Saturday, April 11, 2020

रंगासाई सर आणि कोरोना

अकरावी ते तेरावी गणेश क्लासला जायचो. रंगासाई सर होते इकॉनॉमिक्स शिकवायला. ठाण्याला राहणारे रंगासाई सर केळकर कॉलेजात शिकवायचे आणि संध्याकाळी डोंबिवलीत गणेश क्लासमध्ये आमच्या डोक्यात इकॉनॉमिक्स भरायचा प्रयत्न करायचे. मराठी त्यांना येत नसावं आणि अकरावीच्या मुलांसमोर आपलं तोडकं मोडकं हिंदी वापरलं तर खिल्ली उडवायला या अर्धवट वयातील मुलांच्या हाती आयतं कोलीत दिल्यासारखं होईल हे त्यांना माहिती असावं त्यामुळे त्यांचं लेक्चर कायम दाक्षिणात्य हेल असलेल्या इंग्रजीत असायचं. सरांचा फोटो माझ्याकडे असण्याचं कारण नाही, त्यामुळे आता सरांची मूर्ती अंधूक आठवते. तामिळ सिनेमातील नासर नावाचा गुणी अभिनेता जसा दिसतो तसं माझ्या स्मृतीतील सरांचं चित्र आता दिसू लागलं आहे.

पूर्ण इंग्रजीत असलेल्या लेक्चरमुळे त्या काळच्या डोंबिवलीतील कॉमर्स शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये सर लोकप्रिय होणं जरा कठीणच होतं. त्यात सरांचा विषय इकॉनॉमिक्स, जो तत्कालीन डोंबिवलतीलच काय पण आजही असंख्य भारतीयांच्या नावडीचा विषय आहे. त्यामुळे इतर विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या गराड्यात रंगासाई सर एकटे पडलेले असत. पण त्यामुळे त्यांच्या शिकवण्यावर परिणाम झाला नाही. आपला विषय ऐकण्यात फार रस नसलेल्या विद्यार्थ्यांसमोरही ते कायम नावाप्रमाणेच रंगात येऊन शिकवत. साधारणपणे 'कमी तिथे आम्ही' असा माझा स्वभाव लहानपणापासून असल्याने विद्यार्थीप्रिय नसलेल्या रंगासाई सरांकडे मी ओढला जाणं स्वाभाविक होतं. त्यामुळे मी त्यांच्या लेक्चरला जरा जास्त लक्ष द्यायचो. परिणामी इकॉनॉमिक्स हा विषय किमान थोड्या फार प्रमाणात का होईना पण डोक्यात शिरू लागला आणि मग त्याची गोडी लागली.

मग एकदा डोंबिवलीत एका पुस्तक प्रदर्शनात 'रॉबर्ट हेलब्रॉनर' यांच्या 'Worldly Philosophers' या पुस्तकाचा बाळ गाडगीळ यांनी 'अर्थशास्त्राचे शिल्पकार' या नावाने केलेला अनुवाद मिळाला. कमी कळत असलं तरी मित्रांसमोर स्टाईल मारायची म्हणून घेतलं आणि वाचायला सुरवात केली. त्यातलं चौथं प्रकरण वाचायला सुरवात करायला आणि लोकसंख्येचा सिद्धांत रंगासाई सरांनी शिकवायला एकच गाठ पडली. परिणामी इकॉनॉमिक्स आणि रंगासाई सरांवरच प्रेम वाढलं आणि ते अजूनही टिकून आहे.

१६९६ च्या सुमारास इंग्लंडमधील ग्रेगरी किंग नावाच्या एका नकाशा तज्ज्ञ आणि संख्याशास्त्रीने त्यावेळच्या उपलब्ध साधनांवरून इंग्लंडची लोकसंख्या किती असावी याचा अंदाज बांधला होता. साडेपाच दशलक्ष हा किंगचा अंदाज आश्चर्यकारकरीत्या सत्याजवळ जाणारा होता. पण किंग साहेबांना केवळ तत्कालीन लोकसंख्येत रस नव्हता तर ती लोकसंख्या किती वेगाने वाढेल याबद्दलही त्यांनी अंदाज बांधला होता. त्यांच्या अंदाजाप्रमाणे इंग्लंडची तत्कालीन लोकसंख्या दुप्पट व्हायला इसवीसन २३०० उजाडलं असतं आणि इसवीसन ३५००च्या आधी ती चौपट होऊ शकली नसती.

