-----------------------------------------------------
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो. रात्री जेवल्यावर शतपावली म्हणून नाक्यावरच्या पानपट्टीवाल्यापर्यंत चालायला जाऊ लागलो होतो. मग पानपट्टीवाल्याने आग्रह केला म्हणून रोज रात्री पान खाणे चालू झाले. हिने विचारले तेंव्हा, गुलकंद घातलेले पान घशाला चांगले इतके बोलून मी तो विषय घाई घाईने संपवला.
बाहेरचे खाणे बंद केले होते. फारच इच्छा झाली तर घरी आणून खात होतो. एक दिवसआड पाणीपुरी खाण्याचे बंद करायचे ठरवले. तसे मी प्रजापती पाणीपुरी वाल्याला बोललोसुद्धा. त्याचे हात थरथरले. दोन पुऱ्या त्याच्या हातातंच फुटल्या. पाणीपुरी मी खात असतानादेखील त्याला ठसका बसला. "साब अभी पंधरा सालसे खा रहे हो… आप ऐसा बोलोगे तो मै किसकी तरफ देखनेका?" असे जेंव्हा तो म्हणाला तेंव्हा मला त्याच्या पाण्याने डबडबलेल्या डोळ्यात त्याची कच्ची बच्ची दिसू लागली. म्हणून मग केवळ त्याच्या त्या मला कधीही न भेटलेल्या बाळांच्यासाठी मी आठवड्याच्या शेवटी एकाच दिवशी तीन प्लेट पाणीपुरी खाणे चालू केले.
आधी भात सोडायचे ठरवले होते. तसे मी घरगुती ऋजुता दिवेकरला सांगितले देखील. त्यावर तिने काहीही प्रतिक्रिया न देता "बरं" इतकेच म्हटले. पान प्रकरणानंतर ती थोडी अबोल झाली होती. मी देखील जास्त काही न बोलता स्वयंपाकाच्या मावशीना भात कमी लावण्यास सांगितले. दिवसअखेरीस मला जाणवले की स्वतःची कुठली अशी खास चव नसलेला ह्या अन्नघटकाचे मला व्यसन लागले आहे. दारू, चरस, गांजा सोडताना लोकांना प्रचंड त्रास होतो हे ऐकून माहित होते. पण तसला अनुभव मलापण येईल याची कधी कल्पना देखील केली नव्हती. काही केल्या पोट भरल्यासारखे वाटेना. चार पोळ्या जास्त खाउन देखील पोट रिकामेच वाटू लागले. ही तर काहीच बोलत नव्हती. दोन दिवस पोटाचे हे रिकामपण सहन करून सगळे शेवटी असह्य झाले आणि मित्राला माझी व्यथा सांगितली तर तो म्हणाला अरे गरम भात जास्त जातो, म्हणून तू गरम भात खाणे सोड. त्याचे म्हणणे ऐकून मी दुपारचा उरलेला भात रात्री तर रात्रीचा उरलेला भात दुसऱ्या दिवशी दुपारी खायला सुरवात केली. माझी अवस्था बघून, हिच्या नकळत आईने स्वयंपाकाच्या मावशीना थोडा जास्तीचा भात लावायला सांगितले. एक दोन आठवडे हे छान चालले, पण मग माय लेकरांचे प्रेम हिच्या लक्षात आले. तिने काही बोलायच्या आधीच मी शरणागती पत्करली. शेवटी मी एक वेळचा भात सोडावा आणि दिवसातून फक्त दोन कप चहा प्यावा अश्या तहाच्या कलमावर माझी सुटका झाली. चीनला बरेच वर्षे राहून आलेले माझे एक जुने वरिष्ठ सहकारी नेहमी म्हणत की, "आनंद, बायकांनी हळदी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला कधी नाही म्हणू नये." त्यांचे ते वचन म्हणजे यिन का यांग का कुठल्याश्या चीनी ड्रॅगन देवाची मला अप्रत्यक्ष आज्ञा आहे असे माझ्या मनाने घेतल्याने त्या चीनी तीर्थाचे पेयरूप मी दिवसातून साताठ वेळा भक्तीभावाने ग्रहण करीत असे. पण आता एक वेळच्या भाताबरोबर अनेक वेळेच्या चहावर मला पाणी सोडावे लागले. पोट कमी होईल या आशेने मी हे अनशनाचे प्रयोग सहन करीत होतो.
आणि नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी तिसरी प्लेट पाणीपुरी संपवताना जुना शाळासोबती भेटला. त्याने एकदम, "काय इंटरनेटचे लेखक ! आजकाल काय क्लास चालत नाही वाटतं ? बराच वेळ मिळतोय लिहायला … ह्यां ह्यां ह्यां", म्हणत माझ्या पाठीवर, ज्याला धपाटा म्हणतात अशी एक सणसणीत थाप मारली. एका हातात प्लेट तर दुसऱ्या हातात मोबाईल असल्याने मला प्रतिकार करता आला नाही आणि तोंडात भली मोठी पुरी असताना स्मित हास्य करण्याचा प्रयत्न केल्याने, अंजनीच्या सुतासारखा दिसत असताना, मी खांदे उडवून, मान हलवून, प्रजापतीवाल्याकडच्या त्या गर्दीत हलकी उडी मारत त्याला मूक प्रतिक्रिया दिली. त्याला काहीतरी झणझणीत उत्तर द्यावे असे मनात आले पण काही सुचलेच नाही. माझे असे बरेचदा होते, आयत्या वेळी प्रतिक्रिया सुचतच नाही आणि सुचते तेंव्हा मी एकटा असतो.
मला कसे गुंडाळायचे याचा साक्षात्कार माझ्या या मित्राला फार लहानपणीच झालेला होता. म्हणून त्याने सवयीप्रमाणे पुढच्या सगळ्या संभाषणाची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. मग त्याच्या आग्रहावरून, माझ्या खात्यावर, पुढच्या दोन प्लेट पाणीपुरी खाताना कळाले की आमच्या दहावीच्या बॅचला २५ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून आमच्या बॅचच्या काही लोकांनी Reunion चा कार्यक्रम (ह्याचे "पुनर्मिलन सोहळा" हे भाषांतर लिहिताना मलाच लाजल्यासारखे झाल्याने मी इंग्रजी शब्दच वापरला आहे) आखला आहे. नाश्ता, गप्पा, विविध गुणदर्शन, जेवण, खेळ, चहा वगैरे भरगच्च कार्यक्रम असून त्यासाठी माणशी एक गांधीजी अशी वर्गणी द्यायचे ठरले आहे. मी स्वभावाने तसा थोडासा बुजरा असल्याने लगेच हो-नाही न म्हणता नंतर फोन करून सांगतो असे सांगायचा प्रयत्न केला. तर त्यावर, "हो. तुम्ही आता मोठे लोक झालात. आता तुम्ही काय ज्ञानपीठ मिळालेल्या लोकांच्यातच बसणार. आमच्यासारख्या जुन्या मित्रांची आता काय किंमत?" वगैरे हृदयास घरे पाडणारी वाक्ये बोलू लागला. शेवटी, मी Reunionला येणार की नाही याच्या अनिश्चिततेमुळे त्याला होणाऱ्या दुख्खाला कमी करण्यासाठी मी एक गांधीजी त्याच्या हातावर टेकवले आणि घराकडे वळलो.
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment