Tuesday, April 26, 2016

निर्गुणी भजने - प्रस्तावना

------------------

------------------
मला गाण्यातलं फार कळत नाही. रागांची नावं वगैरे तर अजिबातच नाही. शाळेत संगीताच्या तासाला मी दाणी बाईंचा फार आवडता विद्यार्थी असावा. कारण रागांची नावे, त्यांची लक्षणगीते, ते कधी म्हणावेत याचे संकेत, या किंवा अश्या सारख्या सर्व प्रश्नांना तोंडी परीक्षेत मी केवळ एकच उत्तर देत असे, 'आठवत नाही'. त्यामुळे माझी तोंडी परीक्षा लवकर आटपायची आणि लेखी पेपर तर माझ्या पुढे बसलेल्या मुलाचा तपासला की माझे मार्क आपोआप ठरायचे. त्यामुळे बाईंच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान क्षण मी वाचवले आहेत याची मला खात्री आहे. पण माझ्या मते मी उत्तम कानसेन आहे. सूर मला मोहात पाडतात. मनावर आलेली मरगळ घालवतात.


मला वाटत संगीताबद्दलची आवड तयार करून मला आपल्या कानसेन घराण्याचा शागीर्द करून घेण्याचे श्रेय माझ्या बाबांकडे जाते. माझे बाबा शास्त्रीय संगीत कमी ऐकत असले तरी भक्ती संगीत आणि नाट्य संगीताचे चाहते होते. पंडित जसराज, कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा, किशोरीताई आमोणकर हे त्यांचे आवडते गायक. तुटपुंज्या पगारात त्यांनी एक छान रेकॉर्ड प्लेयर घेतला होता आणि त्यांच्या आवडत्या गायकांच्या रेकॉर्ड ते मोठ्या हौसेने विकत आणायचे. लहानपणी कुमारजींची निर्गुणी भजने मी आवडीने ऐकायचो असे माझी आई सांगते. मी तीन चार वर्षाचा असताना, माझ्या लहान भावाच्या जन्मानंतर एके दिवशी, आता हे छंद परवडायचे नाहीत असे वाटून त्यांनी तो रेकॉर्ड प्लेयर आणि त्या रेकॉर्ड्स घरातून काढून टाकल्या. मी चौथीत गेल्यावर, ताप काढून त्यांना फिलिप्सचा टू इन वन टेपरेकॉर्डर घ्यायला लावला. पण त्यांनी त्यातल्या रेडीओलाच जवळ केले. नाही म्हणायला, सुरेश वाडकरांची 'ओंकार स्वरूपा'ची आणि भीमसेन जोशींची 'सुन भाई साधो'ची, अश्या दोन कॅसेटस त्यांनी आणल्या होत्या. पण निर्गुणी भजने घरातून गेली ती गेलीच. बाबांनी जणू काही आपलं संगीत प्रेम आवरूनच घेतलं होतं.


