Monday, February 15, 2016

मी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)

--------------------------------------------------------


Reunionचा दिवस उजाडला. बायको पोरांची पिकनिक होती, म्हणून त्यांना स्टेशनवर सोडून आलो. तरुण दिसण्यासाठी मी टी शर्ट घालायचे ठरवले. आधी आडव्या रेघांचा टी शर्ट घालून पाहिला, मग उभ्या. पण आरशात दिसणारे रूप काही मनातल्या माझ्या प्रतिमेशी मेळ खाईना. मग चौकडी चौकडीची रचना असलेला टी शर्ट घातल्यावर तर कमरेवरचा भाग अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते काढून ठेवलेल्या पृथ्वीच्या गोळ्यासारखा दिसू लागला आणि मी कुठल्याही रेघा नसलेला प्लेन आणि ढगळ टी शर्ट घालून शाळेसमोर उभा राहिलो. Reunion चौथ्या मजल्यावरील सभागृहामध्ये होतं. मी जिममध्ये केलेल्या सरावाचे स्मरण करत जिना चढून वर गेलो.


मुलींनी छान रांगोळी वगैरे काढली होती. खुर्च्या मांडल्या होत्या. स्टेजच्या मागे पडद्यावर  Reunion चा फ्लेक्स लावला होता. मला उशीरच झाला होता. माझ्याआधी अनेक जण आलेले होते.  माझ्यासारखे कुणी डोंबिवलीमधूनच तर काही मुंबई वरून, काही पुण्यावरून, एक मैत्रीण तर हुबळीवरून असे कोण कोण कुठून कुठून आले होते.  मुली साड्या नेसून तर मुलं झब्बे बिब्बे घालून, सगळे छान दिसत होते. त्यांच्या सगळ्यात, सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ टी  शर्ट घातलेला मी वेगळा दिसतोय असे मला वाटू लागले. पण मग माझे लक्ष जरा बारीक झाले. अनेकांची पोटे माझ्यापेक्षा जास्त सुटली आहेत, कित्येकांच्या केसावर काळाने आपला हात फिरवला आहे हे दिसू लागले. मला थोडे माणसात आल्यासारखे वाटू लागले. मित्रांशी गप्पा मारत होतो. ज्यांना ओळखता येत नव्हते त्यांना खोटी ओळख देऊन ते कोण असावेत याचा अंदाज घेत होतो. नजर तिला शोधत होती. अजून कुठे दिसत नव्हती.


मग चहापान झाल्यावर ओळखीचा कार्यक्रम सुरु झाला. एका दोघांनी छान विनोदी अंगाने स्वतःची ओळख करून दिली. मी विनोदी लिहितो असा प्रचार झाल्याने सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे लागले होते. माझा नंबर आला. पण ती आली नव्हती. मला काय बोलायचे तेच सुचेना. मी काहीतरी बोलून खाली बसलो. एक दोघांनी, हा खरंच लिहितो का दुसऱ्याकडून लिहून घेतो? असे एकमेकांना विचारल्याचे मला ऐकू आले. आता तर मला ती न येण्याचे हायसेच वाटले. ओळखी झाल्या. चहापान देखील झाले. हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला गेलेल्या शिक्षकांना आणि काही मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मी अजूनच उदास झालो.


आणि स्वातीने स्टेजचा ताबा घेतला. ती सध्या योगाचे प्रशिक्षण देण्यात नाव कमावून आहे असे मगाशी कळले होते. तिचा स्टेजवर येण्याचा आवेश पाहून मला उगाचच ती आता सगळ्यांना कपालभाती, प्राणायाम वगैरे करायला लावेल असे वाटू लागले. स्वातीला सगळ्यांचे शाळेतील गुण आठवत होते. मग तिने एकेकाची नावे घेत त्यांना स्टेजवर बोलावत त्यांच्याकडून त्यांचे पूर्वीचे गुण उधळून घ्यायला सुरवात केली. मला स्वातीच्या स्मरणशक्तीचे कौतुक वाटले. तिला केवळ योगबळामुळेच  हे सारे आठवत असावे अशी माझी खात्री झाली. आणि आता जिमनंतर थोडा वेळ योगाभ्यास चालू करायचा आणि ते नाही जमले तर निदान पतंजली ची बिस्किटे आणि नूडल्स खाऊनतरी मेंदूला चालना द्यायची असा निश्चय केल्यावरच माझे मन शांत झाले.


