Monday, July 8, 2019

क्रॅश

प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय उद्योगक्षेत्रात सर्वोच्चपदी व्यावसायिकतेपेक्षा रक्ताच्या नात्यांना परिणामी घराणेशाहीला प्रथम पसंती दिली जाते असा अनेक भारतीयांचा आक्षेप असतो. त्यामुळे भारतीय कंपन्यांत शिक्षण किंवा अनुभवाच्या जोरावर तुम्ही व्यवस्थापकाच्या (मॅनेजर) पदापर्यंत पोहोचू शकतात परंतू सर्वोच्च कार्यकारी अधिकारी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर) म्हणून अधिकार मिळणे इथे दुरापास्त असते, हा त्या आक्षेपाचा पुढचा भाग असतो. परंतू इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय उद्योगक्षेत्र पाश्चिमात्य देशांपेक्षा अजून बाल्यावस्थेत आहे. समभाग वापरून भांडवल गोळा करणे ही संकल्पना जरी भारतीय समाजात आता शंभर सव्वाशे वर्षे जुनी झालेली असली तरी रोखे बाजारात सहभाग घेणाऱ्या भारतीयांचे संख्याबळ अजूनही अत्यल्प आहे.

समभागधारकांनी भांडवलासाठी पैसे देऊन ईस्ट इंडिया कंपनीसारखी मल्टिनॅशनल कंपनी इंग्लंडमध्ये इसवीसन १६०० मध्ये सुरु झाली त्यावेळी भारतीय उद्योगक्षेत्राने भांडवल उभारणीसाठी पूर्वजांची मालमत्ता आणि नातेसंबंध याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही मार्गाचा विचार केलेला नव्हता. त्यामुळे भांडवलाचा पुरवठा आणि उद्योगाची जोखीम या दोन्हींची जबाबदारी एकाच घरावर पडणे स्वाभाविक होते. परिणामी समभागधारकांचे हित किंवा व्यावसायिकतेचे महत्व या संकल्पना भारतीय उद्योगक्षेत्रात रुजण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालू आहे. १९९२च्या आर्थिक उदारीकरणानंतर जेव्हा सेबीने भांडवल बाजारात अधिक महत्वाची भूमिका घेण्यास सुरवात केली. त्यानंतर १९९९ -२०००-२०१३ असे टप्पे घेत भारतात कंपनी सुरु करणाऱ्या घराण्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तीने कंपनीच्या संचालक मंडळात असणे (Independent Directors) बाह्य आणि स्वतंत्र संचालक ही संकल्पना भारतात रूढ झाली. संचालकांच्या बाबतीत कायदा करणे आवश्यक असले तरी सर्वोच्च कार्यकारी अधिकाऱ्याच्या बाबतीत मात्र कायदा करणे म्हणजे कंपनीच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करणे होईल. त्यामुळे केवळ भारतातंच नव्हे तर जगभरात सीईओ नेमणे ही कंपनीची अंतर्गत बाब मानली जाते.अनेक भारतीय कंपन्यात अजूनही मूळ प्रवर्तकाच्या घरातील व्यक्ती कंपनीच्या शीर्षस्थानी काम करताना दिसून येतात.

भारतीय कंपन्यांत व्यावसायिक कार्यकारी अधिकारी दिसणे तुरळक असले तरी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांत भारतीय वंशाची व्यक्ती कंपनीला दिशा देताना दिसतात. पेप्सीमध्ये इंद्रा नूयी, गूगलमध्ये सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नादेला, अडोब मध्ये शंतनू नारायण यासारखे अनेक भारतीय शिक्षण आणि अनुभवांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार यशस्वीपणे हाताळताना दिसत आहेत. परंतू याचा अर्थ सर्वोच्च पदावर व्यावसायिक अधिकारी नेमले म्हणजे ते कंपनीला कायम यशाची नवनवी क्षितिजे दाखवण्यात यशस्वी होतीलंच याची खात्री नसते. २००८च्या आर्थिक संकटानंतर सिटी ग्रुपने निवडलेले विक्रम पंडित, डॉयश बँकेने निवडलेले अंशुमन जैन यांचा कार्यकाळ किंवा वोल्टाज मधील रमेश सरीन आणि इन्फोसिस मधील विशाल सिक्का यांचा कार्यकाळ आणि त्यानंतर त्यांना सोडावा लागलेला पदभार ही देखील लक्षणीय उदाहरणे आहेत. याचा अर्थ व्यावसायिक सीईओ हा कंपनीसाठी आणि सीईओसाठी एक महत्वाचा निर्णय असतो. तो यशस्वी होईलंच याची खात्री नसते. पण येत्या काळात उद्योगांची गुंतागुंत इतकी वाढत आहे की व्यावसायिक सीईओ ही कंपन्यांची अत्यावश्यक बाब होणार आहे. त्यामुळे व्यावसायिक सीईओ नेमताना कंपनी आणि सीईओने कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत याचा अभ्यास महत्वाचा आहे.

आर गोपालक्रिष्णन यांचे 'Crash Lessons from the entry and exit of CEOs' (क्रॅश सीईओंच्या नेमणूक आणि निर्गमनातून मिळालेले धडे) हे पुस्तक याच मुद्द्यांचा उहापोह करते.

Image Credit : Internet 

आर गोपालक्रिष्णन, द माईंडवर्क्स या ब्रॅण्डद्वारे कंपन्यांसाठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कलकत्ता युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्र नंतर आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी आणि शेवटी हार्वर्ड बिझनेस स्कुलमधून व्यवस्थापनाचा अभ्यास पूर्ण करून लेखक अनेक भारतीय आणि अभारतीय कंपन्यात कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. टाटा सन्स मध्ये कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला. सध्या ते कॅस्ट्रोल इंडिया आणि हेमास होल्डिंग या कंपन्यांचे बाह्य संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि कंपन्यांना व संचालकांना मार्गदर्शन करतात. या विषयावरील त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत.

क्रॅश या पुस्तकात गोपालक्रिष्णन यांनी पंधरा केस स्टडीज वापरून कंपन्यांना आणि सीईओंना मार्गदर्शन केले आहे. सर्व पंधरा केस स्टडीज या व्यावसायिक सीईओंच्या निवडीनंतर आलेल्या अपयशाच्या आहेत. हे अपयश का आले असावे आणि असे अपयश आपल्या पदरी पडू नये म्हणून कंपनी व सीईओने काय काळजी घेतली पाहिजे या सर्व मुद्द्यांचा उहापोह या पुस्तकात आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात गोपालक्रिष्णन यांनी आपले निरीक्षण आणि प्रतिपादन तर दुसऱ्या भागात पंधरा केस स्टडीज मांडून आपल्या प्रतिपादनाचे उदाहरणासहीत समर्थन; अशी या पुस्तकाची मांडणी आहे.

पहिल्या भागात गोपालक्रिष्णन यांनी जोसेफ जॉन कॅम्पबेल या अमेरिकन पुराण अभ्यासकाच्या १९४९ मधील The Hero with a Thousand Faces (हजार चेहऱ्यांचा नायक) या मह्तग्रंथाचा आधार घेतला आहे. कॅम्पबेल यांच्या मते जगभरातील कुठल्याही पुराणकथेतील नायकाच्या आयुष्यात काही टप्पे कायम दिसून येतात. साधे जग > साहसाची हाक > द्विधा मनस्थिती > सल्लागाराचा प्रवेश > उंबरठा ओलांडणे > परीक्षांचा काळ > खडतर आव्हानांची सुरवात > सत्वपरीक्षा > विजय > बक्षीस > पुनर्स्थापना > नायकत्व याच टप्प्यांतून जगातील सर्व पौराणिक कथा फिरतात. मग ती रामायणातील रामाची कथा असो किंवा महाभारतातील कृष्णार्जुनाची कथा असो किंवा अन्य समाजातील कोणत्याही पौराणिक नायकाची कथा असो.

