Tuesday, February 2, 2016

‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)

भाग १ । भाग ३ । भाग ४
--------------------------
मुले बागडत होती. सासू सासरे आणि आई खूष दिसत होते आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. सकाळी रेडिओवर ऐकलेले "आनंद पोटात माझ्या माईना" हे दत्त भक्तीगीत हिला उत्सवच्या गेटसमोर उभे करून तर अनाम कवीने लिहिले नसावे ना? अशी एक पुसटशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून मला देखील आनंदाचे भरते येत असताना मुलांनी मला गेटकडे खेचले आणि तिथल्या सहाय्यकाने, "तिकडून आत जा, हा बाहेर यायचा रस्ता आहे" असे मला सौजन्य, कंटाळा, तिरस्कार आणि कीव या सर्व भावनांचे मिश्रण असलेल्या आवाजात सांगून दुसऱ्या दिशेने पिटाळले. पोरं लगेच तिकडे पळाली देखील. ही माझ्यावर चिडली, माझी आई माझी बाजू कशी काय घ्यावी या विचारात पडली आणि माझी सासू, भोंडल्यातले "श्रीकांता कमलाकांता" हे गाणे आपल्या मुलीसाठीच लिहिले आहे असा चेहरा करून माझ्याकडे पाहू लागली.
आत गेल्याबरोबर दत्त महाराज जागृत दैवत असले तरी फार कडक दैवत आहेत आणि मी लहानपणापासून अनेक श्वानांना मारलेल्या दगडांचा हिशोब आज पुरा करून घेणार आहेत असे वाटू लागले. हिला खरेदी करायची होती आणि मुलांना खेळायच्या ठिकाणी जायचे होते. दोन्ही बाजूंना कसे सांभाळायचे त्याचा विचार करताना मी स्वतः खरेदीत लक्ष घालून, चटकन ते सोपस्कार आटपून नंतर खेळायच्या जागी जायचे ठरवले. हिला म्हटले तू तिकडून खरेदी कर मी इकडून करतो. खरेदीच्या वेळी माझी आई सुद्धा आपण कौसल्या आहोत हे विसरून कैकयीच्या भूमिकेत जाते आणि सासू सुनेची शनी मंगळ युती होते. म्हणून एका गटात मी, दोन्ही मुलं आणि माझे सासरे तर दुसऱ्या गटात तीनही महिला अशी विभागणी होऊन, नंतर टेनिस कोर्टाच्या इकडे भेटायचे ठरवून आम्ही दोन दिशांना पांगलो.
पटापट पितांबरी, समईसाठी तिळाच्या तेलाच्या बाटल्या, ओटा पुसायचे कापड, तारेचा ब्रश वगैरे खरेदी करून माझ्या सासऱ्यान्वर मी किती गृहकृत्यदक्ष आहे ते ठसवण्याच्या प्रयत्नात होतो. पण त्या अनुभवी पुरुषाने माझ्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने बघून हताशेने मान हलवली. मग मुलांसमोर हिम्मत हरलेली दाखवू नये म्हणून मी तळोदचा रेडी ढोकळा मिक्स, गिट्स ची रवा इडली असले प्रकार खरेदी करू लागलो. इथे एक बरे होते की सगळे विक्रेते प्लास्टीकच्या छोट्या द्रोणात त्यांच्या रेडी मिक्स पदार्थांची चव आम्हाला देत होते. त्यामुळे मुले जरा शांत होती. सासरे पण चवीने खाणारे असल्याने त्यांची मगासची हताशा थोडी कमी झाल्यासारखी वाटली. मुलांनी तोपर्यंत एक की-चेन वाला शोधला होता. तो की-चेन वर नावं लिहून देत होता. मी त्यांना खेळायला जायचे आमिष दाखवून त्या गर्दीतून स्वतःचे अंग काढून घेतले. आमच्या बाजूची खरेदी आटपून आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो.
