Wednesday, September 4, 2019

थोडक्यात सांगायचं झालं तर

जर्मन भाषेतील 'कुर्त्झगेझाग्ट' म्हणजे इंग्रजीतील 'In a nutshell' किंवा मराठीतील 'थोडक्यात सांगायचं झालं तर'.

तर या कुर्त्झगेझाग्ट नावाचं एक युट्यूब चॅनेल आहे. वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना सुंदर अॅनिमेशनच्या सहाय्याने थोडक्यात समजावून सांगणे हा या चॅनेलचा उद्देश आहे. आणि हे काम करत गेली सहा वर्षे ते यशस्वीपणे टिकून आहेत.

असं काही चॅनेल आहे हे मला माहिती नव्हतं. सकाळी पोरांना घेऊन बाहेर गेलो होतो. त्यांच्याबरोबर रिसेशनवर गप्पा मारत होतो. काही व्हिडिओ बघत होतो. एक दीड तासाने मी जरा गप्प बसलो तर मोठा लेक म्हणाला, "बाबा तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. विषय वेगळा आहे. पण तुला आवडेल."

मी गाडी चालवत होतो. त्याने व्हिडिओ लावला आणि मग मला ९०लाख सबस्क्रायबर असलेल्या आणि २०१३ साली स्थापन झालेल्या या चॅनेलची ओळख झाली. मग उरलेला दिवस या चॅनेलच्या मागे कधी संपला ते कळलंच नाही.

जो व्हिडिओ लेकाने आग्रहाने दाखवला त्याचं नाव होतं The Egg.

अॅण्डी वियर नावाच्या लेखकाच्या कथेवर बेतलेला हा व्हिडीओ गेली दोन वर्षं बनत होता. दि १ सप्टेंबरला तो अपलोड केल्यापासून आज ४ सप्टेंबरला संध्याकाळी सातपर्यंत त्याला ६६लाख लोकांनी पाहिलंय.

काळ एकरेषीय असतो या गृहितकाला छेद देत आयुष्याचं प्रयोजन सांगणारा हा व्हिडीओ नितांतसुंदर आहे.

या निमित्ताने गेल्या वर्षी सुरू केलेली सिध्दार्थ मालिका पूर्ण करण्याची इच्छा तीव्र झाली. आणि मुलांना स्मार्टफोन घेऊन दिल्याचं चीज झाल्यासारखं वाटलं.

 

इतिहासाची पुनरावृत्ती

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर फेसबुक असतं तर किती वेगळं चित्र दिसलं असतं.

सतीबंदीवरची भद्र लोकांची अभद्र मतं राजा राममोहन रॉयना जितकी ऐकू आली त्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात ऐकू आली असती. आणि सतीसमर्थकांनी रॉयविरूध्द जनमत एकत्र करून त्यांना बिनशर्त माफी मागायला लावली असती.

नेहरू सुभाष संबंधांबद्दल उडणाऱ्या अफवा बघून सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेला 'चलो दिल्ली' ऐवजी 'चलो घर' म्हणून बरखास्त तरी केले असते किंवा मग 'तुम मुझे खून मत दो क्यूंकी उससे मै तुम्हे केवल अंग्रेजोंसे आजादी दे सकता हूं, तुम्हारे अज्ञानसे नही |' असं म्हणत अज्ञातवास स्विकारला असता.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? किंवा पुनश्च हरिओम सारख्या अग्रलेखांवर आम जनतेची मतं. गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक साजरी करण्यावरून केवळ ब्रह्मवृदांतंच नाही तर जनसामान्यांत उठलेला गदारोळ टिळकांना अधिक तीव्रतेने ऐकू आला असता. आणि कदाचित त्यांनी 'कायमचा रामराम' असा एखादा अग्रलेख लिहून केसरीला टाळं ठोकलं असतं.

सावरकरांची जन्मठेप व त्यानंतरच्या सशर्त सुटकेच्या बातम्या, गाय हा उपयुक्त पशू आहे सारख्या त्यांच्या विधानांवर आणि 1857 चे स्वातंत्र्यसमर सारख्या पुस्तकांवर वाचकांची मते त्यांना लगोलग मिळाली असती. आणि सरकारने लादलेल्या शर्तींचा भंग करून पोहत जाऊन त्यांनी अंदमानचे काळेपाणी गाठले असते.

पुणे करार. गोलमेज परिषदा. दांडी यात्रा. असहकार आंदोलन. फाळणी. पाकिस्तानला दिलेले पन्नास लाख. हिंसाचाराचा आगडोंब यासारख्या प्रत्येक घटनेवर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आपण 'पराई पीड जाणत नाही' म्हणून गांधीजींनी स्वतःला 'वैष्णव जन' मानणं सोडलं असतं.

