Monday, May 30, 2016

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.५) सुनता है गुरू ग्यानी - तिसरा चरण

------------------

------------------
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा  अजून एक पाठभेद सांगितला.  तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.


जीवाचा देहजन्म, त्याचे नामकरण, त्याचा इंद्रियगम्य सुखांचा हव्यास आणि त्यांच्या सातत्याची ओढ, त्यामुळे न संपणारी तृष्णा आणि या तृष्णेवर विजय मिळवून अक्षय सुखाचा आनंद घेण्यासाठी, अधोमुख कुंडलिनीला ऊर्ध्वमुख करून तिचा उलटा प्रवास करवणारा साधक यांच्याबद्दल कबीर सांगत आहेत,  असा  त्या कडव्याचा अर्थ मी लावला होता. आता तिसऱ्या कडव्याकडे वळतो.


गगन मंडल में गौ बियानी, भोई पे दई जमाया जमाया |
माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत बपरानी हो जी … ll 3 ll


डॉ परळीकरांच्या पुस्तकात याचा जो अर्थ दिला आहे तो तपशीलाच्या थोड्याफार फरकाने मला जवळपास पटला आहे.  परळीकर म्हणतात, "आकाशरूपी मस्तकात इंद्रिये व्याली म्हणजे त्यांनी इच्छांना जन्म दिला आणि त्यांनी जमिनीवरच अनेक संकल्प केले. या जगात जे सार तत्व (तत्वमसि) आहे ते संतांनी आत्मसात केले आणि असारतत्व म्हणजे माया ही जगात वाटली गेली."


विश्वाचे मूळ इच्छा. आधी निर्गुण निराकाराला स्वतःला अनुभवायची इच्छा झाली. त्यासाठी गुणांचे आणि आकाराचे अस्तित्व असणे महत्वाचे होते. म्हणून मग चार लोक, त्यातून हिरण्यगर्भ, त्यातून हिरण्यपुरुष, त्याची इंद्रिये, इंद्रियांचे प्रयोजन पूर्ण व्हावे म्हणून लोकपालरुपी गुण अशी एक साखळी निराकारात पूर्ण होते. आकार घेण्यासाठी जड कुठून येते त्याचे पुरेसे समाधानकारक उत्तर न देता मग याच्या अगदी उलट साखळी आपल्या साकार जीवनात तयार होते.


मला ही कल्पना जशी समजली आहे ते सांगण्यासाठी तीन उदाहरणे देतो.


१) हिरण्यपुरुषाचे डोळे उत्पन्न होतात. त्यानंतर डोळे आहेत म्हणून दृष्टी उत्पन्न होते. मग दृष्टी आहे म्हणून प्रकाश उत्पन्न होतो आणि मग प्रकाश आहे म्हणून आदित्य / सूर्य उत्पन्न होतात. अशी एक साखळी पूर्ण झाली की दुसरी साखळी जीवाच्या जडदेहाच्या  असते. आता सूर्य तयार झालेले असतात. त्यांचा प्रकाश देखील असतो, आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी जड देहात डोळे निर्माण होतात. किंवा,


२) हिरण्यपुरुषाचे मुख उत्पन्न होते. मग मुख आहेत म्हणून वाणी उत्पन्न होते. वाणी आहे म्हणून वाणीचे इंद्रिय तयार होते. ही निराकाराची साखळी पूर्ण होऊन विश्वोत्पत्ती झाली की प्रत्येक जड देहात वाणीचा अनुभव घेण्यासाठी वाणीचे इंद्रिय तयार होते. किंवा,


३) हिरण्यपुरुषाच्या नाकपुड्या उत्पन्न होतात. मग नाकपुड्या आहेत म्हणून श्वास उत्पन्न होतो. श्वास आहे म्हणून प्राणवायू उत्पन्न होतो. ही निराकाराची साखळी पूर्ण झाल्यावर, प्रत्येक जड देहात या प्राणवायूचा अनुभव घेण्यासाठी नाकपुड्या तयार होतात.  


आता ज्याचा अनुभव घ्यायचा तो प्रकाश, ध्वनी किंवा प्राणवायू तयार झाला. ज्याच्या सहाय्याने अनुभव घ्यायचा ती इंद्रिये तयार झाली. इतके सगळे झाले की  मग अनुभव घेण्यासाठी तो निर्गुण निराकार पुरुष, टाळूतून या सगुण साकार जडदेहात प्रवेश करतो. आणि मग इंद्रियगम्य सुख अनुभवतो. स्वतःच स्वतःला स्वतःच्या सहाय्याने अनुभवतो.


ज्याला निर्गुण निराकाराची ही लीला कळते तो इंद्रियांच्या उपभोगात रमण्याऐवजी आपले जडदेहातील अस्तित्व मूळ अस्तित्वाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. सातत्याचा हव्यास न करता, जीवनाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो. अनुभवांच्या वैविध्यात सुख दुःख न शोधता, अस्तित्वाचे कारण समजल्यामुळे निर्गुण निराकाराची सगुण साकार बासरी होतो. त्यातून निर्गुणाचे सूर वाहू देतो. लीला उपभोगतो पण लीलेत गुंतून पडत नाही. संसाराचे तत्वमसि हे सार कळून चुकल्याने परमेश्वराकडे,"माझे सुख वाढव किंवा दुःख कमी कर" अश्या मागण्या करण्यात त्याला रस उरत नाही. त्याच्या विचारांच्या घुसळणीमुळे, त्याच्या साधनेमुळे जणू जीवनरुपी दुधातले सत्वरुपी लोणी त्याला मिळालेले असते. पण साधक नसलेला सामान्य माणूस मात्र स्वतः या घुसळणीमध्ये अडकून सुद्धा परमेश्वराशी असलेले आपले अद्वैत ओळखू शकत नाही. तत्वमसि चा बोध न झाल्याने, तो घुसळणीमध्ये तयार होणारे लोणी सोडतो आणि त्या तुलनेत निसत्व असणाऱ्या, उरल्या सुरल्या ताकाला जवळ करतो. अनुभवांच्या वैविध्याऐवजी सातत्याच्या मागे लागतो. बासरीतून निघणाऱ्या सुरांच्या वैविध्याचा आनंद घेण्याऐवजी एकाच सुराच्या मोहात पडून एकसुरी होतो. आणि शेवटी सुखाच्या सातत्याच्या मागे लागलेला माणूस सातत्याने दुःखाचा अनुभव घेत राहतो.


वरील विचार लिहिताना, विशेषतः, "स्वतःच स्वतःला स्वतःच्या सहाय्याने अनुभवतो" हे वाक्य लिहिताना माझा मीच थरारलो. वाटले की हा विचार माझ्या अनुभवांच्या व्याप्तीपेक्षा खूपच मोठा आहे. म्हणून लगेच गुगलवर "He experiences himself through himself"  असे शोधले तेंव्हा अश्याच शब्दात पण वेगळ्या भावनेने आणि वेगळ्या अर्थाने अल्बर्ट आईनस्टाईनने लिहिलेले एक वाक्य मिळाले. वर्ल्ड ज्युईश कॉंग्रेस चे पॉलिटीकल डायरेक्टर असलेले श्री. रॉबर्ट मार्कस यांचा मुलगा पोलिओमुळे दगावल्यानंतर त्यांच्या सांत्वनासाठी १२ फेब्रुवारी १९५० रोजी पाठवलेल्या पत्रात आईनस्टाईन म्हणतात, "A human being is a part of the whole, called by us "Universe," a part limited in time and space. He experiences himself, his thoughts and feelings as something separate from the rest—a kind of optical delusion of his consciousness. The striving to free oneself from this delusion is the one issue of true religion. Not to nourish it but to try to overcome it is the way to reach the attainable measure of peace of mind."