हि आलेली नव्हती. मुलं आपण पहिले पोहोचलो या आनंदात होती. पण मला, वेगाने खरेदी करण्यात हिला हरवण्याच्या आनंदापेक्षा तिच्या हळू वेगाचे कारण, जास्तीत जास्त निरुपयोगी खरेदी, हे जाणवले असल्याने मुलांना सासऱ्यांच्या हवाली करून मी तिला शोधायला निघालो.
एका ठिकाणी बरीच गर्दी दिसली. म्हणून पाय उंचावून बघायचा प्रयत्न केला, तर गर्दीच्या केंद्रस्थानी, काश्मीर गालिच्याचे एक टोक हातात घेऊन उभ्या असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील विजयी हास्य; पंधरा वर्षापूर्वी अंतरपाट दूर होताच, वरमाला हातात घेऊन माझ्याकडे रोखून बघणाऱ्या चेहऱ्यावर, मी अक्षतांच्या बोचऱ्या वर्षावात आणि “सावधान….सावधान” च्या गजरात पाहिले होते. मी गर्दीत घुसलो आणि हळूच हिला म्हणालो, "अगं मागे घेतलेला गालिचा अजून आपण वापरत नाही आता हा कशाला अजून नवीन?" त्यावर, ‘तुम्हाला काय कळतंय त्यातलं’ वाला सराईत चेहरा करून तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि गालिच्याच्या किमतीत घासाघीस चालू ठेवली. पाच दहा मिनिटे हुज्जत घालूनही सोक्ष मोक्ष लागेना तेंव्हा मी हिला जवळपास ओढतच तिथून बाहेर काढले. तो काश्मीर गालिचावाला विक्रेता, विक्री न होऊन देखील थोडा खूष झालेला मला वाटला. मीही त्याला नजरेनेच, “दुवा मे याद रखना” हा संवाद ऐकवून तिथून निघालो.
मी एक नवीन ड्रेस घेऊन देईन या बोलीवर ही शांत झाली. माझ्या आईच्या चेहऱ्यावर चारचौघात सुनेला स्वतःचे म्हणणे पटवू शकल्याने मुलगा कर्तबगार निघाल्याचे समाधान पसरले तर हिच्या आईच्या चेहऱ्यावर नवऱ्याकडून नवे काही मिळाल्याशिवाय जुना हट्ट न सोडणारी असल्याने, मुलगी कर्तबगार निघाल्याचे.
मुलांना आणि सासऱ्यांना सोडलेल्या ठिकाणी पोहोचलो तर जाणवले की अजूनही माझ्या श्वान-शिला-प्रक्षेपण पापांचा हिशोब दत्त गुरुंसाठी संपलेला नाही. सासरे तिथे असलेल्या एका सोलर पंप विक्रेत्याशी बोलत आहेत आणि त्यांचे लक्ष नाही हे पाहून पोरांनी तिथे लावून ठेवलेले सर्व अडथळे ओलांडून, सांभाळून ठेवलेल्या टेनिस कोर्टावर प्रवेश केला होता आणि त्यावर त्यांचे कबड्डी कम कुस्तीचे प्रयोग चालू झाले होते. माझ्या पोटात धस्स झाले. त्यांना धपाटे घालत तिथून बाहेर काढले. धाकट्याने गळा काढला आणि आजूबाजूचे सर्व लोक मी जणू काही या दोन बिलंदरांना पळवून नेतोय की काय अश्या संशयाने माझ्याकडे बघू लागले. शेवटी की-चेन देईन असे वचन माझ्याकडून घेऊनच, त्याच्या अम्मावर गेलेला माझा तो धूर्त वंशज शांत झाला. त्यांच्या की चेन बनवत असताना, बायकोचे लक्ष माझ्या हातातील पिशव्यांकडे गेले आणि माझ्या सासऱ्यांची हताश मुद्रा पुन्हा प्रकटली.
--------------------------
भाग १ । भाग ३ । भाग ४

No comments:

Post a Comment