Tuesday, February 2, 2016

नावाजलेला गुरव...

१५ जुलै २०१५ ला प्रवीण क्षीरसागर ने फेसबुकवर ही पोस्ट टाकली होती.

प्राथमिक शाळेपासून ते नोकरीच्या पहिल्या पाचेक वर्षापर्यंत माझ्याबाबतीत खरी ठरलेली/मला बोलली गेलेली मराठी म्हण -
'नावाजलेला गुरव देवळात हागला'
काय व्हायचं, शाळेत मार्क वैगरे चांगले मिळायचे/नोकरीत काम बरे करायचो. पण वर्षा-सहा महिन्यातून माझ्याकडून असे काहीतरी व्हायचे की.. मला हे ऐकावे लागायचे.

त्याची माझी नवीनच मैत्री झाली होती. त्याला बिचाऱ्याला माझी मैत्रीची विनंती स्वीकारताना माहिती नव्हतं की तो ती विनंती स्वीकारून कशाला निमंत्रण देतोय ते. मी ती पोस्ट वाचली आणि प्रवीणच्या मुसक्या वळायच्या कामाला लागलो. एक लांबलचक उत्तर लिहिलं. आणि फेसबुकवर टाकून दिलं. आता तुम्ही माझ्या तावडीत सापडला आहात तर मग तुम्ही पण ते वाचा.
_______________________________________________________________________________

Pravin Kshirsagar तू सांत्वन करून घेण्यासाठी लिहिलं नाहीयेस हे कळतंय आणि फेसबुक कन्फेशन बॉक्स नाहीये हे पण माहिती आहे …. पण जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि नवीन विचार आले म्हणून तुझी परवानगी न घेता तुझी पोस्ट शेअर करत लिहितोय,
तुझी पोस्ट वाचली आणि, आठवीत संपूर्ण महाराष्ट्र NCC कॅम्पला गेलो असताना परेड स्क्वाड मध्ये सरांचा आवडता म्हणून पुढल्या रांगेत असताना, सार्जंट मिलिंद कुलकर्णी ने "दाहीने मुड" अशी आरोळी दिलेली असताना मी एकट्याने "बाये मुड" केले होते. मग शाळेला परेडमध्ये तिसरा क्रमांक माझ्यामुळेच मिळाला नाहीतर कदाचित पहिला, गेला बाजार दुसरा तरी मिळाला असता म्हणून रडण्यात घालवलेला माझा दिवस आठवला

…. जुडो कराटेमध्ये छान जम्प करतो म्हणून सरांनी सर्व शाळांच्या मुलांसमोरील प्रात्यक्षिकात सगळ्यात पहिल्यांदा जायला सांगितले तर चार मुलांवरून कोलांटी उडी मारताना धडपडलो ते आठवले.

… नववीत वक्तृत्व स्पर्धेत "धर्म म्हणजे काय?" या विषयावर सुरेख भाषण करून विसरून गेलो आणि पाच सहा महिन्यांनी कळलं कि मला पहिलं बक्षिस मिळालंय मग बक्षिस समारंभाला छान नटून थटून गेलो आणि आयोजकांनी घोषणा केली कि प्रथम क्रमांकाचा विजेता कुमार आनंद मोरे आता त्याचे भाषण करेल आणि मग बक्षिस समारंभ होईल. तेव्हा काहीच आठवत नसल्याने घसा कोरडा पडलेला असताना कसे बसे थातूर मातुर भाषण करून रया गेलेल्या चेहऱ्याने व्यासपीठावरून खालती उतरताना सर्व पालकांच्या, "ह्याला कशाला मिळालं बक्षिस, वशिला असेल" असं बोलणाऱ्या बोचऱ्या नजरा चुकवत जागेवर जाऊन बसलो आणि मग हरलेल्या मनाने खाली मान घालून बक्षिस घेऊन घरी आलो ते आठवले

… CA च्या प्रवेश परीक्षेत काय करू नये याच्या ठळक अक्षरात छापलेल्या स्पष्ट सूचना असताना, गणिताचा पेपर सांख्यिकीच्या उत्तरपत्रिकेत आणि सांख्यिकीचा पेपर गणिताच्या उत्तरपत्रिकेत लिहून निकाल लागेपर्यंत प्रेमळ वडिलांच्या जिवाला लावलेला घोर आठवला ….

