Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ४)

_________

गुगलने काय कमाल केली ते समजायच्या आधी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. वेब सर्च सुरु व्हायच्या खूप आधी इंटरनेट सर्च सुरु झालेलं होतं. याचे धागेदोरे १९८२ च्या हू इज (Who is) पर्यंत जातात. पण वेब क्रॉलिंग, इंडेक्सिंग आणि सर्च या तीन चाकांवर चालणारं सर्च इंजिन १९९३ मध्ये अस्तित्वात आलं. त्याचं नाव होतं जम्पस्टेशन. त्याआधीची कित्येक सर्च इंजिन्स म्हणजे हाताने तयार केलेल्या वेब डिरेक्टरिज होत्या. ज्या वेगाने वेब वाढत होतं त्यापुढे हाताने तयार केलेल्या डिरेक्टरिज टिकणं अशक्य होतं. जम्पस्टेशन फार लोकप्रिय झालं नाही पण त्यानंतर लगेचच वेब क्रॉलर, लायकोस, मेगॅलेन, एक्साईट, इन्कटोमी, अल्टा विस्टा, याहू अशी अनेक सर्च इंजिन्स अस्तित्वात आली.

यातील बहुतेक सर्च इंजिन्स इतर कुठल्यातरी वेब पोर्टलशी किंवा वेब ब्राऊजरशी संलग्न होती. ब्राऊजर काय ते आपण मागेच बघितले आहे आणि तुमच्यापैकी अनेकजण हा लेख ब्राऊजरवर वाचत असतील. वेब पोर्टल ही इंटरनेटवरची सगळ्यात गोंधळलेली निर्मिती होती. एकाच वेळी वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनेल, एकाच वेळी माहिती आणि मनोरंजन देण्याचा हा प्रकार होता.

वर्ल्ड वाईड वेब वापरण्यासाठी तुम्हाला टेलिफोन कंपनीला पैसे द्यावे लागायचे, वेब ब्राऊजर विकत घ्यावा लागायचा. आणि तुम्हाला एखाद्या उद्योगाबद्दलची माहिती त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मिळणार होती, ज्यासाठी त्या उद्योगाने वेब सर्वर आणि वेब डिझाईनचे पैसे मोजलेले होते. पण इंटरनेटचा वापर जर कुणी मनोरंजनासाठी किंवा बातम्या वाचण्यासाठी करायचं ठरवलं तर, मग या बातम्यांसाठी किंवा मनोरंजनासाठी बातम्या देणाऱ्या किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवणाऱ्या वेब साईट्सना पैसे द्यावेत की देऊ नयेत? यावर मायक्रोसॉफ्टचे उत्तर होते की त्यासाठीही पैसे द्यावेत. माहिती आणि मनोरंजासाठी ग्राहकांकडून पैसे घेणारी MSN नावाची सर्व्हिस मायक्रोसॉफ्टने १९९५ मध्ये सुरु केली होती. परंतु त्याचवेळेस आलेल्या याहू सारख्या वेब साईट्सवर बातम्या फुकट मिळू लागल्या. आणि मग अश्या बातम्या देणाऱ्या वेब पोर्टल्सचा महापूर आला. सगळ्या वेब पोर्टलवर सर्चइंजिन, ताज्या घडामोडींची माहिती असं सगळं पॅकेज एकत्रित मिळू लागलं. आणि तेही मोफत. या सगळ्या वेब पोर्टल्सनी वर्तमानपत्रांचं, टिव्हीचं आर्थिक गणित वापरलं. छपाईचा आणि वितरणाचा खर्च नसल्याने जाहिरातींच्या जोरावर माहिती मोफत देणे त्यांना शक्य वाटू लागले. अश्या रीतीने हार्डवेअरसाठी पैसे भरता, सॉफ्टवेअरसाठी पैसे भरता, कनेक्शनसाठी पैसे भरता, तर मग माहितीसाठीसुद्धा पैसे भरा हा msn चा मुद्दा जाहिरातींच्या वादळात पालापाचोळ्यासारखा उडून गेला. आणि वर्ल्ड वाईड वेबवर जाहिरातींचा प्रवेश झाला.

