Showing posts with label पद्य. Show all posts
Showing posts with label पद्य. Show all posts

Sunday, March 15, 2020

कंबोडिया, फ्लॅश मॉब, ओ फॉर्च्युना आणि लाईफ इज ब्यटिफुल

सकाळी चालायला जाण्यापूर्वी फेसबुक उघडलं. एका ज्येष्ठ मित्राने कंबोडियाच्या अंगकोर मंदिरांचा व्हिडिओ शेअर केलेला पाहिला. त्यांच्याच पोस्ट्स बघून दोन वर्षांपूर्वी कंबोडिया व्हिएतनामला गेलो होतो. 

कंबोडियाच्या अंगकोर वट आणि अंगकोर थॉमच्या देवळानंतर 'टा प्र्हॉम' देवळात गेलो होतो. (या देवळाच्या दुरुस्तीचं काम भारत सरकार करत आहे आणि अॅंजेलीना जोलीच्या टूम्ब रेडर्स या चित्रपटाचं चित्रीकरण या देवळातही झालं होतं). 'टा प्र्हॉम'च्या भव्य भग्न वास्तूत फिरताना मोबाईलवर 'ओ फॉर्च्युना' लावून हिंडलो होतो. आजूबाजूला कुणी नाही ते पाहून इअरफोन बंद करून त्या भग्न वास्तूलाही 'ओ फॉर्च्युना' ऐकवलं होतं. कार्ल अॉफच्या संगीताची जादू, ओ फॉर्च्युनाचे न कळणारे लॅटिन शब्द आणि जुन्या देवळांच्या भिंतीतून उगवून आकाशापर्यंत पोचलेले वटवृक्ष या सगळ्याचा परिणाम होऊन मनात उसळलेला भावनांचा कल्लोळ डोळ्यातून घळाघळा वाहू दिला होता.आणि माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून बावरलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप हसूही आलं होतं. 


आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हणून युट्यूबवर ओ फॉर्च्यूना शोधलं. समोर नेहमीचे व्हिडीओ आले आणि नेहमीपेक्षा एक वेगळा व्हिडीओ आला फ्लॅश मॉब या नावाने. 



माझ्या आयुष्यात फ्लॅश मॉब ही गोष्ट कधी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली नाही. अगदीच तोंडी लावायला म्हणून जेव्हा पिझ्झा हट भारतात नवीन होतं आणि माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा हिला घेऊन पिझ्झा हटला गेलेलो असताना आम्हाला वाढणारा वेटर टेबलाजवळ येऊन आपलं काम करत असताना एकाएकी बाकीच्या वेटर्सनी ताल धरून नाचायला सुरवात केली होती आणि तिथे आलेल्यापैकी कुणाच्या तरी वाढदिवसासाठी एक गाणं म्हणत टेबलामधल्या जागेत नाच करून दाखवला होता. 

माझ्या तालाशी जुळवून घेणं अशक्य आहे हे नृत्यदेवतेला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे तिने माझ्या आयुष्यातून फार लवकर काढता पाय घेतला होता. त्यामुळे इतर कुणी नाचू लागलं तरी मला अवघडल्यासारखं होतं. त्याशिवाय आपण, नाच आवडणाऱ्या आपल्या प्रेयसीला घेऊन त्या काळात न परवडणाऱ्या हॉटेलात गेलेलो असताना वेटर्सनी छान नाच करून दाखवल्याने माझी अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. त्यानंतर मी कायम डॉमिनोजचा ग्राहक झालो आणि पिझ्झा हटला 'नाचता येईना ते गिऱ्हाईक होई वाकडे' ही मराठी म्हण शिकवली होती. 

त्यानंतर साधारण २०११ ला सीएसटी स्थानकावर संध्याकाळी पाचच्या सुमारास तरुणांच्या एका समूहाने रंग दे बसंतीच्या गाण्यावर समूहनृत्य केलेलं होतं. त्याचा व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांत बघताना, आपल्याला नाचता आलं असतं तरी आपण असं चारचौघात नाचू शकलो नसतो याची खात्री पटून त्या गाण्यावर सगळ्यात पहिल्यांदा नाचायला सुरवात करणाऱ्या मुलीचं कौतुक वाटलं होतं. 



नंतर कळलं होतं की बघणाऱ्यांसाठी जरी तो उत्स्फूर्त अविष्कार असला तरी त्यात भाग घेणाऱ्यांनी त्यासाठी बरीच पूर्वतयारी केलेली असते. त्यांचं सादरीकरण रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी प्रशिक्षित कॅमेरामन मोक्याच्या ठिकाणी पेरलेले असतात आणि ते केवळ सादरीकरणाला रेकॉर्ड करत नसून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियादेखील रेकॉर्ड करत असतात. अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षितरित्या आपल्या बाजूला संगीत किंवा नृत्याचा अविष्कार सुरु झाला की माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात ते बघणं मोठं मनोरंजक असतं. आज ओ फॉर्च्यूनाच्या फ्लॅश मॉबचा व्हिडीओ बघताना त्यातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघताना असाच हरखून गेलो. 

फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. यूट्यूबच्या अल्गोरिदमला माझी आवड कळली आणि त्याने ऑटो प्ले मोडवर फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाचे व्हिडीओ दाखवायला सुरवात केली. पश्चिमी देशात हे फ्लॅश मॉब साधारणपणे एअरपोर्ट किंवा मॉल किंवा रेल्वे स्टेशन किंवा शहरातील एखादा प्रसिद्ध चौक अश्या ठिकाणी आपलं सादरीकरण करतात. सुरवातीला तिथल्या गिऱ्हाईकांचे किंवा प्रवाश्यांचे आवाज, नेहमीच्या सूचनांचे आवाज असा सगळा मामला चालू असतो. आणि कुठेतरी कोपऱ्यातून कुणीतरी व्हायोलिन किंवा बासरी किंवा ट्रम्पेट किंवा छोटा ड्रम वाजवायला सुरवात करतं. लोक लक्ष देत नाहीत. मग अजून कुणीतरी दुसरं वाद्य घेऊन येतं. ठरलेल्या क्रमाने एका मागून एक इतर वाद्यवृंद गोळा होत जातो. आणि मूळ सुरावटीत आपलं वाद्य मिसळवू लागतो. आता लोक शांत होऊ लागतात. बहुतेक लोक एका ठिकाणी उभे राहून त्या सादरीकरणाचा आनंद घेऊ लागतात. इतस्ततः धावणाऱ्या लहान मुलांचे आईबाप त्यांना पकडून उभे रहातात. संगीताची जादू आणि वातावरणातील भारलेपणा असा असतो की इतका वेळ गोंधळ घालणारी मुलंही शांतपणे उभी राहतात. वाद्यमेळ वाढत जातो. आता वाद्यवृंदाचा संगीत संयोजकही समोर येतो आणि त्या सुरावटीत तेथील सर्वजण गुंगून जातात. शेवट होतो आणि मग टाळ्यांचा जल्लोष, शिट्ट्या किंवा प्रोत्साहनपर हाकारे यांचा कल्ला होतो आणि रोमांचित प्रेक्षक पुन्हा आपापल्या कामाला लागतात. सगळ्या फ्लॅश मॉब व्हिडिओचा फॉरमॅट साधारणपणे असाच असतो. 

मोबाईल खिशात होता. त्यामुळे पुढे काय सुरु होणार ते माहिती नव्हतं. प्रत्येक वेळी युट्यूब जे ऐकवेल त्यासाठी तिथल्या प्रत्यक्षदर्शींइतकाच मी देखील अनभिज्ञ होतो. एकामागून एक वेगवेगळ्या सुरावटी वाजत होत्या. ओ फॉर्च्यूनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलेली सादरीकरणं झाली. मग बोलेरो झालं. मग ब्ल्यू डॅन्यूब झालं. मग बीथोव्हेनच्या नवव्या सिम्फनीतील ओड टू जॉय झालं. क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी झालं. 

चढ चढून धाप लागली होती. पण कानात वाजणाऱ्या सुरावटींमुळे अंगावर रोमांच उभे राहात होते. जरा थांबलो. घाम पुसता पुसता पुन्हा एकदा मगाशी लागून गेलेलं बोलेरो लावलं. मेक्सिकोतील कुठल्यातरी शहरातील चौकात एका वाद्यवृंदाने रावेलची ही रचना सादर केली होती. संध्याकाळच्या गर्दीतून एक मुलगी पुढे येते. ड्रम्स मांडते आणि बोलेरोचा मध्यवर्ती ताल चालू करते. 



बोलेरोमध्ये तो ताल संपूर्ण वेळ चालू राहतो. जवळपास पंधरा मिनिटांच्या त्या संगीतात मध्यवर्ती असणारा एकच ताल, संगीताच्या कार्यक्रमांसाठी बांधलेल्या विशेष सभागृहात असतानाही पुन्हा पुन्हा वाजवत राहायचं म्हणजे अजिबात खायचं काम नाही. आणि लोकांच्या गर्दीत एकट्याने येऊन आपले ड्रम्स मांडून तो ताल धरायचा म्हणजे तर अजून कठीण. आजूबाजूला अगदी जवळ उभे असलेले प्रेक्षक, त्यामुळे जरा ताल किंवा ठोका चुकला की नाचक्की ठरलेली. रंग दे बसंती गाण्यावर नाचायला सुरवात करणार्या पहिल्या मुलीप्रमाणेच या ड्रम वाजवणाऱ्या मुलीबद्दल मला फार कौतुक वाटू लागलं. वाटलं की अश्या कुठल्या फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाच्या वेळी आपणही तिथे असलं पाहिजे. त्या वाद्यवृंदातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक करताना मी थकणार नाही याची माझी मलाच खात्री पटली. 

आणि एकदम जाणवलं की फेसबुक म्हणजे एक प्रकारचा फ्लॅश मॉब आहे. फक्त या मॉबमधे जो तो एकटा असतो. आणि इथे बहुतेक जण फारसा सराव न करता येतात. आपापल्या भिंतीवर खरडणारा प्रत्येकजण एकटाच वेगवेगळी वाद्य वाजवत असतो. आणि आपापल्या कामात गुंतलेले लोक मधेच तिथे डोकावतात. आपण कलाकार आहोत की नाही हे माहिती नसलेल्या कलाकारांचं सादरीकरण बघत असतात. काहींचे ताल चुकतात. काहींचा एकट्याचा वाद्यवृंद फारसा रंग भरत नाही. काहींचा वाद्यवृंद मात्र कमालीचा रंगतो. लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला दोघांना खूष करून जातो. तुलना करून माझा मीच हसलो. बोलेरो संपलं. 

चेकॉव्हस्कीची रचना सुरु झाली. ही रचना मात्र कुठल्या एअरपोर्ट किंवा मॉलमध्ये नसून चक्क एका हॉस्पिटलमध्ये सादर केली होती. 



वेदनेने बेजार झालेल्या रुग्णांना आणि आप्तेष्टांच्या दुखण्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांना हे स्वर्गीय संगीत ऐकून किंचित काळ का होईना पण वेदनेचा आणि चिंतेचा विसर पडला असेल, असा विचार करून, त्या वाद्यवृंदाच्या कल्पकतेचं मला कौतुक वाटलं. माझ्या आवडत्या शॉशँक रिडम्प्शन चित्रपटातील मोझार्ट ऑपेराचा सीन आठवला. जिथे जीवन म्हणजे त्याच त्याच कंटाळवाण्या गोष्टींची अंतहीन मालिका असते, जिथे आयुष्याला पुढे चालवणारी आशा नावाची अद्भुत साखळी नाहीशी झालेली असते, त्या रुक्ष आणि भकास तुरुंगात अँडी जेव्हा काही काळापुरता मोझार्टची सिम्फनी वाजवतो तेव्हा ती काय आहे ते कळलं नाही तरी तेथील कैद्यांच्या मनात आशेचं इवलंसं फूल फुलवते, ते आठवलं. 



आणि त्याचवेळी हे देखील जाणवलं की हॉस्पिटलमधील फ्लॅश मॉबच्या त्या संगीताने अनेकांना काहीकाळ चिंतामुक्त केलेलं असलं तरी कदाचित असह्य वेदनेने तळमळणाऱ्या काही जणांना त्याचा त्रास झालेला असू शकतो. आपल्याला सुखावणारे सूर इतरांना सुखावत असतीलंच हे गृहीतक मोठं धोकादायक आहे. ते इतरांच्या आवडीनिवडीबद्दल, त्रासाबद्दल, आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मनःशांतीबद्दल आपल्याला आंधळं बनवू शकतं. तल्लीनतेने गायलं जाणारं भारतीय शास्त्रीय संगीत कित्येकांना नीरस वाटू शकतं. बेभान होऊन ढोल वाजवणारे स्वतः जरी खूष होत असतील तरीही त्या तालाचा त्रास होणारे अनेकजण असू शकतात. कुणाची अजान तर कुणाची आरती एकाच वेळी कुणाची मन:शांती वाढवत असताना इतर कुणासाठी मात्र डोकेदुखी होऊ शकते. कॉलेज जीवनातील माझा आवडता मायकेल जॅक्सन माझ्या वडिलांना आवडत नव्हता. इतकंच काय पण मगाशी लागून गेलेलं क्वीनचं बोहेमियन ऱ्हाप्सोडी मला समजत नसल्याने फार आवडत नसलं तरी ते माझ्या मुलांना आवडतं हे मला काही कारण नसताना खटकतं. 

चेकॉव्हस्कीची रचना हॉस्पिटलात सादर करणाऱ्या फ्लॅश मॉबमुळे सकाळपासूनच्या माझ्या सकारात्मक विचारात अशा तऱ्हेने थोडा खंड पडला. आणि मी फोन पुन्हा खिशात ठेवून उताराला लागलो. ऑटो प्लेलिस्ट चालू होती. सहासात मिनिटं कुठलंतरी संगीत चालू होतं. सकाळच्या रोमांचकारी संगीताबरोबर केलेल्या रोलरकोस्टर राईडनंतर आलेल्या विचारांमुळे थोडा खिन्न झालो होतो. आणि एकाएकी लहान मुलांच्या आवाजात गाणं चालू झालं. धून ओळखीची होती. पण कुठली ते लक्षात येईना. शेवटी फोन खिशातून बाहेर काढला. संगीताच्या त्या रचनेचं नाव होतं 'ला विटा इ बेला' या इटालियन वाक्याचा अर्थ होतो 'लाईफ इज ब्युटीफुल'. 


रॉबर्टो बेनिग्निच्या लाईफ इज ब्युटीफुल या चित्रपटात ओफेनबाख या जर्मन - फ्रेंच संगीतकाराच्या रचनेचा वापर केलेला आहे. माझी अतिशय आवडती रचना लहान मुलांच्या तोंडून ऐकताना मला जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात करता येणं अशक्य आहे. मगाशी आलेली खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. आणि मी टेकडीच्या त्या निर्जन उतारावर, कानात वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर झुलत झुलत, हात हवेवर हलवत हलवत झोकात उतरू लागलो. जर त्या वेळी मला कुणी पाहिलं असेल तर 'आजकाल लोक मॉर्निंग वॉकलाही ढोसून येतात', असं त्याच ठाम मत झालं असतं. आपला पदन्यास हा झोकांड्या या सदरात जातो आहे हे जाणवूनही त्या संगीताच्या तालावर झुलण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. आणि मला अजून एक गोष्ट जाणवली की माझ्या मनात आधीपासून असलेली, पिझ्झा हटमधील अनपेक्षित नाचण्यामुळे अजून घट्ट बसलेली नाचण्याविषयीची अढी त्या वाकड्या उतारावर मला नाचता येत नसूनही करत असलेल्या झुलण्यामुळे किंचित सैल झाली होती.

Tuesday, September 3, 2019

Abide With Me

परवा सकाळी डोक्याने एक मोठी रोलरकोस्टर राईड पूर्ण केली. पण तिची गंमत तुम्हाला सांगण्यासाठी थोडं मागे जावं लागेल.

