------------------
------------------
दुसऱ्या कडव्यावरच्या माझ्या लेखनावर प्रतिसाद देताना एका मित्राने "तृष्णा तोउ नै बुझानी" असा अजून एक पाठभेद सांगितला. तो शब्दशः कुमारजींच्या आणि परळीकरांच्या संहितेच्या जवळ जाणारा आहे. श्री प्रल्हाद तिपनिया आणि बागली गावातील हस्तलिखित यांच्याशी तो शब्दशः जुळणारा नसला तरी त्याचा अर्थ मात्र तिपनीया यांच्या पाठभेदाशी जुळणारा आहे आणि मला लागलेला अर्थ देखील त्याने अजून बळकट होतो.
जीवाचा देहजन्म, त्याचे नामकरण, त्याचा इंद्रियगम्य सुखांचा हव्यास आणि त्यांच्या सातत्याची ओढ, त्यामुळे न संपणारी तृष्णा आणि या तृष्णेवर विजय मिळवून अक्षय सुखाचा आनंद घेण्यासाठी, अधोमुख कुंडलिनीला ऊर्ध्वमुख करून तिचा उलटा प्रवास करवणारा साधक यांच्याबद्दल कबीर सांगत आहेत, असा त्या कडव्याचा अर्थ मी लावला होता. आता तिसऱ्या कडव्याकडे वळतो.
गगन मंडल में गौ बियानी, भोई पे दई जमाया जमाया |
माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत बपरानी हो जी … ll 3 ll
डॉ परळीकरांच्या पुस्तकात याचा जो अर्थ दिला आहे तो तपशीलाच्या थोड्याफार फरकाने मला जवळपास पटला आहे. परळीकर म्हणतात, "आकाशरूपी मस्तकात इंद्रिये व्याली म्हणजे त्यांनी इच्छांना जन्म दिला आणि त्यांनी जमिनीवरच अनेक संकल्प केले. या जगात जे सार तत्व (तत्वमसि) आहे ते संतांनी आत्मसात केले आणि असारतत्व म्हणजे माया ही जगात वाटली गेली."
विश्वाचे मूळ इच्छा. आधी निर्गुण निराकाराला स्वतःला अनुभवायची इच्छा झाली. त्यासाठी गुणांचे आणि आकाराचे अस्तित्व असणे महत्वाचे होते. म्हणून मग चार लोक, त्यातून हिरण्यगर्भ, त्यातून हिरण्यपुरुष, त्याची इंद्रिये, इंद्रियांचे प्रयोजन पूर्ण व्हावे म्हणून लोकपालरुपी गुण अशी एक साखळी निराकारात पूर्ण होते. आकार घेण्यासाठी जड कुठून येते त्याचे पुरेसे समाधानकारक उत्तर न देता मग याच्या अगदी उलट साखळी आपल्या साकार जीवनात तयार होते.
मला ही कल्पना जशी समजली आहे ते सांगण्यासाठी तीन उदाहरणे देतो.
१) हिरण्यपुरुषाचे डोळे उत्पन्न होतात. त्यानंतर डोळे आहेत म्हणून दृष्टी उत्पन्न होते. मग दृष्टी आहे म्हणून प्रकाश उत्पन्न होतो आणि मग प्रकाश आहे म्हणून आदित्य / सूर्य उत्पन्न होतात. अशी एक साखळी पूर्ण झाली की दुसरी साखळी जीवाच्या जडदेहाच्या असते. आता सूर्य तयार झालेले असतात. त्यांचा प्रकाश देखील असतो, आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी जड देहात डोळे निर्माण होतात. किंवा,
२) हिरण्यपुरुषाचे मुख उत्पन्न होते. मग मुख आहेत म्हणून वाणी उत्पन्न होते. वाणी आहे म्हणून वाणीचे इंद्रिय तयार होते. ही निराकाराची साखळी पूर्ण होऊन विश्वोत्पत्ती झाली की प्रत्येक जड देहात वाणीचा अनुभव घेण्यासाठी वाणीचे इंद्रिय तयार होते. किंवा,
३) हिरण्यपुरुषाच्या नाकपुड्या उत्पन्न होतात. मग नाकपुड्या आहेत म्हणून श्वास उत्पन्न होतो. श्वास आहे म्हणून प्राणवायू उत्पन्न होतो. ही निराकाराची साखळी पूर्ण झाल्यावर, प्रत्येक जड देहात या प्राणवायूचा अनुभव घेण्यासाठी नाकपुड्या तयार होतात.
आता ज्याचा अनुभव घ्यायचा तो प्रकाश, ध्वनी किंवा प्राणवायू तयार झाला. ज्याच्या सहाय्याने अनुभव घ्यायचा ती इंद्रिये तयार झाली. इतके सगळे झाले की मग अनुभव घेण्यासाठी तो निर्गुण निराकार पुरुष, टाळूतून या सगुण साकार जडदेहात प्रवेश करतो. आणि मग इंद्रियगम्य सुख अनुभवतो. स्वतःच स्वतःला स्वतःच्या सहाय्याने अनुभवतो.
ज्याला निर्गुण निराकाराची ही लीला कळते तो इंद्रियांच्या उपभोगात रमण्याऐवजी आपले जडदेहातील अस्तित्व मूळ अस्तित्वाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. सातत्याचा हव्यास न करता, जीवनाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देतो. अनुभवांच्या वैविध्यात सुख दुःख न शोधता, अस्तित्वाचे कारण समजल्यामुळे निर्गुण निराकाराची सगुण साकार बासरी होतो. त्यातून निर्गुणाचे सूर वाहू देतो. लीला उपभोगतो पण लीलेत गुंतून पडत नाही. संसाराचे तत्वमसि हे सार कळून चुकल्याने परमेश्वराकडे,"माझे सुख वाढव किंवा दुःख कमी कर" अश्या मागण्या करण्यात त्याला रस उरत नाही. त्याच्या विचारांच्या घुसळणीमुळे, त्याच्या साधनेमुळे जणू जीवनरुपी दुधातले सत्वरुपी लोणी त्याला मिळालेले असते. पण साधक नसलेला सामान्य माणूस मात्र स्वतः या घुसळणीमध्ये अडकून सुद्धा परमेश्वराशी असलेले आपले अद्वैत ओळखू शकत नाही. तत्वमसि चा बोध न झाल्याने, तो घुसळणीमध्ये तयार होणारे लोणी सोडतो आणि त्या तुलनेत निसत्व असणाऱ्या, उरल्या सुरल्या ताकाला जवळ करतो. अनुभवांच्या वैविध्याऐवजी सातत्याच्या मागे लागतो. बासरीतून निघणाऱ्या सुरांच्या वैविध्याचा आनंद घेण्याऐवजी एकाच सुराच्या मोहात पडून एकसुरी होतो. आणि शेवटी सुखाच्या सातत्याच्या मागे लागलेला माणूस सातत्याने दुःखाचा अनुभव घेत राहतो.
वरील विचार लिहिताना, विशेषतः, "स्वतःच स्वतःला स्वतःच्या सहाय्याने अनुभवतो" हे वाक्य लिहिताना माझा मीच थरारलो. वाटले की हा विचार माझ्या अनुभवांच्या व्याप्तीपेक्षा खूपच मोठा आहे. म्हणून लगेच गुगलवर "He experiences himself through himself" असे शोधले तेंव्हा अश्याच शब्दात पण वेगळ्या भावनेने आणि वेगळ्या अर्थाने अल्बर्ट आईनस्टाईनने लिहिलेले एक वाक्य मिळाले. वर्ल्ड ज्युईश कॉंग्रेस चे पॉलिटीकल डायरेक्टर असलेले श्री. रॉबर्ट मार्कस यांचा मुलगा पोलिओमुळे दगावल्यानंतर त्यांच्या सांत्वनासाठी १२ फेब्रुवारी १९५० रोजी पाठवलेल्या पत्रात आईनस्टाईन म्हणतात, "A human being is a part of the whole, called by us "Universe," a part limited in time and space. He experiences himself, his thoughts and feelings as something separate from the rest—a kind of optical delusion of his consciousness. The striving to free oneself from this delusion is the one issue of true religion. Not to nourish it but to try to overcome it is the way to reach the attainable measure of peace of mind."
निर्गुण निराकार पुरुष सगुण साकाराला वापरून आपली लीला रचतो, अश्या अर्थाचे माझे वाक्य, साधना म्हणजे काय? याचा गंध देखील नसलेल्या आणि शब्दांच्या अर्थामागे धावणाऱ्या अनुभवशून्य माणसाच्या शब्दांचा केवळ फुलोरा आहे तर आईनस्टाईनचे वाक्य म्हणजे दुसऱ्या महायुद्धात आपल्या लाखो बांधवांचा संहार सोसणाऱ्या एका भौतिकशास्त्रज्ञाने आपल्याच एका बांधवाच्या वैयक्तिक दुःखावर दिलेली सहृदय प्रतिक्रिया आहे. मानवाच्या मनःशांती च्या प्रवासासाठी केलेले मार्गदर्शन आहे. त्यामुळे, या वाक्याने आणि ते आईनस्टाईनचे असल्याने मला अतिशय आनंद झालेला असला तरी, मी निर्गुणी भजने आणि आईनस्टाईन यांचा संबंध लावत नाही आहे. केवळ त्याचा अंधुक संदर्भ मला लागला आणि तो मला आवडला म्हणून मी तो नोंदवून ठेवला आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे, अशी विनंती करतो आणि पुन्हा तिसऱ्या चरणाच्या मला लागलेल्या अर्थाकडे वळतो.
तिसऱ्या चरणाचा अर्थ समाधानकारक लागला होता. पण यात, व्यवसायाने विणकर असलेल्या कबीरांनी, गाईचे, दुधाचे, लोण्याचे आणि ताकाचे रूपक का वापरले असेल? त्याचा विचार करत होतो. आणि एकदम आठवली ती कामधेनू. भारतीय पुराणात मनात येतील त्या इच्छा पूर्ण करून देणारी शक्ती म्हणजे कामधेनू. काही ठिकाणी तिला अमृतमंथनातून बाहेर आलेले रत्न म्हटले आहे तर काही ठिकाणी तिला दक्षाची पुत्री, काही ठिकाणी प्रजापतीची पुत्री म्हटले आहे. भगवद्गीतेत देखील दहाव्या अध्यायातील अठ्ठाविसाव्या श्लोकात, भगवान स्वतःचे वर्णन , "गायीत मी कामधेनू आहे" असे करतात. काम म्हणजे इच्छा हे लक्षात ठेवले आणि मला उमगलेल्या अर्थाची संगती लावली तर मग कबीरांनी वापरलेले हे रूपक समजायला सोपे होते.
निर्गुण निराकार परमेश्वराच्या स्वतःला अनुभवण्याच्या इच्छेतून सगुण साकार विश्व उत्पन्न झाले. या सगुण साकार विश्वात जेंव्हा मानवी जडदेह जन्म घेतो तेंव्हा त्याच्या मस्तकात म्हणजे गगनमंडळात इच्छा किंवा कामना जन्म घेऊ लागतात. त्याच्या शरीरातील ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये म्हणजे भुई. त्यांच्या सहाय्याने त्याला होणारे जगाचे आकलन आणि इच्छेला अनुसरून होणारे त्याचे वर्तन म्हणजे जमवलेले दही. आणि त्याची त्या अनुभवांची आसक्ती म्हणजे त्या दह्याची होणारी घुसळण. मग लोणी म्हणजे अनुभवांचे वैविध्य ज्या साठी परमेश्वराने ही लीला रचली. ज्ञानी साधक हे ओळखतो म्हणून तो लोण्याच्या मागे लागतो. तर अनेक जडदेहधारी व्यक्ती आपले अद्वैत विसरतात. आपल्या जन्माचे प्रयोजन विसरतात. इच्छेनुसार ही इंद्रिये वापरायची हा संकेत विसरून त्यांच्या इंद्रियातून इच्छा जन्माला येऊ लागतात. इच्छेची इंद्रीयांवरची पकड सुटते. शेवटी मन, इंद्रियांच्या आधीन होऊन बसते. आणि मग या व्यक्ती, वैविध्याचे लोणी सोडून सातत्याचे ताक पकडून बसतात.
तिसऱ्या चरणातले गायीचे हे रूपक मला असे उलगडले आहे.
------------------
------------------
No comments:
Post a Comment