जोसेफ कॅम्पबेल यांच्या प्रतिपादनाच्या धर्तीवर गोपालक्रिष्णन यांनी कंपनीने निवडलेल्या सीईओंच्या कारकिर्दीचे सहा टप्पे मांडले आहेत. साधे जग > साहसाची हाक >द्विधा मनस्थिती आणि निर्णय > खडतर आव्हानांचा काळ > सत्वपरीक्षा > पुनर्विचार आणि बहिर्गमन.

गोपालक्रिष्णन यांनी पुस्तकात केवळ लौकिक दृष्ट्या अयशस्वी किंवा वादळी कारकीर्दींचा आढावा घेतलेला असल्यामुळे त्यांनी मांडलेले टप्पे सीईओने अपयशानंतर पदभार सोडण्यावर संपतात. आणि जे सीईओ यशस्वी झालेले आहेत त्यांच्या यशस्वी होण्यामागील कार्यकारणभावाचा यात उहापोह केलेला नाही. सर्व अयशस्वी कारकिर्दींचे मूल्यमापन करताना गोपालक्रिष्णन यांनी काही महत्वाची निरीक्षणं मांडली आहेत.

"Power tends to corrupts and Absolute Power corrupts absolutely" हे लॉर्ड एक्टन यांचे विधान नकारात्मक आहे. सीईओची नेमणूक करायची तर त्याला सर्वाधिकार देणे आवश्यक असते. मग त्याला मार्गदर्शक ठरेल अशी तत्वे कोणती. याबद्दल बोलताना गोपालक्रिष्णन यांनी प्रथम सत्य स्वीकारण्याचा मार्ग वापरला आहे. 'अधिकारांमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीची अगम्य भविष्याचा वेध घेण्याची क्षमता कमी होऊन अतिआत्मविश्वास वाढतो; परिणामी चहूबाजूंनी येणारे संकेत ओळखण्यास तो कमी पडतो' हे सार्वकालिक सत्य मान्य करून गोपालक्रिष्णन यावर मात कशी करायची या मुद्द्याकडे वळतात. अपयशाचे धनी बनू नये म्हणून त्यांनी सीईओंना कुठल्या गोष्टींपासून सावध राहायला हवे आणि त्यासाठी कुठली काळजी घ्यायला हवी यासाठी पुस्तकात वेगवेगळी प्रकरणे मांडली आहेत.

याचा अर्थ असा नाही की जेव्हा जेव्हा सीईओ अपयशी होतो तेव्हा त्याची जबाबदारी केवळ त्याच्या एकट्यावरच असते. कंपनी, मावळता सीईओ आणि संचालक मंडळ यांचीही तितकीच जबाबदारी असते हे अधोरेखित करून गोपालक्रिष्णन या सर्वांना मार्गदर्शन करतात.

सामान्यतः जेव्हा प्रवर्तक किंवा त्याच्या घरातील कुणी पदावर असताना व्यवसाय पिछाडीवर पडू लागला की मग व्यावसायिक सीईओची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यावेळी आर्थिक क्षमता आणि नफा पूर्वपदावर आणणे याकडे सीईओ प्राधान्य देतो. त्यासाठी तो जुनी व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो. सुरवातीला संचालक मंडळ त्याला साथ देत असते परंतु नंतर मात्र केवळ आर्थिक प्रगती हे ध्येय नसून उद्योगाची काम करण्याची आणि नातेसंबंधांकडे बघण्याची पद्धत ही देखील महत्वाची आहे हे संचालक आणि सीईओ या दोघांना ध्यानात येते. आणि मग कार्यक्षम सीईओच्या अपयशाची सुरवात होते. त्यामुळे नेमणूक होताना 'बदलाचे वारे घुमवण्यासाठी नेमणूक केली आहे' असे जरी संचालक मंडळाने सांगितले तरी कंपनीच्या मूळ आत्म्याला धक्का लागेल असे निर्णय घेताना सीईओला कायम सहानुभूतीपूर्वक नेतृत्व करायचे असते याकडे लेखक वाचकांचे लक्ष वेधून घेतो.