निर्गुण निराकार पुरुष सगुण साकाराला वापरून आपली लीला रचतो, अश्या अर्थाचे माझे वाक्य, साधना म्हणजे काय? याचा गंध देखील नसलेल्या आणि शब्दांच्या अर्थामागे धावणाऱ्या अनुभवशून्य माणसाच्या शब्दांचा केवळ फुलोरा आहे तर आईनस्टाईनचे वाक्य म्हणजे दुसऱ्या महायुद्धात आपल्या लाखो बांधवांचा संहार सोसणाऱ्या एका भौतिकशास्त्रज्ञाने आपल्याच एका बांधवाच्या वैयक्तिक दुःखावर दिलेली सहृदय प्रतिक्रिया आहे. मानवाच्या मनःशांती च्या प्रवासासाठी केलेले मार्गदर्शन आहे. त्यामुळे, या वाक्याने आणि ते आईनस्टाईनचे असल्याने मला अतिशय आनंद झालेला असला तरी, मी निर्गुणी भजने आणि आईनस्टाईन यांचा संबंध लावत नाही आहे.  केवळ त्याचा अंधुक संदर्भ मला लागला आणि तो मला आवडला म्हणून मी तो नोंदवून ठेवला आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे, अशी विनंती करतो आणि पुन्हा तिसऱ्या चरणाच्या मला लागलेल्या अर्थाकडे वळतो.


तिसऱ्या चरणाचा अर्थ समाधानकारक लागला होता. पण यात, व्यवसायाने विणकर असलेल्या कबीरांनी, गाईचे, दुधाचे, लोण्याचे आणि ताकाचे रूपक का वापरले असेल? त्याचा विचार करत होतो. आणि एकदम आठवली ती कामधेनू. भारतीय पुराणात मनात येतील त्या इच्छा पूर्ण करून देणारी शक्ती म्हणजे कामधेनू. काही ठिकाणी तिला अमृतमंथनातून बाहेर आलेले रत्न म्हटले आहे तर काही ठिकाणी तिला दक्षाची पुत्री, काही ठिकाणी प्रजापतीची पुत्री म्हटले आहे. भगवद्गीतेत देखील दहाव्या अध्यायातील अठ्ठाविसाव्या श्लोकात, भगवान स्वतःचे वर्णन , "गायीत मी कामधेनू आहे" असे करतात. काम म्हणजे इच्छा हे लक्षात ठेवले आणि मला उमगलेल्या अर्थाची संगती लावली तर मग कबीरांनी वापरलेले हे रूपक समजायला सोपे होते.


निर्गुण निराकार परमेश्वराच्या स्वतःला अनुभवण्याच्या इच्छेतून सगुण साकार विश्व उत्पन्न झाले. या सगुण साकार विश्वात जेंव्हा मानवी जडदेह जन्म घेतो तेंव्हा त्याच्या मस्तकात म्हणजे गगनमंडळात इच्छा किंवा कामना जन्म घेऊ लागतात. त्याच्या शरीरातील ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये म्हणजे भुई. त्यांच्या सहाय्याने त्याला होणारे जगाचे आकलन आणि इच्छेला अनुसरून होणारे त्याचे वर्तन म्हणजे जमवलेले दही. आणि त्याची त्या अनुभवांची आसक्ती म्हणजे त्या दह्याची होणारी घुसळण. मग लोणी म्हणजे अनुभवांचे वैविध्य ज्या साठी परमेश्वराने ही लीला रचली. ज्ञानी साधक  हे ओळखतो म्हणून तो लोण्याच्या मागे लागतो. तर अनेक  जडदेहधारी व्यक्ती आपले अद्वैत विसरतात. आपल्या जन्माचे प्रयोजन विसरतात. इच्छेनुसार ही इंद्रिये वापरायची हा संकेत विसरून त्यांच्या इंद्रियातून इच्छा जन्माला येऊ लागतात. इच्छेची इंद्रीयांवरची पकड सुटते. शेवटी मन, इंद्रियांच्या आधीन होऊन बसते. आणि मग या व्यक्ती, वैविध्याचे लोणी सोडून सातत्याचे ताक पकडून बसतात.  


तिसऱ्या चरणातले गायीचे हे रूपक मला असे उलगडले आहे.
------------------

------------------

Monday, May 23, 2016

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

------------------

------------------

मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.


ऐतरेयोपनिषदातला सिद्धांत मला किती पटला हा भाग जरी सोडून दिला तरी त्यात मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे या सिद्धांतात वापरलेली निर्गुण निराकारातून निर्गुण साकार पुरुष निर्माण होणे, मग या निर्गुण साकार पुरुषाच्या अवयवातून गुण निर्माण होणे, त्या गुणांनी जड देहात स्थान ग्रहण करणे आणि  मग त्या सगुण देहात पुन्हा निर्गुण चैतन्याने प्रवेश करणे अशी दाखवलेली निर्मितीची साखळी.  ह्या साखळीत विशुद्ध चैतन्यातून जड कसे निर्माण होते, ते सांगितलेले नाही. किंबहुना चैतन्य आधी की जड आधी, हा प्रश्न देखील सोडवलेला नाही. तरी चैतन्याचा आणि जडाचा अविभाज्य परस्परसंबंध दाखवला आहे. किंबहुना तसा संबंध दाखवण्यासाठीच निर्गुण आणि सगुण या संकल्पना वापरल्या आहेत.  मला ही उपनिषदकर्त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचंड मोठी झेप आहे असे वाटते. या प्रचंड कल्पनाशक्तीला वंदन करून मी दुसऱ्या चरणाकडे वळतो.


वहां से आया पटा लिखाया, तृष्णा तो उने बुझाई बुझाई |
अमृत छोड़सो विषय को धावे, उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll


हा चरण किंवा हे कडवे मोठे गोंधळात टाकते. याचा अर्थ परळीकरांच्या पुस्तकात, "तेथून म्हणजे प्रकृती- पुरुषापासून जीव येथे आला. येथे त्याचा पत्ता लिहून  घेतला म्हणजे त्याला नामरूप प्राप्त झाले. त्याची जन्म घेण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली. जीवाला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आणि तो विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला. अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच विषयांत जीव गुंतून पडला आणि परमेश्वराच्या स्मरणात गुंतून पडण्या ऐवजी बंधनात अडकून पडला." असा दिला आहे.


हा अर्थ चटकन पटला पण निर्गुण निराकाराला स्वतःला अनुभवायचे होते, स्वतःची लीला खेळायची होती म्हणून त्याने सगुण साकाराची निर्मिती केली हा तैत्तिरियोपनिषद, बृहदारण्यकोपनिषद आणि ऐतारेयोपनिषद यांच्या एकत्रित वाचनातून तयार होणारा सिद्धांत एकदा मान्य केला की विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला आणि इंद्रियगम्य पंच विषयात जीव गुंतून पडला असा अर्थ काढणे मला अडचणीचे वाटू लागले. कारण हे पंच विषय अनुभवणे हेच तर या सर्व लीलेचे कारण होते. मग त्याला बंधन कसे म्हणायचे.  पुन्हा, "तृष्णा तो उने बुझाई बुझाई" असा उल्लेख आहे. मग ज्याची तृष्णा भागली किंवा शमली तो अमृत सोडून विषयाकडे का म्हणून धावेल? असाही प्रश्न पडला. आणि माझी शोधयात्रा पुढे चालू राहिली.