गेल्या वर्षी हेमंत राजोपाध्येने फेसबुकवर एक लिंक शेअर केली होती. इराणच्या कुठल्यातरी दऱ्याखोऱ्यात लोक जमले आहेत. पुरुष गायक लंबगोलाकार वर्तुळ करून बसले आहेत. मागे स्त्री गायिका आहेत. या सगळ्यांच्या अवतीभवती अनेक प्रेक्षक आहेत. सर्व गायकांच्या हातात केवळ उकुलेले सारखं एक वाद्य आहे. आणि तालासुरात ते एक गाणं म्हणत आहेत. गाण्याचे बोल कळत नव्हते. पण गाणं मनाला वेड लावून गेलं होतं. कितीतरी दिवस तेच तेच गाणं रिपीट मोडवर लावून ऐकत होतो. गाण्याचे बोल, त्यांचा अर्थ मिळावा म्हणून इथल्या अनेक मित्रांशी संपर्क साधला. पण कुणाकडून गाण्याचे बोल किंवा त्याचा अर्थ मिळाला नाही. तरीही त्यातील ‘या अली, हैदर हैदर हैदर मदत’ हे शब्द समजत होते. गाणं म्हणणारे इराणी असावेत त्यामुळे गाण्याचा आणि नाद ए अलीच्या दुवाचा संबंध मी मनातल्या मनात लावून मोकळा झालेलो होतो. अजूनही मला गाण्याचा अर्थ कळलेला नाही. कुणी जाणकार मित्र तो सांगतील तर मी त्यांचा उपकृत राहीन. या नाद ए अलीच्या दुवाबरोबर थोडं अजून मागे जातो. 



माझी दहावीची का बारावीची परीक्षा झाली होती. माझी सगळ्यात धाकटी मावशी घरी आली होती आणि तिने पिक्चरला जाऊया असा आग्रह केला. म्हणून कधी नाही ते बाबांनी आम्हाला पिक्चरला नेलं. चित्रपट होता अजूबा. त्यातील ऋषी कपूर कुठे अडकला की ‘या अली कर मदद’ असं म्हणायचा आणि सगळ्या गोंधळातून तरून जायचा. त्यानंतर कित्येक वर्ष अडचणीत सापडलो की या अली कर मदद म्हणणारा ऋषी कपूर आठवायचा.

नंतर थोडं वाचन वाढलं तसं इस्लाममधील उहुद आणि खैबरच युद्ध, त्यातील नाद ए अलीची दुवा, शियांसाठी पवित्र असलेल्या अलींना मदतीसाठी हाक मारणं वहाबी सुन्नींना का पटत नाही ते वाचलं. म्हणजे बहुतेक ऋषी कपूरचं पात्र शिया असावं असा कयास बांधला. आणि इस्लाममध्ये शेवटचा उपाय म्हणून सुन्नी मुसलमान अल्लाहला हाक मारणं योग्य समजतात तर शिया मात्र अलीला हाक मारण्यात काही चूक समजत नाहीत अशी खूणगाठ मनात बांधली.

लगान चित्रपटातील माझं ऐकायला अतिशय आवडतं पण चित्रीकरणात मात्र पीटीचे प्रकार केल्यासारखं वाटल्यामुळे बघायला न आवडणारं ओ पालनहारे गाणंही त्याच प्रकारचं आहे. आता मॅच हरणार असं वाटू लागलेले गावकरी एकत्र येऊन

है पथ में अंधियारे
दे दो वरदान में उजियारे;
म्हणतात तेव्हा त्यातील याचना, आर्तता मनाला भिडते आणि त्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून प्रेक्षकांची मनोदेवताही भुवनच्या बाजूने कौल देऊन टाकते.

सीमा चित्रपटातील तू प्यार का सागर है या गाण्यातील,
घायल मन का पागल पंछी उड़ने को बेकरार
पंख हैं कोमल, आँख है धुंदली,
जाना है सागर पार अब तू ही इसे समझा,
राह भूले थे कहाँ से हम;
या कडव्यातील आर्तता मला ‘या अली कर मदद’ सारखीच वाटू लागते.

एकंदरीत अडचणीत असलो की दैवी शक्तीला हाक मारावी ही सगळ्या मानवी समाजात रूढ असलेली पद्धत आहे. मी स्वतः देव मानत नसलो तरी कित्येकदा अडचणीच्या वेळी निर्णय कसा घ्यावा म्हणून माझ्या मनोदेवतेला साद जरूर घातली आहे.

परवा सकाळी न्यायमूर्ती फली नरिमन यांचं एक भाषण ऐकत चाललो होतो. विषय बघितला नव्हता. फक्त फली नरिमन आहेत हे बघून भाषण चालू केलं आणि फोन खिशात टाकून चालायला सुरवात केली. आणि अनपेक्षितरित्या डोक्याला जी काही मेजवानी मिळाली की ज्याचं नाव ते. 



भाषण गांधीजींवर होतं. अनेक धर्म, पंथ - उपपंथ असलेल्या प्राचीन भूमीतून नवीन जगात पाऊल ठेवू शकेल असं राष्ट्र घडवताना गांधीजींनी वापरलेल्या सर्व धर्मांच्या प्रार्थनासभांचा प्रयोग याबद्दल नरिमन यांनी विवेचन केलं होतं.

भारतात एकाच वेळी नांदणारे विविध धर्म, त्यांचे विभिन्न रितीरिवाज, त्यांच्या विविध परंपरा आणि त्यांचा परस्परविरोधी कारवायांचा आणि शोषणाचा इतिहास या कच्च्या मालातून एकसंध राष्ट्र तयार करणे म्हणजे शिवधनुष्य होते. आणि ते उचलण्यासाठी गांधींजीनी आपली संपूर्ण क्षमता वापरली. त्यांच्या अनेक विचारांचा आपल्या घटनेवर प्रभाव आहे. हे आणि यासारखे अनेक मुद्दे अतिशय ओघवत्या शैलीत आणि ससंदर्भ मांडून नरिमन यांनी श्रोत्यांना गांधींजींच्या मनोवस्थेची आणि त्यांच्यापुढील आव्हानांची प्रचीती दिली. संपूर्ण भाषणाचं सूत्र म्हणून त्यांनी स्कॉटिश धर्मगुरू हेन्री फ्रान्सिस लायेट यांनी रचलेलं Abide With Me हे भजन (hymn) वापरलं होतं. नरिमन यांनी त्यातली तीन कडवी उद्घृत केली. माझी उत्सुकता चाळवली गेली. म्हणून यूट्यूबवर भजन शोधलं आणि मग इंटरनेटवर त्याची माहिती वाचली. टीबीच्या आजारामुळे अंथरुणाला खिळले असताना अखेरच्या काही दिवसांत लायेट यांनी हे भजन रचलं होतं. 



जरी हे भजन एका भक्ताने आपल्या वैयक्तिक दुःखावर विजय मिळवण्यासाठी रचलेलं होतं तरी त्याचा गाभा इतका सुंदर आहे की केवळ धार्मिकच नव्हे तर सैनिकी समारंभातही याचा वापर जगभर केला जातो. आणि जगाचं नेतृत्व करणाऱ्या अनेक नेत्यांचं हे आवडतं भजन आहे. गांधीजी त्यातील एक. दर वर्षी २९ जानेवारीला दिल्लीला प्रजासत्ताक सोहोळ्याची सांगता करताना आपल्या तिन्ही सैन्यदलांचे बँड एकत्र येऊन हेच भजन वाजवतात 



मी त्या भजनाचं भाषांतर केलं नसून स्वैर रूपांतर केलं आहे. पण मूळ ख्रिस्ती भजनाच्या गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. मूळ भजनाचे इंग्रजी शब्द त्याखाली दिले आहेत.

माझी साथ सोडू नकोस, संध्याकाळ वेगाने होते आहे. अंधार सगळीकडे दाटून येतो आहे अशा वेळी हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस. जेव्हा मदतीचा ओघ आटत चालला आहे, समाधान लोप पावते आहे, अशा वेळी हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस. असहाय्याला सहाय्य कर.

जेव्हा पृथ्वीवरची सगळी सुखे कोमेजू लागली आहेत, अंत वेगाने जवळ येतो आहे, विजय दूर जातो आहे, सारं काही वेगाने बदलताना दिसतं आहे तेव्हा कधी न बदलणाऱ्या परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

माझी याचना आहे की माझ्याकडे केवळ कटाक्ष टाकू नकोस, केवळ सांत्वनपर शब्द बोलू नकोस, जसा तुझ्या शिष्यांसोबत राहिलास घरच्यासारखा, सहनशील तसाच माझ्यासोबत रहा.

तुझ्या सर्वशक्तिमान रुपात रोंरावत येऊ नकोस. प्रेमळ आणि चांगला, ज्याच्या पंखांवर सगळे उपाय आहेत, माझ्या दुःखासाठी अश्रू आहेत आणि माझ्या वंचना ऐकण्यासाठी हृदयात जागा आहे, असा पाप्यांनाही जवळ घेणारा होऊन ये.

माझ्या शैशवात तू माझ्यावर कृपा ठेवलीस. नंतर तारुण्यात मी बंडखोर झालो. मी तुला सोडलं तरी तू मला सोडलं नाही. आणि आता या शेवटच्या क्षणी हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी मला तू जवळ हवा आहेस. तुझ्या कृपेने मी सगळ्या आमिषांपासून दूर राहू शकेन. तुझ्याशिवाय मला दुसरा कोण चांगला मार्गदर्शक असू शकेल. हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

तुझा वरदहस्त माझ्यापाठी असेल तर मला कळीकाळाचीही भीती नाही. वाईट गोष्टी नाहीश्या होतील. अश्रूंतील कडवटपणा नाहीसा होईल. मृत्यू असो वा अनंतकाळाची वेदना, तुझी साथ असेल तर मीच विजेता होईन.

तुझा कृपाहस्त माझ्या मिटणाऱ्या डोळ्यांवर ठेव. झाकोळणाऱ्या दुःखाला बाजूला सारून मला रस्ता दाखव, मंगलाचा प्रकाश पडू दे माझ्यावर आणि अमंगलाच्या वाईट सावल्या हटव माझ्यावरून. माझ्या जीवनात आणि माझ्या मृत्यूत हे परमेश्वरा माझी साथ सोडू नकोस.

भजनाचे शब्द असे आहेत.

Abide with me; fast falls the eventide;
The darkness deepens; Lord with me abide.
When other helpers fail and comforts flee,
Help of the helpless, O abide with me.

Swift to its close ebbs out life's little day;
Earth's joys grow dim; its glories pass away;
Change and decay in all around I see;
O Thou who changest not, abide with me.

Not a brief glance I beg, a passing word,
But as Thou dwell'st with Thy disciples, Lord,
Familiar, condescending, patient, free.
Come not to sojourn, but abide with me.

Come not in terror, as the King of kings,
But kind and good, with healing in Thy wings;
Tears for all woes, a heart for every plea.
Come, Friend of sinners, thus abide with me.

Thou on my head in early youth didst smile,
And though rebellious and perverse meanwhile,
Thou hast not left me, oft as I left Thee.
On to the close, O Lord, abide with me.

I need Thy presence every passing hour.
What but Thy grace can foil the tempter's power?
Who, like Thyself, my guide and stay can be?
Through cloud and sunshine, Lord, abide with me.

I fear no foe, with Thee at hand to bless;
Ills have no weight, and tears no bitterness.
Where is death's sting? Where, grave, thy victory?
I triumph still, if Thou abide with me.

Hold Thou Thy cross before my closing eyes;
Shine through the gloom and point me to the skies.
Heaven's morning breaks, and earth's vain shadows flee;
In life, in death, O Lord, abide with me.

हे भजन मी जर आधी ऐकलं असतं तर कदाचित इतका हेलावून गेलो नसतो. पण गांधींजींचं हे आवडतं भजन त्यांच्या आयुष्यात का महत्वाचं होतं याचा नरिमन यांनी ज्याप्रकारे अन्वयार्थ लावला ते ऐकताना मी भारावून गेलो. स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसववेणात आणि फाळणीच्या वणव्यात सगळीकडे एकाच वेळी उपस्थित राहू न शकलेल्या त्या महापुरुषाला या भजनाने किती आधार वाटला असेल ते जाणवून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. चालताना थांबून आधी त्या अश्रूंना मनसोक्त वाट करून दिली.

मग मनात विचार आला की केवळ गांधीजींच का? अपूर्व परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला (मग तो देव मानत असो किंवा नसो) भूतकाळ गाडताना, नवीन प्रथा पाडताना, भविष्यकाळ घडवताना जी असामान्य जबाबदारी उचलावी लागते ती पाहता आपण घेतलेले निर्णय भविष्यासाठी सुखकारक व्हावेत अशी इच्छा येताना, आपले मानवी सामर्थ्य किती तोकडे आहे हे जाणवले असताना; हे भजन खरोखर मनाला क्षणभर का होईना पण शांतता देऊ शकेल.

मग ते अफझलखानाला भेटायला निघालेले किंवा पुरंदरचा तह करणारे किंवा मग आग्र्याहून निसटणारे शिवाजी महाराज असोत, किंवा मुलींसाठी शाळा काढणारे फुले दाम्पत्य असो किंवा धर्मांतर करायचा निर्णय घेणारे बाबासाहेब असोत. या महापुरुषांनी आपल्या आयुष्यात जी विलक्षण जबाबदारी पेलली तिचा विचार करताना, जर दैवी शक्ती असेल तर तिने त्यांना आपलं पाठबळ द्यायलाच हवं असं माझ्या मनाला वाटून गेलं. आपल्याला कुठल्यातरी अज्ञात शक्तीकडून मदत मिळावी आणि आपल्या निर्णयाचं सोनं व्हावं म्हणून यांनी आपल्या मनोदेवतेला जर कुठली प्रार्थना केली असेल तर ती नक्कीच अशाच धर्तीवरची असेल असा विचार मनात आला .

विचारांच्या बरोबर धावत असताना मग एकदम जाणवलं की, केवळ नेतेच नव्हे तर आपण सर्वजण आपल्या आयुष्यात अनेकदा अपूर्व परिस्थितीला सामोरे जात असतो. आपले निर्णय समाजावर परिणाम घडवू शकत नसले तरी आपल्या आसपासच्या जिवलगांच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम घडवणारे असतात. ते निर्णय बरोबर यावेत म्हणून आपल्यालाही प्रार्थना करायची असेल मग ती कुठल्या देवाला असो किंवा मनोदेवतेला तर तीही अशीच असावी. ज्यामुळे आपल्याला निर्णय घेण्यासाठी आणि ते राबवण्यासाठी मानसिक आधार मिळेल.

फली नरिमन यांच्या भाषणामुळे, लहानपणी अजूबातील या अलीपासून सुरु झालेला मदत मागण्याचा प्रवास मग अगम्य इराणी गाण्यातून ‘ओ पालनहारे’, ‘तू प्यार का सागर है’ चे टप्पे घेत शेवटी Abide with me पर्यंत जाऊन पोहोचला. माझी नाळ एका सूक्ष्म धाग्याने का होईना पण राष्ट्रपित्याशी जुळली आहे याचा मला आनंद झाला. सकाळी चालायला जाताना विषयाचं बंधन न ठेवता जे मिळेल ते ऐकायच्या माझ्या सवयीवर मी खूश झालो. आणि आनंद वाटला की वाढतो असं म्हणतात म्हणून मग ही पोस्ट लिहून मोकळा झालो.

Tuesday, March 19, 2019

My Way and Women's Day

परवा क्लासमधून घरी आलो. क्लासमधल्या काही अतिआगाऊ पालकांमुळे आणि फेसबुकवरील एका अतिउत्साही मित्रामुळे जरा डोकं तडतडलं होतं. आपण काहीतरी शांतपणे सांगत असताना समोरच्याने प्रत्येक गोष्टीत अगोचरपणा केल्यावर जशी चिडचिड होते त्या अवस्थेत होतो. बायकोला म्हणालो मला जरा शांत बसू द्या, डोकं शांत झालं की मग बोलतो. माझं काहीतरी बिनसलं असेल तर त्यावेळी शांत रहाणंच चांगलं असतं हे तिला आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे पक्कं माहिती आहे. त्यामुळे ती तिच्या कामात बुडून गेली. मोठा लेक अभ्यास करत होता आणि धाकट्याने टीव्हीवर पिक्चर लावला आणि त्याच्याबरोबर मीपण टीव्ही बघत बसलो. सिंग (Sing) नावाचा इंग्रजी ऍनिमेशनपट होता.



चित्रपटात एकही मनुष्य नाही. सगळी पात्र म्हणजे वेगवेगळे प्राणी. आपलं थिएटर लिलावात जाऊ नये म्हणून धडपड करणाऱ्या बस्टर मून नावाच्या कोआलाची आणि त्याला प्रेमळ साथ देणाऱ्या वेंधळ्या वृद्ध स्त्री सरडा सहाय्यकाची गोष्ट.