मग  प्रचंड स्मरणशक्तीच्या स्वातीला आठवण झाली की मी गाणी उलटी म्हणायचो. त्याचा आग्रह सुरु झाला. लग्न होऊन पंधरा वर्षे झाल्याने मी उलटे गाणेच काय पण उलटे बोलणे पण विसरलो होतो. शेवटी विसुभाऊ बापटांना मनातल्या मनात नमस्कार करून स्टेजवर गेलो. पण गाणंच आठवेना. मग एकदम शाळकरी गाणं घेतलं. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पाडगावकारांच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि "नाच रे मोराचे" उलटे करून, "चना रे रामो च्याब्याअं तनाव " म्हटले.  आणि खाली बसतच होतो की ओंकार स्टेजवर आला. त्याच्याबरोबर अजून दोन मित्र पण आले. चौघांनी मिळून अश्या वेळी कोरसमध्ये म्हणायचे जगप्रसिद्ध गाणे, की जे म्हटले नाही तर पाप लागते अशी वदंता आहे ते म्हटले. “देखा ना, हाय रे सोचा ना, हाय रे रख दी निशाने पे जान". शिक्षकी पेशात आणि तेही स्वतःच्या क्लासमधला मुख्याध्यापक म्हणून १५ वर्षाहून जास्त काळ काम करीत असल्याने मी या लहानपणीच्या गुणदर्शनाला थोडासा कंटाळलो होतो म्हणून शाळेत तेराच्या, सतराच्या, एकोणीसच्या पाढ्यांना करायची युक्ती केली. फक्त तोंड हलवत राहिलो. आणि “कुक्डू कु ककू….टणॅण ढणॅण णॅक “ च्या वेळी मात्र जोरात ओरडत राहिलो.


स्टेजवरचे कार्यक्रम संपले आणि मांडलेल्या खुर्च्या बाजूला करण्याचे ठरले. मग शरीराने कधीकाळी आणि मनाने अजूनही मुलीच असलेल्या चाळीशीच्या उंबरठ्यावरच्या ललनांनी फेर धरून नाच सुरु केला. गाणे होते, "पंखीडा तू मोतियो की ला बहार रे, मेरे मीत का मै करूंगा श्रींगार रे". हे गाणे मी गेली इतकी वर्षे ऐकतोय की ते ऐतिहासिकच काय पण पौराणिक म्हणून देखील खपेल अशी मला खात्री आहे. मला तर वाटते, हे गाणे वेदातील पहिली ऋचा रचली जाण्याच्या अगोदर रचले गेले असावे. आणि भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तीरी याच गाण्यावर रासलीला करीत असावेत. काही मुलांनी पण फेर धरला. मला पण खेचण्याचा प्रयत्न केला. मी इतका छान नाचतो की प्राथमिक शाळेत असताना कोळीनृत्यात किंवा आदिवासी नृत्यात मी कायम शेवटच्या रांगेत असायचो. चौथीत असताना, “आज गोकुळात रंग खेळतो हरी” च्या नाचात, एक पाय मुडपून एका जागी उभ्या असलेल्या मुरलीधराची भूमिका मी पार पाडल्यानंतर, नृत्याने माझ्या आयुष्यातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे मी दूर उभा राहून अधून मधून टाळ्या वाजवीत राहिलो.


चाळीशीतले माझे मित्र मैत्रिणी, शाळेच्या स्नेह संमेलनातील त्या दरवर्षीच्या गाण्यावर नाचत होते. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.  पण नाचाच्या स्टेप्स बद्दल तसे बोलायला मला खोटारड्या सिंहाचे काळीज लागेल.  ते नसल्याने, त्यांना बघून  मी निश्चय केला की Life of Pi मधल्या Pi ने सांगितल्याप्रमाणे संपलेल्या प्रवासातील साथीदारांकडे मागे वळून पहायचे इथपर्यंत ठीक आहे पण संपलेल्या प्रवासातील गमती पुन्हा करून पहायच्या नाहीत.


मग जेवायची वेळ झाली. डायट कॉन्शस मुली बेतास बात खात होत्या. एकदम सगळे वाढून घेतले तर चांगले दिसणार नाही या विचाराने मी थोडेसेच पदार्थ वाढून घेतले तर काही जण, 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' चा अर्थ शब्दश: घेऊन यज्ञात टाकण्यासाठी समिधा गोळा कराव्यात तश्या लगबगीने ताट भरून घेत होते आणि आपापल्या खुर्च्या पकडून पोटात चेतलेला वन्ही शांत करीत होते. जवळ जवळ अर्धा तास सभागृहात शांतता होती. केवळ खाताना होणारा तोंडाचा आणि वाढताना होणारा भांड्यांचा आवाज येत होता. त्या शांततेचा भंग फक्त तीन वेळा, एकाने वाढताना पळी पाडली, दुसऱ्याने बसताना वाटी सांडली आणि कुणी एकाने वन्ही शांत झाला आहे याची पोचपावती मोठ्याने डरकाळी फोडून दिली तेंव्हाच झाला. माझ्या सुटलेल्या पोटाबद्दल अनेकांनी वाचले असल्याने, मी कमी खाणार असे त्यांनी गृहीत धरले होते. त्यामुळे मी वाढण्याच्या काउन्टर कडे जाऊ लागलो की सगळे आपापले खाणे थांबवून, सिंहाची चाहूल लागली की हरणांचा कळप जसा चरता चरता थांबून, मान उंचावून त्याचा कानोसा घेतो, अगदी तशाच प्रकारे माझ्याकडे बघू लागत. आणि मी अवघडून प्रत्येक वेळी फक्त काकडी, टोमेटो आणि गाजरच घेऊन परत येत होतो.   