चवदार तळे, पुणे करार, मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, निवडणुकीतील पराभव, धर्मांतर यासारख्या घटनांवर आपल्या विरोधकांच्या अनुयायांची टोकाची मतं आणि स्वतःच्या मूक अनुयायांना गतकालीन मानसिकतेला सोडताना होणारा प्रचंड त्रास पाहून तो महान मूकनायक हतबल झाला असता की अधिक त्वेषाने लढला असता?

जुनागढ आणि हैदराबाद येथील सरकारी समर्थनाने आणि काश्मीरबाबतीत पाकिस्तान समर्थनाने चालणाऱ्या पेड ट्रोल्सच्या पोस्टचा मारा सहन न होऊन पोलादी पुरूष भारतीय एकीकरण व्हायच्या आधीच वितळला असता.

एडविनाची उडवली जाणारी खिल्ली, नियतीशी करारच्या भाषणावरील लोकांची मते, अणुऊर्जा, शिक्षण, आय आय टीची स्थापना, धरण प्रकल्प यावर प्रस्थापितांची आणि विस्थापितांची मते ऐकून पंडीतजी पुन्हा भारत एक खोज लिहायला बसले असते.

कधी कधी वाटतं मार्क झुकरबर्गच्या आईबाबांनी मार्कला जन्म देण्याची घाई न केल्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली आहे. नाहीतर आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या समाजबांधवांना रोजच्या रोज फेसबुकवर हाणून आणि नेत्यांना कायम तोंडघशी पाडून आजच्या पिढीला पारतंत्र्यात जन्माला घातलं असतं.

फोडा आणि झोडा हे ब्रिटिशांचं राजकारण नव्हतंच हे मला फेसबुकमुळे कळलंय. फोडा आणि झोडा ही भारतीय प्रवृत्ती आहे.

Tuesday, September 3, 2019

उत्क्रांती

पाठीवर सॅक, अंगावर ढगळ टीशर्ट, कमरेवर ढगळ जीन्स, डोक्यावर उलटी टोपी, त्यातून बाहेर आलेला आणि पाठीवर लोंबणारा केसांचा शेपटा अशा अवतारातला तिशी चाळीशीचा तरुण, एअरपोर्टच्या वॉशरुममधे माझ्याशेजारी दोन जागा सोडून एका हाताने व्हॉटस अॅप झरझर वापरत निसर्गाच्या हाकेला ओ देत, कुठलाही अपघात होऊ न देता उरलेल्या मोकळ्या एका हाताने जीन्सची चेन लावत फोनच्या स्क्रीनवरुन नजर अजिबात न हटवता ज्या सहजतेने बाहेर गेला ते पाहता पूर्ण लक्ष देऊन दोन हात वापरूनही कायम अपघातप्रवण असलेला मी अतिशय आश्चर्यचकित झालो आहे.

उत्क्रांतीत माझ्यापुढे असलेला तो जीव पाहून; माणसांकडे पहाताना ओरांग उटान, चिंपांझीला काय वाटत असेल त्याचा अनुभव घेतो आहे.

अटकेपार इकॉनॉमिक्स

मी आर्थिक बाबींवर लिहिताना गांभीर्य पाळतो. कारण तो विषय मला पूर्णपणे कळत नसला तरी अतिशय आवडतो.

आर्थिक बाबींवर लिहिण्याचे दोन प्रकार असतात.

१) डेटासकट लिहिणे. सेन्सेक्स इतक्या टक्क्यांनी वाढला. जीडीपी अमूक एक टक्क्यांनी कमी झाला. बेरोजगारीचा दर, रेपो रेट असा असा कमी झाला /वाढला वगैरे. डेटा वाचताना वाचकाला एखादी संकल्पना माहिती नसेल किंवा कळली नाही तर तो ती शोधून समजून घेईल अशी अपेक्षा असते. हे लिखाण बातमीसारखं असतं.

2) केवळ संकल्पनांवर लिहिणे. यात डेटापेक्षा संकल्पनांवर भर दिलेला असतो. भाषा सोपी किंवा क्लिष्ट असू शकते. संकल्पना कळली की ती कुठे वापरायची ते वाचक शोधेल अशी खात्री असते. हे लिखाण कथेसारखं असतं.

माझं लिखाण दुसऱ्या प्रकारात मोडतं असं मला वाटतं.