मग मी मित्रांकडून कॅसेटस आणू लागलो. वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून किंवा बक्षीसाच्या पैशातून विकतही घेऊ लागलो. त्यात सगळं काही होतं. आधी किशोर कुमार आला, मग हेमंत कुमार, मग मन्ना डे, मग तलत मेहमूद, मग अजून एक ट्रॅक त्यात वाढला तो म्हणजे इगल्स, एल्विस प्रेसले, आणि मग बिली जोएल, मायकेल जॅक्सन. मग सी ए च्या अभ्यासाची आर्टीकलशिप सुरु झाली आणि माझा स्टायपेंड पण सुरु झाला. त्यातून कॅसेटस विकत घेणं सोपं झालं. त्यानंतर माझा ट्रॅक एकदम बदलून गेला आणि मी वाद्य संगीताकडे वळलो. उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं रविशंकर ऐकू लागलो. मग ओशोंच्या आश्रमातील ध्यानासाठीचे संगीत ऐकू लागलो. रोज (Rose) मेडीटेशन, गार्डन ऑफ बिलव्हेड, बॅशोज पॉण्ड, ओपन विंडो हे माझे सी ए चा अभ्यास करतानाचे आवडते अल्बम्स होते. तोपर्यंत बाबा, आपल्या कानसेन घराण्याच्या शागीर्दाची धडपडत चालणारी प्रगती लांबूनच बघत होते. मग पैसे कमवू लागलो आणि वाद्य संगीताच्या जोडीला बाबांचे लाडके पंडीत जसराज, कुमारजी, भीमसेनजी, वसंतराव आणि अभिषेकी बुवा कधी आले ते कळलेच नाही. मी अधाश्यासारखं ऐकत होतो. आता शागीर्दाच्या साथीला उस्ताद स्वतः (म्हणजे बाबा) पण येऊ लागले. आणि आम्हा कानसेनांची मैफल रंगू लागली. सगळे गायक आवडत होते पण मनात मोठ्ठ घर केलं कुमारजींनी. त्यांचे गीत वर्षा, मला उमजलेले बालगंधर्व, स्वरांजली ऐकता ऐकता हाती लागली 'निर्गुण के गुण' ची कॅसेट. त्यानंतर घरात निर्गुणी भजने पुन्हा आली ती कायमचीच.


सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. यु ट्यूब ची मजा घेत होतो पण बाबांना यु ट्यूबवर दाखवण्यासारखं काही मिळत नव्हतं. एक दिवस काम करताना कंटाळा आला म्हणून जरा सर्फ करत होतो तर माझ्याकडच्या कुमारजींच्या कॅसेटमधली माझी आवडती 'उड जायेगा हंस अकेला', 'हिरना' ही निर्गुणी भजनं मिळाली. ती ऐकता ऐकता, माझ्याकडच्या कॅसेटमध्ये नसलेली अजून अनेक निर्गुणी भजनं सापडली. नंतरच्या एका रविवारी बाबांना बसवून ऐकवलं. ते पण फार खूष झाले होते. त्यांच्याकडचा रेकोर्ड प्लेयर गेल्यावर त्यांचं हे आवडतं भजन त्यांनी पण वीस एक वर्षांनी ऐकलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी यु ट्यूबला मनोमन लाखो धन्यवाद दिले होते.


त्या दिवशी बाबांना ऐकवलेलं भजन होतं, 'सुनता है गुरु ग्यानी'. भजन फार सुंदर. वेगळेच शब्द. शेवटच्या चरणातील, 'कहे कबीरा सुन भाई साधो' मुळे हे कबीराचे आहे ते कळले होते. पण कुमारजींचा स्वर्गीय सूर ऐकताना शब्दांकडे लक्ष कमी जायचे. हे फक्त ऐकूनच आपण काहीतरी फार पवित्र, मंगल करतोय असे वाटायचे. आणि शब्द सुरांच्या त्या अनवट रचनेचा अर्थ न कळता सुद्धा तिचा वारंवार आनंद घ्यायचो. नंतर एकदा आंतरजालावर या रचनेचे शब्द मिळाले. आणि आपल्याला काही कळत नाही या माझ्या निष्कर्षावर शिक्का मोर्तब झाले. पण भजनाची गोडी काही कमी झाली नाही.