वहां से आया पटा लिखाया, म्हणजे आता सगुण जडदेहात चैतन्याने प्रवेश केला. आणि मग या जडदेहाचा जन्म झाला. देहाच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण समाजाची निर्मिती केल्याने या देहाने आपले  जन्माधिष्ठित कार्य (ज्याला आपण इंग्रजीमध्ये Calling म्हणतो) ते ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याआधी त्यावर सामाजिक संस्कार होतात. त्याचे नामकरण होते. त्याचे नाव जगाने काय ठेवले त्यावरून त्याची ओळख बनू लागते. आणि मग तोही स्वतःला त्याच नावाशिवाय वेगळा ओळखू शकत नाही. ते नाव आणि त्या नावामागील मानवी संस्कृतीची परंपरा वागवण्याचे बंधन त्याच्यावर पडते आणि मग निसर्गाच्या विविध लीलांना उमगून त्यांचा आनंद घेण्यासाठी मुक्त असलेला तो जीव, आपल्या नावामुळे आणि त्याच्यामागील संस्कृतीमुळे, नवनवीन अनुभवांचे एकाच पठडीतले अर्थ काढून मुक्तता सोडून पत्त्यासारखा (address) अविचल होतो.


इथपर्यंत पोहोचलो पण, "तृष्णा तो उने बुझाई" ची संगती लागेना. शोध काही संपेना. सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या संकेतस्थळावर या पूर्ण कडव्याचा अर्थ,
"Your being arrived from there to an address in this world, to quench its own thirst – the desire for God. But putting nectar aside, you drink poison again and again. Going in reverse, you now toss and turn in your own trap." असा दिला आहे.


तो काही मला पटत नव्हता. मग लिंडा हेस बाईंच्या सिंगिंग एम्प्टीनेस या पुस्तकात अजून एक माहिती मिळाली.


कुमारजींना ही भजने त्यांच्या देवास येथील वास्तव्यात मिळाली. देवास येथे शीलनाथ महाराज नावाचे एक साधू पुरुष होते. त्यांच्या दरबारात अनेक विख्यात गवयी आपली संगीत सेवा अर्पण करण्यासाठी यायचे. अनेक निर्गुणी भजनांच्या संहिता कुमारजींना शीलनाथ महाराज संस्थानातून मिळाल्या. आणि शीलनाथ संस्थानातील लिखित प्रतीमध्ये, "तृष्णा तो उने बुझाई" असाच उल्लेख आहे. त्याबद्दल श्रीमती हेस यांची कलापिनी कोमकल्लींशी चर्चा झाली आणि त्यात कलापिनी बाईंनी या वाक्याचा कुमारजींनी लावलेला अर्थ  सांगितला. (मूळ लेखन इंग्रजीत आहे. त्याचे मी मराठीत यथाशक्ती  रुपांतर केले आहे.)


"या ओळी शिवाबद्दल आहेत. तोच शिव ज्याने समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले हलाहल प्राशन केले.  जेंव्हा सुरासुर अमृताची वाट पहात होते तेंव्हा, प्रथम विविध मौल्यवान वस्तू समुद्रातून बाहेर आल्या आणि मग हलाहल आले. हे हलाहल धारण करणे सर्व देवांच्या शक्तीबाहेरचे होते. ते शिवाने आपल्या कंठात धारण केले. म्हणून हलाहल कंठात धारण करणाऱ्या शिवाकडेच आपली तृष्णा शमविण्याची शक्ती आहे. आणि त्याच अनुषंगाने कुंडलिनीला ऊर्ध्वगामी करणे म्हणजे तिचा फास उलटा फिरवणे असा अर्थ आहे."  


श्रीमती हेस यांनी मग निर्गुणी भजनांचे अजून एक प्रसिद्ध गायक श्री. प्रल्हाद तिपनिया यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तर त्यानी कबीरांचा आणि शिवाचा संबंध नाकारला. हे मला अजूनही पटलेले नाही. माझ्या मते हे भजन कुंडलिनी जागृतीच्या प्रवासातील साधकाच्या अवस्थांचे वर्णन करणारे आहे. कुंडलिनी जागृती हा हठयोगाचा भाग आहे. आणि हठयोग्यांचा मूळ पुरुष, "आदिनाथ" म्हणजे भगवान शिव आहे. त्यामुळे हठयोगाचा अभ्यास करणारे कबीर शिवाबद्दल बोलत नसतील असे म्हणणे मला पटले नाही.  पण प्रल्हाद तिपनिया यांनी "तृष्णा नही बुझानी" असा पाठभेद सांगितला. मग श्रीमती हेस यांना बागली गावातील एका घरात १९२८ च्या सुमारास लिहिलेले हस्तलिखित सापडले. ज्यात तिपनिया यांनी सांगितलेला  "तृष्णा नही बुझानी" हा पाठभेद लिहिलेला आहे. हा पाठभेद हेस बाईंना जास्त योग्य वाटला. आणि मला या भजनाची जी संगती लागत होती त्यासाठी मला देखील हाच पाठभेद योग्य वाटला. म्हणून अर्थाच्या शोधात मी या कडव्यापुरता कुमारजींच्या उच्चारापासून दूर जायचे ठरवले आणि बागली गावातील हस्तलिखितात दिलेला पाठभेद प्रमाण मानायचे ठरवले.


आता जेंव्हा मी पाठभेद प्रमाण मानतो आणि माझ्या मनातील संगतीनुसार या कडव्याकडे बघतो तेंव्हा, त्याचा अर्थ मला असा लागतो.


इंद्रिय गम्य सुखांचा उपभोग घेताना मनुष्य सातत्याच्या मागे लागतो. कुठलेही सुखद अनुभव त्याला सातत्याने हवे असतात आणि तेदेखील त्याच्या इच्छेनुसार. सातत्याच्या या हव्यासामुळे नवीन अनुभव घेणे तो विसरतो आणि अविचल होत जातो. हे अविचल होणे म्हणजे मरणे. त्यामुळे शरीरातील चैतन्याचा प्रवास हा गुणांचा गुलाम होतो. आणि अनुभव घेण्याच्या अंतःशक्तीऐवजी बाह्य जगतावर जास्त विसंबून राहतो. त्यामुळे त्याची सगुणाचा उपभोग घेण्याची तृष्णा संपत नाही.


त्यामुळे शेंडीच्या ठिकाणी असणाऱ्या बिंदूतून होणारा विसर्ग म्हणजे जीवन रस कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून, त्या जीवन रसाचे अमृतात रुपांतर करणे विसरतो. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो, हे देखील विसरतो. त्यामुळे हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते. विषयोपभोगाच्या मागे लागल्यामुळे आणि त्याच्या सातत्याचा आग्रह धरल्याने, चिरंतन आनंदाचा अनुभव घेण्याऐवजी तो क्षणिक सुखाच्या गुंत्यात अडकत जातो.

मग यावर उपाय काय? इंद्रियगम्य सुख नाकारावे का? तर माझ्या मते हठयोग आणि कबीर इंद्रियगम्य सुखाला नाकारत नसून, त्याच्या सातत्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी अनुभवांच्या साचलेल्या सारखेपणाला विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने चिरंतन आनंद कुठला? तर टाळूतून शिरून पाठीच्या मणक्याच्या तळाशी वेटोळे घालून वसलेली कुंडलिनी जागृत करून तिला पुन्हा सहस्रार चक्राच्या जागी आणणे. तिथे असलेल्या पोकळीत (ज्याला शरीरांतर्गत गगन किंवा अंतरीक्ष असे म्हटले आहे) तिला स्थिर करायचे आहे. आणि अनुभवांच्या सातत्या ऐवजी अनुभवांच्या तीव्रतेला अनुभवयाचे आहे. प्रत्येक अनुभवात असलेला निर्गुण आणि सगुणाचा परस्परसंबंध अनुभवायचा आहे. गुणाच्या प्रकटीकरणाच्या मोहात न अडकता विशुद्ध गुण अनुभवायला शिकायचे आहे. साखरेच्या प्रेमात न पडता गोडी अनुभवायची आहे. ज्याप्रमाणे डोळे नसलेल्या माणसाची इतर इंद्रिये अधिक टोकदार होतात आणि तो स्पर्श, वास आणि कान यांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो त्याप्रमाणे सर्व इंद्रिये नसताना मनुष्य सर्व गुणांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो. असा विचार त्यामागे असावा. म्हणून मग योगी साधक काय उपाय  करतो ते सांगतात , "उलटी फाँस फंसानी हो जी" म्हणजे कुंडलिनीला उलटे फिरवतो. तिला ऊर्ध्वगामी करतो.

