Monday, November 25, 2019

हलाहल से हलाहल धुल रहा है

जे होणार होतं ते वाईट होतं. जे होत आहे तेही तितकंच वाईट आहे. पण या दोघांच्या वाईटपणाला एकत्र केलं तरी त्याहूनही अधिक वाईट गोष्ट घडते आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या नकळत आपण तिला हातभार लावतो आहोत.

सर्वपक्षीय नेते आपापले निर्णय केवळ सत्तेची लालसा आणि त्यामागच्या अर्थकारणामुळे घेतलेले आहेत हे पदोपदी दाखवून देत असताना पक्षसमर्थक आणि सर्वसामान्य मतदार मात्र आपापल्या आवडत्या पक्षाचे नेते कसे चारित्र्यवान आणि नीतिमान आहेत हे स्वतःला आणि इतरांना पटवून देण्याची धडपड करत आहेत. त्यातल्या काहीजणांना यातला फोलपणा कळतो पण मग त्यांना एक नवीन प्रश्न छळतो की इतर सर्वजण नीतीमत्ता सोडून वागत असताना केवळ एकाच पक्षावर नीतीमत्तेची जबाबदारी कशी काय टाकावी?

फेसबुकवरील एका वरिष्ठ मित्राने तर अटलजींचा काळ आता राहिला नाही. आता बदललेल्या काळात एका मताच्या अभावामुळे सत्तेवरून पायउतार होणाऱ्या अटलजींसारखी वर्तणूक ठेवणे अशक्य आहे असंही सांगितलं.

हे वाचताना मला दोन गोष्टी आठवल्या.

१) कलियुग आहे कलियुग : अटलजींच्या वेळी बाकीचे पक्षही नीतीमान होते हे आपण अप्रत्यक्षपणे मान्य करतो आहोत हे अनेकांच्या लक्षात येत नाही. वस्तुतः त्याकाळीही अन्य पक्ष तितकेच नीतीमान होते जितके आजकालचे पक्ष आहेत. त्याकाळीही संधीसाधू आणि आप्पलपोटे नेते तितकेच होते जितके आज आहेत. त्याकाळीही आपापला अजेंडा राबवण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी आणि त्यासाठी विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी सगळे राजकीय पक्ष तितकेच उतावीळ होते जितके आज आहेत. 'अटलजींचा काळ आज राहिला नाही' या वाक्यामागे गतकाळ फार उत्कृष्ट होता आणि वर्तमानात सगळी माती झाली आहे, हा भारतीयांचा निराशावाद कारणीभूत आहे.

एकदा का एकेका मन्वंतराचे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे चार भाग परमेश्वराने केले आहेत असं मान्य केलं आणि प्रत्येक युगात समाजातील कलीचं प्रस्थ वाढत जाणार हे मान्य केलं की भूतकाळ हा कायम वर्तमानापेक्षा अधिक स्वच्छ वाटणं स्वाभाविक आहे. पण त्यातून एक अनपेक्षित वाईट परिणाम दिसून येतो की वर्तमान आणि भविष्याला बदलण्याची आपली जबाबदारी टाळून आपण अनीतीचं समर्थन तरी करू लागतो किंवा मग त्याला विरोध करण्याची आपली जबाबदारी टाळतो.

२) रश्मिरथी : राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची रश्मिरथी या नावाची एक महाकविता आहे. शिवाजी सावंतांची मृत्युंजय ही कादंबरी ज्याप्रमाणे कर्णाला उत्तुंग दाखवते त्याप्रमाणे रश्मिरथी कर्णाला मध्यवर्ती भूमिका देऊन रचलेलं महाकाव्य आहे. त्यातील कित्येक संकल्पनांबद्दल माझ्या मनात वादाचे भरपूर मुद्दे तयार असले तरीही एक काव्य म्हणून रश्मिरथी माझी अतिशय आवडती रचना आहे. यात शेवटच्या म्हणजे सातव्या प्रकरणात जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतून बसतं आणि त्याच्यावर शरसंधान करायला कृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतो तेव्हा कवी दिनकरांनी कर्णाच्या तोंडी खालील वाक्ये घातली आहेत