जोपर्यंत शब्द सुरात घोळून येत होते तोपर्यंत सुरांची मोहिनी इतकी होती की शब्दांकडे दुर्लक्ष होत होते. पण जेंव्हा शब्द अक्षरांच्या स्वरूपात आले, तेंव्हा मात्र त्यांचा अर्थ आपल्याला कळत नाही आहे हे डाचू लागले. कुठे काही मिळेल तर शोधणे चालू होते. त्याशिवाय स्वतःचे अर्धवट का असेना पण डोके चालवणे होतेच. पण अर्थ सुस्पष्ट लागत नव्हते. मग एक दिवस 'डॉ स म परळीकरांचे', 'सार्थ निर्गुणी भजने' हे पुस्तक हाती आलं. हे छोटेखानी पुस्तक खूप सुंदर आहे. त्यात कबीरांची २१ तर इतर संतांची ९ निर्गुणी भजने आहेत. लेखक स्वतः, एम ए च्या विद्यार्थ्यांना कबीर भजने सात आठ वर्षे शिकवत होते असे त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. त्यामुळेच की काय पण पुस्तकाची मांडणी मूळ भजन, मग शब्दार्थ आणि मग लेखकाला उमजलेला भावार्थ अशी थोडीशी क्रमिक पुस्तकांसारखी आहे. या पुस्तकाने माझी अर्थासाठीची भूक अंशतः का होईना पण भागवली खरी. किंवा ही निर्गुणी भजने समजण्यासाठीची पूर्वपीठीका आणि त्यांचा अर्थ कसा लावावा त्याचे दिग्दर्शन या पुस्तकाने अतिशय उत्तम रीतीने केले.

शब्दार्थ जरी एकसारखे असले तरी भावार्थ मात्र प्रत्येक माणसाला त्याच्या आकलनाप्रमाणे वेगवेगळे वाटू शकतात. आणि निर्गुणाचे वर्णन सगुण शब्दांनी केले असल्याने त्यात अनेक अर्थ लपले असतात किंवा त्यातून अनेक अर्थ निघू शकतात. शाळेतील दाणी बाई जर संगीताबरोबर कबीर आणि हठयोग शिकवत असत्या तर या दोन विषयांवरील माझे प्रभुत्व, संगीताच्या अभ्यासाइतकेच प्रगल्भ आहे याचे प्रमाणपत्र त्यांनी स्वहस्ते दिले असते आणि मलाही ते मान्य आहे. पण ज्ञान वाटल्याने वाढते या सुविचाराचा अनुभव घेताना मला अजून एक अनुभव आलेला आहे की अज्ञान वाटल्याने कमी होते, म्हणून मला आवडलेल्या निर्गुणी भजनांचे माझ्या अल्पमतीला लागलेले भावार्थ लिहून ठेवायचा संकल्प केला आहे. यात डॉ. परळीकरांचे पुस्तक, सिंगिंग एम्प्टीनेस हे लिंडा हेस यांचे पुस्तक, आंतरजालावरची माहिती हा पाया आणि त्यावर माझे मुक्त चिंतन करू शकीन असे आत्ता तरी वाटते आहे. या प्रयत्नात माझे अज्ञान उघडे पडले तर इथले मित्र मदत करतील आणि मला, आपल्या आकलनाचा फायदा करून देतील अशी खात्री आहे.
------------------

------------------

Friday, April 1, 2016

अपाचे लोकांची दंतकथा आणि यमराज

शाळा संपली. शाळेतले मित्र तुटले. आणि कॉलेज मध्ये एकटा पडलेल्या मला नवीन मित्र मिळाला. Saumitra S Manohar. त्याला पण कराटेचे वेड आणि मला पण. तो पण ब्रूस ली, जॅकी चॅन, सॅमो हॉन्ग चा भक्त आणि मी पण. त्याला पण पिक्चरचा शौक आणि मला पण. त्याच्याकडे पण पैसे नसायचे आणि माझ्याकडे पण. पण त्याच्याकडे दोन गोष्टी माझ्यापेक्षा जास्त होत्या. एक म्हणजे व्ही सी आर आणि दुसरा म्हणजे मोठा भाऊ. त्याचा मोठा भाऊ सौरभ मितभाषी. त्याच्याकडे मी पहिल्यांदा कॉम्प्युटर हाताळला. विंडोज ९२ वर माऊस वापरून क्लिक पहिल्यांदा सौरभच्याच कॉम्प्युटरवर केले. मग सौमी आणि सौरभचे ऑडीओ आणि व्हीडीओ कॅसेट चे कलेक्शन मला त्यांच्या घरी बोलावू लागले.


इंडियाना जोन्स, घोस्ट बस्टर्स, स्पेस बॉल्स हे सगळे तिकडे बघितले. हॅरिसन फोर्ड, रिक मोरानीस, मेल ब्रुक्स या मंडळींशी परिचय झाला आणि न संपणारे प्रेम प्रकरण सुरु झाले ते इथेच. स्टीवन स्पीलबर्ग, जॉर्ज लुकास या महान लोकांचा परिचय झाला तो देखील इथेच. मग एका दुपारी सौमीने  आणला नवीन पिक्चर. फॉर अ फ्यू डॉलर्स मोर (बहुदा सौरभ ने आणला असावा , आणि सौमीने आम्हाला बघायला बोलावले).  हिरो होता कोणी एक क्लिंट इस्टवूड नावाचा माणूस. आणि मग सुरु झाले वेस्टर्न / काऊबॉय चित्रपटांचे वेड. सौमीने  काऊबॉय हॅट पण आणलेली होती. कॉलेजच्या एका traditional day ला तर तो काऊबॉय बनून आलेला होता. मग एक दिवस सौरभ ने वेस्टर्न चित्रपटांच्या संगीताची ऑडीओ कॅसेट आणली. पुरेशी जुनी झाल्यावर मी ती माझ्या घरी आणली. सगळे इंस्ट्रूमेंटल संगीत होते. शब्द काहीच नाही. त्यातली एक ट्यून फार आवडली. मी आणि सौमी रस्त्याने जाताना बरेच वेळेला ती म्हणत किंवा शीळेवर वाजवत असू. ट्यून होती मॅकानाज गोल्ड नावाच्या चित्रपटाची. हा पिक्चर बघायचा राहून गेला कॉलेजमध्ये असताना.
मग पुढे पैसे कमवू लागल्यावर स्वतःचं कलेक्शन चालू केलं तेंव्हा मॅकानाज गोल्डची डी व्ही डी घेऊन ठेवली. त्यात ती ट्यून ज्या गाण्याची आहे ते गाणे पण बघितले. "ओल् टर्की बझर्ड". गाणे प्रचंड आवडले होते. मुलांना शाळेत सोडायला जाताना कधी कधी मी त्या गाण्याचे पहिले कडवे (तेव्हढेच मला पाठ आहे) म्हणतो. म्हणून त्यांना पण ऐकून माहीत झाले.


आणि दोन आठवड्यापूर्वी रविवारी दुपारी मुलं मस्ती करत होती म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी माझा सी डी / डी व्ही डी चा खण उघडला आणि जो हाताला लागेल तो चित्रपट बाहेर काढून पोरांना लावून दिला. लागला मॅकानाज गोल्ड. म्हटलं बघा हा पिक्चर. मी जे गाणे सकाळी कधी कधी म्हणतो ते याच पिक्चर मधले आहे. पिक्चर सुरु झाला. टायटल्स संपली आणि जोस फेलीसिआनोच्या आवाजातले गाणे लागले. ग्लेन केनॉनच्या निर्मनुष्य, तांबड्या - लाल, रखरखीत आणि उजाड भूप्रदेशावर उडणारे गिधाड दुरून दिसते आणि सूत्र संचालक आपल्याला एक गोष्ट सांगायला सुरू करतो… मग थोडे गाणे… मग पुन्हा थोडी गोष्ट… मग पुन्हा उरलेले गाणे असा तो पहिला सीन आहे…  ती गोष्ट आणि ते गाणे आंतरजालावरून उचलून, खाली देतोय.


(Speech)
There's an old story
the way the Apaches tell it;
A man was riding in the desert
and came across a vulture
the kind they call turkey buzzards
in Arizona, sittin' on a rock.


"Hey," the man says, "how come you
old turkey buzzard's sittin' here?
I saw you flying over Hadleyberg,
and I didn't want to meet up with you...
so I turned around and come this way."


