Monday, February 1, 2016

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा

-------------------------------------------------

सध्या जी ए कुलकर्णी काढलेत पुन्हा वाचायला. आज पिंगळावेळ काढलं होतं. ऑर्फिअस, स्वामी आणि यात्रिक या त्यातल्या माझ्या आवडत्या कथा. ऑर्फिअस तर नेहमी हलवून सोडते. ऑर्फिअसची माझी ओळख झाली ती सातवी की आठवी मधल्या इंग्रजीच्या धड्यामुळे. Orpheus and Euridice. बर्वे बाई होत्या शाळेत इंग्रजीला आणि क्लासला ऐनापुरे बाई. छान शिकवायच्या  दोघी. हा धडा काही फारसा आवडला नव्हता, पण त्यातल्या ऑर्फिअसची देवाने केलेली कोंडी मनात कुठेतरी बोचली होती.  ग्रीक शोकांतिकेची  पहिलीच भेट आणि तितकीशी न आवडलेली.


कथा एकदम साधी.


एक होता ऑर्फिअस. उमदा ग्रीक तरूण संगीतविशारद. ग्रीकांचं लायेर नावाचं वाद्य वाजवण्यात तज्ञ. संगीताचा देव अपोलोने त्याला आपले सोनेरी लायेर दिलेले होते.


त्याच्या संगीतात असली जादू कि हिंस्त्र प्राणी आपला मूळ स्वभाव विसरून एकचित्त होऊन त्याचं संगीत ऐकत बसायचे. पशु, पक्षी, झाडे, वेली सगळेच गुंग व्हायचे इतकेच काय अगदी वारा सुद्धा शांत व्हायचा, ऊन शीतल व्हायचे, फुलं फुलायची, फळं फळायची वगैरे वगैरे. असले मंत्रमुग्ध करणारे सूर त्याच्या लायेर मधून निघायचे.


या ऑर्फिअस चं लग्न  ठरतं मग एका सुंदर तरुणीशी, युरीडीसी तिचं नाव. लावण्यवती आणि नाजूक वगैरे असलेली युरीडीसी आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या कलेमुळे प्रचंड  खूष असते आणि ऑर्फ़िअस, यौवनाने मुसमुसलेल्या आपल्या सुंदर वाग्दत्त वधू बरोबरच्या भावी सहजीवनाची सुंदर स्वप्ने पहात असतो.


लग्नाच्या दिवशी अरीस्टौस नावाचा देव युरीडीसीचा पाठलाग करतो आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी युरीडीसी गवतातून धावत जाताना तिला एक विषारी साप चावतो. एक निरीक्षण आहे, की बऱ्याच गोष्टींमध्ये नायकाला किंवा नायिकेला पूर्ण ज्ञान किंवा आयुष्याची क्षणभंगुरता असल्या गोष्टी समजावण्यासाठी सापच येत असतो. असो हे विषयांतर झाले.  


तर मी काय म्हणत होतो, युरीडीसिला साप चावतो आणि ती एकदम मरून जाते. ऑर्फिअस वेडापिसा होतो. तो त्याचे लायेर बाहेर काढतो आणि युरीडीसीच्या कलेवराजवळ बसून दु:खाचे आर्त, करूण सूर काढू लागतो.  ते सूर ऐकून अप्सरा आणि देव शोकाकुल होतात आणि त्याला पाताळलोकात जाऊन युरीडीसीला परत घेऊन येण्याचा सल्ला देतात. होणारी बायको गमावलेला ऑर्फिअस पाताळलोकात सदेह जाण्यासाठी प्रवासाला निघतो. अनेक संकटातून तो पाताळलोकाच्या दाराशी सदेह पोहोचतो. तिथे त्याला भेटतो केरव्हेरोस हा तीन डोकी, सिंव्हाचे पंजे, विषारी सापांची आयाळ आणि शेपूट, असलेला भयंकर कुत्रा. पण स्वर्गीय संगीताच्या जोरावर तो कुत्र्याकडून मृत्यूदेवाच्या दरबारात जायची परवानगी मिळवतो .


मृत्युदेव प्लुटो (ज्याचे दुसरे नाव हेडस) आणि त्याची बायको पर्सिफोन दोघेही चकित. अरे हा मानव सदेह इथपर्यंत आलाच कसा? मग आपला ऑर्फिअस सगळी कहाणी सांगतो आणि म्हणतो की माझी बायको मला परत द्या.  देव म्हणतो शक्य नाही इकडे यायच्या मार्गाला परतीची वाट नाही. मग ऑर्फिअस आपलं लायेर काढतो. सुंदर संगीत, अवर्णनीय संगीत, काळजाला हात घालणारं संगीत, स्वर्गीय संगीत, कुणी कधी ऐकले नसतील असे सूर. पाताळलोकातला मृत्यूचा दरबार देखील चैतन्याने भरून जाईल असले अमर संगीत ऐकून पर्सिफोनचे हृदय विरघळते आणि ती आपल्या पतीला, प्लुटोला म्हणते की इतक्या अलौकिक प्रतिभेच्या माणसासाठी आपला नेहमीचा नियम बदलूया आणि त्याची बायको त्याला परत करूया.