Image Courtesy :  Devadutt Patanaik 

'नरोचित धर्म से कुछ काम तो लो !
बहुत खेले, जरा विश्राम तो लो ।
फंसे रथचक्र को जब तक निकालूं,
धनुष धारण करूं, प्रहरण संभालूं,'

'रुको तब तक, चलाना बाण फिर तुम;
हरण करना, सको तो, प्राण फिर तुम ।
नहीं अर्जुन ! शरण मैं मागंता हूं,
समर्थित धर्म से रण मागंता हूं ।'


त्यावर अर्जुन गोंधळतो आणि त्याला त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाच्या तोंडून दिनकरांनी कौरवांची भीमाला विष खाऊ घालण्यापासून ते द्यूत आणि शेवटी अभिमन्यूवधापर्यंतची पापे वदवून घेतली आहेत आणि मग पुढे दिनकरांचा कृष्ण, कर्णाला विचारतो की,

'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?
सभी कुछ मौन हो सहते रहेंगे ?
कि देंगे धर्म को बल अन्य जन भी ?
तजेंगे क्रूरता-छल अन्य जन भी ?'

'न दी क्या यातना इन कौरवों ने ?
किया क्या-क्या न निर्घिन कौरवों ने ?
मगर, तेरे लिए सब धर्म ही था,
दुहित निज मित्र का, सत्कर्म ही था ।'

'किये का जब उपस्थित फल हुआ है,
ग्रसित अभिशाप से सम्बल हुआ है,
चला है खोजने तू धर्म रण में,
मृषा किल्विष बताने अन्य जन में ।'

'शिथिल कर पार्थ ! किंचित् भी न मन तू ।
न धर्माधर्म में पड भीरु बन तू ।
कडा कर वक्ष को, शर मार इसको,
चढा शायक तुरत संहार इसको ।'


माझ्या वरिष्ठ मित्राने जेव्हा आजकाल सर्वपक्षांची नीतीमत्ता खालावली आहे त्यामुळे एका पक्षाकडून नीतीची अपेक्षा का करावी? हा प्रश्न विचारला तेव्हा मला दिनकरांच्या कृष्णाचं 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' हेच वाक्य आठवलं.

आपली गंमत अशी आहे की आपण सगळ्यांनी कृष्णाला भगवंत मानून टाकलेलं आहे त्यामुळे त्याने केलेल्या कृत्याला अधर्म म्हणणं आपल्या कुवतीबाहेरचं आहे. त्यामुळे अनीतीचं उत्तर अनीतीनेच आणि अधर्माचं उत्तर अधर्मानेच प्रभावीपणे देता येऊ शकतं असा आपण आपला गैरसमज करून घेतला आहे. त्याला साक्ष म्हणून आपण कृष्णाला उभं केलं आहे आणि ती साक्ष सर्वमान्य व्हावी म्हणून आपण कृष्णाला भगवंत म्हणून प्रश्न संपवला आहे. परिणामी आपण कवी दिनकरांच्या कर्णाने पुढे भगवान कृष्णाला दिलेलं उत्तर आपण नजरेआड करतो. कर्ण म्हणतो,

'वृथा है पूछना, था दोष किसका ?
खुला पहले गरल का कोष किसका ?
जहर अब तो सभी का खुल रहा है,
हलाहल से हलाहल धुल रहा है ।'

जहर की कीच में ही आ गये जब,
कलुष बन कर कलुष पर छा गये जब,
दिखाना दोष फिर क्या अन्य जन में,
अहं से फूलना क्या व्यर्थ मन में ?'