या कोआलाचं एक थिएटर असतं. आपल्या धूम ३ मधल्या जॅकी श्रॉफसारखं. आणि ते हातातून जाऊ नये म्हणून हा अनेक प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून एक हजार डॉलर्सचं पारितोषिक असलेली एक संगीत स्पर्धा आयोजित करतो. पण त्याची वृद्ध स्त्री सहाय्यक गोंधळ करते आणि तिच्या हातून दोन शून्य जास्त टाईप होतात. एक लाख डॉलर्सचं बक्षीस छापलेली पत्रक गावभर पसरतात. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्या प्रत्येक स्पर्धकाच्या वेगवेगळ्या गमती जमती, प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण तणाव, मोठमोठे अनपेक्षित अपघात आणि शेवटी बस्टरचं थिएटर दिमाखात लोकप्रिय होणं अशी कथा आहे. दोन तासात जवळजवळ साठ गाणी आहेत. त्यामुळे मी काहीशा निरुत्साहाने चित्रपट पहात होतो. डोकं इतकं वैतागलं होतं की रिमोट घेऊन टीव्ही बंद करावा इतकं साधं सुचेना. पण चित्रपट अर्ध्यावर आला आणि माईक नावाचा उर्मट पांढरा उंदीर गायला उभा राहिला. आणि इतका वेळ चित्रपट बघण्याचं सार्थक झालं. दिवसभराचा सगळा ताण निघून गेला. कारण माईक गात होता ते माझं अतिशय लाडकं गाणं आहे. 

फ्रॅंक सिनात्राने अजरामर करून ठेवलेलं हे गाणं १९६९ पासून ते आजतागायत जगभरात गाजतंय. विविध भाषांत याची भाषांतरं झाली. किमान पंधरा जगप्रसिद्ध गायकांना हे गाणं स्वतः गायचा मोह आवरला नाही. कित्येकवेळा चालायला जाताना मी आंद्रे रियूने व्हायोलिनवर सादर केलेलं हे गाणं ऐकून भारावून गेलेलो आहे. असं म्हणतात की या गाण्याने फ्रॅंक सिनात्राच्या करियरमध्ये इतका मोठा रोल बजावला की नंतर त्याला फ्रॅंक सिनात्राचं अँथेम सॉंग म्हणू लागले. नंतर सिनात्राला या गाण्याचा प्रचंड कंटाळाही आला. या गाण्याची अजून एक गंमत म्हणजे अमेरिकेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तेव्हा पहिला बॉल डान्स करण्यासाठी त्यांनी हेच गाणं निवडलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय असं विचारल्यावर सिनात्राच्या मुलीनी गाण्याच्या पहिल्या ओळी उद्घृत केल्या होत्या; And now, the end is near!

फ्रॅंक सिनात्रा करियरमध्ये कंटाळला होता. आर्थिक डबघाईला आलेला होता. आपला तरुण मित्र पॉल अँकाला तो म्हणाला की आता ही शेवटची रेकॉर्ड आणि मग मी संगीत क्षेत्राला रामराम ठोकणार. नंतर पॉल पॅरिसजवळच्या एका खेड्यामध्ये आपल्या घरी गेला होता आणि एका संध्याकाळी रेडियोवर त्याने एक फ्रेंच गाणं ऐकलं. त्या गाण्याची धून त्याला अतिशय आवडली आणि त्याने गाण्याचे हक्क विकत घेण्यासाठी प्रयत्न केले. नगण्य किमतीला लोकप्रिय फ्रेंच गायकाचं ते पडेल गाणं पॉलला विकत मिळालं. आणि त्याने सिनात्राला फोन केला, ‘मी तुझ्यासाठी गाणं शोधलंय’.

रात्री एक वाजता पॉल गाणं लिहायला बसला आणि जर सिनात्रा हे गाणं लिहील तर त्यात कुठले शब्द वापरेल असा विचार करत त्याने सकाळी पाचपर्यंत गाणं पूर्ण केलं. मूळ फ्रेंच गाणं आयुष्यात तोचतोचपणा आल्याने प्रेम सुकून गेलेल्या शुष्क नात्यातील दिखाऊपणाबद्दल होतं पण पॉलने केवळ चाल तीच ठेवून गाण्याचा गाभाच बदलून टाकला. आता ते गाणं होतं एका कृतार्थ म्हाताऱ्याचं. ज्यांच्या आयुष्याची शेवटची संध्याकाळ आहे. मृत्यूची वाट बघताना त्याला गतायुष्य आठवतंय. त्या सिंहावलोकनात ताठ कण्याचा तो वृद्ध म्हातारा म्हणतो आहे की

And now, the end is near
And so I face the final curtain
My friend, I'll say it clear
I'll state my case, of which I'm certain

I've lived a life that's full
I've traveled each and every highway
And more, much more than this
I did it my way

Regrets, I've had a few
But then again, too few to mention
I did what I had to do
And saw it through without exemption

I planned each charted course
Each careful step along the byway
And more, much more than this
I did it my way

Yes, there were times, I'm sure you knew
When I bit off more than I could chew
But through it all, when there was doubt
I ate it up and spit it out
I faced it all and I stood tall
And did it my way

I've loved, I've laughed and cried
I've had my fill, my share of losing
And now, as tears subside
I find it all, all so amusing

To think I did all that
And may I say, not in a shy way
Oh no, no, not me
I did it my way

For what is man, what has he got?
If not himself, then he has naught
To say the things he truly feels
And not the words of one who kneels
The record shows I took the blows
And did it my way

And did it my way




आता माझा अंत जवळ आला आहे. पडदा पडायची वाट बघतो आहे. माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्याची गोष्ट तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो.

मी भरभरून आयुष्य जगलो. वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आणि मनापासून जगलो.

क्वचित कधी पश्चात्ताप झाला. पण असे प्रसंग नगण्य. पण मला हवं तेच केलं आणि सगळ्या परिणामांना न घाबरता सामोरा गेलो.

माझा रस्ता मीच आखला. आणि माझी दिशा मीच ठरवली. आणि मी मनमुराद जगलो.

कधी कधी मी मोठे घास घेतले. पण शक्य तितके पचवले आणि नाही तेव्हा टाकून दिले. पण माझ्या निर्णयांशी खंबीर उभा राहिलो.

प्रेम केलं, हसलो, रडलो, जिंकलो आणि हरलो सुद्धा. आता अश्रू सुकल्यानंतर मागे वळून बघतो तेव्हा सगळं फार विलोभनीय दिसतं आहे.

आता हे सगळं मीच केलंय असं सांगताना मी लाजणार नाही. कारण मी माझ्या मनमुराद जगलो आहे.

कारण हे माझं आयुष्य आहे. आणि ते नाकारण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? मी कधी झुकलो नाही आणि कधी शब्द गिळले नाहीत. मी झेललेल्या घावांच्या खुणा साक्ष आहेत की मी मनमुराद जगलो.

कसला दणदणीत म्हातारा आहे.मनमुराद जगणारा आहे पण बेबंद नाही. बेदरकार आहे पण बेजबाबदार नाही.

हे गाणं ऐकताना मला नेहमी हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सी मधला म्हातारा आठवतो. समुद्रावर एकटा जाणारा. मर्लिन मासा गळाला लागला म्हणून खूष होणारा. माशाला पकडून किनाऱ्यावर आणण्यासाठी उन्हातान्हात भर समुद्रात जाड दोरखंड पकडून बसणारा. हाताला रग लागली तरी दोरखंड न सोडणारा. माशाला किती त्रास होत असेल म्हणून विचार करणारा. त्याच्याशी गप्पा मारणारा. म्हातारपणी मी कसा असावा त्याचा विचार करताना मला कायम हाच म्हातारा आठवतो.

अर्थात भारतीय समाजाच्या चौकटीत अनेक मध्यमवर्गीयांना इतकं छान मनमुराद जगता येणार नाही याची मला कल्पना आहे. जर पुरुषांची ही कथा तर इथल्या स्त्रियांना असं जगता येईल याची शक्यता अगदीच नगण्य.अर्थात आता हे गाणं गायिकांनीही गायला सुरवात केली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना असं जगायला हवं ही इच्छा सगळ्यांच्या मनात तयार होईलंच. कारण कुठलीही गोष्ट प्रत्यक्षात येण्याच्या आधी कल्पनेत अवतरते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे बेजाबदार न होता मनमुराद जगण्याची संधी आपल्याकडील सर्व स्त्री पुरुषांना मिळावी हीच आजच्या महिला दिनाची सदिच्छा.

आपल्या अगोचरपणामुळे मला वात आणणाऱ्या पालकांना आणि फेसबुक मित्रालाही धन्यवाद कारण त्यांनी मला वात आणला नसता तर मी परवाच्या मंगळवारी सिंग चित्रपट पाहिला नसता, मग कदाचित मला माझं लाडकं गाणं चटकन आठवलं नसतं आणि माझ्या लाडक्या गाण्याने माझ्या मनात रंगवलेल्या म्हाताऱ्याला विसरून मी उगाच घरच्यांवर डाफरत बसलो असतो.

Friday, November 23, 2018

भंवरे ने खिलाया फूल

प्रत्यक्ष आयुष्यात आणि इथे फेसबुकवरही माझं मित्रवर्तुळ फार मोठं नाही. पण या मर्यादित मित्रवर्तुळातील खूपजण मला सांगतात की त्यांना माझा फेसबुकवरचा वावर आवडतो. जे असं सांगत नाहीत ते केवळ भिडस्तपणामुळे सांगत नसतील अशी माझी समजूत आहे. यापूर्वी मला ते माझं कौतुक वाटून मी सुखावत असे. आणि खोटं कशाला बोला पण थोडासा गर्वही अनुभवत असे. पण आज सकाळी बायकोशी बोलत होतो. या महिन्यात येऊ घातलेल्या लग्नाच्या वाढदिवसासाठी तिला काय भेट द्यायची त्याबद्दल बोलत असताना ती पटकन म्हणाली ‘आनंद, फेसबुकवर लिहू लागल्यापासून तू खूप बदलला आहेस. आधीपेक्षा खूप कमी आक्रस्ताळा आणि शांत झाला आहेस. छान वाटतं तुझ्याशी बोलायला.’ 

भेटवस्तूचा निर्णय झाला. ती तिच्या कामाला लागली. आणि मी माझ्या. पण तिचं माझ्या स्वभावाबद्दलचं निरीक्षण डोक्यातून जाईना. त्याबद्दल विचार करत असताना मला लहानपणी न आवडलेलं एक गाणं आठवलं.

माझ्या जन्माच्या आसपास राजकपूर साहेबांनी समस्त जगाला ‘सत्यं शिवं सुंदरं’ चा साक्षात्कार घडवला असल्याने आणि मी टीपकागदासारखा सगळं काही टिपून घेत असल्याने माझ्या संस्कारक्षम मनाची अतिकाळजी करणाऱ्या माझ्या तीर्थरुपांनी राजकपूरचं आमच्या घरातील राज्य संपवून टाकलं होतं. अर्थात थोडा अजून मोठा झाल्यावर, घरी व्हीसीआर असलेल्या आणि आई बाबा दिवसभर बाहेर असणाऱ्या मित्रांशी दोस्ती करून मी अपुरे संस्कार पूर्ण करून घेतले तो भाग सोडा. पण साधारणपणे १९८२-८३ मध्ये आरके स्टुडिओजचा प्रेमरोग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी रेडिओवर लागत असत. आणि आमचे चाळकरी स्वार्थी नसल्याने ज्यांच्याकडे रेडिओ होते त्या सर्वानी प्रेमरोगची गाणी आमच्याकडून पाठ करून घेण्याची जबाबदारी स्वतःवर असल्याप्रमाणे आपापल्या रेडिओचे आवाज कायम टीपेला पोहोचलेले ठेवून आम्हाला ती गाणी ऐकवली. त्यातली गाणी, गाणी कमी आणि कविता जास्त असल्याने; पाठ होणं कठीण होतं. पण कळत नसूनही एका गाण्याचं धृवपद कायम मनात रेंगाळत राहिलं. ‘भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राज कुंवर’.


कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारताना या गाण्याच्या ध्रुवपदाचा मी लावलेला अर्थ आठवला.

मुलगी जर फूल असेल (मराठीतील फूल, इंग्रजीतील नाही) तर तिच्या जन्मापासून तिचे आई-वडील, भाऊ-बहिणी, काका-मामा-मावश्या, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी जणू तिच्यासाठी त्या भुंग्याचं काम करतात. तिच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलतात. तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. आणि मग कुणीतरी या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतं. इतक्या सगळ्यांनी फुलवलेलं व्यक्तिमत्व मग हा प्रियकर आपल्यासोबत घेऊन जातो.

पण याचा अर्थ कायम मुलगी फूल आणि मुलगा राजकुमार असा करता येणार नाही. प्रेयसी भेटायच्या आधी मुलगादेखील एक उमलणारं व्यक्तिमत्व असतं. आणि त्याच्या साथी सोबत्यांबरोबर राहून तो घडतो. मग कुणी मुलगी त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडून त्याला आपला जोडीदार बनवते. त्या व्यक्तिमत्वाचे फायदे ती उपभोगते किंवा मग तोटे सहन करते. म्हणजे जगाला जरी माहेर सोडून सासरी जाणारी मुलगी म्हणजे फूल आणि तिचा नवरा म्हणजे राजकुमार वाटला तरी प्रत्यक्षात ते दोघे एकाचवेळी फूल असतात आणि राजकुमारदेखील.

कॉलेजच्या ग्रुपमध्ये सएकही सुबक ठेंगणी नसल्याने डोळ्याच्या पापण्यांची पिटपिट वगैरे माझ्या नशीबात नव्हतं. त्यामुळे माझ्या मित्रांनी म्हटलेल्या ‘बरं’ या एकमेव प्रतिसादाचा अर्थ समजून मी माझा उत्साह आवरता घेतला होता.

पण आज लग्नाच्या वाढदिवसाच्या आसपास असताना, बायकोच्या वाक्यामुळे मला त्याच ध्रुवपदाचा थोडा अजून वेगळा अर्थ लागला.

मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी फूल आणि राजकुमार तर असतातंच. पण ते केवळ काही काळापुरते. एकदा ते एकमेकांच्या आयुष्यात सातत्याने आले की त्यांची फुलाची भूमिका संपत नसली तरी राजकुमाराची भूमिका मात्र संपते. आणि त्यांच्याही नकळत ते एकमेकांसाठी भुंग्याच्या भूमिकेत शिरतात. एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ लागतात. यातून तयार होणारे व्यक्तिमत्व मग अजून नवनवीन मित्र मैत्रिणी तयार करते. आणि मग ते मित्र मैत्रिणी म्हणजे तात्पुरते राजकुमार बनतात. त्यातले जे आयुष्यात दीर्घकाळ राहतात, त्यांचीही राजकुमाराची भूमिका तात्पुरती असते. मग तेही आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत आपला वाटा उचलतात.

म्हणजे जर माझ्या प्रेयसीला मी आवडलो तर त्यात माझ्या विवाहपूर्व आयुष्यातील नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा मोठा हात असावा. आणि इथे कुणाला माझा वावर आनंददायी वाटत असेल तर त्यात माझ्या बायकोचाही मोठा हात असावा. आणि आता जर तिला माझ्यातील आक्रस्ताळेपणा कमी झाल्यासारखा वाटत असेल तर त्यात माझ्या फेसबुकवरील मित्रमंडळींचाही मोठा हात असावा.

असलं काहीतरी सुचलं आणि ते मी बायकोला ऐकवलं तर तिनेही ‘बरं’ असा प्रतिसाद देऊन ‘भेटवस्तूची यादी अजून फायनल नाही. काही सुचलं तर उद्या सांगते.’ असा धक्का दिला. या धक्क्याने माझ्या व्यक्तिमत्वाला काय आकार मिळेल कुणास ठाऊक?