किंग साहेबांचा अंदाज हा तत्कालीन इंग्लंडातील समाजधुरिणांच्या चिंतेचा विषय होता. इंग्लंडची लोकसंख्या अतिशय कमी वेगाने वाढते आहे आणि इंग्लंडच्या साम्राज्याच्या शत्रूंची लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढते आहे असे सर्वमान्य मत होते. परिणामी या शत्रू देशांकडून इंग्लंडच्या साम्राज्यावर हल्ले होणं वाढत जाणार आहे आणि शेवटी इंग्लंड हे महान राष्ट्र लयाला जाऊ शकतं अशी भीती प्रतिष्ठित लोकांच्या मनात होती. त्यात डॉ प्रिन्स नावाच्या एका संख्याशास्त्र्याने उपलब्ध पुराव्याने सिद्ध करून दाखवलं की इंग्लंडची लोकसंख्या ग्रेगरी किंगच्या काळापेक्षा चक्क तीस टक्क्याने कमी झाली होती. आता मात्र इंग्लंडमधील नेत्यांनी लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. लोकसंख्या घटल्याने देशाचा ऱ्हास होतो तर ती वाढल्याने देशाचा विकास होईल असा विचार उदयाला आला. आणि विल्यम पिट (यंगर) या तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानाने चक्क गरिबांची लोकसंख्या वाढावी म्हणून गरिबांना लग्न करण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी मदत देणारं "Poor Relief Bill" संसदेत आणलं होतं.

त्या वेळी इंग्लंडमध्ये अजून एक विचारवंत आणि मंत्री होता. त्याच नाव विल्यम गॉडविन. फ्रँकेस्टाईन लिहिणाऱ्या मेरी शेलीचा पिता आणि जगप्रसिद्ध कवी पी बी शेलीचा सासरा असणारा हा गॉडविन आपल्या अराजकवादी 'anarchist' (माझ्या मते खरं तर ते अराज्यवादी असायला हवं) बंडखोर विचारांसाठी प्रसिद्ध होता. त्याने 'पॉलिटिकल जस्टीस' या नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्यात त्याने इंग्लंडची लोकसंख्या वाढवण्याचे फायदे रंगवून सांगितले होते. भरपूर लोकसंख्या असेल. सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी उत्पादन करावं लागेल. परिणामी सगळ्यांना रोजगार मिळेल. युद्ध होणार नाहीत. राज्यसंस्था लयाला जाईल. लोक सुखी असतील. वगैरे मुद्दे त्याने सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. पुस्तक राज्यसंस्थेच्या विरोधी असलं तरी त्यात भविष्याबद्दल आशादायी चित्र रंगवल्याने त्यावर इंग्लंडमधील उच्च्भ्रू वर्तुळात भरपूर चर्चा होऊ लागली.

डेव्हिड ह्यूम आणि जीन रूसो यासारख्या विचारवंतांशी मैत्री असलेल्या डॅनियल माल्थस या प्रतिष्ठित गृहस्थालाही या पुस्तकातील प्रतिपादन पटलं. (अनेकजण या आडनावाचा उच्चार माल्थुस असा करतात. पण रंगसाई सर माल्थस म्हणायचे म्हणून मीही माल्थस म्हणतो.) तर डॅनियल माल्थस या पुस्तकाबद्दल आपल्या लाडक्या मुलाशी गप्पा मारू लागले. 