… मग नवी कार ज्या दिवशी घेतली त्या दिवशी संध्याकाळी अत्यंत जिवलग घरच्या माणसाला दाखवली तेंव्हा त्याने handbreak तसाच ठेवून जोरात acclerator मारला तेंव्हा धूर धूर झाला होता, त्या बिचाऱ्याला काय वाटले असेल….. शेजाऱ्याने त्याच्या बायकोसाठी नवीन activa घेतली आणि त्या दिवशी घरी आलेल्या तिच्या बहिणीने मला बघू मला बघू असे म्हणून ती चालवायला घेतली आणि सर्व बिल्डींगसमोर ती बिचारी नव्या activaला दगडावर ठोकून गटारीत शिरली तेंव्हा तिला काय वाटले असेल …. अगदी विराट कोहलीला आत्ता वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये अनुष्का शर्मा समोर असताना सर्वांसमोर लवकर बाद होऊन पेव्हेलिअनमध्ये परत जाताना काय वाटले असेल …. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तू सांगितलेल्या म्हणीत आहेत ….

आजकाल वाटते कि रतन टाटा म्हणाले तेच खरे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाबरोबरच नशिबाची जोड सुद्धा लागते …. आणि हे नशीब म्हणजे तरी काय ? शेंबड्या पोरात जग जिंकण्याची शक्यता पाहणारे आई वडील म्हणजे नशीब. आपला नवीन भिडू गडबड करतोय हे कळत असताना त्याला सांभाळून घेणारे वरिष्ठ सहकारी म्हणजे नशीब. नवरा प्रमोशन किंवा मोठा पगार जिंकून घरी परत आला नाही तरी त्याला राजा समजणारी बायको म्हणजे नशीब आणि घरची कामे करून थकलेल्या बायकोच्या हातून एखादा पदार्थ बिघडला तरी तुझ्या सारखी सुगरण तूच असे कौतूक करीत मिटक्या मारून खाणारा नवरा म्हणजे नशीब …. मला तर हे पूर्णपणे पटलय कि आपण जितके वाटतो तितके सेल्फ मेड नसतो. किंबहुना आयुष्यात आपल्याला मिळालेल्या किंवा जवळच्या लोकांनी विनाकारण दुसऱ्यांदा दिलेल्या संधीच आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात …


स्खलनशील माणसातले हे उर्ध्वगामी जाण्याचे सत्व अनुभवी माणसांना जाणवते आणि ते दुसरी संधी देतात म्हणून अस्खलित नसलेल्या माणसांच्या हातूनही उदंड कामे होऊ शकतात ….

आधी गुरव होणे महत्त्वाचे … मग नावाजणे महत्त्वाचे …. मग चुकून देवळातच देहधर्म उरकला तर त्यासाठी अपराधी वाटणे महत्त्वाचे …. दुसरी संधी मिळणे हा आपला हक्क आहे असे न समजता मिळालेल्या शिक्षेला निमूटपणे भोगणे महत्त्वाचे …. दुसरी संधी मिळालीच तर तिचे सोने करणे महत्त्वाचे … आणि आपल्याला दुसरी संधी मिळो किंवा न मिळो दुसऱ्याच्या स्खलनानंतर त्याच्यात किमान अपराधबोध आणि विनम्रपणा आढळला तर दुसरी संधी देणे हे आपले समाजदत्त कर्तव्य समजून वागणे तर सर्वात महत्त्वाचे …

No comments:

Post a Comment