पहिल्या प्रकारचं लिखाण महत्त्वाचं असतं कारण ते विमानाच्या डॅशबोर्डप्रमाणे महत्वाच्या निर्देशांकांची एका क्षणात माहिती देतं. हुशार विमानचालक त्या माहितीचा अचूक वापर करून आपल्या विमानाचं इंजिन गरम न करता, इंधन वाया न घालवता, वेगावर नियंत्रण ठेवत, केबिन प्रेशर योग्य ठेवत, एअर पॉकेट्स, जमिनीपासूनची उंची या सर्व बाबींना लक्षात ठेवत आणि आतल्या प्रवाशांच्या सोयीत कमीत कमी घट करत प्रवास सुखकर करतो.

पण डॅशबोर्ड म्हणजे काय? डॅशबोर्डवरची माहिती कशी वापरायची? याचं ज्ञान नसलेल्या माणसाला इंजिनच्या हीट इंडिकेटरचा आकडा, केबिन प्रेशर, आर्द्रता वगैरे सांगून काही उपयोग होत नसतो. झालाच तर त्रासच होतो. आपापल्या पूर्वानुभवानुसार आणि मतीनुसार ते आपापले निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे समस्या असेल तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते.

पण म्हणून अशा प्रकारची माहिती देऊच नये या मताचा मी नाही. माहिती सर्वांना उपलब्ध असणे हा आधुनिक अर्थाभ्यासाचा पाया आहे. पण आधुनिक अर्थाभ्यासाचं अजून एक गृहीतक आहे. ते म्हणजे व्यक्ती रॅशनल असते. तर्कशुद्ध रहाणे आणि भावनांवर हेलकावे न खाणे हे प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षित असतं.

तर्कशुद्ध विचार करायचा कसा? भावनांना मतांवर आरुढ होण्यापासून कसं रोखायचं? हे समजण्यासाठी संकल्पना समजून घेणं आवश्यक असतं. संकल्पना अमूर्त असतात. त्यांचे शब्दरुप हीच त्यांची मूर्ती असते. अर्थव्यवस्था अमूर्त असते. त्यामुळे अमूर्त अर्थव्यवस्थेबाबतच्या अमूर्त संकल्पना समजावून सांगणे अजून कठीण असते.

सांगणाऱ्याचे शब्दवैभव, विषयाची सखोल माहिती, आणि वापरलेल्या उदाहरणाची मार्मिकता यावरून ठरते की सांगणारा आपल्या मनातले सर्व काही यथास्थित वाचकापर्यंत पोचवण्यात यशस्वी झाला की नाही.

अगदी साधं उदाहरण म्हणजे मंदीबाबत बोलताना अनेकदा 'तेजी मंदीचं चक्र असतं' असं म्हटलं जातं. त्यातील चक्र या शब्दामुळे संकल्पना वेगळ्या पद्धतीने वाचकाला समजते. म्हणून मी 'तेजी मंदीच्या लाटा शब्द' वापरतो. पण दोन तीन दिवसापूर्वीची पोस्ट लिहिताना जाणवलं की या लाटा तलावातल्या आहेत की नदीतल्या की समुद्रातल्या ते कळणार कसं? आणि खरंतर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे पाण्यातील लाटांवरुन चालणारं जहाज नसून हवेच्या लाटांच्या तडाख्यात सापडलेलं विमान असतं. याचाच अर्थ ज्याला मंदी म्हणजे महामार्गावरील खड्डा वाटतो किंवा समतल तलावातील लाट वाटते किंवा नदीतली लाट किंवा समुद्रातील लाट त्या प्रत्येकाचं मंदीबाबतची आकलन वस्तुस्थितीपेक्षा बरंच वेगळं असणार.

म्हणून विषय सोपा करण्यापेक्षा चपखल पण शक्य तितकी अचूक उदाहरणे देण्याकडे माझा कल असतो.

अर्थात मी सर्वज्ञ नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, सरकारने डेफिसिट फिनान्सिंग ऐवजी सरप्लस ट्रान्स्फरचा मार्ग अवलंबला म्हणजे नक्की काय फरक पडला? डेफिसिट फिनान्सिंगमधे आरबीआयचा ताळेबंद भक्कम रहातो पण अर्थव्यवस्थेत जास्त पैसा खेळू लागल्याने महागाई वाढते. हे मला माहिती आहे. पण सरप्लस ट्रान्स्फरमुळे आरबीआयचा ताळेबंद नाजूक झाला असला तरी आता महागाई वाढेल का? हे मला अजूनही नीट कळलेलं नाही. मी त्याबाबत अजून वाचन करतो आहे. त्यामुळे माझ्या पोस्ट्स केवळ मला काय कळतं ते दाखवणारा पिसारा नसून कित्येकदा तो इथल्या मित्रांबरोबर केलेला संवाद असतो. त्यातून मला माझं अज्ञान दूर करता येतं आणि माझ्या उदाहरणांतील कच्चे दुवेही लक्षात येतात.