Monday, June 11, 2018

Wonderful Wonderful

विशीत पदार्पण करायच्या आधी मी प्रेमविवाहातला अर्धा भाग पूर्ण करून प्रेमात पडलो होतो. विवाह करायचा होता पण त्याआधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं बाकी होतं. त्यावेळी माझ्या तत्कालीन प्रेयसीवर (जिला चार वर्षे चाललेल्या कोर्टशिपनंतरही माझा कंटाळा न आल्याने किंवा चार वर्षात माझा इतका धाक बसला की नंतर माझ्याशी विवाह करण्यास नकार देऊ न शकल्याने जी पुढे माझी अर्धांगिनी बनली आणि माझ्या पूर्ण आयुष्यावर जिने ताबा मिळवला) इम्प्रेशन मारण्यासाठी भरपूर बडबड करत असे. एकदा बोलता बोलता तिला सहज म्हणालो होतो की ‘We are the history of future’. ते वाक्य माझं मलाच आवडलं. त्यामुळे मग अजून एक जाणीव झाली की पुढे छान भविष्य हवं असेल तर आज छान काम करायची जबाबदारी आपल्यावर आहे. मग तर अशी सवयंच झाली की पुढे काय हवं ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करायचा.
त्यात कित्येकदा असं व्हायचं (आणि अजूनही होतं) की मला दिसणारं भविष्य मी इतरांना सांगू शकायचो नाही. तिकडे कसा काय पोहोचणार तेही मला नीट कळलेलं नसायचं, पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी उतावीळ झालेलो असायचो. त्यामुळे मग मी घरातल्यांवर आणि विशेषतः सप्तपदी करून आलेल्या माझ्या प्रेयसीवर झटकन चिडायचो. पण बहुतेक माझ्या बायकोचं गोत्र विश्वामित्र किंवा जमदग्नी असावं. कारण तिनेही प्रत्येक वेळी न चुकता ‘शस्त्राघाता शस्त्रची उत्तर’ हा न्याय वापरला. दोघांपैकी एकाला अंधुक दिसणाऱ्या आणि शब्दात पकडता न येणाऱ्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायचं कसं? या समस्येमुळे आम्ही एकमेकांना ज्या प्रेमादराने शहाण्यांत काढायचो की ‘प्रेमविवाहाचे फायदे तोटे’ या विषयावर आम्ही दोघे तीन तासाचा द्विपात्री कार्यक्रम करून; ‘आपण प्रेमविवाह करावा’, असं तरुणांना आणि ‘आपल्या लेकाने / लेकीने प्रेमविवाह करू नये’ असं त्यांच्या पालकांना एकाच वेळी पटवू शकतो.

आता माझ्या अर्धांगाने जितकं आयुष्य तिच्या माहेरी काढलं जवळपास तितकंच आयुष्य माझ्याबरोबर पूर्ण करून झालं आहे. मनाने आम्ही दोघं अजूनही विशीतंच असलो तरी अनुभवांनी आता चाळिशी गाठलेली आहे. दोन मुलांची काळजी घेताना आम्हा दोघांनाही भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमातील No First Use policy चं महत्व पटलेलं आहे. आता ‘जिंकू किंवा मरू’ चा आवेश सरलेला आहे आणि ‘हानी न होवो, होवो शुभंकर’ अशी नवी ओळ आम्ही गदिमांच्या समरगीतात घुसडून तहाचं निशाण कायम हाताशी ठेवतो आहोत. आता आम्हाला आमचं भविष्य अगदी स्पष्ट दिसत नसलं तरी ते जितकं दिसतं तितकं आपल्या जोडीदाराला कुठल्या शब्दांत मांडलेलं अधिक चांगल्या प्रकारे समजेल याचा बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे.

अजून काही आयुष्याचं सिंहावलोकन करण्याची वेळ आलेली नाही पण मध्यंतरी बायको एक इंग्रजी टीव्ही सिरीयल बघत होती. बरेच दिवस (खरं तर बरीच वर्ष) चाललेली ती सिरीयल एकदाची संपली. सिरीयल बघताना नंतर बायको कंटाळूनही गेली होती. मधले कित्येक बेचव भाग सहन करून शेवटी जेव्हा ती सिरीयल संपली तेव्हा नेमका मी घरी होतो. ही सिरीयल बघत होती आणि मी फेसबुकवर टाईमपास करत होतो. एकाएकी थोड्या राकट पुरुषी आवाजातलं गाणं घरात वाजू लागलं. त्या आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. गाणं फार मस्त होतं. चटकन आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं.

मग माझ्या स्वभावाला अनुसरून ते गाणं, त्याचे बोल इंटरनेटवर शोधणं वगैरे उद्योग केले. आणि त्या गाण्यामागच्या कल्पनेने मला मोहून टाकलं.

आयुष्याची संध्याकाळ आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पाखरांना दिलेल्या बळाचं त्यांनी चीज केलं आहे. कृतकृत्य म्हातारा आणि म्हातारी एकटे एकमेकांच्या सोबतीने रहात आहेत. आणि अशात एके दिवशी म्हातारा आपल्या सुरकुतलेल्या म्हातारीला उद्देशून म्हणतो की,

‘बाई गं, कधी कधी समुद्रकिनाऱ्यावरून हातात हात घालून चालताना जेव्हा मी तुझं चुंबन घेतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मोकळ्या आकाशाखाली, एखाद्या टेकडीवर जेव्हा मी तुला मिठीत घेतो आणि त्यावेळी त्याक्षणी तिथे केवळ आपण दोघेच असतो तेव्हा मिळणारा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असतो. मला जाणवतं की हे जग अनेक आनंददायी गोष्टींनी भरलेलं आहे पण तू जर जवळ नसशील तर त्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही. काही शांत संध्याकाळी जेव्हा आपण दोघे एकमेकांशेजारी बसलेलो असतो तेव्हा माझ्यावर तू करत असलेल्या प्रेमाची प्रभा तुझ्या चेहऱ्यावर दिसते आणि त्यावेळी मी किती मोठ्या भाग्याचा धनी आहे ते मला जाणवतं. आणि मग मी म्हणतो की बाई गं, तू आहेस म्हणून सगळं आनंददायी आहे. ‘

Sometimes we walk hand in hand by the sea
And we breathe in the cool salty air,
You turn to me with a kiss in your eyes
And my heart feels a thrill beyond compare
Then your lips cling to mine, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love.

Sometimes we stand on the top of a hill
And we gaze at the earth and the sky
I turn to you and you melt in my arms
There we are, darling, only you and I
What a moment to share, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love

The world is full of wondrous things it's true
But they wouldn't have much meaning without you

Some quiet evenings I sit by your side
And we're lost in a world of our own
I feel the glow of your unspoken love
I'm aware of the treasure that I own
And I say to myself, it's wonderful, wonderful
Oh, so wonderful my love!


आपल्या समाजातील वृद्धांना संध्याछाया भिववू लागल्या की भक्तीरस, अध्यात्म यात गोडी निर्माण व्हावी अशी आपल्या समाजाची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा इतकी प्रखर असते की म्हातारा आणि म्हातारी एकमेकांवर अजूनही प्रेम करत असतील ही कल्पनाही आपण करू शकत नाही.

आपले कृतकृत्य वृद्ध बहुतेकदा एकारलेले असतात. किंवा मग ‘लाख चुका असतील केल्या’ असं म्हणत पश्चात्तापदग्ध असतात. किंवा मग ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी आर्जवे करत आपल्या दूर गेलेल्या पाखरांच्या आठवणीत दुःखी असतात. किंवा मग ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ असं म्हणत जोडीदाराऐवजी विश्वाबरोबर आपले अद्वैत अनुभवायचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी या इंग्रजी म्हाताऱ्याचे शब्द ऐकले तेव्हा आत कुठेतरी सुखावलो. माझा पिंड जरी भारतीय मातीतला असला, इथल्या तत्वज्ञानाने जरी मला वेळोवेळी साथ दिली असली तरी प्रेमविवाह केल्याने आणि आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतःवर आहे हे जाणवल्याने; आयुष्याच्या संध्याकाळी माझी नाळ विश्वाच्या पसाऱ्याशी, किंवा उडून गेलेल्या चिमण्यांशी जोडण्याऐवजी किंवा केलेल्या चुकांबद्दल माफी मागत राहण्याऐवजी, घेतलेल्या योग्य निर्णयांना आनंददायी करण्याचं श्रेय आपल्या म्हातारीला देणारा म्हातारा मला जास्त जवळचा वाटतो.

We are the history of future हे मला जाणवलेलं सत्य आहे. म्हणून भविष्याला छान करण्यासाठी आज छान काम करणं माझी जबाबदारी आहे हे मला मान्य आहे. आयुष्याच्या संध्याकाळी कुठलं गाणं म्हणायचं आहे ते मला सापडलं आहे. त्यामुळे कदाचित माझं आजचं वागणं अजून सजग होईल या जाणीवेने मी खूष झालोय. Life is wonderful आणि ते wonderful का आहे त्याचं एक कारण मला कळलं आहे.

Wednesday, March 28, 2018

टिरीटोम्बा टिरीटोम्बा


डिसेंबर २०१७ मध्ये तुंबाडचे खोत या महाकादंबरीची, राव्हेल या फ्रेंच संगीतकाराच्या बोलेरो या रचनेशी संगती लावणारी चार भागांची मालिका लिहिली होती. त्यावर प्रतिसाद देताना माझे सन्मित्र अनिल गोविलकरांनी आंद्रे रिऊ (André Rieu) या डच व्हायलनिस्ट आणि ऑर्केस्ट्रा कंडक्टरच्या कार्यक्रमाची आठवण झाली अशी नोंद केली होती. त्याआधी आंद्रेच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ युट्युबवर बघितले होते. पण गोविलकरांनी सांगितले म्हणून जास्त लक्ष देऊन बघू लागलो.

केवळ संगीतावर भर न देता आंद्रे सादरीकरणालाही तितकेच महत्व देतो. त्याच्या ताफ्यातील कलाकार सगळेच हसत असतात, नाचणे, फटके मारणे, पडणे, खळखळून हसणे या सगळ्याला आपल्या संगीतात आंद्रे छानपैकी गुंफतो. त्याचा प्रचंड संख्येने उपस्थित असलेला प्रेक्षकवर्गही आंद्रेच्या कार्यक्रमात टाळ्या वाजवतो, सुरात सूर मिसळतो, उत्स्फूर्तपणे नाचतोदेखील; पण सगळं कसं शिस्तीत. त्यामुळे आंद्रेचा कार्यक्रम केवळ श्रवणभक्तीचा न रहाता बघण्यालायक असतो.

आंद्रेच्या कार्यक्रमाची प्लेलिस्ट लावून काम करत बसलो असताना, एकदा एक उडत्या चालीचं गाणं लागलं. कामाची विंडो मिनिमाईझ करून आंद्रेचं सादरीकरण बघू लागलो. नेहमीप्रमाणे आंद्रे आणि कलाकार रंगात आलेले होते. गाणं मला खूप आवडलं होतं. एक शब्द पुन्हा पुन्हा वापरून गाण्यात नुसती धमाल चालली होती. भाषा कुठली होती ते न कळल्याने माझ्यासाठी गाण्याचा अर्थ अगम्य होता. पण प्रेक्षक आणि कलाकार सगळ्यांच्या चेहऱ्यावरील खळाळत्या हास्यामुळे काहीतरी मजेदार प्रकार होता इतकंच मला कळलं होतं. गाण्यात पुन्हा पुन्हा वापरला जाणारा शब्द होता टिरीटोम्बा (tiritomba). गाण्यात मध्येच किशोरकुमारच्या पद्धतीने यॉडलिंगदेखील केलेलं होतं. नंतर ते गाणं अनेकवेळा ऐकलं. घरच्या मंडळींना कंटाळा येईपर्यंत टिरीटोम्बा टिरीटोम्बा गुणगुणणून झालं. शेवटी एकदा बायकोने वैतागून टिरीटोम्बाचा अर्थ विचारला. आणि गुणगुणणं बंद करून मी अर्थ शोधायच्या मागे लागलो. (नवऱ्याची बोलती कशी बंद करायची ते बायकोला चांगलं माहिती असतं यावरचा माझा विश्वास अजून वाढला आहे)

आता अर्थ शोधणं कठीण होतं. कारण भाषा वेगळी होती. कुठली होती ते कळत नव्हतं. शब्द समजत नव्हते. गाण्याचे बोल समोर नव्हते. फक्त टिरीटोम्बा माहिती होतं. मग गूगल बाबाला शरण गेलो. थोड्या शोधाशोधीनंतर कळलं की हे इटालियन लोकगीत आहे. कदाचित तिथल्या नेपल्स या शहरात याची पाळंमुळं असावीत. रोमन लिपीत लिहिलेले गाण्याचे बोल मिळाले. ते असे होते.

Sera jette, sera jette a la marina
Pe' trovà 'na 'nnamorata,
Janca e rossa, janca e rossa, aggraziata,
Fatta proprio pe' scialà.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Spassianno, spassianno pe' llà ttuorno
Sento fà 'no sordeglino.
Mme ne accosto, mme ne accosto chiù bicino
Pe' poterla smiccià.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Era bella, era bella, chiù che bella,
Parea stella de l'ammore.
Era chiuovo, era chiuovo che lo core
Te sa dinto spertusà.
Tiritomba, tiritomba,

Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Io la guardo, io la guardo ed essa ride.
Io la parlo, essa risponne.
E già stevo e già stevo miezo a ll'onne
De l'ammore p'affonnà.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

Quanno veco, quanno veco 'nnitto 'nfatto
Assommarme Tata 'nnante.
Co 'na mazza, co 'na mazza faudiante
Mme voleva dissossà.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

De carrera, de carrera scappo e sferro
Accossì da chelle botte.
Ma la bella, ma la bella juorno e note
Sempe 'ncore me starrà.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba n'è lu vero nio tè.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba a ll'aria va.

आंद्रेच्या कलाकारांनी सादर केलेलं गाणं ऐकत ऐकत कराओके करून झालं. पण अजून अर्थ सापडलेला नाही हे लक्षात होतं. म्हणून शोधाशोध चालू ठेवली. मग गूगलबाबा प्रसन्न झाले आणि अगदी समश्लोकी नाही म्हणता येणार पण Natalia Chernega यांनी केलेला आणि मूळ रचनेच्या वेगाशी मेळ खाणारा इंग्रजी अनुवाद मिळाला. आंद्रेचे कलाकार, स्वतः आंद्रे आणि हजारोंच्या संख्येने असलेला तो प्रेक्षकसमुदाय ह्या गाण्याच्या वेळी इतका खूष का होता ते अनुवाद वाचताना लगेच लक्षात आलं.

In the evening I've come to the seaside
To find a bride for myself,
A graceful blonde with rosy cheeks,
With whom I can live my life in joy.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

Walking and walking around,
I feel a desire to whistle.
I'm going nearer and nearer
To see a girl better.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

She was beautiful, more than beautiful,
She was like a star of love.
As if a thorn, as if a thorn
She has stuck into my heart.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

I'm looking at her and she is laughing,
I'm speaking with her and she is answering.
I've already lost myself
In the waves of love.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

Suddenly I see, suddenly I see
Her father, an enormous man.
Brandishing a stick,
He wants to beat me.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.

Rapidly I'm running away
And dodging his blows.
But the beauty night and day
Will be always in my heart.

Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.
Tiritomba, tiritomba,
Tiritomba is sounding in the air.



संध्याकाळची वेळ आहे. गुलाबी गालाच्या आणि सोनेरी केसाच्या स्वप्नसुंदरीच्या शोधात एक तरुण समुद्रकिनाऱ्यावरून चालला आहे. त्याच्या मनातील ओसंडून वाहणाऱ्या प्रेमामुळे त्याला वातावरणात एक उत्साह दाटून आलेला जाणवतो आहे. जणू सगळी सृष्टी त्याच्याबरोबर स्वप्नसुंदरीच्या शोधात निघाली आहे. गाणं म्हणते आहे. टिरीटोम्बा टिरीटोम्बा.

मग त्याला ती दिसते. त्याला शीळ घालावीशी वाटते. तिला जवळून बघण्यासाठी तो उतावीळ होतो. पुढे जाऊ लागतो. गाणं म्हणत ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’.

ती फार सुंदर आहे. फार फार सुंदर. ती प्रेमाचा तारा आहे. ती त्याच्या काळजात घुसलेला सुखद काटा आहे. आता तो फक्त एकंच गाणं म्हणतो आहे. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’.

तो तिच्याशी बोलतो तेव्हा ते हसते आहे. तो तिला प्रश्न विचारतो तेव्हा ती उत्तरं देते आहे. आणि प्रेमाच्या उसळणाऱ्या लाटात तो हरवून गेला आहे. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’

एकदम त्याला दिसतो तिचा बाप. मोठ्ठाला थोराड. हाती घेऊन काठी धावतोय त्याच्याकडे. आपल्या देखण्या लेकीच्या मागे लागलेल्या रोमिओला पळवून लावण्यासाठी. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’

आता तो पळू लागतो. बापाचे वार चुकवत. स्वप्नसुंदरीपासून दूर. पण ती संध्याकाळ तो कधी विसरणार नाही. तिचं सौंदर्य कायम त्याच्या स्मरणात राहील. ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’

तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलाचं परकीय भाषेतील हे गाणं ऐकताना मला एकदम जवळचं मराठी भाषेतील गाणं आठवलं. यातलं वर्णन इतकं तपशीलवार नाही आणि हे लोकगीत नाही. आहे खरंतर चित्रपटगीत. पण भावना तीच. इथे बाप आणि आई गाण्याच्या सुरवातीलाच येतात. आणि एका भजनाने गाणं संपतं.

