लेक्चर संपवून बाहेर आलो. फेसबुकवर फेरफटका मारला. सरकारने रामायण सिरीयल पुन्हा दाखवायचं ठरवल्याचं कळलं. आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
दर रविवारी सकाळी कराटेच्या क्लासवरून लगबगीने घरी जायचं. कारण रामायणाचा एपिसोड बघायचा असायचा. ते 'सीता राम चरित अति पावन' सुरु होत असताना आम्ही चाळीच्या जवळपास पोहोचलेलो असू. घराघरातून त्या शीर्षक गीताचे सूर येऊ लागत आणि मग मी व माझा धाकटा भाऊ घराकडे अक्षरश: धाव घेत असू. दारासिंगचा हनुमान, हनुमान उडण्याचे स्पेशल इफेक्ट्स, रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी आधी पानाचं दुकान चालवत ही माहिती, विजय अरोराचा नाटकी इंद्रजीत आणि ती हवेतल्या हवेत होणारी बाणांची लढाई; सगळ्या गोष्टी आठवल्या. बालपणीचा काळ सुखाचा म्हणावं अश्या रम्य आठवणींच्या अवस्थेत काही क्षण गेले. आणि मग वीस जानेवारीला पुण्यात एस एल भैरप्पांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला गेलो होतो ते आठवलं.
कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जे घडतं तेच भैरप्पांच्या बाबतीत माझ्या मनातही घडलं होतं. 'वंशवृक्ष' नंतर 'पर्व' नंतर 'माझं नाव भैरप्पा'' नंतर 'सार्थ' नंतर 'मंद्र असा प्रवास केल्याने माझा आवडता झालेला हा लेखक नंतर 'धर्मश्री', 'परिशोध', 'काठ' वाचताना थोडा रटाळ वाटू लागला. त्यांची स्त्रियांबद्दलची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवू लागलं होतं. 'आवरण' वाचायच्या आधी अनंतमूर्तीची त्यांच्याबद्दलची आणि आवरण या पुस्तकाबद्दलची मतं वाचली होती. पण 'माझं नाव भैरप्पा', वाचलेलं असल्याने, आवरण पुस्तकाबद्दल ते न वाचताच एक सहानुभूतीचा कोपरा तयार झाला होता.
त्यानंतर जेव्हा आवरण वाचलं तेव्हा मात्र स्त्रियांप्रमाणेच इतिहासाबद्दलची भैरप्पांची मतं आपल्याला पटत नाहीत हे जाणवलं. तत्वज्ञानाचा अभ्यासक असलेला हा लेखक ज्या सहजतेने प्राचीन पुराणांवरील चमत्काराचं आवरण दूर करू शकतो त्याच सहजतेने अर्वाचीन इतिहासावर भाष्य करू शकेल हा माझा विश्वास डळमळीत झाला. भैरप्पा म्हणजे, 'स्वतःला दिसणारं सत्य आणि वाचक यामध्ये आपले पूर्वग्रह आणि आपले हेतू येणार नाहीत याची काळजी घेणारा लेखक', याऐवजी 'वाचकांना जे पटवायचं आहे त्याची समर्थपणे मांडणी करू शकणारा लेखक' असू शकतात ही शक्यता मी मान्य केली. त्यानंतर त्यांचं पारखा आणि तंतू वाचताना जरी सार्थ किंवा मंद्र इतकाच आनंददायी अनुभव आला तरी याही लेखकावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही आणि त्याचे पूर्वग्रह आपल्या नकळत आपण स्वीकारू नयेत याची जबाबदारी आपल्यावर आहे ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवली होतीच.
'भैरप्पा शब्द प्रमाण' अशी आता जरी माझी अवस्था नसली, तरी या लेखकाने आपल्याला कित्येकदा अपरिमित आनंद दिलेला आहे हे मान्य असल्याने जेव्हा त्यांना त्यांच्याच पुस्तक प्रकाशनात प्रत्यक्ष बघायला मिळेल आणि त्या दिवशी कुठलंही लेक्चर नाही हे लक्षात आलं तेव्हा मी पुस्तक प्रकाशनाला जायचं निश्चित केलं.
दोन पुस्तकांचं प्रकाशन होतं. साक्षी आणि उत्तरकांड. मी साक्षी आधी वाचलं आणि त्याबद्दल मी याआधीच लिहिलं आहे.
महाभारतावरील चमत्काराचं आवरण दूर करणारा हा लेखक रामायणावर लिहीत आहेत हे साधारणपणे दोनेक वर्षांपूर्वी कळलं होतं तेव्हाच माझं कुतूहल चाळवलं होतं. साक्षीबद्दल काहीच कल्पना नव्हती. असं असूनही उत्तरकांड आधी वाचायला न घेता मी आधी साक्षी वाचायला घेतलं त्याला कारण प्रकाशनसोहळा. या सोहोळ्यात शेवटी उत्सवमूर्ती बोलले. जेव्हा त्यांचा आवाज ऐकला, तेव्हा या माणसाचे शब्द आपण अनुवादित स्वरूपात केवळ वाचले होते आता त्याचा आवाज ऐकतो आहोत यामुळे माझे डोळे भरून आले होते. भैरप्पा चाळीस पंचेचाळीस मिनिटे बोलले. त्यातला बहुतेक भाग मी त्यांची पुस्तके आणि आत्मचरित्र वाचलेलं असल्याने मला परिचीत होता. नंतर जेव्हा ते साक्षी आणि उत्तरकांड यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलले तेव्हा मात्र माझ्या भावविभोर अवस्थेत मिठाचा खडा पडल्यासारखं झालं.
