Sunday, March 19, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता?

परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.
प्राचीन वैभवशाली संस्कृतीच्या आता अस्ताला गेलेल्या समाजव्यवस्थेच्या दारावर जेव्हा अर्थाधारित आणि नफाकेंद्रित नवी व्यवस्था धडका देऊ लागली तेव्हा व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावर भारतीय कश्या प्रकारे प्रतिक्रिया देत होते? प्राचीन व्यवस्थेत अडकलेला आणि अस्ताव्यस्त पसरलेला भारतीय समाज मूठभर परकीयांच्या या आगमनाला, त्यांच्या बरोबर आलेल्या नव्या विचारांना कश्या प्रकारे सामोरा गेला? खेड्यात विखुरलेल्या समाजात शहरीकरणाचे आगमन आणि गृहोद्योग, कुटिरोद्योग व मनुष्यबळ वापरून उत्पादन करणाऱ्या शेतीकेंद्रित समाजात यंत्रशक्ती आणि औद्योगिकरणाचे आगमन झाल्यावर त्यांची पाळेमुळे कशी हादरली या सर्वांचे चित्रीकरण करणारे जे साहित्य कन्नड नवसाहित्यात लिहिले गेले त्याला प्रो अशोक “आगमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.

व्यापारमिषाने येऊन अंतिमतः राज्यकर्ते बनलेल्या पाश्चात्यांची राजवट स्थिरावल्यानंतर भारतीय समाजात एक नवीन बदल झाला. यापूर्वी भारतीय लोक परदेशगमन करत होते, पण ते केवळ व्यापारासाठी. जाणारे लोक पैसे कमवायला जात होते किंवा आपली व्यवस्था बाहेर कशी वापरायची ते शिकायला जात होते. आता मात्र भारतीय तरुण परकीय व्यवस्था शिकायला बाहेर चालले होते. त्यांची शास्त्रे, त्यांचे नियम, त्यांचे विचारव्यूह आत्मसात करायला चालले होते. ती व्यवस्था शिकून तिथेच स्थायिक व्हायचे की परत यायचे याबाबत त्यांच्या डोक्यात कुठलाही स्पष्ट विचार असणे कठीण होते.

परकीयांच्या भारतात आगमनापेक्षा, भारतीयांचे बहिर्गमन होताना अगदी उलटी स्थिती होती. आगमनाच्या वेळी, येणारे कुरघोडी करायला आले होते आणि त्यांच्या समोर होता आत्ममग्न निद्रिस्त समाज. तर परदेशगमनाच्या वेळी, बहिर्गमन करणारे शिकायला चालले होते. आणि त्यांच्यासमोर होता आपल्या विश्वविजयाने धुंद झालेला, धर्मबंधने झुगारून देणारा पण भांडवलाधारीत शोषण करणारा, वंशवादी आणि रंगभेद करणारा बलशाली समाज.
त्या परदेशगमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात पाश्चात्य संस्कृती बघून कोणते विचार आले असतील? पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घेताना त्यांना कुठला आणि कसा त्रास झाला असेल? पाश्चात्य संस्कृतीतील मोकळेपणा पाहून त्यांच्या मनात स्वसंस्कृतीविषयक अभिमान किंवा तिरस्कार यापैकी कोणते विचार आले असतील? पाश्चात्य संस्कृतीने रंगभेद करून त्यांना दिलेली दुय्यम वागणूक सहन करताना त्यांना काय वाटले असेल? जर ते मायदेशी उच्चवर्णीय असतील तर आपल्या पूर्वजांनी मायदेशात इतरांवर केलेल्या अत्याचाराची जाणीव होऊन त्यांचे भावविश्व हादरले असेल का? किंवा जर ते मायदेशी कनिष्ठवर्णाचे असतील तर दुय्यमतेची हेटाळणी पाहून त्यांच्या मूळच्या जखमी मनाला अजून डागण्या पडल्या असतील की त्यांचे मन अजून निबर झाले असेल? आणि स्वकीयांपासून दूर, दुय्यम नागरिक म्हणून जगत असताना, विद्याभ्यास करत असताना त्यांनी शारीर इच्छापूर्तीसाठी सुखाच्या आडवाटा कश्या शोधल्या असतील याचे चित्रीकरण करणाऱ्या साहित्य प्रवाहाला प्रो अशोक “निर्गमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.

सगळ्यात शेवटी भारतीय समाजात अजून एक बदल घडून आला. बहिर्गमन किंवा किंवा निर्गमन झालेल्या अनेकांनी इथल्या संस्कृतीला कायमचा रामराम ठोकला आणि ते परदेशी स्थायिक झाले. पण परदेशी संस्कृतीत रुळू न शकणारेही काही भारतीय होते. परदेशी मिळणारी दुय्यम वागणूक; स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांचा उद्घोष करून जगभर वसाहतवाद लादणाऱ्या पाश्चात्यांचा दुटप्पीपणा; पाश्चात्य संस्कृतीत व्यक्तीच्या जीवनात जाणवत असलेली पोकळी; दोन महायुद्धानंतर भांडवलशाहीने घातलेली समाजाची घडी किती तकलादू होती याची झालेली जाणीव; महायुद्धांनी उजेडात आणलेली मानवी क्रौर्य आणि वंशवादाची परिसीमा, औद्योगिकीकरणामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास; भांडवलशाहीचा शोषणकारी भीषण चेहरा; कम्युनिझमची समतेची हाक पण त्यानंतर कम्युनिझमच्या नावे होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढा यासारख्या गोष्टींनी भारतात परतण्याच्या त्यांच्या विचारांना बळ दिले. तर काहींना महायुद्धकाळात जन्मलेल्या रेड क्रॉस सारख्या सेवाभावी संस्था, मिशनरी लोकांनी जगभर चालवलेले कार्य बघून मातृभूमीच्या उत्कर्षासाठी स्वतः कटिबद्ध व्हावेसे वाटले असावे.

भारत बदलून टाकू अश्या आशावादाने भारलेले किंवा पाश्चिमात्य संस्कृतीने भ्रमनिरास होऊन निराश झालेले असे हे दोन प्रकारचे परदेशस्थ भारतीय जेव्हा भारतात परतले असतील तेव्हा त्यांची मनस्थिती कशी असेल?

भारतात सगळेच बदलायचे असे ध्येय उरी बाळगून जर ते आपल्या जन्मगावी परतले असतील तर आपल्या ध्येयसिद्धीसाठी कार्याला सुरुवात करावी कुठून?; अंतर्बाहय दैववादी असलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवायचे कसे? एकाच श्वासात अद्वैताचे तत्वज्ञान आणि जातीभेदाचे समर्थन करून शांत राहणाऱ्या या स्थितीशील समाजाला गतीशील बनवायचे कसे?
परदेशातून परत आलोय म्हणून फुकट मिळणारा मानमरातब घेत शोषणासाठी तयार असलेल्यांच्या उरावर बसायचे की त्यांचे शिव्याशाप झेलत त्यांना त्यांच्या माणूसपणाची जाणीव करून द्यायची? राष्ट्रवादाचे तत्वज्ञान वापरून पाश्चात्य राष्ट्रांनी महायुद्धांचा जो जीवघेणा खेळ खेळत करोडोंच्या रक्ताने स्वतःची आणि इतरांची भूमी रंगवली, तो रक्तरंजित मार्ग न वापरता या प्राचीन संस्कृतीला पुन्हा उर्जितावस्थेला कसे न्यायचे? प्रगतीची व्याख्या काय करायची? सुखाची व्याख्या काय करायची? आभाळंच फाटलंय तर ठिगळं किती आणि कुठे लावायची? सगळ्या जुन्याला मोडून नव्याची निर्मिती करायची का जुन्यातूनंच नव्याची निर्मिती करायची? जुन्यातील काय टाकावे आणि काय ठेवावे?, हे ठरवायचे कसे?; जे टाकायचे ठरवले ते का टाकायचे हे इतरांना समजावयाचे कसे? भावनाशून्य शल्यविशारद होऊन या जुन्या समाजाची शस्त्रक्रिया करायची की भावनिक गुंतवणूक वाढवत या समाजाला हळू हळू बदलत राहायचे? घरच्यांच्या आणि स्वतःच्या कोमल भावना जपायच्या की त्यांच्यावर निखारा ठेवायचा? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैववादाने भौतिक आयुष्याच्याबाबतीत निराशावादी झालेल्यांना समजावताना परदेशवास्तव्यातील चटके खाऊन भ्रमनिरास पावलेल्यांपासून वाचवावे कसे? या सर्व प्रश्नांचे चित्रीकरण करणाऱ्या साहित्य प्रवाहाला प्रो. अशोक “पुनरागमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.

प्रो अशोक यांच्या मते पुनरागमन प्रवाहातील लेखनात लेखकांसमोर महात्मा गांधींचे जीवन होते. खरं तर त्यांच्या या एकाच संदर्भाने वर लिहिलेले सर्व विचार माझ्या डोक्यात आले. पण डोकं जरी माझं असलं तरी त्यात येणारे विचार आणि त्यामुळे सुरु राहणारी विचार प्रक्रिया मात्र पूर्णपणे माझ्या नियंत्रणात नसते. त्यामुळे वर लिहिलेले विचार करून डोक्यातील विचारचक्र थांबले नाही. पुढे जातंच राहिले. हा भाग लांबल्यामुळे ते सगळे विचार पुढच्या काही भागात टाकतो.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ४)


माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गारूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एकमात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या. पण एकाच वेळी इतिहास आणि वर्तमान, व्यक्ती आणि समग्र समाज, भावना आणि तत्त्वविचार, पुराण आणि विज्ञान, लैंगिकता आणि अध्यात्मिकता; या सगळ्यांना कवेत घेण्याची कन्नड कादंबऱ्यांची क्षमता मी वाचलेल्या मराठी कादंबऱ्यांपेक्षा जास्त आहे असे मला वाटते.

माझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.

चंपूकाव्य परंपरा सोडून कन्नड साहित्याने नवता धारण करताना जी सफाई दाखवली आहे तितक्या सफाईने मराठीला संत, पंत आणि तंतसाहित्याचा प्रभाव मोडून काढणे शक्य झालेले नाही. त्याशिवाय कन्नड साहित्यिक जितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेतात तितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेताना मला मराठी साहित्यिक दिसत नाहीत. आणि या ठळक भूमिकेच्या अभावाने तिचा आग्रह धरणे किंवा पाठपुरावा करणे दूरच राहते.

मराठी साहित्याच्या तुलनेत कन्नड साहित्याचे आणि त्याला मिळालेल्या लोकाश्रयाचे मला जाणवलेले हे गुणविशेष डोक्यात असताना, प्रो टी पी अशोक यांनी भारतीपूरसाठी लिहिलेली प्रस्तावना वाचली. ती वाचताना, 'प्रोफेसर' ही उपाधी मिळवण्यासाठी विचारांची स्पष्टता किती असावी आणि ते सहजपणे मांडण्याची हातोटी कशी असावी याचा वस्तुपाठच मिळाला. कन्नड साहित्यातील नव्य किंवा नव्योदय चळवळीबाबत लिहिताना प्रो अशोक यांनी “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” हे सूत्र मांडले आहे. प्रो. अशोकांच्या मते कन्नड साहित्यातील नव्योदयाच्या प्रवाहात तीन वेगवेगळे प्रवाह एकामागून एक येताना दिसतात. त्यांना ते अनुक्रमे “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” म्हणतात. या तिन्ही संज्ञांबाबत प्रो. अशोकांनी अगदी थोडक्यात विवेचन केले आहे पण ते वाचून माझ्या मनात जे विचार आले ते आता लिहितो.

Thursday, March 16, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)


भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एवढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात. हे वाचताना मला शनी शिंगणापूरच्या घरांना दारे/ कुलुपे नसतात हे अर्धसत्य आणि तिथे चोऱ्या होत नाहीत ही समजूत आठवत होती.

इतके असूनही तीर्थस्थळी असते तसे गावभर घाणीचे साम्राज्य असते. सगळीकडे यात्रेकरूंच्या मलमूत्राचा वास भरून राहिलेला असतो. शिवमोग्याहून गावी येणाऱ्या बसमधून यात्रेकरू उतरले की गावातल्या ब्राह्मणांची त्यांना आपल्या घरी जेवण, स्नान आणि पूजेसाठी घेऊन जाण्याची लगबग चालू असते. हे वाचताना मला महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, माहूर आणि आंध्र प्रदेशातील राघवेंद्र स्वामींचे मंत्रालयम इथली परिस्थिती आठवत होती.

देवावर विश्वास नसलेल्या जगन्नाथने विश्वस्तपद नाकारल्याने ते प्रभूंकडे जाते. त्यांनी पूर्ण गावाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेतलेल्या असतात. मंजुनाथाच्या नावे चालणारी गावची एकुलती एक राईस मिल, एकुलती एक बस सेवा आणि वाणसामानाचे भलेमोठे दुकान त्यांच्याच मालकीचे असते.

पूर्ण गाव आपापल्या जातीच्या परिघात मंजुनाथ आणि भूतरायाच्या भोवती फिरत असते. त्याला गती देत असतो देशभरातून येणाऱ्या भाविकांचा ओघ आणि त्याला आधार असतो तो भूतरायाच्या जागृतपणाचा. जगन्नाथच्या शब्दात, भारतीपूरची संपूर्ण जनता म्हणजे मंजुनाथ आणि भूतरायाच्या उदरातंच जन्म घेऊन तिथेच जीवन संपवणारे लाखो गर्भ. त्यांनी प्रत्यक्ष जगात जन्म घेतलाच नाही. ते उदरातंच जन्मले आणि भूतरायाच्या नियमांनी बांधले जाऊन तिथेच त्यांनी जीवन संपविले. बाह्य जगाचे आयुष्य त्यांना स्पर्शदेखील करत नाही. आणि त्यांना त्याची जाणीवदेखील नसल्याने त्याचा खेद किंवा खंत काहीही नाही.

जुन्या जगात जन्माला आलेला जगन्नाथ, शिक्षणासाठी परदेशी जातो. तिथून आपल्या जडणघडणीतील अनुभवांची कमतरता जाणवून ती पूर्ण करण्यासाठी जन्मगावी परततो. आणि जीवन समग्रपणे जाणून घेण्यासाठी त्याला भिडायचे ठरवतो. त्यासाठी तो शूद्रांचा मंदिर प्रवेश करवून आणण्याचे ठरवतो. त्याच्या निर्णयामुळे त्याच्या घरात, गावात, ज्यांनी मंदिरप्रवेश करायचा आहे त्या शूद्रांच्या आयुष्यात आणि इतर समाजघटकांच्या आयुष्यात कुठली वादळे तयार होतात? राजकारणी लोक या सगळ्यावर कशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात? पोलीस कशी बोटचेपी भूमिका घेतात? मंदिर प्रवेशामुळे आर्थिक गाडा मोडू नये म्हणून कोण काय प्रयत्न करतात? स्वतःच्या जन्माबद्दल आलेल्या निनावी पत्रामुळे जगन्नाथाच्या मनात कोणते आणि कसे विचार येतात? आणि शेवटी काय होते? या सगळ्या प्रश्नांना अनंतमूर्तींनी फार कुशलतेने हाताळलेले आहे आणि त्याचा अनुवादही तितकाच अजोड झाला आहे.

पूर्ण कादंबरी वाचताना मला तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर, हाजी अली आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी स्त्रियांच्या मंदिरप्रवेशासाठी केलेल्या आंदोलनांची आणि त्यावेळी घडलेल्या विविध घटनांची आठवण येत होती. एखाद्या घटनेला मांडत असताना तिची स्थल काल आणि समाज निरपेक्षता मांडता आली, त्यातून समग्र जीवनाचे नित्य नूतन तरीही चिरंतन अशा नीतीमूल्यांचे दर्शन घडवता आले तरच तिला लेखकाची सर्वोच्च प्रतिभा म्हणत असावेत आणि भारतीपुरमध्ये अनंतमूर्तींनी मंदिरप्रवेश ह्या घटनेला वापरून भारतीय मनोवृत्तीचे जे प्रत्ययकारी चित्रण केले आहे ते पाहून, वाचकाला एकाच वेळी अतीव आनंद, दुःख, क्रोध, निराशा इत्यादी भावनांचा विस्मयचकित करणारा अनुभव येतो.

पण या लेखमालेचे उद्दिष्ट भारतीपूरबद्दल बोलणे नसून प्रो. टी पी अशोक यांनी लिहिलेल्या तिच्या प्रस्तावनेबद्दल बोलणे आहे. प्रस्तावनेत मांडलेला विचार समजण्यासाठी भारतीपूरची पार्श्वभूमी माहिती असेल तर सोपे जाईल, म्हणून नमनाला हे तीन भागांचे घडाभर तेल वाहिले आहे. आता पुढल्या भागात त्या प्रस्तावनेबाबत लिहितो.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)सधन ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील एकुलता एक मुलगा परदेशी शिक्षणासाठी जातो. त्याचे नाव जगन्नाथ. तिथे एका भारतीय वंशाच्या आंग्ल युवतीबरोबर लग्न न करता राहतो. मद्यपान आणि मांसाशन करतो. क्रांतीच्या गप्पा मारतो. पण तो सगळ्यांशी जुळवून घेत खोटे खोटे जगतो असे त्याला कायम जाणवत असते. ई एम फॉर्स्टर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाच्या विचारांचा तो अभ्यास करत असतो. पण वर्गकलह आणि दांभिकपणा या फॉर्स्टरच्या लेखनविषयाबाबत तो स्वतःची म्हणता येतील अशी स्वतंत्र मतेदेखील तयार करू शकत नसतो. त्या मागचे कारण म्हणजे आपण आयुष्याला सर्वांगाने जाणत नाही, केवळ पुस्तकांतून ओळखतो, हेच असावे असे त्याला वाटते.

‘केवळ हमरस्त्याने जाणाऱ्याला जंगलातल्या आडवाटा, चोरवाटा माहीत नसतात त्यामुळे त्याला सगळे जंगल समजत नाही’ याची त्याला जाणीव झालेली असते. एके दिवशी त्याची प्रेयसीदेखील त्याच्या स्वभावातील खोट्या मनमिळावूपणाबद्दल त्याला सांगते, आणि आपल्या व्यक्तिमत्वाला टोकदारपणा नाही हे त्याचे दुःख अजूनंच तीव्र होते. शेवटी स्वतःच्या स्वभावातील दुबळेपणा मोडून काढण्यासाठी आणि जीवनाला समग्रपणे भिडण्यासाठी भारतात आपल्या जन्मगावी परत येतो.