'सुयोधन को मिले जो फल किये का,
कुटिल परिणाम द्रोहानल पिये का,
मगर, पाण्डव जहां अब चल रहे हैं,
विकट जिस वासना में जल रहे हैं,'

'अभी पातक बहुत करवायेगी वह,
उन्हें जानें कहां ले जायेगी वह ।
न जानें, वे इसी विष से जलेंगे,
कहीं या बर्फ में जाकर गलेंगे ।'

Image Credit : Internet 
मग यातून बाहेर पडायचं कसं? मला वाटतं याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला आपल्या पुराणकथांचं महत्व समजून घेतलं पाहिजे. कितीही आधुनिक प्रकारचं तंत्रशिक्षण आणि समाजव्यवस्थाशिक्षण घेतलं तरी अजूनही आपली मूल्यव्यवस्था आपल्या जुन्या पुराणकथांवरच अवलंबून आहे. त्यामुळे केवळ गावखेड्यातील बेरकीच नव्हे तर शहरांतील उच्चविद्याविभूषित लोकही नवीन पेचप्रसंगात आपल्या वर्तनाचं किंवा आपल्या असहाय्यतेचं समर्थन करताना पुराणकथांतील दाखले देतात. आपली भाषा आपल्या नकळत तेच प्रश्न विचारते. तेच दाखले देते. पुराणातील विजेत्याला देवत्व दिल्यामुळे आपल्याला आपल्या वर्तनातील विरोधाभासांची जाणीव होत नाही.

राजकारणी, मग ते भारतातील असोत वा जगातील कुठल्याही देशातील, त्यांचे वर्तन फार वेगळे असेल असं मला वाटत नाही. व्यावसायिकांकडून स्वतःसाठी किंवा पक्षासाठी पैसे घेऊन निवडून आलेले राजकारणी शेवटी खाल्ल्या मिठाला जागणार आणि स्वतःच्या सत्तालालसेच्या हाकेलाच ओ देणार याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मग ते घराणेशाहीतून आलेले असोत किंवा मग कुठल्याही सांस्कृतिक संघटनेतून आलेले असोत. त्यामुळे त्यांच्याकडून माझा काही फार मोठा अपेक्षाभंग झालेला नाही. त्यांना वेसण घालण्यासाठी गरज आहे ती इतरांच्या अनीतीतून आपल्या किंवा आपल्या लाडक्या पक्षाच्या अनीतीला नैतिक अधिष्ठान न देण्याची. विरोध करायचा नसेल तरी किमान नापसंती दर्शविण्याची.

आपली लोकशाही अजून तारुण्यात आहे. त्यामुळे ती अशी गोंधळलेली असणं फार नवलाचं नाही. तिचा गोंधळ भांडवलदारांकडून, राजकारण्यांकडून किंवा प्रत्यक्ष भगवंतांकडून दूर केला जाणार नाही. तो दूर होईल तो केवळ शिकल्या सवरलेल्या लोकांच्या पसंती किंवा नापसंतीच्या हुंकारामुळे.

शिवाजी महाराजांनी आपल्यासारखा विचार केला असता तर एतद्देशियांचं राज्य स्थापन झालंच नसतं. किंबहुना मला तर असं वाटतं की तत्कालीन सामान्य माणसांनी आजच्यासारखाच विचार केला असावा ज्यामुळे माझ्या लाडक्या शिवाजीराजाला अविरत संघर्ष करावा लागला. म्हणून भक्तीमार्गाच्या संतांची, शक्तीमार्गाच्या रामदासांची शेवटी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. आणि आता आपल्यातील अनेकांची स्वप्नही अपूर्ण राहतील. पण करणार काय? शेवटी कलियुग आहे. आणि आपण ते स्वीकारलं आहे. आपले नेते घोर कली आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध एक नापसंतीचा कटाक्ष टाकण्यासही घाबरतो आहोत. दुसऱ्या कुणी टाकला तर आपण त्यालाही निरुत्तर करणार आहोत, दिनकरांच्या कृष्णाचं वाक्य त्याच्या तोंडावर फेकणार आहोत, 'हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे ?' मग ते भलेही कितीका चुकीचं असेना.

Thursday, November 14, 2019

गंगावतरण आणि बालदिन

रोज सकाळी टेकडीवर चालायला जातो. तिथे आता छान पायवाटा पडल्या आहेत. काही अतिशय तीव्र उताराच्या आहेत, काही समतल आहेत. काहीवर असंख्य छोटेमोठे दगड आहेत त्यामुळे जरा दुर्लक्ष झालं की घसरुन कपाळमोक्ष होणं ठरलेलं आहे तर काहींवर दगड खडे वगैरे काही नसून अगदी छान मातीचा रस्ता तयार झाला आहे.

इथे चालायला येणारे जुने लोक सांगतात की या पायवाटा गेल्या चारपाच वर्षात पडल्या आहेत. आधी नुसतं जंगल होतं. माझ्या मनात विचार आला की जंगल असल्याने किमान पायवाटा बनल्या तरी त्या टिकून आहेत. आधीच्या लोकांनी सतत चालून मळून ठेवलेल्या पायवाटा आता माझ्यासारख्या नवमॉर्निंगवॉकरला वापरता येतात आणि त्यातली कुठली सोपी, कुठली कठीण तेही ठरवता येतं. जर इथे वाळवंट असतं तर कदाचित आधीच्या वाटसरूंमुळे तयार होणाऱ्या पायवाटा, रोजच्या वाऱ्यांमुळे नाहीशा झाल्या असत्या. आणि आकाशातील ताऱ्यांच्या मदतीशिवाय मार्गक्रमण करणे अशक्य झाले असतं. त्यांच्यामुळेही फक्त दिशा कळली असती. पण पायाखालच्या वाळूत कुठे साप, कुठे विंचू आणि कुठे लपलेले खड्डे आहेत त्याची कल्पना आली नसती. त्यामुळे मी वाळवंटात रहात नसून वनराईजवळ रहातो याचं मला हायसं वाटलं. पूर्वसुरींचं संचितज्ञान, त्यांनी मळलेल्या पायवाटा वापरायला मिळणं हेदेखील एक भाग्यच की!

पण जर जंगल बदलत असेल तर? ठिकठिकाणी दरडी कोसळून पूर्वसुरींच्या मळलेल्या वाटा कालबाह्य होत असतील तर? वादळ आणि अतिवृष्टीमुळे जुन्या पायवाटांशेजारी असलेले वृक्ष उन्मळून पडले असतील तर? त्यांनी पूर्वसुरींच्या पायवाटा बंद करून टाकल्या असतील तर?





आपण आपल्या वनराईत चालत किंवा बैलगाडीने जात असलो पण इतरांनी त्यांच्या वनराईत सायकली, मोटारगाड्या नेणं सुरू केलं असेल तर? इथल्या पिढीने पूर्वजपरंपरेला चिकटून रहावं आणि पायवाट, बैलवाट सांभाळत बसावं का? इतरांना आपल्या वनराईत येण्यात रस नसेल तरीही आपण आपल्या पिढ्यांचा पुढचा प्रवास आपल्यापेक्षा सुखकर व्हावा म्हणून प्रयत्न करावा की करु नये? आणि जर आपण असा विचार करत नसू तर इतरांनी आपल्या वनराईत ढवळाढवळ केली तर आपल्याला चालेल का? जर इतरांनी केलेली ढवळाढवळ न आवडल्याने आपण त्यांना पिटाळून लावलं तर भविष्यासाठी आपण काय टिकवून ठेवायचं? आपल्या पूर्वजांच्या पायवाटा ज्या इतरांच्या आगमनाला रोखू शकल्या नाहीत? की इतरांकडून शिकलेल्या नव्या तंत्राला वापरून आपण नव्या पायवाटा तयार करायच्या?

जुन्या पायवाटा असताना आता त्या नवीन जगासाठी कामाच्या नाहीत म्हणून नवीन पायवाटा पाडणं सोपं नाही. पण असं काम दुसर्‍या महायुद्धानंतर अफ्रिका आणि आशियातल्या अनेक देशातल्या नेत्यांवर आपोआप येऊन पडलं. त्या त्या देशातील नेत्यांनी आपापल्या लोकांच्या मूळ स्वभावाला साजेल असे निर्णय घेत ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. मग तो चीन असो की व्हिएतनाम की इस्त्राएल की कंबोडिया की दक्षिण अफ्रिका.

या सर्व देशात हे निर्णय घेणाऱ्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी सर्व निर्णय अचूक घेतले असं कुणीच म्हणणार नाही. त्यातल्या सगळ्यांनी आपापल्या समाजातील सर्व नागरिकांवर किंवा काही गटांवर अनन्वित अत्याचारही केलेत. त्यांच्या धोरणांमुळे त्या त्या देशातील काही पिढ्यांची आयुष्ये दहशतवाद किंवा बेरोजगारी किंवा सांस्कृतिक क्रांती किंवा अनन्वित क्रौर्य आणि हिंसा यांत भरडून निघाली. असं असूनही त्या त्या देशात ते पूजनीय आहेत. चीनमधील माओ असो किंवा कंबोडियातील नोरोदोम सिंहनुक किंवा इस्राएलमधील डेव्हिड बेन गुरियन. या सगळ्यांनी आपापल्या समाजातील पूर्वसुरींच्या वाटा नाहिशा करत आपापल्या समाजाला येणाऱ्या भविष्यासाठी तयार करण्याकडे लक्ष दिलं. आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांचं हे मोठेपण मान्य करत त्यांनी आखून दिलेल्या नवीन पायवाटांचे हमरस्ते करण्याकडे लक्ष दिलं. त्यांच्याकडून झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पण त्यांच्या चुकांसाठी त्यांच्यावर सातत्याने कोरडे ओढून त्यांची प्रतिमा मलीन करण्यात आपला व समाजाचा वेळ घालवला नाही. जो पायवाट पाडण्यास सुरुवात करतो त्यानेच हमरस्ता बनवून द्यावा असा आतताई आणि अशक्यप्राय आग्रह धरला नाही. हमरस्ते बनणं हे अनेक पिढ्यांचं संचित आहे, त्यात आपलीही जबाबदारी आहे, सगळी जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्याची नाही हे मान्य करून ते समाज पुढे चालत राहिले. गंगावतरणाची कथा कधी ऐकली नसूनही त्यांनी आपले हे पहिल्या पिढीचे नेते म्हणजे राजा सगर आहेत. गंगावतरणाआधीच ते स्वर्गवासी झाले म्हणून त्यांना दोष द्यायचं टाळून स्वतः अंशुमन किंवा दिलीप किंवा भगीरथ होण्याकडे अधिक लक्ष दिलं.

पण या सगळ्यात एकंच देश असा आहे जिथे मळलेल्या पायवाटा सोडून भविष्यसन्मुख नवीन पायवाटा पाडण्यात पुढाकार घेणारे नेते कमनशिबी ठरले. त्यांच्या अनुयायांनी त्यांना देवत्व देऊन थिजवलं तर विरोधकांनी त्यांना दानव ठरवण्यात कुठलीच कमतरता ठेवली नाही. गंगावतरणाची कथा माहिती असूनही गंगा आणू शकले नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवण्यात समाजातील अनेकांनी धन्यता मानली.

आपल्या समाजाचा आत्मा चीनची भिंत बांधणाऱ्या आत्यंतिक कष्ट सहन करणाऱ्या माणसांचा बनलेला नाही. कंबोडियाच्या आणि व्हिएतनामच्या आत्यंतिक अत्याचारी आणि हिंसक माणसांचा बनलेला नाही. तर तो एकाचवेळी सबै भूमी गोपालकी असा संदेश देणाऱ्या देवाची सुंदर लेणी, मंदीरे बांधणाऱ्या आणि त्याचवेळी मोठाल्या जनसमूहाला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या माणसांचा आहे. एकाचवेळी जिवाशिवाचं अद्वैत आणि प्राण्यांतही देव शोधणाऱ्या आणि त्याचवेळी परजातीतील माणसांना अस्पृश्य मानणाऱ्या माणसांचा आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या दशकानुसार समवयस्क असलेल्या चीन, कंबोडिया, इस्राएल, व्हिएतनाम इथल्या नेत्यांप्रमाणे आपल्या देशात वागून चालणार नाही. हे उमजून निर्णय घेणाऱ्या या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकाचा आज जन्मदिवस.