Old turkey buzzard says:
"That's funny,
I was only passing through that town.
I was really coming over here
to wait for you."


(Jose Feliciano sings)
Ol Turkey Buzzard, Ol Turkey Buzzard
Flyin, Flyin high,
He's just waiting
Buzzard just a-waiting
Waiting for something down below the dive
Old Buzzard knows that he can wait
Cause every mother's son has got a date,
A date with Fate.. With fate


He sees men come, he sees men go,
Crawling like ants on the rocks below
The men will steal, the men will dream
And die for gold onthe rocks below
Gold, Gold, Gold, they just gotta have that gold
Gold, Gold, Gold, they'll do anything for gold


(Speech)
A thousand years ago, in the southwest, there was an Apache legend. It told about a hidden canyon guarded by the Apache gods and rich with gold. As long as the Apaches kept the canyon a secret and never touched the gold, they would be strong...powerful. That was the legend.


When the spanish conquistadores came, they searched for the canyon, they called it canyon del oro, meaning canyon of gold, but they never found it


Three hundred years later, the Americans came. They heard about the legend but called it, "The Lost Adams". That was because a man named Adams saw it once or so he said. But whether he did or not, he never saw anything again because the Apache's burned out his eyes.


Everybody knew about the legend and a lot of people believed it: Canyon del oro; The Lost Adams. Then for a while there back in 1874, they called it McKenna's Gold.


(Jose Feliciano sings)
Ol Turkey Buzzard, Ol Turkey Buzzard
Flyin, Flyin high,
He's just waiting
Buzzard just a-waiting
Waiting for something down below the dive
Old Buzzard knows that he can wait
Cause every mother's son has got a date,
A date with Fate.. With fate


He sees men come, he sees men go,
Crawling like ants on the rocks below
A whiff of gold and off they go
to die like rats on the rocks below
Gold, Gold, Gold, they'll do anything for gold
Gold, Gold, Gold, gotta have McKenna's gold


वर दिलेल्या लिंक मधला चित्रपटाच्या सुरवातीच्या सीनचा आवाज जरा हळू आहे. म्हणून speech शिवाय फक्त गाण्याचा हा व्हिडीओ,

कधी कशाची कशाला लिंक लागेल ते काही सांगता येत नाही. त्या दिवशी हा सीन बघताना एकदम लिंक लागली ती पुराणातल्या एका कथेशी. कथा गरुडाची. विष्णूच्या वाहनाची. या गरुडाची आई विनता. (काही जण विनिता म्हणतात, तर काही जन विनुता म्हणतात. पण मी पहिल्यांदा वाचले होते तेंव्हा तिचे नाव विनता वाचले होते म्हणून माझ्या लेखी ती विनता). गरुडाचे आईवर फार प्रेम. आई म्हातारी झालेली असते. आता तिचा अंत:काळ जवळ आलेला असतो. गरुडाला ती कल्पना देखील सहन होत नाही. म्हणून तो आईला आपल्या पाठीवर बसवतो आणि सुदूर, दुर्गम अश्या पर्वतावर घेऊन जातो. तिथे पोचतो तो यमराज त्याचीच वाट पहात उभे असतात. म्हणतात, तुझ्या आईचा मृत्यू इथेच लिहिलेला होता. म्हणून मी इथेच तिची वाट पहात उभा होतो. इतके बोलून, विनताचे प्राण घेऊन यमराज निघून जातात.


आणि आज हे सगळे लिहायला बसलो तर कॉलेज पासूनच्या प्रिय मित्र सौमी, त्याचा मितभाषी मोठा भाऊ सौरभ, त्यांच्या घरी घालवलेल्या अनेक दुपारच्या वेळा, तिथे पहिल्यांदाच बघायला मिळालेले अनेक चित्रपट, अभिनेते, दिग्दर्शक, ऐकायला मिळालेले संगीत, आणि त्यातून तयार करून ठेवलेल्या आठवणी सगळं काही उगाच आठवलं.