त्याच्या गावाचे नाव भारतीपूर. आईचे शिर धडावेगळे केल्यावर तुंगा नदीच्या पाण्यात परशुरामाने जिथे परशू धुवून आपले पापक्षालन केले त्या तीर्थहळ्ळीजवळ अनंतमूर्तींनी भारतीपूर वसवले आहे. परशुरामानेच गावात मंजुनाथाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे असा विश्वास असतो. या मंदिराला जगन्नाथाचे पूर्वज विश्वस्त होते. मंजुनाथाच्या देवळातील अख्ख्या गावाला ऐकू जाईल अशी घंटा त्यांनीच दिलेली असते. त्याशिवाय, जगन्नाथाच्या लहानपणी तो मृत्युशय्येवर असताना, मंजुनाथाला सोन्याचा किरीट देण्याचा नवस बोलून त्याच्या आईने त्याचे प्राण वाचवलेले असतात. आणि मग तो नवस फेडलेला देखील असतो.

गावात असते; जगन्नाथची पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रचंड मोठी केळीची आणि पोफळीची बाग. त्याच्या बागेत असतात काम करणारे असंख्य शूद्र आणि त्यापैकी एका शूद्राची नजरेत भरणारी,अंगचटीला येणारी धीट मुलगी, कावेरी. प्रचंड मोठ्या घरात असते त्याची सकेशी विधवा काकू, चिक्की. इस्टेटीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेला बेरकी कारकून, शानभोग शास्त्री.

त्याशिवाय गावात असतात; सदैव चुलीच्या धुराने भरलेल्या घरात राहणारे, वैतागलेली बायको, लग्न न झालेली कमवती मुलगी आणि बेरोजगार मुलगा असा संसार ओढत खादी भांडार चालवणारे ध्येयवादी आणि गांधीवादी कुटुंब मार्गदर्शक, श्रीपतीराय. विधवा असूनही गरोदर राहिलेल्या बहिणीला दारात ठेवून घेणारे आणि दोन लग्ने करून असंख्य मुलांना जन्म देऊन देवावर भरोसा ठेवून स्वस्थ असणारे, पायावर चक्र असल्यासारखे भारतभर भ्रमंती करणारे त्याचे धार्मिक मार्गदर्शक, सुबराय अडिग. गावाबाहेर स्वतःच्या विश्वात रमणारे, केवळ रेडिओ वापरून जगाशी संपर्क टिकवून ठेवलेले आणि विधवा विवाह करून वाळीत पडलेले समाजसुधारक, राघव पुराणिक.

मंदिरात असतात; मंजुनाथाचे सोने चोरून घरासाठी वापरणारे पुजारी सीतारामय्या , बायको असूनही स्त्रीसुखाला वंचित राहिलेला आणि येता जात वडिलांचा मार खाणारा त्यांचा तोतरा मुलगा गणेश. याशिवाय सीतारामय्यांच्या अधिकारावर डोळा असलेला त्यांचाच भाऊबंद नागराज जोईस आणि मंदिराचे नवीन विश्वस्त प्रभू या व्यक्ती भारतीपुरच्या कथेला आकार देतात.

शूद्र गावाच्या वेशीबाहेर रहात असतात. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत अजून गावात प्रचलित असते. त्यामुळे शिवाशीव आणि अस्पृश्यता भारतीपुरात सगळेजण पाळतात. आणि ब्राह्मण जर शूद्रवस्तीत आला तर वस्ती नष्ट होईल म्हणून ब्राह्मणांनी शूद्रवस्तीत येऊ नये असा नियम करून, शूद्रांना अस्पृश्य करणाऱ्या ब्राह्मणांना आपल्या बाजूने तेही अस्पृश्य करून टाकतात. जुन्या काळी रस्त्यातून बाजूला होणारे आणि अंग चोरून उभे राहणारे शूद्र आता अंगणात येत असले तरी नजरेला नजर देत नाहीत आणि पडवीतही येत नाहीत. त्यामुळे त्यांना मंदिरप्रवेश निषिद्ध हे तर ओघाने आलेच. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख शूद्र असला तरी गावातील शूद्रांची अवस्था दरिद्रीच असते. शूद्रांच्या अंगावर लंगोटाशिवाय वस्त्र नसते. स्वतः पोलीस प्रमुख आपले शूद्र संस्कार पूर्णपणे झुगारून देऊ शकलेला नसतो. ब्राह्मण कारकुनावर रोज ऑर्डर सोडून तो स्वतःचे समाधान करून घेत असतो, पण जगन्नाथ त्याला भेटायला गेल्यावर मात्र त्याला ब्राह्मण कारकुनाकडची कॉफी मिळेल याची व्यवस्था करतो. आंबेडकर, नेहरू आणि गांधीजी यांचे फोटो लावलेल्या त्या आधुनिक सरकारच्या कार्यालयात जातीभेदाची प्राचीन संस्कृती सर्वत्र वावरत असते.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही. अवघ्या १२२ पानांत अनंतमूर्तींनी जे मांडलेलं आहे ते तितक्याच प्रभावीपणे श्री रं शा लोकापूर आणि श्री वि ग कानिटकरांनी मराठीत आणलंय.

अनंतमूर्तींनी संस्कारशिवाय अजून दोन कादंबऱ्या लिहिल्या. पण मला त्या मिळत नव्हत्या. तोपर्यंत भैरप्पा त्यांच्या पुस्तकातून भेटले. त्यामुळे भैरप्पा आणि अनंतमूर्तींचा वाद कळला. मला आवडलेल्या वंशवृक्ष या भैरप्पांच्या कादंबरीत अनंतमूर्तींनी काढलेली चूक आणि मला आवडलेल्या संस्कार या अनंतमूर्तींच्या कादंबरीत भैरप्पांनी काढलेली चूक वाचली. २००७ मध्ये भैरप्पांच्या आवरण या गाजलेल्या कादंबरीच्या प्रकाशनवेळी अनंतमूर्ती आणि भैरप्पा यांच्यात झालेल्या वादाचा धुरळा उडालेला पाहिला. अनंतमूर्ती म्हणाले, ‘भैरप्पा एक उत्तम वादविवादपटू आहेत पण ते कादंबरीकार नाहीत”. त्यावेळी भैरप्पा समर्थकांनी अनंतमूर्तींवर, “आयुष्यभरात केवळ अडीच कादंबरी लिहू शकणाऱ्या माणसाने भैरप्पांना कादंबरी लिहिण्यास शिकवू नये”, अश्या अर्थाने केलेले विधान वाचले (अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्यांचे आकार बरेच छोटे आहेत). आणि अनंतमूर्तींच्या, ‘संस्कार’ सोडून इतर कादंबऱ्या वाचायच्या बाकी आहेत हे पुन्हा जाणवले. पण त्या मिळत नसल्यामुळे शांत राहण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय नव्हता.

आणि डोंबिवलीत साहित्य संमेलन झाले. दोन दिवस पुस्तकांच्या राज्यात फिरताना इतके दिवस हुलकावणी देणाऱ्या अनंतमूर्तींच्या दोन कादंबऱ्या सापडल्या. त्यांची नावे भारतीपूर आणि अवस्था. सौ उमा वि कुलकर्णी आणि श्री विरुपाक्ष कुलकर्णी यांनी कन्नडमधून मराठीत रुपांतरीत केलेल्या साहित्याने माझ्याकडच्या कपाटातील एक कप्पा ओसंडून वाहतो आहे. ह्या सिद्धहस्त जोडप्याने माझ्यासारख्या कन्नड न कळणाऱ्या मराठी वाचकाला आजन्म ऋणी करून ठेवले आहे.

‘अवस्था’ आकाराने थोडी लहान असल्याने आधी वाचली. पण ती माझ्या मनावर अपेक्षित प्रभाव पाडू शकली नाही. त्यातील आस्तिकांची आणि कम्युनिस्टांची तुलना फारच लक्षवेधी होती. आणि नंतर कळले की घटश्राद्ध या कथेतून सुरु झालेला अनंतमूर्तींच्या विचारांचा रस्ता प्रथम संस्कार या कादंबरीवर पोहोचतो, तिथून तो दुसरी कादंबरी भारतीपूरला जातो आणि शेवटी अवस्था या कादंबरीमध्ये त्याचा शेवट होतो. दुसरी कादंबरी न वाचता मी थेट तिसऱ्या कादंबरीकडे वळलो म्हणून कदाचित माझा अपेक्षाभंग झाला असावा. मग भारतीपूर वाचायला घेतली. आणि पुन्हा एकदा अनंतमूर्तींच्याविषयीचा आदर दुणावला.

Wednesday, March 15, 2017

याकूबची फाशी आणि देहांत शिक्षेची आवश्यकता

माझे प्रिय मित्र मंदार काळे यांनी याकूब मेमनला फाशीची शिक्षा ठोठावण्याआधी देहांत शिक्षेच्या योग्यायोग्यतेचा उहापोह करणारी एक छोटी पोस्ट लिहिली होती. पण त्यावेळी एकंदरीत सगळ्यांच्या भावना पेटलेल्या असल्यामुळे त्यांना प्रतिसाद देणारे पोस्टच्या सैद्धांतिक बाबीकडे दुर्लक्ष करून तावातावाने आसूड ओढल्यागत प्रतिसाद देत होते. त्यांच्या त्या पोस्टमुळे माझ्या डोक्यात जे विचार आले होते ते लिहून ठेवले होते. आधी ती पोस्ट कॉपी पेस्ट करतो आणि मग त्यामुळे तेव्हा मला सुचलेले विचार इथे डकवतो.


देहांत शिक्षेची भलामण करताना व्यवस्थेला योग्य निर्णय घेण्याची शंभर टक्के कुवत नि माहिती आहे असे गृहित धरले जाते. कारण तसे नसेल आणि शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर मूळ निर्णयाला बाधक असा उलट पुरावा हाती आला तर ती शिक्षा अंशतः देखील उलट फिरवण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नसतो. जन्मठेपेचा कैदी काही काळाने उलट पुरावा हाती आल्यास सुटू शकतो, जरी त्याच्या आयुष्याचा काही काळ व्यवस्थेच्या चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतला असला तरी कदाचित उरलेल्या आयुष्यात त्याला थोडेफार का होईना भरपाई करणे शक्य होते. अशा वेळी व्यवस्था स्वतःच गुन्हेगार ठरते. पण तिला शिक्षा देणारी कोणतीच व्यवस्था अस्तित्वात नसते, तेव्हा हा एक प्रकारचा अन्यायच नव्हे तर हत्याच ठरते. माझ्या मते देहांत शिक्षेला विरोध करण्याचे मुख्य कारण 'शिक्षा ठोठावण्यापर्यंत पोचलेली कारणमीमांसा वा पुरावे हे शंभर टक्के सत्य असल्याची खात्री देता येत नाही' हेच असते. हिरावून घेतलेले प्राण परत देता येत नाहीत हा मुख्य मुद्दा असायला हवा. जगात अमुक एक माणूस गुन्हेगार आहेच (उदा. तो मुस्लिम असल्यास बर्‍याच द्वेषप्रेमींची ही खात्री असते असे दिसते) किंवा गुन्हेगार नाहीच (उदा. आमचे गुरुजी बलात्कार नव्हे साक्षात्कारच करतात, हे सारे कुभांड आहे म्हणणारे भक्त) असे ठामपणे म्हणणारे व्यवस्थेला एकतर सर्वशक्तिमान समजतात किंवा थेट अन्यायकारी समजतात. पण हे दोन्ही दावे केवळ अडाणीपणाचेच निदर्शक असतात. दोनही प्रकारचे निर्णय केवळ पुराव्याआधारे केलेले असल्याने वास्तविक चूक असू शकतात, ठरू शकतात. आणि त्या संभाव्य चुकीचे परिमार्जन करण्याची सोय रहावी म्हणून देहांत शिक्षेला विरोध केला जातो, यात माणुसकी वगैरेचा संबंध नाही. जगात शंभर टक्के सत्य वा वास्तव असे नसते आणि कोणतीही व्यवस्था नेहेमीच अचूक निर्णय घेते वा नेहेमीच पक्षपाती निर्णय घेते असेही नसते. तसे दावे करणारे माथेफिरू असतात इतकेच.Mandar Kale मला वाटतंय माझी कमेंट मोठी असल्याने तुमच्या पोस्ट खाली टाकता येत नाहीये … म्हणून वेगळी पोस्ट करतोय