------------------

------------------

Monday, May 16, 2016

निर्गुणी भजने (भाग २.३) सुनता है गुरु ग्यानी - पहिला चरण

------------------

------------------

सुनता है गुरु ग्यानी या भजनावरचा मागचा लेख धृवपदामुळे माझ्या मनात आलेले विचार असा होता. त्यावरील प्रतिक्रियेत माझे मित्र संकेत यांनी फार चांगला संदर्भ दिला. कबीर विणकर होते. हातमागावर चालणारा त्यांचा व्यवसाय. हातमागावर कापड विणताना देखील “झिनी झिनी” आवाज होतअसतो. पूर्वेचे मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजी येथील राहिवासी अभिषेक प्रभुदेसाई यांनी देखील त्याला दुजोरा दिला. आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो. या अंगाने मी कबीरांच्या भजनांचा विचार केला नव्हता.


आता जेंव्हा मी संकेतच्या कमेंटच्या प्रकाशात या भजनाचा मला लागलेला अर्थ पुन्हा पाहिला तेंव्हा तर मी या भजनाच्या अजूनच प्रेमात पडलो. सजीव आणि निर्जीवांच्या आयुष्याचे भरजरी महावस्त्र विणणारा तो निर्गुण, निराकार आणि निनावी विणकर जेंव्हा त्याच्या अदृश्य हातमागावर, उभे आडवे धागे गुंफत असेल, त्यावर आपला अदृश्य धोटा फिरवत असेल तेंव्हा त्या विनाकारण होणाऱ्या विश्वनिर्मितीचा ध्वनी जर कुठला असलाच, तर तो झिनी झिनी असावा असे या कबीर नामक शेले विणणाऱ्या सगुण, साकार विणकराला वाटणे, मला स्वाभाविक वाटले.


व्यवसायाने विणकर. जन्माने, ईश्वर आणि जग यांच्यात संपूर्ण द्वैत मानणाऱ्या इस्लाम धर्माचा बंदा. दक्षिणेतील रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत मत पुढे घेऊन जाणाऱ्या, उत्तरेतील रामानंद स्वामींचा शिष्य. विष्णूच्या श्रीराम या सगुण अवताराचा भक्त. आणि शैव परंपरेतील नाथ संप्रदायाकडे ओढा. भक्तीमार्ग हाच मोक्ष मार्ग असे दर्शवणारा जीवनपट आणि त्याच वेळेला कुंडलिनी जागृती सारख्या हठयोगातील संकल्पनांचे निरुपण करणारे कबीर, मला आयुष्यावर प्रेम करणारे साधक म्हणूनच भेटतात. सगुण - निर्गुण, इस्लाम - हिंदू, पूर्ण द्वैत - विशिष्टा द्वैत, शैव - वैष्णव, भक्ती - योग अश्या परस्परविरोधी विचारधारांचा मेळ स्वतःच्या जीवनात घालणाऱ्या कबीरांना, रोजच्या जगण्यात ऐकू येणारा झिनी झिनी आवाज; विश्व, आपले अस्तित्व आणि त्यांचा परस्परसंबंध यांना जोडणारा वाटला यात नवल ते काय !


आता पहिल्या चरणाकडे वळतो.


पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll


याच कडव्यातील नाद बिंदू या शब्दामुळे मी अडकलो होतो. त्यातल्या नाद शब्दामुळे, मला हे थोडसं बायबल मधल्या "In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God." सारखं वाटत होतं. पण त्याने सुसंगत चित्र तयार होत नव्हतं. मग परळीकरांचे पुस्तक हाती लागले होते.


परळीकर म्हणतात, "प्रथम शून्यातून (आकाशापासून, ब्रह्मरंध्रात) अनाहत नाद ऐकू आला आणि नंतर तेथे अमृताची साठवण केली. संपूर्ण शरीरात अनिर्वचनीय असा अदृश्य परमात्मा व्यापून राहिला आहे." हा भावार्थ वाचून मन शांत झाले नाही तरीही, अलख = अदृश्य, पुरुष = परमात्मा आणि निर्बानी = अनिर्वचनीय, हे शब्दार्थ मात्र चपखल बसले.


अध्यात्मात नाद शब्द ऐकला की अनाहत नादच असावा असे मला उगाच वाटते. आणि अनाहत नाद हा शब्द आल्यावर मला नेहमी ओंकाराची आठवण येते. मग कुठेतरी वाचलेलं आठवलं की हिंदू तत्वज्ञानातदेखील ओंकारापासून विश्व निर्मितीचा सिद्धांत आहे. शोधाशोध केली तेंव्हा आंतरजालावर तैत्तिरीयोपनिषद आणि विशेषतः बृहदारण्यकोपनिषद यात विश्वनिर्मिती बद्दल या कडव्याच्या जवळ जाणारी रचना सापडली.


आधी फक्त ब्रह्म होते. त्याने म्हटले अहस्मि. म्हणजे मी आहे. म्हणून ब्रम्हातून अहंची निर्मीती झाली. (हा अहं म्हणजे ओम असावा असे मी ठरवले.) मग एकटे  असल्याने हे ब्रह्म रमू शकले नाही. त्याने स्वतःतून स्त्री रूप वेगळे काढले. अर्धनारीश्वर इथेच तयार झाला. आणि मग या युग्मातून विश्वनिर्मिती झाली. अश्या अर्थाचा श्लोक बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायाच्या चौथ्या ब्राह्मणात आहे. तर तैत्तिरियोपनिषदातील ब्रह्मानंदवल्ली या भागातील पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात परमात्म्यापासून सर्वप्रथम आकाश, आकाशातून वायू, वायुतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाण्यातून पृथ्वी, पृथ्वीतून वनस्पती, वनस्पतीतून अन्न आणि अन्नातून प्राण जन्माला आले अशी साखळी दाखवली आहे.


हे सगळं वाचायला छान वाटत होतं आणि या सर्वांचा पहिल्या कडव्याशी काहीतरी संबंध आहे असे वाटत होते. पण तो काय ते कळत नव्हते. कारण नाद शब्दाचा ओम च्या अनाहत नादाशी अंधुक संदर्भ लागला तरी बिंदूची उकल होत नव्हती. आणि तो "जमया पानी" चा उल्लेखतर माझ्या धडपडीकडे बघून हसतोय असं मला वाटत होतं.


मग एकदा असंच जाणवलं की ध्रुवपदाचा अर्थ लावताना मी, कुंडलिनी साधनेच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या साधकाला कबीर, ग्यानी गुरु म्हणत आहेत, असा विचार केला होता. पण त्यानंतर पहिल्या कडव्याचा अर्थ लावताना मात्र विविध धर्मातील विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताच्या मागे लागलो होतो. म्हणजे धृवपद व्यक्तीबाबत तर पहिले कडवे पूर्ण विश्वाबाबत अश्या उलट सुलट प्रकारे मी अर्थ लावत होतो. माझ्या अर्थ लावण्यातली विसंगती जाणवताच मी उपनिषदांतून सापडलेली विश्वोत्पत्तीची दिशा, एकट्या व्यक्तीच्या कुंडलिनी साधनेशी कुठे जुळते आहे का, ते शोधायच्या मागे लागलो. आणि मग ऐतरेयोपनिषदातील उल्लेख सापडले.