चडवा तुझा बापूस लय खविस हाय गो
येतां जाता तुझ्यामागे तुझी आई साय गो
माका मातुर इतूर बितूर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो …।।

एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती …
नाक्यावरती पाहिली होती … मन्नामध्ये भरली होती ।।

तिचे गोरे गोरे गाल
तिचे काळे काळे बाल ।।
लचकत मुरडत चालली होती … पायली होती … चालली होती …
एक पोरगी….

वारियाने कुंडल हाले ।।
डोळे मोडीत राधा चाले ।।

एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती …
नाक्यावरती पाहिली होती … मनामध्ये भरली होती



हे गाणं आठवलं म्हणून मग युट्युबवर ऐकत बसलो आणि लहानपणी सकाळी शाळेची तयारी करताना रेडिओवर स्नेहल भाटकरांच्या आवाजात ऐकलेलं वारियाने कुंडल हाले आठवलं.

वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले
राधा पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा
हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा



यातलं ‘बैल दुभवी नंदाघरी’ चं न सुटलेलं कोडं आठवलं. दुभवीचा अर्थ जर दूध काढणे असेल तर मग साक्षात हरी बैलाचं दूध काढतोय असा अर्थ होतो. लहानपणी वाटायचं की नाथ महाराजांचं काहीतरी चुकलं असावं. बैलाचं दूध कसं काय काढणार. पण मग नाथांच्या एका पैची गोष्ट ऐकली आणि इतके काटेकोर नाथ महाराज अशी चूक करणार नाही याची खात्री पटली. असे असले तरीही आळस हा स्थायीभाव असल्याने, माझ्या लहानपणी इंटरनेट नसल्याने आणि गुणगुणायच्या आधी अर्थ माहिती करुन घे असा आग्रह धरणारी बायको लहानपणी नसल्याने तो प्रश्न तसाच सोडलेला होता. आता टिरीटोम्बाच्या उत्साहात ते कोडंपण सोडवावंसं वाटलं आणि वारियाने कुंडल हाले ऐकत पुढे शोधत राहिलो.

तेव्हा कळलं की राधा गौळण चालली आहे. वाऱ्याने तिच्या कानातील कुंडलं हलत आहेत. तिचे डोळे चंचल आहेत. ते पाहून हरी भुलले आहेत. आणि चक्क बैलाचं दूध काढायला बसले आहेत. हरीचं रूप पाहून राधाही भुलली आहे आणि रिकाम्या डेऱ्यात रवी घुसळून लोणी काढायला बसली आहे. त्या दोघांचे प्रेमात देहभान हरपले आहे आणि ते प्रेमात एकरूप झाले आहेत. मधुराभक्तीचा अर्थ दाखवणारी ही रचना वाचताना तिसऱ्या आणि पाचव्या ओळीत आजही अडकलो. रेडिओवर ऐकलेल्या गाण्यापेक्षा पाठभेद असलेल्या रचना नेटवर मिळाली.

वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले
राधा पाहून भुलले हरी । बैल दोहितो अपुल्या घरी
फणस जंबिर कर्दळी दाट । हाति घेऊन सारंगी पाट
हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना

यातलं जंबिर म्हणजे लिंबू हे कळलं आहे पण सारंगी पाट किंवा नारंगी फाटाचा काय अर्थ आहे तो काही अजून कळला नाही. इथे कुणाला माहिती असेल तर समजून घ्यायला आवडेल. आणि तो पटला तर पोस्ट एडिट करीन.

टिरीटोम्बाच्या नादात इतकं सगळं वाचलं काही कोडी थोडी उलगडली म्हणून खूष होतो आणि स्वतःच्या प्रेमाची आठवण झाली. माझी ही माझी लग्नाची बायको असल्याने ती माझी राधा नाही. आमच्याकडे बैल नाहीत आणि तिच्याकडे डेरा रवी वगैरे साधनं नाहीत. त्यामुळे हरपलेले देहभान कधी दाखवता आले नाही.

माझे सासरे खवीस नाहीत. मी माझ्या बायकोला मी नाक्यावर पाहिलं नाही. आणि तिला पाहण्याआधी किंवा नंतर नाक्यावर उभा राहिलो नाही. सी एच्या अभ्यासाने नाक्यावरची मजा करायची राहून गेली.

डोम्बिवलीत समुद्र नाही. मला शीळ घालता येत नाही. माझे सासरे मोठ्ठाले व थोराड नाहीत. त्यांच्याकडे रट्ट्टे हाणायला काठी नाही. त्यामुळे माझं ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’ म्हणायचं राहून गेलं.

लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली. जसजसा वाचू लागलो तसतसा पुनर्जन्मावरचा विश्वास कमी होत गेला. हे एकमेव आयुष्य आहे हा विश्वास वाढत गेला. पण आज पुनर्जन्मावर विश्वास ठेवावासा वाटतोय. किमान तीन पुनर्जन्म मिळावेत.

पहिल्या पुनर्जन्मात समुद्रकिनारी शीळ वाजवत जाताना सोनेरी केसांच्या गोड मुलीने हसून आपल्याशी बोलावं आणि काठी घेऊन धावत आलेल्या तिच्या बापापासून आपण पळत दूर जावं. पुन्हा ती कधी भेटली नाही तरी ती संध्याकाळ कायमची स्मरणात रहावी.

दुसऱ्या पुनर्जन्मात गोऱ्या गालांची काळ्या केसांची मुलगी नाक्यावरती दिसावी.

आणि तिसऱ्या पुनर्जन्मात ते बैल दोहण्याइतकं, रिता डेरा घुसळण्याइतकं एकरूपत्व अनुभवता यावं.

असं कधी होणार नाही हे माहिती आहे. पण आज खूप आनंद झाला आहे म्हणून आज त्या आनंदासाठी म्हणतो आहे ‘टिरीटोम्बा टिरीटोम्बा’.

Thursday, March 8, 2018

गाणी आणि वर्तमान (भाग ३.५)

----
----

जेव्हा आपल्या कलाकृतीचे किंवा विचाराचे किंवा रचनेचे विडंबन होते तेव्हा आपण उत्कृष्ट निर्मिती केली असं समजायला हरकत नसते.

काल गाणी आणि वर्तमान ही सिरीज पूर्ण केली. विषय थोडा नाजूक असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे कमी प्रतिसाद मिळाला. पण माझ्या काही आवडत्या गाण्यांची, सद्यकाळातील घटनांशी आणि समाजमाध्यमांवर होणाऱ्या हाणामारीशी ज्या प्रकारे माझ्या डोक्यात संगती लागली होती, त्याच प्रकारे मी ती शब्दात उतरवू शकलो होतो. म्हणून मी खूष होतो.

आणि आता इंद्रनीलचा मेसेज आला. त्रिपुरा निकाल, लेनिन पुतळा, पेरियार पुतळा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी पुतळा प्रकरण त्यावरून समाजमाध्यमांत रोज बदलत जाणाऱ्या भूमिका, सर्वपक्षीय समर्थकांची होणारी गोची आणि तरीही त्यांच्या उत्साहाला कधी न लागणारी ओहोटी पाहून त्याला जे वाटलं ते त्याच्याच शब्दात मांडतो.
--
Please write the next part of your current series on the cycle of social media outrages.

First an incident happens.

Day 1 goes on utter shock and condemnation.

By day 2 the other side gets ready and start proving how the incident is either not that big a deal, how other side has done same things in the past, or how what happened was totally justified, and then social media is filled with counter arguments.

Day three is utter chaos with both the sides hitting each other left and right.

By day four, both of them are somewhat tired and when it seems the issue is going away, someone discovers the comic side to it, and next thing you know your timeline is filled with memes and jokes about the same incident. By this time the anger has also gone down a little bit and the urge to fight is also going away, and both sides find this new wave of memes a little bit relieving.

By day 5th the memes are getting stale and people are losing interest in general in topic. The timeline seems boring, and just when you are going back to your daily mundane life, a new incident happens and the cycle starts again.

The song for this would be "apun jaisa tapori" from Munnabhai MBBS "Fir kya, agale din apne mohalle me Aishwarya Aai"
------


वाचून आणि गाणं बघून पोट धरून हसलो.

आणि मग Ralph E. Wolf and Sam Sheepdog - A Sheep In The Deep आठवलं. समाजमाध्यमांवरील सर्वपक्षीय समर्थक असेच आहेत याची उगाच खात्री पटली.


इंद्रनील, माझ्या लेखनावर विडंबन सुचवून माझ्या लेखनाचं महत्व वाढवल्याबद्दल धन्यवाद ;-)

गाणी आणि वर्तमान (भाग ३)

-------
------
समाजमाध्यमांबाहेरही जग आहे आणि ते इथल्या जगापेक्षाही कित्येक पटीने मोठं आहे हे मला माहिती आहे. इथे व्यक्त होताना लोक वास्तवापेक्षा अधिक उथळपणे व भडकपणे व्यक्त होतात हे मला माहिती आहे. हे असे का होत असावे याबद्दल विचार करत असताना मला जाणवले की राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे समाजमाध्यमांवरील समर्थक या तिघांचे परस्परसंबंध पूर्णतयः भिन्न स्वरूपाचे असतात.

राजकीय पक्ष आपली जाहीर भूमिका घेतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक आयुष्यात ती मान्य असेलच अशी स्थिती कायम नसते. कार्यकर्त्याला लोकांना भेटायचे असते. त्यांच्यात राहायचे असते. त्यांच्याबरोबर राहून काम करायचे असते. त्यामुळे कित्येकदा पक्षाची जाहीर भूमिका वेगळी असली तरी कार्यकर्ता आपल्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे त्या भूमिकेची धार थोडी बोथट करून वर्तन करतो. त्यामुळे पक्ष जरी कडवी भूमिका घेत असला तरी प्रत्यक्षात मात्र ती भूमिका तितकी कडवी रहात नाही. म्हणजे कार्यकर्ता पक्षाच्या भूमिकेतील कडवटपणाला कमी करतो. पक्षाला सुसह्य करतो.

पक्षाच्या कार्यकर्त्याचे वर्तन असे असले तरी समाजमाध्यमांवरील पक्षाच्या समर्थकांचे वर्तन असेच असेल याची खात्री नसते. किंबहुना ते अनेकदा उलटेच असते. इथे सगळेच आभासी प्रतिमेशी बोलत असतात. त्यामुळे आपले बोलणे समोरच्यावर ठसवण्यासाठी अधिक तीव्रतेचा आधार घेतला जातो. प्रत्यक्ष हितसंबंध गुंतलेले नसल्याने समोरच्याला नामोहरम करण्यात काहीच वावगे वाटत नाही. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेला बोथट करून ती समाजाच्या सध्याच्या ग्रहणक्षमतेइतकी सौम्य करण्याऐवजी ती आहे त्यापेक्षा अधिक जहाल आणि तीव्र स्वरूपात मांडली जाते.

एकाची पोस्ट पाहून दुसऱ्याला पोस्ट सुचते त्यामुळे इथे एकाच विषयावर असंख्य पोस्टींच्या लाटा उसळत असतात. ऑनलाईन आणि रियलटाइम असल्याने हा संवाद समकालीन (synchronous) आहे असा आपल्याला भास झाला तरी त्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्स वेगवेगळ्या वेळेला येत असल्याने प्रत्यक्षात तो संवाद विषमकालीन (asynchronous) असतो. त्यामुळे आपण ऑफलाईन गेल्यावर आलेल्या विरोधी प्रतिसादांना उत्तर देताना अनेकांची भाषा अजून भडक होत जाते. आणि मग प्रतिध्वनीचा प्रतिध्वनी येत राहून सर्व वाचकांच्या मनावर ओरखडे पडतात. तोपर्यंत नवीन विषयाची सुरवात होते आणि मागच्या विषयवार निघालेल्या ओरखड्याची किंमत पुढच्या पोस्टवर वसूल केली जाते. त्यातून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्या लोकांचे त्यांच्याही नकळत कंपू बनत जातात. आणि मग प्रत्येकाच्या पोस्टमधील विखार वाढतो आणि आपापल्या कंपूतील लोकांच्या टाळ्या घेऊन समोरच्या कंपूतील लोकांचे मतपरिवर्तन न करता आपण जिंकलो म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतो. पण प्रत्यक्षात मात्र पक्षाच्या समर्थकाने आपल्या वर्तनाने त्या पक्षाला समाजासाठी असह्य केलेले असते.

प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठी राजकारण करतो. किंबहुना त्यासाठीच राजकारण केले पाहिजे. पण मग सत्ता कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मात्र, ‘आपापल्या मतदारांच्या आणि पाठिराख्यांच्या उत्कर्षासाठी’ असे असल्याने ‘संपूर्ण समाजाचा उत्कर्ष’ हे कुठल्याही पक्षाचे धोरण असू शकते अशी कल्पना करणेदेखील भारतात अशक्य झाले आहे. त्यामुळे हा पक्ष शेटजी भटजींचा, तो पक्ष शेतकऱ्यांचा, तो पक्ष उपेक्षितांचा, तो पक्ष अल्पसंख्यांकांचा असे वर्गीकरण झालेले आहे. समाजमाध्यमे आल्यामुळे या वर्गीकृत पक्षांच्या समर्थकांना आपापली भूमिका रोज समोर मांडावीशी वाटते आहे. पूर्वी एखाद्या पक्षाला मत दिल्यावर पाच वर्षे त्याचे रोज समर्थन करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि मतदार अशी विभागणी होती. आता मात्र केवळ मतदार असून चालत नाही. जर तुम्ही समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षाचे समर्थकही व्हावे लागते. फार कमी लोक या ताणापासून स्वतःला वाचवू शकतात. आणि वाचवू न शकलेले अनेकजण शेवटी कंपूत अडकतात. त्यामुळे दिशाहीन पक्ष, त्यांचे कडवे आणि वाचाळ समर्थक आणि बावचळलेले कार्यकर्ते असे काहीसे चित्र सध्या दिसून येते. आणि संधीसाधू नेत्यांचे फावते.

मी पक्षांना दिशाहीन म्हणतो कारण, सत्ता जाताच ते सैरभैर होतात. त्यांचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते लगोलग त्यांना सोडून नव्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसतात. म्हणजे समाजवाद, साम्यवाद, भांडवलशाही हे शब्द कितीही वेळा वापरले तरीही कुठल्याही राजकीय पक्षाकडे यापैकी एकही संकल्पना भारतीय लोकशाहीच्या चौकटीत कश्याप्रकारे राबवायची त्याचा ठोस कार्यक्रम नाही. आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांसाठी यांच्याकडे कुठली योजना नाही. ज्यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी योजना नाहीत ते देशासाठी काही दूरगामी योजना आखून सर्व समाजासाठी काही करतील ही आशा भाबडी ठरते. किंबहुना आपल्या लोकशाहीत देशातील सर्व लोक येतात हेच या राजकीय पक्षांना मान्य नाही.

मध्ययुगातून आधुनिक युगात येण्याची पूर्ण तयारी व्हायच्या आधीच स्वातंत्र्य मिळालेल्या या देशाकडे स्वतःचे राजकीय तत्वज्ञान नाही. राजकीय तत्वज्ञान म्हणजे समाज कोणत्या मूल्यांवर उभा करावा? ती मूल्ये कशी निवडावीत? त्या मूल्यांना प्रतिष्ठा कश्याप्रकारे मिळवून द्यावी? त्या मूल्यांसाठी व्यवस्था कशी उभारावी? आणि त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे? याचा कुठलाही ठोस कार्यक्रम एकाही राजकीय पक्षाकडे आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मध्ययुगीन सामंतशाहीचे मूल्य आणि विषमतेचे तत्व हाडीमासी खिळलेल्या समाजात घटनेने आणलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये म्हणजे बुजगावण्याला घातलेल्या सुटाबुटासारखी आहेत.

चीन किंवा व्हिएतनाम सारखे देशही साम्यवाद राबवताना स्वतःच्या देशातील लोकांच्या मानसिकतेचा विचार करतात. नेत्यांनी निवडलेल्या मूल्यावर आधारित समाज हे जर गंतव्य स्थानक असेल तर, आज आपला समाज कुठे आहे? प्रवास नक्की किती मोठा आहे? त्या प्रवासात समाजात पूर्वीपासून रुळलेली कुठली मूल्ये अडथळा बनू शकतात? त्यांना दूर करताना त्या मूल्यांमुळे ज्यांना लाभ होतो आहे त्या सर्व समाजघटकांचा जो विरोध होईल त्या विरोधाला कश्या प्रकारचे हाताळायचे? यासारख्या कुठल्याही प्रश्नाला हात न घालता, त्याची स्वतः शोधलेली उत्तरे जनतेसमोर न ठेवता, त्याबद्दल कुठलीही चर्चा न करता; आपले राजकीय पक्ष काम करतात म्हणून मला ते दिशाहीन वाटतात. त्यांचे बहुतेक सर्व निर्णय दीर्घकालीन नसून तत्कालीन असतात, दोन निर्णयात सुसूत्रता नसते परिणामी त्यांच्या समर्थकांना वाचीवीर होण्याशिवाय पर्याय उरत नाही.