बहुतेक विचारांचे उगम हा सद्यस्थितीतील कुठल्यातरी प्रसंगामुळे मनात आलेले तरंग हाच असतो …. ज्ञान व अनुभवांचे पाणी जितके खोल आणि शांत तितकी तरंगांची तीव्रता अधिक तर जितके पाणी उथळ तितकी तरंगांची शक्यता मावळून केवळ खळखळाटच उरतो हा माझा नित्याचा अनुभव कालच्या तुमच्या विचार करण्यास लावणाऱ्या पोस्ट मुळे आणि त्यावरील "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" छाप काही गमतीदार कमेंट्स मुळे दृढ झाला ….

तुमची पोस्ट ज्या मूळ पोस्ट ला उत्तर म्हणून लिहिली होती त्या तुमच्या मित्राचे नाव आठवत नाही पण त्यांच्या योगे अल्बर्ट काम्यूंचा Reflections on the Guillotine निबंध डाऊन लोड करून वाचला आणि मग डेथ पेनल्टी बाजूने आणि विरोधातली आंतरजालावर पटकन मिळणारी बरीच मतं वाचली … मग ओसामा बिन लादेन ला अमेरिकेने अबोटाबाद ला टिपून मारण्यामागची कारण मीमांसा वाचली …. मनाचा तळ जोरात ढवळून निघाला आणि डोक्याला खाद्य मिळालं ….

सलमान खान किंवा इतर समाजधुरीण ज्या मानवतावादाची ढाल पुढे करत आहेत ती तुम्ही झुगारून दिली असल्याने गुन्हेगारांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क या विषयावर चर्चा अपेक्षित नाही असे गृहीत धरतो …. त्याशिवाय तुम्ही फाशीच्या शिक्षेवर सैद्धांतिक चर्चा करण्याची तुमची इच्छा एका कमेंटमध्ये मांडली आहे म्हणून लिहिण्याचा धीर वाढला …

काम्यूंचा निबंध तात्विक नसून भावनिक आहे असे सर्वजण मानतात आणि तो निबंध याकूब ज्या खटल्यात दोषी आढळला आहे त्याबद्दल बोलत नसून युरोपमध्ये त्याकाळी प्रचलित असलेल्या गिलोटिनच्या शिक्षेच्या सर्रास वापराविरोधात होता. त्या निबंधात तुम्ही मांडलेले मुद्दे नाहीत, म्हणून त्या निबंधाला बाजूला ठेवतो आणि तुमच्या पोस्ट कडे वळतो.

मला जाणवलेले तुमच्या पोस्टमधले चार महत्वाचे मुद्दे म्हणजे,
  1. संशयातीत करणारा पुरावा खरोखरच असतो काय ?
  2. न्यायव्यवस्था खरोखरच नि:पक्षपाती आणि पूर्वग्रहविरहित असते काय ?
  3. पूर्वग्रहदूषित व्यवस्थेने शिक्षेच्या नावाखाली केलेल्या हत्येला न्याय म्हणता येईल काय ?
  4. आणि फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्यानंतर जर निरपराधीत्व शाबीत झाले तर शिक्षा ठोठावल्यामुळे निरपराधावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन कसे करायचे?
या चारही मुद्द्यांची आणि त्याचे मूळ म्हणजे सध्या गाजत असलेली याकूब मेमनची फाशीची शिक्षा यांची सांगड घातल्यावर मला जे जाणवलं ते लिहितोय…

न्यायालयासमोर येणारे खटले साधारण तीन प्रकारचे असतात.
  1. भांडणे : हि साधारणपणे मालमत्तेसंबंधी असतात. अश्या भांडणांमध्ये समाजाचे नियम ठरलेले असल्यामुळे न्यायालयाचे काम केवळ पुरावा बघून कुणाचा पक्ष नियमाप्रमाणे असल्याने बरोबर आणि कुणाचा पक्ष नियमोल्लंघन करत असल्यामुळे चूक ते ठरवणे इतकेच असते. न्यायदान चूक कि बरोबर यातच संपते. पुराव्यातून सत्यदर्शन होते कि नाही या प्रश्नात न्यायालय पडत नाही. हे खटले दिवाणी असल्याने यात न्यायालय स्वतःहून लक्ष घालत नाही आणि या खटल्यात फाशीच्या शिक्षेचा प्रश्नच उद्भवत नाही.
  2. गुन्हा : यात दुसऱ्याच्या मालमत्तेचा अपहार, चोरी, फसवणे, दमदाटी, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा संकोच, शारीरिक इजा, बलात्कार अश्या गोष्टी येतात. यात समाजसंमत वागणे म्हणजे काय याची व्याख्या स्पष्ट असल्याने न्यायालयाचे काम गुन्हा खरंच झाला आहे कि नाही? तो आरोपीनेच केला आहे कि नाही? साक्षी पुरावे सत्याला स्पष्ट करणारे आहेत कि नाहीत? याची खात्री करून पुराव्यानुसार निरपराध ठरल्यास आरोपीला मुक्त करणे आणि पुराव्यानुसार गुन्हेगार ठरल्यास गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार गुन्हेगारास शासन करणे इतकेच असते. न्यायदान चूक कि बरोबर यापेक्षा एक पायरी कठीण होते आणि सत्य शोधनाची नवीन जबाबदारी न्यायालयावर येऊन पडते. त्यासाठी पोलिस तपास आणि सरकारी वकील हि व्यवस्था काम करते. हे खटले फौजदारी स्वरूपाचे असल्याने यात न्यायालयाला तक्रार आल्यावर किंवा पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यावर किंवा क्वचित स्वतः हून ही लक्ष घालावे लागते. या खटल्यातही फाशीची शिक्षा होण्याचा संभव नगण्यच असतो.
  3. अपराध : यात दुसऱ्याचे आयुष्य संपवणे हा सर्वात मोठा गुन्हा येतो. हा खटला फौजदारी असतो आणि न्यायदान अधिक कठीण होते. सर्वांना समान न्याय याचा अर्थ सर्वांना समान शिक्षा नसून जितका अपराध मोठा तितकी शिक्षेची तीव्रता मोठी असा असतो. जर खटल्याचा मुद्दा एका निरपराधाची हत्या असेल तर कुठल्याही प्रकारची शिक्षा या अपराधामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करू शकत नाही. अश्या परिस्थितीत जर थंड डोक्याने योजनाबद्ध रीतीने जर कोणी खून पाडत असेल तर केवळ दोन पायावर चालतो, आपली भाषा बोलतो आणि आपल्यासारखे विचार बऱ्याचदा करतो म्हणून त्याला फाशी सोडून दुसरी कुठलीही शिक्षा दिल्यास न्याय झाला असे समाजाला वाटत नाही आणि इथे फाशीच्या शिक्षेचा उगम होतो.
शिवाजी राजांच्या काळातील कुणाचे हात पाय कापून टाकण्याचा किंवा कुणाला तोफेच्या तोंडी तर कुणाला हत्तीच्या पायदळी देण्याचा न्याय आपण मध्ययुगीन म्हणून सोडून दिला तरी आपली न्यायव्यवस्था पाश्चात्त्य न्यायव्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे हमुराब्बीचे कायदे किंवा मोझेस कडून मिळालेल्या आज्ञा किंवा इस्लाममधील न्यायाची अरबी संकल्पना यांचा प्रभाव आपल्याला टाळता येत नाही आणि मनाने पुराणात किंवा मध्ययुगात वावरणाऱ्या भारतीय समाजाला फाशीच्या शिक्षेमागील न्यायदानातील संभाव्य चूक महत्त्वाची वाटेनाशी होते.

