Thursday, March 8, 2018

गाणी आणि वर्तमान (भाग ३)

-------
------
समाजमाध्यमांबाहेरही जग आहे आणि ते इथल्या जगापेक्षाही कित्येक पटीने मोठं आहे हे मला माहिती आहे. इथे व्यक्त होताना लोक वास्तवापेक्षा अधिक उथळपणे व भडकपणे व्यक्त होतात हे मला माहिती आहे. हे असे का होत असावे याबद्दल विचार करत असताना मला जाणवले की राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे समाजमाध्यमांवरील समर्थक या तिघांचे परस्परसंबंध पूर्णतयः भिन्न स्वरूपाचे असतात.

राजकीय पक्ष आपली जाहीर भूमिका घेतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक आयुष्यात ती मान्य असेलच अशी स्थिती कायम नसते. कार्यकर्त्याला लोकांना भेटायचे असते. त्यांच्यात राहायचे असते. त्यांच्याबरोबर राहून काम करायचे असते. त्यामुळे कित्येकदा पक्षाची जाहीर भूमिका वेगळी असली तरी कार्यकर्ता आपल्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे त्या भूमिकेची धार थोडी बोथट करून वर्तन करतो. त्यामुळे पक्ष जरी कडवी भूमिका घेत असला तरी प्रत्यक्षात मात्र ती भूमिका तितकी कडवी रहात नाही. म्हणजे कार्यकर्ता पक्षाच्या भूमिकेतील कडवटपणाला कमी करतो. पक्षाला सुसह्य करतो.

पक्षाच्या कार्यकर्त्याचे वर्तन असे असले तरी समाजमाध्यमांवरील पक्षाच्या समर्थकांचे वर्तन असेच असेल याची खात्री नसते. किंबहुना ते अनेकदा उलटेच असते. इथे सगळेच आभासी प्रतिमेशी बोलत असतात. त्यामुळे आपले बोलणे समोरच्यावर ठसवण्यासाठी अधिक तीव्रतेचा आधार घेतला जातो. प्रत्यक्ष हितसंबंध गुंतलेले नसल्याने समोरच्याला नामोहरम करण्यात काहीच वावगे वाटत नाही. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेला बोथट करून ती समाजाच्या सध्याच्या ग्रहणक्षमतेइतकी सौम्य करण्याऐवजी ती आहे त्यापेक्षा अधिक जहाल आणि तीव्र स्वरूपात मांडली जाते.

एकाची पोस्ट पाहून दुसऱ्याला पोस्ट सुचते त्यामुळे इथे एकाच विषयावर असंख्य पोस्टींच्या लाटा उसळत असतात. ऑनलाईन आणि रियलटाइम असल्याने हा संवाद समकालीन (synchronous) आहे असा आपल्याला भास झाला तरी त्या पोस्टवर येणाऱ्या कमेंट्स वेगवेगळ्या वेळेला येत असल्याने प्रत्यक्षात तो संवाद विषमकालीन (asynchronous) असतो. त्यामुळे आपण ऑफलाईन गेल्यावर आलेल्या विरोधी प्रतिसादांना उत्तर देताना अनेकांची भाषा अजून भडक होत जाते. आणि मग प्रतिध्वनीचा प्रतिध्वनी येत राहून सर्व वाचकांच्या मनावर ओरखडे पडतात. तोपर्यंत नवीन विषयाची सुरवात होते आणि मागच्या विषयवार निघालेल्या ओरखड्याची किंमत पुढच्या पोस्टवर वसूल केली जाते. त्यातून राजकीय विषयांवर लिहिणाऱ्या लोकांचे त्यांच्याही नकळत कंपू बनत जातात. आणि मग प्रत्येकाच्या पोस्टमधील विखार वाढतो आणि आपापल्या कंपूतील लोकांच्या टाळ्या घेऊन समोरच्या कंपूतील लोकांचे मतपरिवर्तन न करता आपण जिंकलो म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतो. पण प्रत्यक्षात मात्र पक्षाच्या समर्थकाने आपल्या वर्तनाने त्या पक्षाला समाजासाठी असह्य केलेले असते.

प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठी राजकारण करतो. किंबहुना त्यासाठीच राजकारण केले पाहिजे. पण मग सत्ता कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मात्र, ‘आपापल्या मतदारांच्या आणि पाठिराख्यांच्या उत्कर्षासाठी’ असे असल्याने ‘संपूर्ण समाजाचा उत्कर्ष’ हे कुठल्याही पक्षाचे धोरण असू शकते अशी कल्पना करणेदेखील भारतात अशक्य झाले आहे. त्यामुळे हा पक्ष शेटजी भटजींचा, तो पक्ष शेतकऱ्यांचा, तो पक्ष उपेक्षितांचा, तो पक्ष अल्पसंख्यांकांचा असे वर्गीकरण झालेले आहे. समाजमाध्यमे आल्यामुळे या वर्गीकृत पक्षांच्या समर्थकांना आपापली भूमिका रोज समोर मांडावीशी वाटते आहे. पूर्वी एखाद्या पक्षाला मत दिल्यावर पाच वर्षे त्याचे रोज समर्थन करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि मतदार अशी विभागणी होती. आता मात्र केवळ मतदार असून चालत नाही. जर तुम्ही समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पक्षाचे समर्थकही व्हावे लागते. फार कमी लोक या ताणापासून स्वतःला वाचवू शकतात. आणि वाचवू न शकलेले अनेकजण शेवटी कंपूत अडकतात. त्यामुळे दिशाहीन पक्ष, त्यांचे कडवे आणि वाचाळ समर्थक आणि बावचळलेले कार्यकर्ते असे काहीसे चित्र सध्या दिसून येते. आणि संधीसाधू नेत्यांचे फावते.

मी पक्षांना दिशाहीन म्हणतो कारण, सत्ता जाताच ते सैरभैर होतात. त्यांचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते लगोलग त्यांना सोडून नव्या सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला बसतात. म्हणजे समाजवाद, साम्यवाद, भांडवलशाही हे शब्द कितीही वेळा वापरले तरीही कुठल्याही राजकीय पक्षाकडे यापैकी एकही संकल्पना भारतीय लोकशाहीच्या चौकटीत कश्याप्रकारे राबवायची त्याचा ठोस कार्यक्रम नाही. आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांसाठी यांच्याकडे कुठली योजना नाही. ज्यांच्याकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी योजना नाहीत ते देशासाठी काही दूरगामी योजना आखून सर्व समाजासाठी काही करतील ही आशा भाबडी ठरते. किंबहुना आपल्या लोकशाहीत देशातील सर्व लोक येतात हेच या राजकीय पक्षांना मान्य नाही.

मध्ययुगातून आधुनिक युगात येण्याची पूर्ण तयारी व्हायच्या आधीच स्वातंत्र्य मिळालेल्या या देशाकडे स्वतःचे राजकीय तत्वज्ञान नाही. राजकीय तत्वज्ञान म्हणजे समाज कोणत्या मूल्यांवर उभा करावा? ती मूल्ये कशी निवडावीत? त्या मूल्यांना प्रतिष्ठा कश्याप्रकारे मिळवून द्यावी? त्या मूल्यांसाठी व्यवस्था कशी उभारावी? आणि त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे? याचा कुठलाही ठोस कार्यक्रम एकाही राजकीय पक्षाकडे आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मध्ययुगीन सामंतशाहीचे मूल्य आणि विषमतेचे तत्व हाडीमासी खिळलेल्या समाजात घटनेने आणलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये म्हणजे बुजगावण्याला घातलेल्या सुटाबुटासारखी आहेत.

चीन किंवा व्हिएतनाम सारखे देशही साम्यवाद राबवताना स्वतःच्या देशातील लोकांच्या मानसिकतेचा विचार करतात. नेत्यांनी निवडलेल्या मूल्यावर आधारित समाज हे जर गंतव्य स्थानक असेल तर, आज आपला समाज कुठे आहे? प्रवास नक्की किती मोठा आहे? त्या प्रवासात समाजात पूर्वीपासून रुळलेली कुठली मूल्ये अडथळा बनू शकतात? त्यांना दूर करताना त्या मूल्यांमुळे ज्यांना लाभ होतो आहे त्या सर्व समाजघटकांचा जो विरोध होईल त्या विरोधाला कश्या प्रकारचे हाताळायचे? यासारख्या कुठल्याही प्रश्नाला हात न घालता, त्याची स्वतः शोधलेली उत्तरे जनतेसमोर न ठेवता, त्याबद्दल कुठलीही चर्चा न करता; आपले राजकीय पक्ष काम करतात म्हणून मला ते दिशाहीन वाटतात. त्यांचे बहुतेक सर्व निर्णय दीर्घकालीन नसून तत्कालीन असतात, दोन निर्णयात सुसूत्रता नसते परिणामी त्यांच्या समर्थकांना वाचीवीर होण्याशिवाय पर्याय उरत नाही.