या ऐतरेयोपनिषदातील पहिल्या अध्यायात तीन खंड आहेत. पहिला खंड सृष्टी उत्पत्ती बद्दल, दुसरा मनुष्य शरीर उत्पती बद्दल तर तिसरा अन्न उत्पत्ती बद्दल आहे. हे वाचताना माझा युरेका क्षण आला. आणि ध्रुवपदापासून बाकीच्या सगळ्या कडव्यांची एकच एक सुसंगती लागू लागली.


पहिल्या अध्यायाचा पहिला खंड म्हणतो, सर्वात प्रथम परमात्मा एका निर्गुण ज्योतीच्या स्वरूपात होता. या ज्योतीला प्रकाश, उष्णता हे देखील गुण नव्हते. मग त्याला विश्वोत्पत्तीची इच्छा झाली. म्हणून त्याने अम्भ (स्वर्ग), मरीची (अंतरीक्ष), मर (पृथ्वी अथवा मर्त्य) आणि आप (जल अथवा पाताळ) या चार लोकांची रचना केली. यातील पृथ्वीलोक आणि अंतरीक्षलोक यांना एकत्रितरित्या हिरण्यगर्भ किंवा सृष्टीचे बीज म्हणतात आणि हा हिरण्य गर्भ पाताळलोकाच्या म्हणजे जलाच्या मध्यावर असतो.


अश्या तऱ्हेने चार लोकांची निर्मिती झाल्यावर मग परमात्म्याने त्यांचे लोकपाल निर्माण करण्यासाठी हिरण्यपुरुष निर्माण केला. त्याची निर्मिती अशी झाली. प्रथम हिरण्यगर्भातून त्या पुरुषाचे मुख तयार झाले. मुखातून वाचा आणि वाचेतून अग्नी तयार झाला. मग नाकपुड्या तयार झाल्या. नाकपुड्यातून प्राण आणि प्राणातून वायू तयार झाला. मग डोळे तयार झाले. डोळ्यातून दृष्टी आणि दृष्टीतून आदित्य (सूर्य किंवा प्रकाश) निर्माण झाला. मग त्वचा तयार झाली. त्वचेतून रोम आणि रोमातून वनस्पती तयार झाल्या. मग हृदय , हृदयातून मन आणि मनातून चंद्र तयार झाला. मग नाभी, नाभीतून अपान आणि अपानातून मृत्यू निर्माण झाला. मग जननेन्द्रिय, त्यातून वीर्य आणि त्यातून पुन्हा आप (चौथ्या लोकाचे तत्व) निर्माण झाले.


मग दुसरा खंड म्हणतो, अग्नी, वायू, प्रकाश अश्या सर्व देवता तयार झाल्या पण त्यांना आपले कार्य करण्यासाठी जडशरीर नव्हते. म्हणून परमात्म्याने मानवी शरीराची रचना केली. प्रत्येक देवाने या शरीरात आपापले स्थान घेतले. अग्नी - मुखातील वाक इंद्रियात, वायू - प्राणवायूच्या रूपाने नाकपुड्यात, सूर्य (किंवा प्रकाश) - दृष्टीतून डोळ्यात, दिशा - कानात, वनस्पती - त्वचेवरील रोमात, चंद्र - हृदयात स्थित असलेल्या मनात, मृत्यू - अपान वायूच्या रूपाने गुदमार्गातून प्रवेश करून नाभीत, तसेच आप किंवा जल देवता वीर्य रूपाने जननेन्द्रियात जाउन बसले.


म्हणजे, निर्गुणातून सगुणाची निर्मिती कशी होते? या प्रश्नाचे उत्तर देताना ऐतरेयोपनिषद जे सांगते त्याचे सार असे की, निर्गुण निराकार परमात्म्याच्या इच्छेमुळे अम्भ, अंतरीक्ष, मर आणि आप हे चार लोक तयार होतात.  त्या चार लोकातील अम्भ लोक (स्वर्ग लोक) दूर राहतो. पाताळ किंवा जल किंवा आप लोक आधार  बनतो. त्याच्या मध्यावर मर आणि अंतरीक्ष हे लोक उभे राहतात. त्या दोघांना एकत्रितरीत्या हिरण्यगर्भ म्हटले जाते. पण हे चारही लोक अजून निर्गुण असतात.  त्यात गुणांचा संचार होण्यासाठी हिरण्यगर्भातून हिरण्यपुरुष निर्माण होतो. निर्गुण हिरण्यपुरुषाचे निर्गुण अवयव तयार होतात. मग त्या निर्गुण अवयवातून त्याचे प्रयोजन करणारा एकेक गुण तयार होतो. तेच हे लोकपाल. अग्नी, वायू, प्रकाश, वनस्पती (याचा अर्थ मी वस्तूंचे गुण असा लावला), चंद्र(कायम कमी जास्त होण्याच्या हिंदोळ्यावर चंचल रहाणारे मन), मृत्यू आणि वीर्यरूपी बीजाला सामावून घेणारे आप किंवा जल, हे या हिरण्यपुरुषाच्या अवयवातून निर्माण होणारे विविध गुण किंवा लोकपाल आहेत. यातील आप हा हिरण्यगर्भाला तोलून धरणारा लोक आहे आणि हिरण्य पुरुषाच्या अवयवातून तयार होणारा एक गुण म्हणजे लोकपाल देखील आहे. आता निर्गुणातून गुण तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण होते पण या गुणांना आपले प्रयोजन पूर्ण करण्यासाठी जडसृष्टीची आणि जड शरीराची गरज असते म्हणून मग ज्या क्रमाने गुण (लोकपाल) निर्गुणातून (म्हणजे हिरण्यपुरुषातून, जो पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्रित हिरण्यगर्भातून निर्माण झालेला असतो) तयार होतात त्याच्या उलट क्रमाने गुणरूपी लोकपालातून मनुष्याचा जडदेह (मातेच्या गर्भात) तयार होतो; अशी ही कल्पना आहे.


पण या मनुष्य शरीरात अजून चेतना नसते. म्हणजे निर्गुणातून सगुण तयार तर झाले पण त्यांचा आपापसात सांधा बसलेला नसतो. म्हणून हा गुणयुक्त जडदेह प्राणहीन किंवा चेतनाहीन असतो. चेतना म्हणजे ज्याच्या इच्छेने विश्वाचे हे महावस्त्र विणले जाते तो निर्गुणी परमात्मा. तो परमात्मा किंवा ती चेतना जोपर्यंत या जड देहात प्रवेश करत नाही तोपर्यंत सर्व गुणांना आपले कार्य करता येणे अशक्य असते.


चेतना आपल्या शरीरात कशी प्रवेश करते त्याचे वर्णन तिसऱ्या खंडात आहे. आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी या लोकपालांना आपण पंच महाभूते म्हणून ओळखतो. ही पंचमहाभूते इतर लोकपालांबरोबर मनुष्य देहाची आणि सृष्टीची रचना करण्यास कारणीभूत होतात. सर्व लोकपाल, मातेच्या उदरातील गर्भाच्या जड देहात आपापली जागा घेतात. आणि मग या शरीरात परमात्मा शिरतो. कुठून? तर लहान मुलाच्या डोक्यावर जो मऊ भाग असतो ज्याला आपण टाळू म्हणतो तिथून. कुंडलिनी साधकांच्या दृष्टीने, परमात्मा सहस्रार चक्रातून किंवा ब्रह्मरंध्रातून शरीरात प्रवेश करतो. आणि शरीरात चैतन्य सळसळू लागते. विविध इंद्रियांत आपापली जागा घेऊन बसलेल्या लोकपालांना हे चैतन्य वापरून आपले गुण प्रदर्शन किंवा आपली ताकद वापरता येते.