असल्या अपराधात पुराव्यांचा अपुरेपणा, तोकडेपणा, साक्षीदारांच्या चुका आणि न्यायदानातील संभाव्य पक्षपातीपणा लक्षात घेता फाशी दिल्यावरही दयेचा अर्ज आणि कायमस्वरूपी तुरुंगवासाची तरतूद आपल्या कायद्यात आहे. अनेक गुन्हेगारांनी त्याचा फायदा देखील करून घेतला आहे.

अश्या परिस्थितीतही मला फाशीच्या शिक्षेची शक्यता ठेवावी असेच वाटते. माझे मत फाशी द्या म्हणून नसून जास्तीत जास्त काय होऊ शकते त्याची मर्यादा निश्चित करून ठेवावी असे आहे.

निरपराध गुन्हा कबूल करणार नाहीच पण अट्टल गुन्हेगारदेखील गुन्हा लपवण्याचा अखंड प्रयत्न करणारच. सत्यशोधनाच्या कामात मदत केली तर शिक्षा मर्यादेपर्यंत न ताणता थोडी कमी होऊ शकते हि शक्यता गुन्हा अन्वेषणाच्या कामाला गती आणू शकते आणि आरोपीकडून अधिक सहकार्य मिळवू शकते असे मला वाटते . थोडक्यात काय फाशी देऊच नका पण फाशी देऊ शकण्याचा व्यवस्थेचा हक्क नाकारू नका.

याला जर कोणी असे म्हटले कि जी व्यवस्था जीवन सुरु करू शकत नाही त्या व्यवस्थेला जीवन संपवण्याचा अधिकार नाही तर हा विचारच पोकळ आधारावर उभा आहे.

मुळात आपल्याला व्यवस्था बनवण्याचा अधिकार तरी कोणी दिला? तो काही निसर्गाने दिला नाही तर आपला आपणच घेतला आहे. निसर्गाला नीती नाही. निसर्गात कित्येक घटनांची पुनरावृत्ती होत असते आणि ज्यांची होताना आपल्याला दिसत नाही त्यांच्या पुनरावर्तनाचे चक्र आपल्या आयुष्यापेक्षा मोठे असते असे मी मानत असल्याने निसर्गात नियम असावेत पण ते निरपेक्ष, भावनारहित आणि मूल्यरहित असतात. एकदा का निसर्गाचे मूल्यरहीत असणे मानले कि कुठल्यातरी मुल्यांवर आधारलेले जन्मसिद्ध किंवा घटनादत्त अधिकार हीच मुळी अनैसर्गिक कल्पना आहे हे मान्य करणे सोपे जाते. पाश्चात्त्य देशांतील bill of rights ची संकल्पना देखील मला अशी make believe वाटते

किंबहुना निसर्गात न्याय देखील नाहीच, तिथे आहेत केवळ परिणाम. या भावनाशून्य, मूल्यरहित आणि (आपल्या दृष्टीने गैरसोयीचे म्हणून विनाकारण) बदलत जाणाऱ्या निसर्गात आपल्या जीवनाला काही अर्थ राहावा म्हणून आपणच केलेली योजना म्हणजे समाज. हा समाज मग काही काही मूल्यहीन गोष्टींना अमूल्य ठरवतो त्यांना सांभाळण्याचे काही नियम ठरवतो, त्या नियमांना तात्विक मुलामा देऊन नीतीची संकल्पना उभारतो आणि मग येते ती न्यायाची संकल्पना … पण निसर्ग त्याच्या अनाकलनीय लीलांनी आपल्या या बंदिस्त उभारणीमध्ये नवीन शक्यतांचे सुरुंग लावतच राहतो. मानव म्हणून जन्माला येवून मानवी समाजाचे सर्व फायदे उपभोगून कुणी समाजमान्य मूल्यांचा आणि ज्या जीवनाला अमूल्य मानले त्यालाच संपवण्याचा प्रयत्न करतो आणि निसर्गाने पेरलेला हा सुरुंग आपल्याला उध्वस्त करत विचारांचा धुरळा उडवून देतो.

