----------
राजे आणि पुरोहितांची वर्चस्वाची लढाई चालू असतानाच मध्यपूर्व आशियात एकेश्वरवादाचा उदय झाला. मनुष्याचे गुण देवाला अधिक व्यापक प्रमाणात चिकटवण्याच्या उद्योगाने आपली चरम सीमा गाठली. देव पुरुष बनला. आकाशातला बाप बनला. तो ठराविक मुलांशी करार करू लागला.
पुरुषसत्ताक, मूर्तीपूजा नाकारणारा, एकेश्वरवादी लोकांचा पंथ
ज्यांना अब्राहम पासून सुरु झालेले धर्म म्हणतात त्यांना समाजधारणा करण्यासाठी, माणसाने माणसाशी कसे वागावे याची दहा कलमी आज्ञावली (दशसूत्री किंवा Ten Commandments) इजिप्त मधून बाहेर पडल्यानंतर सिनाईच्या पर्वतावर प्रत्यक्ष देवाकडून मिळाली असेल. पण त्याआधी आकाशातल्या बापाशी बोलण्याची, त्याच्या आज्ञा मानण्याची आणि मोडण्याची त्यांची परंपरा होती. स्त्रीच्या इच्छेने, खाल्लेल्या ज्ञानवृक्षाच्या फळाने देवाची आज्ञा मोडली गेली आणि माणसाला आकाशातल्या बापाच्या रोषाला बळी पडावे लागले या पहिल्या पापाच्या पायाभरणीवर एकेश्वरवादाच्या पुरुषसत्ताक धर्माची उभारणी झाली.
सुरवातीला हा एकेश्वरवादी धर्म, एखाद्या पंथाच्या स्वरूपात होता. त्याला फारसे सामाजिक आणि आर्थिक परिमाण नव्हते. अब्राहमच्या वयाच्या शंभराव्या वर्षी आणि त्याची पत्नी साराच्या वयाच्या ९०व्या वर्षी त्यांना देवाच्या कृपेने पुत्र झाला तो इसाक किंवा आयझॅक, या इसाकचा पुत्र जेकोब किंवा याकूब या सर्वांनी आपली रेष पृथ्वीवरचा पहिला मानव अॅडम किंवा ज्याला आपण बाबा आदम म्हणतो त्याच्याशी जोडून आपल्या घराण्याच्या वंशावळीचा इतिहास नोंदवून ठेवायला सुरवात केली. या घराण्यातील जवळपास सर्व पुरुष प्रेषित होते. ते देवाशी बोलू शकत होते. त्यांनी काय, कधी आणि कसे करावे याच्या आज्ञा त्यांना प्रत्यक्ष देवाकडून मिळत होत्या. पण त्या आज्ञा माणसाने माणसाशी कसे वागावे आणि समाज धारणा कशी करावी या स्वरूपाच्या नसून, त्या विशिष्ट कुटुंबाने कसे वागावे अश्या घरगुती स्वरूपाच्या होत्या. त्याकाळातील अनेक ईश्वरांना मानणाऱ्या अनेक टोळ्यांमध्ये एका ईश्वराला मानणारी अजून एक टोळी इतकेच त्याचे स्वरूप होते. समाजातील इतर टोळ्यांनी आणि नगर राज्यांनी, देवाची मूर्तीपूजाच काय पण देवाचे नाव देखील घेण्यास तयार नसणाऱ्या ह्या अजून एका टोळीला आपल्यात सामावून घेतले.
सुरवातीला हा एकेश्वरवादी धर्म, एखाद्या पंथाच्या स्वरूपात होता. त्याला फारसे सामाजिक आणि आर्थिक परिमाण नव्हते. अब्राहमच्या वयाच्या शंभराव्या वर्षी आणि त्याची पत्नी साराच्या वयाच्या ९०व्या वर्षी त्यांना देवाच्या कृपेने पुत्र झाला तो इसाक किंवा आयझॅक, या इसाकचा पुत्र जेकोब किंवा याकूब या सर्वांनी आपली रेष पृथ्वीवरचा पहिला मानव अॅडम किंवा ज्याला आपण बाबा आदम म्हणतो त्याच्याशी जोडून आपल्या घराण्याच्या वंशावळीचा इतिहास नोंदवून ठेवायला सुरवात केली. या घराण्यातील जवळपास सर्व पुरुष प्रेषित होते. ते देवाशी बोलू शकत होते. त्यांनी काय, कधी आणि कसे करावे याच्या आज्ञा त्यांना प्रत्यक्ष देवाकडून मिळत होत्या. पण त्या आज्ञा माणसाने माणसाशी कसे वागावे आणि समाज धारणा कशी करावी या स्वरूपाच्या नसून, त्या विशिष्ट कुटुंबाने कसे वागावे अश्या घरगुती स्वरूपाच्या होत्या. त्याकाळातील अनेक ईश्वरांना मानणाऱ्या अनेक टोळ्यांमध्ये एका ईश्वराला मानणारी अजून एक टोळी इतकेच त्याचे स्वरूप होते. समाजातील इतर टोळ्यांनी आणि नगर राज्यांनी, देवाची मूर्तीपूजाच काय पण देवाचे नाव देखील घेण्यास तयार नसणाऱ्या ह्या अजून एका टोळीला आपल्यात सामावून घेतले.
देवदूताशी रात्रभर लढून जेंव्हा जेकोबचे नाव “इझराएल” (देवाशी लढणारा) असे पडले आणि मग त्या मल्लयुद्धाच्या बद्दल बक्षीस म्हणून त्याला देवाच्या नावाने राज्य करण्याचा अधिकार मिळाला, तेंव्हा लोकांनी निवडलेला टोळी किंवा गणप्रमुख किंवा वंशपरंपरागत हक्काने गादीवर आलेला राजा ही रचना सोडून देवाने राज्य दिलेला राजा ही नवी संकल्पना अस्तित्वात आली.
या जेकोबचा मुलगा जोसेफ किंवा युसुफ अक्कलहुशारी, मेहनत आणि कर्म धर्म संयोगाने इजिप्त मध्ये राजा झाला आणि निर्गुण निराकार आकाशातल्या बापाला मानणाऱ्या लोकांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य इजिप्त मध्ये मिळाले. पण दैववशात हे सर्व इझराएल आणि जोसेफचे वंशज शेवटी इजिप्तमध्ये गुलामीच्या अवस्थेला पोहोचले. आणि गुलाम कारागीरांच्या या प्रचंड लोकसंख्येने इजिप्तच्या फॅरोह राजांना आपली प्रचंड आर्थिक ताकद वाढवण्यास मदत केली. आपल्या मुक्तिदात्या प्रेषिताची वाट बघत, जन्मजात गुलामी सोसणाऱ्या या पिढीजात कारागीर लोकांमुळे इजिप्तचे आर्थिक साम्राज्य कमालीचे स्थिर झाले ते जवळपास ३००-३५० वर्ष.
त्याला धक्का दिला तो जन्माने इझराएलचा वंशज असलेल्या पण लहानपणापासून राजवाड्यात वाढलेल्या मोझेसने. राजकुमाराप्रमाणे वाढलेल्या आणि राज्य कसे चालते ते लहानपणापासून शिकलेल्या मोझेसचे जन्मरहस्य माहित झाल्यावर त्याला राजा रॅमसीसने मृत्यूदंड किंवा देशत्याग हे दोनच पर्याय दिले. देशत्याग केलेला मोझेस नंतर इजिप्तला परतला तो देवाच्या आज्ञेवरून. आपल्या सर्व लोकांना (जवळपास ४० लाख) परत घेऊन जाण्यासाठी. मग राजा रॅमसीसने नाही म्हणणे, देवाने चमत्कार घडवणे, शेवटी अत्यंत हानी सोसून रॅमसीसने त्यांना जाण्यास परवानगी देणे. लाल समुद्र दुभंगून या प्रचंड समुदायाला मोझेसने इजिप्त बाहेर काढणे. मग ४० वर्ष वाळवंटात भटकून शेवटी कनानच्या (आजचा इझराएल) देशात परतणे या सर्व कथा सगळ्यांनाच माहित असतील. या गोष्टीतला चमत्काराचा आणि काव्याचा भाग वगळला तर एक आर्थिक भाग माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे.
कुटुंबाचा पंथ ते प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा धर्म
राज्य कसे चालते? ते मोझेस शिकलेला होता. त्याला इजिप्तच्या राज्याच्या स्थैर्याचा आणि आर्थिक भरभराटीचा कणा इझराएलच्या लोकांची गुलामगिरी आहे हे उमगले होते. म्हणून त्याने सैन्यबळ नसताना इजिप्तचे राज्य हादरवले ते ह्या गुलामांना देशाबाहेर काढून. देशत्यागाचा आदेश झुगारून परतलेल्या मोझेसला रॅमसीस राजाचा विरोध हा बाकी कुठल्या कारणामुळे नसून जर मोझेस ची मागणी मान्य केली तर इजिप्तला होणारे आर्थिक नुकसान थोपवण्यासाठी होता, असे मला वाटते.
एका देवाला मानणाऱ्या इतक्या प्रचंड संख्येचा समुदाय एकाच वेळी गुलामीतून मुक्त होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांना वळण लावण्यासाठी मोझेसच्या मदतीला पुन्हा आकाशातला बाप धावून आला. त्याने मोझेसला सिनाईच्या पर्वतावर दहा आज्ञा दिल्या. त्यांचे स्वरूप या चाळीस लाख लोकांच्या समूहाने एकमेकांशी कसे वागावे अश्या स्वरूपाचे होते. अश्या रीतीने अनेक वर्षे एका कुटुंबाचा असलेला पंथ आता धर्मात रुपांतरीत झाला. ह्या धर्माला विस्तारवादी असण्याची आवश्यकता नव्हती. इतर धर्मातून या धर्मात धर्मांतर शक्य असले तरी अश्या धर्मांतराला प्राधान्यक्रम दिला गेलेला नव्हता. कदाचित या धर्माच्या जन्मवेळी असलेली ४०लाख ही प्रचंड लोकसंख्या धर्मांतराच्या मध्ये मोठी अडचण म्हणून येत असावी. असे असले तरी या धर्माने जगात एकेश्वरवादाची मुहूर्तमेढ रोवली.
इथपर्यंतच्या इतिहासात आधी भटकी टोळी आणि टोळीप्रमुख >> मग स्थिरावलेला लोकसमूह आणि गणप्रमुख किंवा राजा >> मग लोकांच्या या समाजाला व्रतवैकल्ये आणि पूजाविधी यातून देवाचे अधिष्ठान मिळवून देणारा पुरोहित वर्ग >> मग राजा आणि पुरोहितांच्या अनुत्पादक वर्गाला पोसणारी नगरराज्यांची व्यवस्था असे नेहमीचे टप्पे सोडून “धर्माच्या आधारे तयार झालेले राज्य” ही या संपूर्ण गोष्टीतली सर्वात महत्वाची आणि नाविन्यपूर्ण घटना होती. धर्म - राज्य - अर्थव्यवस्था एकत्र होऊ लागले. सामाजिक आणि आर्थिक आयुष्यात वंशपरंपरागत हक्कांपेक्षा करारामुळे तयार होणारे हक्क महत्वाचे ठरण्यास सुरुवात झाली होती.
