Sunday, March 19, 2017

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता?

परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.
प्राचीन वैभवशाली संस्कृतीच्या आता अस्ताला गेलेल्या समाजव्यवस्थेच्या दारावर जेव्हा अर्थाधारित आणि नफाकेंद्रित नवी व्यवस्था धडका देऊ लागली तेव्हा व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावर भारतीय कश्या प्रकारे प्रतिक्रिया देत होते? प्राचीन व्यवस्थेत अडकलेला आणि अस्ताव्यस्त पसरलेला भारतीय समाज मूठभर परकीयांच्या या आगमनाला, त्यांच्या बरोबर आलेल्या नव्या विचारांना कश्या प्रकारे सामोरा गेला? खेड्यात विखुरलेल्या समाजात शहरीकरणाचे आगमन आणि गृहोद्योग, कुटिरोद्योग व मनुष्यबळ वापरून उत्पादन करणाऱ्या शेतीकेंद्रित समाजात यंत्रशक्ती आणि औद्योगिकरणाचे आगमन झाल्यावर त्यांची पाळेमुळे कशी हादरली या सर्वांचे चित्रीकरण करणारे जे साहित्य कन्नड नवसाहित्यात लिहिले गेले त्याला प्रो अशोक “आगमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.

व्यापारमिषाने येऊन अंतिमतः राज्यकर्ते बनलेल्या पाश्चात्यांची राजवट स्थिरावल्यानंतर भारतीय समाजात एक नवीन बदल झाला. यापूर्वी भारतीय लोक परदेशगमन करत होते, पण ते केवळ व्यापारासाठी. जाणारे लोक पैसे कमवायला जात होते किंवा आपली व्यवस्था बाहेर कशी वापरायची ते शिकायला जात होते. आता मात्र भारतीय तरुण परकीय व्यवस्था शिकायला बाहेर चालले होते. त्यांची शास्त्रे, त्यांचे नियम, त्यांचे विचारव्यूह आत्मसात करायला चालले होते. ती व्यवस्था शिकून तिथेच स्थायिक व्हायचे की परत यायचे याबाबत त्यांच्या डोक्यात कुठलाही स्पष्ट विचार असणे कठीण होते.

परकीयांच्या भारतात आगमनापेक्षा, भारतीयांचे बहिर्गमन होताना अगदी उलटी स्थिती होती. आगमनाच्या वेळी, येणारे कुरघोडी करायला आले होते आणि त्यांच्या समोर होता आत्ममग्न निद्रिस्त समाज. तर परदेशगमनाच्या वेळी, बहिर्गमन करणारे शिकायला चालले होते. आणि त्यांच्यासमोर होता आपल्या विश्वविजयाने धुंद झालेला, धर्मबंधने झुगारून देणारा पण भांडवलाधारीत शोषण करणारा, वंशवादी आणि रंगभेद करणारा बलशाली समाज.
त्या परदेशगमन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात पाश्चात्य संस्कृती बघून कोणते विचार आले असतील? पाश्चात्य संस्कृतीशी जुळवून घेताना त्यांना कुठला आणि कसा त्रास झाला असेल? पाश्चात्य संस्कृतीतील मोकळेपणा पाहून त्यांच्या मनात स्वसंस्कृतीविषयक अभिमान किंवा तिरस्कार यापैकी कोणते विचार आले असतील? पाश्चात्य संस्कृतीने रंगभेद करून त्यांना दिलेली दुय्यम वागणूक सहन करताना त्यांना काय वाटले असेल? जर ते मायदेशी उच्चवर्णीय असतील तर आपल्या पूर्वजांनी मायदेशात इतरांवर केलेल्या अत्याचाराची जाणीव होऊन त्यांचे भावविश्व हादरले असेल का? किंवा जर ते मायदेशी कनिष्ठवर्णाचे असतील तर दुय्यमतेची हेटाळणी पाहून त्यांच्या मूळच्या जखमी मनाला अजून डागण्या पडल्या असतील की त्यांचे मन अजून निबर झाले असेल? आणि स्वकीयांपासून दूर, दुय्यम नागरिक म्हणून जगत असताना, विद्याभ्यास करत असताना त्यांनी शारीर इच्छापूर्तीसाठी सुखाच्या आडवाटा कश्या शोधल्या असतील याचे चित्रीकरण करणाऱ्या साहित्य प्रवाहाला प्रो अशोक “निर्गमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.