थॉमस माल्थस
फोटो सौजन्य : इंटरनेट 
केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेला, लॅटिन आणि ग्रीक भाषेवर प्रभुत्व असलेला आणि गणितात रँग्लर असलेल्या या बुद्धिमान मुलाचं नाव होतं थॉमस माल्थस. पुढे १९२९ मध्ये जागतिक मंदीच्या काळात जॉन मेनार्ड केन्सने मांडलेली "general glut", सार्वजनिक उत्पादनातिरेक ही संकल्पनादेखील याच थॉमस माल्थसला जाणवली होती. पण तो त्याच्या काळाच्या इतका पुढे होता की त्या संकल्पनेचं काय करायचं ते त्याला आणि त्याच्या समकालीन विचारवंताना कळलं नाही. थॉमस माल्थसची थोरवी सांगण्यासाठी फक्त इतकंच सांगतो की ख्रिस्ती धर्मगुरू असलेल्या माल्थसबाबाच्या विचारांनी चार्ल्स डार्विनही प्रभावित झाला होता.

गॉडविनने पुस्तकात सांगितलेल्या मुद्द्यांचा वडिलांशी बोलताना प्रतिवाद करताना थॉमस माल्थसने जे मुद्दे मांडले त्यामुळे डॅनियल माल्थस इतके प्रभावित झाले की त्यांनी आपल्या मुलाला आपले विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध करायला सांगितले. त्यातून तयार झालेलं पुस्तक म्हणजे 'An Essay in to Principles of Population', लोकसंख्येच्या नियमांवरचा निबंध.

त्यानंतर थॉमस माल्थसने या निबंधाची सात संस्करणे काढली. प्रत्येक वेळी त्याने मागील संस्करणातील त्रुटी सुधारल्या किंवा निबंधावरील आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माल्थसने मांडलेले लोकसंख्यावाढीचे नियम थोडक्यात या प्रकारे सांगता येतील.

१) लोकसंख्या गुणाकार श्रेणीने वाढते. जेव्हा अनुकूल वातावरण मिळतं, तेव्हा मनुष्यप्राण्यांचं लैंगिक आचरण लोकसंख्या वाढीचं गुणोत्तर अतिशय वेगाने बदलवून टाकतं.

२) याउलट अन्नधान्य मात्र बेरीज श्रेणीने वाढतं

३) म्हणजे लोकसंख्या जर २ > १० > ५० > २५० > ७५० या पद्धतीने वाढत जात असेल तर अन्नधान्य मात्र २ > ५ > ८ > ११ > १४ या पद्धतीने वाढत जाते. परिणामी वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नपुरवठा मिळू शकत नाही.

४) मग या लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्या बिघडलेल्या समतोलाला पुन्हा ताळ्यावर आणण्याचं काम दोन नियंत्रक करतात.
पहिला म्हणजे पॉझिटिव्ह किंवा नैसर्गिक नियंत्रक. बिघडलेल्या असमतोलामुळे गरिबी, दैन्य, दुष्काळ, भूकबळी, रोगराई, युद्ध होतात आणि लोकसंख्या पूर्ववत होते.
किंवा मग दुसरा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक नियंत्रक म्हणजे माणसांनी घेतलेले निर्णय. यात लग्नाचं वय लांबवणे, संतती नियमन, ब्रह्मचर्यपालन, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणं वगैरे बाबी येतात.
जो समाज हे प्रतिबंधात्मक उपाय करणार नाही त्याच्यावर निसर्ग आपले उपाय लागू करतो आणि शेवटी लोकसंख्येला ताळ्यावर आणतो.

५) जेव्हा सुबत्ता येते तेव्हा माणसे कुटुंबनियोजनाकडे दुर्लक्ष करतात परिणामी गुणाकारश्रेणीने लोकसंख्या वाढायला सुरवात होते. वाढत्या लोकसंख्येला कमी पडू नये म्हणून अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जाते. त्यामुळे अन्नधान्य मुबलक मिळू लागतं. परिणामी पुन्हा लोकसंख्या वाढू लागते. लोकसंख्येचा विस्फोटच होतो म्हणा ना. पण या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जमीन वाढत नाही. परिणामी वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न मिळत नाही. परिणामी लोकसंख्या एक आपत्ती बनते. आणि या आपत्तीत भरडले जातात ते सामाजिक उतरंडीतील तळागाळाचे लोक. त्यांच्याकडे अगोदरच संसाधनांचा तुटवडा असतो त्यामुळे ते अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात टिकून राहण्यासाठी असमर्थ ठरतात. आणि ज्यांच्याकडे संसाधनांची विपुलता आहे किंवा ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे ते टिकाव धरतात. म्हणून सरकारने लोकसंख्यावाढीसाठी उत्तेजन देऊ नये. (डार्विन बाबामुळे आता सगळ्यांना माहिती झालेल्या हर्बर्ट स्पेन्सर यांच्या 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' या संकल्पनेचं एक मूळ इथेही असावं असं मला वाटतं)

अश्या तऱ्हेने गॉडविनने रंगवलेलं लोकसंख्यावाढीतून आर्थिक सुबत्तेचं चित्र माल्थसने उध्वस्त केलं. माल्थसने मांडलेले मुद्दे इतके प्रभावी पण नकारात्मक होते की त्या काळात त्याने समाजधुरिणांवर दडपण आणलं. इतकंच काय पण हेलब्रॉनर यांनी आपल्या पुस्तकात माल्थसच्या प्रकरणाचं नावंही The Gloomy Presentiments of Parson Malthus and David Ricardo म्हणजे 'धर्मोपदेशक माल्थस व डेव्हिड रिकार्डोचं उदास विचारविश्व' असं दिलं आहे.

माल्थसच्या या लोकसंख्यावाढीच्या सिध्दांतावर भरपूर टीका झाली. तो कालबाह्य झाला आहे असं प्रतिपादन कित्येकदा केलं गेलं. जागतिकीकरण, शेतीत झालेल्या सुधारणा, शेतीचं औद्योगिकीकरण, हरितक्रांती आणि आता जीएम बीबियाणं यामुळे आपण माल्थसच्या काळापेक्षा कित्येकपट लोकसंख्या असूनही अन्नधान्याच्या तुटवड्यावर मात केली आहे. आता जर कुठे भूकबळी असतील तर ते अन्नधान्याच्या उत्पादनाच्या तुटवड्यामुळे नसून वितरणव्यवस्थेतील त्रुटींमुळे आहेत. असं असलं तरी हरितक्रांतीमागे किंवा भारतासारख्या विकसनशील देशांतील कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमांमागे वैचारिक भूमिका माल्थसच्या लोकसंख्येच्या सिध्दांतातील प्रतिबंधात्मक उपायांची होती हे अनेकांना पटेल.

आज जेव्हा कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे तेव्हा यामुळे कराव्या लागणाऱ्या लॉक आऊटमधे सगळ्यात जास्त भरडले जाणार आहेत ते समाजातील आर्थिक उतरंडीतील सगळ्यात खालच्या थरातील लोक. ज्या ज्या देशात कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेवर अतिरिक्त बोजा पडला आहे किंवा पडणार आहे त्या त्या देशातील आर्थिक उच्चस्तरातील लोकांना उपचार करुन घेणं परवडतं आहे किंवा परवडणार आहे. अडकले आहेत किंवा अडकतील केवळ आर्थिक निम्नस्तरातील लोक.

आज जर माल्थस असता तर त्याने आपल्या निबंधाचं आठवं संस्करण केलं असतं आणि मुबलक अन्नधान्य उपलब्ध असूनही लोकसंख्या समतोल करण्याच्या निसर्गाच्या नियमांना शब्दबद्ध केलं असतं. आणि अशा परिस्थितीत सरकारची जबाबदारी ही आर्थिक दुर्बळ घटकांकडे अधिक लक्ष देण्याची आहे हे ठासून सांगितलं असतं.

लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करु नका. वाढलेल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा. संसाधने केवळ मूठभर लोकांच्या हातात एकवटू देऊ नका आणि असलेल्या लोकसंख्येची क्रयशक्ती खालावू देऊ नका अन्यथा सार्वजनिक उत्पादनातिरेकामुळे येणाऱ्या आर्थिक मंदीला सामोरे जावे लागेल असंही त्याने समजावलं असतं.

आज संध्याकाळी बायकोमुलांबरोबर कोरोनाबद्दल बोलताना माल्थस आठवला. मग हेलब्रॉनरांच्या पुस्तकातील माल्थसवरचं प्रकरण पुन्हा चाळलं. तेव्हा रंगासाई सरांची आठवण आली.

No comments:

Post a Comment