Monday, May 23, 2016

‎निर्गुणी भजने‬ (भाग २.४) सुनता है गुरू ग्यानी - दुसरा चरण

------------------

------------------

मागच्या भागात मी ऐतरेयोपनिषदातील विश्वोत्पत्ती चा सिद्धांत आणि सुनता है गुरु ग्यानी चा पहिला चरण यांचा संबंध आहे असा अर्थ लावला होता. त्यानुसार, निर्गुणाच्या इच्छेने प्रथम निर्गुणातून चार लोकांची निर्मिती, त्यानंतर हिरण्यपुरुषाची निर्मिती, त्याच्या अवयवातून चार लोकाच्या लोकपालांची म्हणजे गुणांची निर्मिती, मग गुणांच्या कार्यसाफल्यासाठी मानवी देहाची निर्मिती, या देहातील विवक्षित अवयवांमध्ये एकेका गुणाने स्थान ग्रहण करणे आणि मग देहाच्या टाळूतून चैतन्य शक्तीने मानवी देहात प्रवेश करणे असा पहिल्या चरणाचा अर्थ लावला होता.


ऐतरेयोपनिषदातला सिद्धांत मला किती पटला हा भाग जरी सोडून दिला तरी त्यात मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे या सिद्धांतात वापरलेली निर्गुण निराकारातून निर्गुण साकार पुरुष निर्माण होणे, मग या निर्गुण साकार पुरुषाच्या अवयवातून गुण निर्माण होणे, त्या गुणांनी जड देहात स्थान ग्रहण करणे आणि  मग त्या सगुण देहात पुन्हा निर्गुण चैतन्याने प्रवेश करणे अशी दाखवलेली निर्मितीची साखळी.  ह्या साखळीत विशुद्ध चैतन्यातून जड कसे निर्माण होते, ते सांगितलेले नाही. किंबहुना चैतन्य आधी की जड आधी, हा प्रश्न देखील सोडवलेला नाही. तरी चैतन्याचा आणि जडाचा अविभाज्य परस्परसंबंध दाखवला आहे. किंबहुना तसा संबंध दाखवण्यासाठीच निर्गुण आणि सगुण या संकल्पना वापरल्या आहेत.  मला ही उपनिषदकर्त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचंड मोठी झेप आहे असे वाटते. या प्रचंड कल्पनाशक्तीला वंदन करून मी दुसऱ्या चरणाकडे वळतो.


वहां से आया पटा लिखाया, तृष्णा तो उने बुझाई बुझाई |
अमृत छोड़सो विषय को धावे, उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll


हा चरण किंवा हे कडवे मोठे गोंधळात टाकते. याचा अर्थ परळीकरांच्या पुस्तकात, "तेथून म्हणजे प्रकृती- पुरुषापासून जीव येथे आला. येथे त्याचा पत्ता लिहून  घेतला म्हणजे त्याला नामरूप प्राप्त झाले. त्याची जन्म घेण्याची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली. जीवाला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आणि तो विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला. अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच विषयांत जीव गुंतून पडला आणि परमेश्वराच्या स्मरणात गुंतून पडण्या ऐवजी बंधनात अडकून पडला." असा दिला आहे.


हा अर्थ चटकन पटला पण निर्गुण निराकाराला स्वतःला अनुभवायचे होते, स्वतःची लीला खेळायची होती म्हणून त्याने सगुण साकाराची निर्मिती केली हा तैत्तिरियोपनिषद, बृहदारण्यकोपनिषद आणि ऐतारेयोपनिषद यांच्या एकत्रित वाचनातून तयार होणारा सिद्धांत एकदा मान्य केला की विषयांच्या उपभोगाकडे धावत सुटला आणि इंद्रियगम्य पंच विषयात जीव गुंतून पडला असा अर्थ काढणे मला अडचणीचे वाटू लागले. कारण हे पंच विषय अनुभवणे हेच तर या सर्व लीलेचे कारण होते. मग त्याला बंधन कसे म्हणायचे.  पुन्हा, "तृष्णा तो उने बुझाई बुझाई" असा उल्लेख आहे. मग ज्याची तृष्णा भागली किंवा शमली तो अमृत सोडून विषयाकडे का म्हणून धावेल? असाही प्रश्न पडला. आणि माझी शोधयात्रा पुढे चालू राहिली.