सगळ्यात शेवटी भारतीय समाजात अजून एक बदल घडून आला. बहिर्गमन किंवा किंवा निर्गमन झालेल्या अनेकांनी इथल्या संस्कृतीला कायमचा रामराम ठोकला आणि ते परदेशी स्थायिक झाले. पण परदेशी संस्कृतीत रुळू न शकणारेही काही भारतीय होते. परदेशी मिळणारी दुय्यम वागणूक; स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांचा उद्घोष करून जगभर वसाहतवाद लादणाऱ्या पाश्चात्यांचा दुटप्पीपणा; पाश्चात्य संस्कृतीत व्यक्तीच्या जीवनात जाणवत असलेली पोकळी; दोन महायुद्धानंतर भांडवलशाहीने घातलेली समाजाची घडी किती तकलादू होती याची झालेली जाणीव; महायुद्धांनी उजेडात आणलेली मानवी क्रौर्य आणि वंशवादाची परिसीमा, औद्योगिकीकरणामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास; भांडवलशाहीचा शोषणकारी भीषण चेहरा; कम्युनिझमची समतेची हाक पण त्यानंतर कम्युनिझमच्या नावे होणारी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढा यासारख्या गोष्टींनी भारतात परतण्याच्या त्यांच्या विचारांना बळ दिले. तर काहींना महायुद्धकाळात जन्मलेल्या रेड क्रॉस सारख्या सेवाभावी संस्था, मिशनरी लोकांनी जगभर चालवलेले कार्य बघून मातृभूमीच्या उत्कर्षासाठी स्वतः कटिबद्ध व्हावेसे वाटले असावे.

भारत बदलून टाकू अश्या आशावादाने भारलेले किंवा पाश्चिमात्य संस्कृतीने भ्रमनिरास होऊन निराश झालेले असे हे दोन प्रकारचे परदेशस्थ भारतीय जेव्हा भारतात परतले असतील तेव्हा त्यांची मनस्थिती कशी असेल?

भारतात सगळेच बदलायचे असे ध्येय उरी बाळगून जर ते आपल्या जन्मगावी परतले असतील तर आपल्या ध्येयसिद्धीसाठी कार्याला सुरुवात करावी कुठून?; अंतर्बाहय दैववादी असलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवायचे कसे? एकाच श्वासात अद्वैताचे तत्वज्ञान आणि जातीभेदाचे समर्थन करून शांत राहणाऱ्या या स्थितीशील समाजाला गतीशील बनवायचे कसे?
परदेशातून परत आलोय म्हणून फुकट मिळणारा मानमरातब घेत शोषणासाठी तयार असलेल्यांच्या उरावर बसायचे की त्यांचे शिव्याशाप झेलत त्यांना त्यांच्या माणूसपणाची जाणीव करून द्यायची? राष्ट्रवादाचे तत्वज्ञान वापरून पाश्चात्य राष्ट्रांनी महायुद्धांचा जो जीवघेणा खेळ खेळत करोडोंच्या रक्ताने स्वतःची आणि इतरांची भूमी रंगवली, तो रक्तरंजित मार्ग न वापरता या प्राचीन संस्कृतीला पुन्हा उर्जितावस्थेला कसे न्यायचे? प्रगतीची व्याख्या काय करायची? सुखाची व्याख्या काय करायची? आभाळंच फाटलंय तर ठिगळं किती आणि कुठे लावायची? सगळ्या जुन्याला मोडून नव्याची निर्मिती करायची का जुन्यातूनंच नव्याची निर्मिती करायची? जुन्यातील काय टाकावे आणि काय ठेवावे?, हे ठरवायचे कसे?; जे टाकायचे ठरवले ते का टाकायचे हे इतरांना समजावयाचे कसे? भावनाशून्य शल्यविशारद होऊन या जुन्या समाजाची शस्त्रक्रिया करायची की भावनिक गुंतवणूक वाढवत या समाजाला हळू हळू बदलत राहायचे? घरच्यांच्या आणि स्वतःच्या कोमल भावना जपायच्या की त्यांच्यावर निखारा ठेवायचा? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दैववादाने भौतिक आयुष्याच्याबाबतीत निराशावादी झालेल्यांना समजावताना परदेशवास्तव्यातील चटके खाऊन भ्रमनिरास पावलेल्यांपासून वाचवावे कसे? या सर्व प्रश्नांचे चित्रीकरण करणाऱ्या साहित्य प्रवाहाला प्रो. अशोक “पुनरागमन” नोंदवणारा साहित्यप्रवाह म्हणतात.

प्रो अशोक यांच्या मते पुनरागमन प्रवाहातील लेखनात लेखकांसमोर महात्मा गांधींचे जीवन होते. खरं तर त्यांच्या या एकाच संदर्भाने वर लिहिलेले सर्व विचार माझ्या डोक्यात आले. पण डोकं जरी माझं असलं तरी त्यात येणारे विचार आणि त्यामुळे सुरु राहणारी विचार प्रक्रिया मात्र पूर्णपणे माझ्या नियंत्रणात नसते. त्यामुळे वर लिहिलेले विचार करून डोक्यातील विचारचक्र थांबले नाही. पुढे जातंच राहिले. हा भाग लांबल्यामुळे ते सगळे विचार पुढच्या काही भागात टाकतो.

No comments:

Post a Comment