हे वाचून झाल्यावर नाद म्हणजे परमात्म्याची प्रकाशातीत असल्याने दिसू न शकणारी म्हणून अदृश्य किंवा अलख ज्योत. जिचा नाद अनाहत म्हणजे कुठल्याही आघाताशिवाय होत असतो. ज्याला आपण आपल्या वाचेने प्रकट करू शकत नाही म्हणून तो अनिर्वचनीय नाद. वाणी नसलेला नाद, निर्बानी नाद. बिंदू, म्हणजे चार लोकातील अंतरीक्ष आणि मर यांचा मिळून बनलेला हिरण्यगर्भ. पीछे जमया पानी म्हणजे, चौथा आपलोक ज्याच्या मध्यावर हिरण्यगर्भ स्थिर असतो, ही संगती लागली. सब घट पूरण, म्हणजे मातेच्या उदरातील पूर्ण वाढ झालेले (सर्व लोकपालांनी आपापली स्थाने घेऊन स्थिर झालेले) गर्भ. आणि त्यात सहस्रार चक्रातून शिरणारी परमेश्वरी चैतन्य शक्ती म्हणजे अलख पुरुष निर्बानी अशी संगती लागून, पहिल्या कडव्याच्या अर्थाचा माझा शोध पुरा झाल्याचे समाधान मला मिळाले. यात मी कुठे चुकलो असेन तर मला दुरुस्त करा.


आणि हो, आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार, गर्भ कधी सजीव गणला जातो? सर्व अवयव विकसित झाल्यावर की अंड फलित झाल्यावर ? या प्रश्नांच्या अंगाने कृपया वरील लिखाण वाचू नका. आधुनिक विज्ञानाने आपल्या हाती आलेल्या माहिती नुसार ते तितकेसे चपखल बसत नाही याची मला कल्पना आहे.

पण ऐतरेयोपनिषदाच्या काळात हे विज्ञान उपलब्ध नसताना, निर्गुण निराकारातून सगुण साकार सृष्टीची निर्मिती कशी होत असेल याबाबत आधी गुणरहित चैतन्य, मग त्याच्या इच्छेने क्षेत्र (लोक), मग हिरण्यगर्भ, मग हिरण्यपुरुष, मग त्याचे अवयव, त्या अवयवातून गुण (लोकपाल), मग गुणांच्या प्रकटनासाठी मानवशरीर तयार होताना पुन्हा उलटा प्रवास करीत, गुणातून शरीराचे अवयव आणि त्या शरीरात पुन्हा अवतरणारे चैतन्य ही कल्पना कवी कल्पना म्हणून बाजूला सारायची म्हटली तरी या कवीची कल्पना शक्ती प्रचंड असावी हे मानायलाच हवे.


आणि इतका सगळा विचार केवळ दोन ओळीत मांडणाऱ्या कबीराला देखील त्याच्या क्षेत्रातील गृहीतकांचा ग्यानी गुरु म्हटल्याशिवाय राहवत नाही. आता पाहिजे तर पुन्हा वाचा हे पहिलं कडवं,


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

------------------

------------------

Sunday, May 8, 2016

निर्गुणी भजने - (२.२) सुनता है गुरु ग्यानी - धृवपद

------------------

------------------
सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती  ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता. आणि एकाच भजनातील वेगवेगळी रूपके, लेखकाने दिलेला अर्थ वाचूनही परस्परविसंगत वाटत होती.  हे जाणवल्यावर मी पुस्तकातील सगळी भजने कोणकोणत्या प्रकारात बसू शकतात त्याचे वर्गीकरण करण्याच्या मागे लागलो. त्यातून मला जाणवलेले निर्गुणी भजनांचे तीन प्रकार, मी दुसऱ्या लेखाच्या सुरवातीला मांडले आहेत. सुनता है गुरु ग्यानी हे भजन त्यातील पहिल्या प्रकारात (ज्यात साधनेचे वर्णन आहे आणि हठयोग साधनेच्या तंत्राचे निरुपण आहे) चपखल बसले, आणि मग ते भजन मला त्याचा थोडा वेगळा अर्थ सांगू लागले. आणि वेगवेगळ्या रुपकांची थोडी अधिक सुसंगती मला लागू लागली.


भजनाचा मला उमगलेला अर्थ सांगण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करतो की यात वर्णन केलेल्या कुंडलिनी आणि तिच्या प्रवासावर माझा अजून तरी विश्वास बसलेला नाही. जे इंद्रियगम्य नाही त्यावर विश्वास ठेवायला माझी बुद्धी तयार होत नाही. पण जे इंद्रियगम्य नाही ते अस्तित्वातच नाही हे म्हणायला माझे मन तयार होत नाही. त्यामुळे माझी निर्गुणी भजनांची अर्थयात्रा श्रद्धायुक्त अंतःकरणाने नसून कुतूहलपूर्ण मनाने आहे.


मला वाटते या भजनात कबीर, काय करा ते सांगत नसून काय होते ते सांगत आहेत. संपूर्ण भजन सामान्य माणसांनी संसाराच्या तापत्रयांपासून मुक्ती साठी काय करावे त्याचे मार्गदर्शन करत नसून, कुंडलिनी जागृतीची साधना करणाऱ्याला काय काय अनुभव येतात, त्याला कुठल्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दल मार्गदर्शन करते.


या भजनाचे धृवपदच बेभान करणारे आहे. विश्वरूप दर्शन घडवणारे आहे. तयारी न करता पाहिले तर भीतीने गाळण उडवणारे आहे आणि जाणीवपूर्वक पाहिले तर अनासक्त प्रेमाचा उद्भव करणारे आहे.


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


कुंडलिनी साधनेच्या अंतिम टप्प्याला पोहोचलेल्या साधकाला कबीर ग्यानी गुरु म्हणतात. आणि हा ग्यानी गुरु एकाच वेळी स्थूलदेहात (दृष्य देहात) आणि सूक्ष्म देहात (चेतना देहात) स्वतःला अनुभवू शकतो. त्याच्या सूक्ष्म देहातील मस्तकाच्या भागाला (जिथे सहस्त्रार चक्र असते) कबीर "गगन" म्हणतात. आणि या गगनात अखंडितरित्या एक “शांत आवाज” होत असतो. त्या आवाजाचे वर्णन करण्यासाठी, कबीर झीनी झीनी असा शब्द वापरतात. हा कबीरांचा आवडता शब्द आहे. आणि त्याला ते अनेक संदर्भात वेगवेगळ्या भजनात वापरतात. कधी आवाजासाठी तर कधी चादरीसारख्या भासणाऱ्या जीवनाच्या वस्त्रासाठी. त्यातून त्यांना सांगायचे असते एक असलेपण आणि नसलेपण. कर्ता - कारणविरहीत अस्तित्व.  सद्गुण - दुर्गुण विरहीत अस्तित्व. गुणातीत, निर्गुण अस्तित्व.


अत्यंत जवळून तेजः पुंज प्रकाश दिसावा पण त्याच्या उष्णतेची धग न लागावी. दिपून न जाता त्या प्रकाशाकडे, डोळे पूर्ण उघडे ठेवून पहाता यावे असा गुणातीत, निर्गुणी शांत प्रकाश. झीनी झीनी प्रकाश. आवाज तर आहे पण त्यामागे कुठलाही नाद, लय, आघात, ताण, सूर नाही. तो स्वयंभू आहे. त्याचा गोंगाट नाही, गोंधळ नाही, तीव्रता नाही, कोमलता नाही, चढ नाही, उतार नाही, मधुरता नाही. असा शांत आवाज. झीनी झीनी आवाज.