'राम वनवासाला गेला. भरत राज्य करायला समर्थ नव्हता. त्यामुळे चौदा वर्षे अयोध्येत अनागोंदी माजली. समर्थ राजाच्या अनुपस्थितीमुळे लोक करभरणा चुकवू लागले. साठेबाजी करू लागले. राम जेव्हा वनवासाहून परतला तेव्हा त्याला या अनागोंदीतून मार्ग काढायचा असल्याने त्याने कठोर निर्णय अमलात आणायला सुरवात केली. त्यामुळे कर चुकवणारे व्यापारी आणि त्यांचे सहाय्यक अधिकारी यांना त्रास होऊ लागला. परिणामी त्यांनी रामाला बदनाम करायची मोहीम सुरु केली. पण राम तर निष्कलंक. त्याच्यावर चिखल कसा काय उडवणार?, म्हणून मग त्यांनी रामाचं चारित्र्यहनन करून त्याच्या कायद्यांबद्दल सामान्य जनतेत अप्रीती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले. म्हणून मग त्यांनी सीतेच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरवात केली. म्हणजे सीतेच्या चारित्र्यावर शंका घेणारा सामान्य धोबी नव्हता तर तत्कालीन भ्रष्ट अधिकारी आणि व्यापारी यांनी ही कुजबुज मोहीम सुरु केली होती. त्यामुळे आपल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत अडथळा येऊ नये आणि प्रजेत कायद्याचा धाक राहावा म्हणून प्रभू रामाने कठोर निर्णय घेऊन सीतेचा त्याग केला.' असं माझं आकलन आहे हे भैरप्पांच्या बोलण्याचं सार होतं.
मला ते पटत असतानाच भैरप्पा पुढे म्हणाले. 'आताही तसंच चालू आहे. जेव्हा शासक कडक असतो आणि भ्रष्टाचार करण्याच्या संधी कमी होत जातात तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक आणि भ्रष्ट अधिकारी त्या शासकाबद्दल कुजबुज मोहिमा राबवून त्याच्याबद्दल जनमानस कलुषित करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आपल्या पंतप्रधानांनी निश्चलनीकरण किंवा अन्य कित्येक कठोर निर्णय घेतल्याने त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची फळी सक्रिय झाली आहे.' भैरप्पा पुढे बोलले असते परंतु व्यासपीठावरील अन्य निमंत्रितांनी त्यांना आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे याची जाणीव करून दिल्याने त्यांनी आवरतं घेतलं आणि उपस्थितांना पुस्तक वाचा अशी विनंती केली.
त्यांच्या त्या शेवटच्या वाक्यांमुळे त्यांच्या मनात प्राचीन कर्तव्यकठोर राम म्हणजे कुटुंबमोहापासून दूर असलेले सध्याचे आपले पंतप्रधान असावेत असा माझा ग्रह झाला. आणि प्रेक्षकांत बसलेल्या अनेकांनी ज्याप्रमाणे त्या वक्तव्याचं स्वागत केलं ते ऐकून बाकी सगळ्यांनाही तसंच वाटलं याबद्दल माझी खात्री झाली.
निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या वेळी बँकर्स आणि सर्व्हिस टॅक्स ऑफिसर्स कश्या प्रकारे वागले हे माहीत असल्याने, आणि हे असं होईल याची पूर्वकल्पना शीर्षस्थ नेतृत्वाला आणि त्यांच्या सल्लागार मंडळाला अजिबात नसेल यावर माझा विश्वास बसणं अशक्य असल्याने उत्तरकांड वाचायचा माझा उत्साह अगदी मावळून गेला. २०१७च्या जानेवारीत कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेलं पुस्तक लिहायला भैरप्पांनी कधी सुरवात केली हे मला निश्चित माहिती नसलं तरी हे पुस्तक लिहायला पर्व इतका मोठा काळ लागला नसेल हे मला बातम्यांवरून माहिती होतं. त्यामुळे आपल्या आवडत्या नेत्याला समर्थन देण्यासाठी भैरप्पांनी हे पुस्तक लिहिलं असावं हे मान्य करून मी थोडा खटटू झालो. कुणीही आपल्या लाडक्या नेत्याचं समर्थन करण्याला माझी ना नाही. पण ते प्रच्छन्न असावं असं माझं मत आहे. इतर लोक ज्याला साहित्यिक मूल्य आहे असं समजून वाचतील त्यात आपले हेतू मिसळू नयेत असंही माझं मत आहे. वाचणाऱ्याला माहिती असावं की आपण जे वाचतो आहेव ते नक्की काय आहे.
अर्थात माझ्या मताप्रमाणे भैरप्पांनी वागावं इतकं मोठं माझं कर्तृत्व नाही आणि अधिकारही नाही. त्यामुळे उत्तरकांड घरात आलं खरं पण ते वाचायचा उत्साह मावळला होता.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment