Wednesday, February 3, 2016

‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय

 भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ । भाग ५ । भाग ६ भाग ८
--------------------
देव दैत्य आणि पुरोहित
सुरवातीच्या भटक्या टोळ्या निसर्गपूजक होत्या. यांचे देव म्हणजे सूर्य, चंद्र, पाऊस, वारा, अग्नी अश्या स्वरूपाचे होते. देवांबद्दल भय होते. कृतज्ञता होती  नंतर मातृसत्ताक पद्धतीमध्ये कुटुंबाला स्थैर्य मिळू लागल्यावर निसर्गाला देवी / स्त्री मानले गेले. जुन्या देवांमध्ये उषा, निशा, भू देवी, नदी यांची करूणा भाकली जाऊ लागली. दैत्य / सैतान संकल्पना तयार झाली. शुभ्र पांढरा देव आणि कुट्ट काळा सैतान; स्थैर्य-व्यवस्था म्हणजे देव आणि अस्थैर्य-अव्यवस्था म्हणजे सैतान असे वर्गीकरण होऊ लागले. मग देवांना आणि दैत्यांना  माणसाचे गुण विशेष चिकटू लागले. फक्त अधिक तीव्र आणि विस्तृत स्वरूपात. मग दैत्य पीडा निवारण, आणि देव पूजनाचे विधी तयार होऊ लागले. आणि पुढे आला तो पुरोहितांचा अनुत्पादक वर्ग. ज्याची जबाबदारी इतर उत्पादक वर्गांना घ्यायची होती.

राजा आला
टोळ्या मोठ्या होऊ लागल्या, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली येऊ लागली, पशुधन वाढू लागले आणि मग भांडणे सोडवण्याचे काम, आक्रमण करणाऱ्या इतर टोळ्यांपासून संरक्षण करण्याचे काम करण्यासाठी सर्वाधिकारधारी पूर्णवेळ व्यक्तीची गरज भासू लागली. अंशत: प्रकटलेल्या भांडवलशाहीने सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी राजेशाहीला पुढे येण्यास मदत केली. इतर सर्व गोष्टींप्रमाणे राजेपद देखील वंशपरंपरागत झाले. आणि अजून एक अनुत्पादक वर्ग पुढे आला, सर्वाधिकारी राजांचा अनुत्पादक वर्ग.  अजून पर्यंत केवळ खाजगी मालकी हक्क आणि वंशपरंपरागत हक्क या गुणवैशिष्ट्यांनी आकार घेत असलेल्या भांडवलशाहीने, समाजाच्या स्थैर्यासाठी आणि आपल्या गुण वैशिष्ट्यांना सांभाळण्यासाठी राजाला आपल्यात सामावून घेतले. पुढे सरकारी हस्तक्षेप नको असे म्हणणाऱ्या भांडवलशाहीला सुरवातीच्या काळात स्थैर्यासाठी, विकासासाठी राजा हवा होता.

बांधकाम, पूजा आणि उत्सवांचा बाजार
राजांनी आणि पुरोहितांनी भांडवलशाहीचे पांग फेडले ते बाजाराची निर्मिती करून. देवांची मंदिरे, राजवाडे,पिरामिड्स, किल्ले यांचे बांधकाम, देवळातील पूजाविधी, वेगवेगळे उत्सव आणि पूजा अर्चा यातून ज्याला पुढे थाॅर्स्टीन व्हेब्लेनने आपल्या "The Theory of Leisure Class" या पुस्तकात "Conspicuous Consumption" म्हणजे "उल्लेखनीय किंवा लक्षवेधी उपभोग" असे वर्णन केले तशी जीवन पद्धती जगून समाजातील इतर घटकांना काम दिले, आशा दिली, स्वप्ने दिली. स्थिरतेचा आभास दिला. मग स्वयंपूर्ण गावांतून इतर जगाशी व्यापार सुरु झाला. आणि त्या व्यापारी मार्गांना संरक्षण देण्याचे काम राजे करू लागले.  पुढे जायच्या आधी एक नोंद करून ठेवतो की सोयरीकीतच  होणाऱ्या लग्नसंबंधांमुळे भारतात पुरोहित आणि शस्त्रधारी शासक या दोन्ही वर्गात देखील अनेक जाती आणि पोटजाती निर्माण झाल्या.

भांडवलशाहीच्या बळावर राजेशाही, सामंतशाही पुढे आली. राजासोबत सरदार, जहागीरदार, सरंजमदार आणि जमीनदार लोकांनी उत्पादनाच्या नैसर्गिक साधनांवर कब्जा केला. पुरोहित वर्ग अनुत्पादक असतानाही आरामाचे जीवन जगत होता. त्याच्या मालकीची उत्पादन साधने कमी होती. पण समाजाच्या वागण्यावर त्याचे चांगलेच नियंत्रण  होते. समाजावर नियंत्रण कुणाचे असावे पुरोहितांचे की राजांचे हा संघर्ष पुढे येऊ लागला आणि भांडवलशाहीची नवीन गुणवैशिष्ट्ये धारण करण्याची वाटचाल पुन्हा मंदावली.

--------------------
 भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ । भाग ५ । भाग ६ भाग ८

No comments:

Post a Comment