Tuesday, February 2, 2016

‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)

भाग १ । भाग २ । भाग ३
--------------------------
खाण्याच्या स्टॉल्सच्या ठिकाणी सगळीकडे फिरत आधी काय काय आहे त्याची चाचपणी केली. वेगवेगळे स्टॉल छान सजले होते. कुठे महाराष्ट्रीयन, कुठे चायनीज, कुठे राजस्थानी, कुठे मालवणी, कुठे पाव भाजी, कुठे दाबेली, कुठे चाट, तर कुठे काय अशी सगळी चंगळ होती. मी डाएट वर असल्याचे माझ्या ध्यानात होतं. म्हणून पहिला मोर्चा फळांच्या स्टॉलकडे वळवला. एक मोठा बाउल भरून फळांचे काप घेतले आणि ते खाण्यासाठी दिलेले लाकडी दातकोरणे फेकून सरळ हाताने खाऊ लागलो. कुणाला टोचून बोलणे मला अजून जमत नाही मग टोचून खाणे काय जमणार. म्हणून पाचही बोटांनी फळांना गुदगुल्या करत मोठ्या मजेने रसास्वाद घेऊ लागलो.
त्यानंतर आमचा मोर्चा बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्या शोधू लागला. एक ठिकाणी टेबल मोकळे दिसले. आठ जणांच्या टेबलावर एकंच जोडपं बसलं होतं. मी आणि मुलांनी एकदम “आक्रमण” म्हणत त्या दिशेने धाव घेतली. त्या टेबलावर बसलेले जोडपे मी आणि मुलांच्या त्या आरडा ओरड्यामुळे एकदम घाई घाईने उठून निघून गेले. आणि मी बाकीच्या मंडळींना तिथे बसवून पटकन इतर स्टॉल्स कडे मोर्चा वळवला.
वडा पाव, दाबेली, मिसळ, मूग भजी, मंचुरियन, नूडल्स, पिझ्झा अश्या सगळ्या गोष्टींकडे निरीच्छपणे पहात इतरांसाठी जे हवे ते घेत चालत जाणारा मी एखाद्या संत महात्म्यासारखा दिसत असावा. सगळ्यांना हव्या त्या गोष्टी खायला दिल्यावर शेवटी माझ्यासाठी मी डाएट मिसळ घ्यायचे ठरवले. पाव बिव नको असेही ठरवले. आणि थाटात ऑर्डर दिली. पण माझ्या आधी डोम्बिवलीतले डाएटच्या बाबतीत जागरूक असलेले यच्चयावत लोक दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर त्या स्टॉलवालीच्या धंद्याला माझ्याआधी बरकत देऊन गेले असल्याने, डाएट मिसळ संपल्याची बातमी तिने आनंदी चेहऱ्याने सांगितली. आणि मला मूग भजी किंवा वडापाव घेण्याचा आग्रह करू लागली. पण मी दत्त जयंतीच्या प्रभावात असल्याने ज्याप्रमाणे गोरक्षनाथांनी गुरु मत्स्येंद्रनाथांना स्त्री राज्यातून सोडवून आणताना मंगला की कमला की पिंगला राणीकडे बघितले असेल त्याच नजरेने, मला खाण्याच्या मोहात अडकवणाऱ्या त्या विक्रेत्या स्त्री कडे एक भेदक कटाक्ष टाकून तिथून निघून पुन्हा आमच्या टेबलाकडे आलो. आमच्या टेबलावर फक्त खाण्याचा आवाज सोडल्यास पूर्ण शांतता होती. मला रिकाम्या हाताने परत आलेले पाहून सर्वांनी आपापल्या खाण्याच्या वस्तू स्वतःजवळ किंचित ओढल्यासारख्या वाटल्या पण मी तिकडे हसून दुर्लक्ष केले.
मग माझी घरगुती ऋजुता दिवेकर म्हणाली, “रात्रीचं उपाशी पोटी राहू नका, काहीतरी खाऊन घ्या.” मी मानेनेच नको म्हटले. पण मग ती म्हणाली उद्या सकाळी जिमला त्रास होईल. हे मात्र मला पटले. आणि मी पुन्हा काहीतरी खायला घेण्यासाठी निघालो. सर्व स्टॉलवाल्यांना मी आधी नाकारले असल्याने पुन्हा तिथे जाण्यात मला कसेसेच वाटले. आणि आधी न गेलेल्या राजस्थानी खाण्याच्या स्टॉलकडे मोर्चा वळवला.
