Tuesday, March 13, 2018

Long March

Chinese Long March of 1934
Image Courtesy: Internet

Maharashtra Kisan Long March 2018
Image Courtesy : Internet

दोन कामं होती म्हणून काल ऑफिसच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. खरं तर मित्राकडे रहाण्याचा कार्यक्रम होता. पण अर्ध्या रस्त्यात असताना एका मित्राने वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकणार नसल्याचं सांगितलं. लगेच घरी फोन करून बायकोला कळवलं की रात्री घरी परत येतो आहे. पुण्यात ज्याच्याकडे मुक्कामाला थांबणार होतो त्या मित्रालाही फोन लावून कार्यक्रम बदलल्याची माहिती दिली. आणि ए सी गाडीने आवडतं संगीत ऐकत सकाळी झपाझप गेलो. पहिलं काम पूर्ण केलं. मित्रांना भेटलो आणि संध्याकाळी तसाच परतलो. तरीही थोडा थकलो. सकाळी फेसबुक चेक केलं. मार्कबाबाने सांगितलं की आज तापमान ४० अंश सेल्सियस असणार आहे. त्यामुळे क्लासला दुपारी येणारी मुलं दमलेली असतील, यंदाचा उन्हाळा तीव्र असेल, एप्रिलमध्ये व्हेकेशन बॅचेस सुरु होण्यापूर्वी वर्गातले ए सी पाण्याने नीट स्वच्छ करून घेतले पाहिजेत वगैरे मुद्दे डोक्यात आले. 

तोपर्यंत फेसबुक टाइमलाईनवर शेतकऱ्यांच्या मोर्चाचे Alka Dhupkar यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ आले. उन्हातान्हात फिरणारी माणसं पाहिली. म्हाताऱ्या स्त्रिया पाहिल्या. रात्री रस्त्यावर झोपलेले हजारो लोक पाहिले. तुटक्या चपलेचे. जखमी पायाचे, धुळीने माखलेल्या पायांचे फोटो पाहिले. मनातल्या मनात ए सी गाडीतून आवडतं संगीत ऐकत, शेवटच्या क्षणी कार्यक्रम बदलल्यावर सगळ्यांना कळवून, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम पूर्ण करून आणि जे अर्धवट राहिले त्याबद्दल पुढच्या भेटीची योजना करून पूर्ण झालेल्या कालच्या माझ्या प्रवासाची आणि शेतकऱ्यांच्या या मोर्च्याची तुलना झाली. स्वतःला आलेल्या शिणवट्याची लाज वाटली. 

कसलीच शाश्वती नसताना, कुठलंही काम होईल याची खात्री नसताना, राजकीय स्वार्थासाठी कोण आपला कश्याप्रकारे वापर करून घेईल याबद्दल काही कल्पना नसताना हजारो लाखो लोक रणरणत्या उन्हात एकत्र चालतात. कोण आपला नेता? बोलणी करण्यासाठी सरकार त्याला मान्यता देणार का? सरकारतर्फे कोण बोलणी करणार? काय मिळालं की मोर्चा विसर्जित केला जाणार? जे तोंडी किंवा लेखी मिळेल ते प्रत्यक्षात हाती केव्हा पडणार? आणि ते नाही मिळालं तर आपण पाठपुरावा कसा लावणार? मोर्च्याचं नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेत किंवा विरोधात कसं बसवणार? आपले हक्क मिळवण्यात यांना अपयश आलं तर तर दुसरा पर्याय कोणता? आणि इतर कुठले मार्ग वापरणार? त्यांच्यामागे असलेलं आपलं संख्याबळ कमी होऊ नये म्हणून स्वतः कितीवेळ तग धरणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याजवळ असतील का? हे प्रश्न महत्वाचे आहेत असं त्यांना वाटत असेल का? या विचाराने मीच अस्वस्थ झालो. 

यांना आदिवासी म्हणावं की वनवासी? शेतकरी कर भरतात की नाही? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी की नाही? कर्जमाफीचा लाभ बडे शेतकरीच घेतात की नाही? या मोर्च्यात राजकीय पक्षांचे झेंडे असावेत की नाहीत? हे सगळे प्रश्न म्हणजे चक्रीवादळात उडणाऱ्या धुळीसारखे आहेत. चक्रीवादळाची खरी ताकद वादळाबरोबर उडणाऱ्या धुळीत नसून त्या वाऱ्यांना वाहू देणाऱ्या परिस्थितीत असते. आणि सध्या आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की वेगवेगळे गट सतत लढत आहेत. कुणी अस्तित्वाची लढाई लढतंय तर कुणी अस्मितेची. अस्मितेच्या लढायांकडे समाजाने तिरस्काराने पाहणं आवश्यक आहे तर कुठल्याही एका गटाच्या अस्तित्वाच्या लढाईकडे मात्र संपूर्ण समाजाने सहानुभूतीने पाहणं आवश्यक आहे. 

दुर्दैवाने आपल्या देशातील अस्तित्वाच्या लढायांसाठी आपण आपलं स्वतःचं, इथल्या लोकांना जवळचं वाटेल असं तत्वज्ञान तयार करण्यात अपयशी ठरलो आहोत. सध्याच्या मोर्चाचं नावदेखील लॉन्ग मार्च वापरून मोर्चेकरी नसता विरोध ओढवून घेत आहेत. भारतातील कम्युनिस्ट विरोधकांच्या नजरेत अपयशी असतील, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि त्यानंतरही काही वर्षे त्यांचा किंवा त्यांच्यातील काही गटांचा इतिहास फारसा उज्वल नसेल. पण त्यामुळे त्यांनी ज्यांची बाजू घेतली आहे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तिरस्कारयोग्य ठरत नाही. 

इतके प्रश्न आपल्या समाजात आहेत यावर बहुसंख्यांचा विश्वास न बसणं. सगळे प्रश्न भांडवलशाही किंवा राष्ट्रवाद सोडवू शकेल इतकं भाबडं सामाजिक आकलन असणं, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. 

खरंतर लोकशाही मानणारे कम्युनिस्ट, विरोधी पक्ष म्हणून काम करणारे कम्युनिस्ट, लॉन्ग मार्च काढून सरकारकडे निवेदन देणारे कम्युनिस्ट ही खास भारतीय निर्मिती आहे. हिचा वापर आपण करून घेऊ शकलो तर इथल्या सर्वांचं भलं होणार आहे. त्यामुळे या मोर्च्याला पाठिंबा देऊन आगामी निवडणुकीत सर्व पक्षांना या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट करायला लावणं, आणि सारासार विचार करून मतदान करणं आपलं कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment