--------------------
माझ्या मते, जगाच्या इतर कुठल्याही भागात नसेल इतकी नियमितता आणि सातत्याची हौस भारतीय उपखंडातील लोकांना आहे. कदाचित असमान असूनही ठराविक वेळी नित्यनेमाने येणाऱ्या मोसमी पावसाचा आणि त्यामुळे तयार होणाऱ्या नियमित आणि सातत्यपूर्ण हवामानाचा हा परिणाम असू शकेल. मी तर त्याला सातत्याचे व्यसनच म्हणतो. या सातत्याच्या नादात आपण वैयक्तिक आयुष्याचा आलेख कसा असावा यासाठी दीर्घकाळ टिकू शकणारी अशी चार आश्रमांची व्यवस्था तयार केली. ती व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आणि कुटुंबाच्या स्थैर्यासाठी सकारात्मकरित्या परिणामकारक होती. आणि मग हे स्थैर्य, सातत्य अजून नियमित करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक विलक्षण गोष्ट केली, जी जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात एका स्वचालित व्यवस्थेच्या स्वरूपात राबवली गेली नव्हती. काम तसा मोबदला की हक्क तसा मोबदला ?
भारतीय समाजात बलुतेदारांचा मोबदला म्हणजे बलुतं, बलुतेदाराने शेतकऱ्यासाठी केलेल्या कामाच्या प्रमाणात न ठरवता, निश्चित मोबदला हा बलुतेदाराचा हक्क मानला गेला. बलुत्याचा आकार कामाच्या उपयुक्ततेऐवजी बलुतेदाराचे समाजव्यवस्थेतील त्याचे स्थान आणि त्याची कौटुंबिक गरज यावरून ठरू लागला. पीक कितीही आले तरी बलुतं ठरल्याप्रमाणे देण्याचे बंधन शेतकऱ्यावर आले. त्यामुळे पूर किंवा दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्याची आणि भरभरून पीक आलेल्या वर्षी बलुतेदारांची पिळवणूक होऊ लागली. निसर्गाच्या लहरीपणामुळे एकाच वेळी समाजातील सर्वांचे नुकसान किंवा समाधान व्हायच्या ऐवजी कधी एका घटकाचे समाधान तर कधी दुसऱ्याचे असा आळी पाळीने समाधानाच्या सातत्याचा आभास करून देण्यात आपले पूर्वज यशस्वी ठरले. ह्या व्यवस्थेचा एक अदृष्ट परिणाम म्हणजे कधी एका घटकाचे नुकसान तर कधी दुसऱ्याचे असा आळी पाळीने नुकसानीच्या सातत्याचा देखील भारतीय समाजात उदय झाला.
त्यापुढील काळात बलुतेदाराचे निश्चित मोबदल्याचे हक्क वंशपरंपरागत होत गेले. वंशपरंपरागत हक्क टिकवण्यासाठी मग लग्न सोयरीकीतच होत गेली. त्यामुळे एका प्रकारचे व्यवसाय ही एका गटाची मक्तेदारी होत गेली आणि भारतात जाती व्यवस्थेचा पाया घातला गेला. इतर जगात भांडवलशाहीमुळे वर्ग तयार होत होते आणि भारतात मात्र जाती तयार होत गेल्या. इतर जगात स्थावर आणि जंगम मालमत्तेवरचे अधिकार मान्य करून भांडवलशाही पुढे प्रवाहित होत होती तर भारतात भांडवलशाहीने, स्थावर जंगमाबरोबरच कामाच्या तंत्राचे अधिकार देखील एकेका जातीच्या स्वाधीन करून स्थिरता मिळवली होती.
---------------------
---------------------
No comments:
Post a Comment