वहां से आया पटा लिखाया, म्हणजे आता सगुण जडदेहात चैतन्याने प्रवेश केला. आणि मग या जडदेहाचा जन्म झाला. देहाच्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण समाजाची निर्मिती केल्याने या देहाने आपले  जन्माधिष्ठित कार्य (ज्याला आपण इंग्रजीमध्ये Calling म्हणतो) ते ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याआधी त्यावर सामाजिक संस्कार होतात. त्याचे नामकरण होते. त्याचे नाव जगाने काय ठेवले त्यावरून त्याची ओळख बनू लागते. आणि मग तोही स्वतःला त्याच नावाशिवाय वेगळा ओळखू शकत नाही. ते नाव आणि त्या नावामागील मानवी संस्कृतीची परंपरा वागवण्याचे बंधन त्याच्यावर पडते आणि मग निसर्गाच्या विविध लीलांना उमगून त्यांचा आनंद घेण्यासाठी मुक्त असलेला तो जीव, आपल्या नावामुळे आणि त्याच्यामागील संस्कृतीमुळे, नवनवीन अनुभवांचे एकाच पठडीतले अर्थ काढून मुक्तता सोडून पत्त्यासारखा (address) अविचल होतो.


इथपर्यंत पोहोचलो पण, "तृष्णा तो उने बुझाई" ची संगती लागेना. शोध काही संपेना. सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या संकेतस्थळावर या पूर्ण कडव्याचा अर्थ,
"Your being arrived from there to an address in this world, to quench its own thirst – the desire for God. But putting nectar aside, you drink poison again and again. Going in reverse, you now toss and turn in your own trap." असा दिला आहे.


तो काही मला पटत नव्हता. मग लिंडा हेस बाईंच्या सिंगिंग एम्प्टीनेस या पुस्तकात अजून एक माहिती मिळाली.


कुमारजींना ही भजने त्यांच्या देवास येथील वास्तव्यात मिळाली. देवास येथे शीलनाथ महाराज नावाचे एक साधू पुरुष होते. त्यांच्या दरबारात अनेक विख्यात गवयी आपली संगीत सेवा अर्पण करण्यासाठी यायचे. अनेक निर्गुणी भजनांच्या संहिता कुमारजींना शीलनाथ महाराज संस्थानातून मिळाल्या. आणि शीलनाथ संस्थानातील लिखित प्रतीमध्ये, "तृष्णा तो उने बुझाई" असाच उल्लेख आहे. त्याबद्दल श्रीमती हेस यांची कलापिनी कोमकल्लींशी चर्चा झाली आणि त्यात कलापिनी बाईंनी या वाक्याचा कुमारजींनी लावलेला अर्थ  सांगितला. (मूळ लेखन इंग्रजीत आहे. त्याचे मी मराठीत यथाशक्ती  रुपांतर केले आहे.)


"या ओळी शिवाबद्दल आहेत. तोच शिव ज्याने समुद्र मंथनाच्या वेळी बाहेर आलेले हलाहल प्राशन केले.  जेंव्हा सुरासुर अमृताची वाट पहात होते तेंव्हा, प्रथम विविध मौल्यवान वस्तू समुद्रातून बाहेर आल्या आणि मग हलाहल आले. हे हलाहल धारण करणे सर्व देवांच्या शक्तीबाहेरचे होते. ते शिवाने आपल्या कंठात धारण केले. म्हणून हलाहल कंठात धारण करणाऱ्या शिवाकडेच आपली तृष्णा शमविण्याची शक्ती आहे. आणि त्याच अनुषंगाने कुंडलिनीला ऊर्ध्वगामी करणे म्हणजे तिचा फास उलटा फिरवणे असा अर्थ आहे."  


श्रीमती हेस यांनी मग निर्गुणी भजनांचे अजून एक प्रसिद्ध गायक श्री. प्रल्हाद तिपनिया यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तर त्यानी कबीरांचा आणि शिवाचा संबंध नाकारला. हे मला अजूनही पटलेले नाही. माझ्या मते हे भजन कुंडलिनी जागृतीच्या प्रवासातील साधकाच्या अवस्थांचे वर्णन करणारे आहे. कुंडलिनी जागृती हा हठयोगाचा भाग आहे. आणि हठयोग्यांचा मूळ पुरुष, "आदिनाथ" म्हणजे भगवान शिव आहे. त्यामुळे हठयोगाचा अभ्यास करणारे कबीर शिवाबद्दल बोलत नसतील असे म्हणणे मला पटले नाही.  पण प्रल्हाद तिपनिया यांनी "तृष्णा नही बुझानी" असा पाठभेद सांगितला. मग श्रीमती हेस यांना बागली गावातील एका घरात १९२८ च्या सुमारास लिहिलेले हस्तलिखित सापडले. ज्यात तिपनिया यांनी सांगितलेला  "तृष्णा नही बुझानी" हा पाठभेद लिहिलेला आहे. हा पाठभेद हेस बाईंना जास्त योग्य वाटला. आणि मला या भजनाची जी संगती लागत होती त्यासाठी मला देखील हाच पाठभेद योग्य वाटला. म्हणून अर्थाच्या शोधात मी या कडव्यापुरता कुमारजींच्या उच्चारापासून दूर जायचे ठरवले आणि बागली गावातील हस्तलिखितात दिलेला पाठभेद प्रमाण मानायचे ठरवले.