इंटरनेटवर erp सॉफ्टवेअर्स चालत होती पण तिथे जाहिरातींचा प्रवेश नव्हता. इंटरनेटवर ईमेल्सची सर्व्हिस वापरली जात होती पण तिथे जाहिरातींचा प्रवेश नव्हता. इंटरनेटवर वर्ल्ड वाईड वेब आलं. इथे मोठमोठ्या व्यवसायांनी आपापल्या वेब साईट्स बनवल्या त्यावर इतरांच्या जाहिराती घेण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु वेब पोर्टल्सनी वर्ल्ड वाईड वेबचा वापर करून माहिती आणि मनोरंजनाबरोबरच वेब सर्च सारख्या सेवा मोफत पुरवणे सुरु केले आणि इंटरनेटवर जाहिरातींना प्रवेश मिळाला.

पण या जाहिरातींवर खर्च म्हणजे अजूनही वर्तमानपत्र किंवा टीव्हीप्रमाणे अंधारात बाण मारण्याचा प्रकार होता. आपली जाहिरात कोण बघणार आहे यावर जाहिरातदाराचे काही नियंत्रण नव्हते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक खपाचे वर्तमानपत्र किंवा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम या धर्तीवर सगळ्यात जास्त वेब युजर्स ज्याच्याकडे आहेत त्याला जास्तीत जास्त जाहिराती मिळू लागल्या. यातूनच वेब पोर्टल्सची सारे काही मोफत देण्याची भूक वाढू लागली. यूजर्सना सारे काही मोफत, त्यामुळे सगळ्यात जास्त यूजर्स माझ्या पोर्टलकडे, त्यामुळे सगळ्यात जास्त जाहिरातदार माझ्याकडे असा साधा सरळ हिशोब सुरु झाला.

msn ने काळाची पावले ओळखली. आणि आपली विकतची सेवा बंद केली. msn देखील एक वेब पोर्टल बनलं. मोफत बातम्या आणि मनोरंजन देणारं वेब पोर्टल. मायक्रोसॉफ्टसारखी बलाढ्य कंपनी इंटरनेटवर दुसऱ्यांदा गोंधळली. प्रथम नेटस्केप नॅव्हिगेटवरला शह देण्यासाठी इंटरनेट एक्प्लोरर हा वेब ब्राऊजर तिने ग्राहकांना मोफत दिला होता. आता याहू सारख्या वेब पोर्टल्सना धूळ चारण्यासाठी msn च्या सुरवंटाचं फुलपाखरू झालं. मोफत सेवा देणारं.

मग वेब पोर्टल्सच्या युद्धात मायक्रोसॉफ्टने एक नवीन डाव टाकला. सबीर भाटिया या तरुण भारतीयाने वेब बेस्ड ईमेल ही सेवा मोफत सुरु केली होती. मायक्रोसॉफ्टने ही सेवा आधी कधीच न ऐकलेल्या अवाच्या सवा किमतीला विकत घेतली. आणि msn च्या यूजर्सना मोफत दिली. जेणेकरून msn चे यूजर्स / व्हिजिटर्स वाढतील परिणामी जाहिराती वाढतील आणि मायक्रोसॉफ्टचे उत्पन्न वाढेल. त्याच सुमारास याहूने रॉकेटमेल ही वेब बेस्ड ईमेल सेवा विकत घेतली आणि आपल्या यूजर्सना मोफत उपलब्ध करून दिली. या वेब पोर्टल्सनी आपापले व्हिजिटर्स आपल्याकडेच बांधून ठेवण्यासाठी वेब बेस्ड ईमेल्सचा वापर करून घेतला.याहूने मोफत चॅटरूम्स सुरु केल्या. जिओसिटीज ही वेब होस्टिंग सर्व्हिस (आजच्या ब्लॉग्जची आदिमाता म्हणता येईल) विकत घेतली आणि तीदेखील मोफत सुरु ठेवली. मग याहूने गो टू डॉट कॉम (GoTo.com) ही जाहिरातींच्या व्यवस्थापनाची कंपनी विकत घेतली. ज्यामुळे स्पॉन्सर्ड सर्च रिझल्ट्स ही कल्पना पुढे आली. जाहिरातदार अजून खूष झाले. कुणी ‘डायपर’ शोधलं की याहू सर्च इंजिन जे नेहेमीचे रिझल्ट्स एकाखाली एक दाखवेल त्याच्यावर आणि त्याच्या बाजूला जाहिरातदारांचे रिजल्ट्स दाखवेल. आणि लोक तर सगळ्यात वर दिसणाऱ्या रिझल्टवर क्लिक करतात. त्यामुळे तुमची जाहिरात जास्त प्रभावी ठरेल.

वर्ल्ड वाईड वेबच्या जन्माच्या किमान २० वर्षे अगोदर जन्माला आलेल्या आणि ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेस्कटॉप ऑफिस सॉफ्टवेअरसाठी पैसे आकारून श्रीमंत झालेल्या मायक्रॉफ्टला इंटरनेटवरची मोफत सेवेची गणितं सोडवताना दमछाक होत होती. पण वर्ल्ड वाईड वेबच्या जन्मानंतर जन्माला आलेल्या याहूसारख्या नवीन कंपन्या मात्र नवनवीन सेवा आणि सुविधा ग्राहकाला मोफत देण्यात पुढे धावत होत्या. त्यांच्यामागे पाठबळ होतं व्हेंचर कॅपिटलिस्टसचं. शक्य तिथे स्वतः नवीन सेवा बाजारात मोफत आणायची. जिथे आपल्यापेक्षा अधिक चांगली सेवा कुणी बाजारात आणली असेल तिथे ती सेवा घसघशीत रक्कम देऊन विकत घ्यायची आणि आपल्या यूजर्सना मोफत द्यायची. जुन्या यूजर्सना बांधून ठेवायचं आणि नवीन यूजर्सना खेचून आणायचं. हा मोफतचा डोलारा उभा होता कशाच्या जोरावर? एकंच उत्तर जाहिरातींच्या आणि जाहिरातदारांच्या जोरावर.

अव्वाच्या सव्वा रक्कम मिळाल्याने सबीर भाटिया सारखे इंजिनियर खूष होते. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवून नंतर आपली गुंतवणूक दसपट किंवा शतपट करून मिळाल्याने त्यांचे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट खूष होते. बातम्या, मनोरंजन, माहिती आणि सेवा मोफत मिळाल्याने वेब यूजर्स खूष होते. मोठा, स्थिर आणि वाढता प्रेक्षकवर्ग मिळाल्याने जाहिरातदार खूष होते. जाहिरातींचं उत्पन्न मिळाल्याने पोर्टल्स खूष होते. डॉट कॉम कंपन्यांचे शेअर्स म्हणजे सोन्याची खाण होती. अश्यावेळी गूगलचा जन्म झाला.

गूगलने काही नव्या गोष्टी केल्या. ते केवळ एक सर्च इंजिन होतं. गूगलने हार्डवेअर सॉफ्टवेअर विक्रीच्या बाजाराकडे दुर्लक्ष केले. आपण एक इंटरनेट कंपनी आहोत हे गूगलने निश्चित केले होते. पण याहूच्या मार्गाने जाण्याऐवजी गुगलने नवा रस्ता चोखाळला. गुगलने वेब पोर्टल सुरु केलं नाही. गूगलला इंटरनेटवर चालणारं वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनेल बनण्यात रस नव्हता. कुठल्याही प्रकारचं कन्टेन्ट तयार करण्यात गूगलने कधीच रस दाखवला नाही. जगातील माहितीच्या साठ्याची अनुक्रमणिका बनण्यात गुगलला रस होता.

त्यातलं पहिलं पाऊल म्हणजे गूगलने इंटरनेटचं यलो पेजेस बनायचं ठरवलं. गुगलने आपल्या सर्च इंजिनाच्या प्रोग्रॅममध्ये पेज रँकिंग ही नवी प्रणाली आणली. ज्यामुळे गुगलने शोधून दिलेली वेब पेजेस इतर सर्च इंजिनांपेक्षा यूजर्सच्या अपेक्षेच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी होती. मग गो टू डॉट कॉम (GoTo.com) या कंपनीच्या कल्पना वापरल्या. यात जाहिरातदारांना सर्च टर्म्सचा लिलाव करणे, स्पॉन्सर्ड सर्च रिजल्ट्स देणे या कल्पना होत्या. त्याशिवाय पे पर व्हयू आणि पे पर क्लिक या कल्पना त्यात जोडल्या. गो टू डॉट कॉमने गूगलला कोर्टात खेचलं. शेवटी गो टू ची मालक असलेल्या याहूला गूगलचे शेअर्स देऊन ते प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्यात आलं.

आणि मग याहूचा कित्ता गिरवत गूगलने एकामागून एक इंटरनेट कंपन्या विकत घेण्याचा सपाटा लावला. गूगल ग्रुप्स, पिकासा, गूगल अर्थ, गूगल ऍनालिटिक्स, यू ट्युब, गूगल मॅप्स या सर्व सेवा गूगलने इतरांकडून विकत घेतल्या आणि आपल्या ग्राहकांना मोफत दिल्या.