ही स्थिती जरी फार उत्साहवर्धक नसली तरी रोज समाजमाध्यमांवर आक्रस्ताळेपणाने व्यक्त होण्याच्या सवयीमुळे, आपण किंवा आपल्या मित्रांनी घेतलेली भूमिका योग्य आहे की नाही त्याचा अनेकांना रोज धांडोळा घ्यावासा वाटू लागेल, अशी मला खात्री आहे. अमुक एक पक्ष सत्तेवर आला की रामराज्य येईल अशी आशा ठेवणाऱ्या सगळ्यांचा भ्रमनिरास होण्याची प्रक्रिया समाजमाध्यमांमुळे वेगवान होते आहे. काँग्रेसच्या शासनकाळातील अनागोंदीबद्दल लोकांना चीड येण्यास सत्तर वर्षे लागली असतील (सत्तर हा आकडा अचूक नाही याची मला कल्पना आहे) तरी भाजपाबद्दल किंवा त्यानंतर पुढे सत्तेवर येणाऱ्या कुठल्याही पक्षाबद्दल तसे होणार नाही. समूहाची स्मृती क्षणिक असते हे जरी खरे असले तरी समाजमाध्यमांमुळे तिला जिवंत राखता येऊ शकते. आपण ज्या पक्षाचे समर्थन करतो त्या पक्षाचे इतर समर्थक कश्याप्रकारे वागतात हे समाजमाध्यमांमुळे सगळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत रहाते. त्यामुळे समर्थन करणाऱ्यांचा आवेश भविष्यात आटोक्यात येईल याचीदेखील मला खात्री आहे. फक्त आवश्यकता आहे ती समाज, राजकारण आणि लोकशाही कशी चालते त्याबद्दलचे आपले सगळ्यांचे आकलन सुधारून घेण्याची.

इतर देशांना गुलाम न करता स्वदेशाला संपन्नतेच्या शिखराकडे नेणे म्हणजे डोंगराळ प्रदेशातील घाटरस्त्यावर गाडी चालवण्यासारखे आहे. सतत गिअर बदलावे लागतात. ब्रेक आणि क्लच यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. आणि यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतील असे मला वाटते. हतोत्साहित करणाऱ्या सध्याच्या वातावरणात समाजमाध्यमांना उद्देशून एकंच गाणं म्हणावंसं वाटतं.

Edelweiss, Edelweiss
Every morning you greet me
Small and white, clean and bright
You look happy to meet me

Blossom of snow may you bloom and grow
Bloom and grow forever
Edelweiss, Edelweiss
Bless my homeland forever

द साउंड ऑफ म्युझिक या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच ५३ वर्षे होऊन गेली. त्या चित्रपटात हे गाणे दोनदा येते. जर्मनीने ऑस्ट्रियाला विलीन करून घेतल्यावर ऑस्ट्रियन नागरिक असलेल्या कॅप्टन व्हॅन ट्रॅप एकदा आपल्या कुटुंबासमवेत हे गाणं म्हणतो. आणि दुसऱ्या वेळी साल्झबर्ग येथील उत्सवात हे गाणे तिथे जमलेले सर्व लोक गातात.

या गाण्यातील Edelweiss हे आल्प्स पर्वतराजीमध्ये मिळणारे एक नाजूक फूल आहे. ऑस्ट्रियात हे फूल संराक्षित आहे. ते तोडणे कायद्याने गुन्हा आहे. काही सैनिक तुकड्यांच्या टोपीवर त्याची मुद्रा वापरली जाते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी विरोधी काम करणाऱ्या संघटनांनी Edelweiss हे नाव वापरले होते.

माझ्यासाठी किमान आजतरी Edelwiess म्हणजे समाजमाध्यमे आहेत. आणि नाझी म्हणजे कुठलाही एक पक्ष नसून सर्व पक्षीय विखारी आणि आततायी समर्थक आहेत. त्या सगळ्यांनी इथली लोकशाही नष्ट करू नये म्हणून मी माझ्या Edelweiss ला उद्देशून हे गाणं गुणगुणतो. 



Edelweiss, Edelweiss
Every morning you greet me
Small and white, clean and bright
You look happy to meet me

गाणी आणि वर्तमान (भाग २)

------
------
जेव्हा भाजप समर्थक विजयानंदाच्या पोस्ट्स टाकत होते त्याचवेळी कित्येक मित्रांना ईशान्येकडच्या राज्यांनी चूक केली असे वाटल्याचे त्यांच्या पोस्टवरून जाणवत होते. त्रिपुराच्या लोकांनी लोकशाहीतील मतदानाचा हक्क सुयोग्यरित्या बजावला असं काही पोस्टकर्त्यांचं मत होतं तर संभाव्य हुकूमशाहीच्या वावटळीत आपण तग धरायची तयारी केली पाहिजे असं इतर मित्रांचं मत होतं. भाजपचे समर्थक वाचाळ आहेत. मेनस्ट्रीम मीडिया भाजपने विकत घेतलेला आहे अश्या अर्थाच्या पोस्ट्स देखील वाचायला मिळाल्या.

आणि मग काही मित्रांनी बीफ जनता पार्टीची We choose to stand with the defeated ही पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमधील संयत भाषा, त्यावरचे भाजप समर्थकांचे आणि विरोधकांचे तीव्र प्रतिसाद वाचले. त्या प्रतिसादांमधील तीव्र विरोध वाचून डोकं बधीर होत चाललं होतं. म्हणून तिथून बाहेर पडलो. मग भाजपचे नेते फेकू आहेत, त्यांनी गोबेल्सनीती आत्मसात केलेली आहे आणि ईशान्येकडची राज्ये या भूलथापांना बळी पडली आहेत अश्या अर्थाची एक पोस्ट वाचली. या सगळ्या गदारोळामुळे गोबेल्स, हिटलर, पितृभूमी, एकचालकानुवर्तित्व, हुकूमशाही, फॅसिस्ट या शब्दांनी डोक्यात फेर धरला. आणि एकदम ‘कॅब्रे’ या हॉलीवूडच्या चित्रपटातील एक गाणं आठवलं.

क्रिस्तोफर इशरवूड (Christopher Isherwood) या लेखकाचं ‘द बर्लिन स्टोरीज’ (The Berlin ‘stories) नावाचं एक पुस्तक १९३९ साली प्रसिद्ध झालं होतं. १९६६ साली जॉन कँडर (John Kander) आणि फ्रेड एब्ब (Fred Ebb) या ज्यू जोडगोळीने त्याची कॅब्रे (Cabret) या नावाने एक संगीतिका बनवून ब्रॉडवेवर आणली. आणि मग १९७२ ला त्यावर आधारित त्याच नावाचा एक चित्रपट निघाला.

या चित्रपटात १९३१ च्या जर्मनीचा काळ रंगवलेला आहे. तेव्हा जर्मनीत वायमार प्रजासत्ताक होते. आणि नाझी लोकांचा जोर वाढू लागलेला होता. या पोस्टसाठी चित्रपटाची कथा महत्त्वाची नसल्याने ती इथे सांगत बसत नाही. पण चित्रपटात एक बीअर गार्डनचा सीन आहे. सकाळची प्रसन्न वेळ आहे. कोवळं ऊन आहे. गावातील एक बाग आहे. गावातील आबालवृद्ध बागेत जमले आहेत. सगळीकडे उत्साहाचं प्रसन्न वातावरण आहे. आणि मिसरूडही न फुटलेला सोनेरी केसांचा आणि निळ्या डोळ्यांचा एक तरुण मुलगा उभा राहतो. कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर रोखलेला असतो. आणि तो गाणं म्हणायला सुरवात करतो. संथ लयीत पण स्पष्ट सुरात.

The sun on the meadow is summery warm.
The stag in the forest runs free.
But gather together to greet the storm.
Tomorrow belongs to me.

The branch of the linden is leafy and green,
The Rhine gives its gold to the sea.
But somewhere a glory awaits unseen.
Tomorrow belongs to me.

The babe in his cradle is closing his eyes
The blossom embraces the bee.
But soon, says a whisper;
Arise, arise,
Tomorrow belongs to me.

आणि या तिसऱ्या कडव्याच्या शेवटी एक छोटी मुलगी उभी राहून त्या तरुणाच्या आवाजात स्वतःचा आवाज मिसळून गाऊ लागते. एव्हाना कॅमेरा झूम आऊट होऊन पूर्ण मुलगा दिसू लागलेला असतो. त्याने स्काऊटसारखे कपडे घातलेले असतात. पण त्याच्या दंडावर नाझी स्वस्तिकाचे चिन्ह असलेली पट्टी असते. तो हिटलर यूथ या संस्थेचा सदस्य असतो हे स्पष्ट होते. आता चौथे कडवे सुरु होते. बीअर गार्डन मधील इतर लोकही एकेक करून उठून उभे राहू लागतात आणि गाण्यात भाग घेतात.

Oh Fatherland, Fatherland,
Show us the sign
Your children have waited to see
the morning will come when the world is mine,
Tomorrow belongs to me !

आता गाण्याची लय वाढते. वाद्यमेळ वाढतो. मुख्य गायक आणि कोरसचा स्वर टिपेला पोहोचतो. चौथे कडवे पुन्हा पुन्हा म्हटले जाते. बसलेले लोक उभे राहत जातात. काही स्वेच्छेने काही अनिच्छेने. एक म्हातारा मात्र बसलेलाच राहतो. शेजारची व्यक्ती उभी राहिल्यावर तिच्याकडे काहीश्या विमनस्कपणे आणि हताशेने पाहतो. किंचित नकारात्मक मान हलवतो. बीअर गार्डन गाण्याच्या सुराने दुमदुमून जाते. गाणे सुरु करणारा युवक काखेत धरून ठेवलेली टोपी डोक्यावर घालतो आणि आता कुप्रसिद्ध झालेला हात उंचावण्याचा नाझी सॅल्यूट करतो.

मला हे गाणं आठवलं म्हणजे सध्याच्या भारतीय प्रजासत्ताकाची स्थिती १९३१ च्या वायमार प्रजासत्ताकासारखी आहे असं माझं मत नाही. पण समाजमाध्यमांवर उसळणाऱ्या लाटा आणि त्यातील भाजप समर्थकांचा जल्लोष व विरोधकांची हतबलता पाहून, कर्नाटक मधील निवडणुकांसाठीचा भाजपचा वाढलेला विश्वास आणि शेवटी केरळलाही जिंकून घेण्याच्या त्यांच्या पोस्ट्स वाचून हे गाणं मला आठवलं खरं.

खरंतर हे गाणं (fatherland चा उल्लेख जसा हवा तसा बदलून) सर्वपक्षांच्या समर्थकांनी म्हणायला हवं पण सध्या तरी भाजपचे समाजमाध्यमांवरील समर्थक Tomorrow belongs to me म्हणत आहेत असं मला वाटतं.

गाणी आणि वर्तमान (भाग १)

--------
-------
ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकांचा निकाल लागला. समाजमाध्यमांवर विविध पक्षांच्या समर्थकांच्या मतांच्या फैरी झडू लागल्या. आवडत्या पक्षाप्रमाणे किंवा पटलेल्या विचारधारेप्रमाणे कुणाला हा निकाल फॅसिस्ट हुकूमशाहीच्या आगमनाची नांदी वाटला तर कुणाला राष्ट्रवादाच्या आगमनाची नांदी वाटला. कुणाला ही लोकशाहीची मृत्युघंटा वाटली तर कुणाला छद्म धर्मनिरपेक्षतेची मृत्युघंटा वाटली. माझ्या मित्रांत विविध पक्षांचे समर्थक आणि विविध विचारधारांशी बांधिलकी असणारे सर्वजण असल्याने प्रत्येकाच्या पोस्ट्स वाचून माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. आणि मग या विचारांना अनुसरून कुठलं गाणं त्या मित्रांच्या मनोवस्थेसाठी योग्य ठरेल त्याच्या जोड्या माझ्या मनात लागू लागल्या.

भाजप समर्थक मित्रांच्या पोस्टमधील ऊर्जा आणि विजयोन्माद पाहिला. या निवडणुकीत श्री सुनील देवधरांनी काय काम केलं याबद्दल कौतुकमिश्रित वर्णनं वाचली. संघ कार्यकर्ते कशाप्रकारे ईशान्येकडील राज्यांत निरलसपणे कार्य करत आहेत याबद्दलची आदरयुक्त वर्णनं वाचली. आणि मला 'वंदे मातरम' हे गीत आठवलं. रोज शाळा सुटताना म्हणतात त्या संथ लयीतील नाही तर बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटात हेमंतकुमारांनी गायलेलं द्रुतलयीतलं वीरश्रीपूर्ण वंदे मातरम. बंकिमचंद्र बंगालमधील होते. आणि ईशान्य भारताच्या सध्याच्या निवडणूक क्षेत्राच्या आसपास त्यांची कादंबरी घडते. म्हणून वाटलं की हे गाणं चपखल बसतंय.



पण थोडा विचार केला आणि जाणवलं की ते वीरश्रीपूर्ण गीत या मित्रांसाठी लागू पडत नाही. कारण वंदे मातरम मध्ये मातेला वंदन आहे. भारत माता आहे. तिच्या भूमीचे वर्णन आहे. तिच्या रिपुदमन करण्याच्या शक्तीचे वर्णन आहे. तिच्या दुर्गारूपाचा गौरव आहे. तिच्यासाठी काय करू त्याचे वर्णन नसून ती कशी आहे त्याचे वर्णन आहे. त्यामुळे ते वीरश्रीपूर्ण असले तरी मातेचे गौरवगीत आहे. आपल्याला काय करायचे आहे त्याचे योजनागीत नाही.

मग दुसरंच गीत आठवलं. हिंदीतील प्रसिद्ध छायावादी कवी किंबहुना ज्यांना छायावादाचाया चार खांबांपैकी एक खांब मानलं जातं, ज्यांनी 'कामायनी' या महाकाव्याची रचना केली त्या जशंकर प्रसाद यांनी ही कविता लिहिली आहे. त्यांनी स्कंदगुप्त. चंद्रगुप्त अशी ऐतिहासिक नायकांबद्दलची नाटके लिहिली. कदाचित त्यांच्या 'चंद्रगुप्त' या नाटकातील रचना असू शकेल. जुन्या चाणक्य सिरीयल मधे ही रचना चंद्रगुप्त म्हणतो आणि मग त्याचे मित्र साथ देतात असं चित्रिकरण केलं आहे.

या रचनेत राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. भौगोलिक संदर्भ असलेला देश हा शब्द नाही, तर सांस्कृतिक संदर्भ असलेला राष्ट्र हा शब्द वापरलेला आहे. स्त्रीलिंगी जन्मभूमी किंवा मातृभूमी नाही. तर पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरलेला आहे. सुरवातीला पुल्लिंगी राष्ट्र शब्द वापरणाऱ्या या गीताच्या शेवटी मात्र स्त्रीलिंगी माँ शब्द येतो. पण ही माँ वंदे मातरम सारखी सुजलाम सुफलाम नाही, बहुबल धारिणीं रिपुदलवारिणीं नाही.

या गाण्यात ती सर्वशक्तिमान दुर्गा नसून तिच्या पुत्रांनी तिला शत्रूंच्या रुधिराने अभिषेक केलेला होता आणि शत्रूंच्या मुंडक्याची माळ घालून तिचा शृंगार केलेला होता. पुत्रांनी दिलेल्या सांस्कृतिक सिंहासनावर बसून ती जगावर राज्य करत होती. कालचक्राच्या गतीने हे सिंहासन मोडकळीस आलेले आहे आणि तिच्या पुत्रांवर जबाबदारी आहे की आपले तन मन धन अर्पून तिला तिचा नष्ट झालेला गौरव पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. म्हणजे ती वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून; तन मन धन अर्पण करण्यास तयार असलेल्या सर्वशक्तिमान पुत्रांची ती माँ आहे.

जुन्या चाणक्य सिरियलमध्ये या गीताचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलेलं होतं त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील माझ्या मित्रांना हे गाणे आपलेसे वाटणे स्वाभाविक आहे. आणि संघविरोधकांना संघाची वैशिष्ट्ये धारण करणारे वाटणेही स्वाभाविक आहे. संघाचे विरोधक संघाला जी दूषणे देतात ती सर्व या गीतात ठळकपणे दिसून येतात. शेंडीवाल्यांचा गट. जानवेधाऱ्यांचा गट. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्यांचा गट. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्यांचा गट. भूमी पेक्षा अमूर्त राष्ट्रसंकल्पनेला महत्व देणाऱ्यांचा गट, वगैरे गोष्टी या चित्रीकरणात दिसून येतात.

गाणे सुरु होते तेव्हा रात्रीची वेळ आहे. आश्रमात मशालींचा उजेड आहे. सर्व विद्यार्थी आणि गुरुजन आपापल्या कक्षात विश्राम करत आहेत. एकटा चंद्रगुप्त सचिंत मुद्रेत एका खांबाला टेकून शून्यात नजर लावून बसलेला आहे. आणि तो सहज संथ सुरात स्वगत असल्याप्रमाणे म्हणतो

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन....

आणि आश्रमाला जाग येते. एकामागून एक विद्यार्थी आपापल्या कक्षातून बाहेर येऊ लागतात. आतापर्यंत शांत आणि संथ असलेलं स्वगत आता वीररसपूर्ण गीतात बदलतं. सस्मित आचार्यही आपल्या कक्षातून बाहेर येतात. विद्यार्थी कवायत करत असल्याप्रमाणे शिस्तबद्ध रीतीने राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या भावना एकसुरात मांडतात. हे गाणं बघताना भावनाप्रधान प्रेक्षकांना आपोआप स्फुरण चढतं. आपण काहीतरी करावं ही ऊर्मी दाटून येते.

हम करें राष्ट्र आराधन
तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करें राष्ट्र आराधन ।।धृ।।

अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रद्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट्र अभिवादन ।। १।।

अपने हंसते शैशव से
अपने खिलते यौवन से
प्रौढता पूर्ण जीवन से
हम करें राष्ट्र का अर्चन ।।२।।

अपने अतीत को पढकर
अपना ईतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करें राष्ट्र का चिंतन ।।३।।

है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें
जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें
हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से
हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन
मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन
अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन ।।४।।



कम्युनिस्ट पार्टीला त्रिपुरात धूळ चारण्यात आलेल्या यशामुळे अनेक तरुण भाजप समर्थक ज्या प्रकारे व्यक्त होत होते ते पाहून मला वाटले की त्यांच्या डोक्यात वंदे मातरम मधील सर्वशक्तिमान माँ नसून हम करे राष्ट्र आराधन मधील माँ आहे.

Monday, December 25, 2017

बोलेरो (भाग ४)

--------------
तुंबाडचे खोत मध्ये मंगल आणि अमंगलाचा सातत्याने चाललेल्या सोहळ्याला साक्षी असतो वाडा. मोरयाने बांधलेला; प्रचंड, भव्य वाडा. कादंबरीच्या सुरवातीला आपल्याला भेटतात ते त्याचे भग्नावशेष आणि शेवटी कळतात ती त्याच्या भग्नावस्थेची कारणे. म्हणजे अलिप्त असूनही वाडा शेवटी त्या कथेचा बळी ठरतो. खोतांच्या कथेत वारंवार येत असूनही आणि अलिप्त असूनही त्यात बळी न पडलेली अजून एक साक्षीदार असते जगबुडी नदी. दरवर्षी वैशाखी पौर्णिमेला खोत तिची सहकुटुंब पूजा करतात, तिची ओटी भरतात. पण चारशे वर्षांच्या खोत घराण्याच्या इतिहासाला जगबुडी मात्र अलिप्तपणे पहाते. हजारो वर्षांपासून तशीच वहाते. कुठल्याही भावभावनांचे तरंग उमटवू न देता. एकाच तालात, आपल्याच तालात. आणि सगळ्या भावभावनांच्या तरंगात भिजून ओलेचिंब झालेले तुंबाडकर आणि लिंबाडकर तिच्या काठावर आपापले सूर आळवतात. आपल्या स्वभावामुळे निर्माण होणारे आवेग त्या सुरात मिसळतात. आणि जगबुडीच्या लाटांच्या कलकलाटात आपले भेसूर किंवा सुरेल सूर जोडतात.

आधी एक संथ सूर - जगबुडीचा.

तिच्या काठी मोरयाचा वाडा येतो. आणि जगबुडीच्या संथ एकसुरात खोतांच्या घराचे सूर मिसळू लागतात. पाशवी वासनांचे, मग्रुरीचे, रागाचे, द्वेषाचे, लोभाचे, सत्तोन्मादाचे, समजूतदारपणाचे, दबलेल्या दुःखांच्या उमाळ्याचे, हतबलतेचे, आनंदाचे, हताशेचे.

त्यात लिंबाडचे सूर मिसळतात. औदार्याचे, चिरडीला येण्याचे, देशप्रेमाचे, गोंधळल्याचे, ध्येयवादाचे, समजूतदारपणाचे, संशयाचे, दुःखाचे.

त्यात बाहेरील परिस्थितीचे निरनिराळे सूर मिसळत जातात. जातीभेदाचे, आडव्या पंगतीचे, नवीन शिक्षणाचे, मुंबईच्या पैश्याचे, धार्मिक तेढीचे, विधवा विवाहाचे, दारूचे आणि दारूबंदीचे, टिळकांच्या अग्रलेखांचे, गांधींच्या चळवळींचे, सावरकरांच्या गीतांचे आणि कुणी न पाळणाऱ्या त्यांच्या परंपराभेदी विचारांचे, अफवांचे; असे वेगवेगळे सूर मिळून कादंबरी वेग पकडते. आणि या कादंबरीला जर संगीत मानले तर तिचा क्रेसेंडो किंवा उत्कर्षबिंदू म्हणजे गांधीहत्येनंतर वाड्याचे नष्ट होणे.

गेल्या रविवारी कादंबरी वाचून झाली. डोक्यात हे कादंबरीचे संगीतमय रूप भिनलेले होते. ज्या मैत्रिणीने माझा वाढदिवस आहे अश्या चुकीच्या समजुतीने मला ही कादंबरी भेट दिली होती तिचे आभार मानण्यासाठी फोन केला. तिने उचलला नाही. मग तिला मेसेज टाकून घरच्यांबरोबर फिरायला बाहेर गेलो. गाडी सुरु केली तर त्यात माझी आवडती सीडी चालू झाली.

पहिले संगीत होते कार्ल ऑफ्फचे ‘ओ फॉर्च्यूना’. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन. आणि नंतर सुरु झाले फ्रेंच संगीतकार मॉरिस राव्हेलचे ‘बोलेरो’. हे माझे अतिशय आवडते संगीत आहे. मोठ्या लेकालाही आवडते. आवाज मोठा करून तीनचारदा ऐकले. शेवटी बायको आणि आईने वैतागलेल्या वाटल्या तेव्हा बंद केलं. एकाएकी डोक्यात भिनलेल्या कादंबरीच्या संगीतमय रूपाची राव्हेलच्या बोलेरोशी संगती जुळली. घरी आल्यावर राव्हेलच्या बोलेरोबद्दल जे जे मिळेल ते वाचून काढले.

मॉरिस राव्हेल (बोलेरोचा संगीतकार)
Image Source : Internet 
बोलेरो हा एक लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार आहे. क्युबा आणि स्पेनमध्ये लोकप्रिय असणारा हा नृत्यप्रकार म्हणजे जोडीने करायचे नृत्य. यात संगीत आणि नृत्याची लय संथ असते आणि नंतर ती हळूहळू वाढत जाते.

इडा रुबीनस्टेन नावाची एक रशियन नर्तकी राव्हेलची मैत्रीण होती. तिने राव्हेलला तिच्या बॅलेसाठी एका स्पॅनिश संगीतकाराच्या रचनेची सुधारित आवृत्ती करून देण्यास सांगितले. पण त्या रचना दुसऱ्या एका संगीतकाराच्या स्वामित्व हक्काखाली होत्या. त्याने त्या राव्हेलला देण्यासाठी आनंदाने होकार दिला पण राव्हेलने शेवटी स्वतःच एक रचना तयार करायचे ठरवले.

मग एक दिवस त्याने आपल्या मित्राला घरी बोलावले आणि त्याला पियानोवर एक तुकडा वाजवून दाखवला आणि म्हणाला, ‘मी याच तुकड्याला वारंवार वाजवत राहीन आणि प्रत्येक आवर्तनात त्यात एकेक वाद्य वाढवत जाईन. पाच मिनिटात सुचलेल्या त्या तुकड्याचा वाद्यमेळ बनविण्यासाठी राव्हेलला मग सहा महिन्यापेक्षा जात वेळ लागला. त्यातून जे बनलं त्याची सुरवात संथ लयीत आणि शेवट अतिशय वेगात होत असल्याने राव्हेलने त्या संगीताच्या तुकड्याचं नाव ठेवलं बोलेरो.

पंधरा मिनिटे आणि पन्नास सेकंदाच्या या संगीतात जवळपास सतरावेळा तोच तुकडा वाजतो. प्रत्येक वेळी एक नवीन वाद्य जुन्याबरोबर वाजू लागते आणि मग शेवटी अठराव्या आवर्तनात उत्कर्षबिंदूला तो सर्व वाद्यांना घेऊन थांबतो.


कॅरोल लोम्बार्डच्या १९३४च्या बोलेरो नावाच्या चित्रपटात या संगीताला वापरले आहे.


नंतर बो डेरेकच्या ‘१०’ नावाच्या चित्रपटातील एका संवादामुळे आणि बो डेरेकच्या लौकिकाला साजेश्या प्रणयदृष्यात पार्श्वसंगीत म्हणून वापरले गेल्यामुळे संगीताचा हा विलक्षण तुकडा अजून प्रकाशझोतात आला.


राशोमोन चित्रपटात अकिरा कुरोसावाने याच संगीताचे अनुकरण करणारी थीम पार्श्वसंगीत म्हणून वापरली आहे. त्याशिवाय अनेक चित्रपटांत आणि नृत्य नाटकांत या संगीताचा वापर केला गेला आहे.





जेव्हा या संगीताचा पहिला प्रयोग (परफॉर्मन्स) झाला तेव्हा, प्रेक्षक बेभान झाले होते आणि असे म्हणतात की एक स्त्री चित्कारली, ‘ हा वेडेपणा आहे. राव्हेल वेडा आहे’. जेव्हा राव्हेलला हे सांगितले गेले तेव्हा तो म्हणाला.’त्या स्त्रीला हे संगीत कळले आहे’. अजूनही कित्येक वेळा फ्लॅश मॉब करून हे संगीत युरोप अमेरिकेतील मॉल्स किंवा सार्वजनिक ठिकाणी वाजवून कलाकार लोकांची वाहवा मिळवतात.



या संगीतावर टीकाही भरपूर झाली. सगळ्यात जहरी टीका म्हणजे हे संगीत नसून पाल्हाळ लावले आहे अश्या स्वरूपाची होती. ‘प्रत्येक संगीताचा एक अंतबिंदू असतो आणि बोलेरोच्या बाबतीत तो सुरवातीलाच आहे पण हे राव्हेलला कळलेले नाही’ अश्या तीव्र स्वरूपात त्यावर टीका झाली. ही टीका वाचली आणि तुंबाडचे खोत ही एक विसविशीत कादंबरी आहे. श्रीनांनी पाल्हाळ लावले आहे, अशी या कादंबरीवर होणारी टीका आठवली. आणि मला जाणवलेले कादंबरीतील संगीत व राव्हेलच्या बोलेरोची नक्की संगती काय ते माझे मला उमगले. राव्हेलची रचना अनेकांना पाल्हाळ वाटते, कादंबरी अनेकांना पाल्हाळ वाटते. राव्हेलला स्वतःला ही रचना त्याची सर्वोत्कृष्ट रचना वाटत नाही. या कादंबरीबद्दल श्रीनांचेही मत काहीसे असेच होते.

बोलेरो नृत्य म्हणजे दोन नर्तकांचा खेळ. कुरघोडी नाही, आक्रमण नाही, एकमेकांना संपवायची इच्छा नाही. उलट एकमेकांशी खेळून आनंद लुटणे हाच हेतू. किंवा कदाचित आनंद लुटण्यापेक्षा खेळणे हीच प्रवृत्ती असल्याने प्रवृत्तीशरण होऊन खेळत राहणे. कादंबरीत मंगल आणि अमंगल हे ते दोन नर्तक. राव्हेलच्या बोलेरोत एकामागून एक वाद्ये सुरु होत जातात आणि जुन्या वाद्याबरोबर तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात. कादंबरीत, मंगल आणि अमंगल सर्व पात्रांतून आपला अविरत खेळ पुन्हा पुन्हा खेळ खेळत रहातात. राव्हेलच्या बोलेरोत ड्रम, एकाच संथ लयीत सुरवातीपासून शेवटपर्यंत वाजत रहातो. कादंबरीत सुरवातीपासून शेवटपर्यंत जगबुडी एकाच संथ लयीत वहात रहाते. राव्हेलच्या बोलेरोत उत्कर्षबिंदूत सर्व वाद्ये एकत्र येऊन जो परिणाम घडवतात तोच परिणाम कादंबरीच्या शेवटी वाड्यावर येणाऱ्या संकटातून आपल्या अंगावर येतो.

कादंबरी मोठी, माझे आकलन तोकडे त्यामुळे त्यावर मी लिहिणार नाही असे आईला निक्षून सांगितले होते पण नंतर गाडीत ऐकलेल्या राव्हेलचे संगीत आणि मनात असलेले श्रीनांनी रंगवलेले शब्दचित्र इतके चपखल बसले की तुंबाडच्या खोतांवर लिहिणार नाही हा संकल्प तुटला. आता तर मला असेच वाटते आहे की कुणी तुंबाडचे खोतवर चित्रपट बनवला तर त्याला पार्श्वसंगीत म्हणून राव्हेलच्या बोलेरोशिवाय काहीही वापरू नये. आणि वाड्याच्या अखेरच्या क्षणी या संगीताचा शेवट येईल असे करावे.

मी ज्या प्रयोगांचा उल्लेख केला आहे त्या राव्हेलच्या बोलेरोच्या प्रयोगांचे आणि मग त्याला चित्रपटात वापरलेल्या तुकड्यांचे तुकड्यांचे किंवा त्यावरून बेतलेल्या पार्श्वसंगीताचे व्हिडीओ वर दिलेले आहेत.

लंडन सिम्फनी ऑर्केस्ट्राचा प्रयोग जरी पंधरा मिनिटे पन्नास सेकंद इतका मोठा असला आणि सुरवातीला थोडा संथ वाटला तरी शेवटपर्यंत ऐका ही विनंती. त्यात साधारण १५व्या मिनिटानंतर जे होते तिथे वाडा नष्ट होतो आहे अशी कल्पना मी केली आहे.

मग कदाचित तुम्हाला पटले नाही तरी किमान शक्यता जाणवेल की तुंबाडचे खोत म्हणजे मंगल व अमंगलाने एकमेकांशी मांडलेला खेळ आहे. कुरघोडी न करता एकमेकांना जोखण्याचा खेळ. दोन प्रवृत्तींचा प्रवृत्तीशरण अविरत अंतहीन खेळ. एकाच वाद्याने संथ लयीत चालू होऊन नंतर वेग आणि वाद्ये वाढवत जाणारा खेळ. ज्याचं नाव बोलेरो.


----

Thursday, October 19, 2017

नो रिग्रेट्स

काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.

मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं २०१० मध्ये. म्हणजे हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ५१ वर्षांनी. क्रिस्तोफर नोलानच्या इन्सेप्शन चित्रपटात हे गाणं वारंवार येतं. इतकंच काय पण संपूर्ण चित्रपटात हेच गाणं पार्श्वसंगीत म्हणून संथ लयीत वाजत रहातं. बॅटमॅन आणि जोकरमुळे नोलानचा फॅन बनलेल्या मला इन्सेप्शनमध्ये मात्र फसगत झाल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर बांधलेला हा चित्रपट जरी मला आवडला असला तरी यात प्रेक्षक कसा विचार करतील त्याची गणितं मांडून पटकथेची मांडणी केल्यासारखी मला वाटली होती. हे काही वाईट नाही. पण मग हा जादूचा किंवा नजरबंदीचा प्रयोग ठरतो, चित्रपट नाही; असं माझं मत पडलं होतं त्यामुळे थोडा उदास होऊन घरी परतलो होतो. नोलानने आपल्याला गोष्ट न सांगता आपल्याला गोष्टीचा भाग बनवलं आणि त्या गोष्टीतून प्रेक्षकाला बाहेर पडता येणार नाही अशी योजना केली हे माझं मत झाल्याने मी नंतर नोलानच्या चित्रपटापासून थोडा दूर राहिलो. इतका की नंतर त्याचा इंटरस्टेलार हा चित्रपट, चित्रपटगृहात न पहाता मी तो टीव्हीवर येऊन पुन्हा पुन्हा दाखवला जाऊ लागला तेव्हाच पाहिला. इतके सगळे झाले तरी ते गाणे मात्र माझ्या डोक्यात इन्सेप्शनने घट्ट बसवून टाकले होते. त्याची संथ लय. तो एक वेगळा स्त्री आवाज. त्यातली आर्तता. सगळं भारून टाकणारं होतं. किंबहुना इन्सेप्शनच्या परिणामकारकतेत त्या गाण्याचा मोठा वाट आहे असं माझं पक्क मत आहे.



मग २०१२ मध्ये मादागास्कर या चित्रपटाचा तिसरा भाग आला. मुलांबरोबर पाहायला गेलो होतो. त्या चित्रपटात “कॅप्टन शेंटेल शॅनॉन ड्यू बॉइस” ही खलनायिका असते. न्यूयॉर्क मधून युरोपात आलेल्या अलेक्स या सिंहाला आणि त्याच्या प्राणी मित्रांना पकडण्यासाठी ती जीवाचं रान करते. त्यात तिचे साथीदार जायबंदी होतात. हॉस्पिटलात ते सारे प्लॅस्टर लावून आपापली हाडं जुळवून घ्यायला पलंगावर झोपलेले असतात. ड्यू बॉइस तिथे येते. त्यांना सांगते, 'चला उठा, आपल्याला सगळ्या प्राण्यांना पकडायचं आहे.' नखशिखांत प्लॅस्टर मध्ये बांधले गेलेले सहकारी हलतसुद्धा नाहीत. ती पिस्तूल काढते. आणि छताला लागलेला एकेक दिवा फोडत जाते. पार्श्वसंगीत चालू होतं. शेवटच्या दिव्याच्या प्रकाशात जणू स्पॉटलाईट टाकला आहे अश्या अविर्भावात उभी राहून गाणं म्हणू लागते. सगळे सहकारी हलू लागतात. त्यांची प्लॅस्टर तडकू लागतात. ते उभे राहतात. आणि गाण्याच्या शेवटापर्यंत सगळे ठणठणीत होऊन तिच्या सेवेत रुजू होतात.


मला गाण्याचे बोल कळले नाहीत, कारण ते फ्रेंच भाषेत आहेत. पण हे कुठेतरी ऐकलंय इतकं आठवत होतं. मग एकदा टीव्हीवर मादागास्कर ३ पुन्हा बघताना मध्ये गुड नाईटची ‘नऊ मिनिटात सलमान बना’ अशी जाहिरात लागली. त्यात ते संगीत पुन्हा ऐकू आलं. आणि लिंक लागली. मग नेटवर शोधाशोध केली. तर कळलं की हे गाणं फार प्रसिद्ध आहे. ते जवळपास पाच सहा चित्रपटात वापरलं आहे. आणि दोन तीन जाहिरातीतसुद्धा. आता प्रश्न हा होता की ते गाणं ऐकू आल्याबरोबर ड्यू बॉइसचे सगळे साथीदार लगेच ठीकठाक कसे होतात? मग शोधाशोध चालूच राहिली. आणि त्यातून जे मिळालं फार विस्मयकारक आणि आनंददायक होतं. मी इंटरनेटच्या काळात जन्माला आलो म्हणजे मी भाग्यवान आहे याचा पुनःप्रत्यय करून देणारं होतं.

सन १९१५. फ्रान्समध्ये एक 'गाणारी चिमणी' जन्माला आली. वडील रस्त्यावर डोंबाऱ्यासारखे खेळ करून पैसे कमावणारे, आई बारमध्ये गाणारी तर आजी वेश्यागृह चालविणारी होती. लहानपणी आजीकडे वाढूनही कुपोषित राहिलेल्या या मुलीची मूर्ती छोटी होती. आणि स्वभाव इतका भित्रा होता की तिच्या हालचालीत तिची अस्थिरता जाणवायची. पण ती इतके सुंदर गाणे म्हणायची की तिचं नाव पडलं भित्री, छोटेखानी, गाणारी मुलगी म्हणजे 'गाणारी चिमणी'. तिचं नाव होतं एडिथ पिफ. (मी तिला वाचून ओळखतो, आणि माझं फ्रेंच; झुलू, मंडारिन, किंवा रशियन इतकंच चांगलं असल्याने तिच्या नावाचा उच्चार मी माझ्या मनाने करत आहे. चुकला असल्यास तिथे दुर्लक्ष करा.)

एडिथच आयुष्य खडतर होतं. पण त्यात रोलर कोस्टर सारखे चढउतार होते. भरपूर हाल अपेष्टा आणि उदंड यश; वैयक्तिक आयुष्यात अपयशी प्रेमप्रकरणं आणि अपयशी विवाह पण सामाजिक आयुष्यात प्रचंड लोकप्रियता तिच्या वाट्याला आले. सगळ्यांना धुंद करणारा आवाज असलेली एडिथ स्वतः मात्र ,मादक द्रव्यांच्या आहारी गेली होती. हे गाणं तिच्या आयुष्यात यायच्या आधीच एडिथ प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेली होती.

१९५६ मध्ये मायकेल व्होकेरने, लोकप्रिय फ्रेंच गायिका रोसेल ड्यू बॉइससाठी एक गाणं लिहिलं. पण नंतर ते गाणं एडिथने म्हणावं असं वाटल्याने त्याने गाण्याचे बोल बदलले. त्यानंतर १९५९ मध्ये गीतकार मायकेल, संगीतकार चार्ल्स ड्यू मॉँट बरोबर एडिथच्या घरी गेला. एडिथचा मूड वाईट होता. तुसडेपणाने ती म्हणाली, 'एकदा काय ते म्हणून दाखवा माझा वेळ फुकट घालवू नका.' घाबरत घाबरत तिच्या घरच्या पियानोवर ते गाणं चार्ल्सने म्हटलं. गाणं संपलं. एडिथ शांत होती. तिने चार्ल्सला गाणं पुन्हा म्हणायला सांगितलं. पुन्हा ऐकत असताना ती अतिशय आनंदी होत गेली. आणि तिने ते गाणं म्हणायचं कबूल केलं. आणि मग या जगप्रसिद्ध गाण्याचा एडिथच्या गळ्यातून जन्म झाला. मूळ फ्रेंच गाणं आहे Non, je ne regrette rien. 



त्यानंतर हे गाणं जवळपास चौदा गायकांनी गायलं आहे आणि किमान बारा भाषांत त्याचा अनुवाद झाला आहे. माझ्या फ्रेंच ज्ञानाची कुवत मी वर सांगितलेली आहे. त्यामुळे मी ह्या गाण्याच्या शब्दांसाठी त्याच्या इंग्रजी अनुवादाकडे वळलो. तो इंग्रजी अनुवाद असा आहे.

No! No regrets
No! I will have no regrets
All the things
That went wrong
For at last I have learned to be strong

No! No regrets
No! I will have no regrets
For the grief doesn't last
It is gone
I've forgotten the past

And the memories I had
I no longer desire
Both the good and the bad
I have flang in a fire
And I feel in my heart
That the seed has been sown
It is something quite new
It's like nothing I've known

No! No regrets
No! I will have no regrets
All the things that went wrong
For at last I have learned to be strong

No! No regrets
No! I will have no regrets
For the seed that is new
It's the love that is growing for you



कष्ट अवहेलना आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशस्वी झालेल्या एडिथला या गाण्यात आपलं आयुष्य दिसलं नसतं तर नवलंच. हे गाणं म्हणजे भित्र्या स्वभावाच्या लहानखुऱ्या मुलीनं आयुष्यभर केलेल्या झगड्यानंतर त्यावर केलेलं भाष्य होतं. आयुष्याच्या संध्याकाळी तिला कुणी त्या खडतर प्रवासाबद्दल तिचं मत विचारलं असतं तर जणू त्याचं उत्तरंच ह्या गाण्यात होतं. इथपर्यंत कळल्यावर माझे डोळे पाणावले होते.

पण मादागास्करमध्ये हे गाणं ऐकल्यावर जखमी पोलिसांच्या अंगात वीरश्री का संचारते?, ते काही कळत नव्हतं. मिळेल तसा शोध घेत होतो.

एकदा अल्जीरियाच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल वाचत होतो तेव्हा अचानक एक लिंक मिळाली. अल्जीरिया किंवा अल्जीयर्स ही उत्तर अफ्रिकेतील फ्रान्सची वसाहत. खरं तर वसाहत नाहीच त्यांनी अल्जीरियाला फ्रान्सची भूमी घोषित केलेलं होतं. या अल्जीरियामध्ये दोन प्रकारचे नागरिक रहात होते. मूळचे इस्लामिक अरब आणि नंतर तिथे आलेले कॅथलिक आणि ज्यू फ्रेंच लोक. अर्थात इस्लामी अरबांना समाजात खालच्या दर्जाचे स्थान मिळाले होते. इतका खालचा दर्जा की अरब नागरिकाच्या मताची किंमत फ्रेंच नागरिकाच्या १/७ होती. तिथे स्वातंत्र्यलढा धुमसत होता. तो रक्तरंजित होता. खून, बलात्कार, मारझोड, सामूहिक हत्याकांड, लुटालूट दोन्ही बाजूकडून चालू होते. फ्रेंच सरकार प्रचंड दमनकारी होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अल्जीरियाचा लढा तीव्र होत गेला. १९५४ पासून तीव्रता वाढत गेली. अल्जीरियामधील फ्रेंच लोकांना अल्जीरिया सोडायचे नव्हते. पण फ्रान्समधील कम्युनिस्ट लोकांच्या मदतीने अल्जीरियन स्वातंत्र्यसैनिक आपला लढा जागतिक व्यासपीठावर नेऊ शकले.

शेवटी फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक या प्रश्नावर कोसळले. आणि चार्ल्स द गॉलला पुन्हा पाचारण करण्यात आले. त्याच्या अधिकारात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आणि हे सगळे होण्यात अल्जीरियातील फ्रेंच लोकांचा मोठा हात होता. त्यांची अपेक्षा होती की चार्ल्स द गॉल अल्जीरियातील बंडाळी मोडून काढतील आणि जुनी व्यवस्था अधिक मजबूत करतील. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव इतका होता की संपूर्ण स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर अल्जीरियात सार्वमत घेण्यास चार्ल्स द गॉलने संमती दिली. सार्वमत घेतले गेले. अल्जीरिया आणि फ्रान्समधील ७५% लोकांनी अल्जीरियाला स्वातंत्र्य द्यावे असे मत दिले. अल्जीरियातील फ्रेंच नागरिकांना मात्र यामुळे आपली फसवणूक झाली आहे असे वाटले. त्यांनी फ्रांस सरकारविरोधात आणि या सार्वमताच्या विरोधात बंड पुकारले. बंडाला सगळ्यात पहिला पाठिंबा दिला होता तो फ्रेंच लीजन या लष्करी तुकडीने. एडिथने आपलं No Regrets हे गाणं या फ्रेंच लीजन तुकडीला अर्पण केलं होतं.

फ्रेंच लीजन म्हणजे फ्रेंच नागरिक नसलेल्या पण फ्रान्ससाठी लढू इच्छिणाऱ्या लोकांची फ्रान्सने परदेशात उभारलेली सेना. हिची सुरुवातच मुळी अल्जीरियात झाली. या सेनेत सहभागी असलेल्या परदेशी नागरिकाने फ्रान्सच्या बाजूने लढताना जर युद्धात रक्त सांडले तर त्याला लगोलग फ्रान्सचे नागरिकत्व मिळते. ही जगातील एकमेव सैन्य तुकडी असावी की जी आपल्या देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ न घेता आपल्या तुकडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेते.

तर अश्या या फ्रेंच लीजनच्या अल्जीरियातील तुकडीने सार्वमताचा विरोधातील बंडाला आपले समर्थन दिले. पण बंड तकलादू ठरले. चार दिवसात त्याचा निःपात करण्यात आला. बंडाचे सूत्रधार पकडले गेले. त्यांना शिक्षा झाल्या आणि सैन्य तुकडीतील शिपायांना अल्जीरियातील आपल्या बराकी सोडून दुसऱ्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितले गेले. जवळपास १५० वर्षांचा इतिहास असलेली आपली शक्तिस्थाने सोडून सैनिक बराकीबाहेर निघाले तेच मुळी एडिथचं No Regrets हे गाणं म्हणत.

१५० वर्षाचा बऱ्यावाईट अनुभवांचा ऋणानुबंध सोडून चालले होते ते सैनिक. नवीन मोहिमेवर. जुनं सगळं सोडून. ज्याला त्यांनी अल्जीरियातील स्वातंत्र्यलढा मोडून काढण्यासाठी सर्वाधिकारी राष्ट्रपती होण्यास मदत केली होती त्यानेच अल्जीरियाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते आणि फ्रेंच लीजनच्या शक्तीला उखडून टाकले होते. काव्यगत न्याय म्हणावा की काय अशी परिस्थिती. आणि म्हणून ते जणू No Regrets म्हणत स्वतःचं सांत्वन करत होते. त्यानंतर ते गाणं फ्रेंच लीजनचं स्फूर्तीगीत बनलं आहे.

जुनी जखमी मोहीम सोडून पुन्हा नवीन मोहिमेवर रुजू होण्याची आज्ञा देताना हे स्फूर्तीगीत जेव्हा मादागास्करची खलनायिका म्हणते तेव्हा तिच्या साथीदारांच्या मनात स्फूर्ती दाटून येणे स्वाभाविक असते. हे जाणवल्याने माझा शोध संपत आला. मादागास्करच्या दिग्दर्शकाच्या कल्पकतेचे आणि विनोदबुद्धीचे कौतुक वाटले. पण एडिथच्या गाण्याच्या प्रवासाने दिपून गेलो असतानाच अजून एक गोष्ट जाणवली. की या गाण्याचा प्रवास अजून थांबलेला नाही.

एकंच मूल, छोटी कुटुंब, पंचविशी आणि तिशीपर्यंत चालणारी शिक्षणं, तोपर्यंत होऊन जाणारी एखाद दोन प्रेम प्रकरणं, त्यानंतर त्याच जोडीदाराशी किंवा दुसऱ्या कुणाशी होणारे प्रेमविवाह किंवा जमवून आणलेले विवाह, मग नोकरी आणि घर यांचा सुवर्णमध्य साधण्याची धडपड, त्यात समाजमाध्यमामुळे जवळ आलेलं जग, त्यातून दिसणारे मित्र मैत्रिणींचे आनंदी चेहरे, त्यातून आपण सोडून जग आनंदात असल्याचा होणारा आभास आणि शेवटी त्यातून स्वतःसाठी येणारी अस्वस्थता, जवळ आलेल्या जगामुळे नवीन मित्र मैत्रिणी मिळण्याच्या वाढलेल्या संधी, त्यातून वाढू लागलेले विवाहबाह्य संबंध, आई वडिलांशी उडणारे खटके, मुलांच्या शिक्षणाविषयी वाढणारी अपराधी भावना, आपण आता आयुष्याच्या केंद्रभागी नाही हे कळल्यावर होणारी मनाची घालमेल, त्या घालमेलीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःशी चाललेली झटापट, त्यात काही जणांचे उध्वस्त मनोविश्व, काही जणांना जीवनाचा जाणवलेला फोलपणा, काहीजणांना पुन्हा सापडलेला नवा सूर… या सगळ्याचे व्यवस्थित सार म्हणजे मायकेलने लिहिलेले, चार्ल्सने संगीतबद्ध केलेले आणि एडिथने अजरामर करून ठेवलेले हे गीत. ज्यांना नवीन सूर सापडतो त्यांना तर हे गीत आवडेल याची मला खात्री आहे. आणि ज्यांना तो सापडत नाही त्यांच्याही जुन्या जखमा या गीतातील शेवटचं कडवं ऐकताना चटकन बऱ्या होवोत, बांधून ठेवणारे प्लॅस्टर गाळून पडो आणि नवीन सूर सापडण्यासाठी, सापडलेला सूर आळवण्यासाठी शेवटचं कडवं प्रेरणा देणारे ठरो हीच सदिच्छा.

No! No regrets
No! I will have no regrets
For the seed that is new
It's the love that is growing for you