पुस्तकाचा वाचक हा व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी किंवा सीईओ पदावर काम करणारी व्यक्ती आहे हे गृहीत धरून पुस्तकाची मांडणी केली असली तरी सामान्य वाचकालाही यात रोजच्या जीवनात आपण कोणत्या चुका करतो ते चटकन दिसेल आणि त्यावर मत करण्याचा मार्ग दिसेल याची काळजी लेखकाने घेतली आहे. ठिकठिकाणी उदाहरणांचा वापर करून मांडलेल्या मुद्द्यांमुळे पुस्तक वाचनीय झालेले आहे.

पुस्तकात सुरवातीला आरशाचे काम करणाऱ्या सहाय्यकांचे महत्व सांगताना लेखकाने सर विन्स्टन चर्चिल यांच्या पत्नीचे उदाहरण दिले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत चर्चिल जेव्हा शत्रूपक्षाच्या हृदयात धडकी भरवताना आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयातही भीती उत्पन्न करू लागले तेव्हा चर्चिल यांच्या पत्नीने त्यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर लेखकाने उद्घृत केलेला आहे. आणि त्याची तुलना हनुमानाशी कसे वागावे याचा सल्ला रावणाला देणाऱ्या बिभीषणाशी केली आहे. आपल्यातील दोष आपल्याला हळुवारपणे सांगून त्यापासून आपल्याला दूर ठेवणारे सहकारी हा यशस्वी सीईओचा मोठा गुण असतो.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात, एचपी कंपनीतील कार्ली फियोरीना, सिटीबँकेतील जॅमी डिमॉन, सिटीग्रुप मधील विक्रम पंडित, एटी अँड टी मधील जॉन वॉल्टर, फोर्डमधील ली आयकोका आणि मार्क फील्ड्स, वॉल्ट डिस्ने मधील मायकेल ओविट्झ, झेरॉक्समधील जी रिचर्ड थॉमन, स्टारबक्समधील जिम डोनाल्ड, उबरमधील ट्रेव्हिस कलानिक, सनोफीमधील क्रिस विबाकर, वोल्टाज मधील रमेश सारीं, अर्कोनीक मधील क्लॉस क्लेनफिल्ड, डॉयश बँकेतील अंशुमन जैन आणि इन्फोसिस मधील विशाल सिक्का यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत लेखकाने आपले पहिल्या भागातील प्रतिपादन सिद्ध करून दाखवले आहे. या पुस्तकात वापरलेल्या सर्व केस स्टडीज इसवीसन २००० नंतरच्या कालखंडातील असल्याने वाचकांना त्यातील मुद्दे समजणे सोपे जाते. लेखक स्वतः टाटा ग्रुपशी संबंधित असल्याने त्याने टाटा ग्रुपमधील सायरस मिस्त्रींची केस वगळली असावी असा माझा कयास आहे. त्याबद्दलही वाचायला वाचकांना आवडले असते पण त्या केसच्या अनुपस्थितीमुळे पुस्तकाच्या उपयुक्ततेत काही उणेपणा येत नाही.

पुस्तकाचा शेवट करताना लेखकानी थॉमस मिड्लहॉफ या यशस्वी जर्मन सीईओचे उदाहरण दिले आहे. आयुष्यात अतिशय यशस्वी असलेले थॉमस करियरच्या अखेरीस आर्थिक गैरव्यवहारात सापडले आणि शेवटी त्यांना तीन वर्षांचा कारावास भोगावा लागला. त्याबद्दल बोलताना थॉमस म्हणतात, ' मला काही नियम लागू होत नाहीत असा माझा समज झाला होता. इतरांप्रती तुच्छता माझ्या स्वभावात आली होती. तिच्यामुळे माझा ऱ्हास झाला.' थॉमस मिड्लहॉफ यांचे उदाहरण देऊन जणू लेखक सध्याच्या लोकप्रिय मार्वल कॉमिक्समधील स्पायडरमॅन मालिकेत आलेले "महान अधिकारांबरोबर महान जबाबदाऱ्या येतात" हे वाक्य सर्व सीईओंना समजावून सांगतो.

व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित सर्वांसाठी हे एक उपयुक्त पुस्तक आहे.

पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता ८ जून २०१९