आता या पर्सिफोनची वेगळीच कहाणी. आकाशाचा, वीज आणि वादळांचा देव झ्यूस आणि शेती आणि सुगीची देवी डिमीटर यांची हि कन्या. अपोलो आणि हेर्मेझ हे देव तिच्या प्रेमात पडतात आणि तिला मागणी घालतात पण त्या दोघांचाही (दुसऱ्या बायकांकडून) बाप झ्यूसच असतो, म्हणून बहुतेक या दोघांनाही आई डिमीटर नकार देते. इकडे मृत्युदेव प्लुटोला पर्सिफोन आवडते म्हणून तो पाताळलोकातून जमीन फोडून बाहेर येउन कुरणात फिरणाऱ्या अल्लड पर्सिफोनला उचलून, पातळलोकात घेऊन जातो. पाताळलोकात पर्सिफोन सदेह पोहोचते. आई डिमीटर चिडते. म्हणते मी पृथ्वीवर कुठे सुगी येऊच देणार नाही. मग सर्वसाक्षी सूर्यदेव डिमीटरला सांगतो कि पर्सिफोनला प्लुटो पातळ लोकात घेऊन गेला आहे.


सुगी नाही, अन्नावाचून हवालदिल लोक देवाचा धावा करतात. शेवटी झ्यूस प्लुटोला सांगतो की बाबारे डिमीटरला शांत करून लोकांचे हाल थांबवण्याचा एकच उपाय आहे, तू पर्सिफोनला परत कर. प्लुटो डोकेबाज. तो पर्सिफोनला जायच्या आधी पाताळलोकातलं डाळिंब खायला देतो आणि तिला पाताळलोकातून परत आईकडे पृथ्वीवर पाठवून देतो. ती वर येते पण सगळ्यांना कळते कि तिने पाताळलोकामधले अन्न खाल्ले आहे मग ती पृथ्वीवर कायम राहण्यास अयोग्य ठरते. आणि सहा महिने पृथ्वीवर आणि सहा महिने पाताळात असा तिचा आयुष्याचा प्रवास सुरु होतो. म्हणून तिला फळ फळावळ आणि भाज्यांची देवी म्हणतात. जी पृथ्वीच्या पोटातून सहा महिने बाहेर येते आणि नंतर परत पाताळलोकात परत जाते. मला वाटते स्वतःची असली विलक्षण कहाणी असल्यामुळेच पर्सिफोनला पाताळलोकात सदेह आलेला ऑर्फिअस आणि त्याच्या प्रेमाबद्दल कौतुक वाटले असावे.


पुन्हा विषयांतर झाले.  तर मी काय म्हणत होतो, प्लुटो युरीडीसीला परत करायला नाही म्हणतो पण शेवटी नरमतो. पण देवच तो,  त्यातही प्लुटो. मग यावेळी डाळिंब नाही देत खायला, पण एक मेख मारून ठेवतो. म्हणतो, "ऑर्फिअस, जा तुझ्या लाडक्या युरीडीसिला घेऊन फक्त एका अटीवर की पाताळलोकाच्या वेशीला ओलांडून वळेपर्यंत मागे वळून पाहायचे नाहीस. जा आता पण लक्षात ठेव,  मागे वळून पाहशील तर युरीडीसी पाताळलोकात कायमची परत येईल. "


ऑर्फिअस खूष. त्याला वाटलं जिंकलो. निघाला पठ्ठ्या पृथ्वी लोकाकडे. बायको मागून येते आहे. लांबलचक, अंधारा, कंटाळवाणा प्रवास संपवून आता सूर्यप्रकाश दिसू लागला. आली पृथ्वी जवळ. प्रवासाचा शीण संपू लागला. मन अधीर होऊ लागले. कधी एकदा रस्ता संपतोय आणि पृथ्वीवर कधी पोहोचतोय असं झालं त्याला. धावू लागला . आता वेस ओलांडली कि सुखी संसार सुरु. सुंदर युरीडीसी, सुंदर संगीत, सुंदर आयुष्य. मृत्यूच्या तोंडातून सोडवून आणलेले जीवन.


पण मग मागे वळून न बघण्याची अट मोडली जाते आणि युरीडीसीला पाताळलोकात परत जायला लागते.  पण अट का मोडली जाते याची कारणे मात्र अनेक मिळतात.


पुढे काही लिहायच्या आधी वर आलेल्या ग्रीक वस्तूंच्या, देवांच्या नावाचे स्पेलिंग देऊन ठेवतो.  म्हणजे माझ्या उच्चारांमुळे वाचकांच्या आकलनात बाधा येणार नाही.


लायेर (Lyre): ऑर्फीयसचे वाद्य
अरीस्टौस (Aristaeus) : युरीडीसीचा पाठलाग करणारा देव   
केरव्हेरोस (Cerberus) : पाताळलोकीच्या दारावरचा रक्षक कुत्रा
प्लुटो (Pluto) : मृत्यूचा देव
हेडस (Hades) : मृत्यूदेव प्लुटोचे दुसरे नाव
पर्सिफोन (Persephone) : मृत्यूदेव प्लुटोची पत्नी
झ्यूस (Zeus) : वीज आणि वादळांचा देव, डिमीटरचा नवरा आणि वेगवेगळ्या पत्नीकडून पर्सिफोन, अपोलो आणि हेर्मेझ चा पिता
डिमीटर (Demeter) : शेती आणि सुगीची देवी, झ्यूसची पत्नी आणि पर्सिफोन ची आई
अपोलो (Apollo) : झ्यूसचा वेगळ्या पत्नीकडून झालेला मुलगा आणि खेळांचा देव
हेर्मेझ (Hermes) : झ्यूसचा वेगळ्या पत्नीकडून झालेला मुलगा आणि खेळांचा देव
सूर्यदेव (Helios) : पर्सिफोनला प्लुटो पाताळात घेऊन गेला हे डिमीटरला सांगणारा देव

--------------------------------

1 comment: