Sunday, May 13, 2018

तुमच्या माझ्या डेटाची चोरी (भाग ३)

_________

या लेखमालेचा उद्देश डेटा चोरी म्हणजे काय आणि त्याची मला जाणवलेली कारणे मांडणे असल्याने त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते महत्वाची आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि कायदेशीर संकल्पनाही महत्वाच्या आहेत. म्हणून या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची आर्थिक गणिते कशी बदलत गेली त्याचा धावता आढावा घेऊया.

१९११ मध्ये आयबीएम कंपनीची स्थापना झाली होती. पण कॉम्प्युटरच्या क्षेत्रात तिने प्रवेश केला तो १९५२ मध्ये. १९५२ पासून ते १९६४ पर्यंत आयबीएमने Special Purpose Computer बनवले. म्हणजे यातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभिन्न किंवा अविभाज्य होते. आयबीएमला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी वेगवेगळे पैसे मिळत नव्हते. १९६४ मध्ये आयबीएमने मोठा जुगार खेळला आणि पहिला General Purpose Computer बनवला. म्हणजे यावर सॉफ्टवेअर पहिल्यापासून लोडेड असणार नव्हतं. तर वेगवेगळी सॉफ्टवेअर एकाच कॉम्प्युटरवर लोड करता येणार होती. हा पर्सनल कॉम्प्युटर नसून मेनफ्रेम कॉम्प्युटर होता. इथून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांचा बाजार वेगळा होण्यास सुरवात झाली.

अजून इंटरनेट बाल्यावस्थेत होतं. पण क्रेडिट कार्डचा व्यवसाय भरभराटीला आलेला होता. डायनर्स कार्डपासून लोकप्रिय झालेल्या या संकल्पनेवर व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्या भरभराटीला आलेल्या होत्या. मग बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारी घटना घडली. १९६७ मध्ये बार्कलेज बँकेने पहिलं ATM चालू केलं. १९५९ पासून चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न चालू होता आणि १९६९ साली एका माणसाच्या छोट्या पावलाने मानवजातीसाठी चंद्रापर्यंत मोठी झेप घेतली होती. इतकी सगळी धामधूम चालू होती पण TCP / IP चा जन्म व्हायचा होता. या सगळ्यांमुळे विविध प्रकारचे नेटवर्क प्रोटोकॉल अस्तित्वात येत गेले. त्यात सुसूत्रता यावी म्हणून प्रयत्न होत होते.

आणि १९७२ साली TCP / IP चा जन्म झाला. ज्यामुळे आपापले काम करताना कुणी कुठले नियम पाळावेत याचे नियम निश्चित झाले आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या एकमेकांच्या कार्यक्षेत्राबद्दल विचार न करता, त्यात गुंतवणूक न करता, आपले काम अधिक वेगाने करू लागल्या. पण अजूनही ऑफिस किंवा उत्पादनाचे प्लांट्स हेच सॉफ्टवेअरचे कार्यक्षेत्र होते. घराघरात कॉम्प्युटर पोहोचले नव्हते. १९७२ ला SAP, १९७७ Oracle आणि १९७८ Baan या ERP (Enterprise Resource Planning) क्षेत्रातील दादा कंपन्यांचा जन्म झाला. यांनी इंटरनेटचा वापर करून घेतला.

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस यायला सुरवात झाली. हार्डवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी पैसे कमवले. सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करून देण्याऱ्या सल्लागार कंपन्या स्थापन झाल्या. त्यांनीही रग्गड पैसे कमवले. विशेष म्हणजे त्यांनी ज्यांना या सेवा दिल्या त्यांच्याकडूनच पैसे घेतले. म्हणजे विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, बँका, वित्तसंस्था हे ग्राहक होते आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सल्लागार कंपन्या हे पुरवठादार होते. पुरवठादारांनी आपापल्या ग्राहकांच्या काम पद्धतीत कॉम्प्युटरचा वापर करायला उद्युक्त केले. त्यांची कार्यक्षमता वाढवली. त्यांचे खर्च कमी केले. त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढवायला, त्यांच्या ग्राहकांना खूष करायला त्यांना मदत केली. आणि या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यामुळे या काळात डेटा चोरीच्या प्रश्नाने आजच्यासारखे स्वरूप धारण केलेले नव्हते.

आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्वाच्या कंपन्यांनी जन्म घ्यायचा मुहूर्त जवळ येऊ लागला होता. १९७५ ला मायक्रोसॉफ्टची स्थापना झाली आणि १९७६ला ऍपलची. मायक्रोसॉफ्टने हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरवर अधिक लक्ष द्यायला सुरवात केली. याउलट ऍपलने स्थापनावर्षातच आपला पुढला मार्ग आखून घेतला होता. कॉम्प्युटर म्हणजे केवळ कार्यालयात उपयोगी असणारे उपकरण राहणार नव्हते. आता मेनफ्रेमचा अश्वमेध रोखला जाणार होता. ऍपल बरोबर ह्युलेट-पॅकार्ड, टॅन्डी कॉर्पोरेशन वगैरे कंपन्यांनी आपापले मायक्रो कॉम्प्युटर (ज्याला आपण आजकाल पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो) बाजारात आणले.

या सगळ्यात वेगळी कंपनी होती ऍपल. ऍपलच्या मायक्रो कॉम्प्युटरला चालवण्यासाठीची ऑपरेटिंग सिस्टीम स्वतः ऍपलचीच होती. हार्डवेअर वाल्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवाल्यांनी सॉफ्टवेअर हा नियम मोडीत काढून ऍपलने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीवर स्वतःचा ताबा ठेवला.

मायक्रो कॉम्प्युटरच्या बाजाराने बाळसे धरल्यावर 'हत्तीने टॅप डान्स करायचं ठरवलं'. कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील दादा कंपनी आयबीएमने घरगुती कॉम्प्युटरच्या बाजारात उतरायचा निर्णय घेतला. मेनफ्रेमच्या बाबतीत प्रचंड गुप्तता पाळणाऱ्या आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीत मात्र एकदम खुलं धोरण अंगिकारलं. आयबीएमच्या या पीसीसाठीची ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टकडून बनवून घेतली गेली आणि इतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना या पीसीसाठी सॉफ्टवेअर तयार करायला उत्तेजन देण्यात आलं. यातून मायक्रोसॉफ्टचं अतिबलाढ्य साम्राज्य उभं राहिलं.

पर्सनल कॉम्युटर कुणीही बनवो त्यावर ऑपरेटिंग सिस्टीम आणि कामासाठी लागणारे वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, डेटाबेस, ईमेल क्लायंट वगैरे सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स मायक्रोसॉफ्टचेच होते. हार्डवेअर कंपन्या आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील करारांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पीसी विकला गेला तरी मायक्रोसॉफ्टच्या खात्यात पैसे जमा होत होते. (इथे सॉफ्टवेअर पायरसीच्या मुद्द्याकडे मी दुर्लक्ष केले आहे.)

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र विकून ऍपल पैसे कमवीत होतं. मायक्रोसॉफ्ट प्रामुख्याने केवळ सॉफ्टवेअर विकून तर ह्युलेट-पॅकार्ड, कॉम्पॅक सारख्या कंपन्या केवळ हार्डवेअर विकून. या काळातही विक्रेता आपल्या वस्तू किंवा सेवा ज्या ग्राहकाला विकत होता त्याच्याकडून त्याचे पैसे घेत होता. आणि या घरगुती पर्सनल कॉम्प्युटर्सना इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी काही विशेष कारण मिळाले नव्हते त्यामुळे त्याला डेटा चोरीचा मुद्दा जन्माला यायचा होता.

जगभरात काम करण्याच्या पद्धतीत पर्सनल कॉम्प्युटर्स मोठी उलथापालथ घडवून आणत असताना सर्न इथे हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन प्रोटोकॉलचा जन्म झाला होता आणि टीम बार्नर्स लीने वर्ल्ड वाईड वेबची संकल्पना मांडली होती. वर्ल्ड वाईड वेब आकाराला येत असताना ते वापरण्यासाठी वेब क्लायंटची (ब्राऊजरची) आवश्यकता होती. पहिला ब्राऊजर टीम बार्नर्स लीनेच तयार केला होता आणि १९९१ मध्ये जगासाठी खुला केला होता. वेब सर्व्हर आणि वेब ब्राऊजर तयार झाले. वेबसाईट ही नवीन संकल्पना उदयाला आली. इंटरनेटवरील वेबसाईट म्हणजे कधीही बंद न होणारा बिलबोर्ड आहे हे अनेक व्यावसायिकांना जाणवले. आणि व्यवसायाची वेबसाईट असणे महत्वाचे ठरू लागले. हॉटमेल या नावाने सबीर भाटियाने ईमेलची सुविधा ईमेल क्लायंट न वापरता वेब ब्राऊजरमधून वापरायला उपलब्ध करून दिली. आणि आतापर्यंत केवळ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या इंटरनेटवर जाण्याची नवीन कारणे आकाराला आली. हॉटमेल मायक्रोसॉफ्टने विकत घेतलं तर त्यासारखं रॉकेटमेल याहूने. आणि जगभरात लोकांना वेब ब्राउजरमधून ईमेल वापरणे शक्य झाले. तेही मोफत.

आता इंटरनेटवर वेबसाईट्स होत्या. एमएस ऑफिसबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर मोफत मिळू लागले होते. ऑफिसची कामे संपल्यावरदेखील लोक इंटरनेटवर जाऊ लागले. आपापल्या घरगुती पीसीवरून! वेब ब्राऊजर वापरत, वर्ल्ड वाईड वेबवर सर्फिंग करण्यासाठी!

सर्फिंग करून त्यांना इतर व्यवसायांबद्दलची माहिती मोफत मिळत होती. कारण वेबसाईट्स बनवण्याचा आणि कायम उपलब्ध ठेवण्याचा खर्च जो तो व्यावसायिक करत होता. लोकांना खर्च करायचा होता फक्त इंटरनेट कनेक्शनचा. ब्राऊजर मोफत. माहिती मोफत.

आता इंटरनेटचा वापर करून वस्तू विकण्याची कल्पना काही सुपीक डोक्यात खेळू लागली. त्यापैकी जेफ बेझॉसने १९९४ मध्ये ऍमेझॉनची स्थापना केली. सुरवातीला इंटरनेटचा वापर करून पुस्तके विकण्यासाठी तो ऍमेझॉनचा वापर करणार होता. या सगळ्या धामधुमीमुळे वर्ल्ड वाईड वेब अल्पावधीत लोकप्रिय झालं. आणि त्यावर तयार झालेल्या अगणित वेबसाईट्स मधून आपल्याला हवी ती वेबसाईट शोधण्यासाठी सर्वसामान्य लोकांना सर्च इंजिनची गरज भासू लागली. वेगवेगळी सर्च इंजिन्स इंटरनेटवर उपलब्ध होती. अशात १९९८ साल उजाडलं. डेटाचोरीच्या आपल्या आजच्या अडचणीचा एक धागा जिथून येतो ते बिझनेस मॉडेल यशस्वीरीत्या वापरणाऱ्या कंपनीचा कॅलिफोर्नियात जन्म झाला. तिचे नाव होते गूगल.

No comments:

Post a Comment