ही स्थिती जरी फार उत्साहवर्धक नसली तरी रोज समाजमाध्यमांवर आक्रस्ताळेपणाने व्यक्त होण्याच्या सवयीमुळे, आपण किंवा आपल्या मित्रांनी घेतलेली भूमिका योग्य आहे की नाही त्याचा अनेकांना रोज धांडोळा घ्यावासा वाटू लागेल, अशी मला खात्री आहे. अमुक एक पक्ष सत्तेवर आला की रामराज्य येईल अशी आशा ठेवणाऱ्या सगळ्यांचा भ्रमनिरास होण्याची प्रक्रिया समाजमाध्यमांमुळे वेगवान होते आहे. काँग्रेसच्या शासनकाळातील अनागोंदीबद्दल लोकांना चीड येण्यास सत्तर वर्षे लागली असतील (सत्तर हा आकडा अचूक नाही याची मला कल्पना आहे) तरी भाजपाबद्दल किंवा त्यानंतर पुढे सत्तेवर येणाऱ्या कुठल्याही पक्षाबद्दल तसे होणार नाही. समूहाची स्मृती क्षणिक असते हे जरी खरे असले तरी समाजमाध्यमांमुळे तिला जिवंत राखता येऊ शकते. आपण ज्या पक्षाचे समर्थन करतो त्या पक्षाचे इतर समर्थक कश्याप्रकारे वागतात हे समाजमाध्यमांमुळे सगळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत रहाते. त्यामुळे समर्थन करणाऱ्यांचा आवेश भविष्यात आटोक्यात येईल याचीदेखील मला खात्री आहे. फक्त आवश्यकता आहे ती समाज, राजकारण आणि लोकशाही कशी चालते त्याबद्दलचे आपले सगळ्यांचे आकलन सुधारून घेण्याची.

इतर देशांना गुलाम न करता स्वदेशाला संपन्नतेच्या शिखराकडे नेणे म्हणजे डोंगराळ प्रदेशातील घाटरस्त्यावर गाडी चालवण्यासारखे आहे. सतत गिअर बदलावे लागतात. ब्रेक आणि क्लच यांचा ताळमेळ ठेवावा लागतो. आणि यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतील असे मला वाटते. हतोत्साहित करणाऱ्या सध्याच्या वातावरणात समाजमाध्यमांना उद्देशून एकंच गाणं म्हणावंसं वाटतं.

Edelweiss, Edelweiss
Every morning you greet me
Small and white, clean and bright
You look happy to meet me

Blossom of snow may you bloom and grow
Bloom and grow forever
Edelweiss, Edelweiss
Bless my homeland forever

द साउंड ऑफ म्युझिक या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतीच ५३ वर्षे होऊन गेली. त्या चित्रपटात हे गाणे दोनदा येते. जर्मनीने ऑस्ट्रियाला विलीन करून घेतल्यावर ऑस्ट्रियन नागरिक असलेल्या कॅप्टन व्हॅन ट्रॅप एकदा आपल्या कुटुंबासमवेत हे गाणं म्हणतो. आणि दुसऱ्या वेळी साल्झबर्ग येथील उत्सवात हे गाणे तिथे जमलेले सर्व लोक गातात.

या गाण्यातील Edelweiss हे आल्प्स पर्वतराजीमध्ये मिळणारे एक नाजूक फूल आहे. ऑस्ट्रियात हे फूल संराक्षित आहे. ते तोडणे कायद्याने गुन्हा आहे. काही सैनिक तुकड्यांच्या टोपीवर त्याची मुद्रा वापरली जाते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी विरोधी काम करणाऱ्या संघटनांनी Edelweiss हे नाव वापरले होते.

माझ्यासाठी किमान आजतरी Edelwiess म्हणजे समाजमाध्यमे आहेत. आणि नाझी म्हणजे कुठलाही एक पक्ष नसून सर्व पक्षीय विखारी आणि आततायी समर्थक आहेत. त्या सगळ्यांनी इथली लोकशाही नष्ट करू नये म्हणून मी माझ्या Edelweiss ला उद्देशून हे गाणं गुणगुणतो. 



Edelweiss, Edelweiss
Every morning you greet me
Small and white, clean and bright
You look happy to meet me

No comments:

Post a Comment