अश्या वेळी ज्याची सुरुवात make believe ने झाली आहे त्या अधिकारांच्या कल्पनेत जीवन हिरावून घेण्याचा अधिकार असावा असेच मला वाटते. तरच सार्वभौम या शब्दाला अर्थ राहील. याशिवाय जो समाज जन्माला येणाऱ्या अनंत संभावनांना गर्भपाताच्या अधिकाराखाली मिटवू शकतो त्याला पशुतुल्य वागणुकीमुळे माणसातून बाद झाल्यावर मानवसदृश व्यक्तीबरोबर काय करता येऊ शकते त्याची मर्यादा आखण्यास काही तात्विक अडचण येऊ नये.

नैसर्गिक जीवन कधी सुरु होते (शुक्राणूंचा अण्डकोषात प्रवेश झाल्यावर कि पहिले ट्याहां केल्यावर) आणि नैसर्गिक जीवन कधी संपते ( श्वास थांबल्यावर, कि हृदय थांबल्यावर कि मेंदू कि सर्व अवयव थांबल्यावर) यावर जरी वाद असले तरी सामाजिक जीवन पहिले ट्याहां केल्यावर सुरु होते आणि ज्या वेळी सर्व समाजात राहून सामाजिक जीवनाचे सर्व फायदे घेऊन सुद्धा व्यक्ती नैसर्गिक उर्मींना कह्यात न करता समाजासाठीच्या अमूल्य गोष्टींना उधळू लागते तेंव्हा समाजाचा घटक असलेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संपतो. मग आपल्या 'मानवी जीवन अमुल्य आहे' या मूल्याला जपण्यासाठी आपण जीवन संपवण्याची शक्यता किमान कायद्याच्या पुस्तकात तरी ठेवलीच पाहिजे …. परदेस पिक्चर मधले आनंद बक्षी साहेबांच्या गाण्यातले वाक्य आहे 'जीनेका ही शौक तो मरनेको हो जा तैयार ' हे इथे चपखल बसते.

म्हणून आपण उल्लेखित केलेल्या निरपराधीत्वाच्या शक्यतेमुळे आणि न भरून काढता येण्याजोगे नुकसान असल्यामुळे माझे मत आपल्या सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार फाशीची शिक्षा rarest of rare cases मध्ये वापरण्यासाठी ठेवूनही शेवटी आमरण तुरुंगवासात परिवर्तित होण्यासाठी ठेवावी असेच आहे .

आता राहिला प्रश्न याकूब मेमनच्या खटल्या संबंधी … मला या खटल्याबद्दल काही विशेष माहिती नाही आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण नसला तरी थोडा विश्वास आहे आणि जो निकाल येईल तो मान्य करण्याशिवाय मी काही करू शकत नाही हे मला माहिती आहे. पण एक मात्र कळले कि भारतीय घटना जरी मजबूत असली तरी मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला आपल्या घटनेच्या अंतर्गत असलेल्या कायद्यांच्या तरतुदिनुसार चालवणे म्हणजे विमानाला कारचे इंजिन लावण्यासारखे आहे.

आपले जग दहशतवादरुपी एका नव्या प्रकारच्या गुन्ह्याला तोंड देते आहे.

नवीन समाजाची दळणवळणाची, सम्पर्काची, आर्थिक व्यवहारांची आणि विध्वंसाची सगळी साधने वापरायची पण मानसिकता मात्र मध्ययुगीन ठेवायची. लोकांना धर्माच्या किंवा तत्वाच्या नावाखाली एकत्र करायचे आणि मध्ययुगीन राजाप्रमाणे स्वतःचे सैन्य उभारायचे. देश नसलेले सैन्य आणि भूमी नसलेले देश आणि हे सरळ हल्ला करत नाहीत ते हल्ला करतात प्रजेवर, बाजारांवर, शाळांवर, वाहतुकीच्या साधनांवर…. ह्या गुन्ह्याला आपण मी आधी सांगितलेल्या तीन प्रकारच्या खटल्यांमधून तोंड देऊ शकत नाही …

मला तर वाटतं ह्यातील आरोपींवर खटला चालवणे म्हणजे आपल्या व्यवस्थेला आपणच सुरुंग लावण्यासारखे आहे. न्याय करण्यासाठी न्यायासनाची शक्ती गुन्हेगारापेक्षा जास्त असावी लागते. पण गुन्हेगार न्यायासनंच काय त्यामागील सार्वभौम देश आणि त्यच्या प्रजेचा जगण्याचा हक्कच नाकारत असेल तर ते अघोषित युद्धच असते. आणि युद्धाला लावायचे कायदे वेगळेच असतात, युद्धगुन्हेगारांचे खटले त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतरच सुरु करता येतात ते देखील विशेष न्यायालयात.

एका सैनिकाला किंवा त्याच्या नातेवाईकांना पकडून त्यांच्यावर खटले चालवून आपण शिक्षा केली आहे आणि न्याय झाला आहे असे समजणे भाबडेपणाचे लक्षण आहे. त्यात काही समाज धुरीण निरपराधीत्वाचे दाखले शेवटी देऊन या संपूर्ण खटल्याला आणि त्याच्या शिक्षेला रोमन gladiatar च्या खेळाचे स्वरूप आणत आहेत …. जणू काही न्यायासन गर्दीच्या "मारा मारा" किंवा "सोडा सोडा " च्या गलक्याच्या तीव्रतेवरून अंगठा वर किंवा खाली करून त्या अभागी जीवाच्या आयुष्याचा निकाल देणार आहे.

हे गुन्हे वेगळे…. त्यातील योजना करणाऱ्यांच्या, त्यांना भूमी पुरवणाऱ्यांच्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांच्या, शस्त्रात्रे पुरवणाऱ्यांच्या, तरूण मुलांचे विचार बिघडवणाऱ्यांच्या, प्रत्यक्ष कारवाईत भाग घेणाऱ्यांच्या आणि या सर्वांच्या अजाण किंवा मूक संमती देणाऱ्या नातेवाईकांच्या गुन्ह्यांचे वर्गीकरण करून त्याला वेगवेगळ्या शिक्षा ठरवायला लागतील …. त्यांची योग्य अंमलबजावणी, देश नसलेल्या सैन्याने आणि भूमी नसलेल्या देशाने सपशेल शरणागती पत्करल्यावरच होईल …तोपर्यन्त युद्धात सर्व काही क्षम्य असते हेच मला जास्त सयुक्तिक वाटते.