Tuesday, February 2, 2016

सगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न

कालचा तुझा प्रश्न छान होता … मला समजलेला प्रश्न असा की, "आईचा भाऊ व्याही म्हणून चालतो तर आईची बहिण का नाही? आणि बाबांची बहिण विहीणबाई म्हणून चालते तर बाबांचा भाऊ का नाही ?" आणि तू या प्रकाराला निषिद्ध सगोत्र विवाहाचे स्पष्टीकरण नाकारतो आहेस. इथपर्यंत मी पोचलो. त्यावरची उत्तरं पण छान होती पण तुझ्या मूळ प्रश्नाला उत्तर म्हणून मला समर्पक वाटली नाहीत … मग माझे विचार आणि तर्क चालू झाले. ते कितपत सुसंगत आहेत ते तूच ठरव.

बऱ्याच जणांनी आपल्या प्राचीन संस्कृतीमधील या प्रथेला आधुनिक जगातील जनुकीय शास्त्राचा संदर्भ दिला आहे आणि inbreeding मुळे होणारे जनुकीय दोष टाळण्यासाठी सगोत्र विवाह टाळतात असे भारतीय मनाला पटकन सुखावणारे आणि प्राचीन ऋषी मुनींच्या ज्ञानामुळे भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटायला लावणारे उत्तर दिले आहे. मी देखील श्रद्धाळू भारतीय असल्यामुळे वाचून दोन मिनिटे खूष झालो पण तुझा प्रश्न अनुत्तरीत राहिला हे जाणवले … मग जसा वेळ मिळाला तशी माहिती काढत गेलो …

पहिली गोष्ट म्हणजे सगोत्र आणि जनुकीय शास्त्र याचा संबंध नसावा. ज्या काळात पाऊस वरुण देवाच्या कृपेने पडतो आणि यज्ञाच्या धुराने हविर्द्रव्य इप्सित देवतेपर्यंत पोहोचते अशी समाजमान्यता होती त्या काळात inbreeding मुळे कमजोर किंवा विकृत जनुकांचा प्रसार होत असेल इथपर्यंत आमचे पूज्य ऋषी पोहोचले असतील असे वाटत नाही.

त्याशिवाय वर वधू सगोत्र असतील तर त्यावर तोड म्हणून विवाहसमयी वधूला तिच्या मामाने दत्तक घ्यायचे आणि मग तिचे कन्यादान तिच्या जन्मदात्या आई वडिलांऐवजी मामा मामीने केले तर तो विवाह योग्य मानवा असे शास्त्रवचन असल्याने गोत्र आणि जनुकांचा, सिद्ध साधकाच्या गोष्टीनुसार आपण लावलेला बादरायण संबंध माझ्यासाठी कच्चा ठरला. मग सगोत्र विवाह केल्यास संतती दोष होतो आणि पुढील पिढ्यांचे आयुष्य बिघडते हि शास्त्रवचने दुसऱ्याच कुठल्या तरी हेतूने केलेली योजना असेल असा विचार करण्यास वाव मिळाला.

मुळात गोत्र हि गोष्टच ब्राह्मणांची आहे. माझ्या वाचनात मला असे दिसले कि गोत्र केवळ रक्त संबधातून ठरत नाही तर शिष्य आपल्या गुरुचे गोत्र लावू शकतो. त्यामुळे गोत्र हि केवळ वांशिक गोष्ट न राहता सांस्कृतिक गोष्ट आहे हे कळले आणि पुन्हा एकदा inbreeding आणि सगोत्राचे गोत्र जुळेनासे झाले.

गोत्र संकल्पनेचा उदय कुणाशी विवाह करावा ते ठरवण्यासाठी नसून ब्राह्मणाची योग्य ओळख देण्यासाठी झाला असावा असे मला वाटते. योग्य ओळख देण्यासाठी ब्राह्मणाला साधारण खालील गोष्टी माहिती पाहिजेत;

  1. गोत्र : मूळ संस्थापक ऋषीचे नाव (आंतरजालावर यांची नावे अंगिरा, भृगु, अत्रि, कश्यप, वशिष्ठ, अगस्त्य, आणि कौशिक अशी मला सापडली. हीच बरोबर आहेत याची खात्री मला नाही)
  2. प्रवर : मूळ संस्थापक ऋषीनंतर त्याच गोत्रात जन्मलेले आणि आपल्या अलौकिक कार्यामुळे जगन्मान्य झालेले अन्य ऋषी. (साधारण प्रत्येक गोत्रात तीन ते पाच प्रवर असतात. हि माहिती मी आमच्या शेंडे गुरुजींच्या गप्पातून ऐकली होती)
  3. वेद : प्रत्येक गोत्राने कुठल्या वेदावर अभ्यास करून प्राविण्य मिळवले ते वेद वेगळे असावेत.  वेद जरी चारच असले तरी सर्व गोत्रांनी त्यात आपापले प्राविण्य कमावले असावे. आणि कदाचित दोन किंवा अधिक गोत्रात एकापेक्षा जास्त वेदाध्ययन प्रचलित असावे. (हा माझा तर्क आहे)
  4. शाखा : सर्व ब्राह्मणांना एक जरी सांगितला तरी अख्खा वेद आत्मसात करण्यास लागणारा वेळ आर्थिकदृष्ट्या खर्चिक असावा म्हणून वेदाच्या एकाच शाखेत पारंगत असणे देखील मान्य केले असावे. मग ओळख सांगताना शाखा सांगणे क्रमप्राप्त होत असेल.


याशिवाय वेदाच्या शाखेचे सूत्र, आराधनेची देवता, अभ्यासाला बसण्याची दिशा, शेंडी बांधण्याची पद्धत, पाय धुण्याची पद्धत, यासारख्या गोष्टी देखील ब्राह्मणाला आपल्या पूर्वजांशी नाते जोडून स्वतःचे वांशिक आणि सांस्कृतिक सातत्य आणि त्यामुळे येणारी शुद्धतेची व श्रेष्ठ्त्वाची भावना टिकवण्यासाठी मदत करत असाव्यात.

जितके तुमचे वर्णन, तुमची ओळख अचूक तितके तुम्ही शुद्ध किंवा उच्च संस्काराचे आणि म्हणून तुमचा अधिकार अधिक श्रेष्ठ अशी काहीशी योजना गोत्र या संकल्पनेमागे असावी ह्या अनुमानापर्यंत मी पोहोचलो.

पण मग खरं तर श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी संस्कृतीची शुद्धता टिकवायची, भेसळ टाळायची तर सगोत्र विवाह निषिद्ध मानण्याऐवजी केवळ सगोत्र विवाह शास्त्रसंमत व्हायला हवेत, अश्या गोंधळात पडून सगोत्र विवाह बंदी मागे वेगळी कारणे असतील या माझ्या गृहितकाला बळकटी आली.

याशिवाय कुणीतरी पारश्यांचा उल्लेख केला तेंव्हा हे देखील जाणवले कि अग्निपूजक पारशी लोकांशी आर्य खूप जवळचे होते मग पारश्यांच्या लग्नाच्या चालीरीती उचलण्यास त्यांनी केलेल्या कुचराईने माझ्या मनातील सगोत्राचा आणि inbreeding चा अखेरचा धागा देखील तोडून टाकला.

कुणीतरी इस्टेटीच्या वाटणीसंदर्भात बोललेले वाचले. आणि मग एस एल भैरप्पांच्या वंशवृक्ष आणि पर्व या पुस्तकात त्यांनी केलेला बीजक्षेत्र न्यायाचा उहापोह आणि इरावती कर्वे बाईंचे बरेच लेख आठवले.

मला वाटते की मूल कुणाचे ? बीजाचे की क्षेत्राचे? वडिलांचे कि आईचे हा प्रश्न आजच्या पितृसत्ताक पद्धतीत सुटल्यासारखा वाटतो कारण जवळपास जगभर सर्व संस्कृतींनी मूल बीजाचे - बापाचे असे मान्य केले आहे…. तरीही जगाच्या काना कोपऱ्यात काही काही ठिकाणी  मातृसत्ताक पद्धतीचे अवशेष विखुरलेले आहेत आणि तिथे मूल आईचे किंवा क्षेत्राचे मानले जाते …

आर्यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण भारतातील बऱ्याच भूभागात मातृसत्ताक पद्धती होती. विशेषतः पूर्व किनारपट्टीची आणि दक्षिणेची राज्ये आणि ईशान्येकडच्या प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धतीचे पूर्णपणे विकसित रूप वापरत होते. म्हणजे मूल आईचे. सर्वजण आपल्या आईच्या म्हणजे मामाच्या - मावशीच्या घरी राहणार. नवरे मंडळी आपापल्या बायकांना भेटून पुन्हा आपापल्या आईकडे किंवा मामाकडे - मावशीकडे येवून राहणार. स्त्री स्थिर आणि पुरुष संचारी अशी हि रचना. घरात भरपूर असलेल्या स्त्रियांत आया बहिणींचे नाते. या रचनेत कुटुंबाचा आकार छोटा न राहता मोठा होत जातो आणि हे शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये खूप फायद्याचे ठरते.

याउलट आर्यांच्या पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये स्त्री संचारी आणि पुरुष स्थिर. मूल बापाचे. म्हणजे बापाकडे राहणार. फक्त मुली लग्न करून दुसऱ्या घरी जाणार. सून म्हणून. मग एका घरात जास्त सुना. मग अधिकारांची भांडणे. मोठ्या मुलाची अरेरावी धाकट्यांची मुस्कटदाबी आणि बाहेरून आलेल्या सुनांचे वेगळे होण्यासाठीचे प्रयत्न यातून कुटुंबाचा आकार मातृसत्ताक पद्धतीच्या तुलनेने लहान राहतो. शिकारी आणि गोपालक समूहांमध्ये टोळीचा आकार छोटा असल्याने होणारे फायदे जास्त म्हणून हि पद्धत आर्यांच्या टोळ्यांना भावली असावी. पुढे आर्य जरी स्थिरावले आणि त्यांची पुरुषसत्ताक पद्धत शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये थोडी अडचणीची वाटली तरी यात वेगळे बिऱ्हाड थाटण्याची संधी फार लवकर मिळू शकत असल्यामुळे आणि स्वातंत्र्याची नैसर्गिक ओढ लवकर पूर्ण करता येऊ शकत असल्यामुळे शेती करणाऱ्या आर्यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करत विभाजनाचा मार्ग मोकळा ठेवत स्त्री आणि पुरुष सत्ताक पद्धतींच्या फायदेशीर बाबींचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला.

कदाचित स्वातंत्र्य आणि स्वार्थ या नैसर्गिक प्रेरणांना पूरक अश्या धारणांमुळे आणि आधुनिक यांत्रिक जगाच्या छोट्या कुटुंबाच्या मागणीमुळे हि पद्धत स्त्री सत्ताक पद्धतीपेक्षा जास्त लवचिक असल्याने विजयी ठरली. आणि आता भारतापुरतं बोलायचं झाल्यास  काही वन्य जमाती आणि तुरळक भूभाग सोडल्यास मातृसत्ताक पद्धत बऱ्यापैकी नामशेष झाली आहे.

मग याचा आणि लग्नाचा काय संबंध ?

आपण आधुनिक जगातील प्रेमळ माणसे लग्नसंस्थेला जरी प्रेममय आणि पवित्र मानत असलो आणि आपल्या या सात जन्मांच्या गाठीला सत्यवान सावित्रीच्या कथेचा किंवा हरतालिकेच्या आणि सोळा सोमवारच्या व्रताचा आधार असला तरी तो लग्न संस्थेच्या उगमाइतका प्राचीन नाही.

लग्न हि दोन कुटुंबांना जोडणारी, त्यांच्या मनुष्य संपत्तीत आणि स्थावर जंगम मालमत्तेत युद्ध न करता, चोरी न करता, राजरोसपणे भर टाकणारी महत्वाची आर्थिक आणि सामाजिक योजना आहे.  आपण तिला धार्मिक स्वरूप दिले तरी त्याच्यामागच्या परंपरा आर्थिक आणि सामाजिक आहे.

पुरुषसत्ताक असो व मातृसत्ताक कुठल्याही पद्धतीमध्ये संपत्ती वाढवण्यासाठी नवीन घर जुळणे आवश्यक. मग पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये काका जर आपल्याच घरी रहात असेल तर त्याच्याशी सोयरिक करून काही फायदा नाही पण आत्या चालते कारण ती दुसऱ्या घरात गेलेली असते.

मामा चालतो कारण तो दुसऱ्या  घरातून मुलगी देतो… राहता राहिली मावशीची मुलगी. ती दुसऱ्या घरातून येत असल्यामुळे खरं तर चालायला पाहिजे पण इथे माझ्या मताप्रमाणे मातृसत्ताक पद्धत आपलं अस्तित्व दाखवून देते … आणि मावशी म्हणजे मातृसत्ताक पद्धतीमध्ये त्याच घरात राहणारी म्हणजे नवीन घर जोडले जाणार नाही, म्हणून कदाचित  मावशीची मुलगी न चालणे आपल्या सरमिसळ झालेल्या समाजात प्रचलित झाले असणार.

इथपर्यंत वाचत खरंच पोहोचला असशील तर तुला मनापासून धन्यवाद आणि तुझ्या सहनशक्तीचे कौतुक करून, मी डोंगर पोखरून उंदीर काढलाय का? या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये दे , हि विनंती. (ही पोस्ट फेसबुक वर १३ ऑगस्ट ला टाकली होती, आणि त्यावर प्रवीण क्षीरसागर या माझ्या अमेरिकास्थित मराठी मित्राने तिथेच कमेंट करून अजून चर्चा देखील केली होती. ही त्या मूळ पोस्टची लिंक.)

प्रवीण शिवाय इतर वाचक जर कोणी असतील आणि या विषयावरील मी वर मांडलेल्या विचारांत, तर्कात, गृहीतकांत आणि कल्पनेत जर काही विसंगती आढळली किंवा माझी कुठली चूक आढळली तर जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली ती सुधारून घ्यायला मला आवडेल.

No comments:

Post a Comment