Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग १)

_________

जगण्यासाठी गोडं पाणी आवश्यक आहे. गोडं पाणी झऱ्यात होतं. नदीत होतं. तळ्यात होतं. आपण पाण्याकडे जात होतो. आपण कधी पाण्याकाठी घरं वसवली. तर कधी घराजवळ विहिरी खोदल्या. पाण्याशी निगडित काही व्यवहार जसे की धुणी भांडी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीकाठी करू लागलो. तर काही व्यवहार, जसे की अंघोळ, स्वयंपाक वगैरे घरात करू लागलो. घरात करण्याच्या व्यवहारांसाठी आपण हंडे कळश्या घेऊन नदीकाठी किंवा सार्वजनिक विहिरीवर जाऊ लागलो.

म्हणजे आपल्या घरी पाणी येऊ लागलं ते आपल्या डोक्यावर किंवा कमरेवर धरलेल्या कळश्यांमधून किंवा बादल्यांमधून तेही माणसांसाठी बनवलेल्या रस्त्यांवरून माणसांच्या डोक्या-खांद्यांवरून.

मग गावांची शहरे झाली. पाण्याचे नैसर्गिक स्रोत भलतीकडे आणि माणसांची वस्ती भलतीकडे झाली. आता हंडे- कळश्या, बादल्या वापरणं अशक्य होतं. मग आपण नवीन युक्ती केली. आपण माणसांचे रस्ते आणि पाण्याचे रस्ते बदलून टाकले. माणसाच्या रस्त्याला रस्ते हेच नाव ठेवलं पण पाण्याच्या रस्त्याला आपण नाव ठेवलं पाईपलाईन. आता पाणी पाण्याच्या रस्त्याने शहरभर फिरवणं शक्य झालं. मोठी पाईपलाईन >> मध्यम पाईपलाईन >> छोट्या पाईपलाईन्स असं प्रचंड मोठं जाळं आपण शहरभर विणलं. आता पाणी कुणाच्या डोक्यावरून किंवा खांद्यावरून फिरत नव्हतं. याउलट, रस्त्यावरून उताराकडे धावण्याच्या स्वतःच्या गुणधर्माला वापरून ते प्रत्येकाच्या घरात पोहोचू लागलं.

मग लोक फिरू लागले. आणि फिरताना घरातील नळ, पाईपलाईन बरोबर घेऊन फिरणं अशक्य होतं. काही गावे इतकी दुर्गम होती की तिथपर्यंत पाईपलाईन्स पोहोचवण्याचा आणि त्या सांभाळण्याचा खर्च जास्त होता. मग आपण बाटलीबंद पाणी ही व्यवस्था वापरायला सुरवात केली. आता पाईपलाईन फुटली तरी वेगवेगळ्या ट्रकमध्ये भरलेल्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

असंच काहीसं माहितीबाबत आहे.

सुरवातीला माहितीचा संदेश दूरवर पाठवण्यासाठी जोरात ओरडणे हा मार्ग होता. पण मग ती माहिती सगळ्यांना मिळायची तिच्यात गुप्तता राहात नव्हती. म्हणून मग संकेत वापरून माहिती पाठवणे सुरु झाले. त्यात मग तोफांचे आवाज, मशालींचा उजेड, विविधरंगी निशाणे आली. पण लांबलचक संदेश पाठवणे अशक्य होते. मग संदेशवाहक आले. हनुमंत किंवा अंगद किंवा कृष्ण किंवा विदुर अश्या हुशार लोकांनीही संदेशवाहकांचे काम केले. पण यात संदेशवाहक मूळ संदेशात स्वतःची भर घालून संदेश बिघडवण्याची भीती होती.

मग लिपीचा शोध लागला. मग घोडेस्वार, सांडणीस्वार वगैरे संदेशवाहकांच्याबरोबर लिखित स्वरूपात संदेशवहन सुरु झाले. कधी कधी कबुतरे, ससाणे देखील वापरले गेले. पण पक्ष्यांचा वापर करून पाठवलेले संदेश लहान असायचे आणि ते पोहोचतीलंच याची खात्री नव्हती. म्हणून माणूस संदेशवाहक ही पद्धत जास्त खात्रीशीर होती. म्हणजे इथेदेखील पाण्याप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी माणसांचे रस्ते वापरले जाऊ लागले. आपापली पत्रे समुद्रमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग किंवा भूमार्गावरून इकडून तिकडे जाऊ लागली.

मग तारायंत्राचा शोध लागला. म्हणजे सगळ्यात प्रथम संदेशवहनासाठी आपण वेगळे रस्ते वापरले ते तारायंत्राच्या शोधानंतर. पण इथेदेखील संदेशाची लांबी छोटी असणं आवश्यक होतं. आणि मग लागला टेलिफोनचा शोध. यात संदेश देणारा आणि घेणारा या दोघात मध्यस्थ कुणीच नव्हता. आणि संदेश माणसाच्या रस्त्याने न जाता टेलिफोनच्या वायरीतून जाऊ लागला. ही मोठी क्रांती होती. जगभर टेलेफोन लाईन्सचं जाळं विणलं गेलं. पाण्यासाठी पाईपलाईन्स आणि संदेशासाठी टेलिफोन लाईन्स.

फक्त पाईपलाईन्स जाळं तयार करणं सोपं होतं. कारण पाण्याचा स्रोत आणि आपलं घर स्थिर होतं. त्यामुळे पाईपलाईन्सचं जाळं देखील स्थिर होतं. पण टेलिफोनच्या बाबतीत गडबड होती. इथे आपलं घर स्थिर असलं तरी आपल्याला येणारा फोन कुणाकडूनही येऊ शकला असता. म्हणजे स्रोतापासून ते घरापर्यन्त टेलिफोन लाईन्सचं स्थिर जाळं तयार करायचं असेल तर आपल्याला ज्या ज्या लोकांकडून फोन येऊ शकतील त्या सर्व लोकांकडून प्रत्येकी एक अश्या अनेक वायर्सचं जाळं आपल्याला विणावं लागलं असतं. आणि टेलिफोन उपकरणाच्या मागे या सगळ्या वायर्स लावण्यासाठी असंख्य सॉकेट्स तयार ठेवावी लागली असती. हे अशक्य होतं. म्हणून आपण दुसरी शक्कल लढवली. यात आपण मध्ये स्विच ठेवले. आणि स्विच बदलायला ऑपरेटर ठेवले. तो ऑपरेटर जिथे बसतो तिथे टेलिफोनचे स्विच एक्सचेंज होतात म्हणून ते टेलिफोन एक्सचेंज. आता टेलिफोन एक्सचेंजपासून घराजवळच्या बॉक्सपर्यंत अनेक वायर्सची बनलेली एक मोठी वायर. आणि घराजवळच्या बॉक्समधून घरापर्यंत एकच छोटी वायर. आणि एका एक्सचेंजच्या क्षेत्रातून दुसऱ्या एक्सचेंजच्या क्षेत्रात फोन करायचा असेल तर तो ट्रॅक कॉल जोडून द्यायला मध्ये ऑपरेटर अशी रचना तयार झाली.

आता संदेश देणारा आणि घेणारा दूरवर असले तरी एकमेकांना संदेश पाठवू शकत होते. मध्यस्थ नव्हते. माणसांच्या रस्त्यांऐवजी संदेशाचे स्वतःचे रस्ते होते. भेसळीची शक्यता अतिशय नगण्य होती. संदेश जवळपास गुप्त होते. आणि संदेश त्वरित पोहोचत होते. संदेशाची लांबी गरजेनुसार कमी जास्त करता येत होती. तंत्राची संदेशाचा आकार ठरवत नव्हती. पण संदेश केवळ ध्वनीच्या स्वरूपात होते. आणि कुणी छान नकलाकार असेल तर दुसऱ्याला फसविणे शक्य होते.

तारायंत्र आणि दूरध्वनीच्या सहाय्याने युरोपियांननी जगभर सत्ता प्रस्थापित केली. मग दोन महायुद्ध झाली. त्यात तारायंत्र आणि दूरध्वनीच्या मर्यादांचा वापर करून शत्रुपक्षाला जेरीला आणण्याचे प्रकार करून झाले. महायुद्ध संपली आणि शीतयुद्ध सुरु झाले. जुन्या वसाहतकारांना आता नवीन भीती सतावू लागली होती. जर कुणी महासागराच्या तळाशी टाकून ठेवलेल्या मोठमोठ्या टेलिफोन लाईन्स कापून टाकल्या तर दूरवर संदेश पोहोचवायचे कसे? जसं पाईप फोडला तर पुढे पाणी जाणार नाही तसंच बॅकबोन वायर तोडली तर पुढे संदेश जाणार नाही.

मग इथे आपण नवीन तंत्रज्ञान काढलं. त्याचं नाव पॅकेट स्विचिंग. माहितीच्या स्रोताजवळ माहितीची छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते सगळे तुकडे विविध वायर्समधून दुसऱ्या टोकापर्यंत पाठवायचे. तिथे मग या तुकडयांना पुन्हा जोडून मूळ संदेश पुन्हा तयार करायचा. आणि ही सगळी तोड-जोड यंत्रांकरवी करायची. इतकंच काय पण कुठलं पॅकेट कुठल्या वायरमधून जाईल तेदेखील यंत्रच ठरवणार. म्हणजे आता पाणी पाईपलाईनमधून न जाता बिसलेरीसारखं बाटल्यांमधून पाठवतो तसं एकाच वायरमधून संदेश न जाता त्याचे विविध तुकडे विविध वायरमधून जातात. मग यात तुकडे पुढे मागे पोहोचले, मधेच हरवले तर त्याची सगळी जबाबदारी यंत्र घेणार.

या कल्पनेतून जे जन्माला आलं त्याला आपण म्हणतो इंटरनेट. या व्यवस्थेची कल्पना येण्यासाठी एक व्हिडीओ देतो. 



इंटरनेट म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांची एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे. यात मेसेज तोडायचा कसा? पाठवायचा कसा? पोहोचला आहे की नाही याची खात्री कशी करायची? नाही पोहोचला तर पुन्हा पाठवायचा कसा? आणि पुन्हा जोडायचा कसा? याची प्रचंड प्रणाली आहे. आणि ही प्रणाली जुन्या टेलिफोन लाईन्सवर काम करणार होती. नंतर त्यात फायबर ऑप्टिक केबल्स, सॅटेलाईट्स असे अनेक मार्ग जोडले गेले. पण आपल्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इंटरनेट हे पाईपलाईन्समधून पाणी पाठवण्यापेक्षा ट्रकमधून पाण्याच्या बाटल्या वेगवेगळ्या रस्त्याने पाठवणे आहे. आणि यात केवळ ध्वनी पाठवणे अशी सक्ती नसून आपण चित्र, लेखन, चलतचित्र असे विविध प्रकारचे संदेश पाठवू शकतो.

No comments:

Post a Comment