पण फेसबुकवर संवाद साधणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अर्थविषयक निर्णय सरकार घेत असल्याने आणि सरकारसमर्थक व विरोधकांत अर्थनिर्णयांना राजकीय निर्णयाचे पूरक म्हणून बघण्याची सवय असल्याने इथल्या अर्थसंकल्पनांविषयक पोस्टवर अपरिहार्यपणे राजकीय कमेंट्स येतात आणि संकल्पना पूर्ण समजून घेण्याऐवजी शाब्दिक आसूडाचे फटकारे ऐकू येत रहातात.

मी पॉलिटिकल सायन्सपेक्षा इकॉनॉमिक्समधे जास्त रस घेतो. आणि त्यातल्या सीमारेषा मला स्पष्ट दिसतात. माझ्या बऱ्याच मित्र मैत्रिणींना त्या तशा दिसत नाहीत हे मला आता कळून चुकलंय. त्याबद्दल माझी तक्रार नाही. पण त्यामुळे जेव्हा पोस्ट भरकटते तेव्हा ज्या संकल्पनांचा व्यूह पाश्चात्य समाजाने रचला, जो आपण कळत नकळत स्वीकारला, जो आपल्या जीवनावर सर्वांगीण प्रभाव पाडतो, तो समजून घेण्यासाठी आपण अजूनही पुरेसे गंभीर नाही, हे जाणवून मन थोडं खट्टू होतं.

मी पोस्ट लिहिताना राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवतो आणि माझ्या मित्र मैत्रिणींनी शक्य असेल तर माझ्या पोस्टवर किंवा अन्यत्रही आर्थिक संकल्पनाविषयक पोस्टवर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तर अटकेपार गेलेल्या मराठी भाषेत अर्थविषयक संकल्पना अधिक स्पष्टपणे व्यक्त होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा पुढील अनेक पिढ्यांना होईल याची मला खात्री आहे.

त्याचबरोबर माझे काही मित्र मैत्रिणी पोस्ट ऐवजी अन्य बाबींवर कमेंट करुन काव्य आणि विनोदाचा आनंद घेत असतात. त्याला कदाचित माझी किंचित विनोदी विषयांवर पोस्ट्स लिहिण्याची सवयही कारणीभूत असेल, हे मला मान्य आहे. पण शास्त्रविषयक पोस्टवर काव्य विनोद माफक असेल तर शोभून दिसतो अन्यथा शोभा होते हे वेगळे सांगायला नको.

कुणाला कदाचित माझी ही पोस्ट पटणार नाही. पण गूगल वापरून अर्धवट निदान करुन डॉक्टरशी वाद घालणाऱ्या पेशंटपेक्षा चुकीची उदाहरणं देऊन आणि अर्थाभ्यासाला राजकारणाची उपशाखा मानून सर्वत्र राजकीय मते मांडणारे लोक अधिक घातक आहेत. कारण जेव्हा पेशंट गडबड करतो तेव्हा तो केवळ स्वतःच्या जीवनाशी खेळतो. याउलट अर्थविषयक संकल्पनांना कमी लेखणारा समाज या ना त्या प्रकारे गुलामीत रहातो.

काशीला जायची गोष्ट

बंगळूरुत आहे. मेहुणीच्या लग्नाला आलोय. रम्य सकाळ आहे. हवेत सुखदपेक्षा किंचित जास्त गारवा आहे.

विधी सुरू झाले आहेत. नवरा मुलगा कमरेला वेष्टी आणि अंगावर उपरणं आणि डोक्यावर कानडी पगडी या वेषात काशीला निघालाय. मुलीकडचे आम्ही सगळे त्याची विनवणी करतोय की 'बाबारे ! नको जाऊस. आमची सालंकृत लेक तुला देतो. तुझ्या आयुष्यात ती छान रंग भरेल'

तो नाही म्हणतोय. शेवटी छान सजलेली वधू पुढे आली. तिला पहाताच नवरदेवाचं मन पाघळलं. त्याने काशीचा विचार रद्द केला. आता दोघं मोकळ्या अंगणात फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर झोके घेत आहेत. सगळे आनंदले आहेत. मला एकंच वाटतंय की, नवरा उघडा आहे. थंडी बोचरी आहे. फार जोरात झोके देऊ नका रे. नाही झालं सहन तर पुन्हा विचार बदलेल आणि जाईल काशीला.

इतक्यात माझ्या नजरेला माझी हसतमुख अर्धांगिनी आणि तिचे वडील दिसले. आणि लग्नानंतर आता एकोणीस वीस वर्षांनी जर मी काशीला जाण्याचा हट्ट धरला तर अगदी चटकन परवानगी देतील की काय या विचारामुळे मला या भर थंडीत घाम फुटला आहे.