Saturday, April 11, 2020

चराचरात ईश्वर

भरपूर चालून हनुमान मंदिरापाशी आलो. सक्तीची सुट्टी असल्यामुळे की काय कोण जाणे पण मंदिरासमोरच्या तीनही चौथऱ्यांवर भरपूर गर्दी होती. सुडौल शरीराचे लोक व्यायाम करत होते. मलाही कधी नाही ते सूर्यनमस्कार घालायची इच्छा झाली.

मी एका चौथऱ्यावर चढलो आधीचे लोक बाजूला होऊन माझ्या विस्तीर्ण देहाला सूर्यनमस्कार घालायची जागा होईपर्यंत वाट पाहू लागलो. समोर 'हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी' सूर्याकडे तोंड करून उभे होते. माझ्या डोक्यात गाणं वाजू लागलं...

धन्य तुझी रामभक्ती दिव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी थरथरले आसमानं
एकमुखानं बोला बोला जयजय हनुमान

माझ्या मागे ते सफरचंदासारखं लाल गुलाबी पिवळसर सूर्यबिंब उगवताना मला जाणवत होतं.

माझ्या समोरच्या माणसाचा व्यायाम संपत आला होता. एकाएकी मनात विचार आला की कुठे तोंड करून सूर्यनमस्कार घालावेत? मारुतीरायाकडे तोंड केलं तर भगवान सहस्ररश्मीकडे पाठ होईल आणि सूर्यनारायणाकडे तोंड केलं तर अंजनीसुताकडे पाठ होईल. आणि मला चराचरात ईश्वर असणे म्हणजे काय ते जाणवलं.
मग या चराचरातील ईश्वराकडे पाठ नको म्हणून मी हात जोडून उभ्या उभ्या एक प्रदक्षिणा मारत सूर्यनारायण आणि पवनसुताला नमस्कार केला आणि माझ्यापुढच्या माणसाबरोबर चौथऱ्यावरून खाली उतरून घराच्या रस्त्याला लागलो.

माझ्या शरीरसाधनेत अध्यात्म हाच मोठा अडसर आहे, हेच खरं. नाहीतर आज भारताला एखादा मिस्टर युनिव्हर्स मिळाला असता.

No comments:

Post a Comment