तिथे कचोरी, छोले भटुरे, दाल बाटी वगैरे पदार्थ होते. घरगुती उपयोगाच्या वस्तू विकत घेताना मी हिशोबात केलेल्या गोंधळामुळे; दीडशे रुपयात दाल बाटी घेण्याऐवजी दोनशे रुपयात राजस्थानी थाळी घ्यायचे ठरवले. पैसे दिले. टोकन घेतले. आणि थाळीसाठी रांगेत उभा राहिलो. माझ्या आधी रांगेतले लोक कचोरी, तेलकट भटुरे वगैरे घेत होते. त्यांच्या तब्ब्येतीची काळजी वाटून मी थोडा विमनस्क झालो. आणि माझा नंबर आला. माझे टोकन पाहून तो काउन्टर वरचा माणूस खूष झाला. त्याने खाली लपवून ठेवलेल्या ढिगातून मोठी थाळी काढली. त्यात तो पदार्थ भरू लागला आणि त्यांची नावे सांगू लागला. (तुपात भिजलेल्या दोन) बाजरेकी रोटी, पनीर की सब्जी, चूर्मा लड्डू, दाल बाटी, (तूप ओघळणारा) मूंग दाल का हलवा असं सगळं मनापासून भरल्यावर तो राजस्थानी सेवक माझ्या थिजलेल्या चेहऱ्याकडे हसतमुखाने पहात ती थाळी माझ्या हातात देता झाला.
आता हे सगळं घेऊन पुन्हा टेबलाकडे जायचं आहे या कल्पनेने मला हुडहुडी भरली. माझे टेबल एकाएकी खूप दूर वाटू लागले. मी हळू हळू चालत जाताना माझ्या हातातील थाळीकडे सगळेजण कुतुहलाने बघतायत असे वाटू लागले. मला माझ्या सुटलेल्या पोटाची प्रकाशित केलेली कहाणी आठवली. तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ती वाचली असावी आणि ते सगळे माझ्याकडे आश्चर्य मिश्रीत हास्याने बघतायत असा भास होऊ लागला. शेवटी एकदाचा पोहोचलो. आता तर मीच मनातल्या मनात "श्रीकांता कमलाकांता" म्हणायला सुरुवात केली होती. बायकोने, सासूने आणि आईने देखील त्यात मूकपणे कोरस धरल्याचं मला जाणवलं. काहीतरी बोलायचं म्हणून मी, "अरे ! हे सगळ्यांसाठी आहे," वगैरे बोलून बघितलं. पण माझ्या कुटुंबियांना वाल्या कोळ्याची गोष्ट माहित असल्याने, त्यांनी या ताटात वाटेकरी होण्यास नकार दिला.
त्यानंतर सुमारे अर्धा तास, टेबलावरील बाकीचे सगळे माझ्याकडे बघत असताना मी तुपात भिजलेली राजस्थानी थाळी संपवण्याची पराकाष्ठा करीत होतो. मिर्झा राजांनी उगाच पुरंदरला वेढा घातला असे मला वाटले. "आमची थाळी खाऊन दाखवा नाहीतर शरण या", असे सरळ आव्हान जर त्यांनी शिवाजी महाराजांना दिले असते तर त्यांचा स्वतःचा बराच वेळ आणि औरंगजेबाचा बराच पैसा वाचला असता आणि आलमगीरावर टोप्या विकायची वेळ आली नसती असे विचार डोक्यात आले.
माझ्या मुलांना त्या सगळ्या प्रसंगाची मजा येऊ लागली. "बाबा लवकर संपव. हे सगळं साडेदहाला संपतं." वगैरे सूचना द्यायला त्यांनी सुरवात केली. मोठ्याला तर मी म्हणजे डिस्कव्हरी चॅनेलवरच्या Man v/s Food मधला अॅडम रिचमन आहे असे वाटून त्याने नवीन घेऊन दिलेल्या घड्याळातील स्टॉपवॉच चालू करून काऊन्ट डाऊन सुरु केला. शेवटी एकदाचा त्या संघर्षात Man जिंकला आणि जर मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना थाळीचे आव्हान दिले असते तर "होता आनंद मोरे म्हणून वाचले सह्याद्रीचे खोरे" अशी एखादी म्हण पडली असती या विचाराने मी संपलेल्या थाळीकडे विजयी वीराच्या नजरेने पाहिले.
तोंड तुपकट झालं होतं म्हणून मी हिच्याकडे लक्ष न देता पान विकणाऱ्या स्टॉलकडे मोर्चा वळवला. त्याने बहुतेक मला थाळी संपवताना बघितलं असावं, कारण तो माझ्याशी अत्यंत आदराने बोलत होता. काय कलकत्ता, काय बनारसी काय मघई वगैरे तो मला समजावून सांगू लागला. मी देखील देवानंदच्या बनारसी बाबू चित्रपटात मीच मूळचा नायक होतो आणि आम्ही नागवेलींच्या बनात रहातो अश्या आविर्भावात त्याच्याशी बोलत होतो. त्याच्या स्टॉलवर जास्त कुणी येत नाही. डोंबिवलीचे लोक पान खाण्याच्या बाबतीत दर्दी नाहीत अशी व्यथा पण त्याने माझ्याकडे व्यक्त केली. मला वाईट वाटले म्हणून मी सर्व प्रकारच्या पानांची सर्वांसाठी ऑर्डर देऊन त्याच्या मनात डोंबिवलीकरांबद्दल चांगले मत तयार करण्याचा प्रयत्न केला. हिने विरोध केला इतक्या पानांच्या खरेदीसाठी पण माझा स्वभावच तसा आहे, एकदा गावाच्या कीर्तीचा प्रश्न आला की मी कुणाचं ऐकत नाही. थोडी पानं खाऊन आणि थोडी घेऊन आम्ही निघालो. टूथ पिक घ्यावसं वाटलं म्हणून मी परत फिरलो, तर पानवाला नवीन गिऱ्हाईकाला जास्त कुणी येत नाही वगैरे ऐकवत होता. मला पाहून का कुणास ठाऊक पण जरा चपापल्यासारखा वाटला. पण मी तिथून टूथपिक घेऊन निघालो.
उत्सवचा आजचा दिवस संपला होता. स्टॉलवाले हिशोब लावत होते. काही वेळापूर्वीचा कोलाहल शांत झाला होता. रात्रीच्या थंडीने शहराला आपल्या कुशीत घेतलं होतं. जिमखान्याच्या मोकळ्या मैदानावर थंडी अजूनच बोचरी वाटत होती. हातात फसलेल्या खरेदीचे ओझे होते आणि पोटात फसलेल्या जेवणाचे. रिक्षा दिसत नव्हत्या. म्हणून सगळ्यांना तिथेच उभे करून मी दूरवर पार्क केलेल्या कारला घेऊन येण्यासाठी निघालो. माझी पिल्लं म्हणाली "आम्ही पण येतो." दोघेही आनंदात होते. त्यांच्या गप्पा ऐकत कारपर्यंत पोचलो. माझ्या फसलेल्या खरेदीचा किंवा फसलेल्या जेवणाचा त्यांच्या आनंदावर किंचितही परिणाम झालेला दिसत नव्हता. मग सगळे कार मध्ये बसले. एकाएकी सासूबाई म्हणाल्या की त्यांना आज खूप छान वाटलं. अनुभवी असलेल्या सासरेबुवांनी यावेळी दुजोरा देण्यासाठी हलवलेल्या मानेच्या हेलकाव्यावरून ते खरंच खूष झाले असावेत असं मला वाटलं. सासू सासऱ्यांना नक्की काय आवडते हे कळण्याची शक्ती असलेला जावई अस्तित्वात असलाच तरी तो मी नाही हे मला पुन्हा एकदा पटले. आपल्या मूळच्या कौसल्या रूपात परतलेली आई म्हणाली की, "आनंद, तुझ्याबरोबर जायलाच खरी मजा येते. भरपूर खरेदी, भरपूर खाणंपिणं, थोडीशी धुसफूस आणि मग पुन्हा हसणं." त्यावर ही म्हणाली, "हे सगळं मला पण पटतंय, पण माझा एक ड्रेस बाकी आहे तेव्हढं लक्षात ठेवा." आणि मग सगळे एकदम हसू लागले.
कारच्या काचा खाली होत्या, दूरवर कुठेतरी दत्ताच्या देवळात भजन चालू होते, "निघालो घेऊन दत्ताची पालखी." माझी पालखी चारचाकी होती आणि माझ्या घरचेे, दत्ताचे, माझ्या अल्पमतीला झेपतील असे अवतार त्यात बसून हसत होते. टाळ्या देत होते. दत्त जयंतीचा उत्सव संपत होता आणि मी नवीन साक्षात्काराने भारावलो होतो. मनातल्या मनात म्हणू लागलो;

दत्त दत्त
दत्ताची गाय
गायीचं दूध
दुधाचं दही
दह्याचं ताक
ताकाचं लोणी
लोण्याचं तूप
तुपातली राजस्थानी थाळी
असले गोड कुटुंब असले तर
रोजच उत्सव आपल्या भाळी

--------------------------
भाग १ । भाग २ । भाग ३

No comments:

Post a Comment