२२ जानेवारी २००४ ला गूगलने ऑर्कुट हे सोशल नेटवर्क लॉंच केलं. १ एप्रिल २००४ ला गुगलने तत्कालीन वेब मेल सर्व्हिसेसपेक्षा जास्त स्टोरेज असणारी वेबमेलसेवा सुरु केली. नाव ठेवलं जीमेल. आणि जाहिरातदारांना सांगितलं की आम्ही जीमेलच्या आतील शब्दांच्या अनुषंगाने योग्य जाहिरात जीमेलच्या आत दाखवू. अधिक अचूक जाहिरात. आणि त्याच वेळी यूजर्सना खात्री दिली की तुमची ईमेल्स कुठलीही व्यक्ती वाचणार नाही तर तर केवळ सिस्टीम वाचेल. ते सुद्धा त्यातील कन्टेन्टसाठी नाही तर कीवर्ड साठी. आता तुम्ही काय शोधत आहात त्याप्रमाणे तुम्हाला जाहिराती दिसणार नव्हत्या तर तुम्ही मित्रांशी काय गप्पा मारत आहात त्याप्रमाणे जाहिराती दिसणार होत्या. पण तुम्ही काय गप्पा मारल्या ते जाहिरातदारांना दिसणार नव्हते, गूगललाही ते दिसणार नव्हतं. पण गूगलच्या सिस्टिमला दिसणार होतं. गूगलचे बोधवाक्य होते ‘don’t be evil’. गूगलच्या यूजर्सचा त्यावर पूर्ण विश्वास होता.

हळूहळू गूगलने वर्ल्ड वाईड वेबच्या दुसऱ्या आवृत्तीला आकार द्यायला सुरवात केली होती. कन्टेन्ट तयार करणारे मूठभर आणि कन्टेन्ट वापरणारे अगणित ही वर्ल्ड वाईड वेबची पहिली आवृत्ती होती. नवीन आवृत्तीत गुगलला हे समीकरण बदलायचं होतं. आता कन्टेन्ट वापरणारे पूर्वीप्रमाणेच अगणित रहाणार होते कन्टेन्ट तयार करणारेही अगणित होणार होते.

आता यूट्युब, ऑर्कुट आणि जीमेल यामुळे गूगलकडे टार्गेटेड जाहिराती दाखवण्यासाठी एकाहून अधिक प्लॅटफॉर्म तयार होते. आणि मुख्य म्हणजे यापैकी कुठल्याही एका प्लॅटफॉर्मवर यूजर्सना पकडून ठेवण्यासाठी गूगलला कन्टेन्ट तयार करण्याचा खर्च करावा लागत नव्हता. यूजर्स स्वतःच कन्टेन्ट तयार करत होते. पिकासावरचे फोटोज, यूट्युबवरचे व्हिडीओ, ऑर्कुटवरच्या गप्पा, जीमेलमधले मेल्स यातून यूजर्स स्वतःच गूगलच्या सिस्टिमला आपल्या आयुष्यात काय चाललंय त्याची माहिती देत होते. ती माहिती गूगलच्या सिस्टीममधून बाहेर जात नव्हती. फक्त तिचा वापर करून गूगलची सिस्टीम आपल्याला जाहिराती दाखवत होती आणि गूगलच्या तिजोरीत भर घालत होती.

ज्याप्रमाणे आयबीएम मेनफ्रेममध्ये गुंतलेली असताना ऍपल आणि मायक्रोसॉफ्टने डेस्कटॉप पीसीक्षेत्रात मुसंडी मारली. ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम आणि डेस्कटॉप ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये गुंतलेली असताना याहूने इंटरनेटच्या क्षेत्रात मुसंडी मारली. ज्याप्रमाणे याहू वेब पोर्टल आणि मोफत वेब सर्व्हिसेसमध्ये गुंतलेली असताना गूगलने वर्ल्ड वाईड वेबच्या दुसऱ्या आवृत्तीला आकार द्यायला सुरवात केली. त्याप्रमाणे गूगल आपल्या कामात गुंतलेली असताना अजून एका कंपनीचा जन्म झाला होता तिचं तत्कालीन नाव होतं ‘द फेसबुक’ म्हणजेच आजचं ‘फेसबुक’.

No comments:

Post a Comment