Wednesday, February 10, 2016

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)

--------------------------------------------------
सकाळी अलार्म व्हायच्या आधी उठू लागलो. अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एक नवीन कारण मिळाले होते. जिमला जाण्यासाठी. घाम गाळण्यासाठी. ट्रेडमिलवर धावण्यासाठी. जास्तीची वजने उचलण्यासाठी. सिट अप्स मारण्यासाठी. Reunion - फुलराणी. जिममधून बाहेर पडून समोरच्या कबुतरखान्याजवळ लावलेल्या अॅक्टीव्हाला किक मारताना जेंव्हा कबुतरे उडायची तेंव्हा मला बाहुबली मी असल्याचा भास होऊ लागला. आणि कानात “धीवरा” गाणे घुमू लागले.


इतके दिवस, “इतके रुसवे फुगवे आणि भांडणे आहेत म्हणजे नक्की एकता कपूर ने बनवली असावी” असे म्हणत मी हिणवत असलेल्या खंडोबाच्या सिरिअल बद्दल मला उगाच ममत्व वाटू लागले. बानूबाई थोड्याश्या फुलराणी सारख्या दिसताहेत असे वाटू लागले. मी जिम मधून आल्यावर जेंव्हा माझी म्हाळसा दार उघडत असे तेंव्हा ती कधीही,  


रुसला का मजवरी मल्हारी
रुसला का मजवरी जी
बानू नार आणली घरी मल्हारी
रुसला का मजवरी जी


असे काहीतरी म्हणायला सुरवात करेल असे वाटू लागले.


आरशासमोर उभे राहून मी कुठल्या कोनातून गोजिरवाणा रविकर वाटू शकतो त्याचा अंदाज घेऊ लागलो. आपले केस अजून सुद्धा रुपेरी न होता आणि मैदान सोडून माघार न घेता टिकून आहेत याचा अभिमान वाटू लागला. अजून Reunion ला चार पाच दिवस होते. मग केस जरा नीट कापून घ्यायचे मनात आले.  संध्याकाळी टिप टॉप हेअर कटिंग सलून वाल्याकडे गेलो. गेली जवळपास वीस वर्षे मी इथेच जातो, दर महिन्याच्या पिकाची कापणी करून घ्यायला. तिथे बसल्या बसल्या पेपरामधली शब्दकोडी सोडवून टाकायच्या माझ्या सवयीमुळे तिथल्या मालकाला, संतोषला मागे बक्षीसे देखील मिळाली होती. त्यामुळे त्याला मी फार आवडतो.  नेहमी  शनिवारी केस कापायला येणारं गिऱ्हाईक असं आडवारी आलेलं पाहून तो खूष झाला. "काय मोरे सर? आज काय विशेष वाटतं?"  त्याच्या खुशीमुळे खूष  होऊन मी खरे कारण सांगितले. म्हणालो, "अरे, शाळेचं Reunion आहे या रविवारी. जरा चकाचक करूया म्हणून आलो तुझ्याकडे." मग संतोषच्या हातात माझे डोके  देऊन मी शांतपणे आरशात माझे हसरे प्रतिबिंब पहात बसलो. आता संतोषच्या कृपेने वळणदार दिसणारे माझे केस, शाळेत असताना मात्र असे नव्हते. भुरभुरे जावळ काढताना काय घोटाळा झाला होता कुणास ठाऊक पण नंतर कायम माझे केस भारतातील असंख्य वेगवेगळ्या संस्थानांप्रमाणे एकमेकांशी फटकून स्वतंत्रपणे उभे रहात होते. आणि माझ्या शाळकरी वयाच्या वेळचे सलूनवाले अगदी बारीक कटिंग करून त्या सर्व केसांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यास मदत करीत होते.


त्यातला एक वृद्ध कारागीर तर अजून लक्षात आहे. त्याला डोळ्यांनी थोडे कमी दिसत असे. त्यामुळे मोठी माणसे त्याच्याकडे जात नसत. आणि आमच्या सारख्या चिल्ल्या पिल्ल्यांची त्याच्याकडे रवानगी होत असे.  डोळ्याने अंमळ अधू असलेल्या या कारागिराला मी गेलो की फार चेव चढायचा  आणि गेल्या जन्मी "दोन बोके, माकड आणि लोण्याचा गोळा" या गोष्टीतला त्याने केलेल्या माकडाच्या रोलचा कैफ अजून उतरला नसल्यासारखा तो कायम आधी उजवीकडचे कापायचा मग डावीकडचे थोडे जास्त…. मग पुन्हा सारखे करण्यासाठी, थोडे अजून उजवीकडचे… मग पुन्हा डावीकडचे…. असे करता करता साळिंदराच्या काट्याने भरलेले डोके दिसू लागले की तो थांबायचा कारण, अधू दृष्टीमुळे न दिसणारे सत्य त्याच्या हाताला बोचू लागायचे आणि मग तो त्या कैफातून भानावर यायचा.…. त्याचा एक फायदा झाला की एन सी सी च्या शिंपी सरांनी मला केसांसाठी कधी फटके मारले नाहीत.


आता त्या कारागीराच्या  तावडीतून सुटलो आहे याचा आनंद होऊन मी स्मितहास्य करीत बसलो असताना संतोष म्हणाला, "मोरे सर, थोडे काळवंडलात. असे गेलात Reunion ला तर चांगले दिसणार नाही. माझं ऐका. फेशिअल आणि ब्लिचिंग करून घ्या. जरा चेहरा फ्रेश वाटेल." मी हो म्हणणार होतो. पण तेव्हढ्यात सलून मधल्या टी व्हीवर मेहमूद चे गाणे लागले "हमें काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं. आणि मी भानावर आलो. आणि शेहनाझ हुसेन नावाच्या बाईने स्वतःच्या चेहऱ्यावर न वापरता केवळ जनकल्याणासाठी बनवलेल्या मलमांचा, लेपांचा आणि इतर द्रव्यांचा मारा दोन तीन तास सहन करावा लागेल या कल्पनेने घाबरून शेवटी मी नाही म्हटले. लग्नानंतर पंधरा वर्षानी का होईना पण मोरे सरांचा खिसा हलका करता येईल या विचाराने संतोषच्या चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदावर मेहमूदने विरजण पाडले. आणि मी कापलेल्या केसांचे हलके डोके घेऊन घरी पोहोचलो.  जिमच्या सहाय्यकाचा मेसेज आला होता. उद्या सकाळी लवकर या, वजन आणि मापे घ्यायची आहेत. भरपूर घाम गाळला असल्याने आकारमान आणि वस्तुमान दोन्ही कमी झाले थोडा विश्वास होता पण तरीही काळीज धडधडले.

------------------------------------------------

No comments:

Post a Comment