जेवणे झाली. मंडळी विखरून बसली. मी पण मित्रांच्या एका घोळक्यात जाऊन बसलो. स्टेजवरून काही जण आपापले जीवनानुभव सांगत होते. कोणी एकमेकांबरोबर सेल्फी घेत होते. नाचगाण्याशिवाय सर्वांनी मिळून दुसरे काहीही करता येण्यासारखे नव्हते त्यामुळे गप्पा गोष्टी, गॉसिप वगैरे सुरु झाले. मी आणि माझे तीन चार मित्र हळूच सटकता येईल काय त्याची चाचपणी करीत होतो. आणि संधी मिळताच निघालो देखील.


Reunion यशस्वी होण्यासाठी अनेकांनी निस्वार्थबुद्धीने मेहनत घेतली होती. त्यामुळे कार्यक्रम छान झाला होता. माझ्या एका मित्राला तर फारच आवडला होता आणि तो खुषीत पुन्हा पुन्हा त्याबद्दल बोलत होता. पुढच्या Reunion चं आयोजन करायला तो तयार आहे वगैरे म्हणत होता. दुसऱ्या एका मित्राला मात्र फारच कंटाळा आला होता. पुन्हा Reunion झाले तर अजिबात येणार नाही म्हणत होता. त्यांची थोडी जुंपली आणि मग मी म्हटलं ज्याला आवडलं त्याने इतरांना आवडलंच पाहिजे अशी सक्ती करू नये आणि ज्याला नाही आवडलं त्याने इतरांना पण आवडलं नाहीच पाहिजे अशी सक्ती करू नये. मी बोललो नसलो तरी माझी स्वतःची अवस्था मात्र "आहे मनोहर तरी गमते उदास" अशीच झालेली जाणवली.  


मी खूष होऊन सुद्धा थोडा उदास का झालोय? त्याचा विचार करताना जाणवले की मला Reunion पेक्षा त्याआधीचे तीन चार आठवडे माझ्या मनात झालेले Re-connection अधिक गोजिरवाणे आणि आनंददायी वाटले होते. कारण त्यात मी माझ्या शाळकरी मित्रांच्या, माझ्या मनातील चित्रांबरोबर खेळत होतो. त्या चित्रांना काळाने अजून धक्का लावला नव्हता. आज त्या अनाघ्रात स्वप्नसृष्टीतील चित्रांना Reunion ने वास्तवाचा धक्का दिला होता.  झाडावर फुललेली फुले त्यांच्या नकळत हळू हळू निर्माल्याकडे वाटचाल करताना दिसू लागली होती.


घरी पोचल्यावर WhatsApp वर मित्रांचे संदेश आणि फोटो बघताना मनात आले की आयुष्याच्या एका वळणावर ज्यांच्याशी आपली ताटातूट होते त्यांच्या बद्दल आपल्या मनातील शेवटचे चित्र आणि जर ते नंतर परत  भेटले तर त्यांचे प्रत्यक्ष अस्तित्व यात  प्रचंड मोठे अंतर असते. आयुष्यातले भले बुरे अनुभव माणसाला हळू हळू बदलवत असतात. ते बदल त्याला स्वतःला जाणवत नाहीत आणि ज्यांच्यादेखत ते बदल घडले त्या आजूबाजूच्या लोकांना देखील ते धक्कादायक वाटत नाहीत. पण अनेक वर्षांनी एकदम भेटणाऱ्याला मात्र ते ठळकपणे जाणवतात. कुणास ठाऊक कदाचित माझ्या जुन्या शाळासोबत्यांनादेखील माझ्यातील, मला न जाणवलेले बदल, अस्वस्थ किंवा आनंदी करून गेले असतील.


आणि मग मला फुलराणी न आल्याचे समाधान वाटू लागले. शाळा सोडून पुढे वाचन वाढल्यावर ग्रेसच्या "ती गेली तेंव्हा रिमझिम" च्या मागची कहाणी आणि वेदना समजल्यावर माझ्या आयुष्यातील आता गोड आणि बालिश वाटणाऱ्या प्रसंगाशी मी जोडलेले नाते तुटले तर होतेच पण शाळकरी वयात नक्की काय आहे ते समजण्यापूर्वीच जे संपले होते त्याचे शेवटचे चित्र धक्का न लागता तसेच राहिले हे छानच की.  कधीच म्हातारी न झालेल्या मधुबालासारखे, मेरिलिन मन्रो सारखे.

समाप्त

---------------------------------------------------------

No comments:

Post a Comment