आता जेंव्हा मी पाठभेद प्रमाण मानतो आणि माझ्या मनातील संगतीनुसार या कडव्याकडे बघतो तेंव्हा, त्याचा अर्थ मला असा लागतो.


इंद्रिय गम्य सुखांचा उपभोग घेताना मनुष्य सातत्याच्या मागे लागतो. कुठलेही सुखद अनुभव त्याला सातत्याने हवे असतात आणि तेदेखील त्याच्या इच्छेनुसार. सातत्याच्या या हव्यासामुळे नवीन अनुभव घेणे तो विसरतो आणि अविचल होत जातो. हे अविचल होणे म्हणजे मरणे. त्यामुळे शरीरातील चैतन्याचा प्रवास हा गुणांचा गुलाम होतो. आणि अनुभव घेण्याच्या अंतःशक्तीऐवजी बाह्य जगतावर जास्त विसंबून राहतो. त्यामुळे त्याची सगुणाचा उपभोग घेण्याची तृष्णा संपत नाही.


त्यामुळे शेंडीच्या ठिकाणी असणाऱ्या बिंदूतून होणारा विसर्ग म्हणजे जीवन रस कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून, त्या जीवन रसाचे अमृतात रुपांतर करणे विसरतो. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो, हे देखील विसरतो. त्यामुळे हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते. विषयोपभोगाच्या मागे लागल्यामुळे आणि त्याच्या सातत्याचा आग्रह धरल्याने, चिरंतन आनंदाचा अनुभव घेण्याऐवजी तो क्षणिक सुखाच्या गुंत्यात अडकत जातो.

मग यावर उपाय काय? इंद्रियगम्य सुख नाकारावे का? तर माझ्या मते हठयोग आणि कबीर इंद्रियगम्य सुखाला नाकारत नसून, त्याच्या सातत्याच्या आग्रहाला आणि त्यासाठी अनुभवांच्या साचलेल्या सारखेपणाला विरोध करतात. त्यांच्या दृष्टीने चिरंतन आनंद कुठला? तर टाळूतून शिरून पाठीच्या मणक्याच्या तळाशी वेटोळे घालून वसलेली कुंडलिनी जागृत करून तिला पुन्हा सहस्रार चक्राच्या जागी आणणे. तिथे असलेल्या पोकळीत (ज्याला शरीरांतर्गत गगन किंवा अंतरीक्ष असे म्हटले आहे) तिला स्थिर करायचे आहे. आणि अनुभवांच्या सातत्या ऐवजी अनुभवांच्या तीव्रतेला अनुभवयाचे आहे. प्रत्येक अनुभवात असलेला निर्गुण आणि सगुणाचा परस्परसंबंध अनुभवायचा आहे. गुणाच्या प्रकटीकरणाच्या मोहात न अडकता विशुद्ध गुण अनुभवायला शिकायचे आहे. साखरेच्या प्रेमात न पडता गोडी अनुभवायची आहे. ज्याप्रमाणे डोळे नसलेल्या माणसाची इतर इंद्रिये अधिक टोकदार होतात आणि तो स्पर्श, वास आणि कान यांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो त्याप्रमाणे सर्व इंद्रिये नसताना मनुष्य सर्व गुणांना अधिक उत्कटतेने अनुभवू शकतो. असा विचार त्यामागे असावा. म्हणून मग योगी साधक काय उपाय  करतो ते सांगतात , "उलटी फाँस फंसानी हो जी" म्हणजे कुंडलिनीला उलटे फिरवतो. तिला ऊर्ध्वगामी करतो.

------------------

------------------

No comments:

Post a Comment