमी करून घेण्यास सुरवात केली होती. जेव्हा भारतात छोटेमोठे राजे आपापल्या विजयाची आठवण म्हणून नवनवीन कालगणना सुरु करण्यात खूष होत होते तेव्हा युरोपने ग्रेगोरियन कॅलेंडर आपलेसे करून कालगणनेत एकवाक्यता आणली होती. युरोपात राजा आपले अधिकार बदलून घेण्यास तयार असल्याने त्याची सत्ता अबाधित राहात होती. इतिहासाचे वार्तांकन होत होते. भारतात मात्र राजे आपापले अधिकार वाढवून घेण्याच्या प्रयत्नात असल्याने सततचे सत्तापालट होत होते. परिणामी इतिहासाचे वार्तांकन होण्याऐवजी पुनर्लेखन होत होते.

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या किमान एक शतक आधी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि त्याच्याही आधी रक्ताचे नातलग नसलेल्या लोकांना एकत्र आणून त्यांच्याकडून मोठमोठी कामे करून घेण्यासाठी व्यवस्था आणि तत्वज्ञान तयार करण्यात युरोपीय देश यशस्वी झाले होते. व्यवस्थेचे नाव होते ‘कंपनी नावाची अमर कृत्रिम व्यक्ती’ तर तत्वज्ञान होते ‘स्वार्थ आणि नफा’. ज्याप्रमाणे जीवनातील अनाकलनीय कलाटणींना समजावण्यासाठी पुनर्जन्माचे तत्वज्ञान उपयुक्त होते, सगळ्यांना समजू शकेल इतके सोपे होते त्याप्रमाणे स्वार्थ आणि नफ्याचे तत्वज्ञान नैसर्गिक प्रेरणांवर आधारित असल्याने सगळ्यांना समजणे अतिशय सोपे होते. त्याहून मुख्य म्हणजे ते व्यक्तींना कार्यप्रवण करणारे आणि समाजात शिस्तीने राहण्यास उद्युक्त करणारे होते.

रोमन साम्राज्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या संघटीत असलेला युरोप त्याच साम्राज्याच्या राजाने स्वीकारलेल्या ख्रिस्ती धर्माने सुसंघटित होत गेला. आणि शेवटी धर्मसत्ता राजसत्तेपेक्षा प्रबळ होत गेली. प्रेषित मुहम्मदाने तर धर्मसत्ता आणि राजसत्तेचे एकत्रीकरण करून खलिफाला अनिर्बंध अधिकार दिले. परंतू भारतात मात्र अनेक धर्मांना राजाश्रय मिळूनही हे धर्म राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या संपूर्ण भारतीय उपखंडाला एकत्रित करू शकले नाहीत. कदाचित जैन विचारामागील अनेकांतवादाचे तत्वज्ञान त्याला ठाम राजकीय भूमिका घेण्यास आडकाठी करत असावे. तसेच बुद्ध विचारांनी तृष्णेला सर्व दुःखांचे मूळ मानल्याने ते पुन्हा मुक्तीच्या कल्पनेला प्राधान्य देणारे परिणामी येथील लोकांच्या, मुक्तीच्या प्रतीक्षेत गर्भकोशात राहण्याच्या स्वभावाला पोषक ठरले असावे. पुढे जैन विचार राजकारणातून बाहेर फेकला गेला आणि बुद्धाच्या धम्माचे देखील भारतीय राजकारण आणि समाजकारणातून उच्चाटन झाले.

पुढे रेनेसाँस किंवा पुनर्निमाणाच्या काळात युरोपने धर्म आणि राजसत्ता दोघांना नमविले. हळूहळू तिथे लोकशाही आणि विज्ञानवादी दृष्टिकोन मूळ धरत गेला. याचा अर्थ असा नव्हे की युरोपने स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तीन तत्वांसाठी एकाच वेळी लढा देऊन त्या तिघांना प्रत्यक्षात आणले. ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने या तीन तत्वांचा उद्घोष केला तिने स्वातंत्र्यासाठी समतेचा बळी दिला तर अमेरिकेन राज्यक्रांतीने स्वातंत्र्यास प्रथम, प्रत्येक राज्याचे वेगळे अस्तित्व मान्य करून बंधुत्वास द्वितीय तर गुलामगिरी ठेवून समतेस तृतीय स्थान दिले. याउलट रशियन राज्यक्रांतीने समतेसाठी स्वातंत्र्याच्या बळी दिला. जेव्हा पाश्च्यात्य देश स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाला आपापल्या सोयीप्रमाणे हळूहळू प्राधान्य देत होते त्याचवेळी त्यांचा वसाहतवाद जगभर पसरत होता. हे एकरेषीय धर्म आणि एकरेषीय राजसत्ता असलेले, इतिहासाच्या वार्तांकनाची वेगळी पद्धत असलेले, लोकांना एकत्र आणण्यासाठी स्वार्थाचे नैसर्गिक तत्वज्ञान आणि कंपनी नावाची अमूर्त अमर व्यक्ती वापरणारे युरोपीय जेव्हा भारतीय उपखंडाच्या संस्कृतीसरोवरात आले तेव्हा त्यांचे आगमन या भूभागासाठी अपूर्व होते.

त्यांच्या धर्मातील तत्त्वविचार आणि धारणा इथल्या धार्मिक तत्वज्ञानापेक्षा सरस नव्हते. पण त्यांनी कंपनी नामक अमर व्यक्ती कल्पून नफा आणि स्वार्थ आधारित जी नवी एककेंद्री समाज व्यवस्था तयार केली होती ती अमर आत्मा, पुनर्जन्म आणि कर्मफल या खांबांवर उभ्या असलेल्या विकेंद्रित भारतीय समाजव्यवस्थेपेक्षा नक्कीच वरचढ होती.