दुसरा एकेश्वरवादी धर्म, त्याच्या प्रेषिताच्या हयातीत आर्थिक, सामाजिक आणि लष्करी ताकद कधीच उभारू शकला नाही. देव तोच ठेवून फक्त नवीन करार करणाऱ्या या धर्माला तेंव्हा फारसे अनुयायी देखील मिळाले नाहीत. इतकेच काय पण हा धर्म आपल्या प्रेषिताला सुळावर गमावून बसला. ह्या धर्माच्या गळ्याला जन्मतःच नख लागले होते पण आपल्या प्रेषिताच्या मृत्यूनंतर जवळपास २०० वर्षांनी राजाश्रय मिळून तो चांगलाच फोफावू लागला. संपूर्ण युरोपात ज्याचे साम्राज्य पसरले आहे अश्या राजाने स्वतःचा धर्म सोडून हा धर्म स्वीकारल्यामुळे नष्टप्राय होत चाललेल्या या धर्माने एकदम बाळसे धरले. या धर्माने एकेश्वरवाद कायम ठेवला. पहिल्या धर्माप्रमाणे एकाच वेळी ४०लाख अनुयायी न मिळाल्याने अधिकाधिक अनुयायी मिळवण्यासाठी या धर्माने धर्मांतराला अग्रक्रम दिला. राजाने धर्म स्वीकारला असल्यामुळे तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार करण्याची या धर्माला सुरवातीच्या काळात काही गरज पडली नाही. या धर्माला राजाश्रय मिळाल्यानंतर नवीन कराराच्या या धर्माची रचना पिरामिडसारखी त्रिकोणी होत जाईल हे ओळखूनच की काय पण त्याला पुरोहितांचेदेखील समर्थन मिळाले. फक्त त्यांचे नाव बदलून आता धर्मगुरू झाले. ते देवाच्या नावाने संपत्ती गोळा करू लागले आणि देवाच्या कडून राजांना - मांडलिकांना अधिकार देऊ लागले.
तिसरा एकेश्वरवादी धर्म, जन्मल्यानंतर तेरा चौदा वर्षे धडपडत होता पण त्यानंतर मात्र त्याने पहिल्या आणि दुसऱ्या धर्मातील उपयुक्त तत्वांना वापरले आणि देव तोच ठेवून अंतिम प्रेषिताची कल्पना पुढे आणली. या धर्माला पहिल्या धर्माप्रमाणे ४० लाख अनुयायी नव्हते, आणि अंतिम प्रेषित असल्याने दुसऱ्या धर्माप्रमाणे अनिश्चित काळासाठी राजाश्रय मिळेल की नाही त्यासाठी वाट पाहणे देखील शक्य नव्हते. म्हणून मग आकाशातल्या बापाचा आदेश पृथ्वीवर राबवण्यासाठी, या धर्माने, एक पाउल मागे टाकत जुन्या छोट्या टोळ्यांप्रमाणे धर्मगुरू आणि राजा ही दोन्ही पदे एकत्र करून टाकली आणि एकेश्वरवादाला एकाधिकारशाहीची जोड दिली. जिथे आवश्यकता वाटली तिथे धर्मप्रसारासाठी आणि धर्म रक्षणासाठी तलवार देखील वापरली. त्यातून युरोप आणि मध्य आशियात धार्मिक आणि राजकीय संघर्ष सुरु झाले. सर्वांना समानता सांगणाऱ्या या धर्माला युरोपात आणि आशियात विस्तार करून झाल्यावर तलवारबाज आणि सैनिकांबरोबर कामगारांची आणि स्थैर्याची गरज भासू लागली. समानता आणि कामाची उतरंड या दोन परस्पर विरोधी गोष्टींची सांगड घालण्यात या धर्माला तात्विक पेच पडू लागले. मग धर्मांतर किंवा मृत्यू या दोनच पर्यायांऐवजी कनिष्ठ दर्जाचे भिन्नधर्मीय नागरिक मान्य करून, त्यांच्याकडून वेगळा धर्म मानण्याचा कर गोळा करून, त्यांच्या मालमत्तेच्या अधिकाराला नियंत्रित करून हा आर्थिक प्रश्न सोडवण्याचा तकलादू प्रयत्न करण्यात आला.
शेवटी धर्माच्या नावाने सतत चाललेल्या या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उलथापालथीचा अंत प्रबोधनकाळात झाला. आणि राजेशाहीच्या मगरमिठीतून भांडवलशाहीला मोकळा श्वास घेण्यास अनुकूल वातावरण तयार होऊ लागले. भांडवलशाही अजून नवीन गुणवैशिष्ट्ये धारण करायला तयार झाली होती.
--------------
भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ । भाग ५ । भाग ६ । भाग ७
भारतीय राष्ट्रवाद. .,आणि इतर दोन ई-पुस्तिका मी डाउनलोड करून घेतल्या. सावकाश वाचतो. "समाजवाद अाणि भारत" या लेखांची देखील ईपुस्तिका तयार केली तर बरे होईल.
ReplyDelete