जिथे बाहेरील जगाचे सर्व आवाज थांबावेत आणि त्या शांततेत आपल्या अस्तित्वाचा आवाज ऐकू येऊ लागावा. आणि त्याची इतरांच्या अस्तित्वाशी असलेली सुसंगती लागून त्या सर्वांचा कोलाहल न होता शांतता जाणवावी. तो आवाज म्हणजे झीनी झीनी आवाज.


रोजच्या जीवनात आजू बाजूला असणाऱ्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूचा आवाज होत असतो किंवा ती आवाज करत असते. वाऱ्याची शीळ आणि त्याचे घोंगावणे. समुद्राच्या लाटांची कलकल आणि त्याच समुद्राची गाज. झाडाच्या पानांची सळसळ. वाटेत येईल ते गिळंकृत करत पुढे चाललेल्या वणव्याचा ल्हा ल्हा असा आवाज. झाडे उन्मळून पडताना किंवा वीज कोसळताना किंवा बर्फाचे किंवा दगडांचे कडे कोसळताना त्यांच्या कडाडण्याचा आवाज. मेघांच्या गरजण्याचा, पावसाच्या टपटपण्याचा आवाज. झऱ्यांच्या वाहण्याच्या खळखळीचा आवाज. वाळवंटातील वाळूचा सरकण्याचा आवाज. प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे चीत्कार, कूजन, डरकाळ्या, गुरकावणे, पाणी पिताना केलेला लप् लप् आवाज. दबा धरून बसलेल्या श्वापदाच्या श्वासांचा आवाज, भेदरून उधळलेल्या प्राण्यांच्या खुरांचा आवाज. शिकार करणाऱ्याच्या भुकेचा आवाज, शिकार होणाऱ्याच्या मृत्यूभयाच्या आकांताचा आवाज. शाकाहारी प्राण्यांनी चरताना झालेला हलका आवाज तर मांसाहारी प्राण्यांनी क्षुधा शांत करताना झालेला हाडे फोडण्याचा आवाज. माणसांचे हसणे, रडणे, चिडणे, प्रेम करणे, भांडणे, कण्हणे या साऱ्यांचा आवाज.


नियमबद्ध रीतीने एका रूपातून दुसऱ्या रुपात परिवर्तीत होणाऱ्या निर्जीव सृष्टीच्या परिवर्तनाचा आवाज आणि वेगवेगळ्या सजीवात वेगवेगळ्या गतीने होत असलेल्या हृदयाच्या धडधडीचा आवाज. एकाच वेळी तऱ्हे तऱ्हेच्या आवाजांचा सृष्टीतला कोलाहल. दुरून पहिला तर कुणाला भेसूर किंवा बीभत्स देखील वाटू शकेल. पण ज्ञानी साधकाला त्यातील एकरूपता जाणवते. अस्तित्वाचे नवीन रूप धारण करणे आणि जुने रूप सोडून देणे दिसते.

प्रसव वेदनेने तळमळणाऱ्या स्त्रीचे रडणे, तान्ह्या बाळाने जन्मतःच रडणे, जिवलग अकाली मृत्यू पावल्यावर त्याच्या आप्तेष्टांनी रडणे आणि सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून झालेल्या व्यक्तीच्या अंतानंतर त्याच्या आप्तेष्टांचे मूक रुदन यातील एकत्व त्याला जाणवते. अश्या या सर्वव्यापी आवाजाचे विश्वरूप दर्शन झाल्यावर ग्यानी साधक त्या अखंड आवाजाला ऐकत राहतो. या आवाजाला कबीर म्हणतात झीनी झीनी आवाज.
------------------

------------------

Sunday, May 1, 2016

निर्गुणी भजने - (२.१) सुनता है गुरु ग्यानी

------------------

------------------
निर्गुणी भजनांची रचना जास्त करून कबीरजींच्या आणि गोरक्षनाथांच्या नावावर आहे. सर्व भजने गुरु शिष्य परंपरेचे गुणगान करणारी आहेत आणि नाथपंथीय भाषेचा, शैव संप्रदायाचा या भजनांवरचा प्रभाव पाहता, कबीरजींचा ओढा इस्लाम पेक्षा नाथपंथाच्या तंत्र मार्गाकडे आणि कुंडलिनी जागृतीच्या हठयोगी मार्गाकडे होता असे वाटते.


सगुण साकाराचे गुणगान न करता निर्गुण निराकाराचे आणि त्याच्याशी असलेल्या सर्वांच्या ऐक्याची ग्वाही देतात म्हणून या भजनांना निर्गुणी भजने म्हणतात. बहुतेक निर्गुणी भजने, देवाप्रतीच्या भक्तीचे आणि देवाच्या शक्तीचे, कृपेचे किंवा प्रेमाचे वर्णन करण्याऐवजी स्वतःला ओळखण्यासाठी दिलेली साद आहेत. ज्ञानेंद्रियांतून होणाऱ्या जगाच्या जाणीवेतून आणि मनाच्या अवस्थांतून उद्भवणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर रूपी भावनांच्या कल्लोळातून स्वतःला कसे सावरावे आणि आपल्या मूळ स्वरूपाकडे कसे पोहोचावे याबद्दल मार्गदर्शन करतात.

मला निर्गुणी भजनांचे तीन प्रकार दिसतात.


१) ज्यात साधनेचे वर्णन आहे आणि हठयोग साधनेच्या तंत्राचे निरुपण आहे.
२) ज्यात भावनांच्या कल्लोळात सापडलेल्या मनाला अंतिम सत्याची करून दिलेली आठवण आहे.
३) ज्यात आपल्या गुरुची किंवा परमेश्वराची करुणा भाकली आहे.


मी पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या भजनांबद्दल प्रथम लिहीतो. माझा आणि योगाचा संबंध, 'घोरत केलेले शवासन कितीही  वेळ करू शकणे', इतकाच आहे आणि हठयोगाशी तर दुरूनही नाही, त्यामुळे माझे संपूर्ण लिखाण हे प्रचीती नसलेल्या आणि साधनेची सुरवात देखील न केलेल्या अतिसामान्याचा कल्पनाविलास आहे, हे नमूद करून पहिले भजन तेच घेतो जे बाबांना यु ट्यूब वर ऐकवले होते.


भजन असे आहे,


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


वहां से आया पटा लिखाया, तृष्णा तो उने बुझाई बुझाई |
अमृत छोड़सो विषय को धावे, उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


गगन मंडल में गौ बियानी, भोई पे दई जमाया जमाया |
माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत बपरानी हो जी … ll 3 ll


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


बिन धरती एक मंडल दीसे, बिन सरोवर जूँ पानी रे
गगन मंडलू में होए उजियाला, बोले गुरु-मुख बाणी हो जी ll 4 ll


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे |
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी ll 5 ll


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


कहत कबीरा सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll


सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी


या भजनातले किंचित ओळखीचे शब्द होते इडा पिंगला नारी. कबीरजी बोलीभाषेचा वापर करतात. त्यामुळे नारी म्हणजे नाडी असणार हे समजून मी इडा पिंगला या सुखमन ( सुख देणाऱ्या) नाडी आहेत असा अर्थ लावला होता. पण ते तितकेच.  


काही वर्षापूर्वी बायकोच्या आग्रहाखातर अल्पावधीसाठी योगासनांच्या वर्गाला गेलो होतो. तिथल्या योगाचार्यांच्या बोलण्यात आले की आपल्या शरीरात ७२,००० नाडी असतात (याचे नाड्या असे अनेकवचन अर्थाला मारक ठरते असे मला वाटते). त्यातल्या तीन प्रमुख नाडी म्हणजे इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी. मग एकाएकी जाणवले की सुनता है गुरु ग्यानी मध्ये पण  कुमारजींच्या तोंडून कबीरजी 'सुखमन' म्हणत असले तरी त्या बोलीभाषेतल्या सुखमनचा अर्थ सुषुमन किंवा सुषुम्ना आहे. इथपर्यंत येऊन माझी गाडी अडकली. माझी योगासनांमधली प्रगती पाहून माझे शिक्षक लवकर विरक्तीच्या मार्गावर जाणार असे दिसू लागले म्हणून मी तिथे जाणे सोडले. पण ती ७२,००० नाडीची गोष्ट डोक्यात बसली होती. मग मी प्राणायामातले नाडीशोधन नाही जमले तरी, निराळ्या अर्थाने नाडीशोधनाच्या मागे लागलो.  


मग हे कळले की या इडा आणि पिंगला नाडी म्हणजे प्राणशक्तीच्या संचाराचे घाटरस्ते आहेत तर सुषुम्ना नाडी म्हणजे सरळसोट एक्स्प्रेस हाय वे आहे. या प्राणशक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. आणि ती जागृत झाली की साधकाला अवर्णनीय आनंदाचा प्रत्यय येतो. मग, दीक्षा देताना ओशो शिष्याच्या भुवयांच्या मध्ये आपली दोन बोटे टेकवत आहेत असे छायाचित्र पाहिलेले आठवले. त्याचे वर्णन 'शक्तिपात' असे वाचलेले आठवले. आणि साधनेशिवाय, तात्पुरत्या कालावधीसाठी कुंडलिनी जागृत करण्याचा तो एक बाह्य मार्ग आहे हे कळले. त्याशिवाय कायम स्वरूपी कुंडलिनी जागृत करण्यासाठी हठयोगातील खेचरी मुद्रेचा अभ्यास किंवा प्राणायामातील मूल बंध, उड्डीयान बंध, जालंधर बंध आणि कुंभक यांचा नियमित सराव करावा लागतो. त्याशिवाय सद्गुरुचे मार्गदर्शन असावे लागते, अशी माहिती मिळाली.


कुंडलिनीचे कोडे शब्दबद्ध वर्णनाने सुटते आहे असे वाटत होते. पण अजून मनाचे पूर्ण समाधान होत नव्हते. वेळ मिळेल तसा आणि जे मिळेल ते वाचत  होतो. त्यातून हे कळले की, त्या ७२,००० नाडीमध्ये म्हणजे डॉक्टर जी नाडी मोजतात ती येत नाही. तर या ७२,०००० नाडी आपल्या सूक्ष्मदेहात असतात. आणि कुंडलिनी शक्ती देखील सूक्ष्मदेहात असते. तिचे स्थान आणि तिचा प्रवास आपल्या शरीराच्या दृश्य अवयवांच्या नावांचा संदर्भ देऊन सांगितला तरी तो चालू असतो सुक्ष्म देहात.


मग हे सूक्ष्म देह किंवा चेतना देह प्रकरण काय आहे ते शोधायच्या मागे लागलो. जसे आपल्या दृष्य देहात चयापचयाचे अंतर्गत अवयव, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, सूत्रसंचालन करण्यासाठी मेंदू, रक्तवाहिन्यांचे आणि चेतापेशींचे जाळे असते; तसेच या सूक्ष्म देहात प्राणशक्तीच्या संचारासाठी ७२,००० नाडींचे जाळे असते. नाडी म्हणजे रस्ते हे विसरायचे नाही. दृष्य शरीरातील विविध बिंदुंजवळ या नाडी एकमेकांना विळखे घालतात. त्याला चक्र असे म्हणतात. त्यामुळे शरीरात अनेक चक्र असतात. पण त्यातील सात चक्र महत्वाची मानली जातात. सुषुम्ना नाडी आपल्या पाठीच्या मणक्याच्या खालच्या टोकापासून ते डोक्यावरील टाळूपर्यंत सरळ जाते  तर इडा आणि पिंगला तिला नागमोडी विळखे घालत शरीराच्या अधोभागातून ऊर्ध्व भागाकडे  जातात. या उर्ध्वगामी प्रवासात या तीनही नाडी एकमेकांना सात ठिकाणी विळखे घालतात. तीच ही सप्त चक्रे. त्यांची स्थाने सांगताना शरीराच्या समोरच्या बाजूच्या अवयवांचा उल्लेख केला असला तरी ती ही सर्व चक्र सूक्ष्मदेहात, पाठीच्या मणक्याच्या जवळ असतात हे लक्षात ठेवायचे.


सर्वात खाली माकडहाडाजवळ मूलाधार चक्र (इथे कुंडलिनी साडेतीन विळखे घालून वसते), त्याच्यावर जननेंद्रियाजवळ  स्वाधिष्ठान चक्र, नाभीजवळ मणिपूर चक्र, हृदयाजवळ अनाहत चक्र, कंठाजवळ विशुध्द चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि सर्वात वर डोक्याच्या टाळू जवळ जिथे सुषुम्ना नाडी संपते तिथे सहस्रार चक्र आहे असे हठयोग सांगतो.  हे सगळे मला किती पटले तो भाग सोडला तरी याचा सांधा, 'सुनता है गुरु ग्यानी' शी जुळवायला मदत झाली ती सुखटणकरांच्या पुस्तकाची.


पण त्यातही पहिल्या कडव्यातले नाद बिंदू चे कोडे काही सुटत नव्हते. मग एकदा वाचनात आले की, सहस्रार चक्राच्या खाली आणि आज्ञा चक्राच्या वर, डोक्यावर जिथे शेंडी ठेवली जाते त्या स्थानाला बिंदू असे म्हणतात. तिथून बिंदू विसर्ग होत असतो, म्हणजे जीवन रस पाझरत असतो. कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून त्याचे अमृतात रुपांतर करता येते. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो. हे वाचताना मला ज्ञानोबा माउलींच्या चरित्रातील १४०० वर्षे जगलेले हठयोगी चांगदेव आठवले. सामान्यांना विशुध्द चक्र वापरून बिंदू विसर्गाचे अमृत कसे करावे ते कळत नाही म्हणून त्यांच्या बाबतीत हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते.

इथ पर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर, 'सुनता है गुरु ग्यानी' च्या अस्पष्ट रित्या प्रकट होणाऱ्या अर्थाने गोंधळ उडवला असून देखील कुमारजींच्या विलक्षण स्वराने  मला जसे या भजनाशी बांधून ठेवले तसेच तुम्हालाही बांधले आहे हे स्पष्ट आहे. आणि मला सख्य करण्यासाठी, प्रकट झालेल्या शब्दामागील मूळ विचार, भावना आणि अनुभूती शोधण्याचे समान व्यसन असलेले मित्र मिळालेत याचा आनंद आहे. पण मला वाटते, ज्यांचे कुठलेही प्रमाण देणे मला शक्य नाही अश्या अमूर्त संकल्पना असलेला हा भाग खूप लांबला आहे, म्हणून इथेच थांबतो आणि पुढील भागात या भजनाचा मला लागलेला अर्थ लिहितो.  मी गाण्याची लिंक देतो आहे. माझा पुढचा भाग लिहून होईपर्यंत या उत्कट शब्दसुरांचा आनंद तुम्ही पण घ्या. कदाचित, मूळ अर्थाकडे माझ्यापेक्षा अधिक जवळ जाणारा अर्थ तुम्हाला जाणवेल.------------------

------------------