हमरस्ता बांधण्याची जबाबदारी पहिलं पाऊल उचलणाऱ्यावर नसते, ही जाणीव या नेत्याने भविष्याचा मार्ग दाखवलेल्या समाजाला लवकर प्राप्त होवो आणि अंशुमन, दिलीप व भगीरथाची परंपरा या समाजात टिकून राहो, हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने या समाजाला शुभेच्छा

Sunday, November 10, 2019

बेरीज वजाबाकी

बेरजेचं राजकारण :
१) एक मध्यवर्ती सावध नेता
२) सर्वपक्षीय सलोख्याचे संबंध
३) वतनदारीचं आधुनिक प्रारुप
४) घराणेशाही मिरवत घराणेशाहीकडे वाटचाल
५) सरकारी संस्थांचा वापर बहुतकरुन आपल्या व शरणागताच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी. विरोधकांनाही सामावून घेण्याकडे कल असल्याने अडकलेल्याने शरण जाणे आणि मग त्याचे पुनर्वसन करुन एका क्षेत्रापुरतं मर्यादित करुन ठेवण्याकडे कल.
६) घराणेशाहीमुळे कार्यकर्ते कायम सतरंजी उचलण्याच्या भूमिकेत. आपापल्या भौगोलिक क्षेत्रात नेत्याचं नाव वापरुन आपापली कामं करुन घेता येतात याचा कार्यकर्त्यांना आनंद.
७)समाजात राजकारणावरुन भांडणं कमी. समाजात आधीपासून अस्तित्वात असलेली जातीय, आर्थिक, धार्मिक भांडणं वापरून आपापली राजकीय स्थानं बळकट करण्याकडे राजकीय नेत्यांचा कल.
८) नेता व कार्यकर्ता यापैकी कुणाच्याही लैंगिक आयुष्याची अधिकृत व अनधिकृत व्यासपीठावरुन चर्चा नाही. किंबहुना असं काही उजेडात आलं तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल.
९) जैसे थे प्रवृत्ती समाजात आणि राजकारणात प्रबळ.
१०) मोठे बदल घडण्यासाठी किंवा नवीन नेतृत्व उभे रहाण्यासाठी आर्थिक किंवा नैसर्गिक अरिष्टाची गरज.


वजाबाकीचं राजकारण :
१) एक मध्यवर्ती सर्वशक्तिमान नेता
२) सर्वपक्षीय नेत्यांशी दबावाचे संबंध
३) राजकारणाचं कॉर्पोरेट प्रारुप
४) घराणेशाही नाकारत घराणेशाहीकडे वाटचाल
५) सरकारी संस्थांचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आणि त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी. विरोधकांना संपवण्याकडे कल असल्याने ज्यांना पावन करुन घेतलं आहे त्यांच्याही डोक्यावर टांगती तलवार.
६) अघोषित घराणेशाहीमुळे कार्यकर्ते कायम सतरंजी उचलण्याच्या भूमिकेत पण सतरंज्यांची प्रतवारी असल्याने कार्यकर्त्यांमधे उर्ध्वगामी व्यवस्थेत असल्याचा आनंद.
७) समाजात राजकारणांवरुनही भांडणं आणि जुन्या जातीय, आर्थिक, धार्मिक भांडणांना राजकारणाचाही पदर.
८) स्वपक्षीय व अन्यपक्षीय नेता व कार्यकर्ता या सर्वांच्या लैंगिक आयुष्याची अनधिकृत व्यासपीठावरुन चर्चा. किंबहुना असं काही नसलं तरी त्याचा गवगवा करण्याकडे कल. त्यामुळे राजकारणात ब्रह्मचर्याचं किंवा संसारमोहत्यागाचं वाढलेलं प्रस्थ. नेतृत्वाची मेहेरनजर होण्याची शक्यता वाढल्यास आपापल्या लैंगिक आयुष्याचे पुरावे नष्ट करण्याकडे व्यवस्थेची वाटचाल.
९) जैसे थे प्रवृत्तीबद्दल तिटकारा. कुठलीही किंमत देऊन बदल हवा असं मानणारा लोकप्रिय.
१०) मोठे बदल घडण्यासाठी धनिकांचं पाठबळ आवश्यक.