Tuesday, February 2, 2016

‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)

भाग १ । भाग २ । भाग ४
--------------------------
हिने पंचनामा करणाऱ्या हवालदाराच्या आणि निवाडा करणाऱ्या न्यायाधीशाच्या एकत्रित अविर्भावात माझी खरेदी बघितली. तिळाचे तेल घरात होते आणि मी सूट आहे म्हणून घेतलेले तेल तिच्या नेहमीच्या दुकानदारापेक्षा महाग होते. मी उगाच स्टॉलवाल्याकडे रिफील पॅक नव्हता, जास्त बाटल्या नंतर साठवणीला कामाला येतील वगैरे युक्तिवाद करून पाहिले. त्यावर तिने मी प्रत्येक बाटली चाळीस रुपये जास्त देऊन घेतली आहे असा हिशोब लावून दाखवला. मी उसनं अवसान आणून तिला, "तू कोळसा घोटाळ्यासारखे आकडे फुगवून सांगतेस," असे कायच्या काय बोललो.
मग तिने मी घेतलेली रेडी मिक्स ची पाकिटे काढली. आणि मला एकदम आठवले की मी जिमला जातो. ब्रह्मांड, आकाश, कुऱ्हाड सगळे एकदम कोसळले माझ्यावर. नंतरचे पुढचे काही क्षण वर्णन करण्यासाठीच पाडगावकरांनी "शब्दावाचून कळले सारे…. शब्दांच्या पलिकडले" लिहिले असावे असे मला वाटून गेले. माझ्या आईने, आपल्या गोलंदाजाने एका ओव्हर मध्ये छत्तीस रन दिल्यावर प्रेक्षकांची होते तशी प्रतिक्रिया दिली. माझ्या सासूने तर "श्रीकांता कमलाकांता" मध्ये नवीन कडवं रचायला घेतलं, तर माझ्या अनुभवी आणि हताश सासऱ्याच्या डोळ्यात, "तरी मी तुमच्या प्रेमविवाहाला नाही म्हणत होतो ना !!!!" हे वाक्य मला स्पष्ट वाचता आलं. तेव्हढ्यात मुलांच्या की-चेन आल्या आणि माझी सुटका झाली.
आमचा सगळ्यांचा मोर्चा मी मनातल्या मनात "खेळ मांडीयेला जिमखान्याच्या पायी" म्हणत जिकडे फिरते पाळणे वगैरे होते तिकडे वळवला. मुले ऑक्टोपस मध्ये बसली. माझा मूड थोडा उतरला होता. म्हणून मी बाहेरच थांबलो. दोघांनी त्यांचे मोबाइल माझ्याकडे दिले. मी उदास हसत ऑक्टोपसच्या फिरण्याकडे बघत होतो. तेंव्हा ही म्हणाली, "असू दे. जास्त विचार करू नकोस. तू हा असा आहेस ना म्हणूनच मला आवडतोस." मला जरा बरे वाटू लागले. पुढे ती "तुझ्या अश्या स्वभावामुळेच मला मी कित्ती हुश्शार आणि हिशेबी आहे ते कळते" असलं काहीतरी म्हणत असल्यासारखं मला वाटलं. पण मला आलेल्या प्रेमाच्या आवंढ्यात ते मला तितकंसं महत्वाचं वाटलं नाही. माझा स्वभावंच आहे तसा प्रेमात चटकन विरघळून जाण्याचा.
पुढच्या टोरा टोरा मध्ये आम्ही चौघे बसलो. धाकटा बिलंदर माझ्या जवळ आणि मोठा डॅँबिस हिच्याजवळ अशी वाटणी झाली. आमच्या मागे पुढे कॉलेज कुमार आणि कुमारींच्या जोड्या होत्या. बहुतेक मुली केस मोकळे सोडून इंदुलेखा ब्रिंघा का कायश्या तेलाची जाहिरात करत होत्या असं मला वाटलं. त्यांचे ते हसणं खिदळणं आणि एकमेकांना चटकन टाळ्या देणं आणि एकमेकांचा हात धरणं, सेल्फी स्टिक वापरून फोटो काढताना मान तिरकी करून, बदकासारखी तोंडे करून, एकमेकांच्या कमरेला विळखे घालणं किंवा खांद्यावर हात ठेवणं; बघून मला एकदम मी म्हातारा झालो असं वाटू लागलं. प्रेम विवाह असूनही चार चौघात हिचा हात धरायला मला अजूनही बाचकायला होतं. स्पर्शाची जादू ही पिढी गमावते ती काय? असले उदासवाणे प्रश्न पडू लागले.
आणि आमच्या टोरा टोराने गोल फिरणे चालू केले. सगळे ओरडू लागले आणि मग मीही ओरडू लागलो. टोरा टोराच्या, इतर जोड्यांच्या, माझ्या पिल्लांच्या आणि हिच्या आवाजात माझा आवाज मिसळून भरपूर ओरडून घेतले. त्या चक्राकार गतीने आणि ओरडण्याने मनावरचा ताण ढिला होऊ लागला होता, त्या मुला मुलींवर उगाच प्रेम वाटू लागले. निसर्ग एक काहीतरी काढून घेतो तेंव्हा दुसरे काहीतरी देतंच असतो यावरचा विश्वास वाढून माझे मन शांत होत असतानाच एकाएकी खिशात ठेवलेल्या तीन फोन पैकी कुठला तरी एक गुरगुरू लागला. मान तिरकी, हात आणि पाय अडकलेले, शरीर स्वतःच्या ताब्याबाहेर आणि खिशात गुदगुल्या. काय भयंकर प्रकार होता म्हणून सांगू. शेवटी एकदाचा फोन गुरगुरायचा थांबला, टोरा टोरा फिरायचं थांबलं आणि खाली उतरून, चक्कर येत असताना, मी फोन बघितला.
अनोळखी नंबर होता. मिस्ड कॉल वाल्याला फोन लावला, तो कोणी तरी "केम छो परसोत्तमभाय" वगैरे बोलू लागला. मी मनात म्हटलं, "राँग का होईना कुणाला तरी आपण पुरुषोत्तम वाटतोय हे काय कमी आहे!" त्याच आनंदात मी मोठ्या फिरत्या झुल्यात, कप बशीत, ट्रेनमध्ये बसून घेतले. फुगे फोडले. रिंगा फेकून मुलांना एक लाकडी पट्टी जिंकून दिली. एका मिनिटात जादू शिकायला गेलो. त्या एका मिनिटात आपण पुरुषोत्तमचे, पुन्हा आनंद आणि मग चटकन भुलणारे सामान्य ग्राहक झालो हीच खरी जादू आहे असे स्वतःला बजावत शेवटी खाण्याच्या स्टॉल्सकडे मोर्चा वळवला.

--------------------------
भाग १ । भाग २ । भाग ४

No comments:

Post a Comment